गुरुवार, २२ मे, २०२५

कौटुंबिक स्नेही स्व. तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा



 


#मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


कौटुंबिक स्नेही स्व. तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा


====================


जेंव्हा काही व्यक्ती, काही व्यक्तींच्या आयुष्यात सुख दुःखात एकमेकांना साथ देतात तेंव्हा त्या व्यक्तींच्या भाव विश्वात सुंदर अशा नात्यांची वीण घट्ट होऊन जाते. अशांच्या आयुष्यात फक्त आणि फक्त आपुलकी, जिव्हाळा अन् एकमेकांविषयी असलेल्या आदरयुक्त भावनांचा सुंदर असा मिलाप होऊन आयुष्यभर पुरून उरेल असे निखळ मैत्रीचे नाते निर्माण होते. जातपात, धर्म, वंश इत्यादी बाबी मानवाने मानवाच्या सोयीसाठी निर्माण केलेल्या आहेत. मानवाने मानवाच्या सोयीसाठी निर्माण केलेल्या या बाबींमध्ये ज्यांना कुणाला एकमेकांविषयी समजून उमजून घेणारी व्यक्ती काहींच्या आयुष्यात येते तेंव्हा अशी अत्यंत मोजकी माणसं विधात्याच्या या मानवी विश्वात नशीबवान म्हणायला हवी. अत्यंत नशीबवान ठरणाऱ्या अशा अत्यंत मोजक्या व्यक्तीत माझे तीर्थरूप स्व. वडील अन् माझ्या वडिलांचे जिवलग मित्र स्व. तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा उगले सर दहेगावकर होते.


काल दिनांक २१/५/२०२५ बुधवार रोजी मला संध्याकाळी पाच वाजता माझा जिवलग बालमित्र तथा वर्गमित्र संजय श्रीराम उगले याचा व्हॉट्स ॲपवर मेसेज आला. मी सदरील मेसेज वाचला अन् स्तब्ध झालो. त्या मेसेज मध्ये तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा उगले यांचा स्वर्गवास झालेला असून दशक्रिया विधी बाबतचा मजकूर होता. मी मेसेज अर्धवटच वाचला अन् लगेच जिवलग बालमित्र संजू उगले यास कॉल केला अन् अत्यंत दुःखद संवेदना व्यक्त केल्या. दुसऱ्याच क्षणाला मी माझ्या मुलांना अन् माझ्या पत्नीला आपल्या स्व. दादांच्या ( माझे वडील ) अन् स्व.तीर्थस्वरुप उगले आण्णांच्या मैत्री विषयी भरभरून बोललो. लगेच छ्त्रपती संभाजीनगरहून दहेगाव ता. वैजापूर च्या दिशेने प्रिय जिवलग बालमित्र तथा वर्गमित्र संजय श्रीराम आण्णा उगले याच्या घराकडे सांत्वनपर गृहभेटी साठी निघालो.


स्व. तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा विश्वनाथ पाटील उगले, रा. दहेगाव ता. वैजापूर.


एक अत्यंत प्रेमळ अन् आपुलकी, जिव्हाळा अन् तत्वनिष्ठ असलेलं सात्विक व्यक्तिमत्व..! असं म्हणतात की, विचार जुळणारी माणसं एकमेकांची जिवलग मित्र पटकन होतात. याचं उदाहरण म्हणजे माझे वडील अन् स्व. तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा होय. मी बालवयात , पौगंडावस्थेतील वयोगटात असताना माझे वडील अन् श्रीराम आण्णा यांना पालखेड अन् दहेगाव येथील एकमेकांच्या घरी सुख दुःखात जाताना , एकमेकांना भावनिक आधार देताना बघितलेले आहे. ज्यावेळी माझी आई स्वर्गवासी झाली होती त्यावेळी स्व. उगले तात्यांनी माझ्या वडिलांना दिलेला भावनिक आधार कदापि विसरणे शक्य नाही.आमच्या पालखेड येथील घरी साधारणतः तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या दहेगावहुन सलगपणे तीन चार दिवस तीर्थस्वरुप स्व.श्रीराम आण्णा उगले माझ्या वडिलांना भावनिक आधार देण्यासाठी आले होते. वार्धक्यात एखाद्या स्त्री किंवा पुरुषाचा साथीदार ज्यावेळी स्वर्गवासी होतो त्यावेळी त्या वार्धक्यातील मनाला सांत्वन देण्याची अत्यंत गरज असते. एकतर वार्धक्य, त्यात नानाविध व्याधी सोबत असतात. मानसिकदृष्ट्या खचलेल्या या वयात मन अन् स्वभाव चिडचिडा होऊन जातो हा मानसशास्त्रीय सिध्दांत आहे. स्री किंवा पुरुषाच्या वार्धक्याततील आयुष्यात जर आपला साथीदार कायमचा या इहलोकातून निघून गेला असेल तर या दुःखद अवस्थेत मानसिक अन् भावनिक आधार देण्याचं काम त्या व्यक्तींच्या आयुष्यातील जिवलग स्नेहीच उत्तम प्रकारे करू शकतात असे मला वाटते. ती भूमिका तीर्थस्वरुप उगले आण्णांनी माझ्या स्व.वडिलांचे जिवलग मित्र म्हणून निभावली होती.


स्व. तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा उगले अन् माझे स्व. तीर्थरूप वडील धोंदलगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षक म्हणून सोबत होते. तो कालखंड होता इ.स. १९७० ते १९८० दरम्यानचा..! माझे तीर्थरूप वडील अन् तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा उगले धोंदलगावला सायकलवर जात येत असत. पालखेड ते धोंदलगाव एका बाजूचे अंतर साधारणतः पंधरा किलोमीटर अंतर आहे. शालेय दिवसाच्या रोजी माझे वडील सकाळी पालखेडहून सायकलवर निघायचे. दहेगाव येथून तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा उगले पुढील प्रवासाला सोबत असत. दोघांच्या दोन सायकली असत. पावसाळ्यात सायकलवर जाण्यायेण्याचा अत्यंत त्रास व्हायचा. पूर्ण रस्ता निव्वळ मातीचा असल्याने सायकल चालवणे अत्यंत त्रासदायक ठरत असे. त्यात सर्वात त्रासदायक ठरत असे दहेगाव अन् करंजगाव दरम्यान असलेली बोर नदी..! त्यावेळी पाऊस खूप व्हायचा. बोर नदीला हमखास पूर यायचा. माझे वडील अन् श्रीराम आण्णा दोघांनाही पोहता येत होते. दोघेही पूर्णतः निर्व्यसनी अन् तब्येतीचे काटक होते. बोर नदीच्या पुरातून सायकल काढायची हिम्मत श्रीराम आण्णाच करत असायचे. श्रीराम आण्णा अंगावरील विजार कमरे पर्यंत ओढून अगोदर माझ्या वडिलांची सायकल स्वतःच्या खांद्यावर उचलून नदीच्या पैलतीरावर घेऊन जात असत. मग त्यांची स्वतः ची सायकल नदीच्या पैलतीरावर घेऊन जात असत. शेवटी माझे वडील अन् श्रीराम आण्णा पोहत पोहत बोर नदीच्या पैलतीरावर जात असत. 


माझे स्व. तीर्थरूप वडील अन् स्व. तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा उगले यांच्या मैत्रीच्या विश्वातील हे नातेसंबंध अत्यंत सर्वश्रेष्ठ होते. अगदी निस्वार्थ अन् एकमेकांची काळजी घेणारी ही मैत्री दैव देणगीच होती. माझ्या तीर्थरूप वडिलांनी आम्हाला स्व.तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा उगले अन् त्यांच्या आयुष्याच्या प्रवासातील कित्येक आठवणी सांगितलेल्या आहेत. त्या आठवणी आज आठवल्या की, असे वाटते ही भली माणसं विधात्याने निर्माण केलेल्या त्याच्या विश्वातील मैत्रीच्या विश्वातील देव माणसं होती. त्यांनी ना कुणाची जात बघितली ना कुणाची आर्थिक परिस्थिती बघितली..! बघितला फक्त आणि फक्त माणुसकीचा स्नेह संबंध..! जो स्नेह त्यांनी एकमेकांच्या वार्धक्यातील शेवटच्या टप्प्यापर्यंत कुठलाही आविर्भाव न आणता जपला हे अत्यंत अभिमानास्पद अन् कौतुकास्पद जाणवते. 


माझे तीर्थरूप वडील त्यांच्या सेवेच्या शेवटच्या तब्बल बारा वर्षे दहेगाव येथे मुख्याध्यापक म्हणून सेवेत होते. स्व. तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा उगले यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याच्या वेळी माझे तीर्थरूप वडील ज्या हिमतीने अन् अत्यंत खंबीर होऊन श्रीराम तात्या उगले यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले होते ते सदैव संस्मरणीय अन् एका जिवलग मित्राच्या आयुष्यात भक्कमपणे उभे राहण्याचे सर्वोत्तम उदाहरण होते. 


दिनांक २१/५/२०२५ बुधवार रोजी संध्याकाळी दहेगाव येथे मी प्रिय जिवलग बालमित्र संजय श्रीराम आण्णा उगले अन् ज्येष्ठ बंधू अनिल भाऊ श्रीराम आण्णा उगले यांच्या शेत वस्तीवर सांत्वनपर गृहभेटी वेळी पोहोचलो होतो. त्यावेळी स्व. तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा उगले यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याच्या वेळच्या अन् माझे वडील अन् तात्यांच्या मैत्रीच्या आठवणी दाटून आल्या. श्रीराम तात्यांच्या पाठीशी माझ्या वडिलांच्या खंबीर अन् भक्कमपणे पाठीशी उभे राहण्याच्या त्या प्रसंगाला अन् त्यांच्या जिवलग मैत्रीच्या आठवणींना तिथे उपस्थित असणाऱ्या कित्येकांनी उजाळा दिला. 


माणसाच्या आयुष्यात अनेकानेक नात्यांची वीण घट्ट होत जाते.त्यात रक्ताची नाती अन् रक्त विरहित नाती माणसाच्या आयुष्याच्या प्रवासात त्याच्या अंतिम श्वासापर्यंत सोबत असतात. त्याच नात्यातून निर्माण झालेले भावूक नातेसंबंध , त्यातून निर्माण झालेले ऋणानुबंध मात्र सदैव चिरंजीव ठरतात. मानवाच्या आयुष्यात मृत्यू शाश्वत सत्य आहे. या इहलोकात जो पर्यंत मानवाचे अस्तित्व असते तो पर्यंत असे भावूक अन् ऋणानुबंध जोडणारे नातेसंबंध वर्तमानात देखील सदैव सोबत असतात, आठवणींच्या रुपात..! जसे की, माझ्या स्व. तीर्थरूप वडिलांच्या अन् स्व. तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा उगले यांच्या आठवणींच्या रुपात..!!


स्व. तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा उगले सर यांचे दोन्ही चिरंजीव बँकेत नोकरी करत आहेत. तसेच तात्यांचे जावई तथा माझे प्रिय बालमित्र गोविंद गावंडे कामगार आयुक्त कार्यालय छ्त्रपती संभाजीनगर येथे सेवेत आहे. प्रिय बालमित्र संजय श्रीराम उगले, ज्येष्ठ बंधू अनिल भाऊ श्रीराम उगले , मंगलताई श्रीराम उगले गावंडे अन् प्रिय बालमित्र गोविंद गावंडे पाटील यांना दुःखातून सावरण्याची शक्ती लाभो हीच विधात्याच्या चरणी प्रार्थना..!


स्व. तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा उगले सर यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच भारतमातेच्या चरणी प्रार्थना..!🙏


स्व. तीर्थस्वरुप श्रीराम आण्णा उगले सर यांना आमच्या कुटुंबाकडून भावपूर्ण श्रद्धांजली..!🙏


वंदे मातरम् 


लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव. ©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक: २२ मे २०२५, गुरुवार


एक अत्यंत प्रेमळ अन् आपुलकी, जिव्हाळा अन् तत्वनिष्ठ असलेलं सात्विक व्यक्तिमत्व..! असं म्हणतात की, विचार जुळणारी माणसं एकमेकांची जिवलग मित्र पटकन होतात. याचं उदाहरण म्हणजे माझे वडील अन् स्व. तीर्थस्वरुप श्

शुक्रवार, १६ मे, २०२५

वय होते..


 



#चिंतन ©️


वय होते..


