चिंतन
" विज्ञान पुरुष तीर्थक्षेत्र,रामेश्वरम्..! "
====================================
दि.२७/१०/२०१७ रोजी दुपारपर्यंत आम्ही धार्मिक तीर्थक्षेत्र रामेश्वर महादेव दर्शन,आटोपून पुन्हा रामेश्वर मंदिर परिसरात आलो होतो.खूप जोरजोरात पाऊस सुरू झाला..!माझ्या सोबत वयोवृद्ध माणसं होती.मनात शंका आली की, " विज्ञान पुरुष तीर्थक्षेत्र" दर्शन होते की नाही..? ज्या व्यक्तीने स्वतःसाठी काहीही मागे न ठेवता , सर्व काही देशासाठी अर्पण केले त्या महामानवाच्या पवित्र समाधी स्थळाचे दर्शन होते की नाही..? मनात अशा असंख्य प्रश्नांचे काहूर माजले होते..!
आम्ही मंदिराच्या पूर्वेकडील बाजूस असलेल्या एका दुकानासमोर आडोश्याला थांबलो होतो.दुपार झाली होती.पाऊस उघडण्याचे नाव घेत नव्हता..! तरीही आम्ही सर्वांनी नक्की ठरवले होते की,डॉ.कलाम साहेबांच्या समाधी स्थळी जायचे म्हणजे जायचेच..! अखेर....पाऊस थांबला..! खूप आनंद झाला..! पटकन वाहनाची व्यवस्था करून आम्ही रामेश्वरम् ते मदुराई या राष्ट्रीय महामार्गहून वाहनातून निघालो..!अवतीभोवतीचा परिसर बघत होतो.निव्वळ समुद्री वालुकामय जमीन..!याच परिसरात कलाम साहेब खेळले,बागडले,प्राथमिक शिक्षण घेतले..किती पुण्यभूमी आहे ही...!
अंदाजे वीस मिनिटांनी आम्ही " Dr.A.P.J.Abdul kakam national memorial " येथे पोहचलो..! आतुरता होती...भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या माझ्या पिढीने पाहिलेल्या,ऐकलेल्या ,अनुभवलेल्या सर्वात महान महामानवाच्या समाधी दर्शनाची..! मुख्य दरवाजावर गेल्यावर कडक सूचना मिळाली..." मोबाईल का उपयोग समाधी के आसपास करना सक्त मना है..! " आम्ही सर्वजण प्रवेशित झालो. प्रवेश झाल्या झाल्या प्रवेशित मार्गावर ,भिंतीवर काहीसे उंच असलेल्या भिंतीवर कलाम साहेब यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षणांचे फोटो लावलेले होते..!मी फोटो पाहण्यात दंग होणार ,इतक्यात चि.नमन,मला म्हणाला, " दादा, आपण पहिल्यांदा कलाम साहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊ..! " मी माझा फोटो दर्शन कार्यक्रम बंद केला.समोर चालत होतो,मुख्य दर्शनी ठिकाणी डॉ.कलाम साहेब विणा वादन करत आहे,या स्थितीतील खूप छान ,सुंदर शिल्प दिसले..!कलाम साहेब यांना विणा वादन खूप आवडायचे..!त्यांची ती आवड दर्शनी भागावर दिसल्यावर आपण एका महान रसिक सारस्वताच्या भेटीला जात आहोत याचा आनंद होत होता..!
