मला प्रवासात भेटलेली माणसं..!
" तुम्ही हे ऍप घ्या ..!"
======================================
दिनांक २० ऑगस्ट २०१९ रोजी मी नेहमी प्रमाणे औरंगाबाद बस स्थानकाहुन सकाळी अंधारी येथे शाळेत जाण्यासाठी बस मध्ये बसलो.हडको टी पॉइंट आल्यानंतर आमची बस थांबली.खाली खूप गर्दी होती.माझ्या सिट वर माझ्या बाजूला कुणीच नव्हते.जागा रिकामीच होती.बंदुकीतून गोळ्या सुटाव्या तसे एकामागून एक माणसं बस मध्ये घुसू लागली.त्यात एक गोरे गोमट्या वर्णाचे हेअर डाय केलेले एक अंदाजे ७० वर्षाचे आजोबा पण होते.मी त्यांच्या वयाचा विचार करून त्यांना माझ्या बाजूलाच जागा दिली.मी आपला माझा मोबाईल पाहण्यात मग्न झालो,कारण पुढील एक ते दीड तास " मैं और मेरी तनहाई " तोच मोबाईल होता..!☺मी दररोज बस मध्ये प्रवाशांशी नाहक बोलण्यापेक्षा तऱ्हेवाईक माणसांचे निरीक्षण करून माझ्या ज्ञानात भर पाडत असतो..! पण आज माझीच फजिती होणार होती.
अशी तशी आमची बस हर्सूल येथे आली असेल.इतक्यात ते आजोबा मला म्हणाले,
" कुठले पाहुणे..?"
मी त्यांच्याकडे न पाहता माझ्या मोबाईल कडे पाहत म्हणालो,
"मला आज रोजी पर्यंत तीन गावं आहेत, मूळ गाव,पालखेड,नंतरचे लासूर स्टेशन व हल्ली मुक्काम येथेच औरंगाबाद मध्ये एका ठिकाणी...!"
यावर ते आजोबा मला पुन्हा म्हणाले,
"तुम्ही शिक्षक आहात का हो..?"
मी चमकुन त्यांच्याकडे पाहून म्हणालो,
" तुम्ही कसं काय ओळखलं..?"
आजोबा-" तुम्ही लई चकपक पांढरे कपडे घातले, अन् लई आवरून सावरून बसला आहात त्यावरून ओळखले..!"
असं म्हणताच तेवढ्या वेळापुरता मी ,त्यांची नजर चुकवून मोबाईलच्या काचेत स्वतःला पाहून घेतले..!😂
मनात म्हणलं हे आजोबा,मला ऐन मार्च , एप्रिल महिन्यात याच रस्त्याने बसमध्ये भेटले असते तर मी त्यांना खाणीत काम करणारा कामगार नक्कीच वाटलो असतो,कारण रस्त्याचे काम अन् धूळ..!मग मी पण त्यांच्या वयाला अनुरूप गप्पांच्या फडात अधून मधून रंगलो.
आता आमची बस, चौका या गावाजवळ आली होती. एवढ्यात ते मला म्हणाले...
" तुमचा मोबाईल what's app नंबर काय आहे..?
मी म्हणालो- " काका,मी सहसा माझा व्हॉट्स ऍप नंबर कुणाला देत नाही,कुणी काहीही पाठवतं..!"
आजोबा- " अहो,द्या हो..! तुम्ही आता ओळखीचे निघाले,आमचे पाहुणे आहेत तुमच्या गावाकडे....!"
मला पण त्यांच्या वयाकडे पाहून अन् ते काहीही पाठवणार नाही या अंदाजाने दिला माझा नंबर..!
लगेच ते त्यांच्या मोबाईलच्या कामात व्यस्त झाले. थोड्या वेळाने मला म्हणाले..
" हे एक app आहे,तेवढं प्ले स्टोअरवर जाऊन डाऊनलोड करा..!"
मी-" माझ्या मोबाईल मध्ये स्पेस नाही..!"
आजोबा- " त्यातील काही डिलीट करा मग..!"
