बुधवार, २९ मार्च, २०२३

भेटलेला आनंद


 


मला प्रवासात भेटलेली माणसं.©️


" भेटलेला आनंद..! "


===================================


आज दिनांक २९/३/२०२३, बुधवार रोजी दीर्घ दुपारी प्रवासात असताना माझी बस छत्रपती संभाजीनगर येथील वरद विनायक गणेश चौकात ( मुख्य बस स्थानक जवळील कार्तिकी हॉटेल जवळ ) आली होती. आमची बस, बस स्टँड जवळ आल्यामुळे मी बसच्या दरवाजात येऊन उभा राहिलो होतो.इतक्यात आमच्या बसच्या बाजूला दुसरी बस येऊन थांबली.सिग्नल लागले होते.


माझे लक्ष बाजूच्या बसकडील खिडकीत गेले. एक खूप गोंडस मुलगी , जिचं साधारणतः वय ३ वर्ष असावे ती खिडकीत समोरच्या खूर्चीला धरून उभी होती. त्या बाळाच्या बाजूला एक स्री बसलेली होती.नक्कीच तिची आई असेल. त्या छोट्याश्या दीदींच्या अंगात खूप मळकटलेले कपडे होते. डोक्यावरील केस देखील विखुरलेले होते.मी त्या बाळाकडे बघून तिला टाटा करत हसलो. त्या दीदीला इतका आनंद झाला, की ती त्या सीटवर उड्या मारायला लागली.मी पुन्हा टाटा करू लागलो तर ती पुन्हा आनंदाने उड्या मारू लागली अन् हसू लागली. मी आता मनाशी पक्का निर्णय केला होता की, बाजूची बस , मुख्य बस स्थानकात आली की, त्या बाळाला खाऊ खाण्यासाठी काहीतरी द्यावं म्हणून..! 


इतक्यात सिग्नल सुरू झाले.बाजूची बस मुख्य बस स्थानकात येईल असे अपेक्षित होते,पण ती बस सिग्नल सुरू झाल्यावर सरळ महावीर चौकाच्या ( बाबा पेट्रोल पंप ) दिशेने निघून गेली. मन काहीसे खिन्न झाले.


आयुष्यात ज्यावेळी एखादं कुणीतरी अनोळखी भेटतं अन् त्या भेटीच्या वेळेपुरते ती समोरची व्यक्तिरेखा आपलीशी होऊन जाते. त्यातल्या त्यात त्या भेटीत जर निरागसता भेटली तर मन पहाटेच्या भूपाळी सारखं श्रवणीय होऊन जातं हेच खरं..! मात्र याच मायारूपी मानवी आयुष्यात आपण ज्याला बघून काही क्षणासाठी , वेळेसाठी प्रफुल्लित होऊन जातो, तीच व्यक्तिरेखा जर प्रत्यक्षात भेटली नाही तर मानवी मन खिन्न होऊन जाते. मानवी मनाच्या या दोन्ही बाजू असतात, ज्यावर मानवी संवेदना आरूढ होऊन मनाला सतत हेलकावे खायला बाध्य करत असतात.


आज मला जी अनोळखी छोटी दीदी दिसली अन् त्याच बाळाला मीही दिसलो.एकमेकांच्या अनोळखी नजरेनी आम्ही एकमेकांना जो काही क्षणासाठी आनंद दिला त्याची तुलना कोणत्याही मनोरंजनात होऊच शकत नाही. त्याचं कारण, इथे आम्ही एकमेकांना अगदी निःस्वार्थ हेतूने अन् निष्पाप मनाने साद दिली होती. उगीचच आपण आनंदी व्हावं अन् उगीचच कुणीतरी आपल्यामुळे आनंदी व्हावं याच भोवती माणसाच्या आयुष्याची संहिता गुंफलेली आहे.


आज मी अन् ते छोटेसे बाळ काही वेळेसाठी आनंदी झालो होतो.त्या आमच्या आनंदात कुठलाही स्वार्थ नव्हता.कोणतेही षडरिपू नव्हते. होता फक्त आणि फक्त आनंदाचा देव श्रीकृष्णाचा सहवास..! या भूतलावर आनंदी कसं राहावं अन् आनंद कुठे शोधावा हे प्रत्येकाने आपापल्या परीने शोधण्याचा शोधक प्रयत्न केला. जसा की मी अन् त्या गोंडस दीदीने आज केला. ना आम्हाला कुणी आनंद शोधण्यासाठी प्रवृत्त केले ना कुणी आमच्या दोघांपैकी मुद्दामहून आनंद निर्माण केला.आज आम्हाला जो काही , काही क्षणासाठी आनंद झाला तो आमच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांचा तो दार्शनिक भाग होता.ज्यामुळे आमचं मन प्रफुल्लित झालं.


मी आज दुपारी बसमध्ये होतो अन् ती छोटीशी दीदी देखील बाजूच्या बस मध्ये होती.त्यावेळी मी प्रवासाने अन् धुळीने माखलेल्या अवस्थेत होतो अन् ती छोटीशी दीदी देखील अजिबात श्रीमंतीच्या पोशाखात नव्हती. एवढंच काय, अगदी मध्यमवर्गीय कुटुंबाच्या घरातील मुलांच्या पोशाखात देखील नव्हती. लहान मुलं फक्त दोनच गोष्टी जाणते.एक आनंदी राहणे अन् दुसरी गोष्ट म्हणजे आनंदी राहण्यासाठी रडणे..! या व्यतिरिक्त लहान मुलांना बाकी कशाशी देणंघेणं नसतं. आनंद हा ना कोणती श्रीमंती बघून मिळतो ना कोणते रुपडे बघून मिळतो. माझ्या मते आनंद हा आपल्या मनाला काय भावते त्यावर मनाला निर्भेळ आनंद प्राप्त होत असतो.जसा की आज आमच्या मनाला आनंद मिळाला.


आज मला काही वेळेसाठी , क्षणासाठी जो आनंद झाला होता, त्याची परतफेड त्या आनंदाच्या लेकराला माझ्या कुवतीनुसार काहीतरी गोड देऊन त्या आनंदाची परिपूर्ती करणार होतो.पण तीही संधी मला आनंदाच्या देवाने दिली नाही.येत्या काही दिवसांत माझ्याच शाळेतील अशाच काही आनंदाच्या लेकरांना काहीतरी गोड देऊन त्या आनंदाची भरपाई नक्कीच भरून काढील..! कारण आनंदाचा कोणताही क्षण असाच वाया घालवायचा नसतो हेच मानवी आयुष्याचे सार आहे..! त्या योगेश्वराचा तोच तर संदेश आहे..!😊🙏🏻

आनंदला वय नसतं , असतं फक्त निरागस प्रेमळ मन..!🌹


वंदे मातरम्


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक: २९ मार्च २०२३, बुधवार.

सोमवार, २७ मार्च, २०२३

" रसिकांची रसिकता...!"


 

आमचे गाव आमची माणसं ©️


" रसिकांची रसिकता...!"


===================================


रसिक नसलेलं मन , एखाद्या वाळवंटातील काटेरी झुडपा सारखं असतं.रसिक असलेलं मन, कलाकृतींना आपल्या मनाला सतत प्रफुल्लित ठेवण्यासाठी एखाद्या औषधा सारखं उपयोगात नेहमी आणत असतं.ज्याला मन अन् ज्या मनाला भावना असतात अशांनीच रसिकांची रसिकता जपलेली आहे. रसिक असलेलं मन नटरंग देवतेची पाठराखण करत असते. कारण रसिक मनाला पुरेपूर ठाऊक असते की, मनाच्या आजारावरील सर्वोत्तम औषध कोणते असेल तर ते याच नटरंग देवतेच्या चरणी आहे.याच कलेच्या गाभाऱ्यात आहे.याच कलेच्या मंदिरात आहे. बाकी इतरत्र नाही..!


हरिभाऊ वडगावकर लिखित ' गाढवाचं लग्न ' हे वगनाट्य आमच्याच पालखेड गावातील श्री. पारेश्वर महादेव मंदिर गल्लीतील स्व. उत्तम काका निकम यांच्या हॉटेल मध्ये टेप रेकॉर्डर वर मी कित्येकदा ऐकलं आहे.शाळा सुटली की चार वाजेनंतर बऱ्याचदा उत्तम काका निकम यांच्या हॉटेल मध्ये बसून दादू इंदूरीकर यांचं ' गाढवाचं लग्न ' टेप रेकॉर्डर वर ऐकलं आहे. आदरणीय स्व. उत्तम काका निकम यांचे चिरंजीव विलास निकम ( ह.मु. छत्रपती संभाजीनगर) हा आमचा प्रिय मित्र होता अन् आहे.त्या मैत्रीच्या नात्यातून अन् मुळात विकास निकम यालाही दादू इंदूरीकर यांचं गाढवाचं लग्न ऐकायला जाम आवडायचं,त्यामुळं आम्ही काही रसिक मित्र मंडळी उठल्या पडल्या विलास निकम यांच्या हॉटेल मध्ये सदरील वगनाट्य अगदी तल्लीन होऊन ऐकलेलं आहे. वगसम्राट दादू इंदूरीकर यांच्या विशिष्ट अशा संवादाच्या प्रेमात मी पौगंडावस्थेतील वयोगटापासून ते आजतागायत आहे. गाढवाचं लग्न या वगनाट्यात दादू इंदूरीकर यांनी जी ' सावळ्या कुंभाराची ' व्यक्तिरेखा साकारली आहे त्या उंचीची व्यक्तिरेखा अद्याप पर्यंत कोणत्याही अभिनेत्याला साकारता आली नाही.मोहन जोशी, मकरंद अनासपुरे यांनी गाढवाचं लग्न अन् त्यातील सावळा कुंभार सादर केला,पण दादू इंदूरीकरांच्या अचूक संवादाच्या टायमिंगची कमाल यांना साधता आलीच नाही.माझ्या मते हिंदी चित्रपटसृष्टीतील दादू इंदूरीकर म्हणून गोविंदा यांनाच ओळखल्या जाऊ शकते. त्याचं कारण, दोघांच्याही विनोदी संवादाची अचूक फेक सर्वोत्तम ठरली.


मी माध्यमिक वयोगटात असताना ' घाशीराम ड्रायव्हर ' या नाटकाची टेप रेकॉर्डर वरील ऑडियो क्लिप पालखेड येथील आमच्याच गल्लीतील राजू आप्पा जैन याच्या घराच्या बाजूला असलेल्या घरात ऐकलेली आहे.राजू आप्पा जैन याच्या घराच्या बाजूला जे घर होते त्याला आम्ही त्याकाळी ' गोठा ' असे म्हणत असे.संवाद काहीसे आचरट होते, पण रसिकतेने भान असल्याने त्याचा आनंद फक्त एक रसिक म्हणून घेतला होता.


