शनिवार, ३१ ऑगस्ट, २०१९

आई व तिचे मातृत्व..!











चिंतन ©️
 
" आई अन् तिचे मातृत्व..! "
___________________________________________

समोर असलेल्या दोघांपैकी कुणाला वंदन करू असा प्रश्न ज्यावेळी पडतो..त्यावेळी..त्या दोन्ही संजीवन कलाकृती विधात्याने नक्कीच निवांतपणे बनविलेल्या असतात.
विधात्याची ती एक सर्वांगसुंदर कलाकृती असते, येणाऱ्या पिढीला पथदर्शक होण्यासाठी..!

आपण भारतीय या बाबतीत खूपच नशीबवान आहोत, अशा अनेक सर्वांगसुंदर सजीव कलाकृती प्रत्येक पिढीत..प्रत्येक पिढीने याची देही याचि डोळा पहिल्या आहेत.

खूप नशीबवान असतात असे डोळे..जे हे पाहू शकतात.आणि खूप दुर्दैवी डोळे असतात असे..जे असे सर्वांगसुंदर संजीवन रूप समोर असूनही पाहू शकत नाही.अशा या सुंदर कलाकृती या मानवतेला समर्पित असतात.

आई...! कुणाचीही असो ती त्या विधात्याची या भूतलावरील त्याचा अंश असते..!ही तीच आई असते...जी..आपल्या सर्व ईश्वरीय भावना आपल्या तान्हुल्यात शोधत असते. तिच्यापुढे स्वर्गातील सर्व सुखं थिटे पडते..जेंव्हा तिचे लेकरू तिच्या कुशीत असते.

माझ्या वाचण्यात असं आले आहे की, एकदा नट,निर्माता,दिग्दर्शक राजकपूर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की,जगातील सर्वात सुंदर दृश्य कोणते..?
राजकपूर क्षणाचाही वेळ न दवडता उद्गारले...

" ज्यावेळी एक आई, आपल्या तान्हुल्याला आपल्या मांडीवर घेऊन साडीच्या पडद्याआड घेऊन स्तनपान करते..ते सर्वात सुंदर...व पवित्र दृश्य असते..!"

खरचं किती सहजपणे राजकपूर साहेब यांनी आई व तिचे मातृत्व जगासमोर मांडले. विशेष म्हणजे स्व.राजकपूर साहेब यांनी त्यांच्या " राम तेरी गंगा मैली हो गई " या सुंदर, सामाजिक चित्रपटात अशीच आई, जी आपल्या लेकराला मांडीवर घेऊन साडीच्या पडद्याआड स्तनपान करतांना दाखवली आहे. यापेक्षा दुसरे सुंदर ,पवित्र दृश्य असूच शकत नाही. 

याच दृष्यातून अनेक महामानव विधात्याच्या आसनाला... आसन मांडून कधीचेच जाऊन बसले आहेत. खूप भाग्यवान होती ती सर्व महामानवे. ज्यांना आईचे असे प्रेमळ मातृत्व मिळाले.

" स्वराज्य काय असते.. हे ज्या मराठी माणसाला साधे माहीत देखील नव्हते. ते माहीत झाले..केवळ याच मातृत्वाकडून..! "

" सर्वसामान्यांच्या व्यथा काय असतात,त्यांना कसे संवैधानीक संरक्षण द्यायचे याची जाणीव झाली त्या महामानवाला याच मातृत्वाकडून..! "

" सुशासन कसे असावे याचा सुंदर असा पाठ प्रस्तुत केला तो याच मातृत्वाच्या कुशीत शिकून..! "

" शिक्षणासाठी मोह माया दूर करून आपल्या लेकराला दूर केले ते याच मातृत्वाने..! "

" स्वावलंबी जीवन कसे जगावे..आजही नव्वदीच्या पुढे असूनही तो जिवंत पाठ आजही प्रस्तुत करत आहे हेच मातृत्व, अन् त्याच मातृत्वाचा अंश आज सर्वोत्कृष्ट सार्वजनिक आयुष्याचा सर्वोत्कृष्ट पाठ आपल्या समोर प्रस्तुत करत आहे..! "

असे कितीतरी शृंगारिक शब्द अपुरे पडतील..अशा या गोंडस लेकरांपुढे व त्यांच्या महान मातृत्वापुढे..!

माझे त्रिवार वंदन त्या सर्व मातृत्वाला व त्यांच्या सर्व लेकरांना..!🙏🏻🙏🏻🙏🏻

वंदे मातरम्..!

प्रत्येकाच्या आईवर प्रेम करणारा लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

फोटो स्रोत - गुगल.

दिनांक: ३१ ऑगस्ट २०१८




मायाळू मित्र कल्याणराव डमाळे सर..!



मला प्रवासात भेटलेली माणसं..!

" आईच्या मायेचा मायाळू मित्र,कल्याणराव डमाळे सर..! "
====================================

माझ्या वैयक्तिक आयुष्यात बरीच माणसं या ना त्या निमित्ताने आली..!त्यात प्रत्येकाचे येणं काहीतरी निमित्तानं ठरलेलं होतं अन् आहे..!सगळ्याच चवीची माणसं भेटली..!☺ पण मला सर्वात जास्त आवडणाऱ्या गुळाच्या चवी सारखा अन् आईच्या मायेसारखा एक मित्र शिक्षकी आयुष्याच्या प्रवासात एकमेव भेटला..!
त्यांचे नाव कल्याणराव डमाळे सर..!

मी जून २०११ मध्ये एकलहेरा,ता.गंगापूर येथे ,वैजापूर तालुक्यातील १७ वर्ष सेवा आटोपून हजर झालो होतो.तिथं मी अन् कल्याणराव सोबतच हजर झालो होतो.ते अमळनेर वस्ती, ता.गंगापूर येथून आले होते.

कल्याणराव ,दिसायला एकदम गोरे गोमटे..! आनंद आणि दुःख झाल्यावर लालबुंद होणारे व्यक्तिमत्त्व..! त्यांना मी कधीही राग आलेला पाहिलं नव्हत..! त्यामुळे कल्याणराव यांना रागात लालबुंद झालेलं पाहण्याचा आमच्या तब्बल ७ वर्षाच्या सहवासाता कधी लालबुंद योग आलाच नाही..!☺  जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे त्यांच्या प्रेमळ अन् मायाळू स्वभावाचा पदर आम्हाला जाणवू लागला..!

मी जेंव्हा जेंव्हा भावूकपणे आम्हा शिक्षक मित्रांमध्ये एखादा भावूक विषय चर्चेला घ्यायचो,त्यावेळी प्रिय कल्याणराव यांच्या शरीरावर  बऱ्याचदा " काटे " रोमांच आलेले पहायचो..! मला त्याचवेळी जाणवलं होतं की,कल्याणराव खरचं खुप भावूक अन् संवेदनशील मनाचे व्यक्तिमत्त्व आहे..!मला अशी माणसं पहिल्यापासून खूप खूप भावून जातात, अशांच्या आकंठ प्रेमात मी होतो आणि आहे..!कारण भावना अन् भावुकता माणसाला एक माणूस म्हणून जगायला पुरेशी असते..! बाकी भावनाशून्य माणसांचा पार उताडा आहे..!☺

प्रिय कल्याणराव ,यांच्यातील आईची माया नेहमी जाणवायची..!मी लासूर स्टेशन येथून शाळेत कधी बसने तर कधी दुचाकीवर येणे जाणे करायचो. जून २०११ पासून ते १ मे २०१८ पर्यंत असा एकही दिवस गेला नाही की,त्यादिवशी प्रिय कल्याणराव सरांनी मला निघताना  " सर,दम्मानं जा..!" असं म्हणाले नसेल..!
अगदी न चुकता प्रिय डमाळे सर " सर,दम्मानं जा..!"  असे म्हणायचेच..! त्यांच्या अशा आईच्या मायेनं म्हणण्यानं मी आतून खूप गहिवरून जात असे..! मला त्यावेळी माझ्या मायाळू आईची खूप खूप आठवण यायची..!

शाळेत कधीही कोणत्याही विद्यार्थ्यांना मार लागला किंवा अचानक कुणी आजारी पडलं तर प्रिय कल्याणराव पटकन स्वतच्या गाडीवर त्या विद्यार्थांना  बजाजनगर किंवा अंबेलोहळ येथे दवाखान्यात घेऊन जायचे..ते पण स्वतच्या खिशातून  दवाखान्याचा खर्च करायचे..!

एकलहेरा येथील आम्ही जो पर्यंत सोबत होतो तो पर्यंत मी आणि नंदलाल  सलामपुरे सरांना आळस , नैराश्य किंवा मन उदिंग्न व्ह्यायला लागलेच तर  आम्हाला पुन्हा टवटवीत करायला याच डमाळे सरांच्या  वर्गात जिवंत औषध भेटायचे..!😂 ते जिवंत औषधं होते त्या वर्गातील खूप चुणचुणीत अन् खोडकर मुलं..!😂 माझ्या व प्रिय सलामपुरे सरांच्या मनाला सतत संजीवनी देणारा हा वर्ग..! त्या वर्गाचा मॉनिटर होता चिरंजीव भावेश संतोष औसरमल..अन् त्याला मदतनीस म्हणून काम पहायचा चिरंजीव अनिकेत पंडित..!😂 मी या वर्गात गेल्यानंतर एक शिक्षक म्हणून राहतच नसे..! अगदी बालवयातील नंदन होऊन यांच्यात मिसळत असे..!


मी   आणि सलामपुरे सर,जो पर्यंत एकलहेरा येथे सोबत एकत्र होतो, तो पर्यंत कधी मधी  मुद्दामहून डमाळे त्यांच्या मुलांना कसे रागावतात हे आवर्जून गुपचूप पहायचो..!( हे आता पर्यंत डमाळे सरांना पण माहित नव्हते ,आज माहीत होईल..!😂)
सर,त्यांच्या मुलांना रागवायचे देखील प्रेमाने..!☺ मुळात सरांचा स्वभावच खूप मायाळू असल्याने असे होत होते.

मागील दोन महिन्यापूर्वी एकलहेरा येथे रात्री एका मंगलमय कार्यक्रमाला जाण्याचा योग आला होता.त्यावेळी मी आमच्या तत्कालीन शिक्षिका भगिनी ,व प्रिय नंदलाल सलामपुरे सरांच्या समक्ष डमाळे सरांची गळाभेट घेतांना म्हणालो होतो की,
" आपली आई भेटली भो..! बस ,आता कुणाची भेट नाही झाली तरी चालेल..!"

माया अन् ममता याचा सुंदर मिलाप असलेला आमचा आईच्या मायेचा मायाळू मित्र...आदरणीय कल्याणराव डमाळे सर...!

वंदे मातरम्...!
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
दिनांक: ३१ ऑगस्ट २०१९



" जात..!"

** चिंतन **

"  जात ...! " 
======================================

                                                             
जातीच्या हिडीस मानसिक द्वंद्वात आपल्या भारतीयांचे कधीही न भरून येणारे नुकसान आजतागायत झालेले आहे;ते द्वंद्व आपल्याला एक माणूस म्हणून जगण्यास अडचणीचे ठरते..!आपण फक्त आणि फक्त भारतीयच आहोत..!इतिहास तपासा ,जातपात मानल्यामुळे कित्येक गुणवान मानवी घटकांना निसर्ग विधात्याने निर्माण केलेल्या अतिशय सुंदर विश्वातील अनेक सुंदर बाबींना मुकावे लागलेले आहे...!ज्यावेळी जाती निर्माण झाल्या,त्यावेळी त्या कला,कौशल्यावर आधारित होत्या.कालांतराने त्यातही आर्थिक स्तरानुसार भेद करण्यात आला..!हा भेद प्रत्येक जातीतील वरच्या गटाने केला..व त्यात भरडला गेला त्याच जातीतील खालचा गट...!

