शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२०

" मंदिर अन् मी...!"













चिंतन

" मंदिर अन् मी...!"
================================

माझ्या आयुष्यातील खूप मोठा कालखंड आमच्या गावातील मंदिराच्या सानिध्यात गेला.

त्यातल्या त्यात आम्ही काही बालमित्र ज्यांच्या गल्लीतच, आमच्या घराच्या दारासमोरच  ग्राम दैवत श्री.पारेश्वर महादेव  मंदिर असल्याने.....
मंदिर अन् आम्ही एकमेकांशी घट्ट  बांधल्या गेलो. मग  मंदिर  कुठेही दिसू दे..! ते दिसलं की आपल्या आयुष्यातील गतकाळातील आठवणी लगेच जाग्या होतात अन् आपसूकच त्या मंदिराकडे पाय ओढल्या जातात.

पालखेड येथे माझ्या लहानपणी थेट इ.७ वी पर्यंत आमचे घर म्हणजे निव्वळ मातीच्या धाब्याचे होते.आमच्या घराचा आकार अंदाजे रुंदी ८ फूट अन् लांबी १५ फूट..! अशा एवढ्या जेमतेम आकाराच्या घरात,एक पलंग,वडिलांची सायकल,माझ्या स्वर्गीय आईचा स्वर्गाहून सर्वश्रेष्ठ संसार, चूल अन् आम्ही भावंड..! सगळं कसं दाटीवाटी करून एकंदरीत आनंदात दिवस होते. माझा भाऊ त्याच्या मित्राच्या घरी शिवाजी भाऊ गायकवाड यांच्या घरी झोपायला जायचा.नाहीतर गल्लीतच असणाऱ्या अभ्यासाच्या खोलीत झोपायला जायचा.मी देखील इ.६ वी ,७ वी पर्यंत बऱ्याचदा वेशी जवळ असणाऱ्या मारोती मंदिरात किंवा श्री.पारेश्वर महादेवाच्या मंदिरात मित्रांच्या सोबत झोपायला जात असे.माझ्या सोबत सोमनाथ गायकवाड, रमेश गायकवाड,नाना गायकवाड, ( सर्वजण हल्ली मुक्काम औरंगाबाद) राजू निकम इत्यादी बालमित्र असायचे. त्यामुळं मंदिर अन् आम्ही मित्र , आमचं नातं घरासारखे निर्माण झाले होते.

आजही कोणतेही मंदिर दिसले की,आमच्या गतकाळातील आठवणी जाग्या होतात अन् आपसूकच त्या घराकडे म्हणजेच मंदिराकडे पाय ओढल्या जातात. कारण माझ्या दृष्टीने ते मंदिर नव्हतेच कधी..! आम्हा मित्रांच्या दृष्टीने मंदिर म्हणजे आमचे घरच होते..! अर्थात आजही कोणतेही मंदिर,मला स्वतचं घरच वाटते.

मी अन् सोमनाथ गायकवाड ( ह. मू.बजाजनगर ) स्वयंपाक कलेत पारंगत झालो ते सुद्धा मंदिरातच..!  जवळ जवळ इयत्ता ८ वी पर्यंत आम्ही आमच्या घरासमोर असणाऱ्या संत जनार्दन स्वामी आश्रमातील साधू महाराजांचा स्वयंपाक  करून द्यायचो. तो स्वयंपाक करता..करता त्यातही पारंगत झालो. ज्यावेळी डी. एड ला शिकायला कन्नड येथे होतो तेंव्हा ,याच मंदिरात शिकलेली स्वयंपाक कला कामी आली.😊 पहाटे  उठायची सवय देखील याच मंदिराने लावली.

याच मंदिराने दुसऱ्याचा सन्मान करायची सवय देखील लावली.त्याचं उदाहरण म्हणजे......
आमच्या पालखेड गावात असणाऱ्या श्री.पारेश्वर मंदिरात  साधारणतः बावीस तेवीस वर्षापूर्वी बरेच दिवस पुजारी साधू नव्हते.महादेवाची पूजा,स्नान करण्याची सेवा बाबत आमच्याच गावातील आदरणीय सदाशिव आण्णा जगताप पाटील ( कृषी सहायक अधिकारी) यांनी ठरवले की, आपण पहाटेची पूजा अन् विधी मंत्र सेवा करू,सोबत गावातीलच प्रभू महाराज सोबतीला असतील. संध्याकाळी मात्र सर्व पूजा ,विधी प्रभू महाराज यांनीच करायचे ठरले. संध्याकाळी आमच्या नोकरीच्या वेळेमुळे शक्य नव्हते.

दररोज पहाटे मी अन् सदाशिव आण्णा जगताप पाटील (कृषी सहायक अधिकारी) संत जनार्दन स्वामी महाराजांची विधी पूजा घेऊ लागलो.काही दिवसानंतर आमच्या असे लक्षात आले की,आमची विधी मंत्र सुरू झाले की,काही वेळानंतर आमच्याच बांधवांची मशिदीतील पहाटेची नमाज पठण सुरू व्हायची. बऱ्याचदा आमच्याच गल्लीतील अश्रफ चाचा नमाज पठण करायचे..! एक दिवस सदाशिव आण्णा जगताप अन् मी आम्ही असे ठरवले की, ज्यावेळी मशिदीत नमाज पठण सुरू होईल,तेवढ्या दोन तीन मिनिटात आम्ही मौन पाळायचे. मंत्रोच्चार करायचा नाही. नमाज पठण संपले की,पुन्हा आपली विधी मंत्र सुरू करायचे. आमचा तो नित्यक्रम सुरू झाला होता. आम्ही आमच्याच गल्लीतील,गावातील बांधवाचा ,त्यांच्या धार्मिक मूल्यांचा सन्मान कुठेही गाजावाजा न करता नित्य नियमाने पाळू लागलो होतो. अखेर काही दिवसांनी महंतांची नेमणूक आश्रमात केल्या गेली अन् आम्ही आमच्या घरी आमची देवपूजा करू लागलो. मात्र यातून एक खूप चांगला संस्कार श्री.पारेश्वर महादेवाने आमच्यावर केला की, दुसऱ्याचा सन्मान करा.तेही आपल्याच घरातील,गावातील आहेत..! हे मानवी मूल्य देखील मंदिरानेच दिले.