मुख्य गर्भ गृहात आलो.डॉ.कलाम साहेब , चिरनिद्रा धारण करून समाधिस्त झालेले पुण्यतिर्थ नजरेस पडले..!समाधी स्थळावर हिरवा ,सुंदर नक्षीकाम असलेला कपडा होता..! तो साक्ष देत होता की," कलाम साहेबांनी तहहयात या भारत मातेला सुजलाम सुफलाम करण्यासाठी संपूर्ण जीवन अर्पित केले याचे..!" तिथे अनेकजण समाधी स्थळाला उभे राहून,दोन्ही हात जोडून वंदन करत होते.मला ती कृती सुध्दा खुज्जी वाटू लागली..!मी व चि.नमन ने आपण आपल्या विठुरायाचे जसे साष्टांग दंडवत करून लोटांगण घालून दर्शन घेतो,अगदी तसेच लोटांगण घालून साष्टांग दंडवत करून भारतमातेच्या माझ्या पिढीने पाहिलेल्या या " विज्ञान पुरुषाचे " दर्शन घेतले..!आमची दर्शन करण्याची विनम्र कृती पाहून तेथील संरक्षक असलेले पुरुष ,महिला आचंबित नजरेने आमच्याकडे पाहू लागले..!मी अंदाज लावला, बहुदा असे दर्शन करणारा हा " भक्त " ही मंडळी पहिल्यांदाच पाहत असावा...!आमची दर्शन करण्याची ही " महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची विनम्र वंदना " तेथील दक्षिण भारतीयांना नवीन होती..! शेवटी, आमच्याकडे भेट देण्यासाठी आलेल्यांपैकी एक जण पटकन माझ्या जवळ आला व म्हणाला, " आप महाराष्ट्र से हो क्या..?" मी म्हणालो "" हां,आपने कैसे पहाचाना..?" त्यावर त्या व्यक्तीचे उत्तर कायम मनात घर करून गेले..!तो मराठीत म्हणाला
" महाराष्ट्रातील सर्वसामान्य वारकऱ्यांनी संपूर्ण विश्वाला दिलेली ही अमूल्य,विनम्र वंदन करण्याची देणगी आहे..!आणि अशी वंदना महाराष्ट्रातील माणूसच पुढे येऊन पहिल्यांदा करतो..!" हे ऐकुन मी सदगदित झालो.ते बंधू जळगाव शहरातील होते..!खूप आनंद वाटला, एका मराठी,माणसाला ,एका मराठी माणसाने त्यांच्या संस्कृतीवरून ओळखण्याचा..!
काही वेळानंतर माझे वयोवृध्द वडील,सासरे,दोन्ही मुले व माझी पत्नी तेथील फोटो पाहण्यात मशगुल झाले..! मी मात्र स्तब्ध,निश्चलपने समाधी समोर उभा होतो..!
आणि विचारचक्र सुरू झाले,वंदनीय डॉ.कलाम साहेबांच्या अतुल्य आयुष्याचे चिंतन करण्यास..! मोठ्या उंचीचा हा महान माणूस..! आपल्या पिढीचे नशीब की या थोर विभूतीस आपल्याला पहावयास मिळाले...! रामेश्वरम् मध्ये असतांना लहानपणी कलाम साहेब वडीलांसोबत,कधी बहिणीच्या पती सोबत रामेश्वरम मंदिरात जात असे..! वडीला,सोबत नित्यनियमाने नमाज अदा करायचे..! पण या सर्व कृतीमध्ये कूठेही कर्मठपणा जाणवला नाही.कलाम साहेबांची शिक्षणासाठी असलेली तळमळ आजच्या नवतरूण व विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत आहे. महान कवी गुलजार साहेब यांच्या धीरगंभीर आवाजात असलेली कलाम साहेबांनी लिहिलेली बायोग्राफी जी , मी ऐकलेली आहे,तिचा शब्द न शब्द माझ्या कानात ऐकू येऊ लागला..!राहून-राहून वाटत होते की,राष्ट्र,राष्ट्रसेवा काय असते याचा पाठ प्रस्तूत करण्यासाठी ईश्वरीय शक्ती प्रत्येक काळात अनेक महानुभवांना भूतलावावर पाठवत असतो.
कलाम साहेब स्वत:म्हणतात की,"लोक असा तर्क लावतात की,विज्ञानाचे विद्यार्थी ईश्वरीय शक्तीला मानत नाही;परंतू माझे असे मत आहे की, मी विज्ञानाचा विद्यार्थी होतो म्हणून मला त्या अदृश्य शक्तीला अनुभवता आले.."
काळाच्या पूढे विचार करणारा व भारत महासत्ता २०२०ची स्वप्न दाखवणारा हा महान माणूस...! १०बाय१२च्या खोलीत पूस्तकांसमवेत संसार थाटलेला विद्वान माणूस किती महान होता याची प्रचिती येते..! नाहीतर आज भल्या मोठमोठ्या घरात पूस्तके म्हणजे "अतिअल्पसंख्याक " प्रवर्गात असल्यागत आहे...!भारताचे विज्ञान राष्ट्रपती म्हणून विक्रम साराभाईंची मोठ्या अभिमानाने गूणगाण करणारा थोर माणूस..! वर्तमानपत्र वाटप असो की,वडीलांना नावाडी कामात मदत ....कधीच कामाची लाज बाळगू दिली नाही..!कलामांचे वडील निरक्षर होते; परंतू जीवणाच्या ज्ञानाविषयी विद्वान..! कलाम साहेबांनी तहहयात आपल्या निरक्षर वडीलांना आदर्श मानून व त्यांच्या तत्वांना प्रमाण मानून आयूष्यात भारताला कमालीच्या उंचीवर नेऊन ठेवले..!