जातीयवादाच्या बाबती फक्त एकाच जातीला आरोपीत करून कसे चालेल..? प्रत्येक जातीत श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव केला जात होता व आहे..!प्रथमत: आपापल्या जातीतील असलेला प्रकार,उपप्रकार, श्रेष्ठ-कनिष्ठ इ. अनिष्ट प्रथेविरुध्द दंड का थोपटल्या जात नाही..? अनेकातील एकाला शोधून त्याला आरोपी करावे..! पण होत काय...आपण त्या एक जनाच्या गैरकृत्याची शिक्षा त्या एकाला देण्याऐवजी  त्या एका सोबत त्याच्या भोवतीच्या अनेकांनाही आरोपीत करतो..! इथेच वस्तुनिष्ठ पुरोगामित्व हरवून बसतो..!  असे अनेकातील एकजण प्रत्येक अनेकात आहेत..! आपण वस्तुनिष्ठ मुल्यमापन करत नाही अन् सामाजिक वातावरण गढूळ करून टाकतो.अर्थात असे करणारे जे आहेत त्यांनाच हा निकष लागू पडतो..!

जातपात माननारे प्रत्येक जातीत होते..व आहेत..!प्रत्येक जातीत उपप्रकार ,त्यांच्यात असणारे द्वंद्व यामुळे मानवी समुदायाची अपरिमित न भरून येणारे हाणी झालेली आहे..!त्यामुळे कोणालाच ,कोणाला नावे ठेवण्याचा काहीच अधिकार नाही.!(काही अपवाद..!)अगदी हे जाती जातीतील प्रकार व त्या प्रकारातील उपप्रकार पूर्वीपासून आहेत..!याचा अनुभव घ्यायचा असेल तर कोणत्याही जातीतील लग्न विधी जुळवतांना याचे उत्तम प्रात्यक्षिक मोफत पाहायला मिळते..!अशावेळी अगदी बारीक सारीक चौकशी करतात..!कधी..कधी तर गुप्तहेरांमार्फत (आपापल्या नात्यातील किंवा परके....!) खुलासा काढल्या जातो की संबंधित आपल्याच जातीतील,आपल्याच श्रेणीचा आहे का...? मग तेव्हां कुठे पुढील कार्य सुरू होते...!

जो ,ज्या जातीत जन्माला आला,कदाचित सुरुवातीला तो आर्थिक बाबतीत कमकुवत असू शकतो..! कालांतराने ,तो व्यक्ती,स्वतच्या कौशल्याच्या बळावर, स्वतच्या पायावर उभा राहतो..! मग तोच व्यक्ती,त्याच्या भूतकाळातील आर्थिक परिस्थितीला चक्क विसरून,सुखवस्तू कुटुंबातील मुलगी वधू म्हणून शोधू लागतो व मिळवितो सुध्दा..! ते ही स्वतच्याच जातीतील..!अशावेळी स्वार्थ व सोयीचा विसरभोळेपणा  ही तथ्यहीन मूल्ये प्रकर्षाने जागृत होतात..!हा सुध्दा " सोवळे " पाळण्याचाच प्रकार आहे,फक्त निकष वेगळे आहेत..!

अशा वेळी " अमकी जात अशी... तमकी जात तशी..!" असे बोलण्याचा व भाष्य करण्याचा या मंडळींना नैतिक अधिकार आहे का..? अर्थात जातपात मानायचीच असेल तर ("असेल तर" हे शब्द फार महत्त्वाचे आहे) ती फक्त " आपापल्या मुलांबाळांच्या लग्नविधीपुरती " ....! कारण तिथपर्यंत जातीपातीची  मर्यादा योग्य वाटतात..!आजकाल काहीजणांना तेही मान्य नाही तो त्यांचा वैयक्तिक निर्णय..!कदाचित भविष्यातील मानवाच्या सार्वत्रिकीकरणाची ती नांदी ठरू पाहत असेल...!! अन्यत्र जातपात भेदभाव कालबाह्य वाटते..!वैयक्तिकरित्या माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात सर्वच जातीपातीच्या मानवी घटकांचे योगदान अमूल्य आहे..! ते सर्वजण नसते तर माझे अस्तित्व शून्य असते...!

आपल्या भारतीयातील जातीपातीच्या भेदभाव आचरणांमुळे
 " आपण एक भारतीय " म्हणून खूप सोसलेले आहे..! आपल्यातील या वाईट चालिरितीमुळे परकियांनी सतत आपल्या भारतमातेचे हल्ले करून तिचे लचके तोडलेले आहे..!आपल्या काही  भारतीयात असणा-या या दुर्गुणांमुळे  काही परकियांनी अथवा काही स्वकियांनी सुध्दा आपले मानवीय मूल्यांचे शोषण केले,तर कुणी आर्थिक शोषण केले,कुणी , बौध्दिक शोषण केले ,कुणी आपले सांस्कृतिकदृष्ट्या शोषण केले..तर कुणी शारिरीक शोषण केले...! एकंदरीत जातपात मानल्यामुळे आपण एक भारतीय म्हणून खूप गमावलेले आहे...!

जातपात मानल्यामुळे एका समुदायाच्या मनात न्यूनगंड तर एका समुदायाच्या मनात अहंगंड निर्माण होतो...! आणि ते मानवी संस्कृती वृध्दींगत करायला बाधक ठरते..!  आज आपण खूप प्रगत विश्वात वावरतोय.कधी नव्हे ती माणसाला एकमेकांच्या सहकार्याची गरज पडत आहे.तेंव्हा जातीपातीचे पाश तोडा व एक भारतीय म्हणून आपण एकच आहोत ही उदात्त भावना मनात असू द्यावी...! बघा किती निर्भेळ मानसिक आनंद मिळतो तो...!

माझ्या वैयक्तिक आयुष्यात माझी जन्मभूमी पालखेड,वास्तव्य भूमी लासूर स्टेशन,औरंगाबाद, विविध नोकरीची गावे, माझी सासुरवाडी पोहेगाव,ता.कोपरगाव इ.ठिकाणी अजिबात जातपात न  मानणारे अन् निव्वळ माणुसकीच्या नात्यांवर निस्सीम प्रेम करणारे अनेक महान माणसं भेटली..! या अशा महान लोकांमुळेच माणसाची माणुसकीची भिंत भक्कमपणे आजही उभी आहे..!
काही ठिकाणी,काही उघड जातीयवादी अन् काही सुप्त जातीयवादी  पण भेटले..! ही तीच कफल्लक प्रवृत्तीची माणसं होती ज्यांच्यामुळे त्या विधात्याने निर्माण केलेल्या सर्वांगसुंदर माणसाच्या आयुष्याच्या घरांच्या भिंती कधीच्याच ढासळून गेल्या अन् शिल्लक राहिले फक्त संवेदनशील  भग्नावशेष पडक्या घरांचे..!

आपण भारतातील अनेक थोर राष्ट्रपुरुषांचे कार्यकर्तृत्व बघा,त्यांनी कधीच जातीपातीच्या बेगडी दुर्गुणांनाचा स्वीकार केला नाही आणि आजही कित्येक भारतीय असे दुर्गुण स्वीकारत नाही..!अशांची इतिहासाने दखल घेतलेली आहे..!आणि अशा अनेक थोर राष्ट्रपुरुषांना आपण नेहमी वंदनीय मानत आलेलो आहोत...! ते महापुरुष ,आपण जिवंत असे पर्यंत त्यांचे  अस्तित्त्व आपल्यात असायला हवे....! आपण भारतीय या बाबतीत खूप नशीबवान आहोत की ,आपल्या भारतात अनेक थोर राष्ट्रपुरुषांनी आपल्याला मानवी मूल्याधिष्ठित आचरणाचा पाठ प्रस्तुत करून ठेवलेला आहे...!

आपण अशा अनेक महामानवांना विनम्र वंदन करून आपले  आयुष्य सुंदर बनवूया...!
                                                                     
|| वंदे मातरम् ||

ता.क.:  या लेखाचे हक्क माझ्याकडे राखून आहेत.कुणीही लेखाच्या शेवटी स्वतः चे नाव लिहून कॉपी पेस्ट करू नये.असे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल..!
                           

जातीय भेदभाव अजिबात न मानणारा लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दि.२७ मे २०१७

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९

ही वाट दूर जाते...!

" ही वाट दूर जाते..! "

=====================================

अनेकदा चेहऱ्यावर हास्य आणुनी दुःख लपवूनी जाते
भेटतात कुणी तरी जिथं व्यक्त व्हावेसे वाटते
ही वाट दूर जाते.

जगण्याची आता उतरंडी लागली
मनाला माझ्या उल्हसित ती करून गेली
ही वाट दूर जाते.

आयुष्य संपत चालले या नश्वर देहाचे
काही प्रवासी जाणवतात सदैव याच अबोल मनाचे
ही वाट दूर जाते.

कधी मन मोकळे झाले नाही माणसाचे
बरीच दुःख साचून राहिले अंतर्रमनाचे
ही वाट दूर जाते.

भाव अन् भावना यांचा सुंदर मिलाफ मनुष्य
अन् यात ज्यांना ते लाभले तेच खरे आयुष्य
ही वाट दूर जाते.

हे माझे,ते माझे असे यात रम्यता असेल कदाचित
पण तो अंतर्रमनातील भाव अन् भावना नसेल त्याच्यात
ही वाट दूर जाते.

जन्मभूमी अन् इतर स्थळांच्या अनेक स्मृती माझ्या अंतर्मणी दाटल्या
त्यात कित्येक जणांच्या आठवणी गहिवरून आल्या
ही वाट दूर जाते.

आई माझी असते नेहमी सोबत
सदैव ती पवित्र स्री असते कायम हृदयात
ही वाट दूर जाते.

आता नको वाटतो तो मान सन्मान
आता हवे हवेसे वाटते फक्त अंतर्ध्यान
ही वाट दूर जाते.

वंदे मातरम्..!

ता.क.: आज दिनांक ३० ऑगस्ट २०१९ रोजी भल्या सकाळी या नेहमीच्या  रस्त्याने परतीच्या वाटेवर  असताना निवांत बसून प्रस्तुत भाव अन् भावना जाणवल्या..!
निवांत बसावं माणसानं कधीतरी..!

एक तात्पुरता कवी: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव 

आयुष्याचे मंदिर अंत्यातील पवित्र मूर्ती..!

*** चिंतन ***

" आयुष्याचे मंदिर अन् त्यातील पवित्र मूर्ती..! "
=====================================

माणसाचे आयुष्य एखाद्या मंदिरासारखे असते..! जसे एखादे पवित्र मंदिर ज्याच्या त्याच्या श्रद्धेने नटलेले असते..अगदी तसेच आपले आयुष्य देखील याच अशा अनेक प्रत्यक्ष परिचयाच्या अन् प्रत्यक्ष परिचयाच्या नाही पण,त्यांच्या सहवासाची जाणीव सतत प्रवासात होत असते अशा अनेक गोड  व्यक्तींच्या सहवासाने सजलेले असते..!

जसं एखादं मंदिर ,माणसाला कित्येक वर्षाच्या किंवा काही वर्षाच्या निव्वळ श्रद्येय शोधक वृत्तीने  सापडते अगदी त्याच समर्पण भावनेने काही माणसं माझ्या आयुष्यात उशिरा.. पण लाभली आहेत हे मात्र नक्की..! काही मंदिरं कित्येक किंवा काही वर्षांपासून आपल्या हृदयात निस्सीम श्रद्धा अन् त्यावरील पवित्र प्रेम यांची जागा घेऊन हृदयावर विराजमान झालेली असतात..! जी मंदिरं,अद्याप माझ्या  आयुष्यात  प्रत्यक्ष स्वरूपात दर्शन घेण्यासाठी आलेली नाही, मात्र एक ना एक दिवस त्या  मंदिराचे प्रत्यक्ष पवित्र दर्शन नक्कीच होईल यावर माझा विश्वास आहे..!

आता त्याच मंदिरासारख्या पवित्र माणसांचा सहवास कधी प्रत्यक्ष लाभतो तर कधी प्रत्यक्ष लाभत नाही..! जसं ती मादी कासव,आपल्या पिल्लांना फक्त आपल्या नेत्रांच्या दर्शनाने सुख देऊन त्याच पिल्लांना प्रत्यक्ष दुग्धपान न करताही पिल्लांना दुग्धपानाचा आत्मिक आनंद देऊन जाते..!  अगदी असेच माझ्या या संपणाऱ्या आयुष्यात असेही काही माणसं आहेत,की ज्यांचा अद्याप तरी प्रत्यक्ष सहवास नाही,पण त्याच मादी कासवाच्या पवित्र नेत्रासारखी त्यांची सतत जाणीव या  नश्वर देहाला आहे..! एक ना एक दिवस नक्कीच नियती खळखळून सूखदपणाने हसेल अन् त्या  मंदिरातील पवित्र मूर्ती ला जसा पवित्र स्पर्श होतो तसा पवित्र स्पर्श त्यांना होऊन माझ्या आयुष्याचे पवित्र मंदिर सजून फुलून निघेल याचा मला पूर्ण विश्वास आहे..!

आता याच माणसाच्या आयुष्यातील प्रवासाच्या वाटेवर अनेक असेही नास्तिक भेटत असतात  की, ते त्यांचं कार्य करत असतात, ते जसे आपल्याला दुर्लक्षित करत असतात,आपणही त्यांना अगदी तसचं करायचे..! आपण मात्र ज्या व्यक्तीवर निस्सीम श्रध्दा ठेवून प्रेम करतो त्याच्या आठवणींनी ,ज्या व्यक्तीच्या सहवासाने आपल्याला मनःशांती लाभते अशा माणसांच्या प्रत्यक्ष सहवासाने किंवा आठवणींनी आपल्या आयुष्याला अजुन सुंदर बनवायचे..!

माझ्या वैयक्तिक आयुष्यातील वाटेवर अनेक प्रवासी प्रत्यक्ष भेटले , तर काहीजण हृदयात पूर्वीपासून होते पण त्यातील  काही नुकतेच भेटले  आणि काहीजणांना भेटण्याची माझ्या मनाला प्रचंड उत्सुकता आहे..! बघुया,नियती त्या मंदिरांचे दर्शन कधी घडवून आणते ते..! ते सर्वजण माझ्या सोबत असतात,त्यांच्या आठवणीच्या जाणिवेच्या रूपाने..! त्याच भेटलेल्या प्रवाश्यांपैकी काहीजण शिकवत असतात तर काहीजण शिकून घेतात..! काही प्रवासी तर मला माझ्या आयुष्याच्या वाटेवर असेही भेटले आहे,ज्यांचे अस्तित्व मंदिरातील मुर्तीपेक्षाही पवित्र आहे..!ज्यांच्यावर भावुकपणे  विश्वास ठेवावा असे ते मन मंदिरातील पवित्र मूर्ती सारखे आहेत..!

त्याच अशोका च्या सरळ झाडासारखे ,त्यांचे मनही सरळ आहे..!
काही माणसं ,माझ्या  संपत जाणाऱ्या आयुष्यात त्याच पवित्र मंदिरासारखी होती अन् आहेत..!नक्कीच भेटतील एक ना एक दिवस..!☺

वंदे मातरम्..!

ता.क.: माझ्या सोबत, मिसाळ सर व डी .एडचा फक्त १५ दिवसाचा प्रिय मित्र भागवत माऊली गुठे सर..!

तसेच या लेखाला  कुणीही कॉपी पेस्ट करून  शेवटी स्वतचं नाव लिहून पोस्ट करू नये असे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल..!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
दिनांक: २२ ऑगस्ट २०१९

आरशांनो..!

** चिंतन **

आरशांनो..!
=======================================

टीचलेल्या..आरशानो..

स्वच्छ ,सुंदर आरशांनो..

धूसर आरशांनो..

पुसटश्या आरशांनो..

फक्त शोभिवंत आरशांनो..

फक्त दुसऱ्याचे रुप दाखविणाऱ्या आरशांनो..

रूप बदलणाऱ्या आरशांनो..

व्यसनांच्या आहारी गेलेल्या आरशांनो..

धर्मनिरपेक्षतेचे ढोंगी मुखवटे घेऊन हिंडणाऱ्या आरशांनो..

पंचवार्षिक सोहळ्याच्या तोंडावर विविध उपक्रमात सहभागी होणाऱ्या आरशांनो..

शिक्षणाचे पवित्र कार्य सोडून इतर उपद्व्याप करणाऱ्या ढोंगी आरशांनो..

रुग्णांच्या भावनेचा आर्थिक बाजार मांडणाऱ्या आरशांनो..

माझी जन्मभूमी पालखेड येथे मी इ.दहावीत असताना, दहावीत पहिला आल्यानंतर  सुध्दा, जाहीर केलेले बक्षीस ,  केवळ माझ्या जाती मुळे नाकारणाऱ्या विकृत मानसिकतेच्या आरशांनो..!
( या विषयावर मी एक स्वतंत्र लेख या पूर्वीच लिहिलेला आहे )

धर्मांध विकृत आरशांनो..

एकांगी पुरोगामी  आरशांनो..

सत्ता मिळाली म्हणजे ढोंगी रूप जगाला दाखवून स्वतचे खिशे भरून घेणाऱ्या आरशांनो..

एकंदरीत सगळ्याच आरशांनो..!

तुम्ही माझ्या आयुष्याचे पथदर्शक होता,आहेत अन् राहशाल सुध्दा..!
फक्त तुमचे प्रत्येकाचे रुप दाखविणे भिन्न..भिन्न होते.. अन् आहे..!

मला अशी सर्व आरसे फार फार आवडतात..!

का....?
खालील सुवचनाच्या निमित्ताने..!

" काही माणसं,आपल्या आयुष्यात आरशा सारखी येतात, त्यात पाहून आपल्याला आपल्या काही सवयी बदलता येतील..! "

वंदे मातरम्..!

सर्व आरशांवर प्रेम करणारा लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले
दिनांक: २६ जुलै २०१९

मालिका..!

** चिंतन **

" मालिका..! "
=======================================

विविध वाहिन्यांवरील मालिकांच्या करिता सेन्सॉर बोर्ड असते का..?
बहुदा  असले तरी, तो छोटा पडदा असल्याने त्यांचे तिकडे जाणूनबुजून दुर्लक्ष असेल कदाचित..!☺😎

 आजकालच्या हिंदी मालिका किंवा मराठी मालिका ( ऐतिहासिक व राष्ट्रपुरुषांच्या  सोडून) यांचे जे विषय,दृश्य व त्यांची संहिता याला कुठेच अर्थ,भाव, ताळमेळ अजिबात नाही..! सगळं कसं
 "टंगळमंगळ " सुरू आहे..!☺

मी पालखेड येथे राहत असताना अंदाजे १९९७ ते ९८ च्या कालखंडात दूरदर्शनवर दर रविवारी सकाळी ८:३० ला " थोरला हो..!" ही अतिशय सुंदर विषय असलेली मालिका मी आवर्जून पहायचो..! यात प्रदीप पटवर्धन, अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांच्या अप्रतिम भूमिका होत्या..!

भाव अन् भावना यांचा अतिशय सुंदर आविष्कार असलेली
" थोरला हो..!"  ही मालिका होती..! माझ्या आज पर्यंतच्या आयुष्यात हीच एकमेव मराठी किंवा हिंदी मालिका अशी आहे,की जीचं स्थान अद्याप तरी कोणत्याही मराठी असो अथवा हिंदी मालिकेने घेतलेले नाही..!

महाभारताच्या कथेचा,पण आजच्या काळातील माणसांच्या नात्यांचा कथेचा पदर त्या  " थोरला हो..!" या मालिकेच्या कथेला होता..! खूपच सुंदर कलाकृती होती..! भीम, अर्जुन आणि द्रौपदी यांच्या मूळ कथेच्या अवतीभोवती या मालिकेचे कथानक गुंफलेले होते..! त्यातील प्रदीप पटवर्धन अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळाली होती..! अर्थात त्यात उजवा अभिनय ठरला होता.. ऐश्वर्या नारकर यांचा..! त्या मालिकेचा शेवट त्यावेळी मी पाहिला होता अन् तेंव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले होते..! आजही त्या
 " थोरला हो..!" मालिकेच्या आठवणीत रमून जातो कधी कधी..!☺

वंदे मातरम्..!

लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: २७ ऑगस्ट २०१९
मला प्रवासात भेटलेली माणसं..!
" काका..!"

========================================

आज दिनांक २७ ऑगस्ट २०१६ रोजी सकाळी आदरनिय कमलाकर क्षीरसागर काका डोंबिवलीकर(अखिल भारतीय क्रीडा भारती , तथा मुंबई महानगर पालिका उच्च पदस्थ निवृत्त अधिकारी ) यांच्या समवेत नित्य नियमाप्रमाणे प्रभातफेरीच्या वेळी..!

दररोज काका,प्रभातफेरीला सोबत असायचे..!त्यांच्यात व माझ्यात कमालीचा वैचारिक,भावनिक ऋणानूबंध आहे.ते माझे कृतीशील जीवनातील एक आदर्श महामेरू आहेत.काकांचा व माझा ४ वर्षापासूनचा कौटूंबिक परिचय.क्षीरसागर मावशींची कल्याणला बदली झाल्यामूळे काकांची आजची सकाळची माझ्या समवेतची लासूर स्टेशन येथील शेवटची प्रभातफेरी..कारण काका उद्या डोंबिवलीला सहपरिवार स्थलांतर करणार...!

माझ्या आयुष्यात भेटलेल्या अनेक प्रवाश्यांपैकी आदरणीय कमलाकर काका,म्हणजे खूप पोक्त विचारांचे व्यक्तिमत्त्व..! त्यातल्या त्यात आम्ही जिथं आमच्या आयुष्यातील काही वेळ देतो त्या परिक्षेत्रातील.. थोर व्यक्तिमत्व..!

आदरणीय काका,तुम्ही सतत सोबत असतात..आठवणीत..!
अशा आठवणी,ज्या...प्रत्येकवेळी सकारात्मक जगायला शिकवतात..!
जिथं विचार जुळले की,आपोआप गोड नाते निर्माण होते.तुमचे नि माझे विचार जुळले अन् त्याच जुळलेल्या विचारातून एका पितृतुल्य माणसाबरोबर एक अतिशय आदरयुक्त मैत्री झाली..!
ही मैत्री माझ्या अख्या आयुष्याला पुरून उरेल इतकी ग्रेट आहे..!
तुम्ही जरी यापुढे प्रत्यक्ष संपर्कात नसणार तरी,दूर दुसऱ्या गावी डोंबिवली येथे गेले तरी ऑनलाईन माध्यमातून तुमचा प्रेमळ सहवास होतच राहील..!
प्रेमाला अंतर मर्यादित करूच शकत नाही..!

६२ वर्षाचे हे तरूण सतत काही ना काही सामाजिक उपक्रमाशी निगडीत असायचे.अधून मधून काकांचे येणे होईलच...! 

🌹 वंदे मातरम्..!

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले

दिनांक:२७ ऑगस्ट २०१६
स्थळ: लासूर स्टेशन ते लासूरगाव रस्ता.

" तुम्ही हे एॅप घ्या..!"

मला प्रवासात भेटलेली माणसं..!

" तुम्ही हे ऍप घ्या ..!"


======================================

दिनांक २० ऑगस्ट २०१९ रोजी मी नेहमी प्रमाणे औरंगाबाद बस स्थानकाहुन  सकाळी शाळेत जाण्यासाठी बस मध्ये बसलो.हडको टी पॉइंट आल्यानंतर आमची बस थांबली.खाली खूप गर्दी होती.माझ्या सिट वर माझ्या बाजूला कुणीच नव्हते.जागा रिकामीच होती.बंदुकीतून गोळ्या सुटाव्या तसे एकामागून एक माणसं बस मध्ये घुसू लागली.त्यात एक गोरे गोमट्या वर्णाचे हेअर डाय केलेले एक अंदाजे ७० वर्षाचे आजोबा पण होते.मी त्यांच्या वयाचा विचार करून त्यांना माझ्या बाजूलाच जागा दिली.मी आपला माझा मोबाईल पाहण्यात मग्न झालो,कारण पुढील एक ते दीड तास " मैं और मेरी तनहाई " तोच मोबाईल होता..!☺मी दररोज बस मध्ये प्रवाशांशी नाहक बोलण्यापेक्षा तऱ्हेवाईक माणसांचे निरीक्षण करून माझ्या ज्ञानात भर पाडत असतो..! पण आज माझीच फजिती होणार होती.

