बुधवार, २७ एप्रिल, २०२२

" इंचू चावला, मला इंचू चावला..!"

 



आमचे गाव आमची माणसं ©️


" इंचू चावला, मला इंचू चावला..!"


===============================


दिनांक २४ एप्रिल २०२२, रविवार रोजी रात्री पालखेड येथे जाण्याचा योग आला होता.निमित्त होते, माझे मित्र श्री.बाळू पाटील शेळके यांच्या कन्येचा विवाह सोहळा.. !ज्या शेळके पाटील घराण्यावर माझ्या पणजोबा पासून श्रद्धा आहे,त्याच घराण्यातील प्रिय मित्र बाळू पाटील शेळके हे माजी सरपंच तसेच याच मित्राच्या धर्मपत्नी वैजापूर पंचायत समितीच्या माजी सभापती देखील होत्या. लग्न सोहळ्याला खूप गर्दी असल्याने माझ्या सोबत असलेला माझा जिवलग बालमित्र आण्णासाहेब म्हस्के ( औरंगाबाद ) अन् मी मुख्य गर्दीतून गेटच्या बाहेर दूर उभे राहून अक्षता टाकणार होतो.


इतक्यात आमच्या बाजूला आमच्याच पालखेड गावातील काही तरुण बसलेले होते.त्यापैकी एकजण इतरांना माझ्याविषयी हातवारे करून काहीतरी सांगता होता असे माझ्या लक्षात आले.मला राहवलं नाही अन् मी त्या समूहाकडे गेलो.मी म्हणालो...

" काय मित्रानो, काय चाललं..? मजेत आहात का..? काय म्हणताय..?"


त्यावर त्यातील एकजण मला म्हणाला..

" काही नाही सर..! तुम्ही कसे आहात..? '

मी म्हणालो - " मजेत आहे भो..!"

यावर त्यातील एक तरुण त्याच्या इतर मित्रांना सांगू लागला की, " अय, जाधव सरांना ना..एकदा इच्चू चावला होता, नाटकाच्या ओट्यावर..! मी.. बी तिथं होतो..!"

मी त्या मित्राला मध्येच थांबवून त्या मित्रांना म्हणालो.." अरे, हाव ना..राव..! तुझ्या बरं लक्षात आहे अजुन..! पण तू कोण..? मी तुला ओळखले नाही..! " 

त्यावर तो तरुण मला म्हणाला - " सर,मी भैय्यासाहेब त्रिभुवन..!"

हे नाव ऐकल्या बरोबर मला याच नावाची एक फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट कित्येक दिवसांपासून आलेली आहे यांचं स्मरण झाले.मी त्याला म्हणालो.." मित्रा, मला भैय्यासाहेब त्रिभुवन याच नावाची फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट आलेली आहे, तो तूच का..? मित्रा, काहीतरी परिचयाचा धागा असल्याशिवाय मी फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारत नाही..! तू आमच्या गजा भाऊ त्रिभुवनचा कोण आहेस..? "

त्यावर तो तरुण म्हणाला -" सर,गजा भाऊ, माझे चुलते आहेत..!"

मी म्हणालो - " आता, फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारतो बरं का..! गजा भाऊ त्रिभुवन म्हणजे आमच्या कुटुंबातील सदस्यच बरं का..! अन् काही बी पोस्ट नको करत जाऊ.." असं म्हणालो अन् यावर भैय्यासाहेब त्रिभुवन पण म्हणाला -" नाही हो सर..!"

मी तेथील उपस्थित मित्रांना म्हणालो - " बाकी, नाटकाच्या ओट्यावर मला इच्चु चावला हे लई मोक्कार काम झालं होतं. त्यात अशोक मराठे हा आपला बालमित्र अजुन तेल टाकायला होता..!" यावर आम्ही हसलो.


तर माझ्या फेसबुक मित्रानो मला इच्चू चावला होता तो प्रंसंग पुढीप्रमाणे -


इ. स.१९९९,मी त्यावेळी पालखेड येथे राहत होतो. त्याकाळी दररोज रात्री आमच्या पालखेड गावातील जो नाटकाचा ओटा आहे, तिथं जाऊन बसायचो.तिथं अनेक मित्र येऊन बसायचे अन् माझ्या जागण्याच्या वेळेपर्यंत आम्ही तिथं गप्पा हासडत बसायचो.सोबत असायचे जिवलग बालमित्र शाम शेळके, राजू पाटील शेळके ( दाजी ) , अशोक मराठे,आप्पा जाधव इत्यादी. त्यात आमच्या वयापेक्षा काही लहान मुले पण असायची, त्यात हाच भैय्यासाहेब त्रिभुवन असायचा.


असेच नोव्हेंबर १९९९ मध्ये याच नाटकाच्या ओट्यावर रात्रीच्या वेळी आम्ही गप्पा मारत बसलो होतो.तिथं मी, शाम शेळके, अशोक मराठे इत्यादी उपस्थित होतो.बाजूलाच भैय्यासाहेब त्रिभुवन अन् त्याच्या वयोगटातील काहीजण होते.नाटकाच्या ओट्यावर शहाबादी फर्शी होती. ओट्याच्या फर्शीच्या खाली काही ठिकाणी कपार होती.त्यात सांध म्हणजेच रिकामी जागा सुटलेली होती. गप्पा मारल्या मारल्या अन् मी ओट्यावरून कडेने दोन्ही हात त्यावर टेकून खाली उडी मारू लागलो इतक्यात...

मला काहीतरी टोचल्यासारखे जाणवले.मी लगेच माझ्या बाजूला बसलेल्या अशोक मराठे या बालमित्राला म्हणालो - " यार, अशोक, मला काहीतरी लई टोचले राव, लई आग होऊ राहिली..!"

शाम शेळके याने तिथं बघितले पण अंधार असल्याने त्याला काही दिसेना. शामचे घर अगदी जवळच असल्याने तो पटकन घरी गेला अन् बॅटरी घेऊन आला. फर्शीच्या कपारीत उजेड मारला तर तिथं भला मोठ्ठा इच्चू दिसला.माझ्या बाजूलाच असलेला बालमित्र अशोक मराठे मला म्हणाला - " अरे, नंदू दादा, लई मोठ्ठा इच्चू हाये, तू होय बाजूला, मी मारतो त्याला..!"

अशोकने त्या इच्चूला मारायच्या अगोदर शामने काडीने त्या इच्चूला खाली पाडले अन् चपलेने त्याचा निर्घृण खून केला.


माझ्या उजव्या हातातील मधल्या बोटाला विंचू चावला होता.वेदना वाढायला लागल्या होत्या.त्यात दुसऱ्या दिवशी माझे लासुरगाव केंद्रांतर्गत शिक्षक मित्र आदरणीय दिलीपराव शेलार, आदरणीय शेषराव गंडे , वाघुर्डे सर, नितीन पगार , मेंढे मामा इत्यादींच्या सोबत लासूर स्टेशन येथून रेल्वेने तिरुपती बालाजी येथे जाण्यासाठी बसायचे होते.मला वेदना असह्य व्हायला लागल्या होत्या.माझ्या जवळ उभा असलेला मित्र अशोक मराठे मला म्हणाला - " नंदू दादा, आता तुला लई दुखणार भो.. तुला रात्रभर झोप येणार नाही..!"

माझे त्याच्या बोलण्याकडे अर्धवट लक्ष होते,कारण वेदनेने मी विव्हळत होतो.अखेर शाम शेळके याने मला धरले अन् मला म्हणाला " अय, नंद्या चूप रे, नको इवळू..! अश्या ( अशोक ) तू याच्या जवळ थांब रे, मी पँट घालून येतो.याला आपण गणेश वाणी डॉक्टरकडं घेऊन जाऊ..!" शाम पँट घालून आला म्हणजेच तो आता पर्यंत आमच्या जवळ फक्त अर्धवट लुंगी लावूनच होता.


शाम शेळके पँट घालून येई पर्यंत अशोक मला म्हणू लागला - " नंदू दादा, तुला लई दुखणार भो आता..! आता हे बोट असचं धरून राहावं लागेल..! रात्रभर तू कन्हत राहशील..!" 

अशोक असं म्हणाल्या मुळे मी अजून गडबडून जात होतो.माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच विंचू चावला होता. विंचू चावल्याचा पूर्वाश्रमीचा अनुभव नसल्याने मी जरा जास्तच गडबडून गेलो होतो.शाम पँट घालून आला होता.त्याने मला एका दंडाला धरले अन् परसराम भेंडे याच्या गल्लीतून मला डॉ.गणेश वाणी या बालमित्राकडे घेऊन चालले होते. एखादा अंत्यसंस्कार करून आल्यावर जसं पाणी पाजणाऱ्या व्यक्तीला जसे दंडाला धरून घेऊन कुणीतरी चालते अगदी तसेच शाम माझ्या दंडाला धरून गल्लीतून घेऊन गणेश डॉक्टरकडे चालला होता. रस्त्याने पुन्हा अशोक मला म्हणाला - " यार, नंदू दादा, तुला इच्चू चावायला नको होता राव..! लई हाल होत्या, झोप येत नाही, लई दुखतं.."

शाम , अशोकला म्हणाला - " का..रे..आश्या मी कव्हांच पाहू राहिलो, याला धीर द्यायचा सोडून तू याला अजुन घाबरून देऊ राहिला..! तुला काही अक्कल हाये का..? चूप बस आता..!"

अशोक आता चूप झाला होता.आजू काळे गुरू या बालमित्राच्या गल्लीतून आम्ही अखेर डॉ.गणेश वाणी याच्या दवाखान्यात आलो होतो.रात्रीचे अंदाजे नऊ वाजले होते.त्यावेळी डॉ.गणेश वाणी याचा दवाखाना त्याच्या जुन्या घराजवळील आदरणीय बाबू काका मूलमूले यांच्या घरी होता.थेट नाटकाच्या ओट्यापासून ते गणेश वाणी याच्या दवाखान्यात येई पर्यंत मला दंडाला धरून आणल्यामुळे मी स्वतः ला VIP पेशंट समजू लागलो होतो.


डॉ.गणेश वाणी याच्या दवाखान्यात गेल्या गेल्या प्रिय बालमित्र अशोक मराठे पुन्हा मला म्हणू लागला..

" नंदू दादा, आता घाबरु नको.आता डॉ.इंजेक्शन देतील.तरी पण रात्रभर दुखलचं..!"

अखेर डॉ.गणेश वाणी याने ज्या बोटाला, ज्या ठिकाणी विंचू चावला होता त्याच ठिकाणी इंजेक्शन दिले.पुन्हा अशोक मला म्हणाला..

" नंदू दादा, आता घाबरु नको, तीन चार तास आता तुला वेदना होणार नाही,पण नंतर पुन्हा लई दुखायला लागेल..!"

हे ऐकल्या बरोबर बालमित्र डॉ.गणेश वाणी त्याला म्हणाला.." का..रे..तू याच्या सोबत याला धीर द्यायला आला की अजुन घाबरून द्यायला..!"

हे ऐकल्यावर शाम हसू लागला अन् म्हणाला..

" अरे ,मी याला कव्हापासून हेच म्हणू राहिलो..!"

अखेर अशोक देखील हसू लागला अन् म्हणाला..

" डॉक्टर, मी धीरच देत होतो..!"

डॉ.वाणी म्हणाले -" राव, ही कोणती नवीन पद्धत आहे धीर देण्याची..!"

आम्ही सर्वजण अशोक या बालमित्राच्या धीर देण्याच्या पद्धतीवर आश्चर्यकारक नजरेने पाहू लागलो होतो.


जिवलग बालमित्र शाम शेळके, अशोक मराठे, डॉ.गणेश वाणी आणि आमचे लहान मित्र परिवार भैय्यासाहेब त्रिभुवन यांनी माझ्या चावलेल्या विंचूच्या वेदनेला असह्य होण्यापासून सुसह्य केले होते.फक्त जिवलग बालमित्र अशोक मराठे याने जरा जास्तच असह्य केले होते इतकेच..!😊🙏🏻


गावच्या आठवणी ह्या सर्वात दीर्घकाळ स्मरणात राहणाऱ्या आठवणी असतात,कारण त्या आठवणीत अमृत साठवलेले असते. अमृत संजीवन आयुष्य प्राप्त करून देते म्हणून..! याचमुळे गावच्या आठवणी संजीवन असतात. गावची माणसं अन् बालमित्र ही देवानं दिलेली सर्वोत्तम देणगी असते माणसाला, अर्थात ज्यांना यातील भाव समजला त्यांनाच..! .! आमचा खूप जिवलग बालमित्र अशोक मराठे हयात नाही, पण त्या विधात्याच्या नगरीतून आम्हा सर्व मित्रांची नक्कीच आठवण काढत असेल..! त्या विधात्याच्या नगरीतून या त्याच्या बालमित्राला ,त्याच्या भाषेत त्याच्या नंदू दादाला म्हणत असेल....

" अरे, नंदू दादा, पुन्हा जर इच्चू चावला तर ध्यानात ठेव, लई वेदना होतात बरं का..!"😊


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २७/४/२०२२, बुधवार.

रविवार, १७ एप्रिल, २०२२

मला भूतकाळ भेटला..! 😊


 


मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


मला भूतकाळ भेटला..! 😊


==================================


आज खोडेगाव ( कचनेर जवळील ) ता. औरंगाबाद येथे रेणूका देवीच्या दर्शनाला तेथील जत्रेच्या निमित्ताने सहपरिवार जाण्याचा योग आला.माझ्या  सासुरवाडी कडील नातेवाईकांचे कुलदैवत असलेलं देवीचं गाव, अर्थात सोबत सासुरवाडी कडील नातेवाईक होतेच..!🙏🏻


तिथल्या जत्रात भर उन्हात फिरलो अन् मला मीच माझ्या लहानपणीच्या काळातील नंदनला भेटलो. पालखेड येथील आम्हा बऱ्याच बालमित्रांना गावातील यात्रे निमित्त '  खर्ची ' पाच ते दहा रू.आमच्या घरच्यांकडून मिळायचे. त्या खर्चीत ( रकमेत ) गावातील यात्रेत आलेल्या दुकानात जाऊन काय विकत घेता येईल याची इकडं तिकडं हिंडून चौकशी करायचो.


आज खोडेगाव येथील देवीच्या जत्रेत मला माझा भूतकाळ या फोटोतील मुलात दिसला अन्  मला माझा भूतकाळ वर्तमानकाळ भेटल्याची जाणीव झाली..! माझे मन माझ्या बालवयातील गावच्या यात्रेतील आठवणीत रमून गेले.


आमच्या बालपणी आमच्या पालखेड गावातील यात्रेचं आम्हाला खूप आकर्षण असायचं.नवे नवे कपडे घालून गावातील गल्लीत हिंडायचो.त्या हिंडण्यामध्ये एक उत्साह संचारायचा. जर यदा कदाचित दिवाळीला नवे कपडे विकत घेतले असेल तर त्या दिवशी घातल्या नंतर थेट कार्तिकी अमावास्येला असणाऱ्या यात्रेच्या दिवशीच ते दिवाळीचे नवे कपडे अंगात परिधान करायचो.माझ्या बालपणी कार्तिकी अमावस्येच्या दिवशी पहाटेच आई तिच्या हाताने अंघोळ घालून द्यायची.पहाटेच श्री.पारेश्वर महादेवाच्या मंदिरात दर्शनाला जायचो.सोबत गल्लीतील बालमित्र रमेश गायकवाड, सोमनाथ गायकवाड, विजू गायकवाड, स्व.आप्पा सूराशे अन् नितीन जैन हमखास असायचे.


मंदिरात दर्शनाला आल्यावर मंदिराच्या समोरील मुख्य प्रांगणात भला मोठ्ठा कापडी मंडप यात्रेच्या निमित्ताने गावकरी मोठ्या मेहनतीने टाकायचे.तो मंडप  खूप उंच अंदाजे ऐंशी ते शंभर फूट उंच अन् साधारणत: अडीच ते तीन फूट रुंदीच्या सागवानी खांबावर शंकूच्या आकाराचा असायचा. वरील आसपासच्या उंच बाजूला मोठ्या नाड्या दोरीने मंडप बांधलेला असायचा. आमचे दर्शन झाले की, त्या मधोमध असणाऱ्या लाकडी खांबाला धरून आम्ही बालमित्र गोल गोल फिरायचो. एक वेगळाच आनंद मिळायचा.आज भले अत्याधुनिक पाळणे , आनंदनगरीतील विविध उंच पाळणे आलेत, पण आम्ही बालपणी ज्या खांबाला धरून गोल गोल फिरत असायचो त्याची सर किंवा तो आनंद आजच्या आधुनिक गोल गोल फिरण्याच्या पाळण्यात नाही असे आम्हा काही बालमित्रांना नक्कीच जाणवते. काळाच्या ओघात तो शंकू आकाराचा कापडी मंडप यात्रेच्या निमित्ताने मंदिराच्या समोरील प्रांगणात टाकल्या जाईना.साधा सपाट कापडी मंडप टाकल्या जाऊ लागला.जे सौंदर्य आमच्या बालवयातील काळात गावच्या यात्रेनिमित्त मंदिराच्या समोरील प्रांगणात टाकल्या जाणाऱ्या शंकू आकाराच्या मंडपात उठून दिसत होते,ते त्यानंतर टाकल्या जाणाऱ्या सपाट कापडी मंडपात दिसेना..!


इकडं तिकडं हिंडून झाले की, वडिलांच्या आसपास मुद्दामहून लुडबुड करायची, जेणेकरून त्यांचं आपल्याकडे लक्ष जाईल अन् ते आपल्याला खर्ची देतील.अखेर आपला हेतू साध्य व्हायचा अन् आमच्या वाट्याची पाच ते दहा रुपया पर्यंतची खर्ची मिळायची.मग काय हातात खर्ची पडल्या पडल्या हुंदडत रमेश, सोमनाथ, रमेश, अप्पा अन् विजूच्या घरी जायचो अन् म्हणायचो...

" मला दादांनी खर्ची दिली रे भो..! तुला दिली का..? नसणं दिली तर घे अन् चल लवकर..!"


मित्रांना खर्ची मिळालेली असायची; मग पालखेड गावातील मुख्य पेठेत भरणाऱ्या यात्रेत जायचो.आमच्या बालपणी  मंदिराच्या  गल्लीतच मुख्य पेठ होती.काळाच्या ओघात गावाचा फुगवटा वाढला अन् गावाची पेठ देखील फुगवट्यात पसरली.मुख्य पेठेत आलेल्या दुकानात जायचो, अर्थात पाहिलं दुकान असायचे खाऊचे..! मस्तपैकी दोन रुपयांची गोडीशेव खायचो. गोडीशेव हा माझा सदा सर्वकाळ आवडता खाऊ असल्याने आम्ही बालमित्र त्यावर अगोदर ताव मारायचो.तो कालखंड होता ऐंशीच्या दशकातील सुरुवातीचा..! खाऊ खाऊन झाला की, आम्ही कटलरी दुकानदाराकडे आमचा मोर्चा वळवायचो. कटलरी दुकानदार दरवर्षी एकच असायचे अन् ते आमच्याच पालखेड गावाच्या शिवावरील गाव असलेल्या काटे पिंपळगाव ता.गंगापूर येथील..! उरलेल्या रुपयात खेळणी घेण्यासाठी दुकानदार सोबत आमची बोलणी सुरू व्हायची.आम्ही पट्टीचे गिऱ्हाईक असल्याने खूप घासाघीस करून पाच रुपयांपर्यंत फक्त मुंडकं असलेलं पत्र्याचे ट्रॅक्टर विकत घायचो.जर काही रुपये शिल्लक राहिले तर इतर कुणी मित्र आल्यानंतर त्यांच्या सोबत अजुन इतर काही खरेदी करायला ज्याला आजकाल ' शॉपिंग ' म्हणतात त्यासाठी राखून ठेवायचो.


आमच्या बालपणी खर्ची कमी मिळायची पण त्यात बरकता असायची.आजकाल खर्ची खूप मिळते पण त्यात बरकता  लाभत नाही.बहुदा पैश्यांचे मूल्य घसरले असावे.


असो, आठवणी  कुठून कुठे भेटतील याचा नेम नाही.कदाचित याचमुळे आठवणींना आठवणी म्हणत असावं, कारण त्या आठवून आठवून आठवणीत येतात म्हणून..! 


ता.क. - प्रत्येकाला त्याचा आपला भूतकाळ नक्कीच भेटतो ,फक्त प्रत्येकाचं आपलं वर्तमान जमिनीवर हवं..! 😊


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक -१७/४/२०२२, रविवार.

शुक्रवार, ८ एप्रिल, २०२२

" पितृतुल्य तीर्थस्वरुप पाडळकर बाबा..!"


 

मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


" पितृतुल्य तीर्थस्वरुप पाडळकर बाबा..!"


==============================


" बाबा ,आज तुम्ही कायमचे या इहलोकातून निघून गेलात अन् माझ्या भावविश्वातील एका पितृतुल्य ज्येष्ठ मित्राला मी कायमचा मुकलो..!"


मृत्यू तर प्रत्येकाचं अंतिम विसाव्याचे ठिकाण,पण एखाद्याचा मृत्यू हळव्या मनाला खूप गहिवर निर्माण करून जातो. जसं की,आज पितृतुल्य तीर्थस्वरुप पाडळकर बाबा यांचं कायमचं निघून जाणं..! पितृतुल्य तीर्थस्वरुप पाडळकर बाबा अन् माझ्या नात्यात जिवलग मैत्रीची जी खोली होती ती आमच्यातील वयाच्या तफावतीला कमी करत असे. जिवलग मैत्रीची व्याख्या तरी काय असते हो..? माझ्या मते जिथं तुम्ही तुमच्या अंतर्मनातील सर्व भाव व्यक्त करतात तीच जिवलग मैत्री..! जिथं असं काही जाणवत नाही, ती फक्त मैत्री असते बाकी काही नाही..! मी माझ्या आज पर्यंतच्या आयुष्यात जे काही खूप मोजके ज्येष्ठ पितृतुल्य जिवलग मित्र कमावले होते, त्यात पितृतुल्य तीर्थस्वरुप पाडळकर बाबा सन्मानाने स्थान मिळवून होते.आज माझ्या याच पितृतुल्य तीर्थस्वरुप पाडळकर बाबा यांचे पुणे येथे निधन झाले अन् मी अन् माझे संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले.


पितृतुल्य तीर्थस्वरुप पाडळकर बाबा..!


अतिशय मितभाषी व्यक्तिमत्व..! पितृतुल्य तीर्थस्वरुप पाडळकर बाबा अन् मी जि.प.प्रा.शा.हडस पिंपळगाव, कें. लासुरगाव, ता. वैजापूर, जि.औरंगाबाद येथे शिक्षक म्हणून जवळ जवळ सात वर्षे सोबत होतो. पितृतुल्य तीर्थस्वरुप पाडळकर बाबा यांना त्यांचे चिरंजीव ' बाबा ' या नावाने हाक मारायचे त्यामुळं मी , माझी पत्नी अन् माझे मुले देखील त्यांना ' बाबा ' याच नावाने हाक मारायचो. पितृतुल्य तीर्थस्वरुप पाडळकर सर उपाख्य बाबा अन् मी महावीर नगर , लासूर स्टेशन, ता.गंगापूर येथे सख्खे शेजारी होतो.येथे सख्खे असा शब्दप्रयोग करण्याचा हेतू असा की, मला अन् बाबांना एकमेकांची घरं हक्काची होती..!


मी माझ्या आयुष्यातील दीड तप लासूर स्टेशन येथील महावीर नगर येथे व्यतीत केले.या संपूर्ण काळात असा एकही दिवस जात नसायचा, ज्यादिवशी बाबांची अन् माझी शाब्दिक कोटी झालेली नसायची. मराठी भाषेतील मार्मिक कोपरखळ्या या आम्हा दोघांच्या नित्य भेटीत आवर्जून असायच्या. आमची प्रत्येक भेट ही हसून व्हायची अन् निवांत बसून त्या चर्चेत आयुष्यातील अनेक सुख दुःखांना आम्ही एकमेकांजवळ मनमोकळेपणाने व्यक्त करायचो. लासूर स्टेशन येथील माझ्या दीड तपाच्या कालखंडात पाडळकर बाबा जेवढं मनमोकळेपणाने माझ्याजवळ व्यक्त झाले असतील, तेवढं इतरांच्या जवळ नाही याची खात्री वाटते.