आपले आई, वडील ,बहिणीचे पती यांना न विसरणारे कलाम..! कसे विसरणार...? त्यांना आईपासून निरक्षर जरी असली तरी प्रेम कसे द्यावे हे शिकायला मिळाले..! वडीलांपासून तत्व,कामात लाज न बाळगणे,व बहिणीच्या पतीपासून कष्ट कसे करावे हे अनुभवले..! एकदा कलामांना शिक्षणासाठी पैसे कमी पडतात.घरची परिस्थिती खूपच गरीब.अशावेळी त्यांची बहिण जोहरा स्वतचे सूवर्ण अलंकार विकून भावास शिक्षणासाठी पैसे देते हा प्रसंग आपली भारतीय संस्कृती किती महान आहे याची प्रचिती येते. मग ती संस्कृती वेगवेगळ्या धर्मात ,विविध नैतिक मूल्यांद्वारे वेळोवेळी दिसत असते..! अशा या महान भारताच्या महान सूपूत्राची बायोग्राफी-(आत्मचरित्र) गूलजारजींच्या आवाजात नक्की ऐका मित्रांनो..!
जी माणस गरीब परिस्थितीतून तावून सूलाखून निघतात अश्या अनेक थोर माणसांचे आयूष्य नेहमी सर्व मानव जातीला प्रेरणादाई असते..! लाल बहादूर शास्री,डॉ.आंबेडकर,कलाम साहेब,नरेंद्र मोदीजी इ.गरीबीतून वर आलेली ही माणस आजच्या भारतीयांसमोर निश्चितच आदर्शवत आहेत..!
शेवटी डॉ.कलाम साहेबांच्या कार्यकर्तूत्वास सलाम करून तिथून मी निघालो...! तिथे कलाम साहेब यांच्या बालवयाचे ,त्यांच्या गावाचे,जे चित्र ,चित्रकाराने रेखाटलेले होते ते मनात घर करून गेले..! अनेक फोटो बघत असतांना आपल्या महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या सोबतचा कलाम साहेबांचा फोटो पाहून,इथे " आपला मराठी माणूस " कुणीतरी आहे याचा खूप मोठा भावनिक आधार वाटला..!
माझे सर्वात आवडते पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या सोबतचा फोटो पाहून " दोन महान समकालीन तपस्वींची भेट " माझ्या हृदयात कायमची घर करून राहिली आहे..! कलाम साहेबांनी उपयोगात आणलेल्या काही वस्तू तिथे मांडलेल्या होत्या.त्यात दोन सफारी सुट,एक बूट व एक अगदी साधी स्लीपर चप्पल इ.खूप मोजक्या वस्तू होत्या..!वास्तविक कलाम साहेब यांनी ज्यावेळी राष्ट्रपती भवन सोडले त्यावेळेस ज्या वस्तू सोबत घेतल्या,त्याच वस्तू इथे पहावयास मिळाल्या..!किती मोजक्या गरजा ,होत्या या थोर पुरुषाच्या..!
अंतर्गत विविध वस्तू,छायाचित्रे पाहून झाल्यावर आम्ही बाहेर पडलो.बाहेर फोटो काढण्यास परवानगी होती..!बाहेर डॉ.कलाम साहेबांचा अर्धाकृती व पूर्णाकृती पुतळा होता.तसेच कलाम साहेबांनी भारताला दिलेली संरक्षक कवच कुंडले " अग्नी क्षेपणास्त्र " ची उंच प्रतिकृती मोठ्या अभिमानाने उभी केली होती..!आम्ही बाहेरील डॉ.कलाम साहेबांच्या पुतळ्यास विनम्र वंदन केले..! आणि एक सुखद,भावूक,चिरकाल स्मरणात राहील अशी
" विज्ञान पुरुष तीर्थक्षेत्र " ची भेट संपवून परत निघालो..!
वंदे मातरम्..!
एक प्रवासी लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
रामेश्वरम् तीर्थक्षेत्राला भेट दिल्याचा दिनांक: २७ ऑक्टोंबर २०१७

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा