बुधवार, १ जुलै, २०२६
बाई, रंगभूमीला पोरक्या करून गेल्या..!😔
शनिवार, २० जून, २०२६
आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाची पुण्याई
मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाची पुण्याई
=====================
लिंगभेद विसरून एकतर्फी अथवा एकमेकांना आवडलेला माणूस मग तो कोणत्याही वयोगटातील असो तो भेटला की जपावा, कदाचित पुढच्या भेटीच्या वेळी भेटेलंच असं नाही..!
एकतर्फी अथवा एकमेकांना आवडलेला त्या क्षणात भेटलेल्या त्या काही क्षणापुरते का होईना, आपण कुणाला तरी आपलंसं करावं.आठवण म्हणून वस्तू तर आपण देऊच, मात्र त्या तेवढ्या क्षणासाठी आपलंसं केल्याने जो आनंद प्राप्त होतो तो मनाला सुखावणारा असतो.कारण दूरच्या प्रदेशात आपलं पुन्हा जाणे होईल की नाही माहित नसतं. जरी यदा कदाचित जाणे झालेच तर पुन्हा तो माणूस भेटेल की नाही याची खात्री नसते.
दिनांक ६ जून २०२६, शनिवार रोजी रावेर खेडी मध्यप्रदेश येथील पहिले बाजीराव पेशवे यांच्या समाधी स्थळाच्या परिसरात एक माणूस ज्याला वयोगटाच्या भाषेत बालक म्हणतात तो मला भेटला होता. काही वेळ त्याच्याशी हिंदी भाषेत संवाद साधला.जास्त बोलला नाही.लाजाळू जाणवला. त्या निरागस जीवाला यथायोग्य ते दिले.तिथल्या परिसरातील काही पुरुषांशी संवाद साधला असता बोलता बोलता मी सांगितले की, " हम महाराष्ट्र से आये हैं!" हे ऐकल्या ऐकल्या त्यातील एकजण लगेच म्हणाला...
" आप तो बाजीराव पेशवा सरकार के यहा से हो | पानी पिने को चाहिए क्या..? घरसे लाता हुं..!"
हा आपुलकीचा संवाद ऐकल्यावर मन भरून आले.त्या पुरुषांचा आणि आमचा काहीच परिचय नव्हता.ज्याला जात धर्म म्हणतात आणि त्या एकमेकांना माहीत झाल्यावर जात धर्म माहित झालेला, त्यातल्या त्यात आपल्या जातीतील अन् आपल्या धर्मातील माणूस जर भेटला तर माणूस जरा जास्तच आपुलकी दाखवतो हा पुरोगामी सिद्धांत आहे. त्याही बाबी आम्हाला एकमेकांच्या माहित नव्हत्या. आम्ही हिंदवी स्वराज्याचे पंतप्रधान श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे यांच्या मूळच्या महाराष्ट्रातील आहोत हाच धर्म अन् हीच जात रावेर खेडी येथील त्या अनोळखी व्यक्तीला आमच्यात जाणवली होती.याची जाणीव मला तेव्हा झाली जेव्हा मी साधारणतः पाच मिनिटे त्या तिथल्या पुरुषांच्या सोबत संवाद साधत होतो. मात्र जेंव्हा आम्ही महाराष्ट्रातील आहोत हे ऐकल्या ऐकल्या त्यांनी ज्या आत्मियतेने " आप तो बाजीराव पेशवा सरकार के यहा से हो | पानी पिने को चाहिए क्या..? घरसे लाता हुं..!" हे वाक्य जेव्हा त्याच्या मुखातून बाहेर पडले तेव्हा आपली जात अन् आपला धर्म पहिले बाजीराव पेशवा सरकारच जाणवले.
सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या भौगोलिक कक्षा रुंंदावणारा थोर सेनानी , छत्रपती शिवरायांना परम स्थानी मानणारा हिंदवी स्वराज्यातील एक अद्वितीय योद्धा पहिले बाजीराव पेशवे यांच्या मूळच्या भूमीतील आपण आहोत याचा सार्थ अभिमान त्यावेळी जाणवला.पेशवा सरकार यांच्या मूळच्या भूमीतील आपण आहोत हे ऐकल्यावर रावेर खेडी येथील त्या अनोळखी पुरुषाने थेट त्यांच्या घरून आम्हाला प्यायचे पाणी आणून देण्याबाबतची जी आत्मियता व्यक्त केली होती ती आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाची पुण्याई होती.
पहिले बाजीराव पेशवे यांच्या रावेर खेडी येथील समाधी स्थळाच्या बाजूलाच वाहणाऱ्या आई नर्मदेने आपल्या पूर्वजांच्या कित्येक पिढ्यांना सोळाव्या शतकापासून ते आजतागायत जपले आहे. आपले कित्येक पूर्वज आई नर्मदेच्या परिसरात कायमचे विसावले आहेत.ते आपले पूर्वज जरी मुळचे आपल्या महाराष्ट्रातील होते, तरी पण आई , आई असते..! आई नर्मदेने आपल्या महाराष्ट्राच्या कन्येला, कित्येक शूरवीर सेनानींना आपल्या परिसरात मायेने आपलेसे केले.आज जेव्हा कधी माझ्यासारखा भटकंती करणारा एखादा भटका आई नर्मदेच्या परिसरात भटकतो तेव्हा आजही आपल्या सोबत सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज, पहिले बाजीराव पेशवे, मल्हार बाबा होळकर, महादजी बाबा पाटील शिंदे, आई अहिल्यादेवी होळकर आहेत याची कृतीतून जाणवणारी जाणीव होते.
वंदे मातरम्
आयुष्याच्या प्रवास मार्गावरील एक भटका प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक : २०/६/२०२६, शनिवार
बुधवार, १७ जून, २०२६
Made in India - A Titan story..! भारताच्या ब्रँडची कथा..!
#चिंतन
Made in India - A Titan story..!
भारताच्या ब्रँडची कथा..!
=======================
वेब सीरिज म्हणजे उघडी नागडी अश्लीलता, हे समीकरण बनून गेले आहे आणि त्यात बऱ्याच प्रमाणात तथ्य देखील आहे.जसे चित्रपटांसाठी सेन्सर बोर्ड आहे तसे वेब सीरिजसाठी सेन्सर बोर्ड नसल्यामुळे वेब सीरिज उघड्या नागड्या सुसाट सुटलेल्या आहेत.वास्तविक वेब सीरिज करिता देखील सेन्सर बोर्ड असायलाच हवे असे मला वाटते.
मी वेब सीरिज सहसा बघतच नाही; मात्र याही उघड्या नागड्या सुसाट सुटलेल्या विविध वेब सीरिज मध्ये एक अशीही वेब सीरिज मित्राच्या सांगण्यावरून पाहण्यात आली, जिचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.कडक उन्हाच्या दुष्काळी छायेत थंडगार मृग नक्षत्राच्या गोड पाण्याच्या सरी कोसळल्यानंतर जो आत्मिक आनंद प्राप्त होतो तोच आनंद Made in India - A Titan story ही वेब सीरिज बघितल्यावर येतो.
खूप छानसे सादरीकरण, अधून मधून तत्कालीन काळातील हिंदी आणि तामिळ चित्रपटातील सुमधुर गाणी , भारताला , अखिल भारतात आणि अखिल विश्वात सिद्ध करण्याची सांघिक धडपड म्हणजेच Made in India - A Titan story होय.
चावीच्या घड्याळीतून सेलवर सुरू होणाऱ्या अस्सल भारतीय उत्पादनाची यशस्वी धडपड म्हणजेच Made in India - A Titan story..!
आपल्या भारताचे थोर पंतप्रधान वंदनीय नरेंद्र मोदीजी यांनी जो स्टार्ट अप इंडियाचा मूलमंत्र दिला आहे त्याची चुणूक गतकाळात दाखविणाऱ्या भारतीयांची खरी खुरी कथा म्हणजेच Made in India -A Titan story..!
भारतरत्न वंदनीय जे. आर. डी. टाटा साहेब यांनी ज्या आत्मियतेने अन् स्वाभिमानी वृत्तीने आपले अस्सल भारतीयत्व अखिल विश्वाच्या पटलावर भारताचा ब्रँड म्हणून स्थापित केले त्याची कथा म्हणजेच Made in India - A Titan story..!
वंदनीय जे.आर. डी.टाटा सारखा असा मालक / बॉस जो स्वतःला मालक / बॉस न समजता आपल्या सहकाऱ्यांना एक मित्र समजतो अन् वेळोवेळी समर्पक मार्गदर्शन करतो याचं वास्तववादी प्रस्तुतीकरण म्हणजेच Made in India - A Titan story..!
थोर भारतरत्न जे. आर. डी. टाटा साहेब यांच्या स्वप्नातील ध्येयाला सत्यात उतरविण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या झेरक्सेस देसाई या ध्येयवेड्या व्यक्तीची कथा म्हणजेच Made in India - A Titan story..!
बाकी कथा काही सांगत नाही.एक मात्र नक्की, नसीरुद्दीन शहा, जिम सर्भ , वैभव तत्ववादी यांच्या अप्रतिम अन् संयत अभिनयाची सर्वोत्कृष्ट प्रस्तुती बघायची असेल तर ज्यांना शक्य आहे त्यांनी Made in India - A Titan story बघा..!
अल्झायमर विस्मृती सारखा आजार ,त्यावेळी आपल्या बापाची काळजी घेणारा वैभव तत्ववादी याचा अभिनय, आणि आपल्या नातवंडांत अत्यंत जीव असणारा अल्झायमर आजाराने ग्रस्त असलेला वयोवृध्द आजोबा हा नातेसंबंध खूप छान अभिनयाने प्रस्तुत केला आहे.
मला जर भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांची नावे विचारली तर त्यात दिलीपकुमार साहेब आणि नसीरुद्दीन शहा साहेब यांचा क्रम सर्वात वर राहील.नसीरुद्दीन शहा जे.आर.डी.टाटा साहेब यांना प्रस्तुत करताना अक्षरशः प्रत्येक क्षण जगले आहेत.हॅट्स ऑफ सर..!
जिम सर्भ ♥️
जिम सर्भ या अभिनेत्याने झेरक्सेस देसाई यांना जीव ओतून आपल्या समोर प्रस्तुत केले आहे. जिम सर्भ यांनी अगदी सहजपणे केलेला अभिनय आपल्याला आपण एखादी वेब सीरिज आणि त्यातील गतकाळातील एक कर्तृत्ववान व्यक्तिरेखा न बघता वास्तवातील खरेखुरे झेरक्सेस देसाई यांनाच बघत आहोत असेच वाटते. नसीरुद्दीन शहा सारख्या उच्च कोटीच्या अभिनेत्याच्या तोडीस तोड अभिनय जिम सर्भ यांनी केला आहे. हॅट्स ऑफ सर..!
कुठेही रडारड न करता अत्यंत अल्पसंख्याक असूनही पारशी समाजातील लोकं भारताविषयी किती कृतज्ञतेचा आणि जाणीव असणारा भाव ठेवून आहेत याचा अभिमान वाटतो.
नतमस्तक..!🙏🙏
वंदे मातरम्
एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - १७/६/२०२६, बुधवार
( शुभ रात्री )
रविवार, १४ जून, २०२६
कट्यार काळजात घुसली
#आमचे गाव आमची माणसं ©️
कट्यार काळजात घुसली
=====================
मी सोशल मीडिया व्हॉट्स ॲपवर संगीत कट्यार काळजात घुसली या नाटकातील ' सुरत पिया की छिन बिसराये ' या नाट्य पदाचा व्हिडिओ ऐकला अन् बघितला. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिषेकजी काळे यांनी गायन केलेले नाट्य पद ऐकल्यावर ईश्वरीय सानिध्यात गेलो.अभिजितजी काळे यांना हृदयातून वंदन केले.तसेच कट्यार काळजात घुसली या नाटकाच्या बाबतीत ज्येष्ठांनी सांगितलेल्या आठवणीत रमून गेलो.
पालखेड येथे वास्तव्यात असताना माझे सख्खे चुलते तीर्थस्वरूप स्व.कचरू चंपतराव जाधव उपाख्य आण्णा यांच्या जवळ त्यांच्या वार्धक्यात मी अधून मधून बसत असायचो.ज्येष्ठांच्या जवळ बसलं अन् त्यांना बोलतं केलं की, बराच इतिहास आपल्याला माहित होतो हा माझा स्वानुभव आहे. हाच अनुभव मला आणि आमच्या दोन्ही मुलांना माझे स्व.तीर्थरूप वडीलांच्या वार्धक्यात त्यांच्या जवळ नेहमी संध्याकाळी बसल्यावर यायचा.
असो, पालखेड येथे वास्तव्यास असताना एकदा माझे सख्खे चुलते स्व.कचरू चंपतराव जाधव यांच्या जवळ पालखेड येथील आमच्या आळीतील ओट्यावर बसलेलो होतो. त्यांना आपल्या गावातील नाट्य परंपरेविषयी बोलते केले होते.त्यावेळी ' कट्यार काळजात घुसली ' या संगीतप्रधान नाटकाचा विषय मी काढला होता.तीर्थस्वरूप कचरू आण्णा यांनी सांगितले होते की, " आपल्या पण गावात कार्तिकी यात्रेच्या वेळी कट्यार काळजात घुसली या नाटकाचा नाट्य प्रयोग झाला होता.आपल्याच गल्लीतील जैन नाट्य मंडळ मधील कलाकारांनी हा नाट्य प्रयोग केला होता.त्यावेळी तू लई लहान असशील.पंडित भानू शंकर शास्री ही भूमिका शांतीलाल शेठ जैन यांनी सादर केली होती आणि खाॅंसाहेब आफताब हुसेन यांची भूमिका राजा नाना जैन यांनी केली होती. याच नाटकाला हार्मोनियमवर साथ दिली होती कचरू शेठ जैन यांनी आणि तबल्यावर साथ दिली होती आपल्याच गल्लीतील सखाराम पगार यांनी.त्यानंतर या नाटकाचा प्रयोग पुन्हा आपल्या गावात झाला नाही. त्याचं कारण नाटकातील सर्व नाट्य पदे शास्त्रीय संगीतावर होती.त्याचे गायन आणि संगीत साथ द्यायला कुणी पुढे आले नाही."
आमच्या पालखेड गावात तत्कालीन काळात प्रामुख्याने शास्त्रीय संगीत प्रधान नाट्य मंडळे दोन होती.त्यातले एक होते रोकडीया हनुमान नाट्य मंडळ आणि दुसरे होते जैन नाट्य मंडळ..!रोकडीया हनुमान नाट्य मंडळ मध्ये हार्मोनियमवर साथ माझे सख्खे चुलते तीर्थस्वरूप स्व.कचरू चंपतराव जाधव उपाख्य आण्णा द्यायचे आणि तबल्यावर स्व.तीर्थस्वरूप गीताराम काका कुमावत द्यायचे.विशेष म्हणजे दोघेही बालमित्र होते. तीर्थरूप अण्णांनी मला सांगितले होते की, आम्हा दोघांचा जन्म एकाच दिवशी झाला होता.स्व.गीताराम काका कुमावत हे आमचे आदरणीय अनौपचारिक प्रिय मित्रवर्य नारायणराव कुमावत सर ( शिक्षण विस्तार अधिकारी ) यांचे वडील होते.
पालखेड गावातील तत्कालीन काळातील दुसरे शास्त्रीय संगीत नाट्य मंडळ होते जैन नाट्य मंडळ..! जैन नाट्य मंडळ मध्ये हार्मोनियमवर साथ माझा जिवलग बालमित्र नितीन जैन याचे आजोबा स्व.तीर्थस्वरूप कचरू भाऊ जैन द्यायचे आणि तबल्यावर साथ आमच्याच आळीतील स्व.सखाराम पगार द्यायचे. विशेष म्हणजे स्व.तीर्थस्वरूप कचरू भाऊ जैन एका डोळ्याने अंध होते, मात्र उच्च कोटीचे सारस्वत होते.माझ्या मते आमच्या पालखेड गावात शास्त्रीय संगीत मध्ये हार्मोनियमवर सिद्धहस्त असलेले तीन सर्वश्रेष्ठ सारस्वत होऊन गेलेले आहेत.ते तीन सारस्वत क्रमवार पुढील प्रमाणे होत..१) माझे आजोबा स्व.चंपतराव देविदासराव जाधव २) माझे चुलते स्व.कचरु आण्णा जाधव आणि ३) स्व.कचरू भाऊ जैन..!तसेच माझ्या मते आमच्या पालखेड गावात तबला मृदुंगावर सिद्धहस्त असलेले तीन सर्वश्रेष्ठ सारस्वत होऊन गेलेले आहेत.ते क्रमवार पुढील प्रमाणे..१) स्व.तीर्थस्वरूप सखाराम काका पगार २) माझे चुलते नागोराव काका जाधव आणि ३) स्व.सखाहरी काका गायकवाड मिस्तरी..!
कला देवतेच्या कृपाशीर्वादाने श्रीमंत झालेली आमच्या गावातील उपरोक्त सारस्वतांची पिढी आता हयात नाही.मात्र त्यांनी त्यांच्या काळात आमच्या पालखेड गावात नाट्य परंपरेची जी समृद्ध परंपरा रुजवली, जपली , वाढवली त्याचा एक पालखेडकर म्हणून सदैव अभिमान वाटतो.आजही जेव्हा कधी टीव्हीवर, मोबाईलवर एखादे नाट्य पद ऐकू येते, बघायला मिळते तेव्हा तेव्हा आमच्या पालखेड गावातील समृद्व कलेचा वारसा स्मरणात येतो.ते स्मरण करते वेळी पालखेड गावातील ज्या ज्या सारस्वतांनी नाट्य परंपरेला रुजवलं, जपलं आणि वाढवलं त्या सर्वांना हृदयातून विनम्र वंदन करतो..!🙏
वंदे मातरम्
एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक : १४/६/२०२६, रविवार
मंगळवार, ९ जून, २०२६
महेश्वर..!🕉️
महेश्वर..!🕉️
#मला प्रवासात भेटलेली माणसं.©️
महेश्वर..!🕉️
=======================
काही ठिकाणी गेल्यानंतर आपलेपणाची भावना आपसुकच निर्माण होते.त्यातल्या त्यात अशा ठिकाणी, जिथं आपल्या आईचे वास्तव्य आजही जाणवते.आई या शब्दाची महती तेंव्हा सर्वश्रेष्ठ वाटते जेव्हा एखादी माय माऊली सर्व सामान्यांना आपलंसं करते. आपल्या भारताच्या वैभवशाली इतिहासात अशा काही कर्तृत्ववान अन् मायाळू स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत ज्या समाजव्यवस्थेला आदर्श ठरलेल्या आहेत.
त्यात आई अहिल्यादेवी होळकर ह्या एक आहेत.आई अहिल्यादेवी होळकर यांची आजच्या मध्यप्रदेश राज्यातील नर्मदेच्या किनाऱ्यावरील राजधानी महेश्वर.!महेश्वर येथील किल्ल्याचे राजवाड्याचे भव्य बांधकाम तत्कालीन राजसत्तेची आजही आठवण करून देतो. आई अहिल्यादेवी होळकर यांच्या कित्येक समाजपयोगी कामांची, शौर्याची, उत्कृष्ट प्रशासनाची माहिती संग्रहालयातील विविध माहिती फलकांच्या द्वारे आपल्याला मिळते.
महेश्वर येथील राजवाड्याच्या आतील बाजूत संग्रहालय आहे.तिथे फोटो व्हिडिओ काढायला बंदी आहे. मात्र राजवाड्याच्या बाहेरील अंतर्गत वाड्यात जे काही फोटो , मजकूर आहेत त्यांचे फोटो आपण काढू शकतो. राजवाड्याच्या प्रवेश दाराच्या बाजूला भारताचा नकाशा आहे.आई अहिल्यादेवी होळकर यांनी भारतात हिंदू धर्मांतील ज्या ज्या ठिकाणच्या तीर्थस्थळांचा जिर्णोद्धार केला आहे,अशा एकूण २९ तीर्थस्थळांची ठिकाणे नावासह त्यावर दर्शविलेली आहेत.
१ ऋषिकेश ( उत्तराखंड )
२ गंगोत्री ( उत्तराखंड )
३ विष्णू प्रयाग ( उत्तराखंड )
४ केदारनाथ ( उत्तराखंड )
५ हरिद्वार ( उत्तराखंड )
६ बद्रिनाथ ( उत्तराखंड )
७ वृंदावन ( उत्तर प्रदेश )
८ अयोध्या ( उत्तर प्रदेश )
९ प्रयागराज ( अलाहाबाद ) ( उत्तर प्रदेश )
१० वाराणसी ( उत्तर प्रदेश )
११ गया ( उत्तर प्रदेश )
१२ पुष्कर ( राजस्थान )
१३ नाथ द्वारा ( राजस्थान )
१४ उज्जैन ( मध्य प्रदेश )
१५ इंदोर ( मध्य प्रदेश )
१६ ओंकारेश्वर ( मध्य प्रदेश )
१७ महेश्वर ( मध्य प्रदेश )
१८ अमरकंटक ( मध्य प्रदेश )
१९ द्वारका ( गुजरात )
२० सोमनाथ ( गुजरात )
२१ नाशिक ( महाराष्ट्र )
२२ वेरूळ ( महाराष्ट्र )
२३ पुणे ( महाराष्ट्र )
२४ जेजुरी ( महाराष्ट्र )
२५ चौंडी ( महाराष्ट्र )
२६ पंढरपूर ( महाराष्ट्र )
२७ राजापूर ( महाराष्ट्र )
२८ गोकर्ण ( कर्नाटक )
२९ रामेश्वरम् ( तामिळनाडू )
एक स्री आपल्या कारकीर्दीत एवढे मोठे कार्य भारतभर करते हे बघून अन् वाचून त्या माय माऊलीच्या म्हणजेच आई अहिल्यादेवीच्या कार्यासमोर आपण नतमस्तक होऊन जातो.
आई अहिल्यादेवी होळकर ह्या परम शिवभक्त होत्या.त्या ज्या शिवलिंगाचे नित्य नियमाने पूजन करायच्या ते चांदीत मढवलेले भव्य शिवलिंग , पूजेचे सामान इत्यादी वस्तू सुरक्षितपणे जतन करून ठेवलेल्या आहेत.किल्ल्याचे मजबूत दगडी बांधकाम आखीव रेखीव आहे.त्यावरील शिल्पकला अप्रतिम आहे. किल्ल्याच्या समोरच नर्मदा नदीचे विस्तीर्ण पात्र आहे.
सुभेदार मल्हारराव होळकर आणि पहिले बाजीराव पेशवे यांचातील नाते अत्यंत विश्वासू होते.हिंदवी स्वराज्याचे पंतप्रधान श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे यांनी त्यांच्या कारकीर्दीत मराठा साम्राज्याचा विस्तार करताना काही विश्वासू सरदारांची फळी निर्माण केली.त्यात प्रामुख्याने मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे,पवार घराणे, स्वतःचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा हे होते.
महेश्वर येथील आई अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या समोर आम्ही सह परिवार नतमस्तक झालो आणि आयुष्याचे सार्थक झाल्याचे आत्मिक समाधान लाभले.
वंदे मातरम्
जय मल्हार
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
महेश्वर येथे सह परिवार भेट दिनांक - ७ जून २०२६, रविवार
शनिवार, २५ एप्रिल, २०२६
निवांतपणा अन् सोबत जिवलग मित्र
मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
निवांतपणा अन् सोबत जिवलग मित्र
=====================
सोबत जिवलग मित्र मनोहर गावडे,
सोबतीला थंडगार ऊसाचा रस
अन्....
निवांत निशाचर वेळ..!
ठिकाण - छत्रपती संभाजीनगर शहरातील एक निवांत कोपरा..!
निवांतपणा, आपल्याला आपल्यातील आपलं काय आहे याचा शोध घ्यायला शिकवतो.मग तो निवांतपणा एकट्यातील असो अथवा प्रिय मित्राच्या सोबतचा..! त्यात हमखास आपला आपण केलेला शोध नक्कीच सापडतो. त्यातल्या त्यात निवांतवेळी आपलं कुणीतरी सोबत असलं की, मनाचे आयुष्य , दीर्घायुषी होते.निवांत बसल्यावर कुणी आपल्याला एकलकोंडा म्हणो अथवा काहीही म्हणो, मात्र त्या एकांतात आपल्यातील आपलं कुणीतरी नक्कीच सापडतो..!
आज ज्यावेळी प्रिय मित्र मनोहर अन् मी निवांत होतो, त्यावेळी आयुष्याच्या प्रवासातील कित्येक क्षणांना , व्यक्तींना पुन्हा एकदा जिवंत केले.
वास्तविक मी निशाचर नाही,पण काही वेळी व्हावं लागतं, आपला भुतकाळ शोधण्यासाठी..!
आपल्या मनाला जाणून घेणारे कुणी सोबतीला असले की, त्या बैठकीची रंगत काही औरच असते.
अजून यापेक्षा अजून काय हवे..?
त्या गप्पांच्या बैठकीत आम्हा दोघात उपस्थित होता तो आमचा अत्यंत जिवलग वर्गमित्र स्व. विनोद पाटील..! ♥️
विनोद पाटील आम्हाला कायमचा सोडून कधीचाच गेला आहे, मात्र आजही तो नेहमी सोबत असतो.स्व.विनोद पाटील सारखा अत्यंत प्रेमळ अन् खूप मोठ्या मनाचा मित्र आमच्या संपूर्ण डी. एड. बॅच कुणीच नव्हता. नियती पण ना...सर्वांच्या आवडत्यालाच का आपल्या सोबत घेऊन जाते कुणास ठाऊक..?
जसे माझ्या आयुष्याच्या प्रवासातील पालखेड येथील दोन जिवलग बालमित्रांना नियतीने खूप लवकर आपल्यातून कायमचे दूर तिच्या घरी नेले आहे. स्व.आप्पासाहेब सुराशे अन् स्व.शाम शेळके..! दोघेही जिवलग बालमित्र होते..!♥️♥️
माझी फेसबुक मित्र यादी मोजकीच आहे. त्यात कायमचे अढळ स्थान राखून आहे स्व.विनोद पाटील..! विनोद कधीचाच स्वर्गवासी झालेला आहे, मात्र विनोद पाटील यास मी कधीच अनफ्रेंड करू शकत नाही.जिवलग मित्र होता तो..! भावना जपायचा असतात. विनोद, त्याच्या सर्व विद्यार्थ्यांचा खूप आवडता होता.आज मी अन् माझा खूप जिवलग मित्र मनोहर गावडे ज्यावेळी रात्री निवांत बसलो होतो, तेंव्हा विनोदची उपस्थिती आम्हाला गतकाळातील आठवणीत घेऊन गेली.विनोद पाटील हा आमच्या मैत्रीचा सर्वोच पॉईंट होता. कधीतरी लिहिल , त्यावर..! जिवलग मित्राचा मृत्यू हा आपल्या त्या कालखंडाचा मृत्यू असतो. सगळं काही पाठीमागे राहते.
प्रिय मित्र मनोहर अन् मी ऊसाचा रस पिऊन झाल्यावर निघालो , पुन्हा एकदा आमच्या प्रापंचिक आयुष्याच्या प्रवासात..!
पुन्हा कधीतरी भेटू , आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी..!
असेच कुठेतरी..!
आम्हाला भेटायला , फारसा काही खर्च लागत नाही आणि पचायला ७२ तास लागतील असे खाद्य पदार्थ देखील खाण्यात लागत नाहीत. त्याचे कारण आम्ही गुरुबंधू आहोत म्हणून..! 🕉️
जाणीव अन् जाणिवा जिवंत ठेवणारे आयुष्यात सोबत असले की, बाबा केदारनाथाच्या चरणी भरून पावल्याचे आत्मिक समाधान लाभते. साधं,सरळ आयुष्य जगण्यासाठी यापेक्षा अजून काही लागत नाही.
असो, शुभ रात्री मित्रांनो..!🙏🙂
वंदे मातरम्
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक : २५/४/२०२६, शनिवार
रविवार, १२ एप्रिल, २०२६
आशा दीदीने दीर्घ काव्याला अजरामर केले.
#चिंतन ©️
आशा दीदीने दीर्घ काव्याला अजरामर केले.
=====================
लता दीदी आपल्याला सोडून गेल्या, आता आशा दीदी गेल्या.मृत्यूच्या डोहात दोन स्वर कायमचे विसावले. जरी लता दीदी आणि आशा दीदी यांच्या वर्तमानातील आयुष्यातील स्वर कायमचे थांबले असले तरी त्यांनी गायन केलेला प्रत्येक स्वर पिढ्यानपिढ्या, स्वरांची पूजा करणाऱ्या कित्येक भक्तांना ऐकू येत राहील.
काही चित्रपटावर लिहायला हळुवार मन थांबते.कारण त्या चित्रपटांना फक्त आणि फक्त अनुभवाचे असते.व्यक्त करायला लागलो की भावना स्तब्ध होते.माझ्या भावविश्वात असे दोनच चित्रपट आहेत ज्यांना फक्त आणि फक्त अनुभवून आत्मिक आनंद प्राप्त करत असतो.त्या भावविश्वातील एक चित्रपट आहे सी.प्रेमकुमार लिखित अन् दिग्दर्शित ' 96’ आणि दुसरा सदा सर्वदा सर्वश्रेष्ठ चित्रपट आहे गुलजार साहेब लिखित आणि दिग्दर्शित इजाजत..! या दोन्ही चित्रपटांवर लिहायला लेखणी थांबते , कारण ह्या दोन्ही चित्रपटांना फक्त आणि फक्त अनुभवत असतो. काही भावना व्यक्त न करता हृदयाच्या देव्हाऱ्यात जपून ठेवायच्या असतात.
माझ्या मते संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एखादे दीर्घ काव्य ठरावे असा एकमेव चित्रपट आहे अन् तो म्हणजे इजाजत..! इजाजत चित्रपटाची कथा अन् पटकथा जर थोर लेखक विजय तेंडुलकर सर यांनी लिहिली असती तर तो काहीसा प्रखर भाष्य करणारा चित्रपट झाला असता.मात्र इजाजत चित्रपटाला साहित्य विश्वातील अत्यंत मृदु , संवेदनशील लेखक कवी गुलजार साहेब यांनी प्रस्तुत केले आणि एक अत्यंत तरल भावनाशील चित्रपट इतिहासात अजरामर झाला.
संपूर्ण इजाजत चित्रपटच एक छानसे काव्य आहे अन् त्या काव्यातील सर्वोत्तम काव्य आहे...
" मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा हैं.."
या दीर्घ पद्य रचनेला जेंव्हा गुलजार साहेब यांनी लिहिले अन् संगीतकार पंचमदा ( आर. डी.बर्मन ) यांच्या समोर ठेवले तेंव्हा पंचमदांना वाटले चित्रपटातील सीन लेखन असावे. मात्र गुलजार साहेब यांनी सांगितले हा मजकूर सीन लेखन नसून काव्य लिहिले आहे.यावर पंचमदा बुचकळ्यात पडले अन् आश्चर्यचकित होऊन म्हणाले...
" एवढे मोठे काव्य..? "
बाजूला आशा दीदी भोसले बसलेल्या होत्या.त्यांनी या काव्याच्या पहिल्या ओळी गुणगुणल्या. असे करत करत एका अजरामर गीताच्या , दीर्घ काव्याला संगीतात बंदिस्त करून रसिकांच्या समोर पंचमदांनी प्रस्तुत केले." मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा हैं.." या काव्यातील प्रत्येक ओळ तरल भावूक मनाच्या भावना व्यक्त करते. एखादे सुंदरसे फूल एखाद्या स्रीने आपल्या डोक्यावर लावावे अन् त्या फुलाचे सौंदर्य वाढवावे तसेच काहीसे या काव्यामुळे आशा दीदी यांनी गुलजार साहेब यांच्या या काव्याचे सौंदर्य अजून वाढवून इतिहासात अजरामर केले. याचं काव्य लिखाण बद्दल गुलजार साहेब यांना आणि अत्यंत सुरेल आवाजात गायन केल्या बद्दल आशा दीदी भोसले यांना भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.
आत्मिक आनंद देणाऱ्या बाबींना जपून ठेवून निवांत वेळी अनुभवायचे असते.जसे की मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात गुलजार साहेब लिखित दिग्दर्शित इजाजत चित्रपटाला अनुभवत असतो.
असो, आज गायन क्षेत्रातील चतुरस्त्र सारस्वत आशा दीदी भोसले यांचा स्वर्गवास झाला आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच भारतमातेच्या चरणी प्रार्थना..!
भावपूर्ण श्रद्धांजली..!🙏
फोटो स्रोत : सोशल मीडिया
वंदे मातरम्
एक रसिक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक : १२/४/२०२६, रविवार
शनिवार, ११ एप्रिल, २०२६
भला माणूस शेख गनी उपाख्य डॉन..!
मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
भला माणूस शेख गनी उपाख्य डॉन..!
=====================
परवा दिनांक १०/४/२०२६ शुक्रवार रोजी दुपारी लासूर स्टेशन येथील स्वर्गीय शेख गनी उपाख्य डॉन यांच्या ऐन तारुण्यात झालेल्या स्वर्गवासानंतर त्यांच्या घरी दुःखद सांत्वनपर भेट दिली.सोबत होता माझा अत्यंत आवडता विद्यार्थी गणेश नानासाहेब पाटील गाजरे.
मी माझ्या आयुष्याच्या प्रवासातील जवळ जवळ दीड तप लासूर स्टेशन येथे व्यतीत केले. लासूर स्टेशनचे एक हळुवार प्रेमळ स्थान हृदयात आहे. आमचे स्व.आई दादा सोबत होते, त्यामुळे आधाराचा अन् मायेचा आनंद आयुष्यात होता.लासूर स्टेशन येथे वास्तव्यात असताना इ.स.२०१४ मध्ये माझ्या स्व.आईच्या पायाला फ्रॅक्चर झालेले होते.वैजापूर स्थित डॉ.रहाणे हॉस्पिटल येथे काही दिवसाच्या अंतराने न्यावे लागायचे. माझ्या स्व.आईच्या पायाची हालचाल अजिबात होत नसे.तब्येतही स्थूल होती.अशाच एका दिवशी आईला वैजापूर येथे न्यायचे होते.ऑगस्ट महिना होता.आभाळ भरून आले होते.त्यावेळी लासूर स्टेशन येथे ॲम्ब्युलन्स नसल्यात जमा होत्या.आताची परिस्थिती माहीत नाही. माझ्या माहितीनुसार आमच्या घराच्या पाठीमागे असलेल्या Dr. खरात साहेब ( आस्था हॉस्पिटल लासूर स्टेशन) आणि माझे प्रिय मित्र राहुल भाऊ शिरसाठ यांच्याच कडे ॲम्ब्युलन्स होती. Dr. खरात साहेबांना आदल्या दिवशीच भेटून उद्या ॲम्ब्युलन्स मिळेल का? अशी प्रश्नार्थक विनंती केली. डॉ.खरात साहेब भला देव माणूस..!क्षणाचाही विलंब न करता होकार दिला. फक्त त्यांनी नम्रपणे सांगितले की, " सर, ॲम्ब्युलन्स खूप दिवसांपासून बंद आहे आणि कामावर पण आलेली आहे.तरी पण पाठवून देतो.काहीच काळजी करू नका..!"
दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्या डॉ.खरात साहेब ( आस्था हॉस्पिटल लासूर स्टेशन) यांनी त्यांची ॲम्ब्युलन्स माझ्या घराच्या समोर पाठवून दिली.त्या ॲम्ब्युलन्सवर शेख गनी ज्यांना अख्खे लासूर स्टेशन डॉन म्हणून ओळखत असायचे ते चालक म्हणून आले होते. आल्या आल्या लगेच शेख गनी उपाख्य डॉन म्हणाले..
" गुरुजी , चला निघायचे का..?"
डॉन भाऊ, तरुण कणखर तब्येतीचा होता.मी त्यांना अत्यंत आत्मियतेने घरात आणले. नाही नाही म्हणत होते तरी देखील चहा पोहे असा एकंदरीत अल्पोपहार केला.माझी स्व.आई बाजूलाच अंथरुणावर झोपून होती.आईच्या आग्रहाने अल्पोपहार आटोपला. माझ्या स्व.आईचा स्वभावचं अत्यंत मायाळू होता.आईचा हा सदगुण जेवण, अल्पोपहार अन् चहाच्या वेळी पालखेड येथील माझ्या जिवलग मित्रांना प्रत्येकवेळी यायचा.हाच अनुभव माझ्या आयुष्याच्या प्रवासातील दुसऱ्या गावी लासूर स्टेशन येथे शेख गनी उपाख्य डॉन यांनाही आला होता.शेवटी मीच आईला म्हणालो..
" आई, जास्त आग्रह करू नको.त्यांना जेवढे हवे तेवढे पोहे घेतील."
अखेर अल्पोपहार आटोपला.घरी मी , माझे वयोवृद्ध वडील, माझी पत्नी आणि धाकटा मुलगा नयन त्याचे त्यावेळी वय साधारणतः पाच वर्षे असेल एवढेच जण होतो.आता आईला झोपलेल्या अवस्थेत घराच्या बाहेर उभ्या असलेल्या ॲम्ब्युलन्स मध्ये न्यायचे होते.एका बाजूला मी अन् माझ्या पत्नीने अंथरूणाला धरले आणि दुसऱ्या बाजूला शेख गनी उपाख्य डॉन भाऊ यांनी एकट्याने धरले. शेख गनी मला म्हणाले..
" गुरुजी, पॅक धरा, आईचे वजन जास्त आहे."
