रविवार, २० जून, २०२१

" जिवलग बालमित्रा, रमेश ..! "


 

आमचे गाव आमची माणसं..!


" जिवलग बालमित्रा, रमेश ..! "


===================================


खूप जिवलग बालमित्र रमेश भानुदास गायकवाड..! मूळ रा.पालखेड, ह.मु. औरंगाबाद


आज तुझ्या काळजाचा तुकडा ,रेणुका दिदीचे शुभ मंगल कार्य पार पडले..! एका वधू पित्याची होणारी भावनिक घालमेल मी, दिवसभर पाहत होतो.येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांची सरबराई करणारा वधू पिता अन् त्याच सरबराईत स्वतः चे देहभान हरपून गेलेला माझा खूप जिवलग बालमित्र रमेश ,हे दोन्ही रूपं निव्वळ समर्पण भावनेने तू आज जगलास मित्रा..! स्वतः ला आपल्या लाडक्या लेकीच्या मंगल कार्यात जो कुणी वधू पिता समर्पण भावनेने आलेल्या गेलेल्यांची आत्मीयतेने पूजन करत असतो, त्यावेळी तो वधू पिता, त्या समस्त वधू पित्यांच्या कृतीतून व्यक्त केलेल्या भावनांचे प्रतिनिधित्व करत असतो..! मित्रा रमेश, आज तू, त्या समस्त पित्यांचे खूप आत्मीयतेने अन् तितक्याच भावुकतेने प्रतिनिधित्व केलेस..!


याच माझ्या जिवलग बालमित्र रमेश वर मी यापूर्वीच माझ्या ब्लॉगवर एक लेख लिहिलेला आहे.


विश्वास अन् रमेश ,या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू..! एखाद्या व्यक्तीवर आपल्या आई वडीलांसारखा डोळेझाकून विश्वास ठेवावा ,अगदी त्याच योग्यतेचा माझा प्रिय बालमित्र तथा वर्गमित्र रमेश..! माझ्या आयुष्यात काही मित्र असे आहेत की,ज्यांच्यावर मी, जो विश्वास माझ्या आई वडिलांवर ठेवायचो,त्याच तोडीचे असे ते मित्र आहेत..! त्यात जिवलग बालमित्र रमेश गायकवाड, डॉ.संजय राऊत आणि डॉ.गणेश पा. वाणी सर्वोच्च स्थानी आहेत..! योगायोग असा की, याच लेखात ज्यावेळी मी माझा जिवलग बालमित्र डॉ.गणेश वाणी याचा उल्लेख करत होतो , नेमक्या त्याचवेळी गणेश वाणी याचा मला फोन आला..! काही योगायोग माणसाच्या आयुष्यात नात्यांची खोली दर्शवितात..! ज्या विश्वासाने आपण आपल्या आई वडिलांच्या स्वाधीन आपल्या सर्वस्वाला करतो, अगदी त्याच विश्वासाने आपण आपल्या सर्वस्वाला मित्रांच्या स्वाधीन करावे अन् निश्चिंत राहावे..! हा विश्वास अन् त्या योग्यतेची माणसं, सहज भेटत नसतात..! त्यासाठी नशीब अन् नैतिकता वागण्यातून निर्माण करावी लागते..!


प्रिय बालमित्र रमेश, हा माझ्या स्व.वडिलांचा आदर्श होता, यावरून रमेशची योग्यता सहज लक्षात येईल..! ज्या कठीण अन् गरिबीच्या विवंचनेतून दोघांनीही स्वतः ला समाजात उभे केले होते,माझ्या मते हेच एकमेव कारण दोघांच्याही निस्सीम मैत्रीचे होते. माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांनी माझ्या मोजक्या मित्रांना खांद्यावर हात टाकून शाबासकी दिली होती, त्यात प्रिय बालमित्र रमेश हा एक होता..! 


ग्लॅमर अन् चकाकी असलेल्या माणसांच्या आयुष्यात सर्व सामान्य माणसांची किंमत काय असते, याविषयी व्यक्त व्हायचे झाल्यास त्यावर स्वतंत्र लेख लिहावा लागेल. ग्लॅमर अन् चकाकी असलेली माणसं, सर्व सामान्य माणसाला आपली कधीच जाणवत नाही..! अशी माणसं राहून राहून परकी जाणवतात.अशा माणसांच्या आयुष्याचा होरा अन् तोरा हा सर्व सामान्य माणसाला सतत परकेपणाची जाणीव करून देत असतो..! फक्त अशी जाणीव करून देणं कधी दृश्य स्वरूपात असते तर कधी सुप्त स्वरूपात..! मी अशा ग्लॅमर अन् चकाकी असलेल्या माणसांपासून मनाने दुरुन डोंगर साजरे या पद्धतीने राहतो..!

 

माझा हा खूप जिवलग बालमित्र रमेश, जगाच्या दृष्टीने असणाऱ्या तथाकथित ग्लॅमर ,चकाकी असलेल्या आयुष्याचा घटक नाही. प्रिय बालमित्र रमेश, याचे एक चहाचे दुकान, औरंगाबाद येथील मुकुंदवाडी बस स्टॉप वर आहे..!प्रिय बालमित्र रमेश खूप कष्टातून इथपर्यंत आला आहे.मी जेंव्हा पासून औरंगाबाद येथे स्थायिक झालो होतो तेंव्हा पासून माझे स्व.तीर्थरूप वडील मला याच्या चहाच्या हॉटेलवर घेऊन जायला सांगायचे अन् मग मीही माझ्या संपूर्ण कुटुंबासह जायचो..! वास्तविक माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांनी आयुष्यात कधी बाहेर हॉटेलमधील चहा, नाष्टा केला नाही,पण या नियमाला प्रिय बालमित्र रमेश अपवाद असायचा..! प्रिय बालमित्र रमेश याची भेट झाली, की माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांना खूप मोकळे वाटायचे..! जणू त्यांचा बालमित्रच भेटला..! माझ्या दृष्टीने तो एक मानसोपचार असायचा, एका ज्येष्ठ नागरिकाच्या अंतर्मनावर केलेला..! जो पर्यंत माझे स्व.तीर्थरूप वडील हयात होते तो पर्यंत जेंव्हा जेंव्हा प्रिय बालमित्र रमेश आमच्या घरी यायचा तेंव्हा तेंव्हा आम्हा कुणालाही अगोदर भेटण्याऐवजी सर्वप्रथम माझ्या तीर्थरूप वडिलांना भेटायचा..!


आज ज्यावेळी मी प्रिय बालमित्र रमेश यांच्या कन्येच्या लग्न सोहळा आटोपून माझ्या घरी निघताना निरोप घेत होतो,त्यावेळी आम्हा दोघांचेही डोळे भरून आले होते..! आमच्या त्या दोघांच्या भावूक प्रसंगात आम्हा दोघांनाही आमच्या जिवलग नात्याची अन् आम्हा दोघांच्या स्व.आई वडिलांची जाणीव जाणवत होती..! शेवटी माणसाच्या आयुष्यात यापेक्षा दुसरे काही असते का..? माझ्या मते अजिबात नाही..! मोजकी माणसं अन् मोजक्या आठवणी भावूक माणसांना जगातील सर्वात श्रीमंत बनवत असतात..! अशीच मोजकी माणसं अन् मोजक्या आठवणी माणसाला मानसिक रोग होण्यापासून दूर ठेवण्यासाठी संजीवनी औषधाच्या मात्रांच्या रूपाने उपयोगी पडतात..! आमच्या सर्वोच्च भावूक नात्याला माझी पत्नी बाजूला उभे राहून पाहत होती..!


असो, चि.सौ.का.रेणुका दीदी अन् जावई बापू आपणास आजच्या शुभ मंगल प्रसंगाच्या अन् पुढील वैवाहिक आनंदी आयुष्याच्या माझ्या कुटुंबाकडून मनःपुर्वक शुभेच्छा..!🌹🌹🙏🏻


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


विवाह सोहळा दिनांक - २०/६/२०२१, रविवार.

सोमवार, १४ जून, २०२१

" आम्हाला वाढू द्या..जगू द्या..!"🌳


 


चिंतन


" आम्हाला वाढू द्या..जगू द्या..!"🌳🌳🌿🌱🍀🌳🌳


=========================


मी आज दिनांक १५ जून २०१९ रोजी भल्या सकाळी जन सहयोग परिवार औरंगाबाद च्या वतीने वृक्षारोपण अन् संवर्धन करण्यात आलेल्या डंपिंग ग्राउंड, गोलवाडी फाटा, सैनिकी क्षेत्र येथे गेल्यावर खूप कोवळी अन् लुसलुशीत पाने नजरेत भरली..!


पान होतं पिंपळाचं...!🍃🍃🍃

त्या पानाच्या मनातील भावना अन् संवेदना मला म्हणू पाहत होते की,

" आम्ही आता पृथ्वीवरील सर्वात हुशार प्राण्याच्या म्हणजेच माणसांच्या सानिध्यात प्रवेश करण्यास सज्ज झालो आहे..! आमच्या हिरव्यागार सौंदर्यानं मोहित होऊन,आमच्या सर्वांगावर आमचे विविध सगे,सोयरे जसे की, किडे, मुंग्या, मुंगळे,पक्षी इ.आपापली संस्कृती वाढवतील..! मला त्या नयनरम्य संस्कृतीला अजुन फुलवायला, जोपासायला माझे अख्खे आयुष्य वेचायला आवडेल अन् ते कार्य मला खूप खूप समाधान देऊन जाईल..!


पण.....माझे हेच हिरवेगार नयनरम्य सौंदर्य पाहून कुणीतरी नराधम माझ्याकडं आकृष्ट होईल अन् माझ्या या कोवळ्या, लुसलुशीत सौंदर्यावर,माझ्या वाढलेल्या सौंदर्यावर त्याच नराधमाने विकसित केलेले हत्यार चालवून माझी हत्या करील..! मी जरी मुका असलो तरी माझ्या सर्वांगातून माझ्या वेदना फुटून माझे मुक रुदन सुरू होईल..!माझ्या सर्वांगावर ज्यांनी..ज्यांनी आपली संस्कृती जोपासली,ती सर्व माझी सगे सोयरे त्याच वेळेला अनाथ होऊन ,ते सुध्दा दुःखाच्या काळ्याशार डोहात गडप होतील..!


मला फक्त आणि फक्त देणं माहीत आहे...अन् पृथ्वीवरील सर्वात हुशार प्राण्याला म्हणजेच माणसाला फक्त आणि फक्त माझ्याकडून घेणं माहीत आहे..! किती हा कृतघ्नपणा..?


पण..मी अन् माझे इतर कुळातील इतर वृक्ष आम्ही "जनसहयोग परिवार औरंगाबाद च्या " सानिध्यात स्वतः ला खूप सुरक्षित समजतो..! त्याचे कारण या परिवारातील प्रत्येक सदस्य आम्हा सर्व वृक्षांना आमच्यापैकीच एकजण वाटतो..! ज्या ज्यावेळी जनसहयोग परिवार चे सदस्य आमच्या सानिध्यात येतात,त्यावेळी आम्ही खूप आनंदित होऊन जातो.आम्हाला झालेला आनंद आम्ही व्यक्त करू शकत नाही पण जनसहयोग परिवार चे सदस्य तो आमचा आनंद समजून घेऊन,अंतर्मनात जाणून आम्हाला आंजारतात.. गोंजारतात..!यावेळी आम्हाला आकाश ठेंगणं होतं..! 


निसर्गाच्या त्या विधात्याकडं आम्हा सर्व वृक्षांची 🌳🌳एकच मागणी आहे अन् ती म्हणजे...

" या पृथ्वीवर जिथं..जिथं आमचे इतर वृक्ष भाऊबंद ,इतर कुळातील वृक्ष असतील त्यांना आमच्या प्रेमळ जनसहयोग परिवार सारखे मायाळू सदस्य त्यांच्या सानिध्यात लाभू दे..!"