======================


वय होते झुलायचे अन् झुलवायचे


एकमेकांच्या सोबत खोड्या करायचे


हा कोण तो कोण हे कधी शिवलं नाही


एकमेकांशिवाय कधी करमलं नाही ||१||


होता प्रत्येकाचा स्वभाव वेगळा


म्हणून कधी कुणी जाणवला नाही निराळा


कुणी म्हणतं काही दिवस असतात मंतरलेले 


आम्हीच होतो त्यातील आतुरलेले  ||२||


गत आयुष्याला देखील हेवा वाटला असेल


ते आमच्या मैत्रीला बघून खुदकन हसलं असेल


हळुवार वयात होत्या फक्त तीनच वर्ग खोल्या


मात्र त्या संबंध आयुष्याला त्या पुरून उरल्या ||३||


प्रगत अप्रगत या भानगडीत आम्ही पडलो नाही


सगळेच एक सारखे यापेक्षा दुसरं काही जगलो नाही


कमीत कमी गरजातील आम्ही होतो श्रीमंत


खात्रीने सांगतो आमच्या पैकी कुणीही नव्हता संत ||४||


शेणा मातीच्या अभ्यासिकेत अभ्यासही भरपूर केला


एकमेकांना वाचविण्यासाठी सभ्यतेचा आव देखील आणला


आम्ही होतो पौगंडावस्थेतील निशाचर 


तत्कालीन गावातील माहित होते चराचर ||५||


आता फक्त आठवणी आहेत त्या क्षणांच्या 


काहीजणाच्या वर्तमानात नसलेल्या देहाच्या


वर्तमानात प्रत्येकजण स्थिरावला आहे 


आपापल्या आयुष्यात रममाण झाला आहे ||६||


आला दिवस जात आहे 


जाताना आयुष्य घेऊन जात आहे 


हे दयाघना प्रेमात अंतर ठेवू नको


मैत्रीच्या विश्वात अंतर ठेवून जगणं नको ||७||


वंदे मातरम् 


पद्य लेखन - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील पद्य  लेखन कॉपीराइट केलेले असून पद्य लेखनाचे संपूर्ण हक्क राखून आहेत.)

दिनांक - १६/५/२०२५, शुक्रवार



सोमवार, १२ मे, २०२५

तो देखील धर्म आहे.


 

चिंतन ©️


तो देखील धर्म आहे.


=====================


माझे सह परिवार गेल्या काही दिवसांपूर्वी वर्ष श्राद्ध निमित्त जाणे झाले होते. यथा योग्य पद्धतीने पूजा सुरू झाली होती. मात्र पौरोहित्य करणारे जे गुरू होते ते पूजा , मंत्र उच्चारण करत असताना त्यांच्या तोंडात एका बाजूला धूम्रपान युक्त बार ठेवून मंत्र उच्चारण करत होते.


मला संबधित पौरोहित्य करणाऱ्या गुरूंचे ते वर्तन पवित्र मंत्र उच्चारण करताना अजिबात योग्य वाटले नाही. विशेष म्हणजे संपूर्ण पूजा विधी मंत्र संपे पर्यंत पौरोहित्य करणाऱ्या गुरूंच्या तोंडात धूम्रपान युक्त बार होता. पूजा आटोपल्यावर संबंधित गुरूंनी योग्य ती दक्षिणा ठेवायला सांगितली.मी अजिबात दक्षिणा ठेवली नाही. मी स्वतः हिंदू आहे.हिंदू धर्मातील पूजा विधी पद्धती यावर माझा विश्वास देखील आहे.मात्र जर पौरोहित्य करणारे गुरुवर्य जर पूजा विधी मंत्र उच्चारण करताना स्वतः नैतिक बंधने पाळत नसतील तर आपणही अशा गुरूंना दक्षिणा का म्हणून द्यावी..? त्यांचा धर्मोपदेशक म्हणून सन्मान का करावा..? मी संबंधित गुरूंना या विषयी नम्र भाषेत काहीच बोललो नाही, कारण स्थळ अन् वेळ योग्य वाटली नाही.


असेच ' काही शिक्षकांचे ' देखील असते. शिक्षक देखील गुरुवर्य असतात. काही शिक्षक विद्यार्थ्यांच्या समोर धूम्रपान करतात. यातून असे शिक्षक विद्यार्थ्यांच्या समोर कोणता आदर्श प्रस्तुत करत असतात..? हा फार मोठा सामाजिक प्रश्न आहे. सगळं शहाणपण औपचारिक शिक्षणानेच येते असं अजिबात नाही असे माझे ठाम मत आहे. त्याला जोड स्वतः हुन अंगिकारलेल्या नैतिक मूल्यांची देखील असावी लागते. फार तर अगदी १००% नैतिक मूल्यांची जोपासना जरी शक्य झाली नाही तरी निदान काही बाबतीत जसे की वेळ, स्थळ या बाबतीत तर स्वतः हून बंधने पाळावीच लागतील. तो देखील धर्म आहे. बाकी नुसत्या फुशारक्या , आत्मप्रौढी, अन् एका विशिष्ट वलयात दिसणं यापेक्षा वेगळं काहीच नाही.


