बुधवार, २३ नोव्हेंबर, २०२२

खूप समंजस व्यक्तिमत्व डॉ. अरुण साळे साहेब..!


 


मला प्रवासात भेटलेली माणसं..!©️


खूप समंजस व्यक्तिमत्व डॉ. अरुण साळे साहेब..!


===================================


आज दिनांक २३/११/२०२२ रोजी माझी जन्मभूमी पालखेड ता. वैजापूर , जि. छ्त्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील ग्राम दैवत श्री. पारेश्वर महादेव यांची कार्तिकी यात्रा होती. यात्रेला दरवर्षी गेलो की, गावातील काही घरं आहेत ज्याठिकाणी गेल्याशिवाय गावाला भेट दिल्याचे आत्मिक समाधान लाभत नाही. त्यातलं एक घर माझा खूप जिवलग बालमित्र डॉ.संजय राऊत अन् बाळू माळी यांचं..! 


आज याच ठिकाणी माझे बालपणीचे कौटुंबिक डॉ. आदरणीय अरुण साळे साहेब यांची भेट झाली. ( माझ्या डाव्या बाजूला उभे असलेले ) लहानपणी मला काहीही आजारपण आले की, आदरणीय डॉ. साळे साहेब माझी तपासणी करायचे अन् हळूच गोड गोड बोलत सुई टोचून द्यायचे. सुई टोचून झाल्यावर समजायचे सुई टोचून झाली म्हणून..! त्यावेळी डॉ. साहेबांचा हात आईच्या हातासारखाच जाणवायचा. माझी धन्वंतरी देवतेला प्रार्थना असेल की, या पृथ्वीवरील समस्त डॉक्टरांच्या हातात डॉ. साळे साहेबाच्या हातातील सुई टोचण्याचे आईपण येवो हीच प्रार्थना..! अर्थात यात माझा थोरला मुलगा चि. नमन देखील आला,कारण त्यालाही भविष्यात येणाऱ्या रुगांना सुई टोचायची आहे.


आमच्या घरी कुणी आजारी पडले की, घरातला कुणीतरी सदस्य आदरणीय डॉ.साळे साहेबांच्या घरी निरोप द्यायला जायचा. डॉ. साळे साहेब त्यांची जी पेटी होती ती एकतर स्वतः घेऊन यायचे किंवा घरातील सदस्य ती पेटी घरी घेऊन यायचे.घरी आल्यावर त्यांच्या पेटीतील सुई बाहेर काढायचे.घरात गरम करायला ठेवलेल्या पाण्यात ती सुई टाकायचे. जेणेकरून ती सुई निर्जंतुक व्हावी..! कधी कधी डॉ. साळे साहेब त्यांच्या घरूनच सुई निर्जंतुक करून आणायचे. खूप प्रामाणिक व्यक्तिमत्व..!


 डॉ. साळे साहेब अतिशय शांत स्वभावाचे अन् आजच्या आमच्या वयोगटात आमच्याच वैचारिक बैठकीतील आहेत. अगदी भिन्न भिन्न रंगाच्या गप्पांचा फड यांच्याशी आम्हा काही बालमित्रांचा रंगतो.त्यात आम्ही आमच्या वयोगटाच्या पेकटात लाथ घालतो अन् निख्खळ मैत्रीचा आनंद लुटतो. खूप मॅच्युरिटी असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. साळे साहेब..!


मी आमच्या पालखेड गावातील काही व्यक्तींच्या अजातशत्रू असणाऱ्या स्वभावाच्या निख्खळ प्रेमात आहे. त्यात मला जाणवलेले खूपच शांत अन् अजातशत्रू व्यक्तिमत्वे म्हणजे तीर्थस्वरुप पारसनाथ पाटील मुलमुले साहेब, डॉ.साळे साहेब अन् स्वर्गीय सादेक चाचा बागवान होय.यातील स्व. सादेक चाचा बागवान यांचं व्यक्तीमत्व खूपच शांत श्रेणीतील नव्हते, तर खूप हसरे अन् खेळकर स्वभाव त्यांचा होता. अजातशत्रू मात्र नक्कीच होते.


आदरणीय डॉ. साळे साहेब यांच्याकडे बजाज M 80 दुचाकी गाडी होती. इतक्या कमी वेगात अन् आयुष्यात कधीही न चुकलेली ड्रायव्हिंग केली ती डॉ. साळे साहेब यांचीच..! मर्यादित वेग अन् संयमित ड्रायव्हिंग हे डॉ.साळे साहेबांचं वैशिष्टय होते.यावरूनच त्यांच्या स्वभावाचा अंदाज येतो. त्याकाळी ग्रामीण भागात डॉ. व्यवसायात फार काही आर्थिक स्थैर्य नसायचे. आहे त्या आर्थिक परिस्थितीत आदरणीय डॉ. साळे साहेब यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना अमोल अन् महेश यांना योग्य ते नैतिक अन् औपचारिक शिक्षण दिले.आज त्यांची मुलं आपापल्या आयुष्यात स्थिरावलेली आहेत.


कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव हा त्याच्या देहबोलीतून अन् सार्वजनिक आयुष्यातील वर्तनावरून सहज लक्षात येतो असे मला वाटते. आदरणीय डॉ. साळे साहेब यांचा स्वभाव हा त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील वर्तनातून आम्हाला सहजपणे लक्षात येते असायचा. एखाद्या पुरुषाच्या सर्वांनी प्रेमात पडावं असं प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय डॉ. अरुण साळे साहेब होय..!


काही वर्षांपूर्वी आदरणीय डॉ. साळे साहेब प्रभू श्रीरामाचे मंदिर असलेल्या श्रीरामपूर येथे स्थायिक झाले आहेत.विशेष म्हणजे त्यांचं तिथं स्थायिक होणं वैयक्तिक माझ्यासाठी खूप हृदयस्पर्शी आहे,कारण याच श्रीरामपूर गावात साठच्या दशकात माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांनी मराठा बोर्डिंग मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कमवा व शिका ब्रीद अंतर्गत स्वतः ला आयुष्यात सिद्ध केले होते. घरून काहीही आर्थिक पाठिंबा नसताना जमेल ती कामे करून माझ्या स्व. वडिलांनी  जी साक्षरता प्राप्त केली होती त्या मागे याच श्रीरामपूर गावाचे कळत नकळतपणे योगदान होते. या भावूक संदर्भाने आदरणीय डॉ. साळे साहेबांचं माझ्या आयुष्यात माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांच्या सारखे श्रद्धेचे स्थान आहे..!🙏🏻


असो, आदरणीय डॉ. अरुण साळे साहेब आज तुमची भेट झाली अन् माझ्या आयुष्यातील गतकाळातील अनेक भावूक क्षणांना हिंदोळा मिळाला.शेवटी माणसाचे मन तरी काय असते हो..?

फक्त आणि फक्त गतकाळातील आठवणींना उजाळा देऊन आजच्या वर्तमानकाळात जगून भविष्याची नांदी सुरू करणारे आयुष्यच..! दुसरं काहीही नाही..!


वंदे मातरम्..!

हर हर महादेव..!🙏🏻🕉️🙏🏻


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : २३/११/२०२२, बुधवार, कार्तिकी अमावस्या


सोमवार, ७ नोव्हेंबर, २०२२

वेलू नायकन - कमल हसन सर..!





 


चिंतन ©️


वेलू नायकन - कमल हसन सर..!


==============================


माझ्या मते संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्व कलाकारांमध्ये आता पर्यंत फक्त एकाच अभिनेत्याने सर्वोत्तम अभिनय केलेला आहे. त्या अभिनयासाठी त्या अभिनेत्याला इ. स.१९८७ साली राष्ट्रीय पुरस्कार देखील प्राप्त झाला होता. एवढंच नव्हे तर त्याच सर्वोत्तम अभिनयाच्या बळावर तो चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आला होता. 


तो चित्रपट होता वेलू नायकन..! मूळ तामिळ भाषेत होता. नंतर हिंदीत डब करण्यात आला होता. अभिनेता होता भारतीय चित्रपटसृष्टीत अभिनयाचा चौरंगी चिरा ग्रेट कमल हसन सर, अन् या चित्रपटाचे दिग्दर्शक होते ग्रेट  मणिरत्नम सर..! भारतीय चित्रपटसृष्टीत असे काही चित्रपट आहेत,ज्यांनी त्यांच्या प्रदर्शनानंतर त्याच विषयाला अनुसरून इतर अनेक चित्रपटांची नांदी सुरू केली. त्यात कमल हसन सर अन् मणिरत्नम सर यांच्या वेलू नायकन या चित्रपटाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. तो यासाठी करावा लागेल की, वेलू नायकन चित्रपटात ज्या पद्धतीने एका डॉन ची कथा सादर करण्यात आली होती, त्याच धर्तीवर थोडाफार बदल करून तिथून पुढे अनेकानेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. आता हीच जोडी पुन्हा एकदा तब्बल पस्तीस वर्षांनी पुन्हा सोबत येत आहे.KH 234 या चित्रपटात. हा चित्रपट इ. स.२०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. 


कमल हसन यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी अनेकानेक सर्वोत्तम चित्रपट केले. कमल हसन सर यांच्या चित्रपटसृष्टीतील संपूर्ण कारकिर्दीचा सारांश याच वेलू नायकन या चित्रपटात दडलेला आहे. वेलू नायकन या चित्रपटात कमल हसन सर यांनी तरुण, उमदा तरुण, प्रौढ, वार्धक्यात झुकलेल्या व्यक्तीची, व्यक्तिरेखा आपल्यातील सर्वोत्तम अभिनयाच्या बळावर लीलया पेललेली आहे. वेलू नायकन या चित्रपटात तर काही प्रसंग असे आहेत की, ज्यात कमल हसन सरांनी काहीही संवाद व्यक्त न करता ,फक्त आपल्या देहबोलीतून, आपल्यातील सर्वोत्तम अभिनयाच्या बळावर ते प्रसंग तिथून पुढील पिढीसाठी उत्तम पाठ म्हणून जिवंतपणे उभे करून ठेवलेले आहेत. संपूर्ण वेलू नायकन चित्रपटात कमल हसन सर सर्वोत्तम आहेत, त्यातल्या त्यात दोन प्रसंगात कमल हसन सर का म्हणून ग्रेट आहेत हे मान्य करावेच लागते.त्यातील पहिला प्रसंग पुढील प्रमाणे होय..


ज्यावेळी डॉन वेलू  नायकन पोलीस अधिकाऱ्याला त्याच्या घरी त्याला दम द्यायला येतो. त्यावेळी बैठक खोलीत कुणीही नसते. पोलिस अधिकाऱ्याच्या घरी आल्यावर बैठक खोलीत असलेला फोटो बघतो. त्या फोटोत  त्याच पोलीस अधिकाऱ्याची पत्नी , त्याची मुलगी असते. हे बघून स्तब्ध होतो.तो पर्यंत त्याला माहीत नसते की त्याची मुलगी या पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आहे म्हणून. इतक्यात दुसऱ्या खोलीतून लहान मुलाचा आवाज ऐकू येतो.  बैठक खोलीत त्याची मुलगी जी पोलीस अधिकाऱ्याची पत्नी असते ती येते. वेलू नायकन त्यावेळी आपल्या नातवाला काहीतरी आनंदाने द्यावे यासाठी आपल्या जवळ देण्यासाठी काहीतरी आहे का हे बघतो. त्याची मुलगी आपल्या मुलाला काहीही देऊ नका असे भाव व्यक्त करते.त्याचवेळी ग्रेट कमल हसन सर यांनी जो सर्वोत्तम अभिनय एक शब्दही व्यक्त न करता फक्त आणि फक्त आपल्या देहबोलीतून व्यक्त केला आहे तो सदा सर्वदा सर्वोत्तम आहे.


वेलू नायकन या चित्रपटात कमल हसन सरांच्या सर्वोत्तम अभिनयाचा जिवंत दाखला असणारा दुसरा  प्रसंग म्हणजे चित्रपटाच्या सर्वात शेवटी,त्यांना भेटायला त्यांचा नातू आलेला असतो त्यावेळचा होय. हॅट्स ऑफ टू यू ग्रेट कमल हसन सर..! 


थोडक्यात वेलू नायकन हा चित्रपट श्रीमद्भगवद्गीतेचा सार व्यक्त करतो. तुम्ही जसे कर्म कराल, तसेच फळ तुम्हाला भोगावेच लागेल. भले तुम्ही नियतीच्या फेऱ्यात अडकून चूक केली असेल किंवा गुन्हा केला असेल, तरी देखील तुम्हाला याच मनुष्य जन्मात त्याचं प्रायश्चित्त भोगावेच लागले. यातून कुणालाही सुटका नाहीच..!


ग्रेट कमल हसन सर यांनी विविधांगी भूमिका कारकीर्दीत केल्या आहेत.त्यात प्रामुख्याने अप्पू राजा, पुष्पक ( हा मूकपट आहे) , हे राम, सदमा, अलीकडच्या काळातील विक्रम इत्यादी अनेकानेक चित्रपटात त्यांनी आपल्यातील सर्वोत्तम अभिनयाला रसिक माय बापांच्या समोर प्रस्तुत केलेले आहे.


असो,आज याच अष्टपैलू अभिनेत्याचा म्हणजेच वेलू नायकन ग्रेट कमल हसन सर यांचा जन्मदिन आहे.

( ज. दि. ७/११/१९५४ ) त्यानिमित्त या महान अभिनेत्याला माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा..!

🌹🙏🏻


ता.क. : मी , हिंदीत डब करण्यात आलेल्या वेलू  नायकन चित्रपटाची DVD, एकोणाविस वर्षांपूर्वी थेट लासूर स्टेशन येथून रेल्वेने जाऊन, भाग्यनगर ( हैद्राबाद ) येथे खरेदी केली होती. त्यावेळी आजच्या सारखी, तांत्रिक उपलब्धता सहज नव्हती. त्यावेळी वेलू नायकन चित्रपटाची  DVD परिसरातील उपलब्ध नव्हती.


वंदे मातरम्


एक रसिक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : ७/११/२०२२, सोमवार.

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०२२

" विश्वासाचे दुसरे नाव प्रिय विद्यार्थी गणेश..!"


 

मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


" विश्वासाचे दुसरे नाव प्रिय विद्यार्थी गणेश..!"


=====================================


विश्वास अन् माणूस या दोन शब्दांच गारूड एवढं मोठं आहे की, याच विश्वासाच्या बळावर माणसाच्या आयुष्यात नात्यांना बहर येत असतो. हा असा बहर असतो, ज्याला पतझड माहीत नसते. विश्वासाने निर्माण होणाऱ्या नात्यात भोलेनाथ शंकराच्या रुपातील पवित्र श्रावणातील हिरवळ नेहमी शोभून दिसत असते. श्रावणातील हिरवळीने जशी आपली वसुंधरा सजलेली दिसते, अगदी तसेच विश्वासाच्या मानवी नात्यात देखील अशी हिरवळ शोभून दिसते. एखाद्या व्यक्तीचा विश्वास संपादन करणं सोप आहे,पण तोच विश्वास टिकून ठेवणं, त्या विश्वासाला चिरंतन अमरत्व प्राप्त करून देणे ही फार मोठी गोष्ट आहे. निदान माणसांच्या सध्याच्या गुंतागुंतीच्या आयुष्यात तरी विश्वास ही एक फार मोठी तपश्चर्याच आहे असे मला वाटते.


मला शिक्षक म्हणून सेवा करत असताना सत्तावीस वर्षे झाली. या सेवेच्या आयुष्यात बहुतांशी विद्यार्थी चांगले लाभले. अर्थात काही असेही लाभले , ज्यांना बघून आपला आपण निमूटपणे रस्ता बदलून पुढे जावे. मात्र जे जे विद्यार्थी चांगले लाभले त्यात त्या त्या विद्यार्थांनी प्राप्त केलेली नैतिक आचरणाची जी तपश्चर्या प्राप्त केली होती त्याचं ते फळ होते. अशा अनेकांनी स्वतः ला समाजात आहे त्या परिस्थितीत सिध्द केले.यात अग्रस्थानी आहे माझा खूप आवडता प्रिय विद्यार्थी गणेश नानासाहेब पाटील गाजरे होय..!


मी इ. स.१९९९ मध्ये जि.प.प्रा.शा. हडस पिंपळगाव, कें. लासुरगाव,ता. वैजापूर जिल्हा - छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे पूर्वीच्या शाळेतून बदली होऊन हजर झालो होतो. संत जनार्दन स्वामी मौनगीरी महाराजांच्या अध्यात्मिक विचारांचा प्रभाव हडस पिंपळगावच्या नागरिकांवर खूप मोठा होता. अर्थात माझेही जन्मगाव पालखेड येथे आमच्याच घराच्या समोर संत जनार्दन स्वामी मौनगीरी महाराज आश्रम अन् श्री. पारेश्र्वर महादेवाचे मंदिर असल्याने या गावाशी माझी वैचारिक नाळ पटकन जुळली. येथील शाळेत इयत्ता सातवी मध्ये गणेश नानासाहेब गाजरे हा शिकायला होता. 


गणेश नानासाहेब गाजरे हा अभ्यासात फारसा हुशार नव्हता , पण प्रत्येक विद्यार्थ्याला जिथं खरं हुशार असायला हवं त्या नैतिक आचरण अन् अत्यंत विश्वासू या नैतिक मूल्यांच्या बाबतीत खूप श्रीमंत होता. अर्थात आजही आहे..! हडस पिंपळगाव येथील शाळेत लाभलेले सर्वच विद्यार्थी खूपच चांगले होते,पण ज्या विद्यार्थ्याने माझ्या स्व. वडिलांचे मन जिंकले होते त्यात बबन हजारे ( जळगाव, ता. वैजापूर ) या प्रिय विद्यार्थांच्या नंतर ते स्थान फक्त गणेश नानासाहेब गाजरे यानेच प्राप्त केले होते. त्याचं कारणही तसंच होतं. ज्यावेळी आपल्या पश्चात एखादा व्यक्ती आपल्या आई वडिलांची काळजी घेतो, त्यांची सेवा करतो अशी माणसं ही नियतीने आपल्या आयुष्यात पाठवलेली त्याच ईश्वरीय शक्तीचा अंश असतात या मताचा मी आहे.या माझ्या विचारला पुष्टी देणारे वर्तन प्रिय विद्यार्थी गणेश नानासाहेब गाजरे याचे माझ्या स्व. आई वडिलांच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत राहिले. विशेषतः माझ्या स्व. वडिलांचा दशक्रिया विधी जो की, कायगाव ता. गंगापूर येथे गोदावरी नदीच्या तीरावर केला होता.त्या विधीची, तिथल्या व्यवस्थेची जबाबदारी याच माझ्या खूप आवडत्या विद्यार्थ्याने , गणेशने खूप जबाबदारीने पार पाडली होती. तो प्रसंग अन् ती सेवा माझ्या स्व. वडिलांना प्रत्यक्ष कृतीतून अर्पण केलेली एक सर्वोत्तम श्रद्धांजलीच होती. यापेक्षा एखाद्या व्यक्तीचे थोरपण अजुन काय असू शकते..! ती थोरवी गणेशची नक्कीच आहे.


मी इ. स. १९९९ मध्ये इयत्ता सातवी वर्गाला शिकवायला असताना अभ्यासावरुन एकदा माझ्याकडून गणेशला छडी हातावर जोरात लागली. त्यात त्याला जखम देखील झाली होती. शाळा सुटली. मला उद्याचा धाक पडला होता की, आता उद्या गणेशचे वडील आपल्याला शाळेत नक्कीच याचा जाब विचारण्यासाठी येतील. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत माझ्या वर्गात गणेशचे वडील आले,पण त्यांनी जाब विचारण्या ऐवजी मला असे म्हणाले की.

" गुरुजी, गणेश चुकला तर अजुन झोडपून काढा, आमचं काही बी म्हणणं नाही..!" 

हे ऐकूण मी स्तब्ध झालो होतो. त्यात पुन्हा जी शिक्षा गणेशला मी केली होती, त्याबद्दल त्याने साधे डोळे वर करून डोळ्याने देखील मला प्रत्युत्तर दिले नव्हते. एखाद्याने किती नम्र असावे याचा तो परमोच्च प्रसंग होता. 


