बुधवार, ३ ऑक्टोबर, २०१८

" पित्र व पित्राचे जेवण...! "



***  आमचे गाव, आमची माणसं ***
  " पित्र व पित्राचे जेवण...! "




________________________________________________

आज दिनांक ३ ऑक्टोंबर २०१८ रोजी आम्हाला ,माझ्या घरी आमचा बालमित्र स्वर्गीय आप्पासाहेब धोंडीबा सुराशे पा.याची खूप खूप आठवण आली..!
येणारच..! कारण.....पित्र..व पित्राचे जेवण...!

निदान आम्ही बालमित्र जे पालखेड येथे एकाच आळीत राहत होतो तेवढे जो पर्यंत जिवंत आहोत तो पर्यंत आमच्या आप्पाची आठवण येणारच..!
मी, या फोटोतील सोमनाथ  गिरजीनाथ गायकवाड
( भगवा सदरा घातलेला) व रमेश भानुदास गायकवाड( पांढरा सदरा घातलेला) सर्व हल्ली मुक्काम औरंगाबाद..! व स्वर्गीय आप्पा सुराशे...

आम्ही बालपणी एकमेकांच्या घरी पित्राचे जेवण करायला हमखास जायचो..! फार तर तुम्ही असेही म्हणू शकता की ,जर आम्ही एकमेकांच्या घरी पित्राचे जेवण करायला नाही गेलो तर..ज्यांच्या नावाने पित्र आहे,त्यांच्या आत्म्याला शांती मिळतच नसेल...हे निदान मी तरी खात्रीने सांगतो..! एवढं आमचं व त्या पित्राच्या जेवणाचे ऋणानुबंध जुळले होते..!

पालखेड येथे आप्पाच्या शेतात आम्ही बालपणी जवळ जवळ ३ ते ४ किलोमीटर पायी जायचो...तेही याच आॅक्टेाबर हिट मध्ये..! आम्ही गेल्या..गेल्या..आप्पाचे वडील..ज्यांना आम्ही " दादा " म्हणायचो..ते आम्हाला आमच्या जातीच्या नावाने उल्लेख करून स्वागत करायचे..अन् म्हणायचे...
" आला का रे.......( टिंब टिंब )!"
मी मुद्दाम आज, त्या काळी आमच्या जातीच्या नावाने उल्लेख करून स्वागत करणाऱ्या निव्वळ प्रेमळ शब्दांचा उल्लेख करत नाही.नसता आमच्या ऐवजी दुसराच एखादा भलताच आक्षेप घ्यायचा अन् आमचा फक्त आणि फक्त राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी वापर करून घ्यायचा..!😂

आम्हाला मात्र दादांच्या त्या  हाकेच्या कधीच राग येत नव्हता..!आप्पा इ.९ वी त असताना स्वर्गवासी झाला अन्  आमचे आप्पांच्या घरचे पितृ पक्षातील जेवणाचा देखील  शेवट झाला..!
जेंव्हा कधी धोंडीबा दादा मला भेटायचे तेंव्हा..तेंव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू यायचे..अन् मला म्हणायचे ....
" माझा आप्पा, तुझ्या एवढाच असता रं आता..!"
या त्यांच्या कंप पावणाऱ्या स्वरात एका बापाचा करूण स्वर मला ऐकू येत होता..! धोंडीबा दादा, आप्पांच्या मृत्यूने पार खचून गेले होते.नंतर  माझे गावातून स्थलांतर झाले..अन् संपर्क तुटला दादांबरोबर..!

अखेर २०१५ या वर्षी ( मला नेमकी तारीख आठवत नाही) धोंडीबा दादा स्वर्गवासी झाल्याचे मला समजले.मला राहवले नाही.मी व माझी पत्नी धोंडीबा दादांच्या पालखेड येथे गावापासून दूर असणाऱ्या शेतात जेवण, साखर घेऊन गेलो. कडू आक्का ( स्व.आप्पाची मोठी बहीण ) तिथे होती. मला तिने बरोबर ओळखले..अन् रडायला लागली..! कारण कडू आक्का ला माहीत होते की , नंदुचे व माझ्या भावाचे एकमेकांवर किती प्रेम होते ते..! आमच्या बालमैत्रीची कडू आक्का जिवंत साक्षीदार  होती अन् आहे..!मला ही गहिवरून येत होते.अखेर खूप वेळ थांबल्या नंतर आम्ही निघालो तर...याही दुःखात कडू आक्का यांनी मी व माझी पत्नी " नाही ..नाही..! " म्हणत होतो तरी मोटार सायकल ची अख्खी डिक्की भरून भुईमुगाच्या शेंगा मला दिल्याचं..अन् म्हणाली...
" आरे,तुला कोणी देत नाही..! तुझ्या पोरांना देऊ राहिली..! गुपचूप घे..!

असो,
पितृपक्षातील जेवणात कडू, गोड खीर, आंबट कढी वरण भात इ खाद्य पदार्थांची रेलचेल असते..! पावसाळ्यात येऊन गेलेली मरगळ, ग्लानी दूर होण्यासाठी पोषक पदार्थ युक्त पंच पक्वान्न युक्त जेवण खाऊन आपली तब्येत चांगली व्हावी हाच या जेवणामागील मुख्य उद्देश..! सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यातील पंच पक्वान्न त्यात असतात..!

हिंदू धर्मातील विविध सण,उत्सव ,परंपरा यामागे विज्ञान आहे..!फक्त काही स्वार्थी लोकांनी त्यात अंधश्रध्दा घुसवल्या अन् हिंदू धर्मातील या सणांना ,परंपरांना बदनाम केले..!

आज आम्ही तेच बालमित्र पुन्हा एकदा त्याच पित्राच्या जेवणाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आलो...!,पण आमच्या मुलांना सोबत घेऊन..! पित्राला एकमेकांच्या घरी जेवायला बोलावतात हेच , ही नवीन पिढी विसरून गेली आहे हे फार मोठे दुर्दैव आहे आजच्या मॉडर्न पिढीचे..! काही अपवाद..असतील कदाचित..!

ता.क. : आज माझ्या स्वर्गीय आई चे पितृपक्षातील पूजन होते..!
आई,तू सतत माझ्या सोबत असते..!

वंदे मातरम्..!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: ३ आॅक्टोबर २०१८