मी- " सगळं महत्त्वाचं आहे,त्यामुळं काहीही डिलीट करता येणार नाही..!"
आजोबा-" जास्त जागा नाही लागणार, करा काहीतरी डिलीट..!"
मी- " काका,मला ते app नाही लागत..!"
आजोबा- " तुम्ही घेऊन तर पहा..! वाटल्यास त्या app ची लिंक मी पाठवतो..!"
आता मात्र मला त्यांच्या आग्रहाचे अपचन व्हायला लागले होते.मी काहीसा सौम्य कडक स्वरात त्यांना म्हणालो
मी- " तुम्ही का मला आग्रह करू राहिले..?माझी अजिबात इच्छा नाही..!"
आजोबा-" मी लिंक तुमच्या नंबरवर पाठवली आहे,ती लिंक ओपन करून ते app घ्या..!"
आता आमची बस फुलंब्री बस स्थानक येथे आली. तेंव्हा लगेच आजोबा म्हणाले..
" केली का लिंक ओपन..?"
मी सौम्य उंच स्वरात म्हणालो- " तुम्हाला समजत नाही का हो..? मी नाही म्हणतोय अन् तुमचं तेच सुरू आहे..!"
यावर ते आजोबा शांत झाले.आता पाल फाटा आला होता.ते आजोबा पुन्हा म्हणाले..
" अहो,सर,त्या app मधून जर तुम्ही फेसबुक,व्हॉट्स ऍप सुरू केले तर तुम्हाला काही पैसे मिळतील..!"
मी काहीच न बोलता गुलजारजींची इजाजत चित्रपटातील " मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है..!" ही गझल ऐकण्यात मग्न होतो.
फरशी फाट्यावर आमची बस थांबली.त्याचा फायदा घेऊन ते आजोबा मला पुन्हा म्हणाले..
" मी काय म्हणतो,एकदा ते app घेऊन तर पहा..!"
मी- " मी,माझी जागा बदलू का हो..?"
यावर ते चूप बसले.सकाळचे ९ वाजले होते.आळंद गाव आले होते.पुन्हा त्या आजोबांचा पाल्हाळ सुरू झाला...
" सर,राग नका येऊ देऊ..! पण तुम्ही खरंच जर ते app मी पाठविलेल्या लिंक मधून जर घेतले ना,तुम्हाला थोडेफार पैसे मिळतील..!"
आता मात्र की रागात त्यांना म्हणालो- " हे पहा काका,तुमच्या वयाचा विचार करून मी तुम्हाला कडक स्वरात बोलू शकत नाही..! आता पुन्हा हा विषय काढला तर माझा नाईलाज होईल..!"
आजोबा एकदम चिडीचूप झाले.अखेर अंधारी गाव आले.मी उतरू लागलो.इतक्यात ते आजोबा मला पुन्हा म्हणाले...
" सर, जमलंच तर लिंक ओपन करून ते app घ्या..!"
मी रागाने त्यांच्याकडे पाहून खाली उतरलो.
उतरल्या बरोबर मी त्या आजोबांचा नंबर ब्लॉक करून टाकला. विचार करू लागलो की, काहीवेळा आपला चांगुलपणा नडतो आपल्याला..! मी त्यांना माझा व्हॉट्स ऍप नंबर नको होता द्यायला..! पण मी त्यांच्या वयाचा अन् गावाकडच्या निघालेल्या ओळखीमुळे त्यांना माझा व्हॉट्स ऍप नंबर दिला होता.मी सहसा अनोळखी व्यक्तीला नंबर देतच नाही,पण त्यांनी माझ्या गावाकडची ओळख दिल्यामुळे मला त्यांचा उमाळा आला होता..!
ता.क.: मोजक्याच माणसांना मी प्रेमानं अन् विश्वासाने माझा व्हॉट्स ऍप नंबर दिला आहे त्यांनी मला मेसेज न केल्याबद्दल गोड राग मानू नये..!😂
जर राग आल्यास मला ब्लॉक करा..!😂😂
वंदे मातरम्..!
लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: २१ ऑगस्ट २०१९