एकंदरीत मंदिराचे माझ्या आयुष्यात स्वतच्या घरा सारखे स्थान आहे..! आता पर्यंत नोकरीच्या गावातील मंदिरे देखील स्वतच्या गावातील मंदिरासारखीच जाणवली..!

वंदे मातरम्

लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव .

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: ३१ जानेवारी २०२०, शुक्रवार.

गुरुवार, ३० जानेवारी, २०२०

" सोज्वळ दातृत्व....संतोष भाऊ औसरमल पा. "



मला प्रवासात भेटलेली माणसं..!

" सोज्वळ दातृत्व....संतोष भाऊ औसरमल पा. "

==================================

दिनांक २६ जानेवारी २०१८ ची सकाळ..!
स्थळ: जि.प.प्रा.शा.एकलहेरा,कें.: अंबेलोहळ,ता. गंगापूर, जि.औरंगाबाद...!

सकाळी शाळेत विद्यार्थी व आम्ही सर्व शिक्षक प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या तयारीत मग्न होतो. शाळेतील एका  वर्गखोलीत मोठमोठाल्या आकाराच्या बसायच्या बऱ्याच चटया  ठेवलेल्या होत्या.गावातील एक अतिशय प्रेमळ पालक आदरणीय संतोष भाऊ औसरमल पा.यांनी आपल्या शाळेला सप्रेम भेट दिल्या आहेत हे समजले.मुख्य ध्वजारोहण आटोपले होते.उर्वरित कार्यक्रमाला सुरुवात झाली होती.

मी आमच्या शाळेच्या कार्यालयाच्या समोरील व्हरांड्यात उभा होतो.विद्यार्थ्यांचे कोडकौतुक सुरू होते.कार्यक्रम आता समाप्तीकडे चालला होता. माझ्या  बाजूलाच कोपऱ्यात ज्यांनी एवढ्या महागड्या चटया शाळेतील गोर गरिबांच्या विद्यार्थांना बसण्यासाठी दान दिल्या होत्या ते संतोष भाऊ औसरमल दूर बाजूला उभे होते.मला राहवलं नाही,मी त्यांच्याकडे गेलो अन् त्यांना हळु आवाजात म्हणालो...
" संतोष भाऊ,तुम्ही खूप मोठ्या मनाने एवढ्या महागड्या चटया शाळेतील गोर गरीब विद्यार्थ्यांना सप्रेम भेट दिल्या आहेत,त्याबद्दल तुमचा सत्कार करायचा आहे..!"
यावर आदरणीय संतोष भाऊ यांनी नम्रपणे नकार दिला.मी त्यांना म्हणालो...
" अहो, असं काय करताय,तुमच्या सारख्यांचाच खरा सत्कार व्हायला हवा..! आजकाल कुणी एखादी वस्तु कुणा एखाद्याला भेट दिली तर पार इकडून तिकडून फोटो काढून आत्मप्रसिध्दी देतात,अन् तुम्ही तर कोणताही स्वार्थ न बाळगता एवढ्या महागड्या चटया भेट दिल्या आहेत..!"
तरी पण संतोष भाऊ सत्कार स्विकारण्याच्या मनःस्थितीत नव्हते. शेवटी मी ठरवले की,संतोष भाऊंचे माईक मध्ये जर नाव पुकारले तर..मग त्यांना सत्कार स्विकारण्यासाठी यावेच लागेल. समोर शाळेतील सहशिक्षक श्री.सलामपूरे सर उभे होते.मी त्यांच्याकडे गेलो अन् त्यांच्या कानावर सर्व माहिती सांगितली अन्
श्रीनेवार सरांना ,संतोष भाऊंचे नाव ,योग्य त्या वर्णनासह पुकारण्यास सांगितले.सरांनी नाव पुकारले अन् संतोष भाऊ यांना मुख्य ठिकाणी सत्कार घ्यायला जावे लागले..!

आपल्यातील खूप भारतीय ,भारतीयांसाठी खूप काही देतात..तेही कोणत्याही अहंकाराचा लवलेशही अंगाला न चिकटू देता..!

आमच्या प्रा.शा.एकलहेरा, ता.गंगापूर शाळेला गावातील एक सद्गृहस्थ आदरणीय संतोषराव पाटील औसरमल(काळी पँट,पांढरा सदरा) यांनी खूप मोठ्या आकाराच्या ८ चटया  स्वेच्छेने भेट दिल्या..! सदरील चटई भेट देताना फोटोही काढू नका असा आग्रह संतोष भाऊंनी धरला होता..!पण  खूप  आग्रहाने त्यांना  फोटो काढण्यासाठी तयार केले..समाजात चांगला संदेश जाण्यासाठी..!
खूप भला माणूस..!

आदरणीय संतोषभाऊंचा स्वतःची चटई तयार करण्याचा वाळूज एमआयडीसी परिसरात कारखाना आहे.  हे तेच संतोषभाऊ आहेत,ज्यांचा गोड मुलगा चि.भावेश संतोष औसरमल ,याच्यावर एक लेख मी लिहिलेला आहे..! खाण तशी माती या उक्तीप्रमाणे संतोष भाऊ सारखाच त्यांचा चिरंजीव भावेश याचे वर्तन होते..! आज समाजात कुणी एखाद्याने एवढसं काही कुणाला दिलं तर अख्ख्या जगाला पार बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणारी बहुसंख्य माणसांची जमात..! अन् त्याच माणसातील लुप्त होत चाललेल्या अन् आज अल्पसंख्यांक होत चाललेल्या आदरणीय संतोष भाऊ सारखी भली माणसं..! ज्यांना ना ...सन्मानाची अपेक्षा ...ना....कुणाकडून कौतुकाची अपेक्षा..!
                                                                                           ता.क.: एका भारतीयाची अनेक भारतीयांना दिलेली कृतार्थ भेट..!
         
 वंदे मातरम्..!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
प्रसंग दिनांक: २६ जानेवारी २०१८
लिखान दिनांक: ३० जानेवारी २०२०

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२०

" आत्महत्येच्या मृतदेहाला पाहणारे विकृत प्रेक्षक..! "





** मला प्रवासात भेटलेली माणसं..! **

" आत्महत्येच्या मृतदेहाला पाहणारे विकृत प्रेक्षक..! "

==================================

आज दिनांक १८ जानेवारी २०१८ रोजी संध्याकाळी शाळेतून घरी औरंगाबाद शहरातुन  येताना खूप रस्ता जाम झाला होता.जसजसा पुढे येऊ लागलो तसतसे रस्ता जाम का झाला याचे चित्र स्पष्ट होऊ लागले होते..!

कुणीतरी एका इसमाने रेल्वेच्या रुळावर रेल्वेखाली आत्महत्या केली होती..अन् ती झालेली  आत्महत्या अन् त्याच आत्महत्याग्रस्त इसमाचा मृतदेह पाहणाऱ्यांची प्रचंड गर्दी जमली होती..!
बरं..जे अनेक जण तो रेल्वे रुळावरील मृतदेह पाहत होते त्यांना तो नीटपणे दिसत पण नव्हता..! तो मृतदेह पाहणाऱ्या लोकांपासून अंदाजे ३०० ते ४०० फूट अंतरावर होता..!मात्र जिवंत माणसांची त्या मृत देहाला पाहण्याची खूप उत्सुकता निर्माण झाली होती..!अक्षरशः रेटारेटी करून प्रत्येक जिवंत माणूस त्या मेलेल्या मृतदेहाला पाहण्याची विकृत हौस भागवून घेत होता..! पाहायला पाहत का नाही...पण जर पाहणाऱ्या माणसांकडून त्या मृतदेहाला किंवा अपघातग्रस्त इसमाला मदत झाली तर आपण समजू शकतो पण...इथे तर असे काहीही होत नव्हते..!

 जिवंत माणसांच्या पाहण्याच्या हौसेमुळे रस्त्याच्या दुतर्फा जवळ जवळ ३ किलोमीटर  पर्यंत वाहनांचा चक्का जाम झाला होता..!त्या पाहणाऱ्या विकृत प्रेक्षकांमध्ये सगळेच पाहण्याची विकृत हौस भागवून घेत होते..! मी आपला निमूटपणे एका वाहनात बसून त्या माणसांची गर्दी अन् त्यांची त्या मृतदेहाला पाहण्याची झुंबड  पाहत होतो..!

माणूस मोठा विचित्र प्राणी आहे.ज्या मृतदेहाला पाहून त्याला खूप भीती वाटते त्याच मृतदेहाला पाहण्या साठी त्याची झुंबड उडाली होती..! झुंबड देखील अशी होती...की..जिच्यामुळे माझ्या सारख्या असंख्य सर्वसामान्य माणसाला नाहक चक्का जाम झाल्याचा मानसिक त्रास सहन करावा लागत होता..!ज्या ठिकाणाहून मला माझ्या घरी यायला फक्त तीन ते चार मिनिटे लागतात..आज या विकृत प्रेक्षकांमूळे त्याच ठिकाणाहून घरी यायला तब्बल ४५ मिनिटे लागले..! आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त ते मृतदेहाला पाहणारे माणसं..!

मुळात माणूस एक खूप चमत्कारिक प्राणी आहे.  एखादी जखम होऊ नये यासाठी तो सतत खूप खूप काळजी घेत असतो..! पण जर स्वतःला जखम झालीच तर तीच जखम तो आलेल्यांना कौतुकाने दाखवत असतो..!!
असेच काहीसे  स्वतः च्या मृत्यू,अपघात बाबतीत तो सतत घाबरून,भिऊन असतो,पण दुसऱ्याच्या  अपघात,मृत्यू बाबतीत तो मोठ्या कौतुकाने ते पाहत असतो किंवा इतरांना दाखवत असतो..!अशी ही बऱ्याच माणसाची मनोवृत्ती आहे..!


ता.क.: एखादा जिवंत माणूस,रस्त्यात अडचणीत दिसलाच तर..आज जशी त्या आत्महत्येच्या मृतदेहाला पाहण्या साठी  जिवंत माणसांची गर्दी जमली होती तेवढीच गर्दी जमेल का हो..?

वंदे मातरम्..!

लेखक व प्रत्यक्षदर्शी : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक : १८ जानेवारी २०१९
स्थळ: छावणी रेल्वे उड्डाण पूल, नगर रोड.

सदरील लेख माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: १८/०१/२०२०,शनिवार

बुधवार, १५ जानेवारी, २०२०

" गोड बोलण्याच्या सर्वांना शुभेच्छा..!"😊





"  गोड बोलण्याच्या सर्वांना शुभेच्छा..!"😊

===================================

मी तसा नेहमीच गोड गोड बोलत असतो आणि गुळ तर दररोजच खातो..!  बचपन से इस आदतसे  मजबूर हूँ..!
अगदी लहानपणी स्वतच्या घरी गुळ चोरून देखील खाल्लेला आहे..!😊
 माझ्या प्रवाशी पिशवीत देखील गूळ  असतो..! मला जरी यदा कदाचित ध्यान राहिले नाही,तरी माझी धर्मपत्नी ध्यान करून गुळाचा मोठ्ठा खडा प्रवाशी पिशवीत नक्कीच ठेवते..! माझ्याही पत्नीला माहीत आहे की,
" एकवेळ माझ्या नवऱ्याला जेवणाचा डब्बा नाही दिला तरी चालेल,पण त्यांच्या प्रवाशी पिशवीत गुळ नक्की लागतो..!" 😊
त्यामुळं माझी मकरसंक्रांत  दररोजच असते..!😊
( मी गुळाचा मोठ्ठा खडा खाऊन झाल्यावर कुणीही मला प्रवाशी पिशवीतील गुळ खायला मागण्याचा गोड हट्ट् करू नये..!😊)

हा..आता मीही माणूस आहे म्हणून कधी मधी मलाही राग येतो..!पण तो आला की, एखाद्या स्मशानभूमीत चक्कर नक्कीच मारुन येतो..! किंवा वंश परंपरागत असलेल्या रसिकतेत स्वतः ला गुंतून घेतो..!

बाकी ज्यांना कुणाला वाटतं की,त्यांनी अमरत्वाचा पट्टा बांधलेला आहे,अशांनी येत्या ३१ जानेवारी रोजी प्रदर्शित होणारा " प्रवास "  चित्रपट  नक्की पाहा..!

असो,
आपणास देखील गोड गोड बोलण्याच्या गुळासारख्या गोड गोड शुभेच्छा..!🙏🏻😊🌹

वंदे मातरम्..!🙏🏻🇮🇳🙏🏻

निमित्त: मकरसंक्रांत..!
गुळावर निस्सीम प्रेम करणारा एक खवय्या लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: १५ जानेवारी २०२०

मंगळवार, १४ जानेवारी, २०२०

" भोगी,मकरसंक्रांत व कर..! "




चिंतन

" भोगी,मकरसंक्रांत व कर..! "
==================================
हिंदू धर्मातील प्रत्येक सण,उत्सव निसर्ग ,आरोग्य विज्ञान ,मानवी मूल्ये यांच्याशी निगडित आहेत.प्रत्येक सण,उत्सव माणसातील माणूसपण शोधायला शिकवतो..!
                       
हिंदू धर्मातील पर्यावरणाशी सुसंगत व निगडित असलेल्या अनेक सणांपैकी मकरसंक्रांत...!आज याच मकरसंक्रांतीच्या तीन दिवसांपैकी पहिला दिवस साजरा केला जातो आहे...अन् तो म्हणजे भोगी..!

भोगी
 हिंदू धर्मातील या सणाचे वैशिष्ट्ये म्हणजे आज भोगीला तीळ टाकून भाजी,भाकरी खाणे त्यानिमित्ताने पौष्टिक व विशिष्ट ऋतूतील आहार आणि त्यामागील आहार विज्ञान लक्षात येते.

मकरसंक्रात..!
वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन त्यासोबत तिळगुळ घेऊन " तिळगुळ घ्या..गोड गोड बोला " असा खूप गोड सामाजिक संदेश यातून समस्त मानवजातीला दिला जातो..!

कर..!
त्यानिमित्त कुणीही भांडणे करू नये , करकर करू नये, समस्त मानवजातीला एकमेकांशी प्रेमाने,सहकार्याने राहणे असा नैतिक संदेश देणारा दिवस..!

हिंदू धर्मातील प्रत्येक सण हा पर्यावरणाशी सुसंगत व निगडित आहेत.प्रत्येकातून पर्यावरणीय व  नैतिक सामाजिक संदेश दिला जातो..! मकसंक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो..!                                                                                           

ता.क.: आम्ही भारतीय आहोत,आम्हाला भारतातील सर्व धर्माचे  पर्यावरणपूरक ,व सामाजिक संदेश देणारे सण खूप प्रिय आहेत..!

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

वंदे मातरम्..!
दिनांक:१४/१/२०२०,मंगळवार

गुरुवार, ९ जानेवारी, २०२०

" आमच्या एकाच गावातील दोन नेते..!"






आमचे गाव, आमची माणसं..!©️

" आमच्या एकाच गावातील दोन नेते..!" 👬 

================================

प्रिय मित्र नंदू व प्रिय मित्र बाळु..!
 उपाख्य श्री. नंदकिशोर भाऊसाहेब जाधव पाटील व श्री. रामचंद्र मुरलीधर शेळके पाटील..!

