शुक्रवार, १८ डिसेंबर, २०२०

खूप खूप धन्यवाद मित्रा,आजू..!


 

आमचे गाव, आमची माणसं..!


" खूप खूप धन्यवाद मित्रा आजू..! "

___________________________________________


तू आज दिनांक १५ जुलै २०१८ रोजी भर पावसात..फक्त आणि फक्त भेटण्यासाठी आलास..! अर्थात पाऊस नेहमीप्रमाणेच बुरुबुरू सुरू होता..!

पण तुझ्या आत्मीय सहपरिवार भेटीने निदान आमचे संपूर्ण कुटुंब तरी प्रेमाने न्हावून निघाले..! मित्रा आजू,तुला नेहमी भेटलो की,मला माझ्या गत आयुष्यातील एका खूप भावूक प्रसंग आठवतो मित्रा..!


ज्यावेळी माझी डी.एड.करिता निवड झाली होती.माझा नंबर महाराष्ट्रातील तत्कालीन अती शिस्तीचे म्हणून ओळखले जाणारे आदरणीय शिक्षण महर्षी व्यंकट आण्णा रणधीर यांचे 

" डॉ.बाबासाहेब आंबेडकर डी.एड.कॉलेज, बोराडी, ता.शिरपूर,जिल्हा धुळे येथे निवड झाली होती. पालखेड येथून मी माझ्या वडिलांसोबत एक लोखंडी पेटी व त्यात दैनंदिन गरजेच्या वस्तू घेऊन निघालो होतो.त्या रोजी पोळ्याचा सण होता..!तुझ्या किराणा दुकानासमोर आम्ही चाललो होतो..तेवढ्यात तू मला आवाज दिला..

" अरे,नंदन..इकडे ये..!" 

मी कुतूहलापोटी गेलो.तर तू मोठ्या श्रद्धेने माझ्या हातावर साखर ठेवलीस अन् म्हणाला होतास...

" नंदन,काही काळजी करू नको,तू आपल्या गावापासून खूप दूर चालला आहेस,पण..मी दिलेल्या या साखरेचा गोडवा तुला सदैव गोड व सुरक्षित ठेवील..!"


माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माझी स्व.आई व वडील सोडून कुणीतरी माझी , इतकी भावनिक आधाराची पाठराखण केली होती अन् तो तूच होतास मित्रा आजू..! 


आज तू ,सपत्नीक माझ्या या घरी आलास,याच घराची पूजा करायला तू फक्त माझ्या निख्खळ मैत्रीखातर पालखेड येथून आला होतास..!मला आज हे सांगायला अभिमान वाटतो की,मी ज्यारोजी जी माझ्या घराची पूजा फक्त माझ्या कुटुंबीयांसोबत केली होती..त्यावेळी अनावश्यक खर्चाला कात्री लावून मी तोच माझ्या ऐपती एवढा खर्च एका अनाथाश्रम ला देणगी दिला होता..! कारण ज्यांना भोजनाची खरी गरज आहे त्यांच्या मुखी ते गेल्याचे कृतार्थ भाव माझ्या अंतर्मनात मरे पर्यंत राहील..! त्या भावूक घटनेला म्हणजेच माझ्या घराच्या पूजेला तुझा स्पर्श झाला होता याचा मला नेहमी आनंदच होतो. हे मी आज पर्यंत जाहीर केले नव्हते पण..तुझ्या हस्ते केलेल्या त्याच पूजेचा ,तू आज याच घरी भेट दिल्याने आज सांगावसं वाटला..म्हणून व्यक्त झालो मित्रा..! 


 शाब्दिक कोट्या करायला मला हवेहवेसे ठिकाण म्हणजे तूच आहेस मित्रा..!अर्थात तूही करतोस म्हणा..!😂

तू आज आपल्या पालखेड पंचक्रोशीत हिंदू धर्मातील विविध धार्मिक विधी कार्यक्रमात नाव लौकीक मिळवला आहे याचा खूप आनंद वाटतो मित्रा..!

 

आशा करतो,जर माझ्या दोन्ही मुलांनी मला विचारून लग्न केलेच तर त्यांचे लग्नही तुझ्याच हस्ते लावून,त्यात एक सुमधुर मंगलाष्टक म्हणायला लावून एक सुंदर प्रेमाचं, भावनिक नात्याचं वर्तुळ पूर्ण करील..!


काळजी घे मित्रा..!


वंदे मातरम्..!


लेखक व अजय काळे उपाख्य आजू उपाख्य गुरु चा बालमित्र: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले

स्थळ: औरंगाबाद.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक:१५ जूलै २०१८

सोमवार, ७ डिसेंबर, २०२०

" जब्राट फोटो, पण.. आमचा नाही...! "😊


 




आमचे गाव आमची माणसं..!

" जब्राट फोटो, पण.. आमचा नाही...! "😊
________________________________________

आज दिनांक ७ डिसेंबर २०१८ रोजी नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले, या नावाचा इसम त्याच्या जन्मगावी पालखेड येथे गेला होता.तिथं त्याला बराच तऱ्हे तऱ्हेचा बदल जाणवला..!  

आज हा लेख लिहिणारा इसम  सकाळी ज्यावेळी गावात गेला होता त्यावेळी,त्याचे बरेच बालमित्र परगावाहून आलेले नसल्याने या इसमाने काहीवेळ पालखेड गावातीलच एका गल्लीत जिथं आम्ही माध्यमिक वयोगटात असताना चांगल्या कामासाठी बकरीच दूध अक्षरशः चोरलं होतं तिथंच एका ओट्यावर बसून एकांतवासात जाणे पसंत केले होते..!🤭
( त्या बकरीच्या  दुधावर लेख लिहावा वाटतो, पण... दोन प्रिय बालमित्रांची  रीतसर परवानगी घेऊन त्या सत्य घडलेल्या प्रसंगावर लिहिल..!😀 कारण त्या लेखाचे सर्व हक्क या दोघांकडेच राखून आहेत..!😎 ) 

जेंव्हा..या  इसमाचे बालमित्र परगावाहुन ,स्वतः च्या गावात आपलं,दररोजच्या जीवनात कुठं अन् काय...काय चुकतं याच अवलोकन करायला याच इसमाच्या एका बालमित्राच्या ,जो की,गावात पौरोहित्य करतो अजय काळे गुरू त्याच नाव, याच्या दुकानाच्या ओट्यावर एकत्र जमले होते..! ( या इसमाच्या डोक्यावर नोट धरलेला तो मित्र..!) त्याच्या किराणा दुकानासमोर बहुतांशी बालमित्र उभे राहिले   होते. एकमेकांची मापे काढल्यानंतर, फुकटचा मानसिक औषधोपचार झाल्यानंतर गावातीलच एका इसमाला आमच्या सर्वाच्या छबी टिपण्यासाठी कळकळीची नम्र विनंती केली...अन् त्याही इसमाने आमच्या सर्वांच्या......
" छबीदार ,छबी...मी तोऱ्यात उभी,
जशी चांदनी,चमचम नभी...!"
या गीताच्या पुरुषी संस्काराने ,ओतप्रोत भरलेल्या अनेक छबी टिपल्या..!

पण  या सर्व छबी टिपल्यानंतर ,त्या सर्व छबी पाहत असताना माझ्या सहज लक्षात आले की,, आमच्यात कडेला एक अनोळखी इसम क्रमानुसार वाकून उभा होता...! तो असे काय बघत होता..तिकडे की,त्यानं कित्ती...कित्ती सुंदर क्रम बदलला..पाहण्याचा..! मला त्या वाकून क्रमवार पाहणाऱ्या इसमाच्या विविध छब्या लई... जब्राट आवडल्या..!😊

ता.क.: कधी..कधी..आपण ज्यांचे फोटो काढतो,त्यांच्यापेक्षा ,त्या फोटोतील अनोळखी इसमांचे फोटोच लई जब्राट येऊन जातात...!जसे त्या वाकलेल्या इसमाचे..!

वंदे मातरम्..!

फोटो निमित्त : लेखकाच्या पालखेड गावची जत्रा..!

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: ७ डिसेंबर २०१८

शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर...




चिंतन ©️

" डॉ.बाबासाहेब आंबेडकर नसते तर....! "

====================================

 एखाद्या व्यक्तीचे असणे जितके फार महत्त्वाचे असते.तितकेच फक्त कल्पना करा तीच व्यक्ती जर नसती तर....?

 नसती तर..? या नुसत्या काल्पनिक विचाराने सुध्दा फार भीती वाटते. अंगावर शहारे येतात. भीती कशाची वाटते..? नसण्याच्या फक्त काल्पनिक विचाराने अंगावर शहारे का येतात..?

तर.... " बाप " या ईश्वरीय भक्कम आधारवडाची अनुभूती आलीच नसती..!
बापाची ,त्याच्या " सर्व " लेकरांकरिता होणारी तगमग समजलीच नसती..!
आपल्या " सर्व " लेकरांकरीता त्या बापाची होणारी धडपड समजलीच नसती..! 
तो ,जो कुणी या सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता आहे,तो वेळोवेळी या.. ना त्या रुपात या भूतलावर अवतीर्ण होत असतो याची प्रत्यक्ष अनुभूती आलीच नसती..! " 
सर्वांकरिता " झिजने काय असते याचे जिवंत स्वरूपात प्रात्यक्षिक आपल्याला समजलेच नसते..! 
स्वतःमध्ये अलौकिक शक्ती असूनही सर्वसामान्यांकरिता जमिनीवर राहणे काय असते याचा अनुभव आलाच नसता..! 
फक्त " माहिती " असणे व " ज्ञान " असणे यातील सुक्ष्मभेद आपल्या सारख्या सामान्य जनांना समजलाच नसता..!
 
आपण मराठी माणसं या बाबतीत खूप नशीबवान आहोत की, आपल्याला थोरले महाराज छत्रपती शिवराय यांच्या रूपाने ,सर्वांना सोबत घेऊन जाणारे एक महान बापासारखे थोर व्यक्तिमत्त्व पहिल्यांदा भेटले.
                                         
मित्रांनो,अशी अनेक महान व्यक्तिमत्वे या ना त्या निमित्ताने या भूतलावर अवतीर्ण होत असतात. फक्त त्यांच्यातील ईश्वरीय शक्तीचा अधिवास समजून घ्यावा लागतो. आस्तिकता काय असते हे अशा महान व्यक्तिमत्त्वांकडे बघून मनोमन पटते. शेवटी आपली " आस्तिकता " म्हणजे तरी काय असते हो..? तर ती असते निव्वळ श्रध्देचा आंतरिक भाव..! मग ती श्रध्दा कुणाची ,एखाद्या माणसातील देवामाणसांकडे बघून असते. तर कुणाची प्रत्यक्ष कधीही न बघितलेल्या पण क्षणोक्षणी " जाणवणाऱ्या "अदृश्य पण दृश्य अनुभूती देणाऱ्या भावनिक शक्तिंकडे बघून असते. माझ्यामते यालाच " आस्तिकपणा " म्हणतात. नास्तिकता हा प्रकार मुळीच नसतो. ती आपण निर्माण केलेली फक्त " कल्पना " आहे. माझी या दोन्ही दृश्य व अदृश्य शक्तींवर कमालीची श्रध्दा आहे. माझी यांच्या असण्यावर श्रध्दा आहे.. माणसांमधील देवमाणूस,म्हणजेच दृश्य शक्ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर..! 

एखादा भावनिक माणूस या विचाराने नेहमी सदगदीत होत असतो की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर असो किंवा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेब किंवा अजूनही खूप जण आपल्या देशात जन्माला येऊन गेले या विचाराने भारावून जातो. डॉ.आंबेडकर यांच्यावर बालपणी,तरुणपणी जो सामाजिक भेदभाव झाला व ज्या ज्या " झारीतील शुक्राचार्यांनी " तो केला त्यांना डॉ.आंबेडकरांनी आपल्या विद्वत्तेने सडेतोड उत्तर दिले आहे. फक्त खूप वाईट याचे वाटते की,भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर सक्षम झाल्यानंतर त्यांच्यातील अलौकिक बुद्धिमत्ता व शक्ती बाबत देखील भेदभाव होत राहिला याची खंत वाटते.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे हे झारीतील शुक्राचार्य कोण होते..? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना फक्त दलितांपुरतेच मर्यादित करणारे कोण होते किंवा आहेत..? आजही बरेचजण व काही स्वतःला पुरोगामी म्हणणारे देखील फुले शाहू व आंबेडकर यांचा फक्त नावांचा वापर करून स्वतच्या स्थैर्याचे घरे का बांधून घेत आहेत..? ज्या कम्युनिस्ट विचारधारेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ,त्यांच्या संपूर्ण हयातीत प्रखर विरोध केला,आज काहीजण त्याच विचारधारेच्या साहाय्याने सामाजिक वातावरण का बिघडवत आहेत..? याचा अभ्यासू व्यक्तींना अंदाज आलाच असेल. तो त्यांनी चिंतन मनन करून घ्यावा.

माझ्या मते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ,आपल्या देशाची पुढील बहुतांशी क्षेत्रातील रूपरेषा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आखली. ऐनवेळी काहीजण पुढे येऊन स्वतच्या कर्तृत्वाचे टेंभे मिरवत राहिले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्या निवडणुकीत पराभूत करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्यांनी ते आटोकाट प्रयत्न का केले असतील..? 

गेल्या सप्टेंबर २०१७ मध्ये आमच्या जिल्हा परिषद प्रा .शा.एकलहेरा, ता. गंगापूर या शाळेत परिपाठाच्या वेळी ,विद्यार्थांना मी,आईचे महत्त्व सांगत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील एक भावनिक प्रसंग, जेंव्हा डॉ. बाबासाहेब यांचे संविधान लिहून झाले आणि ते सातारा येथील स्व.भिमाईच्या समाधी स्थळी गेले,त्यावेळचे त्यांचे खूप भावनिक विचार सांगत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर अक्षरशः खूप रडले. मी खूप भावनिक झालो, तो प्रसंग सांगत असताना. माझ्याकडून एका आई प्रती असलेली ,एका महान मुलाची भावनिक साद सांगणे खूप कठीण झाले,खूप गहिवर निर्माण झाला होता तेंव्हा..! शब्दच फुटेना..! मला त्यावेळी माझ्या शाळेतील शिक्षक सहकारी आदरणीय व्यंकटेश श्रीनेवार सर यांनी सावरले व पुढील परिपाठ पूर्ण करून घेतला.

आपण का कुणासाठी एवढे भावनिक होतो..? याचे कारण सर्व भावनिक माणसे ओळखू शकतात. माझ्या साक्षर होऊन कौटुंबिक स्थैर्य असण्याला कारणीभूत माझे आई -वडील , शिक्षक अन् परम वंदनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत. तसेच आज आम्ही जे काही थोडेफार स्थैर्य प्राप्त केले आहे,ते फक्त माझ्या तीर्थरूप वडीलांमूळेच..! आणि माझ्या वडिलांना साक्षर होऊन जे स्थैर्य प्राप्त झाले ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक संकुलातील संस्कारामुळे..! याचाच अर्थ कर्मवीर भाऊराव पाटील यांचे आदर्श होते ; परम वंदनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर..!

जात म्हणून आजही आपल्यातील काहीजण मनातून स्पृश्य अस्पृश्य ही अत्यंत धोकादायक मानसिकता सोबत घेऊन समाजात वावरताना आढळून येत असतात. हा भेदभाव दृष्य स्वरूपात दिसत नसेल, पण अदृश्य स्वरूपात समाजात वावरताना दिसत असतो. ही अशी अत्यंत धोकादायक सामाजिक मानसिकता जो पर्यंत मनात राहील तेंव्हा जाणवते की, वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी किती मोठे सामाजिक कार्य या वंचित समाजासाठी करून ठेवलेले आहे. ही सामाजिक जाणीव, जाणीव असणाऱ्या सुज्ञ नागरिकांच्या सहज लक्षात येईल. आज भले आपण प्रजासत्ताक देशात राहत असलो तरी, जातपात पाळणे हा गुन्हा असला तरी, काहींच्या अंतर्रमनातून जो पर्यंत हा भेदभाव जाणार नाही तो पर्यंत ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर ' हा विचार एक विचार म्हणून समाजात जिवंत असलेला दिसेल. एखादा व्यक्ती अत्यंत बिकट परिस्थितीतून पुढे येतो अन् आपलं आयुष्य एका विशिष्ट ध्येयासाठी समर्पित करून देतो अन् विशेष म्हणजे त्या समर्पित आयुष्याचे सार्थक होते याचे माझ्या मते दोन उदाहरणे सर्वोत्कृष्ट आहेत. ते दोन समर्पित मानवी आयुष्य म्हणजे सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज आणि वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर..!आपल्या आयुष्यात एक विशिष्ट ध्येय समोर ठेवून ही दोन्ही राष्ट्रपुरुष आपल्या आयुष्यात मार्गक्रमण करत राहिली. आजही त्यांनी आखून दिलेल्या वैचारिक अन् बौद्धिक सिध्दांतावर जे मार्गक्रमण करत आहेत तेच खरे त्यांचे अनुयायी..! बाकी इतरांची आपलं केविलवाणं अस्तित्व दाखविण्यासाठी नुसती धडपड सुरू असते.

आज भारतरत्न वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्त या महामानवास विनम्र अभिवादन..! 🙏🏻
                                                           

ता.क : माझ्या मते डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,प्र.के.अत्रे, आचार्य रजनीश(ओशो) यांच्या सारखे परखड लेखक /वक्ते झाले नाही आणि होणारही नाही..! वाचकांनी डॉ.आंबेडकर लिखित " Thought's on Pakistan " हा ग्रंथ किंवा याचे हिंदी/मराठी संस्करण अवश्य वाचावे.मग कळेल डॉ.आंबेडकर किती महान द्रष्टे व परखड मते असणारे लेखक होते म्हणून..!

वंदे मातरम्
जय भीम..!

नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव.©️
 
 https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
                                     
दिनांक:६ डिसेंबर २०१७



मंगळवार, १ डिसेंबर, २०२०

दिलू, आमचा सचिन तेंडुलकर..!


 

" आमचे गाव ,आमची माणसं ""


         दिलू, आमचा सचिन तेंडुलकर..!

___________________________________________

                             

क्रिकेट...हा सर्व भारतीयांचा आवडता खेळ..!त्यात आमच्या पालखेड , ता.वैजापूर गावात या खेळाविषयी अबाल,वृद्घांना खूप गोडी..!या फोटोत जी व्यक्ती मधोमध उभी आहे,तो आमचा बालमित्र-दिलीप सूराशे..! मी त्याला नेहमी " दिलू " या नावानेच हाक मारतो..!


आमच्या तत्कालीन (१९९५ ते २०००) शिवशक्ती क्रिकेट संघातील खूप महत्त्वाचा फलंदाज होता.आम्ही आमचा संघ खेळण्यास पालखेड परिसरात असलेल्या शिवराई,जळगाव, चोर वाघलगाव, परसोडा,विनायक नगर,लासूरगाव,दहेगाव(शेड), काटे पिंपळगाव इ.ठिकाणी घेऊन जायचो.तिथले संघही आमच्या गावात खेळायला यायचे..!दिलीपच्या फलंदाजीत एक नजाकत होती..!समोर कितीही घातक गोलंदाज असो,हा दिलू, चेंडूला अगदी लीलया पार करायचा..!याला बाद करणे,गोलंदाजांना खूप कठीण जात असे.दिलीपचा स्टेट ड्राईव्ह अतिशय तंत्रशुद्ध असायचा..!दिलीप टेनिस बॉल,लेदर बॉल वर खूप नेत्रदीपक फलंदाजी करत असे..! 


प्रिय बालमित्र दिलीप उपाख्य दिलू , आमच्या गावातील तसेच पंचक्रोशीतील सर्वोत्कृष्ट फलंदाज होता..! आमच्या पालखेड गावातील ही साधी सरळ अन् गोड स्वभावाची माणसं आहेत, ज्यांना भेटलं की मैत्रीच्या नात्याला अजुन उभारी येते. दिलीप सारखी माणसं, अजातशत्रू असणाऱ्या माणसांचं प्रतिनिधित्त्व करणारी असतात.माझ्या तरी पाहण्यात आलेले आहे की, प्रिय बालमित्र दिलीप उर्फ दिलू हा कधीही कुणाच्याही वाह्यात फंद्यात पडलेला नाही..! कधीही भेटला तर अगदी सौम्य स्वरूपात हसून अन् प्रेमळ भाषेतच बोलणार ,असा आमच्या दिलुचा स्वभाव आहे..!


आमच्या पालखेड गावातील आमच्या समकालीन मित्रांमध्ये ज्या दोन ग्रेट फलंदाजांच्या तंत्रशुद्ध फलंदाजीचा मी निःसीम चाहता होतो ते दोघे आहेत, प्रिय बालमित्र दिलू सुराशे अन् माझा वर्गमित्र अन् बालमित्र शेख फैय्याज बागवान..! ( ह.मु. औरंगाबाद ) . शेख फैय्याज बागवान आणि दिलीप सूराशे यांचे क्रिकेट संघ पालखेड येथे नव्वदच्या दशकात जेंव्हा समोरासमोर खेळायला उतरायचे तेंव्हा या दोन्ही प्रिय बालमित्रांकडून अप्रतिम अशा फलंदाजीचे सादरीकरण व्हायचे..! त्यात आमचं पालखेड गाव कलेच्या अन् खेळाच्या बाबतीत जरा जास्तच आघाडीवर..! आमच्या गावातील क्रिकेट शौकीनांचे भरभरून प्रेम शेख फैय्याज बागवान अन् दिलीप सुराशे लाभले आहे..!


प्रिय बालमित्र दिलू आणि शेख फैय्याज बागवान या ग्रेट मोजक्या व्यक्तीमुळे आमच्या पालखेड गावातील क्रिकेट खेळाला अन् त्यातील फलंदाजीला तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून नजाकत लाभलेली आहे..!


दिलीपला खेळण्यासाठी योग्य मार्गदर्शन व पुढील ठिकाणे मिळाली असती तर हा दिलीप नक्कीच खूप चमकला असता हा आम्हाला खूप विश्वास होता..!पण त्याकाळी ग्रामीण भागात अश्या तांत्रिक बाबींवर कुणी विचार केला नाही तसेच मुख्य म्हणजे परिस्थितीही आड आली..! 


माझ्या गावातील या सचिन तेंडुलकर ला त्याच्या क्रिकेट खेळातील कलात्मकतेकरिता माझा व खालील छायाचित्रातील कडेचा प्रिय बालमित्र डॉ.संजय राऊतचा मानाचा मुजरा..!


ता.क. : दिलीपला आम्ही कधीच रागावलेले पाहिलेले नाही..!🙏


 वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक :३० नोव्हेंबर २०१७

बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२०

शौर्य तीर्थक्षेत्र भेट, गिरगाव चौपाटी लगत..!" " हुतात्मा तुकाराम ओंबळे "



 

मला प्रवासात भेटलेली माणसं..!


" शौर्य तीर्थक्षेत्र भेट, गिरगाव चौपाटी लगत..!"

            " हुतात्मा तुकाराम ओंबळे "

_________________________________________

                                                          

आम्ही मे २०१७ च्या सुरुवातीच्या आठवड्यात मी, माझी पत्नी अन् दोन्ही मुलं धार्मिक तीर्थक्षेत्र, आधुनिक तीर्थक्षेत्र यांचे मनोभावे दर्शन व वैज्ञानिक कुतूहलापोटी प्रत्यक्ष दर्शन घेऊन आलो. में २०१७ च्या परतीच्या प्रवासात वेरावल -गुजरातहून दुपारी १:२०ला रेल्वेने परतीच्या प्रवासाला निघालो.दुसऱ्या दिवशी सकाळी आमची रेल्वे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर सकाळी ७:३४ला पोहचली.सकाळी फ्रेश झालो व मुंबईचा वडा पावचा नाश्ता केला.वास्तविक ज्योतिर्लिंग सोमनाथला जातांना ज्यावेळी मुंबईला छत्रपती शिवाजी टर्मिनसवर उतरलो होतो;त्यावेळी तेथील गर्दी पाहून व गतकाळातील याच ठिकाणी आपल्या अस्मितेवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या स्मृति जाग्या झाल्या होत्या...! परंतु सोमनाथला जातानाच्या प्रवास नियोजनात मुंबईचे आधुनिक तीर्थक्षेत्र-तारांगण व विज्ञान केंद्र दर्शन होते.आणि त्यांचा उत्स्फूर्त आनंद घेतलाही..! मात्र सोमनाथहून येतानांच्या प्रवास नियोजनात दर्शन घेण्याची व नतमस्तक होण्याची सारखी हुरहूर लागली होती...!


 एका असामान्य तीर्थक्षेत्राची, एका असामान्य शूरवीराच्या प्राणाच्या बलिदानाने पूनित झालेल्या " शौर्य तीर्थक्षेत्र " ला भेट देण्याची...! ते " शौर्य तीर्थक्षेत्र " होते सिंधू सागराच्या किनाऱ्यावरील गिरगाव चौपाटीच्या मुख्य रस्त्यालगत..!आणि त्या शौर्य तिर्थक्षेत्राचे वंदनीय शौर्य पूरूष होते..."हुतात्मा तुकाराम ओंबळे साहेब( सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक)...!! 


 टॅक्सीतून उतरून आम्ही अथांग सिंधू सागराला नजरेत सामावून घेतले..!मुख्य रस्त्यावर आलो.एका शहर पोलिसाला मी विचारले 

" साहेब,इथे शौर्य पूरूष तुकाराम ओंबळेजींचे स्मारक कुठे आहे..?" माझा हा प्रश्न ऐकुन ते शहर पोलिस आश्चर्यचकित व अभिमानास्पद नजरेने माझ्याकडे काही क्षण बघतच राहिले..!मग काही क्षणानंतर त्यांनी प्रेमाने ,आत्मीयतेने आमची चौकशी केली..!मी त्यांच्या मानसिकतेचा बरोबर अंदाज लावला की, बहुदा हुुतात्मा तुकाराम ओंबळेजींच्या स्मारकाची चौकशी केल्याने त्यांना खूप आनंद झाला होता..!आम्हाला दुरून ते ठिकाण दाखवून ते आपल्या सेवेसाठी गेले..!


गिरगाव चौपाीवरील मुख्य रस्त्यालगतच ते "शौर्य स्थळ " होते..!आम्ही सर्वजण मी ,माझी पत्नी,थोरला मुलगा चि.नमन व धाकटा मुलगा चि.नयनने त्या महान ,देशरक्षणासाठी स्वत:चा प्राणाची आहुती देणाऱ्या भारतमातेच्या थोर सुपुत्रास विनम्र वंदन केले..!याच ठिकाणी आपल्या शत्रू राष्ट्राने (त्याला राष्ट्र म्हणायच्या सूध्दा स्थितीत ते सध्या नाही..) पाकिस्तानने दि.२६/११/२००८ रोजी मुंबईवर हल्ला करण्यासाठी पाठविलेल्या अजमल कसाब नावाच्या राक्षसी अतिरेक्याला जिवंत पकडले होते ...हुुतात्मा तुकाराम ओंबळेजींनी...!मात्र त्या नराधमाने ओंबळेजींना बंदुकीच्या गोळ्यांंनी घायाळ केले होते..! स्वतः घायाळ होवून सूध्दा ओंबळेजींनी क्रूरकर्मा दहशतवादी कसाबला आपल्या वज्रबाहूपाशातून सोडले नव्हते..!


अखेर तो क्रूरकर्मा जिवंत पकडला गेला; परंतु भारतमातेचा थोर सुपुत्र तुकाराम ओंबळेजी धारातीर्थी पडले..! धारातीर्थी पडले ते सर्वसामान्य मुंबईकरांचे,भारतवासियांचे प्राण वाचविण्यासाठी..! हे विचारचक्र माझ्या मनात चालू होते...!त्या "शौर्य तीर्थक्षेत्राला "पूनश्च एकदा वंदन करून आम्ही पुन्हा त्याच शहर पोलिसांकडे आलो.कारण आमचा टॅक्सी थांबा तेथे होता..!मुंबईच्या भीषण गरमीत,खूप जाम करणा-या वाहनांना मार्ग दाखवित आपली सेवा ते शहर पोलिस साहेब इमानेइतबारे करत होते..! उष्णतेची परवा न करता..!त्यांची व माझी फक्त नजरभेट झाली..!त्यांना पाहून मला माझ्या सावलीतील नोकरीचा असणारा पोकळ गर्व पार गलितमात्र झाला..!मनोमनी त्यांनाही वंदन केले..!त्या शहर पोलिस साहेबांच्या नजरेत " आमचा कुणीतरी सन्मान केला, शौर्य तिर्थक्षेत्राला भेट देऊन ...!" हा आत्मगौरवाचा भाव मला जाणवला..! एवढ्या घाईत देखील त्यांनी आमच्याकडे बघून स्मित केले..!आम्हाला खूप आनंद झाला होता..!


आमची या "शौर्य तीर्थक्षेत्राला" भेट दिल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते..! "शौर्य तीर्थक्षेत्र " हुतात्मा तुकाराम ओंबळेजींच्या पुतळ्याखालील लिहिलेल्या ओळी मनात म्हणत होतो... 

                                                               

" प्राणाचे देऊनी बलिदान..वाचविले असंख्य प्राण... हे शूरवीरा ,आपणास मुंबईकरांचा प्रणाम...!!!  

                                

वंदे मातरम्..!

                                                      

लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक:२५ मे २०१७

शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२०

आली माझ्या घरी ही दिवाळी


 

आमचे गाव आमची माणसं..!


" आली माझ्या घरी ही दिवाळी..! "


=================================


काही गाणी , अजरामर होऊन जातात, ती त्यांच्यातील गोडव्यामुळे..! लाडू,करंजी, बत्तासे इत्यादी अनेकानेक स्वादिष्ट पदार्थांची चव त्यात नक्कीच असते, कित्येक पिढ्यानपिढ्या..!


जसे की, " आली माझ्या घरी ही दिवाळी..!"

 हे अष्टविनायक चित्रपटातील गीत माझ्या बालपणापासून ऐकत आलेलो आहे.दरवर्षी दिवाळीच्या दिवशी हे गीत , कुणा मराठी रसिक माणसाने ऐकले नसेल असा शोधूनही सापडणार नाही..! एकवेळ ' मराठी रसिक ' माणूस दिवाळीचे फराळ करणार नाही,पण " आली माझ्या घरी ही दिवाळी..!" हे अतिशय सुमधुर गीत ऐकतोच..! 🎼


हे सुमधुर गीत मी आयुष्यात पहिल्यांदा लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी ऐकले होते, ज्यावेळी मी पालखेड, ता.वैजापूर येथे इयत्ता चौथी मध्ये होतो. तो प्रसंग देखील माझ्या लक्षात आहे. माझ्या वडिलांची जूनी सायकल पंक्चर झालेली होती आणि थोडीफार दुरुस्ती करायची होती.सायकलचे पंक्चर काढण्यासाठी आणि दुरुस्ती करण्यासाठी मी हाफ सदरा अन् हाफ चड्डीवर , सायकल लोटत लोटत आमच्याच गल्लीतील थोडेसे दूर असलेले बाळू काका गायकवाड मिस्तरी यांच्याकडे घेऊन गेलो होतो. माझ्या वडिलांनी मला दिवाळीच्या सणानिमित्त नवीन हाफ सदरा अन् हाफ चड्डी, आमच्याच गल्लीतील पारस भाऊ जैन टेलर यांच्याकडून शिवून घेतले होते. मी जरी सायकल लोटत लोटत चाललो होतो तरी देखील अंगात नवीन कपडे घातलेले असल्याने एखाद्या मिरवणुकीतील सन्माननीय माणसासारखा चाललो होतो..! आमच्या बालपणी, मुलांचा हाफ चड्डी अन् हाफ सदरा अगदी आवडीचा पोशाख होता.सायकलची दुरूस्ती आणि पंक्चर काढून झाले इतक्यात बाळू काकांच्या घराच्या जवळच असणाऱ्या अतिशय उंचावरील ग्रामपंचायत इमारतीतून , रेडिओ वर सुरू असलेले " आली माझ्या घरी ही दिवाळी..! " हे गीत ऐकू येऊ लागले होते..! मी तिथंच थांबलो,अन् पूर्ण गीत ऐकले अन् मग घरी गेलो होतो..! त्याकाळी करमणुकीचे सर्वात प्रभावी साधन रेडिओच होता..! तेंव्हा पासून या गीताच्या प्रेमात जे पडलो ते आजतागायत..!


आज त्या सुमधुर आठवणीतील प्रसंगाला जवळ जवळ पस्तीस वर्षे उलटून गेली,पण या गाण्याची आठवण अन् त्यातील गोडवा आजही लक्षात आहे..! आजही जेंव्हा जेंव्हा हे गीत ऐकू येते तेंव्हा तेंव्हा या सुमधुर गाण्याच्या पहिल्या आठवणीतील प्रसंगाची आठवण नक्कीच येते..! जन्मभूमीची अन् तिथल्या आठवणीतील प्रसंगाची ,माणसांची आठवण निदान मला तरी सदैव टवटवीत करत असतात..! आठवणी ह्या, सतत आपल्या भोवती पिंगा घालत असतात,फक्त आपण त्या आठवणी किती अन् कशा जपून ठेवतो यावर त्या आठवणींचे आयुष्य अवलंबून असते..! त्यातल्या त्यात आयुष्यातील कोणतीही पहिली आठवण ,भावूक माणसाच्या हृदयात कायम संजीवन असते..!😊🙏


असो, सर्व भारतीयांना दिवाळी लक्ष्मीपूजन निमित्त मनःपूर्वक सुमधुर शुभेच्छा..!🌹🙏


वंदे मातरम्..!


एक रसिक मराठी माणूस - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक- १४/११/२०२०, लक्ष्मीपूजन, शनिवार

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२०

मनोहारी मित्र, मनोहर गावडे..!


 

मला प्रवासात भेटलेली माणसं.


" मनोहारी मित्र, मनोहर गावडे..! "


=================================


" तू कितनी भी खुबसुरत क्यु ना हो ए जिंदगी,

खुशमिजाज दोस्तो के बगैर अच्छी नहीं लगती...! "


🙏🌹👬


नात्याच्या बाबतीत सर्व प्राण्यांमध्ये समृध्द प्राणी माणूस..! त्याच माणसाच्या नात्यातील समृध्द नाते दोन...! त्यापैकी एक आईचे अन् दुसरे मित्रांचे..! आता काहींना असे वाटेल की, इतर नाते, समृध्द नात्यात असतात की नाही..? नक्कीच असतील..! पण नात्यातील सूक्ष्म विण ज्या प्रकारे माणूस, आपल्या आईजवळ अन् मित्राच्या जवळ गुंफतो, तितकं इतर नात्याच्या जवळ अणू - रेणू इतका नाही गुंफू शकत, असे मला वैयक्तिक वाटते..!अणू - रेणू इतका फरक असतोच..!


माझा डी. एड चा प्रिय वर्गमित्र मनोहर गावडे ( जि.प.शिक्षक खुलताबाद अन् ह.मु. औरंगाबाद ) अन् मी त्याच मैत्रीच्या नात्यात , त्याच मैत्रीची विण घट्ट बांधून आहोत..! प्रिय मित्र मनोहर, आम्हा सर्व तत्कालीन डी एड बॅच मधील सर्वात प्रेरणादायी मित्र..! आम्ही वैजापूर आणि गंगापूर मधील काही मित्र, कन्नड येथे डी. एड चे शिक्षण घेत असताना, बहुदा त्याकाळी जगातील सर्वात असुविधांनी युक्त असणाऱ्या वसतिगृहात राहत होतो. आमचा हा जिवलग मित्र मनोहर, वेरूळ येथील संत जनार्दन स्वामी मौनगीरी महाराज आश्रमात वास्तव्यास होता. तिथून दररोज कॉलेजला ये जा करायचा..!


आमच्या तत्कालीन डी. एड कालखंडातील आठवणी ,या आजही आमच्या तत्कालीन बॅच मधील आम्हा काही मित्रांना आनंदाने जगायला मदत करतात.प्रिय मित्रा मनोहर , तू आपल्या डी. एड बॅच मधील सर्वात प्रेरणादायी मित्र आहेस..! तुझे आज पर्यंतचे आयुष्य अन् त्यातून तू प्राप्त केलेले आत्मिक समाधान सर्वकाही ग्रेट आहे..! मित्रा मनोहर, तू जेंव्हा शिक्षक म्हणून नोकरीला नव्हतास तेंव्हा रिक्षा चालवून आत्मनिर्भर होत गेलास..!आमच्या तत्कालीन वर्गातील सर्वांचा सर्वोच्च प्रेरणास्थान ,आमचा जिवलग मित्र, मनू ..! कोणतेही पाठबळ नसताना ,एका धार्मिक आश्रमात वास्तव्यास राहून शिक्षण घेऊन स्वतच्या आयुष्यात स्वाभिमानाने उभा राहणे, निव्वळ प्रेरणादायी आहे..! माझे अन् मनोहर मध्ये मैत्रीची विण घट्ट होण्यास मदत झाली ती, संत जनार्दन स्वामी मौनगीरी महाराज ( वेरूळ ) यांच्यावरील आमच्या श्रद्धेमुळे..!🙏


डी. एड ला असताना प्रिय मित्र मनोहर आणि मी ज्या हक्काने आणि आत्मीयतेने आमचा डी. एड चा अतिशय जिवलग मित्र विनय जोशी ( हल्ली कार्यरत, प्रशाला कन्नड ) याच्या घरी जायचो ते नाते आजच्या पिढीत निर्माण होताना दिसत नाही..! विशेष म्हणजे आपला अतिशय प्रिय मित्र विनय वसंतराव जोशी ,कन्नडकर याचा स्वभाव आणि विनयच्या स्वर्गीय आईचा स्वभाव हा ईश्वराने निर्माण केलेल्या प्रेमाच्या नात्यातील सर्वोच्च श्रेणीतील होता, त्यामुळं हे भावूक अन् प्रेमळ नाते वृध्दिंगत होत गेले..! विनयच्या आणि त्याच्या आईच्या, म्हणजेच आपल्या आईच्या प्रेमाची ,मायेची फुंकर आपल्याला ,त्याकाळी नेहमी लाभलेली होती..! आमच्या त्या अतिशय जिवलग मित्रावर, विनय जोशीवर नंतर नक्कीच लिहिल..!


आमच्या तत्कालीन डी एड बॅच मधील सर्व मित्रांमध्ये ,प्रिय मनोहर हा सर्वात समजूतदार मित्र होता..! त्याला हा समजूतदारपणा ,हा परिस्थितीने शिकविला होता..! परिस्थिती आणि परिसर माणसाला सगळं काही शिकवत असते, अगदी तसेच मनोहरच्या बाबतीत झाले. डी एड ला असताना आणि आताही मी, वैयक्तिक माझ्या अंतर्मनातील बऱ्याच विचारांना ,या मित्राजवळ व्यक्त करत असतो, कारण नात्यातील खोली..! आयुष्यात काही अतिशय खाजगीत असलेले प्रिय मित्र असतात, ज्यांच्याजवळ आपण सर्व रंगांची उधळण करत असतो, त्यापैकीच एक प्रिय मित्र मनोहर..! आजही कुठेही प्रवास असेल तर, सहसा मी मनोहरच्या सोबत असतोच..! त्या असलेल्या सोबतीत ,आजच्या आमच्या प्रपंचातील, आयुष्यातील आठवणींवर उकल काढण्याचा प्रयत्न करत असतो.


असो, आम्हा दोघांकडून सर्व भारतीयांना दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या म्हणजेच वसुबारस निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा..! 🌹🙏


जय बाबाजी..!

वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव 


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक - १२/११/२०२०, गुरुवार, वसुबारस

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२०

आयुष्याची शिलाई..!



 


मला प्रवासात भेटलेली माणसं..!


            " आयुष्याची शिलाई..! "


================================


आयुष्य...! प्रत्येकाचं व्यक्तित्व आणि प्रत्येकाचं अस्तित्व दर्शविणारे असते..! याच व्यक्तित्वात अन् अस्तित्वात माणूस, आपल्या आयुष्याचा गाडा हाकत दररोज जगत असतो आणि त्याच जगण्यात त्याच्या आयुष्याच्या उसवलेल्या कपड्यांना आयुष्याची शिलाई करत असतो..! माझ्या वैयक्तिक आयुष्याच्या माझ्या अस्तित्वाच्या चाळिशी उलटलेल्या कपड्यांवर विविध माणसांच्या सोबतीने आयुष्याची शिलाई अगदी पक्क्या धाग्याने गुंफत आलेलो आहे..! त्यात  पालखेड, लासूर स्टेशन, जळगाव, हडस पिंपळगाव, सोनवाडी  एकलहेरा, औरंगाबाद आणि आता अंधारी येथील माझ्या अस्तित्वाच्या खुणा अन् त्यांच्या धाग्यांना शिवत आलो आहे..! वैजापूर, गंगापूर आणि सिल्लोड  तालुक्यातील माझ्या वैयक्तिक आयुष्याच्या शिलाईचे धागे जसे जमेल तसे अगदी निव्वळ प्रेमानं विणत आलो..! काही धागे अगदी कडक मांज्या सारखे देखील भेटले,अशांच्या द्वारे आपला गळा कापून घेण्यापेक्षा माघार घेऊन शिल्लक असलेल्या आयुष्याच्या शिलाईला अजुन उसवण्यापासून वाचवत गेलो..!


आज दिनांक ६/११/२०२० रोजी संध्याकाळी नवीन विकत घेतलेल्या बेड शिटला कडेकडेने शिवून घेण्यासाठी बजाजनगर परिसरात आम्ही उभयतांनी , कुणी या नवीन कापडाला शिवून देतो का..याचा शोध घेण्यासाठी आलो होतो. अखेर आपल्या आयुष्याचे जेष्ठ धागे ,मन लावून शिवत असणाऱ्या एका ज्येष्ठ व्यक्तित्वाला पाहिलं अन् थांबलो तिथं..! माझी पत्नी ,माझ्या बालमित्राच्या घरी गेली अन् मी , आयुष्याच्या अस्तित्वाची शिलाई शिवणाऱ्या त्या ज्येष्ठाच्या सानिध्यात गेलो, त्यांच्या आयुष्याच्या अनुभवाची शिलाई समजून उमजून घेण्यासाठी..!


स्थळ - मोहटा देवी मंदिर ते सारा वृंदावन वसाहत तिसगाव रस्ता - बजाजनगर, औरंगाबाद.


नाव - तिर्थस्वरुप नारायण जाधव काका, मुळ राहणार - आन्वा, ता. भोकरदन ह.मु.बजाजनगर. औरंगाबाद


ज्येष्ठांना बोलतं केलं अन् त्यांच्या आपल्यातील काही परिचयाच्या खाणाखुणा निघाल्या की, गप्पांच्या फडांमध्ये माझ्यासारखा माणूस स्वतच्या आयुष्याची शिलाई, त्याच ज्येष्ठांच्या अनुभवाच्या धाग्यातून शिवत जातो..! गप्पांच्या ओघात मी , अंधारी येथे नोकरी करतो हे सांगितल्या बरोबर काकांचे डोळे चमकून गेले. मी लगेच अंदाज लावला की, काकांच्या नात्यांच्या आठवणीतील धागे अंधारी गावाशी नक्कीच बांधलेले असणार आणि ते खरं निघालं..! तिर्थस्वरुप जाधव काका यांचे बरीच पाहुणे मंडळी अंधारी गावात आहे,असे त्यांच्या बोलण्यातून जाणवत गेले..!


तिर्थस्वरुप जाधव काका , शिवणकाम करण्यासाठी सकाळी ९:३० वाजता येतात अन् थेट संध्याकाळी ६ वाजता घरी जातात.दुपारी घरी जाऊन जेवण करून येतात अन् पुन्हा शिलाईचे धागे गुंफत बसतात..! जुन्या उसवलेल्या कपड्यांना शिवून देणे हे काम काका अगदी मन लावून करतात..! तिर्थस्वरुप जाधव काका  यांना आपल्या मुलांचा खूप अभिमान वाटतो आहे,कारण काकांची मुलं त्यांची खूप काळजी घेतात, त्यांना खूप जीवही लावतात. तिर्थस्वरुप जाधव काका यांच्या अंगी शिवणकाम ही कला असल्यानं ,घरी निव्वळ बसून राहण्यापेक्षा आपल्या आयुष्याला ,आपल्या आवडत्या कलेच्या माध्यमातून आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात..! जुनी माणसं, कशा प्रकारे खरीखुरी आत्मनिर्भर आहेत याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे तिर्थस्वरुप जाधव काका ..! 


माझ्या आयुष्यातील आता पर्यंतच्या वाटचालीत शिलाईचे धागे अन् त्यांना सुंदर अशी गुंफण करणारे सतत भेटत गेले..! पालखेड येथे पारस जैन टेलर, नितीन जैन टेलर आणि लासूर स्टेशन येथे जितू भाऊ जैस्वाल टेलर अन् पुन्हा नितीन जैन टेलर..! या सर्वांनी त्यांच्या सुरेख अशा प्रेमळ सहवासरूपी धाग्यात मला गुंफून घेतलेले आहे..! आता औरंगाबाद येथील बजाजनगर परिसरातील तिर्थस्वरुप जाधव काका यांचाही सामावेश त्याच प्रेमळ सहवासरूपी धाग्यात मला गुंफून घेणार हे नक्की..! इथून पुढं माझं भविष्यातील कधीमधी निवांत बसण्याचं अन् माझ्या उरलेल्या आयुष्याच्या धाग्यांची शिलाई शिवण्याचं हक्काचं ठिकाण राहील,तिर्थस्वरुप जाधव काका यांचं हे पवित्र ठिकाण...! 


रात्रीची चाहूल लागायला लागली होती, तिर्थस्वरुप जाधव काका यांचा निरोप घेताना म्हणालो..

" काका, तुमच्या सवडीने ,माझ्या घरी नेईल तुम्हाला..! कृपया नाही म्हणू नका..!"

यावर काकांना झालेला निव्वळ आत्मीय आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे जाणवत होता..! मी निघताना  काका आवर्जून म्हणाले..

" गुरुजी, पुन्हा नक्की या बरं का..!"

मी - " अहो, तुम्ही नाही म्हणले तरी मी येतच जाणार आहे..! माझा मोबाईल नंबर असू, अन् तुमचाही द्या..! अधून मधून करीत जाईल प्रेमानं खुशाली..!"


आम्ही रस्त्यानं घरी येत होतो त्यावेळी माझ्या मनात पुन्हा तोच विचार येत होता की, जुनी माणसं घरी निव्वळ बसून राहण्यापेक्षा आपल्या आयुष्याला ,आपल्या आवडत्या कलेच्या माध्यमातून आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात..! जुनी माणसं, कशा प्रकारे खरीखुरी आत्मनिर्भर आहेत याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे तिर्थस्वरुप जाधव काका..! हाच आपला खरा भारत आहे..! जो खरा भारत हिंदी साहित्यिक प्रेमचंद यांच्या साहित्यात आढळला, जो खरा भारत मराठी साहित्यिक शंकर पाटील यांच्या साहित्यात आढळला, जो खरा भारत थोर लेखक आर.के. लक्ष्मण यांच्या मालगुडी डेज मध्ये आढळला..! जो खरा भारत लोकशाहीर अण्णाभाऊंच्या साहित्यात पदोपदी जाणवला; आणि भारतातील मध्यमवर्गीय माणसाला आपल्या लेखणीतून समर्थपणे व्यक्त करणाऱ्या  थोर लेखक व.पू.काळे यांच्या साहित्यात..! तो खरा भारत माझ्यामते इथच आहे, तिर्थस्वरुप जाधव काकांच्या आसपास..!


बजाजनगर परिसरातील माझ्या सर्व मित्रांना माझी नम्र विनंती असेल की, तिर्थस्वरुप जाधव काका यांच्याकडे नक्की तुमचे शिवणकाम घेऊन जा अन् खऱ्याखुऱ्या भारतातला आत्मनिर्भर करायला मदत करा..!🙏


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव ©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक - ६/११/२०२०, शुक्रवार

बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२०

" मलाही एक दिवस वर जायचे आहे..!"


 

चिंतन


" मलाही एक दिवस वर जायचे आहे..!"


=====================================


मलाही एक दिवस वर जायचे आहे,

पण अद्याप मी जमिनीवर उभा आहे..!


एक ना एक दिवस या सुखद  दुःखद आठवणींना येथेच सोडून जायचे ,

पण अद्याप मी जमिनीवर उभा आहे..!


हा माझा, ही माझी या मायाजालात अडकून बसायचे आहे,

पण अद्याप मी जमिनीवर उभा आहे..!


गतकाळातील आठवणींना आज आठवून जसे जमेल तसे जगायचे आहे,

पण अद्याप मी जमिनीवर उभा आहे..!


याच भूमीत रामदेवराय यादव जन्मले, त्यांच्याच गौरवशाली भूमीत,

अद्याप मी जमिनीवर उभा आहे..!


आसपास, माझा मराठवाडा हिरवागार दिसत आहे,पण त्याच हिरवेगार दिसणं, फक्त वर्षा ऋतु इतकेच मर्यादित आहे, हेच पाहण्यासाठी,

अद्याप मी जमिनीवर उभा आहे..!


कदाचित अजुन कित्येक पिढ्यांना हेच फक्त वर्षा ऋतूतील हिरवे रुप पाहणे नशिबी असेल,

कारण मी अद्याप त्याच त्या  मानसिकतेत अगदी घट्ट पाय रोवून याच भूमीत उभा आहे..!


पूर्वी, आता अन् भविष्यातही कदाचित माझं , असं फक्त दुसऱ्यांसाठी उभा राहणं नशिबी आहे,

अद्याप मी याच जमिनीवर अस्तित्वहीन ताठ मानेने येथेच उभा आहे..!😔🙏


स्थळ - भांगसी माता गड ( औरंगाबाद )


वंदे मातरम्..!


एक तात्पुरता कवी - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक - २९/१०/२०२०, गुरुवार

गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२०

" नवरात्रोत्सव गरबा नृत्य, खरा स्री शक्तीचा उत्सव..! "


 

चिंतन


" नवरात्रोत्सव गरबा नृत्य, खरा स्री शक्तीचा उत्सव..! "


==================================


माझ्यामते नवरात्रोत्सव मधील गरबा नृत्य दांडिया हा खरा फक्त स्त्रीयांचा, स्री शक्तीला आणि आदिशक्तीला समर्पित केलेला अतिशय पवित्र उत्सव..!


मात्र कालपरत्वे महिलांच्या  याच नवरात्रोत्सव मध्ये पुरुषांनी नेहमीप्रमाणे आपल्या अहंकारी पुरूषी मानसिकतेनुसार त्यात घुसखोरी केली अन् पुरूषी संस्कृतीचे त्यावर ग्लॅमर चढवायला सुरुवात केली..!


वास्तविक नवरात्रोत्सव मध्ये महिलांनी महिलांच्या सोबत एकत्रीत येऊन आपला आनंदोत्सव, नवरात्रोत्सव साजरा करायला हवा, जेणेकरून महिलांना त्याचा निसंकोचपणे खरा अत्यानंद घेता येईल..! 


जरी यदा कदाचित पुरुष त्या नवरात्रोत्सव मध्ये सहभागी झालेच तर त्यांनी त्यांचा रास गरबा नृत्य दांडिया स्वतंत्रपणे वेगळा आयोजित करून त्यात मनसोक्त आनंद घ्यावा..! किंवा फक्त पती पत्नी यांच्याच एकत्रीत रास गरबा नृत्य दांडिया स्वतंत्रपणे आयोजित करून त्यात मनसोक्त आनंद घ्यावा असे मला वैयक्तिक वाटते..! माझ्या या वैयक्तिक मताचे पुरूषी मानसिकतेच्या लोकांनी जास्त मनावर घेऊ नये ही नम्र अपेक्षा..! 🙏 


 मी लासूर स्टेशन येथे राहत असताना लासूर स्टेशन येथील माझे स्नेही आदरणीय संजयजी शर्मा यांनी  त्यांच्याच घराच्या समोर असलेल्या मैदानात अतिशय उत्कृष्ट प्रकारे रास गरबा नृत्य दांडिया नवरात्रोत्सव आयोजित केला होता. त्यात  फक्त आणि फक्त महिलाच सहभी होत्या..!आदरणीय संजयजी शर्मा यांनी स्त्रीयांचा, स्री शक्तीला आणि आदिशक्तीला समर्पित केलेला अतिशय पवित्र नवरात्रोत्सव आयोजित केला होता. त्याबद्दल आदरणीय संजयजी शर्मा यांना त्रिवार वंदन..!🙏🙏🙏


असो, 


खालील व्हिडिओ मध्ये जो गरबा नृत्य सादर करताना फक्त आणि फक्त महिला दिसत आहेत. तिथं एकच पुरुष आहे जो की ढोल वाजवत आहे.त्या पुरुषानेही स्त्रीयांच्या गरबा नृत्याच्या विरूद्ध दिशेला तोंड केलेले आहे..!जेणेकरून तेथील महिलांना निसंकोचपणे आपला आनंदोत्सव साजरा करता यावा. 


सदरील दृश्य  गुजरातमधील, कच्छ वाळवंटातील  भूज अंजार भचाउ येथील...! सदरील स्थळ राजस्थान, पाकिस्तान सीमेलगत बाखासर चौकीजवळील आहे.


सदरील सुमधुर गरबा नृत्य गीत गायन केले आहे गुजरातमधील सुप्रसिद्ध गायिका गीता रेबारी यांनी..!


आज नवरात्रोत्सव मधील सातवी माळ..! त्यानिमित्त सर्व महिला भगिनींना आणि पुरुषांना देखील श्रद्धेय शुभेच्छा..!🌹

व्हिडिओ स्रोत - व्हॉट्स ऍप

अंबाबाईचा उदो उदो..!


वंदे मातरम्..!


आईचा एक उपासक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक - २३/१०/२०२०, शुक्रवार

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

" ज्येष्ठांच्या सहवासातील दैनिक दिन..!


 

चिंतन


" ज्येष्ठांच्या सहवासातील दैनिक दिन..!



==================================


ज्येष्ठांच्या सोबत बसून, त्यांच्याकडील अतिशय समृद्ध अनुभवाचा ठेवा समजून घ्यायचा असतो. घरातील ज्येष्ठ जो पर्यंत हयात असतात तो पर्यंतच खरा संजीवन सहवास असतो..! बाकी ज्येष्ठांच्या हयाती नंतर कितीही उमाळा, प्रेम प्रदर्शित केला तर तो फक्त एकतर अभिनय वाटतो किंवा औपचारिक आयुष्याचे , कृत्रिम अनौपचारिक प्रदर्शन वाटते..!


ज्येष्ठांच्या सहवासातील प्रत्येक क्षण, एखाद्या विद्यापीठात उच्च कोटीची शिक्षण घेतल्यासारखेच असते..! जर ज्येष्ठांच्या सहवासातील क्षणास आपण मुकलो तर, बाकी औपचारिक शिक्षणाच्या कितीही पदव्या घरातील फाईल मध्ये ठेवा, त्या फक्त कागदाच्या सुशोभित पावत्या वाटतात..!


घरातील ज्येष्ठ , आपल्या घरात इष्टच करत असतात..! फक्त आपण त्यांच्या कलाने अन् त्यांच्या म्हातारपणातील लहान बालकाच्या सोयीने घ्यायचे असते..! घरातील ज्येष्ठामूळे , घरातील सातच्या आत ही अस्सल भारतील संस्कृती सदैव चिरंजीव असते..! भले घरातील ज्येष्ठ, घरातील तरुणांना, मुलांना सातच्या आत या अस्सल भारतीय संस्कृतीचे डोस प्रत्यक्ष पाजाळणार नाहीत, पण त्यांच्या फक्त असण्याने सातच्या आत ही अस्सल भारतीय संस्कृती आपोआप झिरपत जाते..!

( येथे ' सातच्या आत ' हा शबदप्रयोग आहे, शब्दशः अर्थ अपेक्षित नाही..!)


आमच्या घरात आमचे जेष्ठ आहेत म्हणून आम्ही इष्ट राहण्याचा प्रयत्न करतो..! आमच्या घरातील आमच्या ज्येष्ठांच्या अस्त्तित्वामूळे , आपण काही चुकल्या नंतर आजही आपल्या कानाखाली आवाज काढल्या जाईल याचा धाक सदैव असतो..! कारण आमच्या घरातील आमच्या ज्येष्ठांचं अख्ख आयुष्याच अतिशय स्वयंशिस्तीचे अन् आजही स्वावलंबी जीवनाचे आहे..! 


कुणाच्याही घरातील ज्येष्ठांच्या गरजा , आजच्या पिढीतील माणसांपेक्षा अतिशय नगण्य असतात..! त्यांची एकच गरज असते अन् ती म्हणजे, घरातील कनिष्ठांनी  मायेचे अन् मी घरात आहे याचं अस्तित्व दर्शविणारे  दोन  निव्वळ प्रेमळ शब्द बोलावेत म्हणून..! आमच्या घरातील आमच्या ज्येष्ठांचं, आम्हाला नेहमी एकच सांगणं असतं की, " आपल्या लायकी पेक्षा , श्री.पारेश्र्वर भगवंताने आपल्याला लई दिलं आहे, जास्तीचा हव्यास धरू नका, धपकन जमिनीवर आदळशाल..! 


आमच्या घरातील आमच्या जेष्ठांच्या त्वचेवरील प्रत्येक सुरुकुती , प्रत्येक काहीतरी शिकवून जाते..! कारण त्या प्रत्येक सूरुकुती मागे, त्यांच्या अख्ख्या आयुष्याची तपश्चर्या दडलेली आहे..! ती तपश्चर्या साधी सुधी मुळीच नाही..! तर त्या मागे त्यांच्या गतकाळातील अतिशय दारिद्र्य अवस्थेत शिक्षण घेतलेला खूप मोठा कालखंड दडलेला आहे..!


आज आम्ही जे काही आहोत त्यामागे एक जेष्ठ अजुन होते, पण नियतीने त्या अतिशय गोड अन् अतिशय मायाळू जेष्ठाला आमच्यातून पाच वर्षांपूर्वीच हिरावून घेतले आहे..! त्या आमच्या अतिशय मायाळू जेष्ठाचं नाव होतं..आई..! आणि एक ज्येष्ठ आज त्याच स्वावलंबी जीवनाचे संतुलित आयुष्य आमच्या सोबत व्यतीत करत आहे, त्यांचं नाव आहे..दादा, आमचे तीर्थरूप वडील..!🙏


असो, आज जेष्ठ नागरिक दिन आहे..! तसा आमच्या घरात निदान माझ्या पिढीत तरी दररोज जेष्ठ नागरिक दिन आहे..! बाकी आम्ही उभय जेष्ठ नागरिक झाल्यावर आमची पुढील पिढी आमच्या सारखाच दररोज प्रेमळ जेष्ठ नागरिक दिन अस्तित्वात ठेवील की नाही हा खूप मोठा चिंतनाचा विषय आहे...! हा चिंतनाचा विषय, आम्हा उभयतांचाच नाही, तर माझे जे समकालीन मित्र आहेत त्यांच्याही आयुष्यातील खूप मोठा चिंतनाचा विषय असेल यात तिळमात्र शंका नाही..! कारण अजुन दहा वीस वर्षानंतर मी अन् माझ्या समकालीन मित्रांच्या घरात जेष्ठ औषधाला देखील सापडणार नाहीत..! कारण, त्यावेळची पिढी जरा जास्तच सुशिक्षित असणार आहे..!🙏


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक - १/१०/२०२०,गुरुवार.

बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

मराठवाडा स्वातंत्र्य दिन



** चिंतन **


नेमके काय...?

मराठवाडा मुक्ती  संग्राम दिन...की ,

मराठवाडा स्वातंत्र्य दिन...?

________________________________________


वास्तविक इंग्रज राजवट व मराठवाडा यांचा फारसा काही संबंध आला नाही.थोडक्यात इंग्रजांच्या जुलमी राजवटीचा तडाखा मराठवाड्याला बसला नाही..!

 

पण.....

त्याहून जबर तडाखा मराठवाड्याला बसला..! तो तडाखा असा काही क्रूर होता..की त्यात कित्येक महिलांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली..! क्रूरकर्मा रझाकार व निजाम यांच्या  जुलमी वृत्तीने आपल्या मराठवाड्यातील इज्जतीचा जाहीर पंचनामा झाला. बऱ्याच जणांनी विरोध केला..! गोदावरीबाई टेके सारख्या रणरागिणी लढल्या...पण शरण नाही गेल्या..त्या क्रूर रझाकरांच्या समोर..! 


दरवर्षी माझ्या मनात एकच प्रश्न आजच्या रोजी येतो की,

आपण आजही काहीतरी गफलत करत तर नाही ना..?

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन... की.... मराठवाडा स्वातंत्र्य दिन...?


थोडेसे अर्थाने पाहूया....


मुक्ती या शब्दाचा अर्थ आहे..स्वातंत्र्य ...किंवा सुटका..! आणि संग्राम याचा अर्थ होतो लढा..!

मग दरवर्षी जो उल्लेख केल्या जातो.." मराठवाडा मुक्ती संग्राम दिन " याच्यातील मराठवाडा हा आपल्या भौगोलिक परिसराचा शब्द..! अन् त्याला लागून शब्द येतो..मुक्ती संग्राम...! मग आपण काय मराठवाड्याशी संग्राम करून मुक्त झालो का..?

याचे उत्तर सर्वांना मान्य आहे.." अजिबात नाही..!"


 हैद्राबाद हे आज जरी एक शहर असले तरी १७ सप्टेंबर १९४८ पूर्वी ते एक स्वतंत्र संस्थान होते..! नव्हे..नव्हे तो एक स्वतंत्र देश होण्याच्या मार्गावर होता..! पण आपल्यावर खूप खूप मेहरबानी सरदार वल्लभभाई पटेल यांची..! सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अतिशय कणखर नेतृत्व गुणांनी आपण त्यारोजी निजाम राजवटी पासून स्वतंत्र्य झालो..!ते आपल्या मराठवाड्याचे 

" राष्ट्रपिता " म्हंटले तरी वावगे ठरणार नाही..!


म्हणजेच त्यादिवशी मराठवाडा स्वतंत्र्य झाला..!


ताजा कलम: आपण " मराठवाडा स्वातंत्र्य दिन " म्हणणे योग्य राहील..!


 " मराठवाडा स्वातंत्र्य दिनाचा विजय असो..! "


वंदे मातरम्...!


नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक: १७ सप्टेंबर २०२०

 

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०

" आमचे,आदरणीय बापू, संजय जाधव पाटील सर..!"


 

मला प्रवासात भेटलेली माणसं..!


" आमचे,आदरणीय बापू, संजय जाधव पाटील सर..!"


==================================


त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आहे..!त्यांच्या सानिध्यात आम्ही व्यतीत केलेला कालखंड ,जगातली माणसं कशी ओळखायची हे शिकवून गेला..! त्यांच्या सहवासात जेंव्हा आम्ही होतो,तेंव्हा त्यांनी आम्हाला सख्ख्या भावासारखा जीव लावला..! त्यांच्यातील सामाजिक भान अन् माणसांची जाण ,आयुष्यात खूप काही शिकवून गेली..! आमच्या दृष्टीने त्यांचं व्यक्तिमत्व उत्तुंग होते,अन् आहे..! त्यांची आपल्यातील असणाऱ्या सर्व सामान्य माणसाला जवळ करण्याची प्रेमळ साद आपलीशी करून गेली..! जगात अनेकांच्या बाह्यांगात, अंतर्मनात तऱ्हेतऱ्हेचा अहंकार बऱ्याचदा जवळून तर कधी दुरून पाहायला मिळाला, मिळत आहे..! पण आमचे आदरणीय बापू या सर्वांना नक्कीच अपवाद होते अन् आहेत..! आमच्यासाठी नेहमीसाठी आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे आमचे,आदरणीय बापू..! अर्थात संजय जाधव पाटील ( सर ) वारेगाव- किनगावकर ( ता. फुलंब्री )


कालखंड नव्वदच्या दशकातील..!


मी तर त्यावेळी नोकरीला देखील लागलेलो नव्हतो.माझे थोरले बंधू सुनील भाऊ, हडको ,औरंगाबाद येथे राहत होते. बंधू  अविवाहित होते.सुनील भाऊ, एका खाजगी कंपनीत काम करत असे.माझे डी. एड झाल्यावर मीही, झेपेल ते काम करण्याच्या उद्देशाने काही दिवस सुनील भाऊ कडे गेलो होतो. अर्थात झेपेल ते काम करण्याची गरज पडलीच नाही,कारण शिक्षक म्हणून नोकरी लवकर लागली होती..! मात्र याच कालखंडात औरंगाबाद येथील तत्कालीन आमचे सख्खे शेजारी म्हणून आदरणीय संजय जाधव पाटील सर उपाख्य बापू यांच्याशी अतिशय जवळून संपर्क आला..!


आम्ही म्हणायला औरंगाबाद शहरात राहत होतो पण,आदरणीय बापूंच्या अतिशय प्रेमळ स्वभावामुळे शहरातील ' लिमिटेड ' जीवनाचा अनुभव कधी आलाच नाही.आदरणीय बापूंचा स्वभाव मुळात अतिशय प्रेमळ..! आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आदरणीय जाधव सर,यांचा मुळ पिंड खेड्यातील असल्याने आमच्यातील अनौपचारिक नात्यातील संबंध वृद्धिंगत होत गेले..!आदरणीय जाधव सरांनी आम्हा दोघाही भावंडांना खूप जीव लावला..! एखाद्याला जीव लावणं आणि एखाद्याशी ओळख असणं यात जमीन अस्मानाचा फरक असतो.आम्हाला बापूंनी जीव लावलेला आहे..! अगदी त्यांच्या घरातलं जेवणाचं ताट आमच्यासाठी बऱ्याचदा हक्काने तयार असायचे..! बहुतांशी संध्याकाळी आदरणीय जाधव सर उपाख्य बापू,आमच्या रुममध्ये आयुष्यातील अनुभवांवर आमच्याशी गप्पा करायचे..! 


आदरणीय संजय जाधव पाटील सर उपाख्य बापू, तसे मुरब्बी शिक्षकी नेते..!  राष्ट्रवादी शिक्षक संघटनेची मुहुर्तमेढ आदरणीय जाधव सर यांनीच रोवली..! मी तसा वैयक्तिक कोणत्याही शिक्षक संघटनेचा अधिकृत सदस्य नव्हतो आणि सध्याही नाही..! पण काही शिक्षक संघटनेतील काही माणसं, मला सदैव आपली जाणवली,म्हणून वैयक्तिक अशा ,माझ्या दृष्टीने ग्रेट असणाऱ्या शिक्षक नेत्यांच्या निव्वळ प्रेमात होतो अन् आहे..! त्या मोजक्या ग्रेट शिक्षक नेत्यांपैकी आदरणीय संजय जाधव पाटील सरांचे स्थान सदैव सर्वोच्च स्थानी आहे..! त्याचं कारणही तसंच आहे..! माणसाच्या आयुष्यात पहिलं जे काही असतं, ते ,कोणताही भावूक माणूस ,त्याच्या आयुष्यात त्या पहिल्याला सदैव हृदयाच्या गाभाऱ्यात हळुवारपणे पुजत असतो..! अगदी असंच काहीसं, माझ्याही आयुष्यात शिक्षक होण्याच्या मार्गावर असतानाच आदरणीय जाधव सरांसारखे अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व भेटले,त्यामुळे त्यांच्यावरील एक शिक्षक नेता म्हणून असलेलं पाहिलं प्रेम तहहयात राहील यात तिळमात्र शंका नाहीच..! मी नोकरीलाही नव्हतो तेंव्हा नव्वदच्या दशकात आदरणीय जाधव सरांच्या सोबत, त्यांच्या तत्कालीन शिक्षक संघटनेसाठी, आलेल्या शिक्षकांची सरबराई करण्याची  संधी मिळाली हे माझे नशीब..! ठिकाण होते  सिद्धार्थ उद्यान औरंगाबाद..!


आदरणीय संजय जाधव पाटील सर उपाख्य बापू,यांनी  मराठवाडा पदवीधर शिक्षक निवडणूक देखील लढवलेली आहे.  माणसातील पहिल्या प्रेमासाठी कोणताही माणूस आसक्त असतो,अगदी त्याच भावूक नात्याने आदरणीय जाधव सरांसाठी अदृश्य सेवा करण्याची संधी त्यावेळी मिळाली हे देखील माझे नशीबच..!


आदरणीय संजय जाधव सरांना आमच्या वडिलांचा खूप अभिमान वाटतो, आणि आमच्याही वडिलांना आदरणीय संजय जाधव सरांचा खूप अभिमान वाटतो..! आजही कधी कधी आमचे वयोवृध्द तीर्थरूप वडील, आदरणीय बापूंची आवर्जून आठवण काढतात अन् नेहमी म्हणतात...

" संजय जाधव सरांच्या सारखा निगर्वी शिक्षक नेता सापडणे मुश्किल..! आपल्या घरातला माणूस, लई माणुसकी संजय जाधव सरांना..! "


माझे इ. स.२००० मध्ये ज्यावेळी लग्न जमले होते त्यावेळी आदरणीय संजय जाधव पाटील सरांना, माझ्या लग्नपत्रिकेच्या पहिल्याच पानावर श्रद्धेने स्थान दिले होते..! कारण आमच्यासाठी आदरणीय संजय जाधव पाटील सर , घरातलीच प्रेमळ आणि श्रद्धेय व्यक्ती होती..! आजही आमच्या लग्नाची ती लग्नपत्रिका जपून ठेवलेली आहे..! माझ्या लग्नाच्या दिवशीच वैजापूर येथील शिक्षक पतपेढीचा प्रचार सुरू होता.त्या अतिशय धामधुमीतून , शाम भाऊ राजपूत आणि आदरणीय संजय जाधव पाटील सर लग्न सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते..! विशेष म्हणजे आदरणीय संजय जाधव पाटील सर उपाख्य बापू, माझ्या लग्नाच्या दिवशी  थेट, वाटी ( वधू वर यांना निरोप देई पर्यंत)  लावणेपर्यंत हक्काने उपस्थित होते ,हे त्यांच्यातील असलेली सर्व सामान्य माणसाला आपला अमूल्य वेळ देण्याची नैतिकता दर्शविते..! लासूर स्टेशन येथील माझ्या घरी आदरणीय बापू,ज्यावेळी आले होते,त्यावेळी आम्हा उभयतांची अगदी मोठ्या भावासारखी आस्थेवाईकपणे केलेली विचारपूस आम्हाला सुखावून गेली होती..!


आदरणीय संजय जाधव पाटील सर उपाख्य बापू यांच्यासारखी ग्रेट माणसं, माणसातील माणुसकीच्या संस्कृतीच्या वहनाचे , वृद्धिंगत होण्याची कार्य करत आहेत म्हणून तर बरीच सर्व सामान्य माणसं आजही ,अशा माणसात  ' आपला माणूस ' शोधण्याचा प्रेमळ प्रयत्न करत असतो..! जसे की आम्ही आदरणीय संजय जाधव सरांमध्ये शोधतो आणि अनुभवतो सुध्दा..! 🙏🌹

 

वंदे मातरम्...!


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक : ९ सप्टेंबर २०२०, गुरुवार

** परतफेड नियतीची..! **


*** मला प्रवासात भेटलेली माणसं..! ***


*** परतफेड नियतीची..! ***


______________________________________________


एकदा एक इसम दिनांक २२ ऑगस्ट २०१८ रोजी औरंगाबाद बस स्थानक येथील ,एका रिक्षात सर्वात अगोदर येऊन बसला होता.

त्या रिक्षात हळूहळू अनेक प्रवासी येऊन बसले .

तो इसम अलीकडेच उतरणार होता.बाकीचे प्रवासी थेट उतरणार होते.

थोड्या वेळाने अजुन काही प्रवासी रिक्षात ,थेट पर्यंत जाण्यासाठी आले,अन् रिक्षावाल्याने त्यांना रिक्षात बसवून घेतले... अन्....थेट पर्यंतच्या प्रवाशांना जागा शिल्लक राहिली नाही म्हणून त्या रिक्षावाल्याने सर्वात अगोदर स्वतः हुन बसवून घेतलेल्या त्या इसमाला ,रिक्षा सुरू होण्यापूर्वीच उतरवून दिले होते.अन् म्हणाला .........


" साहेब, तुम्ही दुसऱ्या रिक्षाने या..!"


तो इसम निमूटपणे उतरला अन् दुसऱ्या रिक्षांची वाट पाहू लागला..अन् ती रिक्षा धूर सोडीत भूर्रकन निघून गेली होती.


चार दिवसानंतर......................................................


वेळ दुपारची २ वाजेची होती. ठिकाण देखील तेच होते.तोच इसम ,नेहमीप्रमाणे त्याच रिक्षा स्टँडवर आला होता.त्या इसमाला ,पुन्हा तोच रिक्षावाला पुन्हा नजरेस पडला . तोच रिक्षावाला त्या इसमाला खूप गयावया करून म्हणत होता की,

" ओ,साहेब...माझ्या रिक्षात बसा ना...! आज रिक्षात बसायला कुणीच नाही आले हो..!आज लई धंदा लई कमी झाला..! "

त्या इसमाने त्या रिक्षावाल्याकडे पाहत मंद स्मित केले होते.अन् तो इसम त्याच रिक्षावाल्याला नम्रपणे म्हणाला .......


" भाऊ, तुम्ही मला ओळखलं का..?"


रिक्षावाला म्हणाला- " नाही साहेब..!"


तो इसम - " भाऊ ,मी तोच आहे, ज्याला तुम्ही चार दिवसांपूर्वी सर्वात अगोदर येऊन सुध्दा ,तुमच्या गाडीत बसून उतरवून दिले होते..! कारण काय तर तुम्हाला फक्त ५ ₹ जास्तीचे प्रवासी मिळाले होते.."


तो रिक्षावाला खूप खजील झाला होता.


तो इसम काहीच बोलला नाही.दुसरी रिक्षा आली अन् त्या रिक्षात बसून तो इसम आपल्या घराकडे रवाना झाला..!

तो पहिला रिक्षावाला शून्य नजरेने व पश्चाताप मुद्रेने पाहत राहिला..!


ता.क.: नियती जसेच्या तसेच परतफेड करत असते,नेहमी...!😊🙏


वंदे मातरम्..!


तो इसम: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक:२२ ऑगस्ट २०१८
 

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०

बरं झालं मी माणूस नाही..!


 


चिंतन


" बरं झालं मी माणूस नाही..! "

( एका पक्षाचे मनोभाव )


=================================


माणसांच्या गोंगाटात दिवसभर माझा जीव पार घाबरून जातो..! संध्याकाळ केंव्हा होईल अन् त्यानंतर रात्र केंव्हा होईल याच प्रतीक्षेत देखील मी पार थकून जातो..!


अखेर ती रात्र येते अन् मी निवांत होतो, एकांतात बसुन माणसावर आत्मचिंतन करायला..!

या आत्मचिंतनात माझ्या विचाराची अखेर होते, आणि स्वतः शीच व्यक्त होतो...

" बरं झालं मी माणूस नाही..! कारण माणसाने, माणसांची निवातंपणाची क्षेत्रे कधीचीच काबीज केली आहेत, सर्वार्थाने अतिक्रमण करून..! आमच्यात माणसा सारखे नाही होत, याकरिता त्या अदृश्य शक्तीला माझे त्रिवार वंदन..! 


मला पुन्हा उद्याच्या सकाळची भीती वाटते..! सकाळ झाल्यावर पुन्हा तोच गोंगाट, तोच माणूस, पुन्हा पाहायला मिळणार आणि पुन्हा मला एक संपूर्ण दिवस जीव मुठीत धरून काढावा लागणार..! पूर्वी जिथं आम्ही निवांत होतो,आज तिथं देखील आक्रांत होत आहे,विविध प्रसारणांचा..!त्या आक्रांतात, आमचा निसर्गतः लाभलेला  एकांत, माणसामुळे भिवून जातो..! आमच्या त्याच एकांताला गेल्या काही वर्षांपासून माणसाची नजर लागली आहे..! 

 बरं झालं मी माणूस नाही..!


म्हणून मी, याच निवांत रात्रीची दररोज रात्री आतुरतेने वाट पाहत असतो अन् त्यात स्वतःला एकांतात ध्यानस्थ करून घेत असतो..! ज्याला माणसात ' डिप्रेशन ' असं म्हणतात, तसला काही एक प्रकार आमच्यात अजिबात नसतो..! बहुदा ' डिप्रेशन ' ही अखिल माणसाला माणसाने दिलेली सर्वोत्तम देणगी असावी, माणसाचं मन उध्वस्त करणारी..! 

 बरं झालं मी माणूस नाही..!


याच निवांतपणात आम्हाला सापडतो, त्याच नियंत्याचा ,निवांत अमृत सहवास..! दिवसाच्या गोंगाटात तोच अमृत सहवास, पार भेदक स्वरूप धारण करतो अन् पुन्हा एकांतातील ,आम्हाला उध्वस्त करत सुटतो..!

 बरं झालं मी माणूस नाही..!


मी असं ऐकलंय की, कुठेतरी एक माणूस, आमच्यातील एकांतवास प्रभू केदारनाथाच्या सानिध्यात शोधतोय म्हणे..! नियतीने आमच्यातील संवेदना माणसाच्या रुपात कुठे का होईना, कुणाला का होईना देण्याचं नक्की केलेलं दिसतंय..! अशी काही माणसं बघितली, पाहिली की, आमच्याही मनात विचार येतो की....

हे विधात्या, त्या वैराग्य प्राप्त माणसासारखं ,वैराग्य आम्हालाही दे..!


ता.क. - सदरील पक्षी, दररोज रात्री, आमच्या घराच्या गॅलरीत बसायला निवांतपणे येत असतो. आज त्याच पक्षाच्या अंतर्मनातील बहुदा असणारे मनोभाव ,माझ्या लेखणीच्या द्वारे व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे..!


वंदे मातरम्...!


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक - ४/९/२०२०, शुक्रवार.

गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०

" आता पुन्हा तो " राम राम..!" होणे नाही..! "😔



 


मला प्रवासात भेटलेली माणसं..!


" आता पुन्हा तो " राम राम..!" होणे नाही..! "😔


==================================


मी ज्यावेळी इ. स.१९९५ ला शिक्षक म्हणून वैजापूर तालुक्यात नोकरीला लागलो तेंव्हा असे मनात धरून चाललो होतो की, माझ्या संपूर्ण शिक्षकी आयुष्यातील सेवा ही आमच्याच वैजापूर तालुक्यात विविध गावात जाईल. मात्र जे आपल्या मनात असतं ते बऱ्याचदा होत नाही, अन् असं न होण्यामागे त्या नियतीनेच आपल्याला अजुन इतर विश्वाचा पसारा दाखवायचं नक्की केलेलं असतं..! वैजापूर तालुक्याच्या बाहेर, इ. स.२०११ साली गंगापूर तालुक्यात शिक्षक म्हणून प्रवेश झाला..! गंगापूर तालुका ,तसा आमच्याच वैजापूर तालुक्याचा जुळाभाऊ..! आणखी विशेष म्हणजे  याच गंगापूर तालुक्यात माझे डी एड चे खूप जिवलग मित्र जसे की, दत्ता भाऊ घोगरे, जनार्दन राऊत, दादाभाऊ, सुनील जाधव, भगवान हिवाळे इत्यादी असल्याने आपल्याच तालुक्यात सेवा करायला मिळणार या मानसिकतेत मी होतो..!


मात्र....

शासनाच्या ऑनलाईन बदली धोरणामुळे मला बदली होऊन सिल्लोड तालुका अन् त्यातील अंधारी गाव मिळाले. कधी आयुष्यात सिल्लोड तालुक्यात जाण्याचा प्रसंग आला नाही,आणि अंधारी नावाचे गाव पहिल्यांदाच ऐकले अन् तिथं हजर होण्यासाठी फुलंब्रीच्या पुढे विचारत विचारत गेलो. अंधारी शाळेत उपस्थित होण्याच्या दिवशीच गावाच्या बाहेरील पुलावर एका काहीशा अंध व्यक्तीला मी शाळेचा नेमका पत्ता विचारला,त्यावर त्या व्यक्तीने मला सांगितले की,

" मी शाळेतच चाललो आहे, चला माझ्या सोबत.मी तिथं शिपाई म्हणून आहे, कैलास उबाळे माझं नाव..!" 

हे ऐकल्यावर मला अजुन आधार जाणवला. शाळेत जाऊन हजर झालो.मी लगबगीने बाहेर आलो.उबाळे मामा, बाहेरच उभे होते.मी त्यांना माझा सर्व परिचय दिला.त्यावर त्यांचं एक वाक्य कायमचं मनात घर करून गेलं, अन् ते वाक्य होतं,

" सर, तुम्ही औरंगाबाद, बजाजनगर हून दररोज येणार आहात, तुमच्या  घरी  म्हातारं माणूस ( माझे वडील ) हाये, म्हाताऱ्याची काळजी घ्या..! प्रवासात घाई करू नका, अडीअडचणीत कामं येईल म्हणून एक रजेचा अर्ज माझ्याकडं राहू द्या..! "

या त्यांच्या अतिशय समजूतदार वाक्यांनी मला खूप गहिवरून आलं होतं,पण काही भावना व्यक्त करायच्या नसतात,त्या स्पर्शाच्या जाणिवेतून व्यक्त करायच्या असतात या भावनेतून मी आदरणीय उबाळे मामांच्या खांद्यावर मायेनं हात ठेवला..! कोण,कुठला नंदन ,अन् या निव्वळ अपरिचित गावात हक्काच्या मायेनं बोलणारं पहिलं जर कुणी भेटलं असेल तर ते आदरणीय उबाळे मामाच..! ज्यांना भावनेच्या जाणिवांची जाणीव असते,त्यांच्यासाठी असे प्रसंग चिरकाल स्मरणात राहणारे असतात..! बाकी निष्ठुर मनाला यात काहीही जाणवणार नाही हेही तितकंच खरं..!


मग काय...अंधारी शाळेत उपस्थित झाल्यापासून दररोज आपण एखाद्या देवळात प्रवेश केल्यानंतर जशी पवित्र निनादाची घंटी वाजवतो,अगदी तसेच , शाळेत प्रवेश केल्या केल्या आदरणीय उबाळे मामांना......

" राम, राम मामा..!" अशी साद घातल्यानंतरच माझी दररोजची शिक्षक हजेरी पटावर स्वाक्षरी होऊ लागली..!


मी माझ्या ऑफ पिरियड ला देखील वर्गातच असायचो,तेंव्हा बऱ्याचदा उबाळे मामा,माझ्या वर्गात हळूहळू चालत यायचे अन् मायेनं म्हणायचे...

" सर, आता बस करा, तुम्ही सकाळपासून वर्गातच आहात, जा खाली, आरामशीर बसा आता..!"

उबाळे मामांचे हे हक्काचे प्रेमळ बोलणे ऐकून माझ्या मनातील भावनेचा कोपरा अजुन टवटवीत व्हायचा..! सकाळी शाळेत गेलो की, आदरणीय उबाळे मामा, बऱ्याचदा हक्काने मला, त्यांची शिक्षक हजेरी पटावर त्यांचा हात धरून स्वाक्षरी करायला सांगायचे..! मी ज्यावेळी शाळेत हजर झालो त्यावेळी ,अगदी सुरुवातीला इयत्ता आठवीच्या वर्गात ज्यावेळी उबाळे मामा, विद्यार्थी गोषवारा रजिस्टर घेऊन आले होते,तेंव्हा त्यांनी त्यांच्या भाषेत वर्गातील सर्व विद्यार्थांना सांगितले होते की,

" पोरांनो, जाधव सरला त्रास देऊ नका रे..!"

वाक्य अगदी साधं होतं,पण त्यातील भावार्थ खूप मोठा होता..!


आदरणीय उबाळे मामा, तसे गाण्याच्या बाबतीत देखील रसिक होते,हे त्यांच्या विविध गाण्यांच्या आवडीनिवडी वरून माझ्या लक्षात आले होते.आदरणीय उबाळे मामा यांचं खूप आवडतं गाणं होतं,  ' अशीही बनवाबनवी ' या चित्रपटातील " हृदयी वसंत फुलताना,प्रेमात रंग यावे..!"

केवळ याच गाण्याच्या प्रेमापोटी मामांनी त्यांच्या मोबाईलची रिंग बॅक ट्यून याच गाण्याची ठेवली होती, हे मामांनी मला आवर्जून सांगितलेलं होतं..! आमच्या अंधारी प्रशालेतील सर्व शिक्षकांचे अन् विद्यार्थांचे खूप आवडते होते,आदरणीय उबाळे मामा..!


दरवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा रक्षाबंधन हा एक उत्सव माणसांच्या एकमेकांच्या नात्यात माणुसकीचा, मायेचा, आत्मीयतेचा धागा घट्ट व्हावा म्हणून त्याच पवित्र भावनेने साजरा केला जातो.मी दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी आदरणीय उबाळे मामांना राखी बांधायचो..! त्यावेळी उबाळे मामांना झालेला आनंद ,माझ्या मनाला अतिशय सुखावून जायचा..!


नियती जितकी प्रेमळ असती तितकीच ती निष्ठुर देखील असते.याच निष्ठुर नियतीने काल दिनांक २/९/२०२० रोजी आदरणीय उबाळे मामांना,आपल्यातून हिरावून घेतले..!अंधारी प्रशालेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी एका नात्याला कायमचे पोरके झाले..! आता मी जेंव्हा जेंव्हा अंधारी प्रशालेतील इमारतीत सकाळी सकाळी प्रवेश करील तेंव्हा तेंव्हा आता " राम राम मामा..!" अशी प्रेमळ हाक घालायला उबाळे मामा तिथं नसणार..! आता तिथं फक्त आणि फक्त उबाळे मामांच्या अनेक स्मृती एकवटलेल्या असतील..!त्या प्रत्येक एकवटलेल्या आठवणीत उबाळे मामांच्या  आठवणीतील सहवासाचा  फक्त गहिवर माझ्या सोबत असेल..! मात्र प्रत्यक्ष मधुर सहवासाचा तो उल्हास त्यात नसेल..! 


माझी शिक्षक म्हणून जी काही सेवा सिल्लोड तालुक्यातील अंधारी प्रशालेत होत आहे ती या तालुक्यातील शेवटचीच सेवा राहील,कारण मी कधी ना कधी गंगापूर किंवा वैजापूर तालुक्यात परत जाईल,पण...या अंधारी प्रशालेतील  आदरणीय उबाळे मामांच्या सोबतचा आठवणीतील सुंदर असा गहिवर नक्कीच सोबत घेऊन जाईल..! शेवटी माणसाचं आयुष्य तरी काय असतं हो..? अगदी साधं सोपं म्हणजे, आपल्या आयुष्यातील वाटेवर भेटणाऱ्या विविध प्रवाशांच्या आठवणींचा देव्हारा अन् त्याच देव्हाऱ्यात मांडून ठेवावीत अशी मोजकी पण खूप चांगली भेटलेली प्रेमळ माणसंच, दुसरं काय..! 🙏


आदरणीय स्वर्गीय उबाळे मामांना भावपूर्ण श्रद्धांजली..!

तुम्ही सदैव आठवणीत राहशाल, यात तिळमात्र शंका नाही..! आता फक्त माझ्या मनात एकच खंत राहील..

" आता पुन्हा तो " राम राम..!" होणे नाही..! "😔


वंदे मातरम्...!


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव 


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक : ३/९/२०२०, गुरुवार

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२०

" माझ्या नाकावर टिच्चून..!"



***  मला प्रवासात भेटलेली माणसं  **"


" माझ्या नाकावर टिच्चून..!"

__________________________________________


आज दिनांक २७ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी बसने शाळेत निघालो होतो.बसमध्ये आज खिडकी जवळील जागा काही मिळाली नाही.मग नाईलाजाने खिडकीजवळ बसलेल्या एका इसमाजवळ जाऊन बसलो..!


बापरे...!

तो..बचाबचा तोंडात गुटख्याच्या पुड्या ओतून चावत बसला होता.ज्या वासाची मला सर्वात जास्त अॅलर्जी तोच वास अहिंसात्मक मार्गाने सहन केला..खूप वेळ... तोंड वाकडे करून..!

बरं या दरम्यान दुसरीकडे जागा पण नव्हती..! वाहकाकडे ( कंडक्टर) कडे गाऱ्हाणे मांडावे तर त्याचाही तोबरा भरलेला होता..!


आज माझ्या नाकावर खूप अत्याचार झाला आहे.

हल्ली कुणीही..काहीही मागायचे असले की ,आंदोलन करतात..!

माझ्या नाकावर, टीच्चून जो अत्याचार झाला आहे,त्याबाबत माझ्या अत्याचार ग्रस्त नाकाला कुणी नाकावर टिच्चून न्याय देईल का हो...आंदोलन करून..?😂


ता.क : तो अत्याचार करणारा तरुण त्याच्या मोबाईल वर कुणाशी तरी " प्रेमळ संवाद " करत होता.मला प्रश्न पडलाय..की, असल्या वासाड्या लोकांबरोबर " प्रत्यक्ष  कृतीयुक्त प्रेमळ संवाद " कसा  काय करत असतील...

" त्या " ...? 😂


वंदे मातरम्..!


* दिनांक:२७ ऑगस्ट २०१८

* अत्याचार स्थळ: सरकारी बस.

* अत्याचार करणारा : धडधाकट तरुण.

* अत्याचारग्रस्त लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

 

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

" तुम्ही हे ऍप घ्या ..!"

 


मला प्रवासात भेटलेली माणसं..!


" तुम्ही हे ऍप घ्या ..!"

======================================


दिनांक २० ऑगस्ट २०१९ रोजी मी नेहमी प्रमाणे औरंगाबाद बस स्थानकाहुन  सकाळी अंधारी येथे शाळेत जाण्यासाठी बस मध्ये बसलो.हडको टी पॉइंट आल्यानंतर आमची बस थांबली.खाली खूप गर्दी होती.माझ्या सिट वर माझ्या बाजूला कुणीच नव्हते.जागा रिकामीच होती.बंदुकीतून गोळ्या सुटाव्या तसे एकामागून एक माणसं बस मध्ये घुसू लागली.त्यात एक गोरे गोमट्या वर्णाचे हेअर डाय केलेले एक अंदाजे ७० वर्षाचे आजोबा पण होते.मी त्यांच्या वयाचा विचार करून त्यांना माझ्या बाजूलाच जागा दिली.मी आपला माझा मोबाईल पाहण्यात मग्न झालो,कारण पुढील एक ते दीड तास " मैं और मेरी तनहाई " तोच मोबाईल होता..!☺मी दररोज बस मध्ये प्रवाशांशी नाहक बोलण्यापेक्षा तऱ्हेवाईक माणसांचे निरीक्षण करून माझ्या ज्ञानात भर पाडत असतो..! पण आज माझीच फजिती होणार होती.


अशी तशी आमची बस हर्सूल  येथे आली असेल.इतक्यात ते आजोबा मला म्हणाले,

" कुठले पाहुणे..?"

मी त्यांच्याकडे न पाहता माझ्या मोबाईल कडे पाहत म्हणालो,

"मला आज रोजी पर्यंत तीन गावं आहेत, मूळ गाव,पालखेड,नंतरचे लासूर स्टेशन व हल्ली मुक्काम येथेच औरंगाबाद मध्ये एका ठिकाणी...!"

यावर ते आजोबा मला पुन्हा म्हणाले,

"तुम्ही शिक्षक आहात का हो..?"

मी चमकुन त्यांच्याकडे पाहून  म्हणालो,

" तुम्ही कसं काय ओळखलं..?"

आजोबा-" तुम्ही लई चकपक पांढरे कपडे घातले, अन् लई आवरून सावरून बसला आहात त्यावरून ओळखले..!"

असं म्हणताच तेवढ्या वेळापुरता मी ,त्यांची नजर चुकवून मोबाईलच्या काचेत स्वतःला पाहून घेतले..!😂

मनात म्हणलं हे आजोबा,मला ऐन मार्च , एप्रिल महिन्यात याच रस्त्याने बसमध्ये भेटले असते तर मी त्यांना खाणीत काम करणारा कामगार नक्कीच वाटलो असतो,कारण रस्त्याचे काम अन् धूळ..!मग मी पण त्यांच्या वयाला अनुरूप गप्पांच्या फडात अधून मधून रंगलो.


आता आमची बस, चौका या गावाजवळ आली होती. एवढ्यात ते मला म्हणाले...

" तुमचा मोबाईल what's app  नंबर काय आहे..?

मी म्हणालो- " काका,मी सहसा माझा व्हॉट्स ऍप नंबर कुणाला देत नाही,कुणी काहीही पाठवतं..!"

आजोबा- " अहो,द्या हो..! तुम्ही आता ओळखीचे निघाले,आमचे पाहुणे आहेत तुमच्या गावाकडे....!"

मला पण त्यांच्या वयाकडे पाहून अन् ते काहीही पाठवणार नाही या अंदाजाने दिला माझा नंबर..!

लगेच ते त्यांच्या  मोबाईलच्या कामात  व्यस्त झाले. थोड्या वेळाने मला म्हणाले..

" हे एक app आहे,तेवढं प्ले स्टोअरवर जाऊन डाऊनलोड करा..!"

मी-" माझ्या मोबाईल मध्ये स्पेस नाही..!"

आजोबा- " त्यातील काही डिलीट करा मग..!"

मी- " सगळं महत्त्वाचं आहे,त्यामुळं काहीही डिलीट करता येणार नाही..!"

आजोबा-" जास्त जागा नाही लागणार, करा काहीतरी डिलीट..!"

मी- " काका,मला ते app नाही लागत..!"

आजोबा- " तुम्ही घेऊन तर पहा..! वाटल्यास त्या app ची लिंक मी पाठवतो..!"

आता मात्र मला त्यांच्या आग्रहाचे अपचन व्हायला लागले होते.मी काहीसा सौम्य कडक स्वरात त्यांना म्हणालो

मी- " तुम्ही का मला आग्रह करू राहिले..?माझी अजिबात इच्छा नाही..!"

आजोबा-" मी लिंक तुमच्या नंबरवर पाठवली आहे,ती लिंक ओपन करून ते app घ्या..!"


आता आमची बस फुलंब्री बस स्थानक येथे आली. तेंव्हा लगेच आजोबा म्हणाले..

" केली का लिंक ओपन..?"

मी सौम्य उंच स्वरात म्हणालो- " तुम्हाला समजत नाही का हो..? मी नाही म्हणतोय अन् तुमचं तेच सुरू आहे..!"

यावर ते आजोबा शांत झाले.आता पाल फाटा आला होता.ते आजोबा पुन्हा म्हणाले..

" अहो,सर,त्या app मधून जर तुम्ही फेसबुक,व्हॉट्स ऍप सुरू केले तर तुम्हाला काही पैसे मिळतील..!"

मी काहीच न बोलता गुलजारजींची इजाजत चित्रपटातील " मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है..!" ही गझल ऐकण्यात मग्न होतो.


फरशी फाट्यावर आमची बस थांबली.त्याचा फायदा घेऊन ते आजोबा मला पुन्हा म्हणाले..

" मी काय म्हणतो,एकदा ते app घेऊन तर पहा..!"

मी- " मी,माझी जागा बदलू का हो..?"

यावर ते चूप बसले.सकाळचे ९ वाजले होते.आळंद गाव आले होते.पुन्हा त्या आजोबांचा पाल्हाळ सुरू झाला...

" सर,राग नका येऊ देऊ..! पण तुम्ही खरंच जर ते app मी पाठविलेल्या लिंक मधून जर घेतले ना,तुम्हाला थोडेफार पैसे मिळतील..!"

आता मात्र की रागात त्यांना म्हणालो- " हे पहा काका,तुमच्या वयाचा विचार करून मी तुम्हाला कडक स्वरात बोलू शकत नाही..! आता पुन्हा हा विषय काढला तर माझा नाईलाज होईल..!"

आजोबा एकदम चिडीचूप झाले.अखेर अंधारी गाव आले.मी उतरू लागलो.इतक्यात ते आजोबा मला पुन्हा म्हणाले...

" सर, जमलंच तर लिंक ओपन करून ते app घ्या..!"

मी रागाने त्यांच्याकडे पाहून खाली उतरलो.


उतरल्या बरोबर मी त्या आजोबांचा नंबर ब्लॉक करून टाकला. विचार करू लागलो की, काहीवेळा आपला चांगुलपणा नडतो आपल्याला..! मी त्यांना माझा व्हॉट्स ऍप नंबर नको होता द्यायला..! पण मी त्यांच्या वयाचा अन्  गावाकडच्या निघालेल्या ओळखीमुळे त्यांना माझा व्हॉट्स ऍप नंबर दिला होता.मी सहसा अनोळखी व्यक्तीला नंबर देतच नाही,पण त्यांनी माझ्या गावाकडची ओळख दिल्यामुळे मला त्यांचा उमाळा आला होता..! 


ता.क.: मोजक्याच माणसांना मी प्रेमानं अन् विश्वासाने माझा व्हॉट्स ऍप नंबर दिला आहे त्यांनी मला मेसेज न केल्याबद्दल गोड राग मानू नये..!😂  

जर राग आल्यास मला ब्लॉक करा..!😂😂


वंदे मातरम्..!


लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक: २१ ऑगस्ट २०१९


सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

प्रिय विद्यार्थी अर्जुनचा धाकटा भाऊ प्रिय नंदू..!

 


मला प्रवासात भेटलेली माणसं..!


प्रिय विद्यार्थी अर्जुनचा धाकटा भाऊ प्रिय नंदू..!


===================================


अतिशय  नम्र आणि सालस माजी प्रिय विद्यार्थी नंदू शिंगाडे, तुला जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा बेटा..!🌹


नव्वदच्या दशकात तू जेंव्हा जळगाव ता.वैजापूर येथील  प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होतास, त्यावेळी तुझी शिक्षणाप्रती असणारी प्रचंड ओढ, भूक मी अगदी जवळून पाहिलेली आहे.अतिशय सर्व सामान्य परिस्थितीत तू शिक्षण घेतले अन् आज लासूर स्टेशन येथे स्वतचं शैक्षणिक कार्य सुरू आहे..!


सरस्वती कोचिंग क्लासेस या नावाच्या रूपाने लासूर स्टेशन येथे तुझ्या रूपाने एक सामाजिक जाणीव अन् बौध्दीक जाणीव असलेला प्रिय विद्यार्थी हे योग्यपणे हाताळत आहे याचा नक्कीच अभिमान वाटतो..! यात सातत्य असू दे..! शैक्षणिक कार्यात खूप आवश्यक असणाऱ्या आचारसंहिता बाबत, प्रिय नंदू , तुला मागेच हक्काने मार्गदर्शन केलेले आहेच, त्याचे पालन करतो आहेच, त्यात उणीव पडू देऊ नये..!🙏


तुझा मोठा भाऊ , माझा अतिशय प्रिय  विद्यार्थी अर्जुन शिंगाडे ( ह.मु. बजाजनगर औरंगाबाद) , याचा तू नेहमी तुझ्या आयुष्यात आदर्श असू दे..! कारण अर्जुन हा माझ्या आवडत्या विद्यार्थ्यांपैकी एक आहे..! प्रिय अर्जुन, खूपच शांत अन् स्समजुतदार आहे..! माझ्या शिक्षकी आयुष्यातील वाटचालीत सुरुवातीला अशी अनेक प्रेमळ मुलं भेटली याचा नक्कीच आनंद वाटतो.त्यात अर्जुन चे स्थान खूप वरचे आहे..! विशेष म्हणजे तुझा मोठा भाऊ अर्जुन ,हा त्याच्या प्राथमिक शाळेतील वयोगटात असताना वर्गात सर्वात मोठा होता,पण त्याने कधीही दांडगाई केली नाही ,की कधीही आपल्यातील नैतिक मूल्यांचा तोल ढासळू दिला नाही..! प्रिय नंदू , तू  नशीबवान आहेस, प्रिय विद्यार्थी अर्जुन सारखा भाऊ तुला लाभलेला आहे..! प्रिय अर्जुन सारखा विनम्र विद्यार्थी लाभणे हे कोणत्याही शिक्षकांसाठी अभिमानास्पद आहे..!


वंदे मातरम्...!


नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक : १८/८/२०२०

रविवार, १६ ऑगस्ट, २०२०

" अंश...एक..! रूपे दोन..!! "

 चिंतन


" अंश...एक..! रूपे दोन..!!  "


====================================


प्रत्येक जण आपापल्या कालखंडाचे प्रतिनिधित्व करत असतो..!

जसे प्रभू रामचंद्र यांनी त्यांच्या कालखंडाचे प्रतिनिधित्व केले..तर..

भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या कालखंडाचे प्रतिनिधित्व केले..!

दोघेही एकाचेच अंश होते...पण..दोघांचे आचरण..उच्चारण..उपदेशन..भिन्न..भिन्न होते..!

कारण ,असे भिन्न भिन्न असणे..ही त्या कालखंडाची मागणी होती..! 


प्रभू रामचंद्र व भगवान श्रीकृष्ण दोघेही एकच आचरण...उच्चारण... उपदेशन करून त्या त्या कालखंडात जगले असते तर..तो त्या कालखंडावर अन्याय झाला असता..!

नियतीने असे...एकाच्याच अंशाला.. असे भिन्न...भिन्न वर्तन करायला भाग पाडले..! 

असे इतिहासात अनेक उदाहरणे आहेत की,जे एकाचेच अंश होते पण वर्तन भिन्न..भिन्न..!


असे असण्याचे एकमेव कारण म्हणजे..त्या..त्या कालखंडाचे ते अपत्य असणे होय..!


अन् या भारतमातेच्या सुपुत्रांनी ती आपल्या कृतीने ,युक्तीने पूर्ण केली..! तीच त्यांची कायमची ओळख बनून गेली.प्रत्येकजण स्वतंत्र असतो.एकाचाच जरी अंश असला तरी...तो स्वतंत्र असतो..! 

असे प्रत्येकाचे स्वतंत्र असणे..त्या..त्या कालखंडातील स्वातंत्र्याची, समाजमनाची मागणी असते..इच्छा असते...! नव्हे .नव्हे..असे प्रत्येकाचे स्वतंत्र असणे हे  त्या कालखंडाचे लाडके अपत्य असते..भिन्न..भिन्न आचरण..उच्चारण... उपदेशनाचे..!


" अटलजी तुम्ही नरेंद्र होता..तुमच्या कालखंडाचे |


भिन्न..भिन्न नरेंद्र असतात.. त्या..त्या कालखंडाचे |"


तुम्ही प्रभू रामासारखे जगले |


कुणी भगवान श्रीकृष्णा सारखे जगत आहे..|


नीती दोघांची  भिन्न..भिन्न |


पण उद्देश मात्र एकच आहे |


माझा देश अग्रेसर व्हावा |


भावपूर्ण श्रद्धांजली...अटलजींना...!


( निधन दिनांक - १६/८/२०१८ )


ता.क.: वरील मजकुरात उपमा अलंकार उपयोगात आणला आहे..! तुलना केलेली नाही..हे कृपया वाचकांनी नम्रपूर्वक समजून घ्यावे ..!


वंदे मातरम्..!


नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक: १७ ऑगस्ट २०१८

मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०

" राम.. राम..! " 🙏

 





आमचे गाव आमची माणसं ©️


" राम.. राम..! " 🙏


================================


माझे जन्मगाव पालखेड, ता. वैजापूर येथे आमच्या घराच्या समोरच ग्राम दैवत श्री.पारेश्वर महादेव मंदिर आहे.

माझ्या बालपणी मंदिरात प्रवेश करते वेळीच , डाव्या बाजूला कोपऱ्यात भिंतीवर मंदिरातील सर्व लाईट सुरू करण्याचे मुख्य बटण होते. मी त्यावेळी प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होतो. त्यावेळी नेहमीप्रमाणे एक दिवस संध्याकाळी मंदिरात दर्शनाला गेलो होतो.त्यावेळी मंदिरातील सर्व लाईटचे मुख्य बटण आमच्याच गावातील वयोवृध्द व्यक्तिमत्व स्वर्गीय माणिक बाबा डोमाळे चालू करण्यासाठी चालले होते.मी आणि माझा जिवलग बालमित्र स्वर्गीय आप्पासाहेब सुराशे त्यांच्या मागे मागे गेलो.तीर्थस्वरुप माणिक बाबा डोमाळे यांनी लाईट चे बटन दाबल्या बरोबर " राम राम..!" असे म्हणाले..! मी आणि आप्पा ने अवतीभोवती पाहिले तर कुणीही नव्हते..! मला राहावले नाही.मी तिर्थस्वरुप माणिक बाबा डोमाळे यांना म्हणालोच.....

" बाबा, तुमच्या आसपास कुणीही नाही,मग तुम्ही " राम राम...!" कुणाला म्हणाले...?

यावर स्वर्गीय तीर्थस्वरुप माणिक बाबा डोमाळे आम्हाला म्हणाले....

" पोरांनो, यधळा जव्हा लाईट , दिवा लावला जातो ना, तव्हा, तव्हा राम.. राम असं म्हणायची रीत हाये..! कोणत्या बी कामाची सुरुवात राम राम असं म्हणून करत्या..! यधळा..यधळा समदेजण दमून भागून आलेले असतात..! तेवढंच देवाचं नाव घेतल्यानं मन शांत होत पोरांनो..! "


हेच स्वर्गीय तीर्थस्वरुप माणिक बाबा डोमाळे माझ्या आजोबांचे म्हणजेच चंपतराव जाधव यांचे खूप जिवलग मित्र होते, असे माझे तीर्थरूप वडील आजही सांगतात. तत्कालीन आमच्या पालखेड गावातील वारकरी सांप्रदायाची धुरा तीर्थस्वरुप माणिक बाबा डोमाळे यांच्याच खांद्यावर होती.


मग, काय त्या दिवसापासून बालपणी पालखेड येथील आमच्या घरातील चिमणी ( दिवा ) लावायचे काम बऱ्याचदा मीच करू लागलो. त्या दिवसापासून प्रत्येक दिवशी चिमणी ( दिवा) लागतेवेळी " राम ,राम ...!" म्हणायची जी श्रद्धेय सवय लागली ती, आजतागायत कायम आहे. कधी मनातल्या मनात तर कधी हळू आवाजात.


तीच सवय आणि तीच गतकाळातील सुखद आठवण माझ्या मुलांना देखील मागेच सांगितलेली आहे. त्यामुळे मुलंही घरातील, पार्किंग मधील दिवे ( लाईट, ट्युब ) लावताना एकट्यात कधी मनातल्या मनात तर कधी हळू आवाजात.." राम राम..!" असं म्हणतात.


माझ्या वैयक्तिक आयुष्यात संध्याकाळी दिवा लावते वेळी 

" राम..राम..!" म्हणण्याची सुरुवात करतेवेळी असणारे स्वर्गीय तीर्थस्वरुप माणिक बाबा डोमाळे आज हयात नाहीत अन् माझा अती प्रिय बालमित्र स्वर्गीय आप्पासाहेब सूराशे देखील हयात नाही..! पण त्यांच्या आठवणीतील ही श्रध्येय परंपरा मी जपून ठेवली आहे. आणि तीच श्रद्धेय आठवणीतील परंपरा निदान आज तरी मुलं सांभाळून आहेत, बाकी मुलं, ही श्रध्येय परंपरा पुढे सुरू ठेवतील की नाही, माहीत नाही..!


कोणत्याही सुखद आठवणीतील श्रद्धेय परंपरा ,आपल्या सांस्कृतिक वारस्याला पवित्र आठवणीने पुढे नेत असतात. जसे की माझ्या आठवणीतील, संध्याकाळी दिवे लावते वेळी म्हणण्याची श्रद्धेय परंपरा...

" राम, राम..!" 🙏


वंदे मातरम्...!


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : ११/८/२०२०, मंगळवार, गोकुळाष्टमी.

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

विजय वैजिनाथ गायकवाड, माझ्या आयुष्याचा साक्षीदार..!





" आमचे गाव , आमची माणसं..!"
                         
विजय वैजिनाथ गायकवाड, माझ्या आयुष्याचा साक्षीदार..!
======================================

 विजय  हे नाव ऐकल्याबरोबर विजुचे आम्ही बालमित्र सोडून त्याच्या इतर मित्रांना मुकुल आनंद दिग्दर्शित " अग्निपथ " चित्रपटातील विजय दीनानाथ चव्हाण या व्यक्तिरेखेतील " काही गुणांचा " पदोपदी अनुभव येत असेल..!अर्थात आम्हा बालमित्रांनाही विजू मधील    " विजय दीनानाथ चव्हाण " म्हणून भेट झाल्यावर कधी..कधी अनुभव येतो..! विजू मध्ये " विजय दीनानाथ चव्हाण " या व्यक्तिरेखेतील काही गुणवैशिष्ट्ये उतरली आहे..जसे..आक्रमकता,निर्भिडता, रूबाब,स्वतःचे विश्व स्वतः उभारणे,हे विश्व उभारतांना आप्तस्वकीयांना संरक्षण,सेवा व समर्पण निर्विकारपणे पुरविणे हे विजूने "  विजय दिनानाथ चव्हाण " च्या व्यक्तिरेखेतील गुणांसारखे गुण आजतागायत जपलेले आहे..!

विजय दिनानाथ चव्हाण ने आपले ध्येय साध्य करण्यासाठी खूप गोष्टींचा ,मोहपाशांचा त्याग केला  होता,अगदी विजूनेही तसाच त्याग केलेला आहे..!आपली भावंडे,त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात स्थिर होऊन यशस्वी होण्यामध्ये विजुचा हा त्याग मी पाहिलेला आहे..!काहीजण त्याच्या त्यागाकडे दुर्लक्ष करतात.कदाचित विजूच्या आक्रमक स्वभावामुळे त्याचा त्याग जाणवत नसेल..! किंवा अशी आक्रमक माणसं कशाची त्याग करतात..?या मनोवृत्तीमूळे काहींना तो लक्षात येत नसेल...बहुधा..!मुळात कमालीची आक्रमकअसलेली माणसं भावनेच्या बाबतीत कमालीची भावूकही असतात..! विजू,दार्शनिक अंगाने जरी आक्रमक दिसत असला तरी तो भावनेच्या बाबतीत अंतर्मुख होणारा माणूस आहे..!

एखादी व्यक्ती,लेखक,चित्रपट,चित्रपटातील व्यक्तिरेखा,इ.अनेक बाबतीत विजूने त्याची भावुकता जपलेली आहे.मग व.पू. काळेंचे लेखन असो,अभिनेत्री रेखाचे सौंदर्य असो, ओशोंचे विचार असो,अथवा शक्ती सामंत दिग्दर्शित " शक्ती " हा हिंदी चित्रपट असो या सर्वांवर विजूने स्वतपेक्षा काकणभर जास्त प्रेम केले आहे..!

हा माझा बालमैत्रीचा त्याच्या सोबतचा असलेला सजीव अनुभव सांगतो..! माझ्या आयुष्यात बालमित्रांनी मला खूप काही भरभरून दिले आहे..! विशेषतः डॉ.गणेश वाणी,डॉ.संजय राऊत,आण्णासाहेब म्हस्के व विजू..आणि हे आमचे सर्व बालमित्र जाणतात..!इतरही मित्रांचे माझ्या आयुष्यात खूप योगदान आहे.कोंदणात गोंदून ठेवावे असे हे बालमित्र..!

मी,सार्वजनिकरीत्या सांगू इच्छितो की, या मित्रांनी माझ्या घरात कायमचे जरी वास्तव्य केले तरी तो माझा आयुष्याचा कृतार्थाने भरलेला सर्वार्थ असेल..! वास्तविक विजू व माझ्यात बऱ्याच बाबतीत विचारधारा भिन्न आहेत.पण त्या जिथे जुळलेल्या आहेत,त्यावर आम्ही दोघांनीही भरभरून प्रेम केले आहे व करत राहणार..! प्रिय बालमित्र विजू,माझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाचा साक्षीदार आहे..!

आमचा बालमित्र विष्णु  एकनाथराव  पगार (ह.मु.औरंगाबाद)आम्हाला
" दोन ध्रुव " म्हणतो..!तरी देखील आम्ही खूप जिवलग मित्र आहोत..!

" विजय गायकवाड "  हे पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक नामांकित नाव आहे..!

विजू तुला जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

वंदे मातरम्..!

ता.क. मित्र फक्त कौतुकी नसावेत,तर एकमेकांचे गुणदोष दाखविणारे असावेत.तसेच भिन्न विचारधारा असूनही जुळणाऱ्या धारांवर नितांत प्रेम करणारे असावेत.. दोन्ही बाजूंनी..!
उदा.विजू व माझ्यासारखे..!

लेखक व विजुचा बालमित्र: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

 दि.३ ऑगस्ट २०१७