बुधवार, २४ डिसेंबर, २०२५

अत्यंत दुर्मिळ पिढी.यांनाही जपलं पाहिजे.


 

#मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


अत्यंत दुर्मिळ पिढी.यांनाही जपलं पाहिजे..!


===================


दिनांक २४/१२/२०२५, बुधवार रोजी थंडी खूप होती.मी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन वरील पॅसेंजर रेल्वे मधील एका डब्यात प्रवेश केला.गर्दी होती.डब्यातील सीट शोधत शोधत अखेर एका ठिकाणी जागा आढळून आली.तिथे दाटीवाटीत बसलो.माझ्या बाजूला एक जेष्ठ नागरिक दिव्य मराठी वर्तमानपत्र वाचत होते.एक चिरतरुण वरील स्लिप सीटवर पहुडलेला होता.डब्यातील लाईट सुरु होता.थंडीमुळे सर्व खिडक्या बंद होत्या.लाईटच्या प्रकाशात ते जेष्ठ नागरिक काका वर्तमानपत्र वाचत होते.


त्या चिरतरुणाला लाईटच्या प्रकाशामुळे झोप येईना.अखेर तो चिरतरुण वैतागून काहीश्या उंच स्वरात जेष्ठ नागरिक काकांना म्हणाला..

" तुमचा पेपर वाचून झाला का..?"

ते जेष्ठ नागरिक काहीसे रागाने म्हणाले..

" पेपर मी विकत घेतला आहे.मी वाचील नाहीतर नाही वाचणार.तुमची जबरदस्ती आहे का..? "


थोड्या वेळाने बघितले तर तो चिरतरुण वरील सीटवर पहुडलेल्या अवस्थेत मोबाईल बघण्यात मग्न झाला होता.


ते जेष्ठ नागरिक काका माझ्याकडे बघत पुटपुटले..

" कठिणच जमाना आला आहे.मी पैसे देऊन पेपर विकत घेतला आहे अन् हा मला विचारतो आहे तुमचा पेपर वाचून झाला आहे का..?


अशी जुनी जाणती माणसं बघितली की, ' मोडेन पण वाकणार नाही ' या म्हणीची आठवण आली.बाकी काहीही असो वरील प्रसंगावर माझ्यासह इतरांची भिन्न भिन्न मतं असू शकतात, मात्र या जेष्ठ नागरिक काकांच्या सारखी सुद्धा पिढी अत्यंत दुर्मिळ होत चालली आहे.याही पिढीवर निस्सिम प्रेम करायला हवे. त्याचं कारण एवढं स्पष्टवक्तेपणाने वागायला पण स्वतः , स्वतः विषयी अत्यंत प्रामाणिक असावं लागतं. जे माझ्या समवयस्क पिढीत नसल्यात जमा आहे. ही अत्यंत दुर्मिळ पिढी आहे.यांनाही जपलं पाहिजे..!


अखेर माझे नियोजित रेल्वे स्टेशन आले होते.मी निघताना त्या जेष्ठ नागरिक काकांना अत्यंत आत्मियतेने म्हणालो..

" काका, उतरतो मी. थंडी खूप आहे.काळजी घ्या. एकटेच दिसता..? कुणी सोबत नाही का..?"

काकांनी माझ्याकडे बघून स्मित केले अन् म्हणाले..

" हो बेटा, मनमाडला चाललो आहे.काम आहे."


आधीच घडून गेलेल्या प्रसंगामुळे त्या काकांना ' मनमाडला काय काम आहे ?' असे विचारण्याची माझी हिंमत झाली नाही.🙂 


ता.क. : तत्त्वनिष्ठ असणाऱ्यांसोबत आपणही आपल्या पायरीत बसून रहावं.


वंदे मातरम् 

सुप्रभात मित्रांनो.🙂🙏


नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: २५/१२/२०२५, गुरुवार

शनिवार, २० डिसेंबर, २०२५

कृती छोटी पण, प्रेरक नक्कीच आहे..!



 

#मला प्रवासात भेटलेली माणसं..!


" कृती छोटी पण, प्रेरक नक्कीच आहे..! "

===============================


" सर, तुम्ही ७ डिसेंबर ला कुठे गेले होते हो..?" 

माझ्या जवळ येऊन हळू आवाजात या अभिषेक सखाराम तोडकरने मला विचारले.

मी- " अरे,बेटा..माझ्या जन्मगावाची यात्रा होती त्या दिवशी..! म्हणून मी त्यारोजी रजेवर होतो..! का..काय झाले..? "

अभिषेक - " काय...सर...माझा वाढदिवस होता ना त्या दिवशी..! "

मी - " अरे ,व्वा...! अभिनंदन बेटा..!"

आमच्यातील हा संवाद सुरू असताना अभिषेकला मला काहीतरी सांगायचे होते पण तो सांगू..का...नको...या द्विधा मनःस्थितीत असल्याचे मला जाणवले.मी त्याला म्हणालो..

" काय रे...काय झाले..? कुणी काही बोलले का तुला..? "

अभिषेक - " नाही हो सर..!"

मी - " मग काय झाले..?"

अभिषेक माझ्याजवळ आला अन् म्हणाला..