माझी जन्मभूमी पालखेड ता. वैजापूर जिल्हा औरंगाबाद येथील दोन समकालीन समवयस्क तरणाबांड नेत्यांना त्यांच्या एकाच दिवशी साजरा होणाऱ्या दुर्मिळ जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..! 🌹

या दोघांपैकी प्रिय बालमित्र नंदू,हा आमच्या जवळच्या आळीतला..!एकाच वयाचे असल्याने आमच्या पहिली पासूनच्या औपचारिक शिक्षणाचा प्रारंभ देखील सोबतच झाला..! हा पहिल्यापासून आक्रमक भूमिका घेऊन आपल्या बालवयात अधून मधून चुणूक दाखवत असायचा..! विशेषकरून आमच्या माध्यमिक वर्गातील जीवनात..!
असं करता..करता..मजल...दर..मजल करत..करत..राजकीय आयुष्यात चालत राहिला..अन् आज हा एका राजकीय पक्षाचा राजकीय नेता आहे..! या आमच्या प्रिय बालमित्राचा एक गुण बहुतांशी राजकारण्यांनी घ्यायला हवा, अन् तो गुण म्हणजे नंदू निर्व्यसनी आहे अन् याची सकाळ, लवकर सुरू होते..! हे दोन्ही गुण बऱ्याच गोष्टी मिळवून देतात..!बाकी आता हा नंदू,माझा वर्गमित्रच असल्याने ,याच्या सोबतच्या काही आठवणी अन् प्रसंग असे घडून गेलेले आहेत,की ते प्रसंग निदान आमच्या वर्गातील कोणत्याच ,त्यातल्या त्यात आम्ही अभ्यासाची खोली करून राहणाऱ्या मोजक्या मित्रांच्या स्मरणातून‌ जाऊच शकत नाही..! कधीतरी त्या..त्या प्रसंगावर मी लिहिणारच आहे..! 😊

असो,
दुसरा प्रिय मित्र बाळु..! उपाख्य बाळु पाटील शेळके..!!

हा आमच्या माध्यमिक वर्गाच्या मागील बँच मधील..! प्रिय बाळूचा स्वभाव बराचसा आपल्या वडिलांवर गेलेला..! शांत,संयमी स्वभाव..! प्रिय बाळूच्या वडिलांवर म्हणजेच स्वर्गीय तिर्थस्वरुप मुरलीधर भाऊ शेळके पा. यांच्यावर माझ्या तीर्थरूप वडिलांचं विशेष प्रेम..! त्याचं कारण... तिर्थस्वरुप मुरली भाऊंचा अतिशय समजूतदार अन् विनयशील स्वभाव..! थोडक्यात आज बरेच जण स्वतच्या खऱ्या आडनावाच्या शेवटी जी पदाची बिरुदावली लावतात त्या " पाटील " या पदाच्या बिरुदावलीचे खरे वारसदार‌ म्हणून नेहमी जाणवणारे आमचे वंदनीय स्वर्गीय मुरली भाऊंच्या शेळके पाटील घराण्याचा वारसा ,प्रिय बाळुला जन्मजात मिळाला आहे..! वंदनीय स्वर्गीय मुरली भाऊ,तहहयात आपल्यातील प्रेमळ,मायाळू ,समजूतदार पाटील पदाच्या स्वभावावर कायम राहिले..!

माझ्या जन्मगावाची दिशा व दशा या दोघांच्या हाती आहे..! आमच्या गावाला नेमकी दिशा द्यायची की दशा करायची हे ,या दोघांच्या राजकीय विचारधारा ठरवतील..! अजून एखादी तिसरी आघाडी जरी माझ्या जन्मगावात पालखेडला उदयाला आलीच तर तिच्याही हाती गावाची दिशा अन् दशा ठरविण्याचे हक्क राखून ठेवण्यात आलेले आहेत..!🙏😊

वरील उल्लेखित दोघेही माझे मित्र,आमच्या गावात राजकीय प्रतिस्पर्धी आहे...! माफ करा " होते " असं वाटतं..!
" होते " यासाठी लिहिले आहे की, माझे दोघेही मित्र राज्यातील सध्याच्या महाविकास आघाडी सरकार मधील दोन निव्वळ भिन्न विचारधारेच्या पण सध्या मित्र झालेल्या दोन राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व करतात...! 🙏🏻

आज आम्ही काहीजण पालखेड गाव सोडून बाहेरगावी स्थायिक झालेलो आहोत. आमच्यातील काहीजण आता पुन्हा पालखेड येथे पुन्हा राहायला येतील की नाही हे सांगता येणार नाही..! मात्र आमचं ,आपल्या जन्मभूमीवर व तेथील सर्व माणसांवर निस्सीम प्रेम आहे..! ❤️ आम्ही जे कुणी पालखेडकर बाहेरगावी स्थायिक झालेले आहोत,आमची तुम्हा दोघांकडून नम्र अपेक्षा एकच आहे की, आपल्या जन्मभूमीची कीर्ती सर्वदूर पसरवा..! 🙏🏻

वंदे मातरम्..!

वरील दोन्ही मित्रांना त्यांच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा एक स्थलांतरित बिगर राजकीय पालखेडकर : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव, पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक: ९ जानेवारी २०२०, गुरुवार.

मंगळवार, ७ जानेवारी, २०२०

" मला भारत देश सापडला..! "










मला प्रवासात भेटलेली माणसं..!

" मला भारत देश सापडला..! "

   ===============================                                      

आज दिनांक ८ जानेवारी २०१८ रोजी  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकलहेरा ,ता.गंगापूर या शाळेत मधल्या दीर्घ सुट्टीत , इ.४ थी मधील सागर च्या हाताच्या कोपऱ्याला थोडेसे खरचटले होते.लगेच विजय ,सागरला स्वतच्या घरी घेऊन गेला, सोबत सतीश होता. घरगुती व आयुर्वेदिक उपचार म्हणजे हळद..! सागरच्या थोड्याशा जखमेवर विजयने हळद लावली अन् सोबत एका पुडीत देखील बांधून दिली..!कारण सागर दूर मळ्यात राहतो..!शाळा सुटल्यावर जखमेवर लावायला..! हे सर्व मला त्या वर्गात गेल्यावर समजले..!

वास्तविक मी या वर्गाला शिकवत नाही,पण जेंव्हा,जेंव्हा आसपास अंतर्मुख करायला लावणाऱ्या घटना घडतात,तेंव्हा मी त्यांच्या वर्गशिक्षकांची आदरणीय कल्याणराव डमाळे सर यांची  परवानगी घेऊन या चिमुकल्यांच्या वर्गात जातो..! अंतर्मुख होऊन,आपला भारत खरा कसा आहे हे शोधायला..! हा वर्ग मला खूप खूप आवडतो..!मी दिवसातून एकदा तरी या इ.४ च्या वर्गात हमखास जातोच..आयुष्यातील बरेच काही शोधायला..आणि मला या वर्गात अंतर्मनातील आनंद नक्की सापडतो..!  

मग या ठिकाणी मला आपला भारत देश प्रत्येकवेळी नक्कीच सापडतो..! 
आणि विश्वास पटतो, तो बऱ्याच थोर राष्ट्रपुरुषांच्या अस्तित्वांचा..! 
विश्वास पटतो त्यांच्या असण्याचा..! 
विश्वास पटतो,तो त्या राष्ट्रपुरुषांनी न बघितलेल्या एकमेकांच्या जातींचा..!
विश्वास पटतो, तो माझे मी अनुभवलेले बालपण अजूनही शिल्लक आहे,या मुलांमध्ये याचा..!
आणि सर्वात विश्वास पटतो तो अजुनही या भारतात बरेचजण भारतीय आहेत याचा..! 

मी हा प्रसंग पाहून व ऐकून खूप अंतर्मुख झालो..!
किती छोटी छोटी मुले ही,यांना फक्त आणि फक्त प्रेम,जिव्हाळा माहीत..!यांच्या भावविश्वात " जात " हा रोग अजुन शिवलेला नाही..!त्यांना ना जातीचा अहंकार शिवलेला ना न्यूनगंड आलेला..!ते मस्तपैकी जगत आहेत..एका सुंदर व गोड भावविश्वात..! कारण ती लहान आहेत म्हणून..! माणूस जसजसा मोठा होत जातो,तसतसा तो प्रत्येकात  बरेच काही शोधून मग मदत करायची की नाही हे ठरवत पुढील मुल्यहिन आयुष्य व्यतीत करत जातो..!  ही मुले ,ज्या भावविश्वात सध्या मैत्रीपूर्ण जगत आहेत,त्यात त्यांना खूप आनंद मिळतोय,तो घेऊ द्या त्यांना..! हाच आपला भारत देश आहे, सर्व राष्ट्रपुरुषांच्या अंतर्मनातील..!
                                                                                            
ता.क.: मी या मुलांची आडनावे मुद्दामहून लिहिली नाहीत..!कारण बरीच मोठी माणसं आडनावावरून जात शोधण्याचा किळसवाणा प्रकार करतात..!

वंदे मातरम्..!

लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव 

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

 फेसबुकवर लिखाण दिनांक :८/१/२०१८ व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: ८/१/२०२०, बुधवार

सोमवार, ६ जानेवारी, २०२०

सिध्दहस्त लेखक- विजय तेंडुलकर सर..!




चिंतन  ©️

सिध्दहस्त लेखक- विजय तेंडुलकर सर..!

=================================

आज ग्रेट मराठी लेखक आदरणीय विजय तेंडुलकर सर,
यांचा जन्मदिन आहे.( ज. दि.६ जानेवारी १९२८)
त्यानिमित्त त्यांच्या सिध्दहस्त लेखणीला विनम्र अभिवादन..! 🙏🏻

विजय तेंडुलकर सर यांच्या लेखणीतून " सिंहासन " सारखा अत्युत्कृष्ट मराठी चित्रपट तयार झाला अन् त्या सगळ्या सफेदपोष लोकांना उघडं नागडं केले जे स्वतःला साळसुदपणे सर्व सामान्य लोकांच्या समोर प्रस्तुत करत असतात. जब्बार पटेल सर दिग्दर्शित अन् विजय तेंडुलकर सर यांची उत्त्तम पटकथा असलेला सिंहासन हा चित्रपट संपूर्ण विश्वातील राजकीय विषयावरील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे. सिंहासन चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेम मध्ये बेरकी राजकारणी अन् बेरकं राजकारण क्षणोखणी दिसतं.

शह प्रतिशह, कुरघोडी यावर भाष्य केले आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजकीय नेत्यांचे असलेले अनैतिक संबंध  यावर देखील यात कळत नकळतपणे काही दृष्यातून भाष्य करण्यात आले आहे. तेच अनैतिक संबंध प्रत्यक्षात काहीजणांच्या आयुष्यात धुरळा उडवून गेले. 