हळूहळू चालत चालत आम्ही आईला अलगदपणे ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेलो. माझे वयोवृद्ध वडील घरीच थांबणार होते.आम्ही लासूर स्टेशन येथील महावीरनगर येथून लासूरगाव मार्गे वैजापूर येथे निघालो.पावसाची रिमझिम सुरु झाली होती.ॲम्ब्युलन्स गाडी काहीशी अस्वस्थच जाणवू लागली होती.अखेर जे व्हायला नको तेच झाले.लासूर स्टेशन ते लासूरगाव रस्त्याच्या मध्यावर ॲम्ब्युलन्स बंद पडली.आता काय करावे..?
हा अत्यंत वेदनादायी प्रश्न माझ्या समोर निर्माण झाला होता.शेख गनी भाऊंनी खूप प्रयत्न केले पण ॲम्ब्युलन्स काही चालू होईना.अखेर मी लगेच माझे प्रिय मित्र राहुल भाऊ शिरसाठ ( शारदा मेडिकल ) यांना मोबाईलवरून संपर्क केला.प्रिय मित्र राहुल भाऊ शिरसाठ यांना जी आहे ती सत्य परिस्थिती सांगितली.राहुल भाऊंनी क्षणाचाही विलंब न करता त्यांची ॲम्ब्युलन्स काही वेळात पाठवून दिली आणि " अजून काही मदत लागली तर आवर्जून सांगा सर..!" राहुल भाऊ शिरसाठ यांचा मानसिक आधार त्यावेळी धीर देऊन गेला.
राहुल भाऊ शिरसाठ यांची ॲम्ब्युलन्स काही वेळात आली होती.वरतून रिमझिम पाऊस सुरू होता.रिमझिम पावसात आईला बंद पडलेल्या ॲम्ब्युलन्स मधून बाहेर काढून बाजूच्या दुसऱ्या ॲम्ब्युलन्स मध्ये न्यावे लागणार होते.शेख गनी भाऊंनी मला धीर दिला अन् म्हणाले..
" गुरुजी टेन्शन मत लो, मैं हुं..! "
असे म्हणून आमच्या आईच्या अंथरूणाला एका बाजूने घट्ट पकडून अन् दुसऱ्या बाजूला मी , माझी पत्नी यांनी पकडून आईला बंद पडलेल्या ॲम्ब्युलन्स मधून बाहेर काढून बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या ॲम्ब्युलन्स मध्ये अलगदपणे ठेवले.आभाळातून रिमझिम पाऊस सुरू होता.आई भिजू नये म्हणून आईच्या चेहऱ्यावर छत्री धरण्याची जबाबदारी धाकटा मुलगा नयन याने निभावली होती.आईला बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या ॲम्ब्युलन्स मध्ये अलगदपणे ठेवल्यानंतर शेख गनी भाऊकडे बघून माझ्या स्व.आईने दोन्ही हात जोडले. आईने तिच्या मूळ अत्यंत प्रेमळ अन् मायाळू स्वभावाला अनुरूप अतिशय नम्रपणे जोडलेले हात कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या आपल्या संस्कृतीचे मूल्य दर्शवित होते.त्यावेळी माझ्या अन् माझ्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू आले होते.शेख गनी भाऊंनी ते ओळखले माझ्या खांद्यावर हात ठेवून मला म्हणाले..
" गुरुजी, टेंशन मत लो, उपरवाला साथ हैं.आप अपनी अम्मी की सेवा कर रहे हो.खुशनसीब हो..! रस्ते में अगर कुछ तकलीफ होती हैं तो मुझे तुरंत कॉल करो.मैं जल्द से जल्द पहुंच जाऊंगा..! "
दुसऱ्या ड्रायव्हर भाऊंना आवश्यक ती काळजी घेण्याचे सांगितले आणि आम्हाला पुढील मार्गाला सुव्यवस्थीपणे मार्गस्थ केले.
जो पर्यंत लासूर स्टेशन येथे वास्तव्याला होतो तो पर्यंत अधून मधून मला शेख गनी भाऊ कॉल करून आईच्या तब्येती बाबत खुलासा घेत असायचे.मी माझ्या आईच्या आयुष्यावर आधारित आई वडील हयात असताना एकतीस भागात लेख लिहिलेले आहेत.त्यातील एका भागात शेख गनी भाऊंनी आमच्या आयुष्यात कृतीतून व्यक्त केलेल्या मदतीचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आहे.सदरील पुस्तक अजून प्रकाशित केलेले नाही.भविष्यात बघू..!
जात धर्म ह्या मानव निर्मित बाबी..! ज्याने त्याने त्याचा यथा योग्य सामाजिक हितासाठी उपयोग करायला हवा.त्यांचे उपद्रवमूल्य वाढले की सामाजिक वातावरण गढूळ होते.धर्माच्या मदतीने माणसाने समुहाने , आत्मियतेने , आनंदाचे काही क्षण साजरे करुन आपापल्या परंपरा जपत जगायला अन् जपायला सुरुवात केली. काळाच्या ओघात जात, धर्म , वंश इत्यादी बाबींचा माणसाच्या आयुष्यात कधी अहंकाराने कधी न्यूनगंडाने वापर होऊ लागला.यात घुसमट झाली ती कमी संख्येच्या, संवेदशील मनाच्या अन् भावनाशील मनाच्या मानवी घटकांची..! माणसाच्या आयुष्यात रक्ताचे नाते श्रेष्ठ की रक्त विरहित नाते श्रेष्ठ..? हा प्रश्न आपल्याच पूर्वजांच्या कित्येक उदाहरणांवरून त्यांनी आपल्या समोर प्रस्तुत करून ठेवलेले आहे. मोह, माया अन् मानवी आयुष्य यावर श्रीकृष्णाने आपल्या विद्वत्तेने केलेले वैचारिक भाष्य सर्व मानवी घटकांना सदैव अनुकरणीय आहे.शेख गनी माझा रक्ताचा नातेवाईक नव्हता, मात्र विधात्याने ऐन संकटात पाठविलेला त्यावेळचा देवदूत होता. अशावेळी रक्ताची नाती बोधट ठरतात अन् चिरंजीव ठरतात रक्त विरहित नाती..! आर्ष कालीन , प्राचीन , मध्ययुगीन अन् आधुनिक काळात मानवी जीवनातील असे कित्येक उदाहरणे आहेत ज्यांनी ऐन वेळी मदत करतो तो विठ्ठल याची अनुभूती कित्येकांना दिलेली आहे.
आमच्या आयुष्यातील देवदूत स्व.शेख गनी उपाख्य डॉन भाऊ यांचा स्वर्गवास झाला आहे हे मला सोशल मीडियाद्वारे उशिरा माहित झाले. लासूर स्टेशन येथील त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे , सांत्वनपर गृहभेट घेतली.यावेळी त्यांच्या घरातील जेष्ठ बंधू उपस्थित होते.त्यांनाही डॉन भाऊंच्या माणुसकीच्या आठवणी सांगितल्या.त्यांनाही गहिवरून आले.
असो, शेख गनी उपाख्य डॉन भाऊ ( सावंगी लासूर स्टेशन )यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच भारतमातेच्या चरणी प्रार्थना..!
भावपूर्ण श्रद्धांजली..!🙏
वंदे मातरम्
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक : १२/४/२०२६, रविवार
शनिवार, ४ एप्रिल, २०२६
' आधार आदरणीय कौराजी पाटलांचा..!'
#मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
' आधार आदरणीय कौराजी पाटलांचा..!'
===================================
आम्ही दिनांक ३/४/२०१६, रविवार रोजी भल्या सकाळी पालखेड परिसरातून निघून नाशिक येथे पोहोचलो होतो.
निमित्त होते,प्रिय जिवलग बालमित्र डॉ.संजय राऊत याला कानिफनाथ महाराज यांची मूर्ती नाशिक येथून घेऊन यायची होती आमच्या या बालमित्राला ,सदरील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मौजे बाजार वाडगाव, ता. गंगापूर येथे करायची होती.
मात्र सदरील प्रवासाला निघण्यापूर्वी एक दिवस अगोदर प्रिय बालमित्र संजुचा मला फोन आला की,
" नंदू, ,आपल्याला कानिफनाथ महाराज यांची मूर्ती नाशिक येथून घेऊन यायची आहे.तुला सोबत यावेच लागेल. अजुन एखादी अनुभवी जाणकार व्यक्ती सोबत घे..!"
हे ऐकल्याबरोबर माझ्या डोळ्यासमोर लगेच माननीय कौराजी पाटील निघोटे ( सरपंच हडस पिंपळगाव ) नाव आले. त्याचं कारण असं की,मी हडस पिंपळगाव, ता.वैजापूर येथे जवळजवळ आठ वर्षे शिक्षक म्हणून सेवा केली होती.या संपूर्ण कालावधीत याच गावातील जय बाबाजी भक्त परिवारातील माझे गुरुबंधू माननीय कौराजी पाटील निघोटे यांचा एक सकारात्मक अन् अतिशय खंबीर नेतृत्व म्हणून जवळून परिचय झाला होता. विशेष म्हणजे धार्मिक अन् सामाजिक कामासाठी कौराजी पाटील निघोटे यांची समर्पण वृत्ती जवळून पाहिली होती. मी दुसऱ्याच क्षणी कौराजी पाटील निघोटे यांना फोन केला अन् म्हणालो..
" पाटील, जय बाबाजी, वंदे मातरम्..! उद्या आपल्याला सकाळी लवकर नाशिक येथे कानिफनाथ महाराज यांची मूर्ती आणायला जायचे आहे. तुम्हाला यायला जमेल का..?"
माननीय कौराजी पाटील निघोटे यांनी लगेच होकार दिला अन् सांगितले की,
" गुरुजी, तुम्हीं या,मी जळगाव फाटा फाट्यावर सकाळी येऊंन थांबतो..!"
(स्थानिक परिसरात याला लाडमसरी / लाडले अन्सारी फाटा देखील म्हणतात.)
सहजवृत्तीने, सहकार्यवृत्तीने चांगल्या कार्यासाठी कौराजी पाटील निघोटे यांनी प्रवासासाठी होकार दिला होता. सकाळी सहा वाजता नियोजित ठिकाणी यावे असे ठरले.मी लगेच माझ्या बालमित्राला फोन करून पुढील नियोजन सांगितले.
मी पहाटे ५:३० वाजता लासूर स्टेशन येथून निघून जळगाव फाट्यावर पहाटे ५:४५ ला पोहोचलो. कौराजी पाटील निघोटे अगोदरच येऊन बसलेले होते.पालखेड ( शेड फाटा ) फाट्याहुन जिवलग बालमित्र डॉ.संजू राऊत व जिवलग बालमित्र डॉ.गणेश वाणी यांच्या सोबत पुढील प्रवासाला चार चाकी वाहनात निघालो. माझी दुचाकी पालखेड फाट्यावर एका दुकानासमोर उभी करून दिली होती.
नाशिक येथे कानिफनाथ महाराज यांची मूर्ती घेतली.याकामी कौराजी पाटील निघोटे यांचा अनुभव कामी आला होता. दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती.आम्ही हॉटेल मध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली,मात्र कौराजी पाटील निघोटे म्हणाले की,
" गुरुजी, आपण इथून जवळच असलेल्या बाबाजी आश्रमात जाऊ,दर्शन घेऊ अन् तिथंच आश्रमातील जेवण करू..!"
आम्ही होकार देऊन आश्रमात जाऊन दर्शन घेऊन,मस्तपैकी वरण पालक भाजी,बाजरीच्या भाकरी सोबत काला कुस्करून पोटभरून जेवण केले.ही भोजन व्यवस्था फक्त आणि फक्त कौराजी पाटील निघोटे यांच्या , आश्रमातील परिचयामूळेच शक्य झाली होती.भक्तीचा,दर्शनाचा अन् जेवणाच्या तृप्तीचा ढेकर देऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.
माननीय कौराजी पाटील निघोटे अतिशय कडक शिस्तीच्या स्वभावाचे व्यक्तिमत्व..! आम्ही ज्यावेळी हडस पिंपळगाव येथे शिक्षक म्हणून सेवा करत होतो तेंव्हा आम्हा सर्व शिक्षकांना सकारात्मक कार्यासाठी नेहमी पाठिंबा देत होते.आदरणीय कौराजी पाटील निघोटे हे तत्त्वनिष्ठ,स्वाभिमानी अन् वेळ प्रसंगी लवचिक अन् शिस्तीचे पाईक म्हणून देखील मला खूप भावलेले आहेत.शाळेत काही पाल्यांच्या तक्रारी आल्यावर जबाबदार व्यक्ती म्हणून त्या बाबी कौराजी पाटील निघोटे यांच्या कानावर घातल्या जात असायच्या.त्या त्या प्रत्येकवेळी कौराजी पाटील यांनी शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी अन् शिक्षकांसाठी स्वीकारलेल्या संरक्षणवृत्तीचे, समाजहिताचे वेळ प्रसंगी कठोर शिस्तीचे धोरण स्वतः पुढाकार घेऊन वेळोवेळी अंगिकारले होते. वेळ प्रसंगी शाळेतील काही विद्यार्थ्यांना योग्य त्या शब्दात समजावून सांगून शाळेच्या हितासाठी केलेलं कार्य नक्कीच कौतुकास्पद अन् अभिमानास्पद होते. आजकाल इथून तिथून अशी निर्भीड, तत्त्वनिष्ठ वेळ प्रसंगी कठोर, लवचिक समाजहितासाठी कार्य करणारी सार्वजनिक आयुष्यातील पिढी अत्यंत कमी प्रमाणात आढळून येते. शाळेत ,विद्यार्थ्यांची, कोणतीही समस्या निर्माण झाली तर माननीय कौराजी पाटील निघोटे सर्वात पुढे येऊन यातून सहजसुंदर मार्ग काढायचे.चांगल्या कामासाठी शिक्षकांना नेहमी पाठबळ देत होते. त्यांच्या सरपंच कार्यकाळात आणि सरपंच पदावर नसल्यावर सुध्दा ,शिक्षकांसाठी खूप मोठा मानसिक आधार माननीय कौराजी पाटील निघोटे यांचा होता.
प्रस्तुत फोटो स्थळ : पंचवटी नाशिक.
सोबत : माझे प्रिय बालमित्र डॉ.गणेश वाणी व डॉ.संजय राऊत.तसेच सोबत हडस पिंपळगाव,ता.वैजापूर येथील माजी सरपंच आदरणीय कौराजी पाटील निघोटे.
वंदे मातरम्
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
भेट दि.३/४/२०१६ रविवार
बुधवार, १ एप्रिल, २०२६
नर्मदे हर हर..!🙏🕉️🙏
शुक्रवार, २७ मार्च, २०२६
" सारस्वतांचे आम्ही भक्त रसिक...!"
#आमचे गाव आमची माणसं ©️
" सारस्वतांचे आम्ही भक्त रसिक...!"
=========================
रसिक नसलेलं मन , एखाद्या वाळवंटातील काटेरी झुडपा सारखं असतं.रसिक असलेलं मन, कलाकृतींना आपल्या मनाला सतत प्रफुल्लित ठेवण्यासाठी एखाद्या औषधा सारखं उपयोगात नेहमी आणत असतं.ज्याला मन अन् ज्या मनाला भावना असतात अशांनीच रसिकांची रसिकता जपलेली आहे. रसिक असलेलं मन नटरंग देवतेची पाठराखण करत असते, कारण रसिक मनाला पुरेपूर ठाऊक असते की, मनाच्या आजारावरील सर्वोत्तम औषध कोणते असेल तर ते याच नटरंग देवतेच्या चरणी समर्पित केलेली कला आहे.याच कलेच्या गाभाऱ्यात सारस्वत अन् त्याचे भक्त रसिक आनंदात जगत असतात.
माझे जन्मगाव पालखेड ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर या गावाला जवळ जवळ शंभर वर्षांची नाट्य परंपरा आहे. मला जेंव्हा पासून समज आली तेंव्हा पासून दरवर्षी पालखेड गावातील पारेश्वर महादेवाच्या कार्तिकी यात्रेतील काही नाटकं अन् त्यातील नाट्य कलाकार कायमचे हृदयात स्थान मिळवून आहेत.माझ्या मते आमच्या पालखेड गावात सादर केलेल्या सर्वोत्तम अभिनयाच्या भूमिका अन् ती सादर केलेले पालखेडकर नाट्य कलाकार पुढीप्रमाणे..
क्रम : नाटक – भूमिका – नाट्य कलाकार
नाटक – संत तुकाराम ,
भूमिका – संत तुकाराम महाराज,
नाट्य कलाकार –आदरणीय माणिक भाऊ मोकाटे ,
नाटक –राक्षशी लालसा ,
भूमिका – राजा शशांक ,
नाट्य कलाकार – आदरणीय निवृत्ती काका कुमावत,
नाटक – मानी मराठा ,
भूमिका –छत्रपती संभाजी महाराज ,
नाट्य कलाकार –आदरणीय नवनाथ काका गायकवाड ( निवृत मुख्याध्यापक ) ,
नाटक – मानी मराठा,
भूमिका –औरंगजेब ,
नाट्य कलाकार – स्व.भानुदास भाऊ शिंदे,
नाटक – मानी मराठा,
भूमिका – गणोजी शिर्के ,
नाट्य कलाकार – स्व.रामकृष्ण रोठे,
नाटक – एकच प्याला ,
भूमिका – सुधाकर ,
नाट्य कलाकार – आदरणीय तुळशीदास मुलमुले,
नाटक – एकच प्याला ,
भूमिका – सिंधू ,
नाट्य कलाकार – आदरणीय अशोक वाणी,
नाटक – संगीत शारदा,
भूमिका – शारदा
नाट्य कलाकार –आदरणीय स्व. नंदलाल भाऊ जैन, आदरणीय रमेश भाऊ जैन आणि आदरणीय जगन्नाथ भाऊ निकम,
नाटक – विच्छा माझी पुरी
नाट्य कलाकार- नारायण रोठे ( टेलर ),
तसेच माझ्या पिढीच्या अगोदर जी सर्वोत्तम मराठी नाटकं अन् त्यातील सर्वोत्तम नाट्य कलाकार आमच्या पालखेड गावात होऊन गेलेले आहेत ते गावातील वडीलधाऱ्या माणसांकडून त्या विषयी नेहमी ऐकलं आहे.त्यात प्रामुख्याने....
नाटक – तंट्या भिल ,
भूमिका – आदरणीय ऋषीपाठक गुरु,/ स्व.खांडेकर सर ( राजू भाऊ गिरजीनाथ शेळके सर यांचे नातेवाईक ),
नाटक – संगीत सौभद्र / संगीत शारदा ,
नाट्य कलाकार – स्व.आदरणीय नंदलाल भाऊ जैन आणि स्व. आदरणीय राजाभाऊ नाना जैन
पालखेड गावातील शास्त्रीय संगीत नाटकांना दिग्दर्शित करण्यासाठी माझ्या पाहण्यात आलेले दोन दिग्दर्शक होते ते म्हणजे स्व.आदरणीय एकनाथ नाना पगार अन् स्व. आदरणीय एकनाथ आण्णा वाणी होय.
तसेच गावातील पूर्वीच्या काळी जी संगीत प्रधान शास्त्रीय संगीताची नाटकं सादर करण्यात आली होती त्याला हार्मोनियमची साथ माझे सख्खे आजोबा स्व.चंपतराव जाधव, अन् तबला साथ माझे चुलत आजोबा स्व.नागोराव जाधव यांनी सर्वोत्तम साथ दिली होती. त्या शास्त्रीय उंचीची साथ अद्याप पर्यंत पालखेड गावात कुणालाही देता आली नाही हे गावातील जुने जाणते नागरिक आवर्जून सांगतात.
विशेष नाटकांची विशेष आवड असली की विशेष काहीतरी बघावं वाटतं छत्रपती संभाजीनगर शहरातील नाट्यगृहात अनेक विशेष नाटकं बघितली.कधी पालखेड येथून मित्रांच्या सोबत येऊन तर कधी लासूर स्टेशन येथून येऊन तर कधी छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक झाल्यावर बरीच मराठी नाटकं एकट्याने न बघता सह परिवार बघितली आहेत.या सर्व बघितलेल्या सर्व नाटकांपैकी चार नाटकं विशेष आवडली ती पुढीलप्रमाणे -
हॅम्लेट ( मराठी नाटक ) ,
ऑल द बेस्ट ( मराठी नाटक ) ,
देवबाभळी,
चौथे नाटक आहे..
शरद पोंक्षे अभिनित मी नथुराम गोडसे बोलतोय.छत्रपती संभाजीनगर येथे ’ मी नथुराम गोडसे बोलतोय ’ हे नाटक बघण्यासाठी पालखेड येथून चार चाकी जीप वाहन करून आलेल्या गावकरी मित्रांच्या सोबत सदरील नाटक बघितलेले आहे.
हरिभाऊ वडगावकर लिखित ' गाढवाचं लग्न ' हे वगनाट्य मी व माझ्या काही बालमित्रांनी माध्यमिक वयोगटात असताना आमच्याच पालखेड गावातील श्री. पारेश्वर महादेव मंदिर गल्लीतील स्व. उत्तम काका निकम यांच्या हॉटेल मध्ये टेप रेकॉर्डरवर कित्येकदा ऐकलं आहे.शाळा सुटली की चार वाजेनंतर बऱ्याचदा उत्तम काका निकम यांच्या हॉटेल मध्ये बसून दादू इंदूरीकर यांचं ' गाढवाचं लग्न ' टेप रेकॉर्डर वर ऐकलं आहे. आदरणीय स्व. उत्तम काका निकम यांचे चिरंजीव विलास निकम ( ह.मु. छत्रपती संभाजीनगर) हा आमचा प्रिय मित्र होता अन् आहे.त्या मैत्रीच्या नात्यातून अन् मुळात विकास निकम यालाही दादू इंदूरीकर यांचं गाढवाचं लग्न ऐकायला जाम आवडायचं,त्यामुळं आम्ही काही रसिक मित्र मंडळी उठल्या पडल्या विलास निकम यांच्या हॉटेल मध्ये सदरील वगनाट्य अगदी तल्लीन होऊन ऐकलेलं आहे. वगसम्राट दादू इंदूरीकर यांच्या विशिष्ट अशा संवादाच्या प्रेमात मी पौगंडावस्थेतील वयोगटापासून ते आजतागायत आहे. गाढवाचं लग्न या वगनाट्यात दादू इंदूरीकर यांनी जी ' सावळ्या कुंभाराची ' व्यक्तिरेखा साकारली आहे त्या उंचीची व्यक्तिरेखा अद्याप पर्यंत कोणत्याही अभिनेत्याला साकारता आली नाही.मोहन जोशी, मकरंद अनासपुरे यांनी गाढवाचं लग्न अन् त्यातील सावळा कुंभार सादर केला,पण दादू इंदूरीकरांच्या अचूक संवादाच्या टायमिंगची कमाल यांना साधता आलीच नाही.माझ्या मते हिंदी चित्रपटसृष्टीतील दादू इंदूरीकर म्हणून गोविंदा यांनाच ओळखल्या जाऊ शकते. त्याचं कारण, दोघांच्याही विनोदी संवादाची अचूक फेक सर्वोत्तम ठरली.
मी माध्यमिक वयोगटात असताना ' घाशीराम ड्रायव्हर ' या नाटकाची टेप रेकॉर्डर वरील ऑडियो कॅसेट पालखेड येथील आमच्याच गल्लीतील आदरणीय राजू आप्पा जैन यांच्या घराच्या बाजूला असलेल्या घरात ऐकलेली आहे.राजू आप्पा जैन याच्या घराच्या बाजूला जे घर होते त्याला आम्ही त्याकाळी ' गोठा ' असे म्हणत असे.संवाद काहीसे आचरट होते, पण रसिकतेने भान असल्याने त्याचा आनंद फक्त एक रसिक म्हणून घेतला होता.
चित्रपटात देखील काही नाट्य रसिकता दाखवल्या गेलेली आहे. नाटक वेड्या तरुणाची कथा असलेला एन. चंद्रा दिग्दर्शित अन् नाना पाटेकर अभिनित ' वजुद ' नावाचा एक हिंदी चित्रपट येऊन गेलेला आहे.नाना पाटेकर यांनी यात मल्हार नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. हा चित्रपट मध्यांतर पर्यंत खूप छान होता,पण मध्यांतर नंतर पूर्णपणे भरकटून गेला.मात्र याच चित्रपटाच्या अगदी शेवटी ,मल्हार नावाच्या व्यक्तिरेखेने नाटकाच्या मंचावर अप्रतिम असे स्वगत सादर केले होते.असे स्वगत माझ्या मते अद्याप पर्यंत कोणत्याही चित्रपटात ,कोणत्याही अभिनेत्याने अथवा अभिनेत्रीने सादर केलेले नाही.एका नाटक वेड्या तरुणाची एकतर्फी प्रेमापोटी, अभिनयाच्या वेडा पोटी होणारी मनाची होरपळ वजुद चित्रपटात चित्रित करण्यात आली आहे.बहुदा मध्यांतराच्या नंतर पटकथेत गडबड झाल्याने आपण एका खूप सुंदर चित्रपटाला मुकलो असे मला एक रसिक म्हणून आजही वाटते.रंगभूमीसाठी अन् अभिनयासाठी एखादा अभिनेता किती आसुसलेला असतो याचं खूप छान चित्रण वजुद चित्रपटात आहे.