मी अगोदरच उल्लेख केल्याप्रमाणे गणेश नानासाहेब गाजरे हा अभ्यासात फारसा हुशार नव्हता, पण त्याचं वागणं कमालीचं चांगलं होतं.बुध्दीमत्ता अन् त्याद्वारे आयुष्यात मिळणारे स्थैर्य या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक नाही असे मला वाटते. एक शिक्षक म्हणून मला असे वाटते की, दुनियादारीचे शिक्षण ज्याला मिळाले , किंबहुना अशाच लोकांनी आपल्या आयुष्यात यश प्राप्त केले आहे. बुध्दीमत्ता , दुनियादारीचे शिक्षण अन् त्याच्या सोबतीला जर नैतिक मूल्यांचा ठेवा सोबत असेल तर अशी माणसं सहसा आपल्या आयुष्यात अयशस्वी होत नाही. गणेश अभ्यासात जेमतेम होता त्यामुळे त्याने माध्यमिक शिक्षणाचा मार्ग अर्ध्यावर सोडून दिला. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने गावाच्या जवळच असलेल्या लासूर स्टेशन येथे एका हॉटेलवर वेटर म्हणून काम करायला सुरुवात केली. जिद्द, सचोटी, प्रामाणिकपणा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गणेशच्या अंगी असलेला निर्व्यसनीपणा या मूल्यांच्या आधारे स्वतः चा हॉटेल व्यवसाय ' जय बाबाजी हॉटेल ' या नावाने सुरू करण्याचे ठरवले. लासूर स्टेशन येथील सावंगी चौकात सुरुवातीला चहा अन् नाश्त्याचे हॉटेल सुरू केले. त्यात जम बसल्यावर थंड पेय असलेला व्यवसाय सुरू केला. काळाच्या ओघात त्यात चांगला जम बसला. विविध थंड पदार्थ, आईस्क्रीम तयार करण्याचा छोटेखानी प्रकल्प त्याने सुरू केला. जेणेकरून हाच माल दुसऱ्याकडून खरेदी करून ग्राहकांना विकण्यापेक्षा आपणच तयार करून विकु हा व्यावसायिक उद्देश त्यामागे होता. यात गणेशला यश मिळाले. गणेश त्याच्या व्यवसायात दिवसेंदिवस यश मिळवत होता अन् आहे .या यशाच्या मार्गात असताना त्याने त्याचा तोल ढळू दिला नाही हे विशेष..! नाहीतर बऱ्याचदा असे बघायला मिळते की, यश आपल्या सोबत अनेक अयशस्वी गोष्टीना सोबत घेऊन येत असते.


जी व्यक्ती,माणसं आपल्या आई वडिलांचा, घरातील जेष्ठांचा, स्रीयांचा कमालीचा आदर करतात, अशी व्यक्ती, माणसं सदा सर्वदा वंदनीय असतात. माझे स्व. वडील लासूर स्टेशन येथून कधी मधी पालखेड येथे जायचे. माझे स्व. वडील सावंगी चौकातून गावाकडे जाताना दिसले की, माझ्या स्व वडिलांना एखाद्या वाहनात बसून देई पर्यंत गणेश वडिलांच्या सोबतच असायचा. माझे वडील गावाकडून आल्यावर लासूर स्टेशन येथील माझ्या घरी त्यांना आणून सोडत असे. हे सर्व माझे स्व. वडील मला शाळेतून घरी आल्यावर अभिमानाने सांगत असे. हे नैसर्गिक नैतिक संस्कार , गणेशच्या अंगी होते त्यामुळे त्याचे स्थान माझ्या कुटुंबात खूप सन्मानाचे होते,आहे अन् राहील यात तिळमात्र शंका नाही.


मी माझ्या आयुष्यात अगदी माझ्या घरातील सदस्यांचे जे स्थान माझे काही बालमित्र, काही शिक्षक मित्र, जन सहयोग सामाजिक संस्था परिवार छ्त्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) चे सर्व सदस्य यांना दिलेले आहे तेच स्थान माझ्या या खूप प्रिय विद्यार्थ्याला म्हणजेच गणेश नानासाहेब पाटील गाजरे याला दिलेले आहे. हे स्थान माझ्या मुलांच्या पुढील पिढीत देखील राहील हे सूर्य प्रकाशा एवढे सत्य आहे..! कारण नियतीने आपल्या आयुष्यात जी काही देव माणसं कोणत्या ना कोणत्या रूपात पाठविलेली असतात ,ती हीच तर आहे..!🙏🏻


वंदे मातरम्


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : ४/११/२०२२, शुक्रवार.