" सर,ते तुम्ही मागे म्हणाले होते ना..की आमचा कुणाचा वाढदिवस असला तर त्या दिवशी केक, चॉकलेट वर पैसे खर्च करण्यापेक्षा त्याच पैशातून काहीतरी घेऊन ज्यांना गरज आहे त्यांना द्या म्हणून..!"

मी -" अरे..हा..म्हणालो होतो..! "

अभिषेक - " सर,मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी..४० ₹ चे पेन आपल्याच शाळेच्या बाजूला असणाऱ्या लहाण्या जिल्हा परिषदेच्या  शाळेत ३ रीच्या विद्यार्थ्यांना वाटले..!"


मी काहीवेळ त्याच्याकडे पाहताच राहिलो..अन् विचार करू लागलो की, मुलं त्यांच्या गुरुजींच्या प्रत्येक नैतिक मूल्यांच्या शिकवणीवर किती बारीक लक्ष ठेवत असतात. या अभिषेकने असे काही अप्रतिम कार्य केले होते की,जे..जे मोठी सुशिक्षित माणसं कुणाच्याही वाढदिवसाला  स्वतःच्या किंवा इतरांच्या चेहऱ्याला केक फासतात त्यांना सणसणीत चपराक लगावली होती.


मला खूप खूप आनंद झाला होता. मी ज्या..ज्या छोटछोट्या नैतिक मूल्यांची रुजवणुक माझ्या सध्याच्या अंधारी प्रशालेतील विद्यार्थ्यांमध्ये करू लागलो होतो...त्याला आता कुठे खूप सुंदर असा अंकुर फुटायला लागला होता.मला हेच अपेक्षित होते. भले असे करणाऱ्यांची संख्या कमी असेल पण प्रारंभ झाला होता हे काय थोडे होते का...? भले त्यांच्या या कृती जगाच्या दृष्टीने खूप अती सामान्य असेल पण छोट्या कृतीतूनच मोठी कार्य सहज होत असतात. एकाजनाचे प्रेरक कार्य..निदान पाच जणांना तरी प्रेरित करत असते यावर माझा ठाम विश्वास आहे.


मी ज्यावेळी अंधारी प्रशालेत जून २०१८ मध्ये हजर झालो होतो ,त्यावेळी मला या शाळेत बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये एक नवीनच प्रकार पाहायला मिळाला होता.

तो असा..

या शाळेत ज्या मुलामुलींचा वाढदिवस साजरा होत असे,ते बरेच मुलं मुली केक वर्गात आणत असे अन्  दणक्यात वाढदिवस साजरा करत असे.मला प्रश्न पडत असे की,या मुलामुलींना १०० ते १५० ₹ चा केक घ्यायला यांच्या घरचे पैसे कसे काय देऊ शकतात..? मुलांना चॉकलेट वाटप करणे समजू शकतो पण..वर्गात केक आणून..?


मी त्यावेळी या मुलांना त्यांच्या या साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसाबद्दल प्रत्यक्ष उपदेशाचे काहीसे रागावून डोस दिले नाही ; कारण पौगंडावस्थेतील वयोगटातील मुलांना पटकन अशा अनेक गोष्टी सहजपणे लवकर मुद्दामहून समजत नाही. 😊 कारण हा वयोगट आयुष्यातील सर्वात संवेदनशील वयोगट असतो. जोषपूर्ण आयुष्याचा प्रारंभ इथूनच सुरू होतो. मात्र आपण वाढदिवसाला नेमके काय काय करायला हवे याबाबतीत तासिका झाल्यावर सांगत असे.त्याचाच हा खूप चांगला परिणाम होता..की अभिषेकने त्याच्या वाढदिवसाला वर्गात केक आणून वाढदिवस साजरा करण्यापेक्षा लहान मुलांना काहीतरी अभ्यास उपयोगी वस्तू त्याने दिली होती. 


प्रिय अभिषेक याने  वर्गात केक न आणता दुसऱ्या एका चांगल्या कृतीतून स्वतःचा वाढदिवस साजरा करायला प्रारंभ तर केला होता,याचा मला खूप खूप आनंद झाला होता. कोणताही चांगला प्रारंभ हाच येणाऱ्या काळातील चांगल्या कृतींचा प्रारंभ बिंदू असतो. म्हणून प्रिय अभिषेकची ही छोटीशी कृती अंधारी प्रशालेतील बाकीच्या त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणार होती,जी मुलं अन् मुली वर्गात केक आणून आपला वाढदिवस दणक्यात साजरा करत होती..! प्रत्येक वर्गात मी गेल्यावर अभिषेकने वाढदिवसाच्या दिवशी काय केले, याचे आवर्जून विद्यार्थांना सांगत होतो. याचा दृश्य परिणाम असा झाला की, अशा प्रकारांना आळा बसला.


खूप खूप अभिनंदन बेटा अभिषेक..!🌹


वंदे मातरम्.. !


ता.क.:  कृती छोटी आहे...पण अनुकरणीय नक्कीच आहे. अभिषेकला या छान कार्याबद्दल पतंजली बिस्कीट पुडा बक्षीस दिला.


लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


प्रसंग दिनांक: ७/१२/२०१८


लेखन दिनांक: २० डिसेंबर २०१८