पालखेड गावातल्या रसिक आठवणी खूप आहेत.त्यातली एक गमतीशीर आठवण थोडक्यात पुढीलप्रमाणे होय.
राक्षसी लालसा नाटक जेवढ्या वेळी पालखेड येथे एकाच नाटक पार्टीकडून सादर केल्या गेले तेवढे इतर कोणतेच नाटक पुन्हा पुन्हा सादर केल्या गेले नाही.राक्षसी लालसा हे नाटक एवढ्या वेळी पुन्हा पुन्हा दरवर्षी सादर झाले होते,की त्यातील भूमिकांचे संवाद गावातील प्रेक्षकांचे तोंडपाठ झाले होते.🙂 नाटकाच्या सुरुवातीची गण झाल्यावर नाटकाला प्रारंभ व्हायचा.राजा शशांक ( निवृत्ती काका कुमावत ) सिंहासनावर बसलेले असायचे. सिंहासनावरून उडी मारून राजा शशांक यांचा संवाद असायचा...
" प्रतिभा प्रतिभा तुझ्या या राक्षसी लालसेने.." इत्यादी संवाद म्हणल्या म्हणल्या लाईट जायची. लगेच सदरील नाटकाचे इतर पाठीराखे गावाच्या बाहेर दहेगाव रस्त्याला असलेल्या विद्युत डिपीकडे जाऊन उडालेले फ्यूज टाकून द्यायचे.लाईट पुन्हा सुरळीत होऊन पुन्हा राजा शशांक ( निवृत्ती काका कुमावत)सिंहासनावर बसून तोच संवाद उडी मारून म्हणून नाटकाला प्रारंभ करायचे. राजा शशांक यांनी उडी मारली रे मारली की लाईट जायची.असे साधारणतः तीन चार वर्षे झाले.अखेर याच नाटकाच्या पार्टीतील काहीजण याचं नाटकाच्या सुरुवातीलाच दहेगाव रस्त्याला लागून असलेल्या विद्युत डिपी जवळ राखण बसू लागले. तेंव्हा कुठे राजा शशांक ( निवृती काका कुमावत) यांनी सिंहासनावरून उडी मारून पुढील संवाद म्हणून नाटक सुरळीत प्रारंभ होऊ लागले होते. राजा शशांक यांच्या उडीच्या वेळी नेमक्या वेळी जाणारी light 🚨 आपोआप जात होती की मुद्दामहून कुणीतरी डीपी वरील फ्यूज बंद करत होते हे गावातल्या नाट्य कलाकारांना अन् रसिकांना माहित असलेले / नसलेले कोडेच होते.
काळाच्या ओघात, जबाबदारीच्या ओघात तसेच माझे स्व.तीर्थरूप आई वडील यांच्या स्वर्गवासानंतर गाव, आयुष्याच्या दैनिक प्रवासात मागे सुटत चालले.मात्र गावातल्या आठवणी माझ्या आयुष्याच्या प्रवासात सदैव चिरंजीव आहेत.अधून मधून गावाकडे जाणे येणे होते तेंव्हा गतकाळातील आठवणी हृदयात एखाद्या सारस्वताचे पूजन कराव्यात तशा पवित्र भावनेने जाग्या होतात.
गावातल्या नाटकाच्या अनेकानेक आठवणी आहेत, तुर्तास आवरतं घेतो. आज या रसिक आठवणींचे स्मरण होण्याचं कारण असे की, आज रंगभूमी दिवस आहे त्यामुळं गतकाळातील अनेक आठवणी मनाच्या गाभाऱ्यात दाटून आल्या अन् त्या सर्व रसिक माय बापांच्या समोर एक रसिक म्हणून प्रस्तुत केल्या..!
आजच्या रंगभूमी दिवस निमित्त सर्व नाट्य कलाकारांना त्यातल्या त्यात माझी जन्मभूमी पालखेड येथील हयात नसलेल्या अन् हयात असलेल्या सर्व नाट्य कलाकारांना माझ्याकडून अन् माझ्या कुटुंबाकडून विनम्र मानवंदना..!🙏🏻
लेखाच्या सोबत प्रस्तुत असलेल्या फोटोत माझ्यासह प्रिय शिक्षक मित्र सुनील जोशी सर, अरविंद पाटील सर अन् पारस जैन सर आहेत.
स्थळ: शासकीय अध्यापक महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर
( इ.स. २०१० - १२ )
ता. क. - कलेसाठी रसिकांची रसिकता ही रसिक देवतेचे केलेले पूजन असते.
वंदे मातरम्
एक रसिक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक : २७ मार्च २०२६, शुक्रवार
मंगळवार, २४ मार्च, २०२६
बुवा तिथे बाया – एक अपूर्ण राहिलेली आठवण..!
मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
बुवा तिथे बाया – एक अपूर्ण राहिलेली आठवण..!
=====================
आम्ही पालखेड येथे श्री.पारेश्वर विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिकायला होतो.त्यावेळी आमचे गुरुवर्य आदरणीय जी.एम.भगत सर यांनी आम्हा काही विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आचार्य अत्रे लिखित ' बुवा तिथे बाया ’ हे नाटक करण्याचे ठरविले होते.नाटकाचे नाव ऐकल्या ऐकल्या आम्हा सर्व विद्यार्थी मित्रांना गुदगुल्या झाल्या होत्या.आम्ही पालखेडकर मुळातच नाटकी अन् कलेवर निस्सिम प्रेम करणारे असल्याने उत्कृष्ट लेखकाचे नाटक असल्याने ’ बुवा तिथे बाया ’ हे धाडसी नाटक करण्याचे ठरविले होते.
त्यावेळी आजच्या सारखी अद्ययावत पुस्तके मिळण्याचे ऑनलाइन व्यवस्था नव्हती. सदरील नाटकाचे पुस्तक तत्कालीन औरंगाबाद आत्ताचे छत्रपती संभाजीनगर येथे मिळेल या आशेने आमच्याच वर्गातील वर्गमित्र रमेश घोडके अन् मी पालखेड येथून पहाटे पायी चालत निघून परसोडा रेल्वे स्टेशनवर भल्या सकाळी पोहोचलो. तिथून सकाळच्या रेल्वेने छत्रपती संभाजीनगर येथील गुलमंडी परिसरातील सर्व पुस्तकांचे दुकाने पालथे घातले मात्र आचार्य अत्रे लिखित ' बुवा तिथे बाया ’ या नाटकाचे पुस्तक उपलब्ध झाले नाही.
रिकाम्या हाताने अन् अर्धवट उपाशी पोटाने आम्ही पुन्हा परतीच्या संध्याकाळच्या रेल्वेने परसोडा रेल्वे स्टेशनवर उतरून पालखेड येथे परतलो होतो. सदरील नाटकाचे पुस्तक उपलब्ध झाले नव्हते, त्यामुळे आम्ही काही विद्यार्थी अन् आमचे गुरुवर्य आदरणीय भगत सर नाराज झालो होतो.
आमच्या पालखेड गावात जी काही अत्यंत मोजकी नाटकं आम्हा पालखेडकरांनी आपल्या कलासक्त अभिनयाने सादर करून अजरामर केलेली आहेत त्यात आदरणीय भगत सर दिग्दर्शित अन् थोर लेखक वसंत सबनीस लिखित ’ विच्छा माझी पुरी करा ’ या नाटकाचा आजही पालखेड गावाच्या नाट्य परंपरेतील इतिहासात आवर्जून उल्लेख केल्या जातो.माझे मोठे बंधू सुनील भाऊ, अंबादास भाऊ घोडके, नारायण भाऊ रोठे इत्यादी वर्गमित्रांनी भगत सर दिग्दर्शित विच्छा माझी पुरी करा या नाटकाला आपापल्या अभिनयाच्या जोरावर एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते.त्यातल्या त्यात या नाटकातील नारायण भाऊ रोठे यांनी " हल्या... हप्प...थिर्र...या अजरामर वाक्याने या नाटकाला अन् नारायण भाऊ रोठे यांच्या सर्वोत्तम अभिनयाला आमच्या पालखेड गावातील नाट्य परंपरेत अजरामर केलेले आहे.
जर यदा कदाचित आम्हाला त्यावेळी आचार्य अत्रे लिखित ’ बुवा तिथे बाया ’ या नाटकाचे पुस्तक उपलब्ध झाले असते तर कदाचित पालखेड येथील नाट्य इतिहासात आमच्याही नाटकाची नोंद झाली असती.
साधारणतः बावीस वर्षापूर्वी मी, माझी पत्नी आमचा थोरला चिरंजीव त्यावेळी थोरला चिरंजीव छोटासा होता असे आम्ही सह परिवार दुचाकीवर प्रवास करून एका धर्मगुरुचे दर्शन घ्यायला गेलो होतो.दर्शन घेतले.त्या धर्मगुरूच्या बाजूला एका भांड्यात सफरचंद अन् दुसऱ्या भांड्यात गोड गोड साखरेचे दाणे होते.आम्ही श्रद्धेने दर्शन घेतले.आम्हाला दर्शन झाल्यावर संबंधित धर्मगुरूने गोड गोड साखरेच्या दाण्याचा प्रसाद दिला.आम्ही तो प्रसाद अत्यंत श्रद्धेने घेतला.थोड्याच वेळात तिथे आलिशान चारचाकी गाडीतून काही श्रीमंत माणसं आले.त्यांचे वस्र अन् अंगावरील सोन्याच्या भरजरी दागिन्यांवरून हाय प्रोफाईल भक्त जाणवत होते.त्या श्रीमंत भक्तांनी पण त्या धर्मगुरूचे दर्शन घेतले.मात्र यावेळी त्या धर्मगुरूने बाजूला. असलेल्या भांड्यातील सफरचंद एक एक करून त्या श्रीमंत भक्तांना प्रसाद म्हणून दिले. हे दृश्य पाहून मी विचार केला की, आम्ही सर्व सामान्य आहोत म्हणून आम्हाला गोड गोड साखरेच्या दाण्याचा प्रसाद आणि नुकतेच आलेले हाय प्रोफाईल भक्त श्रीमंत आहेत म्हणून त्यांना सफरचंद..! कुणाला काहीही वाटो मात्र हा भेदभावच होता.एखादा इथे लॉजिक लावेल की, प्रसाद आहे जो दिला तो घ्यावा वगैरे..! मात्र हे लॉजिक निव्वळ तकलादू ठरते. गोष्ट छोटी होती, मात्र त्या प्रसंगावरून माझी त्या धर्मगुरु वरील श्रध्दा समाप्त झाली ती कायमची..!
प्रभू श्रीरामने शबरीचे उष्टे बोरे खाल्ले , श्रीकृष्णाने आपला गरीब मित्र सुदामा याला सन्मानाने जवळ घेतले अन् छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय सर्व सामान्य कुटुंबातील माणसांना आपलंसं केले.श्रीमंती, ऐश्वर्य , शक्ती असतानाही सर्व सामान्यांना जे समानतेची वागणूक देतात ते आपले अनुकरणीय आदर्शवादी पूर्वज आहेत. आपल्या संविधानाला अभिप्रेत असलेल्या समता अन् बंधुता या मूल्यांचे मूळ स्रोत हेच राष्ट्रपुरुष आहेत. कुठलाही सामाजिक भेदभाव करणारे आदर्शवादी कधीच नसतात.
मी काही वर्षापूर्वी प्रत्येक धर्मातील ढोंगी धर्मगुरुंवर एक लेख लिहिला होता.जर यदा कदाचित सर्च करून उपलब्ध झालाच तर पुन्हा शेअर करील. प्रत्येक धर्माच्या आडून त्या त्या धर्मातील काही ढोंगी धर्मगुरु, तत्त्वचिंतक , उपदेशक, आपापल्या धर्मातील देवभोळे असणाऱ्यांना फसवून आपल्या पिशव्या, थैल्या, तिजोऱ्या भरून आर्थिक संपन्न होतात अन् त्यात भरडल्या जातात काही स्री अन् पुरुष..! विशेषतः यात महिलावर्ग मोठ्या प्रमाणात भरडल्या जातो.
मात्र इथेही एक मेख आहे. पीडित अन् पीडिता जर स्वतःहून आपल्या आयुष्याला उध्वस्त करून घेत असेल तर..?
हा देखील मोठा सामाजिक प्रश्न आहे.याचे उत्तर बुद्धिवंतांच्या सहज लक्षात येईल.
बाकी मौन सर्वार्थ साधिके..!😷🙏
ता.क. - आचार्य रजनीश उपाख्य ओशो यांचे धर्म आणि धर्मगुरु यांच्यावरील अनेक जालीम बौद्धिकं सदैव प्रासंगिक आहेत.
वंदे मातरम्
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक : २४/३/२०२६, मंगळवार
शनिवार, १४ मार्च, २०२६
जिवलग बालमित्रांच्या सस्नेह भेटी..!
आमचे गाव आमची माणसं ©️
जिवलग बालमित्रांच्या सस्नेह भेटी..!
=====================
काल दिनांक १४/३/२०२६, शनिवारी रात्री आमचा जिवलग बालमित्र विलास उत्तम निकम हल्ली मुक्काम छत्रपती संभाजीनगर याच्या कन्येच्या विवाह निमित्त आम्ही बालमित्र छत्रपती संभाजीनगर येथे एकत्र भेटलो. सोबत होते सर्व जिवलग बालमित्र गोपीनाथ निकम, वाल्मीक निकम, वधू पिता विलास निकम आणि डॉ. संजय राऊत..! यातील काहींवर यापूर्वीच ब्लॉगवर यापूर्वीच लिहिले आहे.काही बाकी आहेत.वधू पिता तथा जिवलग बालमित्र विलास निकम तथा संजय राऊत यांच्यावर माझ्या ब्लॉगवर यापूर्वीच लेख लिहिलेले आहेत.
वधू पिता विलास निकम या बालमित्राच्या पालखेड येथील तत्कालीन हॉटेल मध्ये ( घर आणि हॉटेल एकच होते ) बसून आमच्या घरात एवढं थांबलो नाही तेवढं विलासच्या हॉटेल मध्ये उठल्या पडल्या बसून अनेकानेक विषयांवर पारायणे केलीत.त्याविषयी सविस्तर विलासवर यापूर्वीच लिहिलेल्या लेखात लिहिलेले आहे. त्या जिवलग बालमित्राच्या कन्येच्या विवाह सोहळ्यातील उपस्थिती खूप साऱ्या आठवणी पुन्हा एकदा आठवण करून गेल्या.
काल रात्री माझा अत्यंत जिवलग बालमित्र Dr. संजय राऊत अन् मी ज्या धावपळीत सदरील विवाह सोहळ्यास आलो ते फक्त आणि फक्त आम्हीच करू शकतो. गतकाळातील , बिकट परिस्थितीत एकमेकांना दिलेला भावनिक आधार अन् एकमेकांच्या घरात घरातल्या सारखं वावरणं या नात्याचा हा मूळ आधार..! एकमेकांची गतकाळातील बिकट परिस्थिती अन् त्यात एकमेकांना दिलेला आधार हाच कोणत्याही नात्याचा सर्वोत्तम आधार असतो.बाकी सगळी नाती मिथ्या ठरतात अन् आहेत. रक्ताची अन् रक्तविरहित नाती हा काय प्रकार असतो अन् त्यातील खरे खोटे कोणते याचा निदान आम्हा काही जिवलग बालमित्रांना अन् इतर काही जिवलग मित्रांना अजून तरी उलगडा झालेला नाही आणि होऊ पण द्यायचा नाही. त्याचं कारण जे नाते आपल्याला आहे त्या परिस्थितीत अन् बिकट परिस्थितीत एकमेकांच्या परिस्थितीला समजून उमजून घेते तेच नाते शाश्वत..! बाकी सब मोह माया आहे.हाच श्रीमद् भागवताचा सार आहे; पण आपल्याला आपल्या महान पूर्वजांनी जे सांगितले आहे त्यातील भावार्थ समजून न घेता आपण नको त्या बेगडी नात्यात स्वतःला शोधत असतो.विषयांतर झाले, पण आमच्या अनेक बालमित्रांच्या नात्यातील हाच भावार्थ आम्ही शोधला अन् आजही त्यावर कायम आहोत त्या विषयाच्या अनुषंगाने उपरोक्त विषय लिखाणात आला.
विशेष म्हणजे आम्ही गोपीनाथ निकम बाळगता यातील सर्वजण चित्रपटाचे विशेष रसिक..! एखादी कथा कशी तोंडी सादर करावी या बाबतीत उपस्थित दोन जिवलग बालमित्रांचा हात पाय अन् तोंड कुणीच धरू शकणार नाही.अर्थात त्या कथा ऐकताना फक्त आमच्यातच एक श्रवण भक्त म्हणून सहनशक्ती आहे हे आम्हा यात उपस्थित नसलेल्या काही बालमित्रांना ठाऊक आहे.🙂
लग्न सोहळा आटोपला.वधू पिता विलास निकम याच्या तीर्थस्वरूप सासूबाईंची श्रद्धेय भेट घेतली.वधू पिता विलास निकम याच्या तीर्थस्वरूप सासूबाईचे माहेर आमच्याच मूळ परिसरातील धोंदलगाव येथील..! आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जिवलग बालमित्र विलासच्या सासुबाई माझ्या तीर्थरूप वडिलांच्या माजी विद्यार्थिनी..! त्या भेटीत माझ्या तीर्थरूप वडिलांच्या आठवणी निघाल्या अन् पित्याच्या सानिध्याची जाणीव झाली.
मी अन् डॉ. संजय राऊत रात्री लग्न सोहळ्यातून निघाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत छत्रपती संभाजीनगर शहरातील कित्येक गल्ल्या पालथ्या घातल्या. त्यात प्रत्येक गल्लीत गतकाळातील आपले दिवस शोधले. तो स्वतंत्र्य लेखनाचा विषय असेल.एकमात्र नक्की ज्यावेळी काल रात्री उशिरापर्यंत मी अन् संजू राऊत छत्रपती संभाजीनगर शहरातील गल्ल्या हिंडलो त्यावेळी वाल्मीक निकम , Dr.गणेश वाणी, स्व.शाम शेळके, आण्णासाहेब म्हस्के, संजय गायकवाड, संजय भाऊ गणपतकाका शेळके, पारसनाथ भोईटे इत्यादी बालमित्रांच्या आठवणींना गतकाळातील सानिध्याचा अंधारलेल्या रात्री उजाळा मिळाला.त्यात कैलासनगर मधील स्मशानभूमी, बाजूलाच जळणारे मृतदेह, कित्येक रात्री रूम मधील खिडक्यातून दिसणाऱ्या त्या जळणाऱ्या मृतदेहाच्या सोबत मित्रांच्या रूमवर मुद्दामहून केलेला मुक्काम सगळं काही सोबत होते.फक्त आज त्या त्या ठिकाणाला ग्लॅमर मिळाले आहे इतकेच..!माझ्या मुलांना कैलासनगर मधील स्मशानभूमी, तिथला परिसर आणि तिथल्या आठवणी प्रत्यक्ष तिथे नेऊन दाखविलेल्या अन् सांगितलेल्या आहेत.छत्रपती संभाजीनगर येथील कैलासनगर परिसरातील तत्कालीन किरायाच्या खोल्या वारसा हक्काने आमच्याच इतर जिवलग बालमित्रांना मीठ ,मिरची, भाजीपाला रूम मधील सर्व भांड्यासह सुपूर्द केल्या होत्या. किती तो जीव..!♥️
मध्यरात्र ओलांडली होती. भले आम्ही आजच्या ग्लॅमर लाभलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरात अंधारलेल्या रात्रीत फिरत होतो, मात्र आम्ही त्याच गतकाळातील छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरात स्वतःला शोधत होतो. गतकाळातील वास्तवात जगलेल्या आठवणींना झोप येऊ लागली होती.पुन्हा कधीतरी त्या गतकाळातील आठवणी पुन्हा एकदा जाग्या होतील व्यक्त होण्यासाठी..! जिवलग बालमित्र Dr. संजय राऊत यास देखील दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या कर्मस्थळी जायचे होते.
वंदे मातरम्
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक : १५/३/२०२६, रविवार
गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०२६
जीर्ण झालेल्या परसोडा फलकाची व्यथा..!😔
मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
जीर्ण झालेल्या परसोडा फलकाची व्यथा..!😔
=====================
आज दिनांक १९/२/२०२६ गुरुवार रोजी प्रवासात असताना परसोडा रेल्वे स्टेशनवर निवांत उभा होतो. रेल्वे स्टेशन वरील जीर्ण झालेल्या, मात्र आपल्या अस्तित्वाची अजूनही उपस्थिती दर्शविणाऱ्या फलकाकडे निवांतपणे बघत होतो.जीर्ण झालेल्या, क्षीण होत चाललेल्या व्यक्ती, वस्तू / वास्तू सजीव असो अथवा निर्जीव त्यात भावार्थ शोधला की आत्मार्थ सापडतो. फक्त त्या सजीव अथवा निर्जीव व्यक्ती, वस्तू / वास्तुशी आपली कुठे ना कुठे तरी नाळ जुळलेली असावी लागते.असेच काहीसे मला त्या जीर्ण झालेल्या फलकाकडे बघून जाणवले.
रेल्वे स्टेशन वरील फलकावर लिहिलेल्या " परसोडा " या नावाला गतकाळातील याच ठिकाणच्या आठवणीत स्वतःला रमवून घेऊ लागलो होतो.
परसोडा..!
आमच्या बालपणातील अन् पौगंडावस्थेतील वयोगटाच्या काळातील आमच्या पालखेड गावाच्या परिसरातील एक महत्त्वाची बाजारपेठ असलेले गाव परसोडा..! याचं रेल्वे स्टेशनवर कित्येकदा बालपणी , पौगंडावस्थेतील हळुवार वयोगटात असताना येणे जाणे व्हायचे.कधी बालमित्रांच्या सोबत, तर कधी माझ्या स्व.तीर्थरूप आई दादाच्या सोबत..! आमच्या पंचक्रोशीतील नागरिकांच्या प्रवासाचे महत्वाचे ठिकाण हेच परसोडा रेल्वे स्टेशन होते. पालखेड येथून पायी चालत येऊन परसोडा येथून रेल्वेने पुढील प्रवासाला कित्येक प्रवासी याच परसोडा रेल्वे स्टेशनने बघितलेले आहेत. कित्येक आठवणी याच परसोडा रेल्वे स्टेशनशी निगडित आहेत. विशेष म्हणजे परिसरातील कित्येक गावातील नागरिकांच्या सुख दुःखाचे साक्षीदार असलेले परसोडा रेल्वे स्टेशन आज जीर्ण अवस्थेत जाऊन आपल्या गतकाळातील प्रवाशांच्या आठवणींनी हुंदका देत आहे. तत्कालीन काळात पंचक्रोशीतील कित्येकांच्या शिक्षणात, आजारपणात , कित्येकांच्या शुभ कार्यासाठी जाण्यासाठी , येण्यासाठी याच परसोडा रेल्वे स्टेशनने तमाम नागरिकांची सेवा केलेली आहे.भौतिक वास्तूने आपल्याला दिलेला सहवास, आधार आठवला की मन भरून येते.आजरोजी प्रशासनाची कृतघ्नता म्हणून की अजून काय मात्र परसोडा रेल्वे स्टेशन खूप दुखी जाणवले.😔
माझ्या स्व.तीर्थरूप आईचे माहेर धुळे शहर होते. माहेर म्हटलं की बहुतांशी भारतीय स्त्रियांच्या आयुष्यातील एक हळुवार कोपरा असतो. विवाहित अथवा विधवा स्त्रीचा वयोगट कोणताही असो, त्या माय माऊलीला आपलं माहेर तिच्या अख्ख्या हयातीत हळुवार मायेचा कोपरा बनून राहते. थोडक्यात काय तर, माझ्या स्व.आईच्या माहेरच्या आठवणींशी परसोडा रेल्वे स्टेशन एक महत्वाचा हळुवार मायेचा दुवा होते. तो भावनिक ऋणानुबंध आठवला की स्व.आईच्या सहवासातील , गतकाळाच्या प्रवासातील प्रेमळ आठवणी जाग्या होतात. आमच्या बालपणी पुढील प्रवासाला दळणवळणाच्या दृष्टीने परसोडा येथील रेल्वे स्टेशन अत्यंत मोलाची भूमिका निभावत होते. माझ्या स्व.आईला जेव्हा कधी धुळ्याला तिच्या माहेराला जायचे अथवा माहेराहून घरी पालखेड येथे परत यायचे असेल तर हेच परसोडा रेल्वे स्टेशन अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असायचे.पालखेड येथून कधी पायी तर कधी बैलगाडीने याच परसोडा रेल्वे स्टेशन वर आम्ही येत असायचो. तत्कालीन काळात मनमाड –छत्रपती संभाजीनगर ( तत्कालीन औरंगाबाद) लोहमार्गावर फारश्या रेल्वे धावत नसत. रेल्वेच्या नियोजित वेळापत्रकाच्या काही तास अगोदरच आम्ही याच परसोडा रेल्वे स्टेशनवर येऊन थांबत असायचो.बऱ्याचदा याच परसोडा रेल्वे स्टेशनवर मुक्काम करण्याची वेळ यायची. सुरक्षितता अन् आपलेपणाची भावना याच परसोडा रेल्वे स्टेशनने आम्हा तत्कालीन पंचक्रोशीतील नागरिकांच्या आयुष्यात जपल्या होत्या.
पालखेड येथील आम्हा बालमित्रांच्या अनेकानेक आठवणी या परसोडा रेल्वे स्टेशनशी जुळलेल्या आहेत.आम्ही पालखेड येथे माध्यमिक शिक्षण घेत होतो.आम्ही बालमित्र त्यात प्रामुख्याने मी स्वतः , डॉ.गणेश वाणी, डॉ. संजय राऊत आण्णासाहेब म्हस्के, बाळू माळी, स्व.शाम शेळके इत्यादींनी महाशिवरात्रीसाठी वेरूळ येथे जाण्याचे नियोजन केले होते.पिशव्या भरल्या अन् पहाटे पालखेडहून पायी चालत येऊन सकाळी सकाळीच परसोडा रेल्वे गाठले.परसोडा येथून सकाळच्या पॅसेंजरने निघून दौलताबाद रेल्वे स्टेशन वर उतरून तिथून पुढे जसे जमेल तसे वेरूळ मुक्कामी जाण्याचे नियोजन केले होते.रेल्वे प्रवासाची उत्कंठा वाढली होती.तिच्या नियोजित वेळापत्रकानुसार मनमाडहून रेल्वे परसोडा रेल्वे स्टेशनवर आली होती.पूर्वीही अन् आताही परसोडा रेल्वे स्टेशनवर, रेल्वेच्या दरवाज्याला समांतर असलेला प्लॅटफॉर्म नव्हता अन् नाही. जमिनीवरून उंच रेल्वेच्या डब्यात शिरताना रेल्वे डब्याच्या दरवाजाच्या पायऱ्या चढताना उतरताना दमछाक व्हायची. रेल्वे आल्या आल्या त्यावेळी आम्ही पटपट पिशवीसह डब्ब्यात चढलो होतो.आमचा जिवलग बालमित्र डॉ.गणेश वाणी याने त्याची पिशवी रेल्वेच्या डब्याच्या दारात आत फेकून दिली अन् तो डब्ब्यात उंच पायरी चढून शिरणार इतक्यात रेल्वे निघाली.पिशवी आत अन् गणेश रेल्वेच्या समांतर पळू लागला होता. कितीही प्रयत्न केला असता तरी गणेशकडून डब्ब्यात चढणे अशक्यच होते.आमचा जिवलग बालमित्र स्व.शाम शेळके सर्वात अगोदर रेल्वे डब्यात चढला होता.शामने हात देऊन गणेश वाणीला आतमध्ये घेण्याचा यशस्वी न होणारा प्रयत्न केला, मात्र गणेश रेल्वे डब्याला समांतर फक्त पळतच राहिला अन् अखेर त्याची गाडी हुकली..!आम्ही दौलताबाद येथे उतरलो. गणेशची पिशवी दोन दिवस वेरूळ येथे सांभाळून पुन्हा घरी पालखेड येथे आल्यावर त्याची त्याला प्रसादासह परत केली होती.आजही जेंव्हा कधी परसोडा रेल्वे स्टेशनवर जाणे येणे होते तेंव्हा तिथला जसा आहे तसाच प्लॅटफॉर्म बघून आमच्या बालमित्राने रेल्वेच्या सोबत लावलेल्या शर्यतीची आठवण येते.मी परसोडा रेल्वे स्टेशन वरील जीर्ण झालेल्या फलकाकडे बघून गतकाळातील आठवणीत रमून स्वतःला तिथं शोधत होतो.
इतक्यात परसोडा रेल्वे स्टेशन वरून एक वयोवृद्ध जेष्ठ व्यक्तिमत्व माझ्याजवळून त्यांच्या मार्गाने पायी जात होते. ते जेष्ठ काका पुढे गेले अन् पुन्हा मागे वळून माझ्याकडे आले.एकदम माझा हात हातात घेऊन मला अत्यंत मायेने म्हणाले..
" तुम्हाला कुठं तरी पाहिल्यासारखे वाटते राव..! ( काही क्षण विचार करून) तुम्ही पालखेडचे ना..? तुमचे चुलते नेहमी आमच्या घरी छानलाल शेत वस्तीवर पंचांग घेऊन यायचे. त्यांना येणे झाले नाही तर आम्ही आणायला जायचो.तिथी, सणवार,जन्मकुंडल्या सांगायचे..!"
मी एकदम आश्चर्यचकित झालो होतो.त्या तीर्थस्वरूप काकांना मी या अगोदर कधीच भेटलेलो नव्हतो, मात्र आपल्या पूर्वजांच्या देहयष्टी अन् देहबोलीवरून त्यांनी माझ्या ओळखीचा अचूक अंदाज लावला होता.मी त्या आदरणीय काकांना विनम्रपणे प्रणाम केला.बराचवेळ तीर्थस्वरूप छानलाल काकांसोबत अनौपचारिक गप्पा झाल्या. त्या गप्पात माझे चुलते स्व. भाऊसाहेब काका जाधव यांच्या विद्वत्तेविषयी छानवाल काका भरभरून बोलले.अखेर अत्यंत आत्मियतेने छानवाल काकांनी घरी येण्याचे निमंत्रण देऊन निरोप घेतला. मी विचार करू लागलो होतो.आपल्या पूर्वजांच्या आठवणींनी मनात गहिवर झाला होता.जुनी जाणती पिढी फक्त बघून आत्मीयतेने ओळख देणारी..! आपुलकीने अन् आत्मियतेने स्वतःहून हक्काने बोलणारी तीर्थस्वरूप छानलाल राजपूत काकांसारखी बहुदा ही शेवटची पिढी असावी.काही माणसं काही क्षण जरी भेटली तरी एक अख्खा कालखंड भेटल्याची अनुभूती देऊन जातात. याची अनुभूती मला तीर्थस्वरूप छानवाल काकांना भेटल्यावर आली होती.
इतक्यात रेल्वेची उद्घोषणा (अनाउन्समेंट) झाली अन् माझे विचारचक्र थांबले.रेल्वे आली अन् मी रेल्वेच्या डब्यात उंच चढून जाणाऱ्या पायऱ्या चढून रेल्वेच्या डब्यात प्रवेश केला. माझ्या पिढीचे बालपण ते आजची माझ्या पिढीची प्रौढावस्था या दरम्यान परसोडा रेल्वे स्टेशनवर काहीच बदल झाला नव्हता.उलट परसोडा रेल्वे स्टेशन आपल्या अंतिम घटका मोजत आहे की काय यांचं दुःख मनात घेऊन माझा पुढील प्रवास सुरु झाला होता.रेल्वेच्या डब्यात बसल्यावर खिडकीतून बाहेर बघितल्यावर पुन्हा तो जीर्ण अवस्थेत असलेला " परसोडा " नावाचा फलक दिसला. अत्यंत दुःखी जाणवला. तो जीर्ण झालेला मात्र कोणे एकेकाळी कित्येकांच्या नजरा त्यावर खिळलेला फलक देखील रुदन करू लागला होता.कित्येक वर्षांनी परसोडा रेल्वे स्टेशन वरील त्या जीर्ण झालेल्या फलकाला कुणीतरी आपुलकीने भेटल्याने त्या फलकाचा गहिवर मला जाणवला होता.तो जीर्ण झालेला परसोडा रेल्वे स्टेशन वरील फलक माझा कुणीतरी कधीतरी जिर्णोद्धार करील अन् विश्वगुरु व्हायला निघालेल्या भारताच्या प्रवासात कृतज्ञतेने मलाही सामील करुन घेईल असा भाव तो परसोडा फलक व्यक्त करू लागला होता याची मला मनोमन जाणीव झाली होती.
वंदे मातरम्
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक : १९/०२/२०२६, गुरुवार
शिव जयंती
सोमवार, १९ जानेवारी, २०२६
गर्दीतला एकांत...!
#चिंतन ©️
गर्दीतला एकांत...!
===================
समाजात राहूनही एकांतात राहण्याची कला ओशोंनी सांगीतली आहे.ही जीवन कला खूप संयमित आहे.खूप माणसांच्या गर्दीत माणूस स्वत:चे अस्तित्वच विसरून जातो.अनायासे त्याचा दूष्परिणाम स्वत:च्या शारिरीक,मानसिक,भावनिकतेवर कमालिचा होतो.
आणि हो....समाज म्हणजे गर्दी नव्हे...! तर समाज हा एकमेकांच्या परस्परपूरक विचारांनी वेढलेला असला तरच मानवास वरील मूल्यांचा परमानंद घेता येतो.उगीचच गर्दीत राहून सामाजिक एकांतवासाला मानवाने मूकू नये.फक्त गर्दी आणि समाज यांचे नीट सूक्ष्म आकलन व्हावे तरच ओशोंच्या वरील विचारधनाचा नीट अर्थ समजणे सोपे होईल.
मी या अशा गर्दीतील एकांताचा खूप खूप आनंद घेत असतो, स्वतः ला त्यात शोधण्यासाठी...आणि त्याद्वारे काहीतरी शिकण्यासाठी..! जी माणसं गर्दीत खूप खूप उथळ असतात..वास्तविक तीच माणसं आतून खूप एकटी असतात. याचा अर्थ असा नव्हे की, गर्दीत अजिबात राहूच नये किंवा आपले विचार व्यक्त करू नये. उलट आहे त्या गर्दीचा स्वतः मधील एकांत शोधण्यासाठी उपयोग करून घ्यायला हवा. मी माझ्या दैनिक प्रवासात,समाजात,विविध ठिकाणाच्या गर्दीत याचा पुरेपूर उपयोग करून घेत असतो...गर्दीतील एकांताचा आनंद घेण्यासाठी.
वास्तवातील एकांत हा शोधावा लागतो.तो स्वतः हून कधीच प्राप्त होत नाही.एकांत आपल्याला आत्मिक शोध अन् त्यातून स्वतःचे वैगुण्य अन् वैराग्य दाखवत असतो. एकांतात बसणं अन् एकांत अनुभवणे ह्या दोन्ही मानसिक बाबी / अवस्था पूर्णतः भिन्न भिन्न आहेत.एकांतात आपण शारीरिकदृष्ट्या बसू शकतो, मात्र त्या बसण्यात मग ते एकट्यात असो अथवा अनेकात, त्यात स्वतःला शोधता आले पाहिजे.
एकांतात बसलेली व्यक्ती बऱ्याचदा काहींना एकलकोंडी किंवा मनोरुग्ण वाटू शकते. हे देखील अर्धसत्य आहे,कारण काही माणसं एकांतात जातात, त्याला कारण त्यांचा भुतकाळ कुणाच्यातरी त्रासाने , दुःखाने त्रासलेला असतो.कुणाच्यातरी त्रासाने विरक्त आयुष्य जगणं अन् स्वतः हून, स्वतःच्या मनाला निवांत करण्यासाठी, आत्मिक शोध घेण्यासाठी एकांत शोधणे ह्या दोन्ही बाबी भिन्न भिन्न असतात
तसेच काहीजण एकांत पसंद करतात, त्याचे कारण त्यांचा भुतकाळ कुणाच्यातरी त्रासाने , दुःखाने त्रासलेला नसतो.तर अशांना एकांत हवा असतो तो स्वतःच्या मनाला निवांत करण्यासाठी..!स्वतःचा शोध घेण्यासाठी..! मग हा एकांत एकट्यात असू शकतो किंवा गर्दीत देखील एकांत असू शकतो..! कुणी एकांतात बसलेला आहे म्हणजे तो अथवा ती एकलकोंडी किंवा मनोरुग्ण आहे असा अंतिम निष्कर्ष काढून समाज आपापल्या व्याख्या त्या संबंधित व्यक्ती विषयी तयार करत असतो. हे योग्य नसते.
थोडक्यात एकांत ही अनेकांत राहून जीवन जगण्याची मानवाची सामाजिक कला आहे..!
असो, काल दिनांक १९/१/२०१७ रोजी आचार्य रजनीश उपाख्य ओशो यांचा स्मृतिदिन होता.
(मृत्यू दिनांक - १९.१.१९९०)
त्यानिमित्त या महान तत्त्ववेत्त्यास विनम्र अभिवादन..! 🙏🏻
वंदे मातरम्...!
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव. ©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक: २० जानेवारी २०१७





