तीर्थस्वरुप पाडळकर बाबा यांचे मुले पुण्यात स्थायिक झालेले होते.पितृतुल्य तीर्थस्वरुप पाडळकर बाबा अन् त्यांच्या अर्धांगिनी ज्यांना माझे कुटुंबीय ' बाई ' या मायेच्या नावाने हाक द्यायचो. ही दोन्ही व्यक्तिमत्वे नात्यात आई वडील जाणवायचे. तीर्थस्वरुप बाई या स्वतः उच्च शिक्षित शिक्षिका होत्या. दोघेही निवृत्तीचे जीवन जगत होते.दरवर्षी तीर्थस्वरुप पाडळकर बाबा अन् बाई यांच्या लासूर स्टेशन येथील घरी गौरी पूजन असायचे, त्यावेळी माझी धर्मपत्नी आवर्जून बाईंना मदत करायला जायची.एकदा तीर्थस्वरुप पाडळकर बाईंची तब्येत अचानक अस्वस्थ झाली होती.त्यावेळी बाबांनी तातडीने माझ्या घरी येऊन माझ्या पत्नीला बोलावून घेतले होते.माझ्या पत्नीने त्यावेळी हलक्या नाजूक आहाराचा स्वयंपाक करून दिला अन् शुश्रुषा केली होती. त्यावेळी तीर्थस्वरुप बाबांना खूप गहिवरून आले होते.जो पर्यंत मी लासूर स्टेशन येथे वास्तव्यास होतो तो पर्यंत माझ्या पत्नीने अगदी निस्वार्थ भावनेने वयोवृध्द तीर्थस्वरुप पाडळकर बाबा अन् बाई यांची अगदी स्वतच्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्ती सारखी सेवा केली होती.याविषयी बाबा बऱ्याचदा माझ्याजवळ बोलून दाखवायचे.बाबांचा धाकटा मुलगा प्रिय नितीन हा पुण्याहून अधून मधून माझ्या संपर्कात असायचा.


 जि.प.प्रा.शा.हडस पिंपळगाव, कें. लासुरगाव, ता. वैजापूर, जि.औरंगाबाद येथे शिक्षक म्हणून आम्ही जवळ जवळ सात वर्षे सोबत होतो.याच काळात काही काळासाठी पाडळकर बाबांकडे शाळेचा मुख्याध्यापक पदाचा प्रभारी कार्यभार आला होता. यातील काही काळासाठी शाळेत शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी मदतनीस नसल्याने बाबा अन् मी सकाळी लवकर शाळेत जायचो अन् शालेय पोषण आहाराची तयारी करायचो.मला स्वतः ला मांसाहारी स्वयंपाक वगळता इतर स्वयंपाक येत असल्यामुळे मी पाडळकर बाबांना सांगितले होते की, " बाबा, तुम्ही काळजी करू नका, जो पर्यंत मदतनीस उपलब्ध होत नाही तो पर्यंत मी स्वतः खिचडी शिजवत जाईल..!" हे ऐकून बाबांना खूप प्रशासकीय अन् मानसिक आधार वाटला होता.आम्ही दोघे शाळा सुरू होण्याच्या अंदाजे चाळीस मिनिटे अगोदर येऊन मी तांदूळ निवडून इतर साहित्य एकत्र करून खिचडी गॅस वर शिजवायला टाकून द्यायचो. ही मदत काही दिवसांसाठीच होती, नंतर मदतनीस उपलब्ध झाल्यानंतर पूर्ववत कार्य सुरू झाले होते.मात्र या काळात बाबांना त्यांच्या प्रभारी मुख्याध्यापक काळात माझ्याकडुन जी एक शिक्षक सहकारी म्हणून सेवा दिल्या गेली होती, त्याची जाणीव पाडळकर सर उपाख्य बाबांनी तहहयात ठेवली..! 


माझ्या लासूर स्टेशन येथील वास्तव्यात माझ्या घरी माझे आई वडील देखील राहायचे.माझ्या तीर्थरूप वडिलांशी बऱ्याचदा बाबा गप्पा करायचे.माझी स्व. खूप धार्मिक होती.तीर्थस्वरुप पाडळकर बाई देखील खूप धार्मिक होत्या.ज्यावेळी पाडळकर बाई एखादी पोथी वाचायला बसायच्या त्यावेळी माझी आई अगरबत्ती न्यायची अन् मन लावून बाईंची पोथी वाचन ऐकायची.यावेळी बाबा निवांतपणे बाहेर येऊन तुळशी वृंदावन जवळ येऊन उभे राहायचे.


तीर्थस्वरुप पाडळकर बाबा अन् माझ्यात मैत्रीचे नाते तहहयात राहिले.आमच्या गप्पात अनौपचारिक विषय हमखास असायचे.मैत्रीत अनौपचारिक विषय राहिले तरच जिवलग मैत्रीचा वेल बहरतो ,नसता मैत्रीच्या वेलीची वाढ खुंटते..! आम्हा दोघांच्या गप्पात सर्व रस असायचे, त्यामुळे या नात्यात ओलावा होता.


चार वर्षांपूर्वी मी लासूर स्टेशन सोडले अन् तीर्थस्वरुप पाडळकर बाबा अन् बाई हे देखील बऱ्याचदा पुण्याला मुलाकडे राहू लागले.मी अधून मधून जेंव्हा कधी लासूर स्टेशन येथे जात असायचो तेंव्हा पाडळकर बाबा अन् बाई जर लासूर स्टेशन येथे आलेले असेल तर दुरूनच मी मोठ्याने म्हणायचो.." बाबा ,केंव्हा आलात ? पुणे कसे आहे ? " अशा अनेक प्रश्नांनी आमच्या भेटीची सुरुवात व्हायची. आता यापुढे मी लासूर स्टेशन जरी कधी मधी गेलो तरी बाबांचा तो प्रेमळ सहवास मिळणार नाही..! पाडळकर बाबांचे बऱ्याचदा तुळशी वृंदावन जवळ उभे असलेले रूप दिसणार नाही..! वडिलकीच्या नात्याने केलेला उपदेश आता होणार नाही..! नियतीने आमच्या नात्यात एका बाजूने कायमचा पूर्णविराम दिला आहे..! माझ्या यापुढील आयुष्यात तीर्थस्वरुप पाडळकर सर उपाख्य बाबांची उणीव कायमची जाणवत राहील.एखाद्या प्रेमळ माणसाच्या आपल्या आयुष्यातील उणीवेला आपण फक्त आणि फक्त अशा प्रेमळ माणसाच्या आठवणीने भरून काढू शकतो..! यापेक्षा आपल्या मानवाच्या हाती दुसरे काहीही नाहीच..! तीर्थस्वरुप पाडळकर सर उपाख्य बाबांची माझ्या आयुष्यातील उणीव त्यांच्या अन् माझ्या अनेक आठवणींनी मी येथून पुढे फक्त आठवून भरून काढत राहत राहील..!


तीर्थस्वरुप पाडळकर बाबा ,आज तुम्ही कायमचे या इहलोकातून निघून गेलात अन् माझ्या भावविश्वातील एका पितृतुल्य ज्येष्ठ मित्राला मी कायमचा मुकलो आहे. तुमच्या सहवासातील प्रत्येक आठवण माझ्यासोबत संजीवन रुपात असेल हे मात्र नक्की..!

तीर्थस्वरुप पाडळकर बाबा , आपल्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच भारतमातेच्या चरणी माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून प्रार्थना..!

भावपूर्ण श्रद्धांजली..!🙏🏻


ता.क. - तीर्थस्वरुप पाडळकर बाबा अन् माझा खालील फोटो, लासूर स्टेशन येथील बाबांच्या घरासमोरील आहे. भेटीची दिनांक होती - २२ ऑगस्ट २०२१


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ८ एप्रिल २०२२, शुक्रवार.