मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
आभासी विश्वातील वास्तववादी मित्र, शिरीष भाऊ..!
===================================
आभासी विश्वात पण ,आपलं कुणीतरी भेटतं, फक्त आपलं त्याच्याशी भेटणं हे आभासी का असेना,पण त्याला वास्तवाची किनार असावी लागते. त्याच आभासी विश्वात आपल्या सारखं , साध्या सरळ पद्धतीने आयुष्य जगणारं ज्यावेळी कुणीतरी भेटतं तेंव्हा आभासी विश्वात देखील आपलं कुणीतरी आहे याची जाणीव होते. याच आभासी विश्वातील फेसबुक या माध्यमाचा वापर आपण कसा अन् कुणाच्या सोबत करतो त्यावर या विश्वातील नात्याची गुंफण तयार व्हायला सुरुवात होते. फेसबुक या आभासी विश्वात मी इ. स.२०१२ पासून कार्यरत आहे.फेसबुकचा योग्य वेळी अन् माझ्या दृष्टीने योग्य भासणाऱ्या फेसबुक मित्रांच्या सहवासात वावरणं मला आवडते. फेसबुक माध्यमावर वावरत असताना असाच एक प्रेमळ मित्र लाभला. त्यांचं नाव आदरणीय शिरीष भाऊ पडवळ..!
शिरीष भाऊ दिगंबर पडवळ..! ( राहणार - पुणे )
एकदम मस्त माणूस..! आयुष्यावर निस्सीम प्रेम करणारा एक अवलिया माणूस. आयुष्यावर निस्सीम प्रेम करत करत याच आयुष्याच्या प्रवासात सतत भटकंती करत असतो.मी मागील एका लेखात म्हंटले होते की, प्रत्येक माणूस हा भटका आहे,फक्त प्रत्येकाची भटकी अवस्था भिन्न भिन्न असते, इतकेच..! शिरीष भाऊ पडवळ हे सध्या फार्मासिस्ट म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल,खडकी,पुणे येथे कार्यरत आहे. निसर्गावर अन् विद्यार्थ्यावर निस्सीम प्रेम करणारा एक अवलिया निसर्गवेडा , माणूसवेडा, माणूस अन् एक प्रांजळ मनाचा शिक्षक..! बऱ्याच वाचकांना प्रश्न पडला असेल की, शिरीष भाऊ तर केंद्र सरकारच्या आरोग्य विभागात नोकरी करत आहेत अन् मी त्यांना शिक्षक का म्हणतोय..? शिरीष भाऊ पडवळ यांनी आपली आरोग्य विभागातील नोकरी सांभाळत विविध शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहे.
शिरीष भाऊ यांची अन् माझी फेसबुक मैत्री झाली अन् काळाच्या ओघात प्रिय शिरीष भाऊ पडवळ माझ्या ब्लॉगवरील लेखांच्या प्रेमात पडले अन् मीही त्यांच्यातील असणाऱ्या निसर्गवेड्या पर्यटकाच्या अन् प्रांजळ मनाच्या शिक्षकाच्या प्रेमात पडलो. प्रेम हे असेच असते.त्याला नेहमी दोन बाजू असतात.त्या जर एकमेकांकडे आकर्षित होणाऱ्या अन् पूरक असतील तर मानवी नात्याची वेल खुप सुंदर प्रकारे बहरते असे माझे ठाम मत आहे.अर्थात या मानसिक अवस्थेला शिरीष भाऊ अन् मीही अपवाद नव्हतो.
आम्हा दोघांचा फेसबुक या आभासी विश्वात बऱ्याच दिवसांपासून आभासी संबंध होताच,पण तो आभासी संबंध प्रत्यक्षात आला तो दिनांक १८ जुलै २०२२ अन् १९ जुलै २०२२ रोजी..! यापैकी दिनांक १९ जुलै २०२२ मंगळवार रोजी, प्रिय शिरीष भाऊ पडवळ यांनी माझ्या सध्याच्या माध्यामिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, गणित, बुध्दीमत्ता इत्यादी घटकांवर सखोल मार्गदर्शन केले.फक्त आणि फक्त विद्यार्थांच्या प्रेमापोटी अन् आम्हा दोघांतील असलेल्या निव्वळ प्रेमळ नात्यापोटी शिरीष भाऊ, आपण दूर असणाऱ्या आमच्या शाळेत आलात.सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप आनंद वाटला. पाऊस होता, रस्त्याचे काम सुरू होते, तरी शिरीष भाऊ, स्वतः ची चार चाकी गाडी घेऊन माझ्या सध्याच्या शाळेत आले.यात त्यांचं निरपेक्ष प्रेम जाणवलं , दुसरं काहीही नाही..!
फेसबुक सारख्या आभासी विश्वात देखील, आपल्याला आपल्या सारखं घरगुती कुणीतरी भेटावं याची नेहमी अपेक्षा असायची.ती प्रिय शिरीष भाऊ पडवळ ( राहणार - पुणे ) यांच्या रूपाने पूर्ण झाली.शिरीष भाऊ, माझ्या छोट्या घरी दोन दिवस मुक्कामी होते.या मुक्कामात असे कधीच वाटले नाही की, आपण एका तात्पुरत्या ओळखीच्या व्यक्तीच्या सहवासात दोन दिवस व्यतीत केले म्हणून..! सध्या शिरीष भाऊ यांचे वय अठ्ठावण्ण वर्षे आहे. त्यांची दिनचर्या अन् आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन यामुळे ते अन् अजूनही अगदी ठणठणीत वाटतात. वाटतात नव्हे आहेच..! शिरीष भाऊ यांचा मुलगा अमेरिकेत उच्च पदावर नोकरीला आहे. आपल्या मुलाकडून कोणतीही अपेक्षा न बाळगणारे एक स्वावलंबी व्यक्तिमत्व म्हणून मला शिरीष भाऊ विषयी अजुन नितांत आदर वाढला.
दिनांक २०/७/२०२२ बुधवार रोजी सकाळी प्रिय शिरीष भाऊ यांना आपल्या संस्कृतीनुसार पूजन करून योग्य तो सन्मान देऊन सन्मानपूर्वक पुन्हा त्याच्या गावी जाण्यासाठी निरोप दिला.प्रिय शिरीष भाऊ पडवळ, तुमच्या सारखी भावप्रधान अन् जाणीव असणारी माणसं , घरी आल्यावर घरात आपलंच कुणीतरी असल्याची जाणीव होते.ज्याचा अनुभव आम्ही घेतला.
प्रिय शिरीष भाऊ पडवळ म्हणजे नियतीचे रक्तविरहीत नात्यातील असणारे सुंदर नाते म्हणजेच खूप संवेदनशील मित्र होय..! अशीच माया कायमस्वरूपी असू द्या हीच प्रेमळ अपेक्षा..! 🌹🙏🏻
ता.क. - प्रिय शिरीष भाऊ यांनी त्यांच्या आयुष्यावर ' मास्तरचं पोर ' हे पुस्तक लिहिलं आहे.मला त्यांनी ते पुस्तक सप्रेम भेट दिले आहे.
वंदे मातरम्..!
लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - २२/०७/२०२२, शुक्रवार


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा