सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३

देवभूमी..! 🕉️ (भाग क्रमांक ५ )


 




मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️

 देवभूमी..! 🕉️
(भाग क्रमांक  ५ )

===================================

दिनांक २० मे २०२३, शनिवार रोजी सकाळी साधारणतः ९:३० वाजता रामबाडाहून आम्ही पुन्हा बाबा केदारनाथाच्या दिशेने पायी मार्गस्थ झालो होतो खरे,पण रामबाडा हून पाय निघत नव्हता, पण पुढे निघणे गरजेचे झाले होते. जे आकाश अगोदर निळेशार दिसत होते आता त्याच आकाशात  काळया ढगांनी दाटी करायला सुरुवात केली होती.अंगाला झोंबणारे थंडगार वारे सुरू झाल्याने अंग अजून गारठून गेले होते.जर यदा कदाचित पाऊस आलाच तरी आमच्या बॅग मध्ये आम्हा चौघांचे रेनकोट असल्याने ओले होण्याची चिंता नव्हती.मात्र चिंता अतिशय थंडगार पावसाच्या पाण्याच्या थेंबांची होती.त्याच अतिशय थंडगार पावसाच्या पाण्याच्या थेंबाचा प्रभाव आसपासच्या वातावरणात होऊन वातावरण अजून गारठून जाईल अन् जास्तीचा पाऊस जर सुरू  झाला तर भौगोलिक परिसराची अनामिक भीती मनात आली होती. जर पाऊस सुरू झाला अन् आपण अर्ध्याच रस्त्यात ओले होऊन पार गारठून गेलो तर वाटेतच हरी ओम करावे लागणार होते.पुढील रस्ता छातीवर येणारा अतिशय उंच चढणीचा होता. मुलांना चालण्याच्या सूचना दिल्या, पण त्यांना तिथलं मनमोहक वातावरण पुढे जाऊ देण्यास परवानगी देत नव्हते.थोरला चिरंजीव नमन मला म्हणाला...
" दादा, थोडं अजून थांबा ना..! किती भारी दृष्य आहे.आपण पुन्हा पुन्हा थोडी येणार आहोत. " त्याचं बोलणं मनाला पटलं. त्याचं वय ऐन तारुण्यातील , त्यात पुन्हा अवतीभोवती हिरवळ, उंच पर्वत रांगा, बाजूला मंदाकिनी नदी..! एका नवतरूणाला किंवा एका नवतरुणीला आपल्या ऐन तारुण्यातील आपलं गद्य किंवा पद्य मन व्यक्त करायला यापेक्षा दुसरं ठिकाण कोणते असू शकते का..? उत्तर माहीत असलेल्या या प्रश्नांमुळे मी काही वेळ तिथं थांबायला तयार झालो.

तारुण्य भित नाही. तारुण्य आपल्या मनाला मुक्त करत असते. तारुण्याला एकच भाषा माहीत असते अन् ती म्हणजे सळसळत्या रक्ताला आपल्या मनाच्या तर कधी शरीराच्या द्वारे व्यक्त करणे. यात मन नेहमी आघाडीवर असते.तारुण्याच्या या भाषेला लिपी नसते. असतो फक्त आणि फक्त भावनेचा हुंकार..! तरुणांची तरुण मनं,  प्रौढांनी निदान निसर्गरम्य परिसरात  जपायला हवीत या मताचा मी..! त्यामुळं होकार दिला अन् मी अन् माझी धर्मपत्नी बाजूला असलेल्या अर्धवट ओल्या दगडी ओट्यावर बसलो.आमची दोन्ही मुलं रामबाडा परिसर, मंदाकिनी नदी अन् तिथला परिसर आपल्या मोबाईल मध्ये स्वतः सोबत तर कधी फक्त त्या परिसराला बंदिस्त करू लागली.

मी अन् माझी धर्मपत्नी बाजूला असलेल्या अर्धवट ओल्या दगडी ओट्यावर बसलेलो असताना माझ्या मनात विचारांचे तरंग उमटायला सुरुवात झाली. दोन्ही बाजूला असलेल्या केदारनाथ घाटीच्या उंच उंच पर्वत रांगा बघून आपण या निसर्गाच्या अदभुत शक्तीच्या पुढे किती खुज्जे आहोत हे बघण्यात मन रमुन गेले होते.केदारनाथ घाटातील दोन्ही बाजूच्या उंच उंच पर्वत रांगा अन् त्यातून वाहणारी मंदाकिनी नदी बघून माझ्या मनातील रसिकता अन् भावुकता जागृत झाली होती. दोन्ही बाजूच्या उंच पर्वत रांगा अन् त्यातून ऐन मधोमध वाहणारी मंदाकिनी बघून केशसांभार केलेल्या एखाद्या स्री च्या डोक्याच्या ऐन मधोमध चांदीचा हार सजवून ठेवला आहे असं ते मनोहारी दृष्य दिसत होते.तो मंदाकिनीचा चांदीचा हार आपल्यातील सौंदर्याने आजूबाजूच्या पर्वताला आपल्या मोहात पाडत होता. त्या उंच पर्वत रांगा देखील, मंदाकिनी नदीच्या मनमोहक रूपाला भाळून  नदीच्या पात्रात अधून मधून आपल्या शरीरावरील खाच खळगे दगड धोंडे अन् वृक्ष यांचा प्रेमळ वर्षाव करत होते. आजूबाजूच्या पर्वत रांगांचा हा प्रेमळ वर्षाव तेंव्हा खूप बहरात येत असेल जेंव्हा हीच मंदाकिनी नदी आपल्या ऐन उफाणावर येत असेल..!

आता आकाशात काळया ढगांची दाटी वाढली होती, त्यामुळे मी मुलांना आवाज दिला अन् आपल्याला आता पुढे जाणे का गरजेचे आहे हे सांगितले.आमच्या दोन्ही मुलांपैकी एकाने आपल्यातील पौगंडावस्थेतील हळुवार वयाला अन् एकाने आपल्यातील ऐन तारुण्याला मुरड घातली अन्  पुढे जाण्यास तयार झाले. पहाटे पाच वाजता गौरी कुंड येथून निघालो होतो तिथून ते इथपर्यंत थोरला चिरंजीव नमन याच्याच पाठीवर मोठी सॅक बॅग होती.बॅग मधील वस्तूंमुळे थोरला चिरंजीव नमन याच्या पाठीवर साधारणतः दहा किलो वजनाची बॅग होती. त्याची तब्येत मजबूत असल्यामुळे या कामासाठी त्याची निवड योग्य होती.तरी पण थकवा शेवटी येतोच. पहाटे पाच ते सकाळी नऊ असे सलग चार तास चढणीच्या रस्त्यावर पाठीवर दहा किलोची बॅग घेऊन चालल्यामुळे साहजिक आहे थकवा येणारच..! मात्र या थकव्या विषयी नमन काही बोलला नाही.त्याच्या आईला बहुदा जाणीव झाली अन् तिने नमन कडील बॅग स्वतःच्या पाठीवर घेतली.तो नाही नाही म्हणाला पण तरी देखील तिने आग्रहाने घेतली.या सजीव सृष्टीतील सर्व प्राण्यांमध्ये आपल्या लेकराचं मन आईच सर्वात अगोदर ओळखते याचं ते मूर्तिमंत उदाहरण माझ्या समोर प्रस्तुत झाले होते. मी मग माझ्या पत्नीकडून तिची पर्स माझ्याकडे घेतली अन् खूपच चढणीचा  प्रवास सुरू झाला. सॅक बॅग आळीपाळीने माझी पत्नी, धाकटा मुलगा नयन अन् थोरला चिरंजीव नमन यांनी इथुन पुढे आपल्या पाठीवर घेण्याचे नियोजन केले.त्यात आघाडीवर थोरला चिरंजीव नमन हाच होता. कमी वेळासाठी धाकटा चिरंजीव नयन अन् माझ्या पत्नीने सॅक बॅग आपल्याकडे घेतली होती.  पर्स माझ्याकडे तर कधी नयन कडे तर कधी माझ्या पत्नीकडे ,मात्र जास्तीत जास्ती वेळ सॅक बॅग थोरला चिरंजीव नमन यानेच आपल्या स्वतच्या  पाठीवर घ्यायचे स्वतः हुन आग्रहाने स्वीकारले होते.

खूपच उंच चढणीच्या प्रवासामुळे पायात गोळे यायला लागले होते.पायात गोळे येऊ लागले होते,पण आम्हा चौघांचा श्वास अजून पर्यंत तरी योग्य लयीत होता. साधारणतः सकाळी अकरा वाजता आम्ही थांबा घ्यायचे ठरवले.उंच चढणीच्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका छोट्या हॉटेल मध्ये, हॉटेल कसले ते..? निळ्या प्लास्टिकचं ओबड धोबड आच्छादन असलेलं छोट दुकानच होतं. त्याच्या रंग रुपापेक्षा तिथं ऐनवेळी खायला प्यायला काय उपलब्ध आहे यावरून त्याच स्थान पंचतारांकित हॉटेल पेक्षाही श्रेष्ठ वाटू लागले होते. त्या दुकानात अर्धवट ओल्या दगडी ओट्यावर बसलो.  पहाटे पाच वाजता गौरी कुंड येथून प्रवासाला सुरुवात केली होती.सकाळी सात वाजता मी, माझी धर्मपत्नी अन् दोन्ही मुलांनी पतंजलीचे प्रत्येकी एक एक बिस्कीट पुडा खाल्लेला होता.रस्त्यात एका ठिकाणी सरबत पिलो होतो. तेवढाच आधार होता. आता सकाळचे अकरा वाजले होते. अगदी सुरुवातीला पहाटे पाच वाजता पायी निघाल्या पासून ते आता सकाळच्या अकरा वाजेपर्यंत सहा तास झाले होते.पोटात भुकेचा व्याकूळ आवाज येऊ लागला होता. चढणीच्या प्रवासामुळे पायात गोळे येऊ लागले होते. त्यात पुन्हा प्यायचे पाणी पोटात कमी गेल्यामुळे घसा कोरडा तर नाही,पण तहान लागली होती. बरं,पाणी प्यावे तर ते दातखिळी बसेल इतके थंडगार होते. मात्र पाणी पिणे आवश्यक होते.नसता पायातील गोळे अजून वेदनादायी होऊन आम्हाला जागच्या जागीच बसायला भाग पाडू शकणार होते. आम्ही सर्वजण अर्धवट ओल्या दगडी ओट्यावर बसलो आणि त्या छोट्या दुकानातील दुकानदाराला माझ्या थोरल्या मुलाने विचारले..

" चाचा, खाने के लिये क्या है..?"
दुकानदार - " भाई साब, खाने के लिये तो नही हैं, पर पिने के लिये लस्सी, माझा हैं | दुं क्या..?"
मी सोबतच्या सर्वांना म्हणालो - " आपल्या सोबत पतंजलीचे खारे बिस्कीट पुडे आहेत.ते अगोदर खाऊन घ्या.मग आपण पिण्यासाठी काहीतरी घेऊ. नमन, त्या दुकानदाराकडून पिण्याच्या पाण्याच्या बाटली विकत घे अगोदर..! खूप तहान लागली आहे."
पाण्याची बाटली विकत घेऊन आम्ही पाणी पिऊन तृप्त झालो होतो.पाणी थंडगार होते,पण लागलेली तहान भागली होती हे महत्त्वाचे झाले होते.संकट आले की, माणसाचे नखरे नाहीसे होतात हेच खरं..! ज्या थंडगार पाण्याविषयी अगोदर मी स्वतः नाक मुरडत होतो, आता तेच पाणी खूप ग्लानी आल्यामुळे निमुटपणे प्यावे लागले होते. खारे बिस्कीट खाऊन झाले होते.आता नमन याने त्या दुकानदाराकडून अमुल लस्सीचे चार पॅकिंग मागवून घेतले.अमुल लस्सीतील गोडवा जिभेला अन् मनाला थंडावा देऊन गेला.शरीरातील ग्लानी बऱ्याच प्रमाणात कमी झाली होती.लस्सीचे अजून एक एक पॅकिंग मागवून घेतले अन् मस्तपैकी लस्सी पिऊन काहीवेळ शांत बसून राहिलो. दुकानदाराचे बिल रोखीने दिले. बसल्यामुळे आराम तर मिळाला,पण मला पायातील गोळे वर मांडी पर्यंत आल्यासारखे जाणवू लागले होते. उठावे वाटत नव्हते,पण अजून मोठा पल्ला गाठायचा होता.त्यामुळं शरीराचे न ऐकता मनाचे ऐकून मार्गस्थ झालो.

आता सकाळचे सव्वा अकरा वाजले होते.आकाशात काळया ढगांची गर्दी असल्यामुळे वातावरण ओलसर अन् खूपच थंडगार होते.रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. घोडे, पायी, डोली असणारे, पाठीवर प्रवाश्यांना घेऊन जाणारे येणारे असे एकंदरीत सर्वजण दाटीवाटीने प्रवास करत होते. काही हट्टे कट्टे तरुण तरुणी देखील त्या मुक्या घोड्याच्या / खेचराच्या पाठीवर बसून मोठा शौर्याचा आविर्भाव आणून चढत होते, उतरत होते. काही खेचर घोडे यांची होणारी हेळसांड, त्यांची दुर्दशा पाहून  यावरून बसून जाणाऱ्या तरुण तरुणी यांना खरचं बाबा केदारनाथ प्रसन्न होईल का..? हा प्रश्न माझ्या मनात आला.मुक्या प्राण्यांना देखील संवेदना असतात. मात्र ज्यावेळी हट्टे कट्टे तरुण तरुणी देखील त्या मुक्या घोड्याच्या / खेचराच्या पाठीवर बसून एक भक्त म्हणून दर्शनाला जात होते कुणी उतरत होते ते बघून यांचं हे पर्यटन आहे की मनोभावे श्रद्धेय  तीर्थयात्रा याविषयी माझ्या मनात शंका आली होती. वयोवृध्द नागरिक, बालक, आजारी व्यक्ती यांनी मुक्या प्राण्यांच्या पाठीवर, चार माणसांच्या खांद्यावरील डोलीतून, एखाद्या पुरुषाच्या, स्री च्या पाठीवरील डोलीतून बसून जाणे उतरणे एकवेळ समजू शकतो,मात्र कानात हेड फोनचे बोळे अडकवून मुक्या प्राण्यांच्या पाठीवर, इतरांच्या खांद्यावरील डोलीत , पाठीवरील डोलीत मोठ्या रुबाबात बसून एक भाविक भक्त म्हणून यांचे स्थान काय आहे , असेल हे त्या परम पित्या बाबा केदारनाथ महादेवालाच माहीत. अशीच शारीरिक अन् मानसिक दुर्दशा त्या चार पुरुषांची  होत असेल जे  आपल्या खांद्यावरून डोलीतून काही  हट्टे कट्टे तरुण तरुणींना घेऊन चालले होते कुणी उतरत होते. तिथल्या पुरुषांच्या पाठीवरील डोलीतून देखील काही हट्टे कट्टे तरुण तरुणी आपल्या कानात हेड फोनचे बोळे अडकवून प्रवासात दिसले. मला काही घोड्याच्या खेचरांच्या अंगावर जखमेचे व्रण देखील दिसले.मात्र आपली वेदना व्यक्त करण्याचा हिसकावून घेतलेला अधिकार फक्त माणूस प्राणी नावाच्या जातीला आहे. इतर मुक्या प्राण्यांना नाही. मुक्या प्राण्यांना फक्त धावणे, पळणे, कष्टाचे काम करणे हेच माहित. हा विचार खूप खोलवर वेदना देऊन गेला. जाऊ द्या आपल्याला काय करायचे हा निष्पक्ष विचार मनात आला अन् माझे विचारचक्र थांबले होते.

केदारनाथ घाटीतून प्रवास करताना एका बाजूला प्रचंड खोल दरी अन् दुसऱ्या बाजूचा हिमालयातील केदारनाथ घाटीचे उंचच उंच पर्वत रांगा.यांना सोबत घेऊन आम्ही हर हर महादेव असा अधून मधून जयघोष करत पुढे पुढे उंच उंच चढू लागलो होतो.साधारणतः दोन तास चालून झाल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडी ओट्यावर आम्ही सर्वजण बसलो.आता मात्र शरीर पार थकून गेल्यासारखे जाणवू लागले होते.त्यातल्या त्यात थोरला चिरंजीव नमन जास्तच काकुळतीला आला होता. त्याचं कारण बॅग चे ओझे घेऊन अन् उंच उंच चढण चढत तो प्रवास करत होता.त्याने त्याची काकुळतीला आलेली भावना व्यक्त केली नाही,पण मला त्याच्या देहबोलीतून ते जाणवलं होतं.

वंदे मातरम्..!
हर हर महादेव..!🙏🏻🕉️🙏🏻

एक भटका प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - १९ सप्टेंबर  २०२३, मंगळवार ( गणेश चतुर्थी )

क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा