मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
जन सहयोगाची गोड गोड दिवाळी..!
===============================
माणसाच्या आयुष्यात अनेक प्रसंग, व्यक्ती अन् त्याच प्रसंगाच्या अन् व्यक्तीच्या भाव विश्वात डोकावून पाहणारी मनं जेंव्हा कुणाला आपलंसं करतात, तेंव्हा प्रेमळ हृदय खुदकन हसायला लागते. ज्या मायेनं ओथंबून भिजलेल्या अतिशय सर्व सामान्य परिस्थितीतील भावूक अन् कष्टाळू मनाचा आनंद द्विगुणित होतो तेंव्हा खऱ्या गोड गोड दिवाळीची चाहूल अन् अनुभूतीही आपसूक येते.अशा कष्टाळू मनाला जेंव्हा कुणीतरी आपली बहीण समजून, आपल्याच कुटुंबातील सदस्य समजून अगदी मनापासून गोडधोड काहीतरी देतो तेंव्हा अजूनही जाणीवा जिवंत असणाऱ्या मनात प्राण आहे याची प्रचिती येते.
जन सहयोग सामाजिक संस्था छत्रपती संभाजीनगर येथील सदस्यांनी छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद )परिसरात हजारो वृक्षांचे रोपण व संवर्धन केलेले आहे. अर्थात दुष्काळाचा शिक्का बसलेल्या मराठवाड्यात असे कार्य उभे करणे जरा कठीणच होते. मात्र ध्येयवेडी माणसं अजूनही या भूतलावर कुठे ना कुठेतरी आपले कार्य निष्काम कर्मयोगी भावनेने सामाजिक उत्तरदायित्व निभावत असतात. त्याचं सर्वोत्तम उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या जन सहयोग सामाजिक संस्थेचे प्रगल्भ नेतृत्व तथा जिवलग मित्र प्रशांत भाऊ गिरे होय.
अनेक सामाजिक संस्था कार्यरत असतात.अनेकांचे कार्यही कौतुकास्पद असते. मात्र कौतुकास्पद कार्याला जेंव्हा निष्काम कर्मयोगी भावनेने जपलं जातं तेव्हा फार मोजक्या सामाजिक संस्था खऱ्या अर्थानं आपलं सामाजिक उत्तरदायित्व निभावत असतात. यासाठी जन सहयोग सामाजिक संस्था नक्कीच कौतुकास पात्र आहे. कोविडचा कालखंड असो की, रणरणत्या उन्हात पाण्याची टंचाई.या सर्व संकटावर मात करत जन सहयोग सामाजिक संस्थेने हजारो देशी वृक्षांना जपलं, वाढवलं आहे. आता हेच कार्य छत्रपती संभाजीनगरचे सिमोलंघन करून सुरू आहे. हे काम करत असताना जाणीव जागृत ठेवून कार्य केल्या गेले हे अत्यंत महत्त्वाचे कार्य ठरले आहे. जाणीव ठेवून जेंव्हा एखादं कार्य होते, तेंव्हा विधात्याचे खरे अस्तित्व त्या सर्व सामान्य परिस्थितीतील मनांत दिसून येते.
उद्यापासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होणार आहे. दिवाळीच्या सणात स्री शक्तीचे पूजन अन् त्याच स्री शक्तिकडून पुरुषाचे औक्षण करण्याची आपल्या महान संस्कृतीची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. विधात्याने या भूतलावर निर्माण केलेली सर्वात पवित्र शक्ती स्री आहे. स्रीचेच अस्तित्व आपल्याला विविध सण , उत्सव परंपरा इत्यादी आनंदोत्सव साजरा करायला प्रवृत्त करत असते. त्या आनंदात आपण स्री शक्तीचे पूजन, दर्शन, सेवा इत्यादी ऋणानुबंध जोडणारे मानवी मूल्य जोपासत आलेलो आहोत. आज दिनांक २७/१०/२०२४, रविवार रोजी जन सहयोग सामाजिक संस्थेने आपले नैतिक मूल्य अजून उंचावत दिवाळीच्या पूर्व संध्येला स्री शक्तीला वंदन करून गोडधोड देऊन अन् खऱ्या लक्ष्मीला , लक्ष्मी देऊन सन्मानित केले आहे. या सर्वोत्तम नैतिक उपक्रमाचे श्रेय जाते ते आमच्या जन सहयोग सामाजिक संस्थेचे प्रमुख अन् जिवलग मित्र प्रशांत भाऊ गिरे यांना..!
जन सहयोग सामाजिक संस्थेचे कार्य उभे करण्यात अतिशय सर्व सामान्य परिस्थितीतील महिलांचे देखील योगदान राहिलेले आहे. कोणत्याही कार्याला जेंव्हा रूपडं येते, तेंव्हा त्या रूपडं आलेल्या कार्याला त्याच्या बाल्यावस्थेत मायेने जोपासणाऱ्या मनाला न विसरणारी माणसं जन सहयोग सामाजिक संस्थेच्या परिवारात आहे याचा सार्थ अभिमान वाटतो.अत्यंत सर्व सामान्य परिस्थितीतील माता भगिनींना दिवाळीच्या पूर्व संध्येला भाऊबीज म्हणून दिलेली जाणीव असलेली कष्टाची लक्ष्मी अन् गोडधोड वस्तू श्रद्धेने भेट दिल्या. तेंव्हा हजारो वृक्षांना मनापासून आनंद नक्कीच झाला असेल. आपापल्या कुटुंबासाठी खऱ्या लक्ष्मी असणाऱ्या अनेक लक्ष्मींच्या भावूक मनात मायेचा ओलावा निर्माण झाला. आपला कुणीतरी श्रद्धेने सन्मान करत आहे ही भावना त्या सर्व माय माऊलींना सुखावून गेली. माझ्यामते मध्यमवर्गीय किंवा उच्चवर्गीय सामाजिक वातावरणातील स्री अन् पुरुषांचा कुणी सन्मान केला तर ती सन्मानित होणारी व्यक्ती आनंदित नक्कीच होत असेल, मात्र हृदयातून फारशी काही आनंदाने भावविभोर होत नसते.त्याचं कारण कळत नकळतपणे कधी ना कधीतरी कुणी ना कुणीतरी अशांचा सन्मान समाज करत असतो. यामुळं सन्मानाच्या या बाबी अशांच्या आयुष्यात कधीतरी येऊन गेलेल्या असल्यामुळे मनाच्या सवयीचा भाग होऊन जातात. याउलट अत्यंत सर्व सामान्य परिस्थितीतील स्री अन् पुरुषांचा जर कुणी यथोचित सन्मान केला तर अशी मने आनंदाने अत्यंत भावविभोर होतात. आपलाही कुणीतरी श्रद्धेने सन्मान करतो आहे ही बाब अशांच्या आयुष्यात पहिल्यांदाच घडते, आपलीही कुणीतरी दखल घेत आहे, आपल्यातील आर्थिक, सामाजिक न्युनगंड अवस्थेला दूर करून कुणीतरी आपल्याला, सन्मानित करत आहे हा भाव खऱ्या अर्थानं सर्व सामान्य परिस्थितीतील मंनाना अत्यंत सुखावून जातो. त्यात जर सन्मानित होणारी अत्यंत सर्व सामान्य परिस्थितीतील स्री असेल तर तिच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या जातात.याची प्रचिती आज जन सहयोग सामाजिक संस्थेच्या वतीने सर्व सामान्य परिस्थितीतील स्री शक्तीचा सन्मान करताना जाणवली. स्री ही भावनेची देवता आहे याची जाणीव होते.
दिवाळी भेट गोडधोड सोहळ्यात आम्ही जन सहयोग सामाजिक संस्थेतील सर्व सदस्य मोठ्या गोडधोड मनाने सहभागी झालो होतो.
होणारच..! त्याचं कारण, आमचा कुटुंब प्रमुख मधासारखा गोड गोड आहे. नाव त्याचं प्रशांत भाऊ गिरे..!
ता.क. - सर्व सामान्य परिस्थितीतील अनुभवलेल्या जाणीवा, जिवंत असे पर्यंत जिवंत असतात.
असो, सर्वांना जन सहयोग सामाजिक संस्थेच्या वतीने दिवाळी निमित्त मनःपूर्वक गोड गोड शुभेच्छा..!
स्थळ - शेळी मेंढी प्रक्षेत्र परिसर पडेगाव - छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
वंदे मातरम् 🌳
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
(सदस्य - जन सहयोग सामाजिक संस्था छत्रपती संभाजीनगर. )
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक: २७/१०/२०२४, रविवार