अशी तशी आमची बस हर्सूल  येथे आली असेल.इतक्यात ते आजोबा मला म्हणाले,
" कुठले पाहुणे..?"
मी त्यांच्याकडे न पाहता माझ्या मोबाईल कडे पाहत म्हणालो,
"मला आज रोजी पर्यंत तीन गावं आहेत, मूळ गाव,पालखेड,नंतरचे लासूर स्टेशन व हल्ली मुक्काम येथेच औरंगाबाद मध्ये एका ठिकाणी...!"
यावर ते आजोबा मला पुन्हा म्हणाले,
"तुम्ही शिक्षक आहात का हो..?"
मी चमकुन त्यांच्याकडे पाहून  म्हणालो,
" तुम्ही कसं काय ओळखलं..?"
आजोबा-" तुम्ही लई चकपक पांढरे कपडे घातले, अन् लई आवरून सावरून बसला आहात त्यावरून ओळखले..!"
असं म्हणताच तेवढ्या वेळापुरता मी ,त्यांची नजर चुकवून मोबाईलच्या काचेत स्वतःला पाहून घेतले..!😂
मनात म्हणलं हे आजोबा,मला ऐन मार्च , एप्रिल महिन्यात याच रस्त्याने बसमध्ये भेटले असते तर मी त्यांना खाणीत काम करणारा कामगार नक्कीच वाटलो असतो,कारण रस्त्याचे काम अन् धूळ..!मग मी पण त्यांच्या वयाला अनुरूप गप्पांच्या फडात अधून मधून रंगलो.

आता आमची बस, चौका या गावाजवळ आली होती. एवढ्यात ते मला म्हणाले...
" तुमचा मोबाईल what's app  नंबर काय आहे..?
मी म्हणालो- " काका,मी सहसा माझा व्हॉट्स ऍप नंबर कुणाला देत नाही,कुणी काहीही पाठवतं..!"
आजोबा- " अहो,द्या हो..! तुम्ही आता ओळखीचे निघाले,आमचे पाहुणे आहेत तुमच्या गावाकडे....!"
मला पण त्यांच्या वयाकडे पाहून अन् ते काहीही पाठवणार नाही या अंदाजाने दिला माझा नंबर..!
लगेच ते त्यांच्या  मोबाईलच्या कामात  व्यस्त झाले. थोड्या वेळाने मला म्हणाले..
" हे एक app आहे,तेवढं प्ले स्टोअरवर जाऊन डाऊनलोड करा..!"
मी-" माझ्या मोबाईल मध्ये स्पेस नाही..!"
आजोबा- " त्यातील काही डिलीट करा मग..!"
मी- " सगळं महत्त्वाचं आहे,त्यामुळं काहीही डिलीट करता येणार नाही..!"
आजोबा-" जास्त जागा नाही लागणार, करा काहीतरी डिलीट..!"
मी- " काका,मला ते app नाही लागत..!"
आजोबा- " तुम्ही घेऊन तर पहा..! वाटल्यास त्या app ची लिंक मी पाठवतो..!"
आता मात्र मला त्यांच्या आग्रहाचे अपचन व्हायला लागले होते.मी काहीसा सौम्य कडक स्वरात त्यांना म्हणालो
मी- " तुम्ही का मला आग्रह करू राहिले..?माझी अजिबात इच्छा नाही..!"
आजोबा-" मी लिंक तुमच्या नंबरवर पाठवली आहे,ती लिंक ओपन करून ते app घ्या..!"

आता आमची बस फुलंब्री बस स्थानक येथे आली. तेंव्हा लगेच आजोबा म्हणाले..
" केली का लिंक ओपन..?"
मी सौम्य उंच स्वरात म्हणालो- " तुम्हाला समजत नाही का हो..? मी नाही म्हणतोय अन् तुमचं तेच सुरू आहे..!"
यावर ते आजोबा शांत झाले.आता पाल फाटा आला होता.ते आजोबा पुन्हा म्हणाले..
" अहो,सर,त्या app मधून जर तुम्ही फेसबुक,व्हॉट्स ऍप सुरू केले तर तुम्हाला काही पैसे मिळतील..!"
मी काहीच न बोलता गुलजारजींची इजाजत चित्रपटातील " मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है..!" ही गझल ऐकण्यात मग्न होतो.

फरशी फाट्यावर आमची बस थांबली.त्याचा फायदा घेऊन ते आजोबा मला पुन्हा म्हणाले..
" मी काय म्हणतो,एकदा ते app घेऊन तर पहा..!"
मी- " मी,माझी जागा बदलू का हो..?"
यावर ते चूप बसले.सकाळचे ९ वाजले होते.आळंद गाव आले होते.पुन्हा त्या आजोबांचा पाल्हाळ सुरू झाला...
" सर,राग नका येऊ देऊ..! पण तुम्ही खरंच जर ते app मी पाठविलेल्या लिंक मधून जर घेतले ना,तुम्हाला थोडेफार पैसे मिळतील..!"
आता मात्र की रागात त्यांना म्हणालो- " हे पहा काका,तुमच्या वयाचा विचार करून मी तुम्हाला कडक स्वरात बोलू शकत नाही..! आता पुन्हा हा विषय काढला तर माझा नाईलाज होईल..!"
आजोबा एकदम चिडीचूप झाले.अखेर अंधारी गाव आले.मी उतरू लागलो.इतक्यात ते आजोबा मला पुन्हा म्हणाले...
" सर, जमलंच तर लिंक ओपन करून ते app घ्या..!"
मी रागाने त्यांच्याकडे पाहून खाली उतरलो.

उतरल्या बरोबर मी त्या आजोबांचा नंबर ब्लॉक करून टाकला. विचार करू लागलो की, काहीवेळा आपला चांगुलपणा नडतो आपल्याला..! मी त्यांना माझा व्हॉट्स ऍप नंबर नको होता द्यायला..! पण मी त्यांच्या वयाचा अन्  गावाकडच्या निघालेल्या ओळखीमुळे त्यांना माझा व्हॉट्स ऍप नंबर दिला होता.मी सहसा अनोळखी व्यक्तीला नंबर देतच नाही,पण त्यांनी माझ्या गावाकडची ओळख दिल्यामुळे मला त्यांचा उमाळा आला होता..!

ता.क.: मोजक्याच माणसांना मी प्रेमानं अन् विश्वासाने माझा व्हॉट्स ऍप नंबर दिला आहे त्यांनी मला मेसेज न केल्याबद्दल गोड राग मानू नये..!😂
जर राग आल्यास मला ब्लॉक करा..!😂😂

वंदे मातरम्..!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
दिनांक: २१ ऑगस्ट २०१९

" सजीव शिल्पकला..! "

*** चिंतन **








" सजीव शिलपकला..!"
=====================================

प्रवास अन् तो ही काहीतरी आत्मचिंतन करायला लावणारा असेल तर या आपल्या सजीव देहाला,त्याच प्रवासात पवित्र भावनेने दर्शन झालेल्या निर्जीव मूर्तीच्या भावना खूप आकर्षित करून जातात..!

हिंदू धर्मातील विविध ठिकाणच्या मंदिराला व त्यातील पवित्र मूर्तींच्या सुबक अन् सजीव जाणवणाऱ्या मूर्तीला पाहिले की, आपले पूर्वज किती महान होते याची साक्ष पटते..! आजच्या आपल्या तथाकथित प्रगती करणाऱ्या माणसाला आपल्या आजच्या असणाऱ्या बुध्दीची कीव करावीशी वाटते..!

मी खजुराहो,कोणार्क येथील वास्तू शिल्पकला प्रत्यक्ष पाहून आलेलो आहे..! जेंव्हा आपण तेथील ते अप्रतिम शिल्पकलेचे स्वर्गीय आनंद देणारे शिल्प कारागिरी पाहतो,त्यावेळी मनाला आत्मिक शांती नक्कीच लाभते..! अर्थात ती अप्रतिम शिल्पकला पाहणाऱ्या माणसांचे मन भावूक,श्रद्धेय असेल तरच असे जाणवेल..! नसता त्या फक्त आणि फक्त एका दगडात कोरलेल्या सर्वसाधारण मूर्ती ठरतील..!

माझ्या आयुष्यातील प्रवासात दर्शन झालेल्या खजुराहो येथील अनेक अप्रतिम शिल्पकलेचा आविष्कार ज्यावेळी मी  पाहिला होता, त्यावेळी आपल्या पिढीतील आज स्वतः ला " ओव्हर स्मार्ट " समजणारी माणसं ( विशेषकरून सुशिक्षित..!☺) किती खुज्जी आहेत याची जाणीव होते..! त्यावर लिहावं वाटतं,पण सगळेच प्रगल्भ विचारांचे नसतात याची जाणीव मला आहे..अन् लेखणी थांबते..!

या पोस्ट करिता जी अप्रतिम शिल्पकलेची जिवंत वाटणारी जी कोरीव मूर्तींची शिल्प विविध छायाचित्रांच्या रूपाने मी स्वतः क्लिक केली आहेत,ती सिध्देश्वर महादेव मंदिर,गोदावरी नदीच्या तीरावर, कायगाव टोका येथील आहेत..!
विनम्र वंदन त्या महान शिल्पकारागीरांना,ज्यांनी अतिशय सुबक अन् उच्च कोटीची शिल्पे कोरलेली आहेत..!

ता.क.: माणसाच्या आयुष्यात काही माणसं दगडी शिल्पासारखी भेटतात तर बरीच शिल्पकलेच्या मूर्ती सारखी सजीवपणे भेटल्याची जाणीव होते.अर्थात याची जाणीव तेंव्हाच होते जेंव्हा  माणसं भावनेने सजीव असतात..!

वंदे मातरम्..!

भटकंती करणारा एक भटका लेखक  :नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

स्थळ:सिध्देश्वर महादेव मंदिर,गोदावरी नदीच्या तीरावर, कायगाव टोका,ता.गंगापूर, जि.औरंगाबाद.
दिनांक: २६ ऑगस्ट २०१९

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१९

" काळी माती..! "





चिंतन
" काळी माती..! "
======================================

मी पालखेड येथे राहत होतो तेंव्हा आमच्याच शेतातून किंवा मित्रांच्या शेतातून घटस्थापना करिता काळी माती घेऊन यायचो..!
त्यानंतर...
मी लासूर स्टेशन येथे राहत होतो तेव्हा हाडके पाटील यांच्या शेतातून घटस्थापना करिता काळी माती घेऊन यायचो..!
त्यानंतर....
मी मागील वर्षी औरंगाबाद येथे स्थायिक झालो,तेंव्हाही मी घटस्थापना पूर्वी काही कामानिमित्त जन्मगाव पालखेड येथे गेलो होतो तेव्हा येताना  आमच्याच शेतातून काळी   माती घेऊन आलो होतो..!
पण......
यावर्षी  आज दिनांक २९ सप्टेंबर २०१९ रोजी शहरातील एका पेठेत घटस्थापना करिता सामान खरेदी करायला गेलो तर काळी माती विकायला होती..!☺

मला तेंव्हा कुठे जाणीव झाली की मी एका शहरात राहायला आलो आहे..! अशा अनेक जाणीवांमूळे मला जाणवत आहे की, मी एक " प्युवर खेडूत " एका शहरात राहायला आलेलो आहे..!☺ त्या अनेक जाणीवांपैकी एक आजची काळी माती..!😂

असो ,सर्व भारतीयांना नवरात्र उत्सव निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!

वंदे मातरम्..!
शूभेच्छूक: एक प्युवर खेडूत लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक:२९ सप्टेंबर २०१९