मला जे वाटलं ते मी नम्रपूर्वक व्यक्त केले आहे. माझ्या वरील व्यक्त होण्याचा ' सर्वजण ' असे न समजता ' काहीजण ' असे समजून ज्यांन त्यानं यावर खरचं आत्मचिंतन करण्याची नितांत गरज आहे असे वाटते. माणसाच्या आयुष्यात समाज हा आपलं निरीक्षण करणारा सर्वात मोठा अन् सूक्ष्म पद्धतीने निरीक्षण करणारा सर्वोत्तम निरीक्षक असतो. एवढ्या मोठ्या सर्वोत्तम निरीक्षकाच्या समोर ज्यानं त्यानं जरा जपून..! पृथ्वीवरील माणूस हा एकमेव असा प्राणी आहे ज्याने आपापल्या सोयीनुसार आत्मिक सुखाच्या अन् भौतिक सुविधांची निर्मिती केली आहे. ज्यातून त्याला आत्मिक समाधान अन् सुख प्राप्ती होत असते. या बाबी निर्माण करताना प्रत्येक मानवी समूहाची, घटकांची काही जबाबदारी याचं मानवी समाजाने निश्चित केलेली आहे. तिचं संतुलन बिघडले तर दृश्य स्वरूपात व्यक्त न होणारे, मात्र जाणवणारे सामाजिक प्रश्न निर्माण होतात. आणि जाणवणारे सामाजिक प्रश्न समाजव्यवस्थेतील सामाजिक सन्मानासाठी त्रासदायक ठरू लागतात.


मी व्यक्त केलेल्या वरील विचारांनुसार मीच स्वतः फार दीड शहाणा , नैतिक मूल्यांची खाण असलेला आहे असे कुणीही कृपया अजिबात समजू नये.मात्र वेळ, स्थळ या बाबतीत स्वतः हून काही सामाजिक बंधने पाळावीच लागतील. तो देखील धर्म आहे..!


जय श्रीकृष्ण..!

वंदे मातरम् 


धूम्रपानाचा विरोधक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - १३/५/२०२५, मंगळवार

बुधवार, ७ मे, २०२५

अजातशत्रू आदरणीय ठोकळ सर..!



 



मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


अजातशत्रू आदरणीय ठोकळ सर..!


======================


आज दिनांक ७/५/२०२५ बुधवार रोजी ज्येष्ठ निवृत्त शिक्षक आदरणीय शामसुंदर ठोकळ सर रा.लासुरगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर यांचा स्वर्गवास झाल्याचे समजले. दुःख वाटले. माझ्या आयुष्याच्या प्रवासात जे ज्येष्ठ सहकारी शिक्षक भेटले त्यातील हळूहळू एक एक तारा निखळत चालला आहे.जसे आज आदरणीय ठोकळ सर यांचं या इहलोकातून कायमचं निघून जाणं..!


आदरणीय ठोकळ सर म्हणजे एक अतिशय जिंदादील व्यक्तिमत्त्व..! अतिशय खडतर परिस्थितीत बालपण, तारुण्य गेलेलं व्यक्तिमत्त्व होते ठोकळ सर..! मी साधारणतः सोळा वर्षे लासुरगाव केंद्रांतर्गत शिक्षक म्हणून सेवा केली. या सेवेत ज्या ज्येष्ठ शिक्षकांचा एक अतिशय अनौपचारिक सहवास लाभला त्यात आदरणीय ठोकळ सर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. आदरणीय ठोकळ सर अन् मी शिक्षक म्हणून हडस पिंपळगाव ता वैजापूर येथे सोबत कार्यरत होतो. ' मी वयाने ज्येष्ठ शिक्षक आहे ' याचा तसूभर देखील अभिमान आदरणीय ठोकळ सरांनी बाळगला नव्हता. आम्हा तत्कालीन नवतरुण शिक्षक मित्रांमध्ये आदरणीय ठोकळ सर अगदी समरसून जायचे.


आम्ही तत्कालीन शिक्षक मित्र मंडळींनी प्राथमिक शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशन निमित्त इ.स.१९९५ ते इ.स. २००० दरम्यान जळगाव ( खान्देश ) अन् नागपूर ( विदर्भ ) जो प्रवास केला होता, तो प्रवास अतिशय रम्य अन् हसत खेळत झाला होता. त्या प्रवासात ज्येष्ठ शिक्षक आदरणीय गोमलाडू सर, स्व. टोणपे सर अन् स्व. ठोकळ सर, स्व.सावळे सर, स्व.मेंढे मामा यांनी आपल वय विसरून आम्हा तत्कालीन नवतरुण शिक्षक मित्रांच्या सोबत प्रवासी आनंद साजरा केला होता. त्या आठवणी माझ्या आयुष्याचा अंतिम श्वास असे पर्यंत अन् स्मृती शाबूत असे पर्यंत विसरणे अशक्य आहे.


आदरणीय ठोकळ सर म्हणजे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते.ठोकळ सरांना मी कधीच कुणाचीही वाद करताना बघितले नव्हते. माझ्या साधारणतः सोळा वर्षे लासुरगाव केंद्रांतर्गत शिक्षक म्हणून सेवेत असताना ज्यांच्या शाब्दिक कोट्यांच्या मी निखळ प्रेमात होतो ते पुढील प्रमाणे सर्व आदरणीय व्यक्तिमत्वे होते - स्व. बनकर सर, स्व. ठोकळ सर, स्व. एस.एम.जाधव सर, स्व. जोशी सर अन् सुभानराव आबा देशमुख..! बहुदा हे सर्वजण बालमित्र असावते म्हणून यांच्यातील अनौपचारिक मैत्री यांचे ज्येष्ठ वय झाल्यावर देखील त्यांचं बालवयातील नात्यांत नेहमी एकमेकांना भेटत असायची. विशेषतः सर्वजण आदरणीय एस.एम जाधव सर, जोशी सर अन् सुभानराव आबा देशमुख यांच्यातील निखळ मैत्रीचे बंध असलेल्या शाब्दिक कोट्या ह्या मला आनंदित करून जायच्या. बऱ्याचदा यांच्यात ठोकळ सर देखील सहभागी व्हायचे. बऱ्याचदा ह्या ज्येष्ठ आदरणीय मित्रांच्या शाब्दिक कोट्या ह्या लासुरगाव येथील माझा खूप जिवलग मित्र स्व. मनोहर काळे याच्या हॉटेल मध्ये होत असायाच्या. एकटक बघत अन् ऐकत यांच्यातील निखळ मैत्रीच्या नात्यातील शाब्दिक कोट्या ऐकून भाषिक कौशल्य अन् मैत्रीच्या नात्यातील मर्मबंधातील प्रेमळ ठेव जगायला शिकलो. या ज्येष्ठांच्या शाब्दिक कोट्या बघितल्या की मला माझ्या पालखेड गावातील काही बालमित्रांची आठवण नेहमी यायची. 


माझ्या लासुरगाव केंद्रांतर्गत शिक्षक म्हणून सेवेत ज्या दोन ज्येष्ठ जिवलग मित्रांना खूप जवळून बघता आले ती जिवलग ज्येष्ठ शिक्षक मित्रांची जोडीगोळी होती स्व.टोणपे सर अन् स्व. ठोकळ सर..! नेहमी सोबत असायचे. अगदी शौचाला जाताना देखील मी या दोन ज्येष्ठ मित्रांना बघितलेले आहे.असे अनौपचारिक ज्येष्ठ मित्र आजकाल बहुदा कुठेही सापडणार नाही याची मला खात्री आहे. अशी मैत्री आयुष्याच्या उतरत्या वयात लाभणे याला देखील नशीबच लागते.


असो, लासुरगाव ता. वैजापूर केंद्रांतर्गत माझ्या सेवेतील अनुभवांच्या खूप आठवणी आहेत, त्या यथावकाश कधीतरी माझ्या ब्लॉगवर नक्कीच लिहिल.


आज ज्येष्ठ निवृत्त शिक्षक आदरणीय शाम सुंदर ठोकळ सर रा.लासुरगाव ता. वैजापूर यांचा स्वर्गवास झाला आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच भारतमातेच्या चरणी प्रार्थना..!

भावपूर्ण श्रद्धांजली..!🙏


वंदे मातरम् 


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ७/५/२०२५, बुधवार