वंदे मातरम्🌳🇮🇳🌳


लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


सौजन्य: जनसहयोग परिवार औरंगाबाद🌳🌱🌿


स्थळ: गोलवाडी फाटा, डंपिंग ग्राउंड सैनिकी क्षेत्र वाळूज रोड, औरंगाबाद


दिनांक: १५ जून २०१९ ची रम्य सकाळ.

गुरुवार, १० जून, २०२१

" अखेर माझे स्वप्न पूर्ण झालं..! " ☺


 



"आमचे गाव आमची माणसं..!"

" अखेर माझे स्वप्न पूर्ण झालं..! " ☺

==================================

काही स्वप्न माणसाच्या आयुष्यात कुठे तरी मनाच्या कोपऱ्यात लपून बसलेली असतात..!त्यातल्या त्यात जी स्वप्न बालपणापासून मनात बाळगून असतात ती जर प्रौढ वयात पूर्ण झाली तर...

अख्खं आता पर्यंत जगलेलं आयुष्य सार्थकी झाल्या सारखं वाटतं..! आयुष्य कृतार्थ झाल्या सारखं वाटतं..!☺
असंच माझे एक बालपणापासूनचं स्वप्न होतं की,
" मी हातात पाण्याची नळी धरून कधी ते पाणी भांड्यात किंवा  जमिनीवर त्या नळीद्वारे पाणी कधी तरी टाकील..!"
पण दिनांक ७ जून २०१९ पर्यंतचे  माझे सगळे आयुष्य याच स्वप्नाची वाट पाहण्यात गेले..!आणि अखेर तो गोड दिवस उजाडला...७ जून २०१९ रोजी.. !

निमित्त होतं आमच्या जनसहयोग परिवार औरंगाबाद च्या वतीने वृक्षारोपण करण्यात  आलेल्या झाडांना पाणी देण्याचं..! माझं हे स्वप्न पूर्ण करून दिल्या बद्दल आमच्या जनसहयोग परिवार चे प्रमुख प्रिय प्रशांत भाऊ गिरे , इतर सदस्य व पाण्याचे टॅन्कर चालक प्रिय नाना भाऊ तुमचे खूप खूप धन्यवाद..!🙏🏻

आता बऱ्याच वाचक मित्रांना मुख्य प्रश्न  पडला असेल की, 
" एवढं क्षुल्लक स्वप्नं पूर्ण व्ह्यायला इतके दिवस कसे काय लागू शकतात..?"
तर अशांसाठी मी फ्लॅश बॅक मध्ये जाऊन आमच्या प्युवर दुष्काळी परिस्थितीचे प्रत्यक्ष जगलेल्या आयुष्याची चित्तरकथा सांगतो..!

----------------------
मी पालखेडला लहानाचा मोठा झालो...तीव्र पाणी टंचाई सोसत..सोसत...! त्यावेळी पाणी विकत मिळण्याची सुविधा नव्हती, म्हणून गावाबाहेरील आडावरून पाणी शेंदून आणण्याशिवाय पर्यायच नव्हता..! त्यावेळी आमच्या कुणाही भावंडांचे लग्न झालेले नसल्याने माझी आई गावाबाहेरील आडावरुन पाणी शेंदुन आणायची..!
तेंव्हा पण नळीद्वारे पाणी भरण्याचे स्वप्न अपूर्णच राहिलं..!

दिवसामागून दिवस जात होते. पालखेड गावात,घरी तसे नळ होते म्हणा...कधी मधी इतकुसं पाणी येण्या पुरते..! ते पण खोल खड्ड्यात उतरून पाणी भरावे लागे..! कुणी  एखादा पाहुणा आला तर मोठ्ठ्या कौतुकाने सांगायला...
" आमच्याकडे नळाला पाणी येते बरं का...!" 
पण जर का तो पाहुणा मुक्कामी राहिलाच तर सगळे बिंग फुटायचे,  कारण नळ  फक्त फुशारकी मारण्याचे दृश्य साहित्य होते..!☺ मग काय...पाहुण्यांच्या बाया सुध्दा पाणी आणायला..घरातील स्रीयांसोबत आडावर....! ☺
तेंव्हा पण नळीद्वारे पाणी भरण्याचे स्वप्न अपूर्णच राहिलं..!

मी नोकरीला लागल्यावर आमच्याकडे मोटार सायकल राजदूत गाडी होती.  तिच्यावर कॅनने, गावापासून अंदाजे २ किलोमीटर अंतरावर असलेल्या परसराम रोठे पाटील यांच्या शेतातून पाणी आणू लागलो..!
तेंव्हाही नळीद्वारे पाणी भरण्याचे स्वप्न अपूर्णच राहिलं..!

पालखेड गावाच्या पश्चिमेला बाळाबाई  क्रिकेट मैदानाच्या जवळ के. टी.त्रिभुवन भाऊ यांच्या घरासमोर एक हातपंप होता..! तिथूनही मी सायकलवर तीस लिटरच्या कॅन अडकवून पाणी आणू लागलो..! त्यावेळी मला सोबत असायचे...प्रमोद राऊत ( बबलू ) ,गणेश भेंडे ही धडधाकट तरणाबांड मुलं..! गणेश भेंडे व प्रमोद राऊत ही दोन्ही मुले पाणी हापसायला लई तरबेज..!
तेंव्हाही नळीद्वारे पाणी भरण्याचे स्वप्न अपूर्णच राहिलं..!

मी लासूर स्टेशन येथे माझ्या आयुष्यातील १६ वर्ष काढली, तीव्र पाणी टंचाई सोसत..सोसत...आणि त्याचा मला खूप खूप अभिमान  देखील वाटतो..! अभिमान वाटण्याचे कारण असे की, पालखेड येथील तीव्र पाण्याची टंचाई भाग क्रमांक १ हाच पुढे लासूर स्टेशन येथे भाग क्रमांक २ ने सुरू झाला होता..!☺
इथे पण...नळीद्वारे पाणी भरण्याचे स्वप्न अपूर्णच राहिलं..!

आता काही महिन्यापासून औरंगाबाद येथे स्थायिक झालो आहे...! आता तशी पूर्वी इतकी  पाण्याची तीव्र टंचाई नाही पण गतकाळातील जाणीव नक्कीच आहे..पाणी जपून वापरण्याची..! पण ते नळीद्वारे पाणी भरण्याचे स्वप्न अपूर्णच होतं..!

अखेर ते बालपणापासून मनात बाळगून असलेलं स्वप्न दिनांक ७ जून २०१९ रोजी पूर्ण झाले..! आता कुठं माझे आयुष्य कृतार्थ झाल्या सारखं वाटतं..!☺  आम्ही जन सहयोग सामाजिक संस्था औरंगाबाद अंतर्गत गोलवाडी फाटा सैनिकी क्षेत्र, छावणी डंपिंग ग्राउंड , वाळूज- औरंगाबाद रोड , औरंगाबाद येथे जवळ जवळ पाच एकर मध्ये अंदाजे सात हजार पूर्णपणे देशी झाडे लावलेली आहेत.अखेर त्या झाडांना पाणी देण्याचं, निमित्त ठरले ,नळीने पाणी देणे..!

आजही कुणी नाहक पाण्याचा नळीद्वारे गल्लीत सडा मारताना किंवा इतर ठिकाणी वाह्यात पाणी वाया घालतांना पहिलं की, पालखेड अन्  लासूर स्टेशन येथील प्युवर दुष्काळी दिवस आठवतात अन् ते पाणी वाया घालवण्यात स्वतः ला पान कोंबडा किंवा पान कोंबडी समजणाऱ्या नर,नारायणीला या  गावी सोडून द्यावं वाटतं..!☺

असो, पुनश्च एकदा प्रिय प्रशांत भाऊ गिरे व जन सहयोग परिवार औरंगाबाद आपले खूप खूप धन्यवाद..! आपण माझे बालपणापासूनचे  "नळीद्वारे पाणी भरण्याचे स्वप्न पूर्ण करू दिल्या बद्दल..! मी आपले हे उपकार जो पर्यंत माझ्या शरीरात पाणी आहे तो पर्यंत विसरणार नाही..!🙏🏻☺

ता.क.: जे कुणी नर किंवा नारायणी पाण्याचा वाह्यात गैरवापर करत असतील अशांना प्युवर दुष्काळी भागात कित्येक महिने राहायला पाठवावं वाटतं..!

वंदे मातरम्..!

एक प्यूवर दुष्काळी भागातील लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

वृक्षारोपण व संवर्धन स्थळ : गोलवाडी फाटा सैनिकी क्षेत्र, छावणी डंपिंग ग्राउंड , वाळूज - औरंगाबाद रोड , औरंगाबाद.

दिनांक: ११ जून २०१९, मंगळवार.

शनिवार, ५ जून, २०२१

भगवा ध्वज , चिरंतन अस्तित्वाची जाणीव..!

 



चिंतन


भगवा ध्वज , चिरंतन अस्तित्वाची जाणीव..!    


===============================


भगवा ध्वज, आपलं अस्तित्व अन् आपल्या जाज्वल्य इतिहासचे सर्वाभिमुख प्रतीक आहे..! भगव्या ध्वजात सर्व ध्वजांना सामावून घेण्याची पवित्र उदारमतवादी शक्ती आहे..! 


भगवा ध्वज हा पहाटेच्या सुमारास सूर्योदय होण्याचा पूर्वी पसरणाऱ्या धूसर भगव्या प्रकाशा सारखे शांत , शितलतेचे प्रतीक आहे..! भगवा ध्वज हा सूर्योदयाच्या वेळी पसरणाऱ्या भगव्या मंद सूर्य प्रकाशाचे शांत प्रतीक आहे.हाच मंद भगवा सूर्य प्रकाश, आपल्याला आपल्या दररोजच्या सुरू होणाऱ्या आयुष्याला नवसंजीवनी ची प्रेरणा देतो..! हाच भगवा सूर्य प्रकाश,दुपारी ज्यावेळी प्रखरता निर्माण करतो त्यावेळी तो आपल्याला आयुष्यात प्रखरातही खूप आवश्यक आहे हेच दर्शवतो..! हीच प्रखरता आपल्याला कणखर बनवते, हेच या सकाळच्या मूळच्या भगव्या रंगाच्या पण ऐन दुपारी दिसणाऱ्या प्रखर सूर्य प्रकाशाची शिकवण आपल्याला निसर्ग देतो..! ज्यावेळी सूर्य नारायण, अस्ताला जात असतो, त्यावेळी तो पुन्हा आपल्या मूळच्या भगव्या रूपात येतो अन् आपल्या सर्व सजीवांचे आयुष्य देखील असेच जिथून सुरुवात झाले पुन्हा तिथेच संपणार याचं त्याच मूळ स्वरूपात आपल्याला दर्शन घडवून देतो..!


संध्याकाळच्या भगव्या सूर्य प्रकाशाचे अस्तित्वच मुळी पुन्हा उद्या निर्माण होण्यासाठी असते.उद्या पुन्हा तोच भगवा रंग सूर्य प्रकाशाच्या रूपाने, या आपल्या संपूर्ण सृष्टीला आपल्या चिरंतन ,शाश्वत अन् संजीवन अस्तित्वाची जाणीव करून देतो..! कारण तो सूर्य प्रकाशाचा भगवा रंग, आपल्या प्रकाशातून भगव्या ध्वजाचे आरोहण करत आहे, अनादी काळापासून..!🙏🏻


मध्ययुगीन भारताच्या इतिहासात याच भगव्या ध्वजाच्या अस्तित्वासाठी कित्येकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली..! प्राणांची आहुती दिलेल्या कित्येकांच्या जिवंत प्राणांची श्रद्धा सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज हेच होते..! मागचा पुढचा विचार न करता फक्त एकच विचार त्याकाळच्या कित्येकांना माहीत होता,अन् तो विचार होता छत्रपती शिवाजी महाराज..! त्याचं कारणही तसंच होतं.आपल्या अस्तित्वाची निशाणी भगवा ध्वज हा सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाती, आई जिजाऊंनी दिला होता..! त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हा विचार सर्वांना सुरक्षित, विश्वासू अन् पवित्र वाटत होता, आजही आहे अन् भविष्यातही असेल..! 