आदरणीय विजय तेंडुलकर सर यांचं साहित्य जर वाचायचे अन् पाहायचे असेल तर एकांगी विचार करणारा   ते वाचू शकत नाही अन् पाहू देखील शकणार नाही. अशांनी ,सरांचे साहित्य वाचायचे अन् पाहायचा तिळमात्र प्रयत्न देखील करू नये,ते अशांच्या सर्व प्रकारच्या तब्येतीला हानिकारक नक्कीच ठरेल..!😊

शांतता कोर्ट चालू आहे, सामना,सिंहासन,सखाराम बाईंडर,घाशीराम कोतवाल,उंबरठा इत्यादी अनेक दर्जेदार कलाकृती आदरणीय विजय तेंडुलकर सर यांच्या लेखणीतून उतरलेल्या आहेत. ज्या सर्व त्या तथाकथित सर्व ढोंगी मानसिकतेच्या लोकांना पार उघडं-नागडं करून आपल्या समोर प्रस्तुत करतात.

डॉ.श्रीराम लागू, निळू भाऊ फुले, नाना पाटेकर, डॉ.गिरीश कर्नाड सर,स्मिता पाटील,सयाजी शिंदे, सुलभा देशपांडे इत्यादी अनेक मराठी कलाकारांना एक सक्षम अभिनेता,अभिनेत्री म्हणून जी ओळख मिळाली,त्यात आदरणीय विजय तेंडुलकर सर यांच्या सिद्धहस्त लेखणीचा खूप मोठा वाटा होता.

समजातील अचूक वैगुण्यावर बोट ठेवून लेखन करणारा असा लेखक होणे नाहीच...!

आपण मराठी माणसं खरंच खूप नशीबवान आहोत,अशी शब्दप्रभूंची अनेक लेकरे आपल्या मराठी साहित्यात जन्माला आली. त्याबद्दल आपण रसिक वाचकांनी त्या जगाच्या नियंत्याचे त्रिवार आभार मानायला हवेत..! 🙏🏻

वंदे मातरम्..!

एक वाचक तथा रसिक नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव. ©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:६जानेवारी २०२०,सोमवार.

शनिवार, ४ जानेवारी, २०२०

" अभिनय सम्राट दिलीपकुमार..!"



" अभिनय सम्राट दिलीपकुमार..!"
====================================
                                       
दिलीपकुमार यांचा अभिनय म्हणजे त्या त्या भूमिकेत त्यांनी ओतलेला त्यांचा प्राण...! काही क्षणासाठी कसा अतिउत्कृष्ट अभिनय करावा याचे मूर्तीमंत अभिनय विद्यापिठ म्हणजे दिलीपकुमार..!

खालील सूभाष घई दिग्दर्शित 'कर्मा 'चित्रपटातील गाण्यात ज्यावेळी नूतनजी गाणे म्हणण्यास प्रारंभ करतात त्यापूर्वी दिलीपकुमारजी केवळ मूकअभिनयाद्वारे चेह-यावर हावभाव व्यक्त करतात की,
"आता तू म्हण किंवा गा! "
(हात वर करून, डोके काहिसे हलवून)  .

काय अप्रतिम अदाकारी आहे ही...! काही क्षणासाठी, खूप काही सांगण्यासाठी, काहीही शब्द न उच्चारता मनोभाव व्यक्त करणे... खूपच कठिन अभिनय प्रसंग आहे! परंतू दिलीपकुमारांनी एवढा कठिण ' काही क्षणासाठी  केलेला अभिनय 'लिलया व्यक्त केलाय...!

 मी, 1995 पासून या छोट्याश्या परंतू अप्रतिम अदाकारीने प्रभावित झालेलो आहे. क्लोज शूटींगमध्ये चेह-यावरील हावभावांना अनन्यसाधारण महत्व असते आणि ते महा कठिण काम दिलीपकुमारांनी ते खालील गीतात काही क्षणाकरिता उत्कृष्टपणे व्यक्त केलय...!

अलिकडील काळात रामगोपाल वर्मा दिग्दर्शित 'सरकार' चित्रपटातील अमिताभ बच्चनजींची क्लोज अप मध्ये केलेली  बहुतांशी  अभिनयाची दृश्ये ही देखील संवादरहित पण क्लोजअप मध्ये व्यक्त केलेली अप्रतिम अदाकारी आहे!  पण कर्मा चित्रपटातील खालील गाण्यातील नूतनजींच्या गाणे म्हणण्यापूर्वीची अदाकारी म्हणजे  अशा अभिनयातील कोहिनूर कोंदण.!

ग्रेट सँल्युट दिलीपकुमार साहेबांना..!

"वंदे मातरम्...!

नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

 फेसबुक वर लेखन दिनांक :४ जानेवारी २०१७ व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: ५/१/२०२०, रविवार

बुधवार, १ जानेवारी, २०२०

" एक अवलिया साहित्यिक, कलाकार कादरखान..! "





चिंतन

" एक अवलिया साहित्यिक, कलाकार कादरखान..! "

