चिंतन ©️
" संयमित माणसाचे लक्षण,सीताफळ खाणं..!" 😋
==============================
खऱ्या संयमी माणसाची ओळख सीताफळ खातानांच होत असते..! कारण, सीताफळ खाणं हे ताप्पड माणसाचं कामच नाही.सीताफळ खाताना सगळं कसं संयमित वर्तन त्यातल्या त्यात तोंडातले संयमित वर्तन ठेवावे लागते तेंव्हा कुठे सुमधुर आनंद प्राप्त होतो..! हेच सीताफळ खाण्याचे काम ताप्पड माणसाने केलेच, तर एकतर त्याची स्वतः ची चिडचिड होऊ शकते किंवा तोंडाच्या आतील दात अन् जीभ यांच्यात द्वंद्व निर्माण होऊन तोंडातील अपघात होऊ शकतो..!
सीताफळ खाताना एका एका शत्रूला ( सीताफळाच्या बिया ) शोधून, गरागरा गोलगोल फिरून त्याला खिंडीतून हाकलून द्यावे लागते.एकेका शत्रूला युद्ध भूमीवरून हाकलून दिल्यावर शत्रूने आपल्या सभोवती गुंडाळलेली मधुर संपदा प्राप्त होते अन् मग तेंव्हा कुठे विजयश्री खेचून आणल्याचा आनंद सोहळा साजरा होतो..!
सगळेच शत्रू कठीण कवच धारण करून जीभ अन् दात यांच्याशी गरागरा गोलगोल लढाई करणारे नसतात. तर काही शत्रू हे खूपच नम्र असतात. जीभ अन् दात यांच्या समोर सपशेल शरणागती पत्करून स्वतः ला जीभ अन् दाताच्या स्वाधीन करतात..!
ज्याला कुणाला सीताफळ खायचे असेल त्याला खाद्य संस्कृतीच्या विश्वातील सुनील गावस्कर किंवा राहुल द्रविड व्हावे लागते, तेंव्हाच कुठे संयमित वर्तन ठेवून टुकुक टुकुक एकेका चेंडूला तडकवून विजय मिळतो. सीताफळ खाताना वीरेंद्र सेहवाग होऊन जमत नाही..!
सीताफळाच्या विरुद्ध हे युद्ध वर्षभर सुरू नसते.साधारणत: हिवाळ्याच्या दिवसांत यात रंगत चढते..!आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातील देवगिरी परिसरात सीताफळाच्या भरपूर स्पर्धा दरवर्षी विशेष करून आयोजित केल्या जातात..! निदान मराठवाडा या बाबतीत तरी नशीबवान म्हणावा..! कारण सीताफळाच्या झाडांना नैसर्गिक पाणी मिळाले तरी ते बिचारे गुप गुमाणपणे वाढते अन् खवय्यांची भूक शांत करते..! नशीब, सीताफळ पाणथळ भागातील इतर सुमधुर फळांसाठी, पिकांसाठी आंदोलन करत नाही..!🙏🏻
असो, आता पुरे करतो अन् शिल्लक राहिलेले सीताफळ संयमित वर्तन ठेवून मस्तपैकी खाऊन टाकतो..!😋🙏🏻
वंदे मातरम्..!
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक -२४/१०/२०२१, रविवार