उगीचच कुणी कुणासाठी आपले प्राण तळहातावर ठेवून कशाला आपल्या आयुष्याचा शेवट करील..? कुणी कुणासाठी आपल्या आयुष्याचा शेवट करायला तेंव्हाच तयार होत असतो जेंव्हा समोरचा आदर्श, जाज्वल्य ध्येयासाठी तितक्याच मोलाचा सत्पुरुष असावा लागतो..! मध्ययुगीन भारताच्या इतिहासात असे सत्पुरुष थोर व्यक्तिमत्व होते छत्रपती शिवाजी महाराज..!


हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी कित्येकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यानंतर रयतेचे राज्य आई जिजाऊ अन् छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेल्या हिंदवी स्वराज्याची जीवनप्रणाली प्रत्यक्षात अस्तित्वात आली..! ६ जून १६७४ रोजी जरी रयतेच्या कल्याणाचा अन् आनंदाचा क्षण प्रत्येक रयत अनुभवत होती,पण माझ्या मते याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या अंतर्मनातून अतिशय भावूक झालेले असणार यात तिळमात्र शंका नाही..! कारण ज्या ज्या मावळ्यांनी, गुप्तहेरांनी, सर्व सामान्य माणसांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते ते सर्वजण त्यादिवशी किल्ले रायगड येथील उत्सवात सहभागी नव्हते..! अशावेळी त्या सर्वांच्या कायमच्या अनुपस्थितीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या असतील,पण डोळ्यांच्या ओल्या कडा दाखवता येत नव्हत्या..! त्याचंही कारण हेच की,बऱ्याचदा कुटुंब प्रमुखाला आपल्या जबाबदारीच्या पदावर असल्यावर आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांसाठी कित्येकदा भावना लपवाव्या लागतात..! अगदी असेच काहीसे छत्रपती शिवाजी महाराज यांचे ६ जून १६७४ रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी झाले असणार..! मात्र आपल्या अंतर्मनातील हा भावनिक हिंदोळा, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आई जिजाऊ यांच्याजवळ नक्कीच व्यक्त केला असेल..! आपल्या अंतर्मनातील भावनिक हिंदोळा व्यक्त करावा, अशी एकच व्यक्ती त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ होती अन् ती महान व्यक्ती म्हणजे आई जिजाऊ..! कोणताही भावूक माणूस आपल्या अंतर्मनातील भावनिक हिंदोळा, कुणाजवळ तरी व्यक्त करतच असतो..!कधी तो व्यक्त होणार भावनिक हिंदोळा सार्वजनिक असतो तर कधी एखाद्या जिवाच्या माणसाजवळ..!


सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज हे त्याकाळी प्रस्थापितांच्या करिता नव्हतेच..! सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी यांचं आयुष्य उपेक्षितांच्या, शोषितांच्या, विस्थापितांच्या करिता खर्ची पडले..!छत्रपती शिवाजी महाराज सारखे कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही..!


भगवा ध्वज , चिरंतन अस्तित्वाची जाणीव असणारा ध्वज..! या भगव्या ध्वजाचा सन्मान आजच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी होत आहे..! त्याबद्दल याच भगव्या ध्वजाच्या अस्तित्वासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या, झटणाऱ्या कित्येक थोर राष्ट्र पुरुषांना विनम्र अभिवादन..!🙏🏻


वंदे मातरम्..! 🚩🙏🏻🚩


व्हिडिओ स्रोत - यु tube


चित्रपट - फत्तेशिकस्त


नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक - ६ जून २०२१, रविवार, 

शिवराज्याभिषेक दिन.