माझे जन्मगाव पालखेड ता. वैजापूर या गावाला जवळ जवळ शंभर वर्षांची नाट्य परंपरा आहे. मला जेंव्हा पासून समज आली तेंव्हा पासून दरवर्षी पालखेड गावातील पारेश्वर महादेवाच्या कार्तिकी यात्रेतील काही नाटकं अन् त्यातील नाट्य कलाकार कायमचे हृदयात स्थान मिळवून आहेत.ते साधारणतः पुढीप्रमाणे..

संत तुकाराम - आदरणीय माणिक मोकाटे 

राक्षशी लालसा - राजा शशांक - आदरणीय निवृत्ती काका कुमावत,

मानी मराठा - छत्रपती संभाजी महाराज - आदरणीय नवनाथ काका गायकवाड ( निवृत मुख्याध्यापक ) , औरंगजेब - स्व.भानुदास शिंदे, गणोजी शिर्के - स्व.रामकृष्ण रोठे

एकच प्याला - सुधाकर - आदरणीय तुळशीदास मुलमुले, सिंधू - आदरणीय अशोक वाणी,

संगीत शारदा - आदरणीय रमेश जैन, आदरणीय जगन्नाथ निकम,

विच्छा माझी पुरी करा - नारायण रोठे ( टेलर ),


तसेच माझ्या पिढीच्या अगोदर जी सर्वोत्तम मराठी नाटकं अन् त्यातील सर्वोत्तम नाट्य कलाकार आमच्या पालखेड गावात होऊन गेलेले आहेत ते गावातील वडीलधाऱ्या माणसांकडून त्या विषयी नेहमी ऐकलं आहे.त्यात प्रामुख्याने 

तंट्या भिल - स्व. ऋषीपाठक गुरु,

संगीत सौभद्र / संगीत शारदा - स्व.आदरणीय नंदलाल भाऊ जैन,


पालखेड गावातील शास्त्रीय संगीत नाटकांना दिग्दर्शित करण्यासाठी माझ्या पाहण्यात आलेले दोन दिग्दर्शक होते ते म्हणजे स्व.आदरणीय एकनाथ नाना पगार अन् आदरणीय एकनाथ आण्णा वाणी होय.


तसेच गावातील पूर्वीच्या काळी जी संगीत प्रधान नाटकं सादर करण्यात आली होती त्याला हार्मोनियमची साथ माझे सख्खे आजोबा स्व.चंपतराव जाधव, अन् तबला साथ माझे चुलत आजोबा स्व.नागोराव जाधव यांनी जी सर्वोत्तम साथ दिली होती, त्या शास्त्रीय उंचीची साथ अद्याप पर्यंत पालखेड गावात कुणालाही देता आली नाही हे गावातील जुने जाणते नागरिक आवर्जून सांगतात.


मला नाटकांची विशेष आवड आहे.छत्रपती संभाजीनगर शहरातील नाट्यगृहात अनेक नाटकं बघितली.कधी पालखेड येथून येऊन तर कधी लासूर स्टेशन येथून येऊन तर कधी छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक झाल्यावर बरीच मराठी नाटकं बघितली.या सर्व बघितलेल्या सर्व नाटकांपैकी तीन नाटकं विशेष आवडली ती पुढीलप्रमाणे -

हॅम्लेट ( मराठी ) - चि.नमन सोबत बघितले आहे

ऑल द बेस्ट - ( माझे जेष्ठ प्रिय मित्र आदरणीय दिलीपराव शेलार सर सोबत )

तिसरे नाटक आहे

मी नथुराम गोडसे बोलतोय ( सह कुटुंब अन् पालखेड गावातील पन्नास एक मित्र मंडळी सोबत बघितले आहे)


चित्रपटात देखील काही नाट्य रसिकता दाखवल्या गेलेली आहे. नाटक वेड्या तरुणाची कथा असलेला एन. चंद्रा दिग्दर्शित अन् नाना पाटेकर अभिनित ' वजुद ' नावाचा एक हिंदी चित्रपट येऊन गेलेला आहे.नाना पाटेकर यांनी यात मल्हार नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. हा चित्रपट मध्यांतर पर्यंत खूप छान होता,पण मध्यांतर नंतर पूर्णपणे भरकटून गेला.मात्र याच चित्रपटाच्या अगदी शेवटी ,मल्हार नावाच्या व्यक्तिरेखेने नाटकाच्या मंचावर अप्रतिम असे स्वगत सादर केले होते.असे स्वगत माझ्या मते अद्याप पर्यंत कोणत्याही चित्रपटात ,कोणत्याही अभिनेत्याने अथवा अभिनेत्रीने सादर केलेले नाही.एका नाटक वेड्या तरुणाची एकतर्फी प्रेमापोटी, अभिनयाच्या वेडा पोटी होणारी मनाची होरपळ वजुद चित्रपटात चित्रित करण्यात आली आहे.बहुदा मध्यांतराच्या नंतर पटकथेत गडबड झाल्याने आपण एका खूप सुंदर चित्रपटाला मुकलो असे मला एक रसिक म्हणून आजही वाटते.रंगभूमीसाठी अन् अभिनयासाठी एखादा अभिनेता किती आसुसलेला असतो याचं खूप छान चित्रण वजुद चित्रपटात आहे.


पालखेड गावातल्या रसिक आठवणी खूप आहेत,पण सध्या आवरतं घेतो. आज या रसिक आठवणींचे स्मरण होण्याचं कारण असे की, आज रंगभूमी दिवस आहे त्यामुळं गतकाळातील अनेक आठवणी मनाच्या गाभाऱ्यात दाटून आल्या अन् त्या सर्व रसिक माय बापांच्या समोर एक रसिक म्हणून प्रस्तुत केल्या..! आजच्या रंगभूमी दिवस निमित्त सर्व नाट्य कलाकारांना माझ्याकडून विनम्र मानवंदना..!🙏🏻


ता. क. - कोणत्याही कलेसाठी रसिकांची रसिकता ही रसिक देवतेचे केलेलं पूजन असते..!


वंदे मातरम्


एक रसिक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : २७ मार्च २०२३, सोमवार.

रविवार, १२ मार्च, २०२३

पुरण पोळी..!


 


चिंतन ©️


पुरण पोळी...! 


=====================================

                                          

आपला भारत देश हा पृथ्वीवरील एकमेव असा देश आहे की,जेथे वेगवेगळ्या सण-उत्सवांनूसार शाकाहारी खाद्य पदार्थ बनविण्याची चांगली परंपरा आहे.आजचेच बघा होळी सण म्हटला की,डोळ्यासमोर अग्नित भस्म होत असलेल्या गोवऱ्या,लाकूडांऐवजी चटकन समोर येते ती  पूरणपोळी..!


आपले भारतीय लोक खवय्येगिरी करिता जगप्रसिध्द आहे.त्याचे एकमेव कारण म्हणजे आपल्या भारतीय  महिला..! भारतीय महिला कमालीच्या सूगरण..! माझ्या मते भारतीय सूगरण महिला व काही पूरूष मंडळीमूळेही सण-उत्सवांना लज्जत आलेली आहे. वेगवेगळ्या प्रदेशातील खाद्य पदार्थांना चवदार व वैशिष्टयपूर्ण बनविले प्रथमत:या महिलांनीच....! 


जेव्हा एखादी ' भारतीय महिला ' स्वयंपाक करण्यास बसते तेव्हा ती एखाद्या ईश्वरीय शक्तीचे मन लावून पूजन,स्तवन करावे त्या तल्लिनतेने स्वयंपाकरूपी कलेत रमून जाते.या तल्लिनतेच्या भक्तीत काही पूरूषही (माझ्यासारखे) रमून जातात..! काहिही खाण्यापेक्षा काहितरी खाल्लेलं कधीही चांगलं असं मला वाटतं. खमंग,चवदार,जीभेवर रेंगाळणारे,नाव ऐकल्या बरोबर जीभेचा संयम सूटणारे खाद्य पदार्थ बनविले ते आपल्या भारतीय महिलांनीच व काही पूरूषांनी..! तेही शाकाहारी पदार्थ...!


माझी स्व.आई, पुरण पोळी खूपच रुचकर बनवायची. माझे लग्न होण्यापूर्वी अन् तिच्या अन्य सूना नव्हत्या त्यावेळी मी जेंव्हा कधी आईला म्हणायचो की,

" आई,आज पुरण पोळी करते का..?"

या माझ्या इच्छेखातर ती लगेच तयारीला लागायची. मुळात मला गोड पदार्थ आवडतात अन् त्यातही जर आईच्या हातची चव जर पुरण पोळीला लागली तर त्या गोडव्याचा गोडवा अमृताहुन श्रेष्ठ वाटायचा. काळाच्या ओघात माझी आई वयोमानानुसार थकली पण अगदी तिच्याच हातची पुरण पोळीची सुगरण चव माझ्या धर्मपत्नीच्या हाताला लाभली..! त्याचे कारण माझी सासूबाई अतिशय रुचकर पुरणपोळी बनवितात. माझ्या पत्नीने सुगरण कौशल्य तिच्या आईकडून शिकून घेतले..!


मूळातच वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचा शोध लावला तो खवय्ये असणाऱ्या माणसांनीच...!  " डाएट " वर असणाऱ्या माणसाला असे संशोधन व शोध करताच येऊ शकत नाही, कारण अशांचे तोंड अन् जीभ खूप जपून वागत असते. अशी माणसं फक्त विविध चवदार ,खमंग विशेषत: शाकाहारी पदार्थांचे फक्त नयनसूख घेऊ शकतात. मी मागे वाराणसीला गेलो होतो. तेंव्हा तेथील गल्लीबोळात विविध शाकाहारी खाद्य पदार्थांची रेलचेल होती, तेही माफक दरात..! वाराणसीत सकाळी...सकाळी गरमागरम चवदार पदार्थ  खाल्यानंतरचा आनंद हा खवय्ये असणा-यांसाठी एक सुवर्ण खाद्य पर्वणीच..! त्याचा मनमुरादपणे जिभेचे चोचले पुरवून पुरवून मी आनंद लुटलेला आहे.😋


घरचं जेवण अन् त्याला आपल्या आईच्या हातचा जर ईश्वरीय  स्पर्श झाला तर असे अन्न अमृताचेच रूप असते. घरच्या जेवणात आईच्या मायेचा ओलावा असतो.असा ओलावा , ज्यात आयुष्यभर मायेच्या ऋणात राहून माणूस त्या ऋणातून कधीही मुक्त होऊ इच्छित नाही. अर्थात मायेच्या जाणीवा जागृत असणाऱ्यांचीच ही भावना असते.  माझ्या स्व.आईने तिच्या सासरच्या आयुष्याच्या प्रारंभी चुलीवर स्वयंपाक बनवला.त्यात देखील पुरण पोळीच्या अमृताची गोडी होती. काळाच्या ओघात विद्युत शेगडी वर स्वयंपाक बनवला त्यात देखील  पुरण पोळीच्या अमृताची गोडी होती. आईच्या वार्धक्यात तिच्या आयुष्यात गॅस आला. गॅस हाताळण्यात माझी स्व. आई काहीशी निरक्षरच होती. तिच्या सूना येण्यापूर्वी गॅस सुरू अन् बंद करण्याची जबाबदारी मीच सांभाळत असे. गॅस जरी आला तरी तिच्या स्वयंपाकात पुरण पोळीच्या अमृताची गोडी होती. काळ बदलला, तशी खाद्य पदार्थ बनविण्याची साधने बदलली.मात्र साधने जरी बदलत गेली तरी त्यातील आईच्या सुगरण हाताची चव कधीही बदलली नाही. पुरण पोळीचा गोडवा अन् त्यातील अमृत संपले असे जाणवलंच नाही.


असो,आज होळी सण आहे..! माझा आवडता खाद्य पदार्थ पूरणपोळी मी आज चाटून पूसून खाणार आहे, तूम्हीही खा..! त्यानिमित्त सर्व शाकाहारी खवय्ये असणाऱ्या खवय्यांना पूरणपोळी खाण्यासाठी मनःपूर्वक चवदार शूभेच्छा..!😋

ता.क. - आपल्या महाराष्ट्रात होळी अन् पुरण पोळी यांचं एकमेकांवर जीवापाड गोड गोड चवदार प्रेम आहे..!😋

    

    

वंदे मातरम्


पुरण पोळी वर जीवापाड प्रेम करणारा खवय्या लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: १२ मार्च २०१७

गुरुवार, २ मार्च, २०२३

शेंडीवाले सर..!


 



मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


शेंडीवाले सर..!


===================================


आपली आपल्या संकटात कोणती ओळख होईल याचा काही नेम नसतो. त्यातल्या त्यात जर आपली कुणा एखाद्याला जर नावासह ओळख नसेल तर आपली देहबोली किंवा आपण आपल्या बाह्य शरीराची कशी ठेवण ठेवतो तीच आपली ओळख समाजात प्रस्तुत केल्या जाते.मला आज दिनांक २ मार्च २०२३ रोजी असाच अनुभव माझ्या बाह्य शरीराच्या ठेवणीवरून आला अन् त्यामुळे  मला जी समस्या निर्माण झाली होती ते  कामही यशस्वी झाले.


आज सकाळी बसने निघालो होतो.सोबत नेहमीप्रमाणे माझी बॅग होती. फुलंब्रीच्या अलीकडे एक पेट्रोल पंप आहे, तिथं एस. टी. महामंडळाच्या बस डिझेल भरतात अन् पुढील मार्गाला लागतात. तिथं बसमध्ये डिझेल भरायला वेळ लागतो, त्यामुळं माझ्यासारखे काही प्रवासी लघुशंकेसाठी उतरत असतात.जसे की ,मी आज उतरलो होतो.आमच्या बसच्या समोर अजुन एक बस असल्याने आमच्या बसमध्ये डिझेल भरायला वेळ लागणार होता. वेळ असल्याने मी आपला लघुशंकेसाठी गेलो होतो. लघुशंकेवरून आल्यावर बघतो तर काय माझी जी बस होती ती काही तिथं दिसेना.मी गडबडून गेलो होतो.डिझेल भरणाऱ्या तरुणाला विचारले तर त्याने सांगितले की, ती बस डिझेल न भरता मागच्या मागे वळून फुलंब्रीकडे निघून गेली.आता काय करावं या चिंतेत मी पडलो होतो. मला त्या बसमधील वाहकाचे नाव माहीत होते,पण त्यांचा मोबाईल नंबर माझ्याकडे नव्हता. बरं, जे प्रवासी मित्र सोबत असतात, नेमके तेही आज बसमध्ये नव्हते.अखेर मी माझे प्रिय प्रवासी मित्र डॉ.गिरी सर यांना लगेच फोन लावला अन् सगळा प्रकार सांगितला. डॉ. गिरी सर यांनी मला सांगितले की ,'माझ्याकडे संबंधित कंडक्टरचा मोबाईल नंबर नाही, मी आप्पांना फोन करून संबंधित कंडक्टर साहेबांना झालेला प्रकार सांगतो अन् बस फुलंब्री बस स्टँडवर थांबायला सांगतो.आप्पा नावाचे एक खूप चांगल्या स्वभावाचे तरुण व्यक्तिमत्व आम्हा सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व आहे.त्यांचं नाचनवेल येथे मेडिकल दुकान आहे. तेही नेहमी प्रवासात सोबत असतात,पण नेमके आज नव्हते. प्रिय मित्र आप्पा यांनी संबंधित कंडक्टर साहेबांना झालेला प्रकार सांगितला अन् लगेच मला संपर्क करून सांगितले की," सर, चिंता करू नका, बस तुमच्यासाठी फुलंब्री बस स्टँडवर थांबलेली आहे, वंदे मातरम्..!"


इतक्यात पुन्हा दुसरा अनोळखी कॉल आला.त्यावरून समोरची व्यक्ती बोलत होती की, " सर, मी घडमोडे सर, बोलतो आहे. मला बसमध्ये असलेल्या आमच्या शाळेतील मॅडमचा फोन आला आहे की, " ते कुणीतरी शेंडीवाले सर आहेत, ते पेट्रोल पंपवर मागेच राहिले आहेत.त्यांची बॅग बसमध्ये सीटवर आहे.त्यांना कसातरी संपर्क करून सांगा की, बस फुलंब्री बस स्टँडवर थांबलेली आहे.जमेल त्या वाहनाने या..!" शेंडीवाले सर अशी ओळख झाल्यामुळे मी लगेच माझ्या डोक्यावरून माझ्या शेंडीला अजुन जाम बांधून घेतले होते अन् मुख्य रस्त्यावर कुणीतरी लिफ्ट देतो का त्याची वाट बघू लागलो होतो.काही वेळेतच एक पुरुष आपली दुचाकी दामटीत येताना दिसला.मी दोन्ही हात जोडून लिफ्ट मागितली त्या देवदूताने दुचाकी थांबवली अन् मी फुलंब्री बस स्टँडवर आलो.


बस स्टँडवर आल्या आल्या संबंधित कंडक्टर साहेब, मला बघून हसायला लागले अन् मला म्हणाले..

" सर, काय राव...चूकच झाली..! बसा आता..!"

मीही हसलो अन् बसमध्ये बसलो.माझ्या सीटमागे मॅडम बसलेल्या होत्या त्या मला म्हणाल्या..

" सर, तुमचे नाव माहीत नव्हते मला.मी आमच्या शाळेतील सरांना सांगितले होते की, शेंडीवाले सर आहेत अन् ते मागेच राहिले आहेत.त्यांची बॅग बसमध्येच राहिली आहे.त्यांना संपर्क करा म्हणून..!"

त्या भगिनी शिक्षक महिलेचे संभाषण ऐकल्यावर मी पुन्हा एकदा माझ्या शेंडीला अजुन जाम बांधून घेतले. त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.


आता बस फुलंब्री बस स्थानकावरून निघाली होती.इतक्यात माझ्या मोबाईलवर आमच्याच शाळेतील आदरणीय काथार सरांचा कॉल आला होता.काथार सर मला म्हणाले की,

" नंदन जाधव सर, मला आत्ताच घडमोडे सरांचा कॉल आला होता अन् त्यांनी सांगितले की, " तुमच्या शाळेतील ते  शेंडीवाले सर आहेत ना, त्यांची बॅग बसमध्येच राहिली आहे अन् तेही मागेच राहिले आहेत.त्यांना सांगा की, बस फुलंब्री बस स्टँडवर थांबलेली आहे.जा लवकर. तुमची बसमध्ये बॅग राहिली आहे का..? बस हुकली आहे का..?" पुन्हा मी माझ्या डोक्यावरील शेंडीला अजुन जाम बांधून घेतले.

मी काथार सरांना सर्व प्रकार सांगितला अन् म्हणालो  की, " सर, मी आता बसमध्ये बसलो आहे.काळजी करू नये.आणि हो सर, खूप खूप धन्यवाद बरं का..!"


अखेर मी शाळेत सकाळी नऊ वाजता पोहोचलो होतो. आज दहावीचा पेपर असल्याने आजूबाजूच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थी अन् शिक्षक आलेले होते.मला बघितल्या बघितल्या आदरणीय घडमोडे सर ( माध्यमिक शिक्षक गाव - मोहरा) माझ्याकडे आले अन् मला म्हणाले..

" सर, नेमके तुमचे नाव माहीत नव्हते.मात्र तुम्हाला शेंडी आहे,हे मी बघितलेले असल्याने मीच काथार सरांना सांगितले होते की,"तुमच्या शाळेतील ते  शेंडीवाले सर आहेत ना, त्यांची बॅग बसमध्येच राहिली आहे अन् तेही मागेच राहिले आहेत.त्यांना सांगा की, बस फुलंब्री बस स्टँडवर थांबलेली आहे.जा लवकर म्हणून..!"


मी आदरणीय घडमोडे सरांना म्हणालो की, " सर, खूप खूप धन्यवाद.तुम्हा सर्वांमुळे मला बस सापडली..!

असे म्हंटल्यावर मी माझ्या डोक्यावरील शेंडीला अजुन जाम बांधून घेतले अन् मनातल्या मनात म्हणालो...

" खूप खूप धन्यवाद प्रिय शेंडी..! आज तुझ्या मुळे माझी ओळख पटवायला सोपे झाले अन् माझे काम सोपे झाले..! "

असे मनातल्या मनात म्हंटल्यावर पुन्हा एकदा मी माझ्या डोक्यावरील शेंडीला अजुन जाम बांधून घेतले.


ता.क.: कृपया तथाकथित एकांगी पुरोगाम्यांनी माझ्या शेंडी वरून माझ्याविषयी अन् माझ्या प्रिय शेंडी विषयी शाब्दिक आदळआपट करू नये ही नम्र अपेक्षा.कारण ज्यांना कुणीतरी बहुजन असे म्हणतात त्यापैकी देखील काहीजण अजूनही शेंडी जानवे वापरतात.🙏🏻 


वंदे मातरम्


एक  प्रवासी लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : २ मार्च २०२३, गुरुवार.

बुधवार, १ मार्च, २०२३

" आनंदी अद्दु उपाख्य अब्दुल सलाम शेठ..! "




 


आमचे गाव आमची माणसं ©️


" आनंदी अद्दु उपाख्य अब्दुल सलाम शेठ..! "


========================


आनंदी आयुष्य जगण्यासाठी फार काही लागत नाही.फक्त निगर्वी स्वभाव , समोराच्यात सहजपणे मिसळून जाण्याची वृत्ती अन् त्याच्या सोबत एखाद्या विषयी असलेली जाणीव असावी लागते.या गोष्टी ज्याला अंगिकारता आल्या त्याला आनंदी आयुष्य सहज जगता येते असे मला वाटते. माझा अन् पालखेड गावातील काही जणांचा अतिशय प्रेमळ संबंध जो आला त्यात आनंदी आयुष्य कसं जगावं यात मला वैयक्तिक काही माणसं नितांत आवडून गेली आहे.नव्हे नव्हे त्या पालखेडकरांनी ज्या प्रकारे आपल्या आयुष्यावर नितांत आनंदी प्रेम केलं आहे , त्या त्यांच्या आनंदाच्या निस्सीम प्रेमात आजतागायत आहे अन् तहहयात राहील हा प्रेमळ विश्वास आहे.अर्थात मला सर्व पालखेडकर नितांत आवडतात.विशेष म्हणजे त्यातील ज्यांचा माझ्या आयुष्याशी वैयक्तिक भावनिक अन् कौटुंबिक संबंध आला, त्यांच्यावर मी अनेक लेख लिहिलेले आहेत.त्यातील प्रत्येकाचे व्यक्तिमत्व , स्वभाव भिन्न भिन्न होता आणि आहे.एक समानता त्यांच्यात जाणवली अन् ती म्हणजे आमची एकमेकांविषयी असलेली निखळ प्रेमळ भावना..!यातील काहीजण हयात आहेत तर काहीजण स्वर्गवासी झालेले आहेत. 


आपल्या आनंदी आयुष्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या गावकऱ्यांपैकी एक पुष्प जिवलग बालमित्र अन् प्रेमळ गावकरी शेख अब्दुल सलाम अहमद शेठ बागवान उपाख्य अद्दू शेठ यावर व्यक्त होतो आहे.


शेख अब्दुल सलाम अहमद शेठ बागवान उपाख्य अद्दू..!

 

आम्ही समकालीन मित्रमंडळी शेख अब्दुल सलाम यास प्रेमाने अद्दू या नावाने हाक देत होतो.अर्थात त्या प्रेमात आजही अंतर पडलेले नाही.अद्दू हा माध्यमिक शाळेत आमच्या मागील वर्गातील मित्र..! अगदी मनमोकळ्या स्वभावाचा असलेला हा आमचा प्रिय मित्र..! आम्ही काही बालमित्र सुरुवातीपासून अद्दूच्या बोलक्या स्वभावाच्या प्रेमात आहोत. अद्दूचे पूर्ण कुटुंब मोसंबी खरेदी विक्री व्यापार उद्योगात असल्याने अद्दूला दुनियादारी जरा लवकरच समजली.व्यावहारिक ज्ञानात कमालीचा हुशार..! आम्हा काही मित्रांच्या अनुभवानुसार अद्दूच्या स्वभावात जातीपातीचे अन् धर्माच्या भेदाभेदीचे संकुचित विचार कधी आलेच नाहीत. याला कारणीभूत अद्दूच्या स्व. वडिलांचे म्हणजेच तीर्थस्वरूप स्व. अहमद चाचा शेठ बागवान यांचे प्रेमळ संस्कार नक्कीच आहेत.आमच्या पालखेड गावाचे जे ग्रामदैवत आहे, त्या श्री. पारेश्वर महादेवाच्या यात्रेच्या वेळी धार्मिक कामासाठी ग्रामस्थ जी वर्गणी गोळा करायचे त्यात तीर्थस्वरूप स्व. अहमद चाचा शेठ बागवान नेहमी पुढाकार घेऊन अगोदर वर्गणी द्यायचे.अतिशय शांत संयमी व्यक्तिमत्व होते अहमद चाचा..! आपल्या वडिलांचे संस्कार कळत नकळतपणे अद्दूवर झाले अन् तोही गावातील गोर गरिबांच्या मदतीला धावून गेलेला आहे.तसेच कोणताही भेदभाव न मानता आम्हा काही मित्रांच्या सोबत गावातील ग्रामदैवत श्री. पारेश्वर महादेवाच्या मंदिरात आलेला आहे अन् धार्मिक उपक्रमात सहभागी देखील झालेला आहे. त्याचं हे वर्तन समृध्द भारताच्या समृध्द अन् प्रगल्भ वैचारिक सिध्दांताचे प्रतिनिधित्व नक्कीच करते.ज्या ज्यावेळी प्रिय मित्र अद्दुची अन् माझी भेट झाली त्या त्यावेळी आम्ही एकमेकांना आपुलकीने " वंदे मातरम् " म्हणतोच.त्यात आजतागायत खंड पडलेला नाही.


प्रिय मित्र अद्दू शेठ , माझ्या लग्नाच्या वेळी पुढाकार घेऊन हक्काचा वऱ्हाडी झाला होता. माझे काही जिवलग बालमित्र तर सोबत होतेच, पण अगदी लग्न मंडपात येई पर्यंत प्रिय मित्र अद्दू सोबत होता. कुणाच्याही लग्नातील आठवणी ह्या, आयुष्यात सदैव गुलाबी रंगाच्या असतात.त्यात मित्र जर सोबत असतील तर विवाह सोहळा सार्थकी झाल्याचे प्रेमळ समाधान नक्कीच लाभते हा माझा स्वानुभव आहे.


शेख अब्दुल सलाम उपाख्य अद्दू याची अन् माझी भावनिक नात्याची वीण घट्ट असण्याचे अजुन एक महत्त्वाचे कारण म्हणजे शेख अब्दुल सलाम शेठ उपाख्य अद्दूचे माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांवर असलेले आदरयुक्त प्रेम..! माझ्या स्व.वडिलांच्या शिस्तप्रिय स्वभावाच्या अन् अतिशय बिकट परिस्थितीतून स्वतः ला सिध्द करण्याच्या मूल्यांच्या निस्सीम प्रेमात अद्दू शेठ होता. पालखेड येथे माझे वडील जेंव्हा जेंव्हा असायचे तेंव्हा तेंव्हा आमच्या पालखेड येथील घराच्या ओट्यावर माझ्या वडिलांच्या सोबत कित्येकवेळा याच प्रिय जिवलग मित्र अद्दूला गप्पा मारताना मी बघितलेले आहे.मी जेंव्हा लासूर स्टेशन येथे वास्तव्यास आलो तेंव्हा देखील प्रिय जिवलग मित्र अद्दू, लासूर स्टेशन येथील माझ्या घरी माझ्या वडिलांना अधून मधून भेटायला नक्कीच यायचा. अद्दू हा मूळचा मोसंबी व्यापारी असल्याने सतत फिरस्तीवर असायचा.जेंव्हा जेंव्हा त्याची चक्कर लासूर स्टेशन येथे व्हायची ,अगदी न चुकता बऱ्याचदा रविवारी किंवा संध्याकाळी माझ्या वडिलांची फक्त प्रेमापोटी भेट घ्यायचा. माझे स्व.तीर्थरूप वडील बऱ्याचदा शक्यतो लासूर स्टेशन येथील माझ्या घरातील वरील खोलीत आराम करत असायचे. प्रिय मित्र अद्दू घरी आल्या आल्या मला मास्टर किंवा मास्तर असे उल्लेखित करून म्हणत असे.

" मास्टर, दादा का मूड कैसा है..? बातचीत हो सकती हैं ना..?"

मी त्याला होकार द्यायचो अन् मग अद्दू वरच्या खोलीत जाऊन दादांशी कित्येकवेळ गप्पा मारायचा.मी सोबत असायचो नाहीतर मी खाली येऊन माझे काम करत असायचो. प्रिय मित्र अद्दू घरी आल्यावर " मास्टर, दादा का मूड कैसा है..? बातचीत हो सकती हैं ना..?" असे विचारण्याचे कारण असे असायचे की, अद्दूला माझ्या स्व वडिलांचा अतिशय शिस्तप्रिय स्वभाव पूर्णपणे माहीत होता.समोरच्याच्या स्वभावाला अनुसरून समोरच्याच्या मानसिकतेचा अंदाज घेऊन आपलं सुसंकृत वर्तन करणे हे अप्रतिम कौशल्य प्रिय मित्र अद्दू शेठ यांच्या अंगी होते अन् आहे हे या कृतीवरून सहज लक्षात येते. सध्या अद्दू शेठ छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक झालेला आहे. तसेच काहीकाळ पालखेड गावातील ग्रामपंचायतीचा सदस्य देखील राहिलेला आहे. आदरणीय शरद पवार साहेब यांच्या राजकीय बैठकीत प्रिय मित्र अद्दू शेठ याचे सार्वजनिक आयुष्य सुरु आहे.


माझ्या तीर्थरूप वडिलांचा स्वर्गवास झाल्यावर प्रिय मित्र अद्दू शेठ छ्त्रपती संभाजीनगर येथील माझ्या घरी सांत्वनासाठी आल्यावर खूप वेळ निवांत बसला होता. विशेष म्हणजे त्यावेळी कोविडची भीतीदायक परिस्थिती चहूकडे होती. शासनाने समाजजीवनावर कोविड महामारी मूळे बरीच बंधने घातलेली होती. त्याही भीतीदायक परिस्थितीमध्ये प्रिय मित्र अद्दू माझ्या घरी आला होता अन् आयुष्यभर माझ्या स्मरणात राहील असा भावनिक आधार देऊन गेला होता.हे नाते एका निस्सीम प्रेमाचे होते.हे नाते एका तरुणाचे, एका वयोवृध्द व्यक्तीवर आदर असण्याचे होते. 


माणसाच्या आयुष्यात दुःख अन् वेदना खूप काही शिकवून जाते.अशावेळी जी जी माणसं कृतीतून आधार देऊन जातात ती माणसं त्या विधात्याने आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवलेली असतात.एखाद्या माणसाच्या आयुष्यात दुःख अन् वेदना ज्या ज्यावेळी निर्माण होते त्या त्यावेळी एखाद्याने प्रत्यक्ष कृतीतून , भावनिक आधार देऊन जी मायेची फुंकर घातलेली असते ती मानवी मन असणाऱ्या भावनिक माणसाच्या चिरकाल स्मरणात राहते हे त्रिकालाबाधित सत्य आहे.त्यावेळी नक्कीच पटते की, तो जगाचा नियंता कुठेतरी अस्तित्वात आहे म्हणून..! हे माझे भावविचार त्या त्या माणसाच्या रूपातील त्या त्या देवदुतांना समर्पित आहेत, ज्यांनी ज्यांनी कुणाच्या तरी दुःखात अन् वेदनेत त्या जगाच्या विधात्याचे प्रतिनिधित्व केलेलं आहे..!


अख्ख्या भारतभर व्यापार निमित्त प्रवास करणाऱ्या अन् त्या प्रवासात भेटलेल्या माणसांची दुनियादारी स्वतः मध्ये आत्मसात करून आनंदी आयुष्य जगणाऱ्या प्रिय मित्र शेख अब्दुल सलाम अहमद शेठ बागवान उपाख्य अद्दू याचा आज जन्मदिन आहे.त्यानिमित्त या जिवलग मित्राला माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून मनःपूर्वक शुभेच्छा..!🌹🙏🏻


वंदे मातरम्..!


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: १ मार्च २०२३, बुधवार.