गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

" आपले भावविश्व...! "























चिंतन ©️

" आपले भावविश्व...! "

==================================

माणूस भावनेवर जगणारा व विविध मनोभावनांच्यापायी स्वत:चे भावविश्व फूलविणारा व वेळप्रसंगी उध्वस्त करणारा देखील..सजीव प्रजातीमधील "बहूदा एकमेव प्राणी " आहे. माणसाने आपले भावविश्व गूंतविण्यासाठी स्री,साहित्य,संगीत,कला,क्रिडा,गाणी इ.ची आपआपल्या सोयीनूसार निवड केलेली आपण बघतो. भावनेवर जगणारी माणसे आपली आवड जपण्यासाठी जिवाचा आकांतही करतात. कधी-कधी स्वत:चे भानही विसरतात;आणि एवढं तल्लिनतेनं भावविश्वात जगतो तो माणूसच...!

महेश भट्ट दिग्दर्शित " जख्म " या चित्रपटातील " तुम आए तो आया मुझे याद,गली में आज चाँद निकला..!" या गीतातील भाव अतिशय हृदयाला स्पर्श करून जातात. आनंद बक्षी यांनी लिहिलेल्या अन् एम. एम. क्रीम यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताचा गोडवा भावूक मनाला सुखावून जातो.

" तुम आए तो आया मुझे याद,गली में आज चाँद निकला..!" 
या गीताच्या सुरुवातीला जेंव्हा नागार्जुन ,पूजा भट्ट हिच्या घरी दारात येऊन उभा राहतो,त्यावेळी पूजा भट्ट,नागार्जुन कडे एकटक बघतच राहते. तिच्या त्या पाहण्यातील आनंदी वृत्ती अन् खूप दिवसानंतर भेट झाल्याच्या विरहानंतरचा जाणवणारा भाव,पूजा भट्ट यांनी अप्रतिम अभिनयाद्वारे व्यक्त केला आहे. पूजा भट्ट यांच्या त्या अव्यक्त भावनेला तितकीच अर्थपूर्ण शब्दांनी,संगीताने साथ दिली आहे , त्यामळे हे गाणं भावूक मनांच्या हृदयात कायमचे स्थान मिळवून आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण गीतात पूजा भट्ट यांनी जो न बोलताही अप्रतिम अभिनय केला आहे,तो निव्वळ लाजवाब आहे..! फक्त आपल्या देहबोलीतून आपल्या भावनेला अतिशय अत्युत्कृष्ट अभिनयाच्याद्वारे व्यक्त करणे या अभिनयाच्या श्रेणीतील यातील सर्वोत्कृष्ट अभिनय पूजा भट्ट यांनी केलेला आहे.

  बऱ्याच लोकांना अजूनही जुनी गाणी ऐकायला आवडतात कारण जुन्या गाण्यांच्या रचना ह्या आपल्या मनातील भावनांशी खूप जास्त प्रमाणात मेळ खातात .आपले मनोविचार ती गाणी प्रगट करत असतात.त्या गाण्यांमध्ये माणूस कधी-कधी स्वत:चे तरूणपण शोधतो..तर कधी-कधी बालपण तर कधी म्हातारपणही..! गाणी माणसाला निरव शांतता मिळवून देते; परंतू ती गाणी,त्यातील नादमाधुर्य व अर्थ मनाला हर्षोल्हासित करणारा असावा. या सर्व बाबी साधारणत: हिंदी किंवा मराठी चित्रपटातील ९०च्या दशकापर्यंत भरभरून पहायला मिळतात.सूधीर फडके,श्रीराम मोघे,जगदिश खेबूडकर,राम कदम,अनिल मोहिले,ग.दि.मा.सूरेश भट ,आनंदघन इ.अनेक मंडळींनी मराठी चित्रपट सृष्टीतील संगितमय व काव्यमय विश्वाला समृध्द केलेल आहे.

 हिंदी चित्रपट विश्वातील भावविश्वाला एका वेगळ्या उंचीवर नेणारी माझ्यामते दोन अवलिया माणसे ....गूलजार साहेब व किशोरदा...! तशी अनेक आहेत परंतू ही मंडळी जरा हटकेच...! किशोरदांनी त्यांच्या उभ्या हयातीत प्रौढ,म्हातारे झाले तरी त्यांच्यातील " बालकाला " कधीच मरू दिले नाही.अन् दूसरे सिध्दहस्त लेखीणीचा महाराजा माणूस...गूलजार साहेब...! गूलजारजींच्या प्रत्येक रचनेतील प्रत्येक शब्दात खूप गोड,गंभीर,समर्पक भावार्थ सामावलेला आढळून येतो. एकदा नाना पाटेकरजी व गूलजारजींची एकत्र मूलाखतीचा कार्यक्रम होता.विविध पत्रकार मंडळी हजर होती.नानाजी मूळातच वाचाळ माणूस...! अन् सोबत साक्षात भाषाप्रभू गूलजारजी...! दोघं, दोन टोकांची भावविश्व सांभाळणारी व जपणारी अवलिया माणसं..! या पत्रकार परिषदेत नानांनी विनम्रपणे काहीही मत व्यक्त करायला चक्क नकार दिला. कारण नाना म्हणाले 
" इथे मानवीय भावविश्वाला आपल्या रचनेद्वारे समृध्द करणारा देवमाणूस बसलेला असल्यावर मी बोलूच शकत नाही.."  
अस म्हणून त्यांनी गूलजारजींकडे माईक सोपविला होता..!

अशी थोर भावनाशील माणसांनी हिदी चित्रपटसृष्टी नटलेली आहे.! गूलजारजी रचित ,जे.पी.दत्ता दिग्दर्शीत " गूलामी " चित्रपटात (माझा सर्वात आवडता चित्रपट आहे) मिथून चक्रवर्ती व अनिताराज वर चित्रित केलेलं एक गाणं आहे. "जिहाले मस्की मुकुंबरंजीश...." वगैरे.. या गाण्यातील सूरूवातीचे शब्द अरेबिक भाषेतील व नंतरचे ऊर्दू मिश्रित हिंदीतील..! या गाण्याचा गोडवा व अर्थ गावा तेवढा थोडाच.! वास्तविक अरेबिक भाषा आपल्याला समजत नाही.तरीही ती रसिक भारतीयांनी भावनेच्या आधारे समजून घेतली व या गाण्याला अजरामर करून टाकले..! 

अशी अनेक गाणी आहेत की,जी भावनेवर जगणा-या अनेक भारतीयांना " भारतीय "म्हणून नेहमी एकत्र आणतात. आणि याचं श्रेय जाते वरील उल्लेखित व अनुल्लेखित रसिक भावनाशील थोर व्यक्तिंना...!

ता.क. - " गली में आज चांद निकला " या सुमधुर गाण्याची व्हिडिओ लिंक..! ज्यांना शक्य आहे त्यांनी निवांत ऐका अन् बघा..!! 🙏🏻🎼

https://youtu.be/SOYFHUTZ-kw

 
वंदे मातरम्..!

एक रसिक : नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - ३०एप्रिल २०१७


मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

" पहिले बाजीराव पेशवे यांना त्रिवार वंदन..! "🙏







चिंतन ©️

" पहिले बाजीराव पेशवे यांना त्रिवार वंदन..! "🙏

=================================

आपल्या भारतात काही राष्ट्रपुरुष " ते आले,त्यांनी पाहिले अन् त्यांनी जिंकले " या उक्तीप्रमाने त्यांचे अख्खे आयुष्य भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. आपल्या मराठी सत्तेचा विचार करायचा म्हंटल्यास त्यात छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज व पहिले बाजीराव पेशवे या तीन महान सेनानींना वरील उक्ती अगदी चपखल बसते.

वास्तविक आपल्या मराठी सत्तेच्या मध्ययुगीन इतिहासातील कालखंडात जाज्वल्य व अनुकरणीय ऐतिहासिक प्रसंगाचे तीन प्रमुख श्वास.त्यात पहिला श्वास म्हणजे थोरले महाराज छत्रपती शिवराय,‌ दुसरा श्वास ,धाकटे महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि तिसरा श्वास म्हणजे..मराठी हिंदवी स्वराज्याचे पंतप्रधान पहिले बाजीराव पेशवे हे होय.

अर्थात पहिला श्वास हा चिरंतन आयुष्याचा पहिला जिवंत साक्षात्कार असतो..कोणत्याही सजीवांकरिता. थोरले महाराज होते म्हणून बाकीच्या सर्व श्वासांना किंमत होती..!थोरले महाराज नसते तर...या फक्त कल्पनेने अंगावर काटा येतो.एवढी थोरवी थोरल्या महाराजांची आहे. मध्ययुगीन कालखंडात व तदनंतर मराठी माणसात, नव्हे नव्हे समस्त भारतीयांमध्ये जिवंतपणाचा, श्वासाचा पहिला हुंकार भरला तो थोरले महाराज शिवरायांनी. मराठी अस्तित्वाचा दुसरा श्वास अर्थात छत्रपती संभाजी महाराज आणि तिसरा श्वास...श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे..! या तिन्ही श्र्वासांच्या तरल कंपणावर आधारलेले अनेक सुंदर स्वर ( शूर सरदार) तयार झाले. त्या सर्व स्वरांचे (शुर सरदारांचे)आरंभवबिंदू होते हेच तीन श्वास होते. आज आपण आपल्या आजच्या असण्यातील श्वासातील तिसरा श्वास म्हणजे पहिले बाजीराव पेशवे यांच्या विषयी थोडक्यात बघुया. 
                                                                      
पहिले बाजीराव म्हंटल्यावर बहुतांशी लोकांना पटकन नजरेसमोर येते ती फक्त मस्तानी..! ह्या मस्तानीच्या निख्खळ प्रेमाचं वलय एवढं काही गडद आहे की, त्यापलिकडचे पहिले बाजीराव आम्हाला ठाऊक नसतात किंवा ठाऊक असूनही आम्ही या थोर राष्ट्रपुरुषाची एका विशिष्ट मर्यादित किंबहुना जातीच्या आकसापोटी एका विषयात यांना गुंतवून ठेवतो. पहिले बाजीराव पेशवे हे वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी हिंदवी स्वराज्याचे पेशवा झाले. असं म्हणतात की ,तुम्ही किती वर्ष आयुष्य जगलात याला महत्त्व नाही,तर जे काही आयुष्य जगलात ते कसं जगलात याला खूप महत्त्व आहे. पहिले बाजीराव पेशवे यांना केवळ ४० च वर्षांचं आयुष्य लाभलं..! राऊंचा जन्मदिन १८ ऑगस्ट १७०० व मृत्यू दिनांक : २८ एप्रिल १७४० म्हणजेच फक्त ३९ वर्ष ८ महिने व १० दिवस एवढेच पण दैदिप्यमान आयुष्य राऊ जगले. त्या एकूण आयुष्यापैकी केवळ २० च वर्षांची क्षत्रिय कारकीर्द लाभलेला हा महान योद्धा. त्या २० च वर्षांच्या काळात राऊंनी ,आपल्या सर्वांचे पहिले श्वास,छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचं ,हिंदवी साम्राज्य केलं.

हिंदवी स्वराज्याचे संकल्पक वंदनीय शहाजी राजे भोसले यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. ते स्वप्न छत्रपती शिवराय यांनी प्रत्यक्ष पूर्ण केले. त्याच हिंदवी स्वराज्याला आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळले वंदनीय छत्रपती संभाजी महाराज यांनी. आणि छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्याला थेट दिल्ली पर्यंत नेण्याचे कार्य पहिले बाजीराव पेशवे यांनी केले. पूर्वीपासून महाराष्ट्रास थेट आव्हान देणारी दिल्ली राउंनी फक्त जिंकूनच नाही, तर दिल्लीवर मराठी सत्तेचा अंकुश ठेवण्यात यश मिळविले ते ह्याच पहिल्या बाजीराव पेशवे यांनीच. थोरले महाराज शिवरायांना अभिप्रेत असलेले हिंदवी साम्राज्य, एवढ्या मग्नतेने वाढविले की, त्यापोटी वैयक्तिक आयुष्यची झालेली हेळसांड, तहान-भूक सारं सारं तुच्छ ठरलं आणि ह्या असामान्य वीराला मृत्यू आला तोही मोहीम करतानाच. रावेरखेडी (मध्यप्रदेश) येथे..दिनांक २८ एप्रिल १७४० रोजी...!😔

पहिले बाजीराव हे अनेक शतकांमधून उदय होणारे निष्णात व अतिशय चपळ सेनापती होते. या सेनानीस फक्त ३९ वर्ष ८ महिने व १० दिवस एवढच आयुष्य लाभलं. त्यातील २० वर्षांची कारकीर्द एक हिंदवी स्वराज्याचे रक्षण करणारा व वाढविणारा पंतप्रधान म्हणून अथक कार्य राऊंनी केले. आपल्या शिवप्रभूंच्या हिंदवी स्वराज्यासाठी युद्ध करत अजिंक्य राहिलेल्या या महारथीचा आपल्याला किती अभिमान वाटला पाहिजे.पण आपल्यातील काहीजन मात्र पहिल्या बाजीरावांना प्रेमवीर म्हणून पाहतात, वाचतात किंवा चर्चेत घेतात. शेवटी काही नाहीच तर मग त्यांची जात पाहतात. वास्तविक अशा अनेक महापुरुषांची " जात " नसते बघायची. हे आपण जेव्हा शिकू, तेव्हाच इतिहास नावाचा खजिना आपल्याला खऱ्या स्वरुपात खुला होतो.
        
मान्य आहे की,पेशवाई मधील काहींनी मानवी मूल्यांची पार अवहेलना केली होती. त्यांच्या या असल्या घाणेरड्या प्रवृत्तींच्या त्रासाचे चटके पहिले बाजीराव पेशवे यांना देखील बसले होते. मात्र आपण प्रत्येक वेळी वस्तुनिष्ठ मूल्यमापन न करता सरसकट सर्वच घटकांना त्यात गोवतो..अन् आम्ही इथेच चुकत जातो. वास्तविक अनेकातील जे कुणी अतिशय वाईट,दृष्ट प्रवृत्ती असतात,अशांना दूर करून त्यांना दंडित करायला हवे; मग ते वैचारिक असो किंवा इतर मार्गाने..! अशा घाणेरड्या प्रवृत्ती प्रत्येक जाती, धर्मात होत्या व आहेत.काहींनी चूक केली म्हणजे अख्ख्या समुदायाला दोषी ठरविणे हे कधीही योग्य नसते. जेंव्हा सूक्ष्मपणे अन् वस्तुनिष्ठ मानवी समाजाचे मूल्यमापन होईल तेंव्हाच प्रगल्भ विचाराच्या समाजाची सुसंस्कृत पिढी निर्माण होईल. पेशवाई म्हंटली की सगळेच त्यातील वाईट अशी आपली मानसिकता होऊन जाते. तसे न करता त्यातील ज्या मानसिकता तुच्छ होत्या त्या सदा सर्वदा तुच्छच मानायला हव्यात.

पहिले बाजीराव पेशवे यांना तत्कालीन जातिव्यवस्थेच्या अनिष्ट प्रथांचा भयंकर त्रास झाला.ते स्वत: ज्या सामाजिक व्यवस्थेचे घटक होते ,त्याच घटकातील काही मानवी मूल्यांवर गदा आणू पाहणाऱ्यांनी राऊंना विरक्त केले होते.मुळात राऊ वाईट चालीरीती विरूध्द बंड करून उठणारे व्यक्तिमत्त्व होते. राऊंच्या वैयक्तीक आयुष्याची पार लक्तरे झाली ,पण धीरोदात्तपणे या सर्व प्रसंगाला सामोरे गेले. या सर्व आत्मिक त्रासात व कौटुंबिक कलहात सुध्दा राऊंनी हिंदवी स्वराज्याच्या कक्षा थेट दिल्लीपर्यंत विस्तारल्या..हे विशेष..!
 
मी स्वतला धन्य समजतो की,पहिले बाजीराव पेशवे यांचे पदस्पर्श माझ्या जन्मभूमीला पालखेड, ता. वैजापूर ,जि. औरंगाबाद येथे लागलेले आहे..! निमित्त होते..पाहिले बाजीराव पेशवे व निजाम यांच्या मध्ये, रक्ताचा एकही थेंब न सांडता झालेली जगप्रसिद्ध लढाई माझ्या जन्मगावी,पालखेड ,ता.‌वैजापूर,जिल्हा,औरंगाबाद येथे झालेली आहे..!

आज, पहिले बाजीराव पेशवे यांचा स्मृतिदिन आहे..!
( २८ एप्रिल १७४०) त्यानिमित्त या थोर सेनानीला विनम्र अभिवादन..!

वंदे मातरम्..!

ताजा कलम : माणूस बाहेरच्या शत्रूला सामोरे जाऊ शकतो,त्यांच्यावर विजय सुध्दा प्राप्त करू शकतो..!
पण घरातील शत्रूंना तो सामोरे जाण्यास कमीच पडतो हे राऊंच्या आयुष्यावरून जाणवते..! नव्हे नव्हे आजही हीच परिस्थिती चहूकडे आहे..!                                     

नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव. ©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक: २८ एप्रिल २०१८

रविवार, २६ एप्रिल, २०२०

" आणि अखेर नियतीने मला बलुतेदार केलेच...!"





चिंतन ©️

" आणि अखेर नियतीने मला बलुतेदार केलेच...!"😊🙏

==================================

मी पालखेड येथे  शिक्षण घेत असताना माझे परम वंदनीय गुरू,आदरणीय भगत सर मला एकदा म्हणाले होते...
( मला सर, कधी मधी प्रेमाने नंदू तात्या म्हणायचे..!)

" नंदू तात्या, तू कुठं जरी गेला तरी बलुतेदारीची निदान कोणतीही एक तरी कला शिकून जवळ असू दे, कधीही कामं येईल..!"

आदरणीय भगत सरांनी तब्बल एकोणतीस वर्षापूर्वी मला केलेला उपदेश असा अन् या परिस्थितीत कामं येईल याची कल्पना देखील केली नव्हती..! परिस्थिती माणसाला सगळं सोंग करायला अन् तेच सोंग प्रत्यक्षात आणायला बाध्य करते हे कुठेतरी वाचलेलं होतं..! पण तेच वाचलेलं प्रत्यक्षात आमच्याच आयुष्यात घडेल याची खात्री नव्हती..! मी माझ्या एका लेखात जसं लिहिलं होतं की, 
" प्रत्येकात दादा कोंडके लपलेला असतो..!"
अगदी तसंच " प्रत्येकात निदान एकतरी बलुतेदार लपलेला असतोच, फक्त वेळ अन् प्रसंग यानुसार तो जागृत होत असतो.....! "

अखेर नियतीने लॉक डाऊन मुळे आम्हाला बलुतेदार केलेच..! 🙏😊 अर्थात पूर्णपणे टक्कल न करता यथायोग्य जमेल तशी बलुतेदारी कामी आली..! याच बलुतेदारीचा प्रयोग मी, माझे तीर्थरूप वडिल, माझे दोन्ही मुलं यांच्यावर बऱ्यापैकी करू लागलो आहे.माझे तीर्थरूप वडील तर ,त्यांची या लॉकडाऊन काळात मी केलेल्या प्रत्येक कटिंगच्या वेळी मला माझ्या या बलुतेदारीचे मोल म्हणून योग्य तो मोबदला देखील देत आहेत. अर्थात माझ्या बलुतेदारीचा माझ्या तीर्थरूप वडिलांनी मला दिलेला मोबदला मी श्रद्धेने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजनाला ठेवणार,कारण त्यांनी दिलेला मोबदला हीच खरी लक्ष्मी असे माझे वैयक्तिक मत आहे. वास्तविक मी, माझ्या वडीलांकडून त्यांची कटिंग केल्यावर ,त्या कटिंगचा मोबदला घ्यायला नकार देतो पण माझे वडील प्रत्येकवेळी मी त्यांची कटिंग केल्यावर म्हणतात..
" तुला एवढी भारी कटिंग कशी जमते..? आपल्या पालखेड गावातील माणिक अनर्थे अन् लासूर स्टेशन येथील राजू भाऊ तुपे यांच्या सारखीच करतो, एकदम मापात..! त्यामुळं राहू दे, नाही म्हणुच नको..!"
माझ्या वडिलांची कौतुकाची थाप मिळाल्यावर माझ्यातली बलुतेदारी अजुन धारदार होऊ पाहते.मी अशावेळी माझ्या वडिलांना म्हणतो की,
" दादा, हे सगळं भगत सरांनी ,आम्ही हायस्कूल मध्ये असताना आम्हाला सांगितल्याचा परिणाम आहे..!त्यावेळी भगत सर,एकदा मला म्हणाले होते की,
" नंदू तात्या, तू कुठं जरी गेला तरी बलुतेदारीची निदान कोणतीही एक तरी कला शिकून जवळ असू दे, कधीही कामं येईल..!"

आज , भगत सरांनी त्याकाळी केलेला बहुमोल उपदेश या लॉकडाऊन काळात कामी येत आहे. खूप खूप धन्यवाद आदरणीय भगत सर, तुमचा उपदेश माझ्या आयुष्यात असाही कामी आला..!🙏

माझी पंच्चेशाळीशी ओलांडली तरी आजही मला माझ्या तीर्थरूप वडिलांचा खूप धाक वाटतो. वडिलांची कटिंग चुकली तर रागावतील की काय याची भीती वाटते. तीर्थरूप वडिलांची कटिंग करायला मी ज्यावेळी सुरुवात करतो, त्यापूर्वी मी आसपास माझा थोरला मुलगा अन् धाकटा मुलगा यांना उभे करतो. त्याचं कारण, माझी मुलं माझ्या तीर्थरूप वडिलांची खूप जिवलग मित्र आहेत. जरी यदा कदाचित कटिंग करताना माझ्याकडून काही कमी जास्त झालेच तर, माझे तीर्थरूप वडील मला रागावणार नाही, कारण त्यांच्या जवळ त्यांचे खूप जिवलग मित्र उभे आहेत म्हणून..! आणि माझे हे व्यावसायिक मानसशास्त्र उपयोगी पडून त्यात यश मिळत आहे.😊

या लॉक डाऊन काळात माझी कटिंग माझा मोठा मुलगा किंवा माझी पत्नी करत आहे. मी त्यांना म्हणालो..
" अरे, घ्या शिकून बलुतेदारी, कधी पण कामं येईल..! "

ता.क.- हा कोरोना भाऊ, माणसाला अजुन काय काय करायला लावील ,हे त्याच नियतीला माहीत..!😔

वंदे मातरम्..!

एक बलुतेदार : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक : २६/४/२०२०, रविवार.

गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

" शिकावं तुझ्यापासून..!"




चिंतन

" शिकावं तुझ्यापासून..!"
===============================

नम्रता काय असते..शिकावं तुझ्यापासून..!

चेहऱ्यावरील निर्विकार भाव कसे असतात..शिकावं तुझ्यापासून..!

आपल्या गुरु प्रती निष्ठा कशी असावी..शिकावं तुझ्यापासून..!

वाचाळते पेक्षा..कृतीने उत्तर कसे द्यावे..शिकावं तुझ्यापासून..!

प्रौढ असूनही  नम्र लाजळूपणा कसा असावा..शिकावं तुझ्यापासून..!

मोह,माया यापेक्षा देशासाठी कसे खेळावं..शिकावं तुझ्यापासून..!

आभाळातील बापाला वंदन कसे करावे..शिकावं तुझ्यापासून..!

कोवळ्या वयात वेगाला सामोरे जाऊन धीरोदात्तपणे उभे कसे राहावे ,शिकावं तुझ्यापासून..!

खेळातील देव व त्याचे देवत्व कसे अंगीकारावं..शिकावं..तुझ्यापासून..!

अर्ध्या हळकुंडात पिवळं कसं होऊ नये..शिकावं तुझ्यापासून..!

अंगी दातृत्व असूनही त्याचे ओंगळ प्रदर्शन कसं करू नये हे शिकावं..तुझ्यापासून..!

आपल्या गुरूंच्या स्मृती कश्या जपून ठेवाव्या..शिकावं..तुझ्यापासून..!

खूप काही असूनही उथळ असू नये..शिकावं तुझ्यापासून..!

आपल्या शेवटच्या सामन्यात मातृभूमीला विनम्र अभिवादन कसे करावे हे शिकावं तुझ्यापासून..!

संयम,एकाग्रता,प्रचंड मेहनत कशी असावी हे  सुध्दा  शिकावं..तुझ्यापासून..!

माझा सर्वात आवडता क्रिकेट खेळाडू प्रिय सचिन..तुला आज तुझ्या जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!
वंदेमातरम..!
जन्मदिनांक:२४ एप्रिल १९७३

 ताजा कलम: सचिनच्या निवृत्तीनंतर मी क्रिकेट पाहणे फार फार कमी केले आहे..!आता थोडे पाहतो ते पण..माही करिता..!

सचिन निवृत्त झाला...अन् क्रिक्रेट खेळातील विनम्रता..संपली असं वाटतं..!

कोणे एकेकाळी पालखेड गावात व परिसरातील गावात क्रिकेट खेळणारा, एक तात्पुरता कवी:
 नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक: २४ एप्रिल २०१८

" मला प्रवासात भेटत असलेला पुस्तक दिन ..! "







चिंतन

" मला प्रवासात भेटत असलेला पुस्तक  दिन ..! "

===================================

मी हल्ली पुस्तकं वाचणं बरच कमी केलं आहे..!
मी हल्ली " माणसं " खूप वाचतो आहे..! कारण एक जिवंत माणूस जर वाचला तर कित्येक पुस्तकातील पानेच्या पाने आपल्याला सहज सापडतात वाचायला..! तेही फुकट..!😊
मात्र माणसं वाचायची असेल की पुस्तकं वाचलेली हवी..! तरच माणसं वाचायला सहज सोप्पी जातात..!

काहीजण म्हणतात..माणसात " षढरीपू " असतात..!
मला तर ही माझ्यासह अनेक माणसं वाचतांना त्यात कित्येक रिपु दिसून येतात..!अर्थात काही माणसं खूप खूप महान आहेत बरं का..! त्यांच्या वाचण्यामुळे आपली भारतीय संस्कृती किती महान आहे..हे अशा अनेक थोर जिवंत पुस्तकांना वाचल्यावर मला पटत आहे..! विशेष म्हणजे ही माणसांच्या चेहऱ्यांची पुस्तकं अगदी मोफत मिळतात..! ज्या माणसात जेवढे रिपु ...तेवढे ते जिवंत पुस्तक खूप वाचनीय..!

मी अशी चांगली,वाईट जिवंत पुस्तकं वाचण्यासाठी मुद्दामहून काही सभ्य गृहस्थांना  जिथे प्रवेश निषेध आहे..तिथे मुद्दामहून जाऊन अशी जिवंत साहित्यसंपदा वाचून माझे ज्ञान समृध्द करण्याचा प्रयत्न करत आहे..! त्याचे कारण..अशी जिवंत पुस्तकं..का.. बरं... टराटरा...फाटत आहेत...याचा..त्यांच्यावरच झालेला, होत असलेला दुष्परिणाम पाहून माझे मीच आत्मचिंतन करून सावध होत आहे..!

लोकं म्हणतात.. सभ्य माणसाने...इथ...नका जाऊ...तिथं..नका जाऊ..वगैरे..!पण माझे थोडंसं तत्वज्ञान वेगळ्या वळणाच आहे..!मी अश्या ठिकाणी मुद्दामहून जाऊन त्या जिवंत पुस्तकाची होणारी अवहेलना,एक माणूस म्हणून त्याची संपत चाललेली जीवनयात्रा..! त्याचे त्या ठिकाणचे विविध जिवंत अभिनय.. इ.अनेक ५६ नखऱ्यांचे सूक्ष्म...कधी..अती सूक्ष्म निरीक्षण करून...तसे माझ्या बाबतीत अजिबात न होऊ देण्याची काळजी घेत आहे..! गर्दीच्या वेळी अनेक पुस्तकं वाचायची मज्जा काही औरच..!त्यावेळी माझ्या माणसं वाचण्याच्या कौशल्याचा कस लागतो..! अगदी ट्वेंटी...ट्वेंटी..सामन्यासारखं..!

फेसबुक सारख्या प्रसारमाध्यमांवर देखील तऱ्हेतऱ्हेचे माणसं ऑनलाईन वाचायला मिळतात..! तेही फुकटम - फाकटम..!😊 हल्ली ही माणसं खूप वाचनीय झाली आहेत. प्रवासात भेटलेली माणसं तर विचारूच नका..! माझ्या दैनंदिन जीवनातील प्रवासात भेटलेली माणसं, मला खूप काही शिकवून जातात,एखाद्या ग्रंथातील पात्रांसारखं..! माझ्या दैनंदिन प्रवासातील भेटणारी माणसं,म्हणजे मराठी साहित्य विश्वातील अनेकानेक लेखकांच्या पुस्तकातील रेखाटलेली पात्र ,प्रत्यक्ष जिवंतरुपाने अवतरीत  झालेली आहेत असेच मला नेहमी जाणवत असते..!

असो अश्या माझ्या या जिवंत पुस्तकं वाचण्या विषयी खूप  काही लिहिण्यासारखे आहे...पण...थोड आखडतं घेतो..!

आज पुस्तक दीन...अरे माफ करा... पुस्तक दिन..आहे..!त्यानिमित्त सर्व  पुस्तक वाचकांना मनःपूर्वक शुभेच्छा..!

ताजा कलम  : जिथे सभ्य गृहस्थांना प्रवेश निषेध आहे..तिथे जर मी कुणाला आढळलो तर माझ्या तेथील उपस्थिती विषयी  इतरांनी उगीचच कडू , आंबट, खारट,गोड इत्यादी चवदार गैरसमज करून घेऊ नये..! माझे ते एक जिवंत  माणसांच पुस्तकं वाचण्याचं वाचनालय आहे..! इतरांनी असे धाडस करायला काही हरकत नाही,पण केलेच तर " संयम "  हवा..!😊

वंदे मातरम्..!

माणसं वाचणारा एक पुस्तकं वाचक लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक : २३ एप्रिल २०१८

मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

" योगीजी अन् दाशरथे सर - असाही संयोग..! "





मला प्रवासात भेटलेली माणसं..!

" योगीजी अन्  दाशरथे सर - असाही संयोग..! "

==================================

माझ्या सर्व वाचक मित्रांना प्रश्न पडला असेल की,
" मला प्रवासात भेटलेली माणसं " या सदरात अचानक उत्तरप्रदेश राज्याचे वंदनीय मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ अन्  आदरणीय तीर्थस्वरुप दाशरथे सरांची आणि माझी अशी कुठे प्रवासात भेट झाली की,मी त्यांच्यावर व्यक्त होत आहे..! "

वाचकांच्या मनातील प्रश्न अगदी बरोबर आहे.मात्र आमच्या तीर्थरूप वडिलांच्या आयुष्यात आदरणीय तीर्थस्वरुप दाशरथे सरांचे शिस्तीच्या बाबतीत खूप मोठे योगदान राहिलेले आहे.  कालच मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांच्या आयुष्यातील अतिशय भावूक अन् सेवा हाच धर्म या ब्रीद वाक्याला अनुसरून एक कौटुंबिक प्रसंग घडला..! माझ्या वडिलांनी ती बातमी वडिलांच्या जवळ असणाऱ्या रेडिओ वर बातम्यात ऐकली.  आम्हाला त्यांच्या तत्कालीन काळातील आदरणीय मुख्याध्यापक श्री.  दाशरथे सरांच्या आयुष्यातील अशीच एक अतिशय शिस्तीची आठवण पुन्हा आवर्जून सांगितली. यापूर्वी सुध्दा तो प्रसंग वडिलांनी मला बऱ्याचदा सांगितलेला आहे. योगीजी व दाशरथे सर,  या दोन्ही महान विभुतींच्या आयुष्यातील समान धागा जुळणाऱ्या " सेवा हाच परमोधर्म " या उच्च कोटीच्या मूल्यांवर आधारित सत्य घडलेली घटना आहे.  माझे तीर्थरूप वडील श्री.विष्णुपंत चंपतराव जाधव ( वय वर्ष ८३) त्या प्रसंगाचे साक्षीदार असल्याने मला माझ्या वडिलांच्या अनुभवातून ...
मला प्रवासात भेटलेली माणसं..!
" योगीजी अन्  दाशरथे सर - असाही संयोग..!"
हा लेख एक सद्य परिस्थितीत एक सत्य प्रासंगिक घटना म्हणून लिहिणे आवश्यक वाटले..!
म्हणून सदरील लेख वाचकांच्या सेवेत नम्रपूर्वक सादर करत आहे...!🙏

इ.स.१९६३-६४
स्थळ -जि.प.माध्यमिक शाळा नाचनवेल,ता. कन्नड,जि. औरंगाबाद.

माझ्या वडिलांना शिक्षक म्हणून पहिली नेमणूक जि.प.माध्यमिक शाळा नाचनवेल,ता. कन्नड,जि. औरंगाबाद हे गाव मिळाले होते.आयुष्यातील पहिली नेमणूक अन् तीही जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत, त्यामुळे माझे वडील खुश होते. अतिशय बिकट परिस्थितीत शिक्षण घेऊन माझे वडील शिक्षक झाले होते.त्यामुळे भविष्यात तिथल्या विद्यार्थांना जाणिवेतून शिक्षण देण्याचा निर्धार माझ्या वडिलांनी मनाशी पक्का केला होता.  नाचनवेल या शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक होते श्रीनिवास किशनराव दाशरथे सर..!

श्रीनिवास किशनराव दाशरथे सर..!
रा.वाकद

अतिशय स्वयंशिस्तीचे मुख्याध्यापक..! माझे वडील सांगतात की,त्यावेळी संपूर्ण शाळेत दाशरथे सरांचे अतिशय बारकाईने लक्ष असे.अगदी, प्रत्येक शिक्षक वर्गात शिकवत आहे की नाही या बाबत दाशरथे सर,संबंधित शिक्षकांच्या वर्गाच्या बाहेरून गुपचूप पाहत असे..! जो शिक्षक असे करताना आढळत नसे,त्यांना कार्यालयात बोलावून कडक शब्दांत तंबी देत असे.तत्कालीन नाचनवेल,ता. कन्नड या संपूर्ण गावात देखील आदरणीय दाशरथे सरांच्या विषयी एक आदरयुक्त धाक होता.माझ्या वडिलांशी दाशरथे सरांचे विशेष सौख्य होते,कारण माझे वडील देखील खूप स्वयंशिस्तीचे पाईक होते.याच प्रेमापोटी दाशरथे सरांनी त्यांच्या कार्यकाळात एकमेव फक्त माझ्याच वडिलांचे सर्व्हिस बुक स्वतच्या हस्ताक्षरात लिहून दिले होते.आजही माझे वडील ही आठवण आवर्जून सांगतात.त्या सर्व्हिस बुक चे झेरॉक्स पाने आजही एक आठवण म्हणून आम्ही जपून ठेवले आहेत.

असेच एके दिवशी जि.प.माध्यमिक शाळा नाचनवेल,ता. कन्नड शाळेतील  प्रत्येक शिक्षक आपापल्या वर्गात अध्यापनात मग्न होते.आदरणीय दाशरथे सर,आपल्या मुख्याध्यापक कार्यालयात ,कार्यालयीन कामकाज पाहत बसले होते.इतक्यात......
शाळेतील शिपाई धावत धावत दाशरथे सरांच्या कार्यालयात गेला अन् दुःखद स्वरात म्हणाला...
" गुरुजी, एक दुःखद बातमी आहे..!"
आदरणीय दाशरथे सरांनी त्या शिपायाला विचारले..
" काय बातमी आहे..?"
शिपाई - " गुरुजी, तुमच्या पत्नीचे निधन झाले आहे; तुम्हाला लगेच घरी बोलावले आहे..!"
दाशरथे सरांनी मोठा दीर्घ श्वास घेतला अन् आपल्या हातातील घड्याळाकडे पाहत करारी अन् नेहमीच्या शिस्तीच्या आवाजात शिपायाला म्हणाले..
"  शाळा सुरू आहे अजुन..!  शाळा सुटायला अजुन तीन मिनिटे बाकी आहेत..! आणि मी लगेच शाळेतून नियमबाह्यपणे घरी जाणे योग्य नाही.मी लगेच घरी आलो म्हणजे माझी पत्नी लगेच काही जिवंत होणार देखील नाही..! माझी सेवा अजुन शाळेत सुरू आहे, शाळा सुटली की,मी घरी येतो..! तू ,तसा निरोप दे..!"
शिपाई स्तब्ध होऊन पाहतच होता.

अखेर शिपाई कार्यालयाच्या बाहेर आला अन् हा संपूर्ण प्रसंग माझ्या वडिलांना सांगितला..!अखेर शिपाई ,घरी निरोप देण्यासाठी निघून गेला.

अखेर शाळा तीन मिनिटांच्या नंतर सुटली.आदरणीय दाशरथे सरांनी दुसऱ्या शिपायाच्या उपस्थितीत संपूर्ण शाळेतील सर्व वर्गांना कुलूप लावले अन् मग आपल्या घरी ,आपल्या धर्मपत्नीच्या अंत्यविधीसाठी गेले.

त्याकाळी आदरणीय दाशरथे सरांच्या या  प्रसंगाची संपूर्ण कन्नड तालुक्यात उच्च कोटीच्या मूल्यांची आदराने सर्वत्र चर्चा झाली होती..!  " सेवा हाच परमोधर्म " मानणारी माणसं ही..!

असाच काहीसा सांधर्म्य असणारा भावूक प्रसंग उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री वंदनीय योगी आदित्यनाथ यांच्या आयुष्यात काल घडला.योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. ही बातमी योगीजी यांच्या कानावर गेली.त्यांनी सध्याच्या कोरोना आजारामूळे आपल्यावर असलेल्या उत्तरप्रदेश मधील जनतेच्या सेवेच्या जबाबदारीमूळे ,वडिलांच्या अंत्यविधीला जाऊ शकले नाही..!  योगीजी यांनी आप्तस्वकीयांच्या सेवा पेक्षा जनता जनार्दनाच्या सेवेला प्रथम प्राधान्य दिले..!

" सेवा हाच परमोधर्म " हे ब्रीद मानून आयुष्य व्यतीत करणारी माणसं याच भारतमातेच्या भूमीवर जन्माला आलेली आहेत..! अशा अनेकानेक महान भारतीयांमूळे
आपल्या भारतीय संस्कृतीची पताका तिच्यातील मुल्यांमूळे सदैव फडकत आलेली आहे..!

वंदे मातरम्..!

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक : २१ एप्रिल २०२०, मंगळवार.

सोमवार, २० एप्रिल, २०२०

" ये...वडा...वडा..! कट लेट अमलेट..!समोसा..समोसा..!"





" मला प्रवासात भेटलेली माणसं..!"

" ये...वडा...वडा..! कट लेट अमलेट..!समोसा..समोसा..!"

===================================

आज दिनांक २१ एप्रिल २०१९ रोजी कल्याण ते औरंगाबाद दरम्यान रेल्वेने प्रवास करताना ,त्या रेल्वेतून फिरणाऱ्या विविध खाद्य पदार्थ विक्रेत्यांना पाहून माझ्या अनुभवांच्या स्मृती जाग्या झाल्या..!

एखादं मध्यम किंवा मोठं रेल्वे स्टेशन आलं रे आलं की,
" ये...वडा...वडा..! कट लेट अमलेट..!समोसा..समोसा..!"
हे आपल्या नाकाला खाजविणारे स्वर किंवा अनुनासिक स्वरात म्हंटले जाणारे वाक्य नेहमी ऐकू येतात..! या बाबतीत मी जरा जास्तच अनुभवी आहे..! कारण तब्बल १८ वर्ष रेल्वे स्टेशन च्या गावाला लासूर स्टेशन येथे राहिलो अन् याच रेल्वेतून याच खाद्य पदार्थांचा प्रवासात वास घेत घेत प्रवास केला..!☺

बरं ही विक्रेते मंडळी, एखाद बऱ्यापैकी रेल्वे स्टेशन आलं रे आलं की, एखाद्या मोहळाच्या गरदार घसाला एखाद्याने दगड मारावा अन् लगेच त्याच मोहळाच्या माश्या उठून समोरच्यावर तुटून पडाव्यात अगदी तसाच प्रकार सुरू होतो..!☺ एका मागून एक हे खाद्य पदार्थ विक्रेते डब्यात घुसतात अन् मुद्दामहून प्रवाशांच्या तोंडाजवळ त्यातल्या त्यात नाका जवळ ,वडा,समोसा,शेव चिवडा इ.पदार्थ आणतात..! बरं,या खाद्य पदार्थांचा " सेंट " पण लई भारी येतो..! कसं काय येतो काय माहीत...? हा सेंट आल्या आल्या.. मग काय..! ज्यांच्या पोटात पशू पक्षी ओरडत असतात,ते लगेच तुटून पडतात..या शिकारीवर..!☺

जर एखादा चहा पिवय्या असेल तर तो आद्रक टाकलेल्या चहाचा एकच प्याला सुध्दा स्वतः च्या तोंडाला लावून गरम तृष्णा शांत करतो..! मी चहा पीत नाही पण बऱ्याच चहा पिताडांच्या प्रतिक्रिया अशा असतात की,त्यात प्रत्यक्ष अद्रक नसतेच..! फक्त तोंडी अद्रक टाकलेलं असतं..!☺

रेल्वेच्या प्रवासातील या खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी प्रवाश्यांचं एक मानसशास्त्र अचूक ओळखलेले आहे..! अन् ते म्हणजे रेल्वेत ,चिल्लर पार्टी दिसली की, यांच्या आवाजाचा डेसिबल अजुन वाढतो..! विशेष म्हणजे रेल्वे प्रवासातील महिलांना भगिनींना पाहून देखील,या खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या ,आवाजाला अजुन चेव येतो..! या विक्रेत्यांना पक्के माहीत आहे की, ही दोन्ही त्यांची हमखास गिऱ्हाईकं..! चिल्लर पार्टी अन् महिला भगिनींच्या सोबत असणारे पुरुष मंडळी,एवढ्या मोठ्या गर्दीत ,आपला आर्थिक पान उतारा करून घेणार नाहीत हे मानसशास्त्र अचूक यांनी हेरलेले आहे..!😊

ता.क.: ज्यांना कुणाला अशा खाद्य पदार्थांचा रेल्वेत सेंट आलेला नसेल त्यांनी आयुष्यात एकदा तरी रेल्वेने प्रवास करून स्वतः च्या नाकाला कृतार्थ करावे..!

ता.क. - लासूर स्टेशन येथील आमचे बरेच स्नेही  स्वतः च्या नाकाला याच खाद्य पदार्थांच्या वासांच्या बाबतीत समृद्ध आहोत, कारण रेल्वे अन् आमचं अतूट नाते आहे..!☺


वंदे मातरम्..!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक : २१ एप्रिल २०१९

प्रवास स्थळ: कल्याण ते औरंगाबाद, जनशताब्दी एक्स्प्रेस..!

शनिवार, १८ एप्रिल, २०२०

" फेसबुक अन् मी..! "






चिंतन ©️

" फेसबुक अन् मी..! "

=================================

मला पूर्वीपासून वाचनाची जाम आवड होतीच,पण वाचनाच्या नंतर जाणवणारे  आत्मअभिव्यक्तीचे भाव  व्यक्त करायचं हक्काचं व्यासपीठ उपलब्ध होत नव्हते. अखेर मार्क झुकेरबर्ग नावाचा आधुनिक युगातील प्रसारमाध्यमांचा देव माणूस,पावला अन् एक सुंदर असं फेसबुक सारखं नितातसुंदर  व्यासपीठ लिहिण्यासाठी उपलब्ध झाले.

मी माझे हेच एकमेव  फेसबुक खाते २०१२ मध्ये सुरू केले.अर्थात हे फेसबुक खाते माझ्या साल्याने ऑनलाईन पद्धतीने सुरू करून दिले होते, तो पर्यंत मी याबाबतीत निव्वळ अक्षरशून्य. होतो. याबाबतीत माझ्या साल्याचे नितांत ऑनलाईन उपकार आहेत माझ्यावर..!
(आम्ही मराठवाड्याची माणसं  " साला किंवा साले किंवा साली " हा शब्दप्रयोग नात्याच्या अनुषंगाने वापरत असतो.वाकड्यात घुसणाऱ्यांना हा शब्दप्रयोग शिवी वाटायचा नाहीतर..!😊 )
असो,

फेसबुक सारखं एवढं सुंदर अन् सुरेख  व्यासपीठ  तेही ऑनलाईन पद्धतीने आपल्या भावनांना, विचारांना व्यक्त करण्याचं  मिळाल्याने मी जाम खुश झालो होतो.मात्र फेसबुकचा देव - मार्क झुकेरबर्ग यांच्या नावाला बट्टा लागणार नाही याबाबतीत स्वतः साठी काही फेसबुक आचारसंहिता स्वतः हुन आखून घेतली. 
ती पुढीलप्रमाणे -

उदाहरणार्थ - 
१) जेंव्हा शाळा सुरू असते तेंव्हा ' शालेय अध्यापनाच्या वेळात ' फेसबुक अजिबात न वापरणे,

२) माझ्या फेसबुक भिंतीवर माझ्याच जन्मदिनाच्या निमित्ताने इतरांच्या मार्फत होणारा शुभेच्छांचा वर्षाव न होऊ देणे. त्यामुळं  माझ्या फेसबुक भिंतीवर शुभेच्छा संदेशांची ट्रॅफिक जाम होत नाही.

३) जास्तीत जास्त समाजप्रबोधनाचे भाष्य छोट्या स्वरूपात व्यक्त करणे,काही बौध्दीक वाचनीय उपक्रम घेणे आणि ज्यावर चिंतन,मनन करावं वाटतं त्यावर लेख  लिहून 
" चिंतन " या सदराखाली माझ्या ब्लॉगवर लिखाण करणे,
       
४) समाजातील जे सर्व सामान्य माणसं ,पण माझ्या दृष्टीने जे असामान्य आहेत त्यांच्या विषयी, प्रवासातील काही वैशिष्ट्यपूर्ण भेटलेली अपरिचित माणसं व ज्यांचा प्रत्यक्ष माझ्या आयुष्यात कोणत्यातरी निमित्ताने भावूक,प्रेमळ संबंध आलेला आहे फक्त अशाच माणसांच्या विषयी 
" मला प्रवासात भेटलेली माणसं " या सदराखाली माझ्या ब्लॉगवर लिखाण करणे.

५) माझं माझ्या जन्मगावावर नितांत प्रेम आहे. आमच्या पालखेड गावातील काही माणसं माझ्या दृष्टीने जगाला हेवा वाटावा अशी ग्रेट आहेत. ही तीच सर्व सामान्य माणसं आहेत ज्यांना कधीही आत्मप्रसिध्दीची गरज वाटली नाही, त्यांना कोणत्याही प्रसारमाध्यमांनी प्रसिध्दी दिली नाही. यातील खूप ग्रेट असणारी अन् ज्यांचा प्रत्यक्ष माझ्या आयुष्यात कोणत्यातरी निमित्ताने भावूक प्रेमळ संबंध आलेला आहे अशा आमच्या पालखेड गावातील ग्रेट माणसांवर , 
" आमचे गाव आमची माणसं " या सदराखाली माझ्या ब्लॉगवर लिखाण करणे.

६) मी मुळातच रसिक..! आमच्या पालखेड गावातील प्रत्येक व्यक्ती रसिकमनाची असल्याने त्याच रसिकतेच्या वारसा हक्कामूळे कलेवर नितांत प्रेम करणारे आम्ही..! याच रसिकप्रेमापोटी अधून मधून गाणी, इत्यादी रसिक मनाला प्रफुल्लित करणारं काहीतरी छानसं पोस्ट करणे,

७)  फेसबुक मित्रांची निवड खूप चोखंदळपणे करणे, आकस ठेवून टीका टिप्पणी करणारे,द्वेष निर्माण करणारे इत्यादींना एकतर अन्फ्रेंड करणे किंवा अशांच्या फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारणे, कदाचित यामुळेच माझी फेसबुक मित्र यादी मोजकी असेल..!

८) माझा फेसबुक प्रोफाइल फोटो शक्यतो एकच असू देणे. अपवाद फक्त काही दिनविशेष असेल, काही नैमित्तिक कारण असेल, काही प्रासंगिक असेल तरच तेवढ्या कालावधी पुरता फेसबुक प्रोफाईल फोटो काही काळासाठी  बदल करणे. सदरील दिनविशेष, नैमित्तिक अन् प्रासंगिक कारण कालावधी संपला की, पुन्हा मूळ प्रोफाइल फोटो अपडेट करणे.

८ ) आणि सर्वात महत्वाचे -
मानसशास्त्रीय दृष्ट्या ,आपल्या मनाला प्रफुल्लित करणाऱ्या पोस्ट अधून मधून फेसबुकवर अपलोड करणे.सतत सतत एकाच भूमिकेत राहिल्याने ,समोरच्याला मानसिक थकवा,चिडचिड येणे साहजिक असते. त्यामुळं जिभेवरील लाळग्रंथींमधून स्राव टपकेल‌ अशा खाद्य पदार्थांच्या पाककृती पोस्ट करणे..! माझ्या मते या संपूर्ण पृथ्वीवर शाकाहारी पदार्थच असे एकमेव घटक आहेत की,ज्यांच्यावर सगळी माणसं जीवतोडून प्रेम करतात.त्यामुळं सर्व लोकांना एकत्र आणण्याचा तो एक चवदार प्रयत्न असतो माझा..! शैक्षणिक मानसशास्त्रात यालाच 
" चेतक बदल " असे म्हणतात..!

मी फेसबुक  हाताळण्यासाठी वरील प्रमाणे स्वतः ला आचारसंहिता लावून घेतली आहे.

माझ्या सारख्यांवर मार्क झुकेरबर्ग भाऊचे लई ऑनलाईन उपकार आहेत.याच ऑनलाईन देव माणसामुळे माझ्या सारख्या खेड्यातील एका माणसाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ऑनलाईन आनंद घेता आला अन् बऱ्याच प्रमाणात इतरांनाही देता आला.  माझ्या मते फेसबुक जर आपण अतिशय सुरेख  अन् संयमीत पध्दतीने हाताळले तर ऑनलाईन स्वर्गात गेल्याचा आनंद नक्कीच मिळतो. हा माझा स्वानुभव आहे..!🙏😊🌹

वंदे मातरम्..!

फेसबुक स्वतच्या  विशिष्ट आचारसंहितेत हाताळणारा : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक : १९ एप्रिल २०२०, रविवार

गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

रेल्वेदिन





चिंतन

रेल्वेदिन...!

===================================

आज रेल्वेदिन..!

त्यानिमित्त भारतीय रेल्वेला जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!🌹

आपल्या भारतातील रेल्वेचा आजचा जन्मदिन..!
आजच्याच दिवशी म्हणजेच १६ एप्रिल १८५३ साली भारतातील पहिली रेल्वे मूंबई ते ठाणे या मार्गावर धावली होती.

मी आज  १६ एप्रिल २०१८ रोजी सकाळी,लासुर स्टेशन येथील महावीर नगर जवळील  रेल्वेगेटवर आमचे मित्र दिपक पवार (गेटमन याचेच मराठी रूपांतर " चौकीदार " असे होते..!) यांच्याकडे गेलो. प्रथमत:त्यांना रेल्वेदिनाच्या शूभेच्छा दिल्या..! त्यानंतर जिचा आज भारतातील जन्मदिन आहे,त्या भारतीय रेल्वेसोबत स्वयंछायाचित्र काढले..!
मराठवाडा एक्सप्रेस सोबत...!

रेल्वे विभाग व त्या अंतर्गत विविध सेवा करणारे सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना आजच्या रेल्वे दिन निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!

मला सगळ्याच " चौकीदारांचा खूप खूप अभिमान वाटतो..! कारण चौकीदार जर चौकन्ना असेल तर बरेच अपघात टळतात..! किंवा बरेच चोर देखील चिडचिडेपणा करतात..!
त्यालाच रडीचा डाव असेही म्हणतात..!😊

मी जो पर्यंत लासूर स्टेशन येथे स्थायिक होतो, तो पर्यंत जेंव्हा कधी मला सुट्टी असली की, मी माझ्या घराच्या मागे असलेल्या याच रेल्वे चौकीवर जात असे. आदरणीय पाशु मामा, प्रकाश गायकवाड मामा, पवार मामा, बागुल मामा, शिवचरण भाऊ मीना ( राजस्थान), रणयेवले मामा व दीपक भाऊ  सर्व चौकीदार सोबत आयुष्यातील काही क्षण नक्की व्यतीत करत असे..! माझे सर्वात आवडते ठिकाण हेच रेल्वे गेट होते, जिथं अनेकानेक रेल्वे , त्यातील हजारो भारतीय दररोज नक्कीच दिसायचे..! अगदी निवांतपणा येथे मिळायचा..! शाळेतून आल्यानंतर शक्यतो रात्रीच्या वेळी काही वेळ निवांत बसण्याचं, माझं हक्काचं ठिकाण हेच ..!

या सर्वांची " चौकीदारी " पाहत असताना एक गोष्ट सहज लक्षात येत होती अन् ती म्हणजे...चौकीदारी करतांना या सर्वांना खूप खूप सावध असावे लागे.बऱ्याचदा रेल्वे गेटवर नियम मोडून , गेट खालून  आपली वाहने काढणारे भेटायचे..! हे सर्व ग्रेट चौकीदार कुणालाही नियमबाह्य पद्धतीने आपले वाहन काढूच देत नसे.यदा कदाचित जर एखाद्या व्यक्तीने असे केलेच तर त्यांना नाहक " बोलणे " खावे लागत असे..!

जर कुणी रेल्वे गेट बंद असल्यावर  आपले वाहन काढलेच तर..हे सर्व " चौकीदार मामा " त्यांना खूप रागवायचे..! नियम मोडून जाणाऱ्यांना रागही यायचा,पण..चौकीदार चौकन्ना असल्यामुळे त्या चुकणाऱ्यांचे काहीच चालत नसे..! चांगल्या गोष्टी करताना अशा अनेक चौकीदारांना अनेकांच्या रोषाला बळी पडावे लागते..! पण अशांच्या रोषांची तमा न बाळगता हे सर्व चौकीदार आपली सेवा प्रामाणिकपणे करत असे..!

मी सुध्दा कधी मधी " मै भी चौकीदार " या भूमिकेत येत असे..! मी सुध्दा छोटी मोठी मदत करत असायचो..! तेंव्हा कळले चौकीदार होणे सोपे नाही..! त्याकरिता समर्पण वृत्ती अन् सजगता फार फार आवश्यक आहे हे समजले..! नियमबाह्य पद्धतीने गेट ओलांडून जाणाऱ्यांना जर जाऊ नाही दिले तर..त्यांना काय लागते
" बोलायला "...?

ता.क.: आयुष्यात प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात चौकीदार असतोच..!

वंदे मातरम्..!

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव 

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

स्थळ :भानवाडी रेल्वे चौकी,लासूर स्टेशन.

माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक: १६ एप्रिल २०१७

" एका इसमाचा उपाशी -तापाशी प्रवास..!"




मला प्रवासात भेटलेली माणसं..!

" एका इसमाचा उपाशी -तापाशी प्रवास..!"
=================================

५ जून १९९८ रोजी एक भोळा भाबडा इसम मडगाव गोव्याहून रेल्वेत ,मुंबईला येण्यासाठी बसला होता.
रेल्वे रत्नागिरी येथे आल्यावर त्या इसमाच्या खिशातील पैसे कुणीतरी चोट्ट्याने‌ चोरले असे त्याच इसमाच्या लक्षात आले होते.फक्त आतल्या खिशात असलेले फक्त ८०₹ तेवढेच शिल्लक राहिले होते.

गोव्याहून निघतानाच हा इसम भुकेला होता.
त्याला वाटले होते,नंतर रेल्वेत जेवण करू..!
मात्र पैसेच कुणीतरी चोरल्याने उपाशी तापाशी भल्या पहाटे हा इसम दिनांक ६ जून १९९८ रोजी मुंबई रेल्वस्थानकावर उतरला होता.
तिथं चौकशी केली असता ,औरंगाबाद येथे जाण्यासाठी रात्री ९ वाजता देवगिरी एक्स्प्रेस आहे ,असे समजले होते.
जवळ आतल्या खिशात शाबूत राहिलेले फक्त ८०₹ शिल्लक राहिले होते.

पोटात सगळेच प्राणी ओरडत होते.
त्या भोळ्या भाबड्या इसमाने तिकीट काउंटरवर जाऊन चौकशी केली की,
" इथून लासूर स्टेशनचे देवगिरी एक्स्प्रेसचे तिकीट भाडे किती ₹ आहे..?"
तेंव्हा तिकीट काऊंटरवाल्या मामांनी....
" ७७₹ भाडे आहे ..! " असे सांगितले होते.
त्या इसमाच्या जवळ फक्त ८०₹ होते अन् भाडे लागणार होते ७७ ₹..!
म्हणजेच शिल्लक फक्त ३₹ राहणार होते.
ते ८०₹ दिवसभर जवळ तसेच ठेवले होते,इमरजन्सीत काही गरज पडली तर उपयोगात आणायला..!
त्या भोळ्या भाबड्या इसमाने असे ठरवले होते की,दिवसभर ८०₹ जवळ ठेवू अन् संध्याकाळी तिकीट काढू..!

अख्खा दिवस उपाशी-तापाशी तत्कालीन नाव व्हीटी रेल्वे स्टेशनवर इकडून तिकडे अन् तिकडून इकडे फिरण्यात दिवस घालवला होता.
अधून मधून भूक लागली की,तो भोळा भाबडा इसम,त्याच रेल्वे स्टेशनवर इतर जे जे प्रवासी चटकमटक खात होते,त्यांच्याकडे एकटक पाहत आपली दुरून भूक भागुन घेत होता. अखेर संध्याकाळी १८:१६ म्हणजेच संध्याकाळचे ६:१८ वाजता त्या भोळ्या भाबड्या इसमाने मुंबई ते लासूर स्टेशन तिकीट काढले होते.
( तिकिटावर वेळ अन् दिनांक आहे )
आता शिल्लक राहिलेल्या फक्त ३ ₹ चे खारे शेंगदाणे विकत घेऊन पोटभर खाल्ले होते.

अखेर रात्रीचे नऊ वाजता देवगिरी एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म वर आल्यावर तो, एक रात्र व एक दिनमान उपाशी -तापाशी  असलेला भोळा भाबडा इसम रेल्वेच्या जनरल डब्यात गर्दीत वाट करून बसला होता.
रात्रभर रेल्वेत इतर प्रवाशांच्या विविध खाद्य पदार्थांचे खाद्य सेवन पाहून तो भोळा भाबडा इसम,स्वतची दुरून पाहून भूक भागवून घेत होता.

अखेर दिनांक ७ जून १९९८ रोजी पहाटे ४ वाजता तो भोळा भाबडा इसम उपाशी - तापाशी लासूर स्टेशन रेल्वे स्थानकात उतरला. आता प्रश्न पडला होता की,इथून पालखेड येथे जाण्यासाठी भाड्याचे पैसे कुणाकडून घेऊ..? याच भोळ्या भाबड्या इसमाचे लासूरगाव शाळेचे माजी मुख्याध्यापक तिर्थस्वरूप अभंग सर,इथेच लासूर स्टेशन येथे राहत होते. तो इसम सकाळी अभंग सरांच्या घरी गेला.सरांना सगळी हकीकत सांगितली.आदरणीय अभंग सरांनी लगेच १००₹ दिले अन् आता घरी जा..! असे सांगितले होते.
त्या भोळ्या भाबड्या इसमाने आदरणीय अभंग सरांचे दर्शन घेऊन जीपने पालखेडकडे प्रस्थान केले..!

ता.क.- आज भारतीय रेल्वेचा जन्मदिन आहे,म्हणून ही आठवण आली बाकी काही नाही..!😊🙏 आणि हो,ते तिकीट आजही संग्रही आहे..!

वंदे मातरम्..!

लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव 

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक : १६/४/२०२०, गुरुवार

बुधवार, १५ एप्रिल, २०२०

" हजरजबाबी प्रिय मित्र, त्रिभुवन सर..! "




मला प्रवासात भेटलेली माणसं..!

" हजरजबाबी प्रिय मित्र, त्रिभुवन सर..! "

=================================

प्रिय मित्र...! प्रकाश सूर्यभान त्रिभूवन सर शिवराईकर ता. वैजापूर,प्रथमत: तूम्हाला जन्मदिनाच्या मनपूर्वक शूभेच्छा.!

प्रत्येकाच्या आयूष्यात रक्तविरहीत नात्यात ईश्वराने दिलेली अनमोल देणगी म्हणजे मित्र..! त्यातही मित्र जर जिवलग असेल तर ....आयूष्यातील बरेचसे चढ-उतार सपाट जमीनीसारखे वाटायला लागतात.माझ्या नोकरीच्या कालखंडात आतापर्यंत " जिवलग मित्र " या श्रेणीत असणा-या मोजक्या मित्रांपैकी प्रिय मित्र-त्रिभूवन सर..! त्रिभूवन सर,म्हणजे जिंदादिल माणूस..! आयूष्याप्रती कमालीचा सकारात्मक असलेला माणूस..! सदैव प्रसन्नचीत असलेला माणूस..!

त्रिभूवन सरांनी नोकरीला लागण्यापूर्वी आयूष्याला ज्या रितीने  मेहनत,जिद्द,स्वकष्ट,शिक्षणातील सातत्य,इ.अनेक मानवी मूल्यांनी सामोरे गेले त्या मूल्यांकडे मी प्रथम पासूनच त्यांना आदराने बघतो..!आम्ही  इ.स.१९९६ला शाळेत सहकारी होतो.सर कोणताही वर्ग,कोणताही विषय अगदी सहजरित्या शिकवायचे..! आज आलेला ज्ञानरचनावाद सरांनी १९९६ लाच राबविला होता..! विशेष करून त्रिभूवन सर,इ.१ ली ला शिकवायला होते, तेव्हा त्यांची इ.१ लीच्या वर्गात प्रवेश करतांना Entry अगदी आनंदी मनाने नाचत-नाचत व्हायची..! मला ती त्यांची शैली कमालीची आवडायची..! कारण इ .१ली चा वर्ग बालमनांचा वर्ग..! नूकताच त्या बालकांनी औपचारिक शिक्षणाचा श्रीगणेशा केलेला ..सगळे अनोळखी वातावरण...आणि...या अनोळखी वातावरणात त्रिभूवन सरांचे त्या बालकांप्रती असलेली आनंददायी भूमिका,त्या बालकांना भयमूक्त करायची..! ही बालकांप्रती असलेली निर्भेळ,आनंददायी भूमिका आजही इ.१ली/२रीच्या वर्गशिक्षकांसाठी अनुकरणीय आहे..!

 त्रिभूवन सरांचा हजरजबाबीपणात कमालीचा हातखंडा आहे..! कधीही भेट झाली की, सरांकडून हजरजबाबीपणाची शाब्दिक कोटी आजही आवर्जून ऐकायला मिळते..!इ.स.१९९७ -९८ ला  मी,नितीन पगार  सर सटाणावाले व त्रिभूवन सरानी विविध निवासी प्रशिक्षणात एकांकीका गाजविल्या..! विशेष म्हणजे या एकांकिका आम्ही ऐनवेळेवर प्रसंगनारूप तोंडी तयार करायचो.थोडक्यात संहिता समजावून सांगायचो.अन् मंचावर बरोबर ऐनवेळेवर सूचणा-या संवादानुसार आमच्या एकांकिका त्यावेळी खूप लोकप्रिय झाल्या होत्या..! आम्हाला प्रोत्साहन तत्कालिन गटशिक्षणाधिकारी आदरनिय नारायणराव फाळके साहेबांचे असायचे..! (नंतर आम्ही या एकांकिका बंद केल्या,कारण प्रशासनाकडून आमचा फक्त आणि फक्त वापर व्हायला लागला..!)

त्रिभूवन सरांचे व माझे आजही कौटूंबिक ,जिव्हाळ्याचे संबंध आहेत व राहतील..! मैत्री निभावतांना ज्या-ज्या मूल्यांवर आपले विचार अंतर्मनातून जूळून येतात ,त्यांच्या साहाय्याने मैत्रीचे रोपटे निश्चितच वाढवायला हवे..! कारण मित्र हा न मागता मिळालेला ईश्वरीय प्रसाद असतो..!

आज माझे प्रिय मित्र,त्रिभूवन सरांचा जन्मदिन आहे.त्याबद्दल सरांना आमच्या कूटूंबाकडून मनपूर्वक शूभेच्छा..!

वंदे मातरम्..!

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

फेसबुकवर लिखाण दिनांक: १५ एप्रिल २०१७

मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

मितभाषी मित्र ,प्रिय विनोद गायकवाड सर..!




मला प्रवासात भेटलेली माणसं..!

मितभाषी मित्र ,प्रिय विनोद गायकवाड सर..!

================================

इ. स.२००६ नंतरच्या लासुरगाव केंद्रांतर्गत शिक्षकांपैकी मला वैयक्तिक प्रिय विनोद बाबुराव गायकवाड या नवतरुण शिक्षकाचा फार अभिमान वाटायचा..! तसा इतरही नवतरुण शिक्षकांच्या कार्याचा अभिमान अन् कौतुक वाटायचंच पण विनोद गायकवाड सरांनी सुरुवातीच्या काळात जबाबदारी घेऊन ती यशस्वीपणे हाताळली त्यामुळं त्यांचं विशेष कौतुक वाटायचं..!

मी याविषयी माझा खूप जिवलग शिक्षक मित्र प्रिय रामेश्वर राऊत याच्या जवळ याविषयी व्यक्त देखील झालेलो आहे.

मला प्रिय विनोद गायकवाड सरांचा अभिमान अन् कौतुक जास्त  वाटायचे कारण असे की, यांना नुकतीच जून २००६ मध्ये प्रथम नेमणूक मौजे उंदीरवाडी,के. लासुरगाव ता. वैजापूर येथे मिळाली होती.अगदी नवीनच प्रारंभ,त्यात दुसऱ्या जिल्ह्यातली व्यक्ती, परिसरात ना कोणत्या नातेवाईकांचा आधार ना कुणाशीही ओळखपाळख..! तरी देखील प्रिय विनोद गायकवाड सरांनी जबाबदारी स्वीकारून सदरील शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक पद  स्वीकारले..! नुसतेच स्वीकारले नव्हते,तर जि.प.प्रा.शा.उंदीरवाडी शाळेला वैभव प्राप्त करून दिले..! मात्र कधीही ही व्यक्ती मुद्दामहून प्रकाशाच्या झोतात आली नाही..! आपण भलं अन् आपलं काम भलं या उक्तीप्रमाणे शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत राहिली..!  ही व्यक्ती कामालाच पुरस्कार मानून कार्य करत राहिली..!  अगदी नवीन परिसर,प्रशासकीय कामाचा काहीही अनुभव पाठीशी नव्हता, ना इतर कोणतं मानसिक पाठबळ पाठीशी होत..! तरी देखील प्रिय विनोद गायकवाड सरांनी अतिशय उत्कृष्ट कार्य ,एक मुख्याध्यापक व एक वर्गशिक्षक म्हणून यशस्वीरीत्या सांभाळले होते..!

नोकरीच्या आयुष्यात अगदी सुरुवातीच्या काळात मुख्याध्यापक  पदाची जबाबदारी घेऊन सोबतच वर्गशिक्षक म्हणून देखील आपल्या मितभाषी स्वभावाने
बौध्दीक,प्रशासकीय,विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून अमीट  छाप प्रिय विनोद गायकवाड सरांनी तत्काळातील लासुरगाव केंद्रांतर्गत पाडली होती.

एक शिक्षक म्हणून उत्कृष्ट कार्य करणारे अनेक पाहिले पण मुख्याध्यापक हे अतिशय जबाबदारीचे पद घेऊन सोबतच एक शिक्षक म्हणून यशस्वी होणारे शिक्षक दुर्मिळच असतात.त्यात प्रिय विनोद बाबुराव गायकवाड सरांचा अभिमानाने अन् कौतुकाने आवर्जून उल्लेख करावा वाटतो..!

वंदे मातरम्..!

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक :१५/४/२०२०

" जो मदत करतो तो विठ्ठल...! "







मला प्रवासात भेटलेली माणसं

 " जो मदत करतो तो विठ्ठल...! "
==================================

आज दिनांक १५ एप्रिल २०१८ रोजी सकाळी, गेल्या वर्षी " हरित क्रांती प्रतिष्ठान लासूर स्टेशन अंतर्गत "  लासूर स्टेशन येथील लासुरगाव रोड लगत लावलेलं एक  कडुलिंबाच्या झाडाला सरळ करत होतो. ते झाड लई मोक्कार वाकडं झालेलं होतं..!काही माणसं व काही झाडं त्यांच्या लहानपणीच सरळ करावी लागतात..!  नसता एकदा का...कवळ्यापणी वाढीत बाक पडला तर...तो बाक..आयुष्यभर  वाकडाच राहतो..!

सोबतीला कुणीच नव्हतं..!काही " सुशिक्षित माणसं " ,दोन,चार, पाच इ. ..सल्ले देऊन त्या क्षणाचे माझे हेड मास्तर होऊन पुढे चालले होते..!😊
मी आपला त्या " सुशिक्षित माणसांना "  कोणत्याही शब्दाने प्रत्युत्तर न देता फक्त  मुक मौखिक व काही प्रमाणात नेत्राभिनयाने मुक प्रत्युत्तर देत होतो..! असो..

मी अगोदर एक बांबू बांधला होता..पण अजून उंची वाढविण्यासाठी त्यावर अजुन एक बांबू बांधायचा होता..!मला एकट्याला त्या बाक पडलेल्या झाडाला बांबू धरून दोरी बांधायला अडचण येत  होती. पण...काय करणार मदत कुणाला मागावी..? त्या " सुशिक्षित माणसांना..?" छे.. छे..!ते तर मोफत सल्ला केंद्रातील सुशिक्षित सक्रिय सदस्य होते..!😊

इतक्यात...बहुदा कडुलिंबाच्या झाडाच्या देवाने माझे गाऱ्हाने ऐकले असावे..अन् तेवढ्यात लासूरगाव कडून भल्या सकाळी दाक्षायणी देवीच्या जत्रातून एक निव्वळ खेडवळ भला माणूस येताना दिसला..! मनात म्हणलं ,
" यांना कसं काय म्हणावं मदत करा म्हणून...?" कारण बरेच जण म्हणतात की,सुशिक्षितांना   " मॅनर्स " असतात...अन् गावंढळ माणसांना नसतात..वगैरे..!त्या तथाकथित धाकापोटी मी काहीच मदत न मागायची ठरवली..!
पण काय आश्चर्य..!
तो खेडवळ भला माणूस लगबगीने माझ्याकडे आला...हातात बांबू घेतला..अन्  मला म्हणाला..
" साहेब,तुम्ही फकस्त मला दोऱ्या कापून द्या..!"

त्या भल्या माणसाने मला " साहेब " म्हंटल्याबरोबर माझ्या व अनेक सुशिक्षितांच्या चांगली जमून थोबाडीत मारल्यासारखे झाले..! मी आपला त्या भल्या खेडवळ माणसाला तो जी..जी..मदत लागेल ती.. ती पुरवत होतो..! तो गावंढळ माणूस, व मी त्याच्या भाषेतील " साहेब " व माझ्या भाषेतील सुशिक्षित माणूस ,असे आम्ही दोघे मिळून त्या कडुलिंबाच्या झाडाला ताठ मानेने उभा राहायला लावले..!

तो खेडवळ माणूस एवढ्यावरच थांबला नाही ,तर  मला नेहमी झाडाच्या कामात मदत करणारे तिर्थस्वरुप एरंडे पाटील बाबा यांच्याकडून कुऱ्हाड घेतली... काट्या तोडून आणल्या...झाडाला लावल्या..अन् मग तेंव्हा तो खेडवळ भला माणूस मला म्हणाला..
" साहेब, आता कुठ लई भारी झालं बघा..!"

त्या भल्या खेडवळ माणसाने मला " साहेब " म्हणल्यावर मी पुन्हा रस्त्यावर कुणी सुशिक्षित माणसं दिसतात का ते पाहू लागलो..!😂
शेवटी त्या खेडवळ,गावंढळ माणसाला मी, माझ्या घरी घेऊन गेलो,त्याचे माझ्या कुवतीनुसार योग्य आदरतिथ्य केले..आणि लासूर स्टेशन येथील बस स्थानकावर सोडले..!
आणि निरोप घेतला एका खेडवळ,गावंढळ भारतीय माणसाचा..निरोप घेताना आलिंगन दिले अन् म्हणालो
" खूप खूप धन्यवाद, विठ्ठल भाऊ..!"
त्या सद्गृहस्थाचे पूर्ण नाव अन् पत्ता होता विठ्ठल काशिनाथ बनसोड..!
रा. बोडखा, ता.खूल्ताबाद,जि.औरंगाबाद

त्या एका खेडवळ,गावंढळ माणसाला निरोप देतांना मला त्या भल्या माणसाने  उद्देशून केलेला " साहेब " हा उल्लेख सारखा बोचत होता..! त्या भल्या माणसाने तो शब्द सहज ,निरागसपणे उच्चारला होता..! पण माझ्या दृष्टीने ती सणसणीत चपराक लगावली होती...आजच्या सुशिक्षितांच्या फक्त मोफत सल्ला केंद्र चालविणाऱ्यांच्या गालफडात...!

ताजा कलम : आजचे तथकाधित सुशिक्षित ,सुशिक्षित आहेत की,खेड्यातील खेडवळ,गावंढळ सुशिक्षित...? सुशिक्षतांची नेमकी व्याख्या काय असेल बरं..?

वंदे मातरम्..!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक: १५ एप्रिल २०१८,

रविवार, १२ एप्रिल, २०२०

" बेटा अक्षय...! "





मला प्रवासात भेटलेली माणसं..!

" बेटा अक्षय...! "
=============================

लासूर स्टेशन येथील माझ्या तब्बल १६ वर्षाच्या प्रदीर्घ वास्तव्यात   ऐन तारुण्यातील मुलांपैकी ज्या मुलाचा खूप भावूक अन् शांत स्वभाव मला भावून गेला तो हाच अक्षय जगन्नाथ बारसे...!
मला हा प्रिय अक्षय बेटा खूप खूप आवडतो..तो त्याच्यातील निगर्वी, निर्व्यसनी अन्  नम्र  स्वभावामुळे..! लासूर स्टेशन येथील माझ्या वास्तव्याच्या कालावधीत असताना किंवा आता जरी कधी भेटला ...माझे लक्ष असो अथवा नसो त्याचे एक काम हा न चुकता करत आलेला आहे अन् ते म्हणजे..मला पाहून आवर्जून
" वंदे मातरम् सर...!" अशी नम्रपूर्वक साद घालणे..!त्यात एक त्याचे प्रेम जाणवते..आपुलकी जाणवते.. संस्कार जाणवतात..!

 विश्वनाथ फूट वेअर , लासूर स्टेशन हे दुकान हा खूप छान प्रकारे चालवतो. कधी कधी याच्या प्रेमळ हट्टामुळे मला हा आधुनिक पादत्राणे हक्काने देतो...! त्यात त्याचे प्रेम अन् प्रेमाचा हक्क जाणवतो..! अशावेळी त्याचे एकच बोलणे असते ..
" सर, थोडी मॉडर्न स्टाईल वापरा हो...!"
त्याच्या या मॉडर्न स्टाईल च्या आग्रहाने मलाही चिरतरुण झाल्यासारखे वाटते अन् घेतो..त्याच्या प्रेमळ आग्रहाच्या वस्तू..मॉडर्न होण्यासाठी..! माझ्या लासूर स्टेशन येथील तब्बल सोळा वर्षांच्या वास्तव्याच्या काळात ,प्रिय अक्षयची दुकान सोडून इतर कोणत्याही दुकानात कधीही , माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी चप्पल, बूट खरेदी केले नाही,अपवाद फक्त एकदाच..! फक्त एकदाच दुसऱ्या एका फूट वेयर दुकानातून चप्पल घ्यावी लागली होती..! त्याचं कारण त्या दुसऱ्या एका प्रिय दुकानदाराने मला खूप खूप विनंती केली होती की,
" सर,एकदा तरी,आमच्या दुकानातून नवीन चप्पल विकत घेऊन पहा..!"
त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रिय अक्षयला भेटलो अन् त्याला सांगितले की, मी एकदाच संबंधितांकडून नवीन चप्पल विकत घेणार आहे, तू नाराज होऊ नको..!
यावर प्रिय अक्षय म्हणाला होता..
" नाही हो सर..! तुम्ही घरची माणसं आहात..! बिलकुल घ्या..!"
 तब्बल १६ वर्षाच्या माझ्या लासूर स्टेशन येथील वास्तव्याच्या काळात तीच एकमेव अन् एकदाच नवीन चप्पल प्रिय अक्षयची दुकान सोडून इतरत्र विकत घेतली होती..! बाकी याच्याशी व याच्या दुकानाशी निस्सीम प्रामाणिक राहिलो..!

याची जेंव्हा जेंव्हा भेट होते..तेंव्हा तेंव्हा याच्यातील माणुसकीचे अन् नम्र स्वभावाचे दर्शन मला नक्कीच जाणवते..!हा तसा स्वभावाने खूप हळवा आहे. त्याच्या अंतर्मनात खूप गहिवर आहे. त्याचे अंतर्मन आतून खूप ओलसर आहे याची मला जाणीव आहे.बऱ्याचदा त्याच्या बोलण्यातून तसे जाणवते..अन् अशी माणसं मनाने खूप सच्ची असतात..! मला अशी माणस खूप भावतात..! मी मागे याच्या समक्ष त्याचे काका,विश्वनाथ भाऊ बारसे यांना नम्रपुर्वक सांगितले होते की,
" आमच्या अक्षय  बेटाची खूप काळजी घ्या..खूप गोड ,नम्र स्वभाव आहे त्याचा..!"
यावर विश्वनाथ भाऊ म्हणाले होते की,
" सर, तुमची मुलं आहेत ही...! यांच्यासाठी हे सगळं काही आहे..! कधीच प्रेमात अंतर पडणार नाही..!"
विश्वनाथ भाऊ बारसे यांनी आपल्या या दोन्ही पुतण्यांना सख्ख्या मुलांपेक्षा  जास्त जीव  लावला आहे..! खूप चांगल्या स्वभावाचे व्यक्तिमत्त्व आदरणीय विश्वनाथ भाऊ..!
प्रिय अक्षयला अजुन एक मोठा, पण याच्याच वयासारखा दिसणारा मोठा भाऊ आहे..त्याचे नाव गौरव..!  (वरील छायाचित्रात प्रिय अक्षयच्या डाव्या बाजूला बसलेला आहे ) तोही खूप नम्र स्वभावाचा आहे ..! हे दोघे भाऊ, भाऊ या नात्यापेक्षा  मित्र म्हणूनच जास्त सदैव असतात..!

माझा अक्षय बेटा...!

तू सदैव माझ्या सोबत असतो...आठवणीतून...अन् तुझ्यातील चांगुलपणातून..! आज दिनांक २५/१२/२०१८ रोजी तू हक्काने फोन करून मला दुकानावर बोलून घेतले अन् मायेचे दोन शब्द बोललास खूप बरे वाटले..! वास्तविक मी आज लासूर स्टेशन येथे ज्या वेळी मी जितू भाऊ  जैस्वाल टेलर  यांच्याकडे बसलेलो होतो मला तुझ्याकडे यायचेच होते पण तुझाच फोन आला.ज्या प्रमाणे माझ्या माजी विद्यार्थ्यावर मी लिहिलेल्या लेखात वर्णन केलेल्या बबन च्या  फक्त आठवणीने त्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले अगदी तसेच आजही तुझ्याकडे मी येणार तितक्यात तुझाच फोन आला..! नियती मनाची भाषा  प्रेमाच्या माणसांना एकमेकांना ऐकवत असते ती अशी...!

आपलं माणुसकीचं प्रेम हे कुणावरही नाही येत..!ते अशाच ठिकाणी अगदी अंतर्मनातून येते, जिथं सर्व प्रकारच्या संवेदना सहजपणे जाणवतात..! प्रिय अक्षय खूप हळवा आहे..! याच जाणिवेतून प्रिय अक्षय ,हा मला अगदी मनापासून भावतो..!

काळजी  घे बेटा अक्षय..!

वंदे मातरम्...!

लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन: दिनांक २५ डिसेंबर २०१८

शनिवार, ११ एप्रिल, २०२०

" नट्टापट्टा..! "





चिंतन

" नट्टापट्टा..! "

=================================

एखाद्या लहान लेकराचा नट्टापट्टा करताना,आपल्या बालपणी आपल्याच आईनं ,आपला केलेला साजशृंगार आठवतो.
बालवयात कोणत्याही सौंदर्याचा तिळमात्र अहंकार नसतो. इथं असतो फक्त ईश्वराने दिलेल्या आनंदाचा ,आनंद व्यक्त करणे.याच बालवयात प्रत्येक बालकाला केलेला नट्टापट्टा ,हा थेट देवतेला समर्पित केलेला सौंदर्याचा भावप्रसाद असतो. आपल्या सारख्या अनेकानेक तरुण किंवा अगदी वार्धक्यातील स्री अन् पुरुषांना जो त्यांच्या पोकळ सौंदर्याचा अहंकार असतो ना, तो या लेकरांच्या नट्टापट्टा केलेल्या पवित्र अशा ईश्वरीय सौंदर्याच्या समोर नतमस्तक होऊन त्यांच्या गर्वाचे हरण होते.

आमची ही भावना दीदी..!
आमची सख्खी शेजारी..! आमच्या घरी आली की, तिच्या बोबड्या बोलीत मला किंवा माझ्या पत्नीला म्हणते,
" नेल पॉलिश लावून द्या..!" 
अन् मग मी किंवा माझी पत्नी या ईश्वराच्या नट्टापट्टा करण्याच्या कार्यात स्वतः ला झोकून देतो. आपल्याच गतकाळातील आपल्या आईने आपल्याला केलेल्या साजशृंगाराच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत..!

हे निरागस मन,आपल्याच भावविश्वात रमून आयुष्याला देखील रमायला भाग पाडते. या निरागस बालकांच्या अंतर्मनात त्या विधात्याने असं काही सौदर्य निर्माण केलेलं असतं की, आपल्या सारख्या असंख्य तथाकथित मोठ्या माणसांच बेगडी सौदर्य या बालकांच्या समोर सपशेल शरणागती पत्करतं.

आपल्या सारख्या वयाने मोठ्या असलेल्या असंख्य माणसांना , त्यांनी केलेल्या नट्टापट्टांचा खूप बेगडी अभिमान..!
मात्र मोठ्या माणसांचा, त्यात स्री अन् पुरुष दोघेही आले आत्मस्तुतीच्या मायाजालात अडकून एका वेगळ्याच मानसिक रोगाचे रुग्ण होऊन जगत असतो. ययातिला देखील त्याच्या पुरुषी सौंदर्याचा अन् देवयानीला देखील तिच्या पोकळ सौंदर्याचा अहंकार होता. मात्र दोघांच्याही सौंदर्याचा शेवट हा एकमेकांच्या नैराश्यपूर्ण आयुष्यातच झाला. आजही समाजात अनेकानेक ययाति अन् देवयानी आढळून येतात.

बालकांचं असं मोठ्या माणसांसारखं काहीही होत नसतं. बालकांचं असं  मोठया माणसांसारखं नैराश्यपूर्ण का होत नसावं..?
तर बालकांच्या अंतर्मनात अन् बाह्य आयुष्यात निव्वळ निर्विकार भाव असतो..! असा निर्विकार भाव,जिथं जात,धर्म,रंग, हुशारी, सौंदर्य,संपत्ती इत्यादी अनेकांचा मोहपाश नसतो.
वरील सगळं काही कवटाळून बसतो आपण सर्व मोठी माणसं नैराश्याच्या गर्तेत जायला..!😊🙏

वंदे मातरम्...!

लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव 

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक : १२/४/२०२०, रविवार

शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

"माझी झालेली आदरयुक्त ग्रेट भेट "





मला प्रवासात भेटलेली माणसं..!

"माझी झालेली आदरयुक्त ग्रेट भेट "
===================================

वेळ,संध्याकाळची..!
दिनांक ,८ एप्रिल २०१८, वार रविवार,
ठिकाण - समर्थनगर,वरद गणेश मंदिर रोड..औरंगाबाद.
मी व माझा थोरला मुलगा चिरंजीव नमन बाबा पेट्रोल पंप कडे लासूर स्टेशनला जाण्यासाठी दुचाकीवर निघालो होतो.मी गाडीवर पुढे गेल्यावर माझ्या  नकळतपने पाहण्यात आले आणि माझ्या मनात लगेच प्रश्न आला की
" सर इकडं कुणीकडे चालले आहे..तेही परिवारासोबत..?"
मी पटकन  बाजूला गाडी थांबवली.आणि खूप घाई घाईने सरांकडे जाण्यासाठी निघालो.
नमन मला म्हणाला " दादा ,काय झाले..?"
मी उत्तर न देता सरांकडे  निघालो. नमन माझ्याकडे आश्चर्यकारक नजरेने पाहत होता.अखेर मी सरांच्या जवळ आलो अन् म्हणालो...

" सर,इकडे कुणीकडे जात आहात तुम्ही..?"
अचानक कुणीतरी आपली आपुलकीने विचारपूस करत असलेले पाहून सरांनी ,माझ्याकडे खूप आनंदित होऊन पाहिले अन् म्हणाले..                         
" अरे नंदू..!  "
" नंदू ..!" अशी हाक कित्येक दिवसानंतर माझ्या कानी पडली होती..! " नंदू " ही हाक ऐकल्यावर कृतार्थतेचे ,आत्मिक समाधानाचे भाव माझ्या मनात उमटले. आपल्या आयुष्यात आपल्याला उद्देशून काहींनी केलेली काही संबोधने  आपल्या ह्रदयात कोरून ठेवलेली असतात..! जसे आज सरांकडून ऐकायला मिळाले " नंदू..!"

माझ्या समोर माझ्या आयुष्याला विशेषकरून प्राथमिक शाळेत असताना ज्या महान शिक्षकाने कलाटणी दिली होती,ते सदा सर्वदा वंदनीय आदरणीय गोमलाडू (राजपूत) सर उभे होते.
नमन त्याच पूर्वीच्या मुद्रेने पाहत होता.मी त्याला सरांचा परिचय करून दिला..
" नमन,हे आमचे सदा सर्वदा वंदनीय सर.. गोमलाडू सर..! सरांनी आम्हाला ,पालखेड येथे इ.५ वी ते ७ वी पर्यंत इंग्रजी विषय शिकविलेला आहे..!"
आदरणीय सरांसोबत त्यांच्या धर्मपत्नी , माझी गुरु माता देखील होत्या.मी व नमन ने सरांचे व गुरु माताचे दर्शन घेतले.
सुरुवातीला सरांनी नकार दिला,पण मी सरांना म्हणालो की,
" सर,आजकाल दर्शन घ्यावे असे खूपच कमी पाय शिल्लक राहिले आहेत..! आणि जे शिल्लक आहेत ,त्यांनी जर नकार दिला तर मग माझ्या सारख्यांनी दर्शन घ्यावे कुणाचे..?"

माझा दर्शनाचा हट्ट  सरांनी व गुरु माता यांनी पुरविला. मी सरांना म्हणालो, " सर,तुमच्यासारखे गुरु लाभणे माझे व माझ्या सारख्या,तुमच्या अनेक विद्यार्थ्यांचे नशीबच म्हणावे..!"
यावर आदरणीय गोमालाडू सर  लगेच म्हणाले की,
" अरे नंदू,माझ्यासारखे शिक्षक ,बऱ्याच जणांना आवडत नव्हते..!"
मी म्हणालो, " अहो,सर ते खूप दुर्दैवी असतील,त्यांना तुमची प्रखर शिस्त आवडली नसेल..आणि सर तुम्ही जी प्रखर शिस्त आम्हाला शिकवली,त्याचाच हा परिणाम आहे की,आम्ही स्वतच्या आयुष्यात काहीतरी शिस्तीत करू शकलो..!"
हे ऐकुन सरांना खूप आत्मिक समाधान झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवले.

आदरणीय गोमलाडू सर...! एक अतिशय शिस्तीचे थोर व्यक्तिमत्त्व. असे व्यक्तिमत्त्व,ज्यांनी उभ्या आयुष्यात शिस्त व मुलांना शिकविण्याप्रती प्रामाणिकपणा जपला. सरांच्या समकाळात आमच्या संपूर्ण वैजापूर  तालुक्यात शिस्त व प्रामाणिकपणा यात दोन वंदनीय  व्यक्तिमत्त्वांचा आवर्जून उल्लेख व्हायचा..एक आदरणीय गोमालाडू सर..व दुसरे माझे वडील तीर्थरूप व्ही.सी.जाधव सर..! या दोन महान शिक्षकांनी आपली शाळा, विद्यार्थ्यां करिता स्वतःला पार झोकून दिले होते. यांनी कधीच कोणत्या पुरस्काराची ,कुणाच्या बेगडी कौतुकाची तिळमात्र अपेक्षा बाळगली नव्हती. आपल्या सेवेलाच " पुरस्कार " मानून यांनी समर्पण वृत्तीने सेवा केली होती.

जी माणसं,शिस्तीची असतात,प्रामाणिक असतात,ती बऱ्याचदा बऱ्याच जनसमूहात लोकप्रिय नसतात. मुळात अशा शिस्तीच्या थोर माणसांना ,आपले कुणीतरी कौतुक करावे. किंवा आपले कुणीतरी कौतुक सोहळे करावे हेच मुळी मान्य नसते. आपल्याकडून होणारी सेवा ,समर्पण यालाच सर्वोच्च पुरस्कार मानून  व्रतस्थ आयुष्य जगणारी ही थोर माणसं.

आदरणीय गोमलाडू सर,आमच्या पालखेड गावाजवळच असलेल्या  बेंदवाडी  येथून सायकलवर यायचे. शाळेत आल्या..आल्या वर्गात..! लगेच आम्हाला काल दिलेल्या इंग्रजी शब्दांचे पाठांतर घ्यायचे. जो ,चुकला,त्याला हमखास  शिक्षा व्हायचीच. त्या  आदरयुक्त धाकापोटी मी किंवा काही मित्र १०० च्या आसपास शब्द पाठ करायचो.