=================================
समयसूचकता अन् त्या आधारावर अतिशय उत्कृष्ट अभिनय याचे सर्वोत्तम उदाहरण असलेले दोन महान नट आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीत झाले आहेत..! त्या नटांपैकी  आपल्या हिंदी चित्रपट  सृष्टीत  एक होते अन् त्यातील एकजण सध्याला आहे..!
त्यातील एक गोविंदा आहेत अन् दुसरे....कादरखान साहेब..होते..!
कादरखान,यांचं आयुष्याची चित्तरकथा  जर आपण त्यांच्या मुखातून ऐकली तर आपल्या सारख्या सुखवस्तू कुटुंबातील माणसांच्या , जे भावनाशील असतील त्यांच्या हृदयाचे स्पंदन चिरचिर होऊन जाते..! अगदी कफल्लक कुटुंबातून तावून सुलाखून निघालेल्या या महान कलाकाराचे आयुष्य आज त्या सर्व भारतीयांना पथदर्शक आहे,ज्यांना कोणतेही पाठबळ मिळत नाही..!
कादरखान यांच्या आईने ,त्यांना शिक्षणाचं स्वप्न दाखवलं अन् त्याच मार्गावर अविरत चालण्याचे बाळकडू पाजले..! आपल्या आईचा भक्कम पाठिंबा अन् स्वतची जिद्द या बळावर समस्त भारतीय चित्रपट सृष्टीला एक अवलिया साहित्यिक ,कलाकार मिळाला..! आपल्या सिध्दहस्त लेखणीच्या माध्यमातून कादरखान साहेब यांनी अख्या भारतीय चित्रपट सृष्टीला नवसंजीवनी प्राप्त करून दिली..!
कादरखान साहेब,यांचे मूळ ठिकाण अफगाणिस्थान..! तिथून त्यांचे सख्खे आई व वडील आपल्या मुंबईत आले. अतिशय दारिद्र्य अवस्थेतील आयुष्य जगण्यासाठी सर्वांचे आयुष्य  व्यतीत होऊ लागले.एक दिवस कादरखान यांचे सख्खे आई वडील विभक्त झाले.. अन् त्या निष्पाप निरागस कादरखानचे आयुष्य पुन्हा एकदा त्या अंधकारमय आयुष्यात ढकलल्या गेले..! त्या माऊलीचे दुसरे लग्न झाले.मात्र दुर्दैव येथेच थांबणार नव्हते..! कादरखान यांचे सावत्र वडील काहीही कामधंदा करत नसायचे.पुन्हा बाल कादरखान आपल्या सख्ख्या वडिलांकडे जात असे अन् एक..दोन रुपये मागून आणत असे..! ते आणल्यावर दाल रोटी खायला मिळत असे..! या विषयी कादरखान साहेब यांनी स्वतः अनुभव कथन केले आहे.ते ऐकून अंगावर शहारे येतात अन् डोळ्यात अश्रू..!
कादरखान यांना त्यांच्या आईने आयुष्यात एकच मूलमंत्र दिला अन् तो म्हणजे..." तू पढ..!"
जो मूलमंत्र घेऊन कादरखान साहेब ,आपल्या कफल्लक आयुष्याला कलाटणी देण्यासाठी अहोरात्र झटत राहिले..! अखेर त्यांच्या आईने दिलेल्या " तू पढ..!" या मुलमंत्राचा  विजय झाला अन् भारतीय चित्रपट सृष्टीला एक अवलिया साहित्यिक कलाकार मिळाला..! हे फक्त साध्य झाले ते शिक्षणामुळेच..!  " तू पढ " या मूलमंत्रामूळेच..!
ज्या तरुण वयात इतर मुलं ऐष करत होती त्यावेळी ,त्याच वयात कादरखान साहेब,आपल्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी अहोरात्र झटत होते..!त्यांच्या आयुष्यात ज्या वेळी तारुण्याचा आनंद घ्यायला हवा होता तो नाही घेता आला..! कारण पुढील  आयुष्य जर सुखी अन् सन्मानाचे जगायचे असेल तर आजच्या माझ्या तारुण्यातील मौजमजा करण्याच्या सवयींना तिलांजली द्यावीच लागेल असा दृढनिश्चय कादरखान यांनी केला होता..! जेंव्हा कादरखान साहेबांच्या  आयुष्यात सर्व ऐहीक सुख लाभले तेंव्हा तारुण्य निघून गेले होते..!
शिल्लक राहिल्या होत्या त्या अतिशय कष्टप्रद आठवणी..! त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर...
" जिंदगीने ऐश नहीं कराया..!
जब खाने का वक्त था,तब रोटी नहीं मिली..!
और जब रोटी आयी तो....भूक मर गई..! "
कादरखान साहेबांच्या असणाऱ्या विनोदी लेखन,अभिनय यावरून एक गोष्ट सहजपणे लक्षात येते की,प्रत्येक विनोदी माणूस,हसमुख माणूस आपल्या हसऱ्या चेहऱ्याच्या मागे एक पूर्वाश्रमीचे दुःख घेऊन वास्तवातील जगाला आपले हसरे रूप दाखवत असतो..! वास्तविक अशा जगाच्या दृष्टीने या हसऱ्या चेहऱ्याच्या मागे एक प्रचंड संवेदना असते..! पूर्वाश्रमीची खोलवर रुतलेली वेदना असते..!
अशीच माणसं हसरी का असतात...?
तर माझ्या मते....
अशाच माणसांना सुखाची किंमत माहीत असते..!
अशीच माणसं ,आपल्या पूर्वाश्रमीच्या दुःखाला आजच्या वर्तमानात हसवत असतात..!
अशीच माणसं आपल्या जुन्या दुखांना म्हणत असतात की, " तू खूप भोगले आहे,आता तू हसण्याचा आनंद घे..!"
नियतीने, पूर्वाश्रमीच्या दुःख सोसलेल्या माणसांना एक निसर्गदत्त भेट दिलेली असती अन् ती म्हणजे...

"हमें तो आदत हैं मुस्कुराने की..!
मगर ये भी एक आदत हैं गम छुपानेकी..!!"

आज कादरखान साहेब, या थोर अवलिया साहित्यिक कलाकाराचा स्मृतिदिन आहे..!
( मृत्यू दिनांक: १/१/१९)
त्यानिमित्त त्यांच्या खडतर आयुष्याला विनम्र अभिवादन..!

वंदे मातरम्..!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले
दिनांक: १ जानेवारी २०२०, बुधवार.