मला प्रवासात भेटलेली माणसं..!©️
" ये बनारस हैं..! "
" मोक्षनगरी काशी..!"
( भाग क्रमांक -१ )
===================================
उस्ताद बिस्मिल्ला खाँ साहेब यांच्या सुमधुर शहनाई चे स्वर , बनारसी पानाचा स्वाद, बनारसी शालूची मायेचं परिधान अन् परम पिता महादेवाच्या पदोपदी जाणवणाऱ्या अस्तित्वाची नगरी म्हणजेच बनारस..! तिला कुणी वाराणसी म्हणते, कुणी बनारस म्हणते तर कुणी काशी म्हणते..! प्रत्येक नावात उस्ताद बिस्मिल्ला खाँ साहेब यांच्या सुमधुर शहनाई चे स्वर ऐकू येऊन बनारसी पानाच्या, स्वादिष्ट मिठाईच्या स्वादातून बनारसी शालूचे वस्त्र परिधान करून अंतर्मन सर्वात शेवटी त्या परम पित्या काशी विश्वनाथ महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन जाते..!🙏🏻 अशा दुर्मिळ अस्तित्वाच्या स्वरूपाची जाणीव हीच काशी विश्वनाथ नगरी सतत करून देत राहते, तिथं पदस्पर्श करणाऱ्यांना, जसे की मला ही जाणीव सदैव होत राहिली..!
माणसांची गर्दी अन् अरुंद गल्ली यांचं अन् काशीचे अतूट नाते आहे. वाराणसीच्या गर्दीतील प्रत्येक माणूस, हा आपल्याला आपल्या श्रद्धेय संवेदना सतत जागृत करत असतो. वाराणसीतील माणसांच्या गर्दीत माणसाचा धर्म दिसत असतो, अन् त्या प्रत्येक माणसांमध्ये धर्माचा अधिपती भोलेनाथ शंकर सतत जाणवत असतो. भोलेनाथ शंकर म्हणजे आयुष्याचं वैराग्य..! ते वैराग्य अनेक तपस्वींच्या सजीव देहाच्या रुपात काशीत पदोपदी दिसत असते.
उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचं मनोमिलन होते ते काशीलाच..! उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्या त्रिवेणी मनोमिलनाशिवाय माणसाच्या आयुष्याचा पूर्णविराम होऊच शकत नाही. उत्पत्ती, स्थिती आणि लय या त्रिकुटांपैकी काशीची ' लय ' या शाश्वत सत्यावर कमालीची श्रद्धा..! वाराणसीच्या गर्दीतील फिरत असताना, बऱ्याचदा अनेक मानवी देह मृत पावून कुणीतरी त्यांचं सारथ्य करून राजा हरिश्चंद्राच्या घाटावर , मनकर्निकेच्या घाटावर श्रद्धेने नेताना दिसत असतात. आम्ही स्वतः वाराणसीच्या गर्दीतून फिरत असताना त्याच गर्दीतून वाट काढत जाणाऱ्या अंत्ययात्रा बघितल्या अन् काशीला मोक्षनगरी का म्हणतात हे पटत गेले. जी अंत्ययात्रा राजा हरिश्चंद्राच्या घाटावर , मनकर्निकेच्या घाटावर श्रद्धेने जाताना दिसत असते, त्या मृत देहाला खांदा देण्यासाठी कुणीही पुढे येते अन् त्या मृत देहाला अग्नीच्या स्वाधीन करून दिल्या जातं..! कित्येक धनाढ्य माणसं, आयुष्याच्या अंतिम समयी याच काशी नगरीत येतात अन् शिवशंकराच्या स्मशानात स्वतच्या देहाला अर्पण करतात. राजा हरिश्चंद्राच्या घाटावर , मनकर्निकेच्या घाटावर श्रद्धेने अखंडपणे मानवी मृतदेहाचे अंत्यसंस्कार होत असतात.
भोलेनाथ शंकर म्हणजे स्मशानातील वैराग्य अन् वैराग्य हेच माणसाचं अंतिम सत्य..! ज्या स्मशानाला माझ्या सारखा सर्व सामान्य माणूस भिऊन जगत असतो, त्याच स्मशानात आपलं वास्तव्य अन् अस्तित्व शोधणारा भोलेनाथ शंकर..! आम्ही ज्यावेळी वाराणसीच्या गर्दीतून फिरत होतो त्यावेळी त्याच गर्दीत माणसांचा निवांतपणा दिसत होता.काही वाचकांना प्रश्न पडला असेल की, गर्दीत माणसांचा निवांतपणा कसा काय असू शकतो..? तर माझ्या मते जी माणसं गर्दीत आपला निवांतपणा शोधत असतात, ती माणसं जीवन जगण्याची कला शिकलेली असतात.जशी एकांतात जीवन जगण्याची कला प्राप्त होते, त्याच प्रमाणे माणसांच्या गर्दीत देखील माणसात माणूस शोधल्यावर नक्कीच प्राप्त होते. काशीच्या गर्दीतून हिंडताना कोणत्यातरी ईश्वरीय अनुभूतीच्या सहवासात असल्याचा ईश्वरीय आनंद नक्कीच मिळतो. गर्दीच्या गोंगाटात देखील स्वतच्या अस्तित्वाला त्या वैराग्याच्या अस्तित्वासमोर अंतर्मनातून नतमस्तक होऊन नतमस्तक व्हावंसं वाटतं..! त्यात सोबत सदैव तीच आदीशक्ती असते जिचा स्वामी भोलेनाथ शंकर असतो..!
आयुष्याचं खरं वैराग्य प्राप्त केलेली , खरं साधुत्व प्राप्त झालेली माणसं याच काशीत आपली हयात व्यतीत करत असतात.त्यापैकी कुणी भोलेनाथ शंकराची आराधना करत असतो, कुणी शहनाईच्या सुमधुर स्वरांची आराधना करत असतो तर कुणी जनता जनार्दनाची सेवा करण्यासाठी ' हम रहे ना रहे, भारतमाता तेरा वैभव अमर रहे ' हे ब्रीद अंगिकारून स्वतः जनतेचं प्रतिनिधीत्व करत असतो..!🙏🏻
हर हर महादेव..!🕉️
वंदे मातरम्..!
लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - ३०/१/२०२२, रविवार.
क्रमशः