शिक्षणात ,शिक्षा आवश्यक.. का.. नावश्यक हा आजच्या बुद्धिवंतांचा चर्चेचा विषय होऊ शकतो..!पण मी मात्र खात्रीने सांगतो की,आदरणीय गोमलाडू सर ,यांनी आम्हाला,त्याकाळी शिक्षा केली,धाक दिला,म्हणून मी किंवा सरांचे अनेक माजी विद्यार्थी स्वतच्या आयुष्यात स्थिर झालो आहे..हे नक्कीच मान्य करतील.

म्हणतात ना.." मुलांना कुणाचा तरी आदरयुक्त धाक असावा.. मग तो शिक्षेचा का असेना तो जर असला तर ती  शिस्तीत राहतात..!तो जर नसेल तर ती  सैरभैर होऊ शकतात..!" माझ्या वैयक्तिक आयुष्यात माझ्या तीर्थरूप वडिलांचा खूप धाक होता म्हणून मी माझ्या आयुष्यात सर्व बाबतीत स्थिर राहिलो हे मात्र स्वच्छ पाण्यासारखे खरे आहे.

आदरणीय गोमलाडू सरांच्या आदरयुक्त धाकाने,शिस्तीने आम्ही सर्व त्यांचे माजी विद्यार्थी घडलो..!आज मला सरांच्या शिस्तीचे महत्त्व पदोपदी  जाणवते. आज मी सरांच्या जवळ उभा राहून फोटो काढला खरा...पण तो ही भित..भित..! सरांची तीच आदरयुक्त भीती वाटत होती. फोटो काढण्यापूर्वी सरांना म्हणालो होतो,
" सर,तुमच्या सोबत फोटो काढू का..?"
सरांचा होकार आल्यानंतरच मी हा फोटो काढला.

आदरणीय सरांच्या व्रतस्थ सेवेचे फळ ,सरांना मिळाले आहे,त्यांचे चिरंजीव श्री. डॉ.जीवन राजपुत , हे औरंगाबाद येथील नामांकित मेंदुविकार तज्ज्ञ आहेत..!  त्यांच्या दवाखान्याचे नाव J J PLUS  Hospital आहे. आदरणीय गोमलाडू सर,आता औरंगाबाद येथे राहतात.

शेवटी मी निरोप घेऊन निघालो,सरांनी माझ्या वडिलांची विचारपूस केली..आणि म्हणाले..
" तुझ्या वडिलांचे आणि माझे खूप चांगले जमायचे. काळजी घे, त्यांची..!"
त्यांची काळजी घेण्याविषयी पुन्हा..पुन्हा मला आवर्जून सांगितले.
अशी झाली माझी ग्रेट भेट..!
आदरयुक्त भेट..!
माझ्या गुरूची..!

वंदे मातरम्..!

ता.क.: आजही कोणतीही शिस्त लावायची म्हंटली, की अशा शिस्त लावणाऱ्या अनेक थोर माणसांना विरोध होतोच.ती शिस्त लावतांना,बेशिस्तांना अडचणीची ठरू पाहते..! पण जेंव्हा त्याच शिस्तीला काही काळ लोटू दिल्यावर मग सगळेच त्या शिस्तीचे कौतुक करत असतात.मग ती शिस्त,घरातली असो,शाळेतली असो किंवा देश पातळीवरील असो..!

आदरणीय गोमलाडू (राजपूत) सरांचा माजी विद्यार्थी:
नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव, 

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन  दिनांक: ११ एप्रिल २०१८, बुधवार.

गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

" दिल तो बच्चा है जी..!" 😊






मला प्रवासात भेटलेली माणसं..!

" दिल तो बच्चा है जी..!" 😊🌹
===================================

अंधारी प्रशालेच्या बाजूलाच असलेल्या केंद्रीय प्राथमिक शाळेतील ही सर्व बालबच्चे कंपनी माझी एकदम  भारी जिवलग मित्र..! हे माझे प्रिय मित्र तर आहेच,पण त्याहून जास्त म्हणजे हे माझे गुरू सुध्दा आहे..!
आता काही शिकली सवरलेली  आणि अक्षरशून्य प्रौढ माणसं बिचकली असतील की, ही बालबच्चे कंपनी अन्  तुझी गुरू कसं काय..?

माझ्या जून्या शाळेत एकलहेरा ता-गंगापूर, सोनवाडी ता. वैजापूर, हडस पिंपळगाव ता.  वैजापूर आणि जळगाव ता. वैजापूर येथे देखील  बालबच्चे कंपनी गुरू  होती, त्यांना पुन्हा याच ठिकाणी हुडकून काढायचे ठरवले होते...! आणि आश्चर्य म्हणजे माझ्या जुन्या शाळेतील सर्व माझी बालबच्चे कंपनी मला याच अंधारी प्रशालेत भेटली..! अर्थात मोठ्या वर्गातील मुलंही मित्र आहेच,पण जो निर्विकार भाव अन् मन या बालबच्चे कंपनीत आढळून येते,तोच निर्विकार भाव अन् मन कोणत्याही मोठ्या व्यक्तीत आढळून यायला मर्यादा पडतात..!

अचानकपणे पाठीमागून येऊन अन् डायरेक्ट पाठीवर चढणारी ही बालबच्चे कंपनी पहिली की, बालपणी ,आईच्या खांद्यावर मी जसा बसायचो तीच अनुभूती येते..!
यांच्यापैकी एखाद्याने चाँकलेट  आणलं अन् यदा कदाचित एकच शिल्लक राहिलं तरी आपल्या दातांनी तोडून अर्ध करून घेण्यात ,एखाद्या देवळातील प्रसाद खाल्याचा आनंद नक्कीच मिळतो..!
एखाद्या लहान मुलांनं तुम्हाला एखाद गिफ्ट दिलं,
तो एखादा दगडाचा तुकडा का असेना, तो आनंदानं अन् कौतुकानं स्वीकारला की,आपल्यापेक्षा त्या लहान मुलांना खूप आनंद होतो..!
कदाचित त्यांच्याकडची कुणाला देण्यासारखी ती एकमेव वस्तू असेल..!
आणि ती देण्यासाठी त्यानं तुमची निवड केली असेल..!😊

ही बालबच्चे कंपनी दुपारच्या सुट्टीत जेवण करायला बसली की,यांना टाळून पुढे जाण्याची हिंमत होत नाही..! कारण यांनी प्रेमाने दिलेला दम एवढा डेंजर असतो की, आपले पाय भीतीने लटपट न होता आपसूकच याच्याकडे  जातात..! प्रत्येकाच्या जेवणाच्या ताटलीतून एकतरी घास घेतला की,तेंव्हा कुठं यांच्यातील  ' प्रेमळ डेंजरपणा '  नाहीसा होतो..!😊

मी माझ्यातील असलेला अहंकार दूर करण्यासाठी या बालबच्चे कंपनीला गुरू मानले आहे..!
मी माझ्यातील नैराश्याला दूर करण्यासाठी या बालबच्चे कंपनीला गुरू मानले आहे..! 
मी माझ्यातील लहान मुलाला मरू न देण्यासाठी या बालबच्चे कंपनीला गुरू मानले आहे..!
मी माझ्यातील असलेल्या तोऱ्याला ,जमिनीवर आणण्यासाठी गुरू मानले आहे..!
माझ्या दूरच्या प्रवसामूळे येणाऱ्या थकव्याला पळवून
लावण्यासाठी या बालबच्चे कंपनीला गुरू मानले आहे..!

यांच्याकडे पाहून नेहमी वाटतं की,
" दिल तो बच्चा है जी..!" 😊🌹

वंदे मातरम्..!

लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक : १० एप्रिल २०२०, शुक्रवार

बुधवार, ८ एप्रिल, २०२०

" महाभारत : एक पथदर्शक सांस्कृतिक ठेवा..!"





चिंतन

" महाभारत : एक पथदर्शक  सांस्कृतिक ठेवा..!"
==================================

परवा दिनांक ७/४/२०२० रोजी दुपारी १२ वाजता  दूरदर्शन DD भारती चँनेलवर सुरू झालेली  महाभारत ही लोकप्रिय मालिका आम्ही सहपरिवार पाहत होतो.इतक्यात लाईट गेली,अन् मालिका पाहण्यात खंड पडला.मात्र लगेच मुकेश भाऊ अंबानी मदतीला धावून आले अन् मोबाईल वर जियो टीव्ही सुरू  केली अन् पुन्हा महाभारत पाहण्याचा आनंद घेऊ लागलो.

महाभारत

" यात जे जे आहे तेच अन्यत्र आढळेल, यात जे नाही ते अन्यत्र मिळणार नाही..!"  महर्षी व्यास
( संदर्भ - प्राचीन भारत, ले. डॉ.धनंजय आचार्य)

या वरील एकाच वाक्यावरून महाभारत या आपल्या प्राचीन भारतातील आर्षकालीन सांस्कृतिक ठेव्याचे महत्त्व सहजपणे लक्षात येते.

समस्त मानवजातीला उपयुक्त ठरेल असे प्रत्येक पात्र यातून आपल्याला बोध देत असते.
महाभारतात क्षत्रियांचा वंशवाद  अन् त्यातून व्यक्त होणारा विकृत अभिमान आहे..!
महाभारतात जातीयवाद अन् त्याला बळी पडलेले सर्वोत्कृष्ट उपजत गुण आहेत..!
महाभारतात स्री सौंदर्याकडे पाहून भ्रमित अन् उध्वस्त  होणारी पुरुषप्रधान संस्कृती आहे..!
महाभारतात स्वतच्या तत्वनिष्ठांपायी ,उघड्या डोळ्यांसमोर उध्वस्त होणारं कुटुंब आहे..!
अंधप्रेम व त्यातून निर्माण होत जाणारी संकुचित प्रवृत्ती आहे..!
महाभारतात मोह, त्याग,प्रेम,वात्सल्य,क्रौर्य, वासना,सेवा, समर्पनवृत्ती, एकनिष्ठा,एकाग्रता,मानसिक कुचंबणा,कर्तव्यपरायणता‌ इत्यादी सर्व गुण अवगुण यात  आहेत..!
महाभारतात स्री जातीची होणारी घुसमट,व्यथा,सौंदर्याचा अहंकार देखील आहे..!

महाभारतात संपूर्ण सृष्टीतील पहिला सर्वार्थाने  विद्वान पुरुष अन् आपल्या  मानवी आयुष्याचे खरे विवेचन करणारा युगपुरुष युगंधर देखील आहे..!
याच युगपुरुषाच्या , युगंधराच्या सिद्धांतावर तिथून पुढे अनेकानेक तत्त्वचिंतक, धर्म,धर्म संस्थापक, पंथ, पंथ संस्थापक इत्यादी जन्माला आले..!
फक्त या सर्वांची नावे भिन्न भिन्न होती,मात्र वरील उल्लेखित तत्त्वचिंतक, धर्म,धर्म संस्थापक,पंथ,पंथ संस्थापक इत्यादींचा मुख्य वैचारिक प्रेरणास्रोत प्रत्यक्षपणे/ अप्रत्यक्षपणे युगपुरुष युगंधरच होता..!
भले आज कुणीही मान्य करो अथवा न करो..! मात्र सूर्य प्रकाश जसा स्वच्छ आणि सत्यता दर्शवितो, अगदी तसेच युगपुरुष युगंधराचे बौध्दीक तत्वविवेचन येणाऱ्या पुढील मानवी पिढ्यांना अनेकजण भिन्न भिन्न धर्म,पंथ स्थापून देत राहिले..! काळाच्या ओघात त्यात भर पडत गेली मात्र,या सर्वांचा प्रारंभबिंदू युगपुरुष युगंधरच होता..!

महाभारत हे भारतीय धर्म,नीती, सदाचार,विविध मानवी घटकांचे सूक्ष्म मानवी स्वभावांचे विवेचन आणि सर्वांना
जिव्हाळ्याचा वाटणारा विषय म्हणजे राजकारण याचा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक ठेवा आहे..!

आम्ही बालमित्रांनी बालपणी दुसऱ्याच्या घरी पालखेड येथे टीव्ही वरील बी.आर.चोप्रा व रवी चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेलं महाभारत पाहिलं अन् कलाक्षेत्रातील याच मालिकेच्या प्रेमात पडलो.चोप्रा साहेबांच्या महाभारत मालिकेला डॉ. राही मासुम रझा
यांच्या संवादाने अन् उत्कृष्ट पटकथेमूळे चार चांद लागले..! या मालिकेची  सर्वात उजवी बाजू माझ्या मते यातील संवाद आहेत अन् ती किमया साधली डॉ.राही मासुम रझा साहेब यांच्या लेखणीतून..!

एक मात्र नक्की  की,सर्व मानवजातीसाठी आपल्या प्राचीन भारतातील आर्षकालीन सांस्कृतिक ठेव्यातील
महाभारत , एक पथदर्शक  सांस्कृतिक ठेवा आहे..! फक्त आपण त्यातून काय बोध घेतो हे प्रत्येक माणसाच्या बौध्दीक,मानसिक,भावनिक कुवतीनुसार आहे..!😊🙏

वंदे मातरम्..!

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक - ९ एप्रिल २०२०, गुरुवार.