चिंतन
" हे भास्करा,तू असा अस्ताकडे जाऊ नकोस..!"
===================================
सुप्रभात..!
मी काल संध्याकाळी सूर्य अस्ताकडे जातांना पहिला..!त्याचे अस्ताकडे सरकणे माझ्यातील ,त्याच्याविषयी असणाऱ्या श्रद्धेला चिरचिरून गेले..!
काहीजण म्हणतील, सूर्य तर दररोज अस्ताला जातो,त्यात काय विशेष एवढं..?
मात्र माणसाचं मन आहे शेवटी..! त्याला कधी काय जाणवेल याची शाश्वती अद्याप तरी विज्ञानाला अन् अध्यात्माला देता आलेली नाही..!
काल संध्याकाळी त्या अस्ताकडे जाणाऱ्या सूर्याची अवस्था पाहून हाच का तो सूर्य,ज्याने कधीतरी आपल्या प्रखर प्रकाशकिरणांनी आपल्यातील अंधारलेल्या अस्मिता जागृत केल्या होत्या..? हा यक्ष प्रश्न माझ्या सारख्या त्या सूर्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या एका सर्व सामान्य माणसाला जाणवला..!
त्या अस्ताकडे जाणाऱ्या सूर्याला म्हणावं वाटलं की,
" हे, प्रखर प्रकाशमान भास्करा,तुझ्यात असलेल्या त्या प्रखरतेला ,तू असा का म्हणून निस्तेज करून घेत आहेस..?
तुझा प्रकाश हा, आक्रमकतेचा,जाज्वल्याचा,शौर्याचा,आमच्यातील मृत झालेल्या अस्मिता जागृत करण्याचा..!
मग अस्ताला का म्हणून चालला आहेस आम्हाला पोरके करून..?
तुझे असे अस्ताकडे जाणे,माझ्या सारख्या असंख्य माणसांना देखील तुझ्यापासून दूर दूर घेऊन जात आहे..! कारण तुझ्यात असलेल्या वरील गुणांवरच तर मी अन् असंख्य माणसांनी निस्सीम प्रेम केले..!आणि तेच जर तिथं नसेल तर मग आमच्या तुझ्यापासून दूर जाण्याला,तुला नाव ठेवण्याचा अजिबात अधिकार नसणार..!
एकमात्र नक्की...! हे भास्करा, तू अस्ताला गेल्यावर , पृथ्वीवरील दुसऱ्या बाजूला तुझा पुन्हा सूर्योदय झालेला असेलही..! मात्र तुझ्यात असलेल्या आक्रमकतेच्या, जाज्वल्याच्या ,शौर्याच्या आमच्यातील मृत झालेल्या अस्मिता जागृत करण्याच्या..या तुझ्यातील अंगभूत गुणांना त्या अनोळखी भूप्रदेशात तू,मनसोक्तपणे उधळू शकणार नाहीस याची माझ्या सारख्या तुझ्यावर निस्सीम श्रद्धा असणाऱ्या कित्येक सर्व सामान्य माणसांना खात्री आहे..!
शेवटी एकच नम्रपणे म्हणेन की,
" हे दिनकरा,तूच सर्व सामान्य माणसाला,असामान्य बनवलं,तू असा आम्हाला तुझ्यापासून दूर दूर नको जायला लावुस..! तुझ्या जाण्याने माझ्या सारखी असंख्य माणसं नाईलाजाने तुझ्यापासून दूर दूर जातील...! पण तुझ्यावर जे निस्सीम प्रेम केले,ते दुसरीकडे कधीही भेटणार नाही..!
कारण...हे भास्करा,तू घरातला वाटतो म्हणून..!
म्हणून म्हणतो ,हे भास्करा,तू असा अस्ताकडे जाऊ नकोस..!"
वंदे मातरम्..!
आक्रमकतेचा,जाज्वल्याचा,शौर्याचा,आमच्यातील मृत झालेल्या अस्मिता जागृत करणाऱ्या सूर्यावर निस्सीम प्रेम करणारा एक सर्व सामान्य माणूस: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक:७ नोव्हेंबर २०१९

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा