आमचे गाव, आमची माणसं..!
" असा खेळाडू ग्रामीण भागात होणे नाही..! "
' शिवाजी भाऊ जाधव '
=====================================
दिनांक .. १६ मार्च २०१८ रोजी.. वेळ होती.. ऐन दुपारची..!लासूर स्टेशन येथील मुख्य चौकात मी चिरंजीव नमन ला परिक्षेहून आल्यानंतर घ्यायला आलो होतो.नमन आला,त्याला गाडीवर बसविणार इतक्यात बाजूला आमचे कौटुंबिक स्नेही आदरणीय शिवाजी भाऊ जाधव पाटील हे दिसले. मी लगेच नमन ला त्यांच्याकडे घेऊन गेलो अन् माझ्या मुलाला शिवाजी भाऊ बरोबर परिचय करून दिला...आणि त्यांचे दर्शन घ्यायला लावले.भाऊंनी नम्रपणे नकार दिला पण..माझा आग्रह भाऊ टाळू शकले नाही अन् त्या पायांवर माझा मुलगा नतमस्तक झाला होता. ज्या व्यक्तीने आमच्या पालखेड गावात क्रिकेट खेळ वाढवला..जोपासला..बाळसं धरू पाहणाऱ्या या खेळाला आमच्या गावात तरुण...धडधाकट केले.. तो माणूस समोर उभा होता..! चिरंजीव नमनच्या नतमस्तक होण्याच्या या कृतीला आजूबाजूचे लोकही कुतूहलाने पाहत होती..!
ज्या गोष्टी पूर्वी सर्वसामान्य होत्या..त्या आज अशा दिसायला लागल्या की कुतूहलच्या वाटतात..! विशेषकरून आजच्या नवतरूणानां..!
घरी येण्याचा खूप आग्रह केला पण कामामुळे भाऊ नाही आले.मी घरी आल्यानंतर माझ्या मुलांना आदरणीय शिवाजी भाऊ व त्यांचे क्रिकेट प्रती असलेली निष्ठा सांगितली..!मुलांना यावर विश्र्वासच बसत नव्हता की अशी ग्रेट माणसं आपल्या पालखेड गावात आहेत म्हणून..!
ज्यावेळी आम्ही बाल्यावस्थेत होतो..त्यावेळी आमच्या जन्मगावी पालखेड ता.वैजापूर येथे क्रिकेट हा खेळ बाळसं धरू पाहत होते.त्या खेळावर जीव ओवाळून टाकणारी पिढी तयार होत होती.अर्थात त्या पिढीला तयार करण्याचे काम आमच्या गावचे तत्कालीन ग्रामसेवक आदरणीय गायकवाड काका हे करत होते..! त्यांनीच आमच्या पालखेड गावात क्रिकेटचे रोपटे लावले..!आम्ही बालपणी मोठ्या कुतूहलाने त्या रोपट्याकडे पहायचो..!
पण..........
कोणतेही रोपटे लावले म्हणजे काम संपत नसते.तर...त्या पुढील काम फार महत्त्वाचे असते.त्याच रोपट्याची जोपासना.. होणे अत्यंत आवश्यक असते.आमच्या गावात क्रिकेटचे रोपटे ऐंशी च्या दशकात काकांच्या हस्ते लावल्या गेले.पण त्याच क्रिकेटच्या बालरुपी रोपट्याला जर कुणी आमच्या पालखेड गावात तरुण केले असेल तर ते आदरणीय शिवाजीराव बाबुराव पाटील जाधव यांनीच..!
शिवाजी भाऊ...!
एकदम हौशी माणूस..! क्रिकेट या माणसासाठी जीव की प्राण..! गावातील तत्कालीन गायकवाड ग्रामसेवक काकांनी लावलेलं क्रिकेटचे रोपटे वाढविण्याची,त्या रोपट्याला तरुण करण्याचे कार्य याच शिवाजी भाऊंनी तन मन धन स्विकारले..!
ज्यावेळी शिवाजी भाऊ गावातील तरुणांना क्रिकेट करिता प्रवृत्त करायचे,त्यावेळी आम्ही प्राथमिक शाळेत होतो.मोठ्या कुतूहलाने आम्ही त्यांची या खेळाप्रती असलेली निष्ठा...आज असे जाणवते की..त्यात रमाकांत आचरेकर सरांनी ज्याप्रमाणे ओतली तीच...निष्ठा माझ्याही गावात झिरपत होती..!
आमचे पालखेड गाव बऱ्यापैकी मोठे.अंदाजे पाच ते सहा हजार लोकसंख्या असलेलं कलेवर,कलाकारांवर,खेळावर,धार्मिक उत्सवांमध्ये रममाण होणारे गाव..! याच आमच्या गावात आज जे खेळाचे स्वरूप दिसते आहे,त्याचे आधारवड आमचे शिवाजी भाऊ हेच आहेत..हे कुणीही मान्य करेल..!
आमच्या गावच्या आसपास विविध गावांना शिवाजी भाऊ,स्वतः पुढाकार घेऊन आपला संघ घेऊन जायचे.अन् त्यात बहुतांशी वेळा जिंकूनच यायचे..! तेही कॉर्क चेंडू किंवा लेदर चेंडूवर खेळून..! फार कठीण असतात हे चेंडू...पण..मुळात रक्तात वेड असावं लागतं..!त्या वेडापाई शिवाजी भाऊ व त्यांचा संघ जिंकण्याची कामगिरी फत्ते करू यायचेच..!
स्वतः शिवाजी भाऊ गोलंदाजी ,फलंदाजी करायचे.तसेच क्षेत्ररक्षण स्लीप किंवा शॉर्ट लेग किंवा फलंदाजांच्या अगदी जवळ क्षेत्ररक्षण..! मोठी हिम्मत असावी लागते याला..! तेही अश्या काळात ज्यावेळी हेल्मेट तेही ग्रामीण भागात मुलांसाठी दुरापास्त होते त्यावेळी..! खरचं ग्रेट होती तुमची ती हिम्मत..शिवाजी भाऊ..!
मला चांगलं आठवते.. तो बहुदा काळ होता..१९८७ चा..! त्यावेळी वाहेगाव,ता.गंगापूर येथे तेथील नागरिकांनी क्रिकेट ट्रॉफी आयोजित केली होती.लेदर बॉल वर...! जवळ जवळ..पंधरा ते वीस संघांनी भाग घेतलेला होता.माझे मोठे बंधू सुनील भाऊ जाधव हे सुध्दा त्या संघाचा हिस्सा होते.दररोज...कधी दिवसाआड पालखेड..ते वाहेगाव असा अंदाजे वीस किलोमीटर प्रवास सर्व खेळाडू सायकलवर करायचे..! खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला गावातील बरीच माणसं देखील जायचे..! मी त्यावेळी इ. सहावीला होतो.सुट्टीच्या दिवशी माझे वडील सायकलवर मलाही इतक्या दूर अंदाजे वीस किलोमीटर सायकलच्या पुढील नळीवर टॉवेल गुंडाळून त्यावर बसवून न्यायचे..!
प्रत्येक सामना, शिवाजी भाऊ यांचा संघ जिंकत होता.आणि एक दिवस.. लेदर बॉल विकत घेण्यासाठी या मुलांकडे पैसेच नव्हते. सर्व मुले नाराज झाली होती. सराव करणे तर फार आवश्यक होते
शिवाजी भाऊंचा संघ अर्ध्याच्यावर सामने जिंकून सर्वोच्च स्थानी होता.पण..सर्वजण जेमतेम परिस्थितीतील असल्याने बॉल कसा घ्यावा याच विवंचनेत पडले..! हे जेंव्हा माझ्या वडिलांना माहीत झाले. तेंव्हा माझ्या वडिलांनी शिवाजी भाऊ व त्यांच्या संघाला नवीन लेदर बॉल विकत घेऊन दिला..! खूप..खूप आनंदीत झाले होते सर्वजण..!
ज्यावेळी आमच्या गावचा क्रिकेट संघ उपांत्य फेरीत पोहचला..त्यावेळी सर्वांनी आमचाच संघ जिंकेल असे वाटतं होते
पण.........एका ग्रामीण भागातील संघाचे असे नेत्रदीपक यश कुणाला तरी पाहावल्या गेले नाही.अन् आमच्या गावच्या संघाविरुद्ध चुकीचे निर्णय पंचांनी दिले.शिवाजी भाऊ व त्यांचा सर्व संघ स्वाभिमानी होता.ते चुकीचे निर्णय अमान्य करून त्या सामन्यातून पाय काढता घेतला..निषेध नोंदवून..!
आजही आमच्या गावात दरवर्षी आमच्या गावाचे ग्रामदैवत श्री.पारेश्वर महादेव यात्रा कार्तिक अमावास्येला भरते..!त्यावेळी यात्रेनिमित्त क्रिकेट ट्रॉफी चे आयोजन केल्या जाते.त्यात बाहेरील जिल्ह्यातील संघ सहभागी होतात.त्यावेळी आदरणीय शिवाजी भाऊ जाधव यांचे हमखास मार्गदर्शन आजची तरुण मुलं घेतात..!शिवाजी भाऊंच्या तालमीत तयार झालेल्या आमच्या गावातील अनेक खेळाडूंनी पंचक्रोशीत नाव कमावले आहे.
जर याच खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा,योग्य तांत्रिक मार्गदर्शन मिळाले असते..तर..माझ्या पालखेड गावातील कित्येक तरुणांनी उच्च पातळीवर क्रिकेट मध्ये नाव रोशन केले असते..!
पण.............!
आदरणीय शिवाजी भाऊ, एका पायाने दिव्यांग आहे.तरी त्यांनी त्या उणीवेला आपली कमजोरी कधीच होऊ दिली नाही. याही परिस्थितीत शिवाजी भाऊंची खेळातील प्रचंड मेहनत,निष्ठा ,समर्पण वृत्ती इ.अनेक बाबी खरोखर ग्रेट आहेत..!
सादर वंदन तुमच्या याच खेळावरील निष्ठेला, समर्पण वृत्तीला, आणि सर्वात महत्वाचे आपल्या पालखेड गावात क्रिकेटला एक व्यापक रूप देण्याला...! ग्रामसेवक गायकवाड काकांनी लावलेल्या क्रिक्रेट रुपी रोपट्याला ऐन तारुण्यात सजवले..वाढवले..त्या खिलाडूवृत्तीला...!
ता.क.: पालखेड मधील क्रिकेट खेळावर तुमचे खूप उपकार आहेत..शिवाजी भाऊ..!आज जी पिढी हा खेळ आपल्या गावात खेळत आहेत,त्यांच्या खेळाला वारसा हा तुमचाच आहे शिवाजी भाऊ..!
वंदे मातरम्..!
लेखक : नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक:१९ ऑगस्ट २०१८


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा