शनिवार, २८ मार्च, २०२०

नियतीचा फटका..!




चिंतन

नियतीचा फटका..!
===================================

दिवसभर असे काम करा की,रात्री पटकन झोप येईल किंवा त्या चांगल्या  कामाच्या आठवणींनी उशिरा झोप येईल..!
आणि..
आयुष्यात असे कार्य करा की, मृत्यूच्या वेळी समाधानाने प्राण त्यागावे वाटेल..किंवा..जरी जर्जर व्याधींनी अंथरुणावर पडून राहिलात तरी...आयुष्यातील त्या चांगल्या कार्याला आठवत...आठवत वेदनाही गुदगुल्या करून त्याच जर्जर व्याधींना हसवतील..!

आज जरी गैरमार्गाने अनेक काहीही मिळवून सफेद पोष म्हणून आपण समाजात वावरत असू,तरी...नियती सगळं काही गुपचूप बघत असते.ती नियती अशा वेळी घाला घालते की,ज्याची कल्पनाही कुणी करू शकत नाही..! माणूस त्याच्या तब्येतीच्या अन् नाहक पोकळ सौंदर्याच्या अहंकारात वावरत असतो आणि.....
" माझ्या गैरकृत्याला कुणीच पाहत नाही..!"
याच एकांगी भूमिकेत त्याचे ऐन तारुण्यातील पात्र वठवत असतो.मात्र याच पात्राची भैरवी त्या वेळी गायन करते ,ज्यावेळी  माणसं आयुष्याच्या शेवटच्या अंकात प्रवेशित होतात..! एकतर अशी माणसं मूर्ख असतात किंवा नियतीला माहीत करून घेण्याची अशांची लायकी नसते...!

तेंव्हा  आपल्या सोबत राहतो तो फक्त भग्नावशेष झालेला आपल्या देहाचा जिवंत पिंजरा अन् त्यातील कुढत...कुढत जगत असलेला प्राण..! माझ्या बालपणापासून ते आजतागायत असे कित्येक जण मी पाहिले आहेत ,पाहत आहे की,ज्यांच्या काळात सर्वदूर आमचेच होते किंवा आहे..! पण ज्यावेळी नियतीने फटके द्यायला सुरुवात केली त्यावेळी असे अनेकजण फक्त शून्यात नजर लावून बघत राहिले..त्याच गतकाळातील गैरकृत्यांकडे....!

नियतीला फसवून गुपचूप दूध पिणाऱ्या  मांजरी सारखी अवस्था काहींची असते..! मात्र ही मांजर किंवा असे बोके हे विसरून जातात की,आज जरी अशा मांजरी किंवा बोके मी माझ्या गैरकृत्याचे परिमार्जन अमके.. अमके खूप चांगले कार्य करून प्रायश्चित्त घेईल..! तर अशा  मांजरी किंवा बोके स्वतः ला फसवत असतात..! अशांचे मन सदैव...त्याच गतकाळातील गैरकृत्य असणाऱ्या आठवणीत पिंगा घालत असते..!

नियती एवढी दूधखुळी नसती रे माझ्या माणसा..! ती असे याचे प्रायश्चित्त तिथं करून कुणालाही सुखी करत नसते..! सगळं काही..जिथल्या तिथेच असते..!

आजही मी ज्यावेळी कुणाला एखाद्या दिवशी किंवा अनेक दिवशी त्या नियतीला फसवून,स्वतः च्या तुंबड्या भरून जगताना पाहतो,त्यावेळी हे तेच माणसं असतात,जे भविष्यात अशा नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या माणसांची प्रतिनिधित्व करणारी असतात..!

असे ज्यांच्या आयुष्यात होणार नाही...त्यांनी..... आज ,आत्ताच ,ताबडतोब.....
" अरे, एक चक्कर स्मशानभूमीत सहज मारून या रे..!"

ता.क.- सदरील छायाचित्र ठिकाण गोलवाडी फाटा, वाळूज,अहमदनगर रोड, सैनिकी क्षेत्र औरंगाबाद.येथे आम्ही जन सहयोग सामाजिक संस्था औरंगाबाद अंतर्गत जवळजवळ सात हजार देशी झाडे लावली आहेत.

लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:२८ मार्च २०१९,गुरुवार

" लक्ष असू द्या..! "



चिंतन

" लक्ष असू द्या..! "
====================================
                                                         

भारतीय समाजकारणात जर विशिष्ट मानवी घटकांची        " तात्पुरती अती नम्रता " दिसण्याचा ऋतु  जर कोणता असेल तर  तो ऋतु म्हणजे...लोकशाहीचा सण होय..! हे सण गल्ली ते दिल्ली पर्यंत मोठ्ठ्या कौतुकाने अन् कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह साजरे होतात..!  या सणांच्या काळात तात्पुरती अती नम्रता असलेल्या माणसांच्या मुखी एकच सर्व मान्य वाक्य असते अन् ते म्हणजे...
" लक्ष असू द्या..!"

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर असे अनेक ऋतु आले अन् गेले..! पण प्रत्येक ऋतुमधील " तात्पुरती अती नम्रता "  हे मूल्य रूपी झाड आजही आपले सर्वोच्च स्थान टवटवीतपणे राखून आहे..!😊  बरं, या ऋतुंच्या काळात, या लोकशाहीच्या सणांच्या काळात  "तात्पुरती अती नम्रता" या पिकाची जोमाने वाढ होते...! अगदी ज्या झाडांच्या ओंब्या कधीच जमिनीला स्पर्श करूच शकत नाहीत, त्यासुद्घा धरती मातेचे,पुत्रांचे ,दीन दुबळ्यांचे  दर्शन घेण्यासाठी आपल्या उंचीचा अहंकार "तातुरता" बाजूला सारून " तात्पुरती अती नम्रता " दाखवून .. त्यांचे दर्शन घेतांना आपल्याला दिसतात..! 😊 एकदा का लोकशाहीतील सणांचा हा मौसम संपला की, नंतर तेच झाड दिसतं पण भारी..भारी हरितपट्ट्यात..! जिथं सर्वसामान्य वाटसरू जाऊ शकत नाही..! किंवा जरी सर्व सामान्य माणूस किंवा कार्यकर्ता गेलाच तरी त्याला तिथं काम मिळतं चटया अंथरण्याचे व त्यावर हुरडा मळून किंवा खळं करून  देण्याचे ..!😊

 खरिप,रब्बी पिके जशी त्या..त्या हंगामात बहरून नंतर वाळून जातात आणि पुन्हा तीच पिके बहरण्यासाठी वाट पाहावी लागते..पुढच्या मौसमाची..! असच काहीसं होतं..!                                                                                              अर्थात काही पिके बारमाही,बहुवार्षिक असतात  जे की ,सदैव अंतकरणातून नम्र असतात तो भाग वेगळा..! ही तीच बारमाही,बहुवार्षिक पिके असतात जी "अती नम्रता " हे मूल्य  नेहमी ताजेतवाने ठेवतात..! अन् अशा पिकांना बाजारभाव देखील उत्तम मिळतो बरं का..! कारण ती विशिष्ट हंगामापुरती बहरत नाही..! तर ती असतात नेहमी टवटवीत..! अगदी ऊसासारखी गोड..गोड..!हल्ली लोकशाहीच्या सणांमध्ये अशी पिके कमी प्रमाणात वाढतात..! 

काही पिके तर आंब्यासारखी वर्षातून एकदाच येतात पण आपल्या अवीट गोडीची गोडी सोडून जातात..! आणि हो काही पिकांचे वाण असे असतात की,त्यांची स्वतः ची अजिबात काहीही ओळख ना पाळख ,ना स्वतः चा काही ब्रँड तरीही ते वाण फक्त अमक्या अमक्या बियाणांच्या पोटी विकसित झाल्यामुळे, अमक्या अमक्या जातीचे वाण असल्याने त्या वाणाला लई मोठ्ठा भाव मिळतो बाजारात..! आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अमक्या अमक्या बियाणांच्या पोटी विकसित झालेल्या वाणांना लई जोरदार मागणी होती..आणि आजही आहे हे विशेष..! दिवसेंदिवस अशा वाणांना बाजारभाव कमी भेटू राहिला आहे. हे नवीन बाजारपेठेतील नव्या गिऱ्हाईकांच्या फक्त वाण गुणवान पाहिजे या निकषामुळे साध्य होऊ राहिले आहे..! या अशा वाणांना ,कसेही करून बाजारात विकण्याचे मनसुबे यांचे हक्काचे गिऱ्हाईक मोठ्या अभिमानाने करत असतात..!

माझे वडील तीर्थरूप विष्णुपंत चंपतराव जाधव ( वय वर्ष ८२),हे मला एकदाच म्हणाले होते की,
" आयुष्यात कधीही कुणाचेही हक्काचे गिऱ्हाईक होऊ नको..!"  मला माझ्या वडिलांचे हे बौध्दीक संस्कार ,असे फक्त दुसऱ्याच्या नावावर मार्केट मध्ये विकायला आलेले वाण , किंवा फक्त अमक्या अमक्या बियाणांच्या पोटी विकसित झालेल्या वाणांना पाहिले की पटकन आठवते ... !
  .                                                                                                      असो,आज आमच्या घरातील उमेदवार चिरंजीव नयन शारदा नंदन जाधव यांचा जन्मदिन आहे..! ते अती नम्र होऊन तुम्हाला नमस्कार करत आहेत.. त्यांचा  काहीतरी स्वार्थ  साध्य होई पर्यंत तरी...!
एकदा का त्यांचा स्वार्थ साध्य झाला की, मग..पुन्हा भेट होईल.... कधी होईल..हे सर्व कार्यकर्त्यांना चांगले माहित आहे..!😊

ता.क.: आणि हो...आमचा हा उमेदवार फक्त माझा मुलगा आहे म्हणून त्याच्यावर प्रेम करू नका किंवा त्याचे कौतुकही करू नका..! त्याचे स्वतः चे काही कर्तृत्व जर त्याने भविष्यात समाजात निर्माण केले तरच त्याला नमस्कार करा..!🙏 त्याचे कौतुक करा किंवा त्याच्यावर प्रेम करा..! उगीचच माझ्या नावावर याचे उसने कौतुक करू नये..लोकशाही मधील सणांमधील काही  तात्पुरत्या अती नम्र उमेदवारासारखे..!

लक्ष असू द्या..!🙏🤗

वंदे मातरम्..!

लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:२८ मार्च २०१८

बुधवार, २५ मार्च, २०२०

अनुकरणीय शिवचरित्र..!



चिंतन

अनुकरणीय   शिवचरित्र..!
==================================

सध्या कोरोना आजारामूळे घराच्या बाहेर पडायचे नाही असे शासनाकडून आदेशित आहे.माझा धाकटा मुलगा चिरंजीव नयन सारखं मला म्हणत होता..
" दादा, मला बाहेर  खेळायला जायचं..! मला बाहेर खेळायला जायचं...!"
मी त्याला म्हणालो- " अरे , आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपापल्या २१दिवस घरात थांबायला सांगितले आहे..! तेही आपल्याच फायद्यासाठी..!"
पण नयन काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.

अखेर मी नयन ला जवळ घेतलं अन् आपल्या मायबापाची म्हणजेच सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सत्य घडलेली गोष्ट सांगितली..!

छत्रपती शिवराय आणि  अफजलखान यांच्या प्रतापगड भेटीची  पार्श्वभूमी, क्रूर अफजलखानाचा वध करण्यासाठी थोरल्या महाराजांनी कित्येक महिने प्रतापगडावर थांबून राखलेला अती संयम अन् मग सगळं आपल्या नियोजनानुसार झाल्यावर शत्रूवर केलेला हल्ला इत्यादी अनेक विषयांना स्पर्श करून गोष्ट सांगितली..!

आणि शेवटी नयन ला विचारले....
" सांग बरं,छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील या प्रसंगावरून काय शिकशील..?"
नयन पटकन म्हणाला -  " शिवाजी महाराज, शत्रूला मारण्यासाठी इतक्या दिवस प्रतापगडावर थांबले..! मी ही काही दिवस कोरोनाला मारण्यासाठी घरातच थांबेल..!"

आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नांचे,अगदी प्रत्येक प्रश्नांचे उत्तर सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगात सहज सापडते..! फक्त लढाया हेच थोरल्या महाराजांचे आयुष्य अजिबात नव्हते; तर अनेक सद्गुणांचा ठेवा हेच थोरल्या महाराजांचे आयुष्य होते हे त्रिकालाबाधित सत्य आहे..! मी माझ्या सध्याच्या अंधारी प्रशालेतील माझ्या लहान मोठ्या मुलामुलींना देखील हेच सांगितलेले आहे की,
 "आयुष्यातील कोणत्याही कठीण परिस्थितीती, समाजात कसं वागावं याचं  उत्तर  पाहिजे असेल..तर ते सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांतून आपल्याला सहजपणे सापडते...! आपले थोरले महाराज आपल्या दैनंदिन जीवनासाठी अनुकरणीय  सुंदर परिपाठ आहे..!"

ता.क.-वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुवावे..!

वंदे मातरम्..!

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: २५/३/२०२०, बुधवार

मंगळवार, २४ मार्च, २०२०

" कर्मयोगी तरुण...प्रिय प्रशांत भाऊ गिरे..! "






मला प्रवासात भेटलेली माणसं

" कर्मयोगी तरुण...प्रिय प्रशांत भाऊ गिरे..! "
===================================

मी जेंव्हा पासून जनसहयोग सामाजिक संस्था औरंगाबाद येथे कृतीयुक्त जोडल्या गेलो..तेंव्हा पासून पाहतोय की, या सामाजिक संस्थेचे प्रमुख व आमचे प्रेरणास्थान प्रिय मित्र प्रशांत भाऊ गिरे हे सतत काहीना काही कामात मग्न असतात.
" आधी केले मग सांगितले " या उक्ती प्रमाणे यांचे आचरण मला खूप प्रभावित करून गेले..!

मी औरंगाबाद येथे स्थायिक होण्यापूर्वी लासूर स्टेशन येथे राहत होतो.तेथेही आम्ही हरित क्रांती प्रतिष्ठान लासूर स्टेशन अंतर्गत लासूरगाव रोडलगत विविध वृक्षारोपण व संवर्धन केले आहे.त्या कार्याला आम्हाला वंदनीय व्यक्तिमत्त्व आदरणीय कमलाकर क्षीरसागर काका ( माजी अधिकारी,मुंबई महानगर पालिका) यांचे खूपच प्रेरणादायक मार्गदर्शन लाभले अन् आम्ही कार्य करत गेलो..! आपल्या समोर एखादे प्रेरक शक्ती असली की,आपले कार्य सहज होत जाते. त्याचे आदरणीय कमलाकर क्षीरसागर काका हे मूर्तिमंत उदाहरण आहे..! त्यांचेच दुसरे रूप मला औरंगाबाद येथे स्थायिक झाल्यावर प्रिय मित्र प्रशांत भाऊ यांच्या रूपाने पुन्हा पाहायला मिळाले..! या बाबतीत मी आदरणीय कमलाकर क्षीरसागर काका यांच्याशी बोललो पण आहे..! त्यांनाही खूप अत्यानंद झाला..!

जेंव्हा वृक्षारोपण अथवा वृक्षसंवर्धन बाबतीत काहीही काम असो,पहिल्यांदा प्रशांत भाऊ पुढे नक्कीच असतात..आणि हीच कृती त्यांना खूप वेगळे ठरवते..! कुठलाही गर्व नाही की बडेजाव नाही ..! मला काहीतरी समाजासाठी करायचे आहे..या ध्येयाने झपाटलेल्या माणसाचे पूर्ण वर्तन प्रशांत भाऊ यांच्या सर्वांगात अगदी ठासून भरलेले आहे..! मला अशी माणसं खूप भावतात अन् आवडतात..! मग त्यांचा वयोगट कोणताही असो..!

ज्यांना इतिहास निर्माण करायचा असतो,त्यांना वेडं व्हावं लागतं..! जगाच्या दृष्टीने अशी माणसं वेगळी वाटत असतील...पण ही तीच माणसं असतात ,ज्यांच्या याच वेडेपणाला , जग भविष्यात वंदन करते..! जगात झपाटलेल्या माणसांनीच काहीतरी करून दाखवले आहे.त्यात प्रशांत भाऊ नक्कीच अग्रेसर आहेत याचा आम्हा सर्व जनसहयोग सामाजिक संस्था औरंगाबाद अंतर्गत सर्व सदस्यांना अभिमान वाटतो..! त्याचे कारण प्रशांत भाऊ यांचे वृक्षाबाबतीत झपाटलेले वर्तन पाहून आम्हाला अजून झपाटून काम करण्यासाठी प्रेरणा मिळत असते..!
आजकाल प्रशांत भाऊ गिरे  यांच्या सारखी कर्मयोगी तरुण माणसं खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात..! मला  अन् आम्हा सर्वांना त्यांचा सहवास लाभतोय  हे आमच्या सर्व सदस्यांचे व आम्ही लावलेल्या सर्व झाडांचे नशीब...!

प्रशांत गिरे या मित्रा बरोबर " सगळ्याच विषयांवर " थोडक्यात,राजकीय,सामाजिक, गोड शृंगारिक , चित्रपट इत्यादी विषयांवर गप्पा मारायला एक वेगळीच मज्जा येते..! नव्हे नव्हे आमच्या सर्वांच्या मैत्रीची ती एक नशाच आहे..!आमच्या या मैत्रीच्या नात्यात सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा गुण कोणता असेल तर तो म्हणजे आमच्यात असलेली प्रगल्भता..! खरी मैत्री तेंव्हा चिरंजीव असू शकते जेंव्हा त्या मैत्रीच्या नात्यात प्रगल्भता निर्माण झालेली असते..!जर मैत्रीच्या नात्यात प्रगल्भता नसेल तर अशी मैत्री केवळ औपचारिकता म्हणून आपल्या आयुष्यात राहते..! जन सहयोग परिवार औरंगाबाद मधील सर्व मित्रांच्या मैत्रीचे चिरंजीव असण्याचे हेच एकमेव कारण आहे हे मी खात्रीने सांगू शकतो..!आम्ही कोणत्याही विषयांवर  जेंव्हा आमची मत व्यक्त करतो तेंव्हा तिथं फक्त आणि फक्त प्रगल्भ मैत्रीच असते,बाकी कोणत्याही प्रकारचा अहंगंड की न्यूनगंड नसतो..!

आज दिनांक  २५ मार्च २०१९ रोजी  याच अतिशय प्रेरणादायक व्यक्तिमत्त्वाचा जन्मदिन आहे..! त्यानिमित्त सर्व वृक्ष प्रेमी मित्रांकडून व वृक्षांकडून प्रिय प्रशांत भाऊ यांना हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या शुभेच्छा..!
असेच प्रेम असू द्या..!

वंदे मातरम्..!

शूभेच्छूक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:२५ मार्च २०१९, सोमवार.

" जिहाले मस्की मुकंब रंजीश , बहाले हिजरा बेचारा दिल हैं..!"



चिंतन

" जिहाले मस्की मुकंब रंजीश ,
 बहाले हिजरा  बेचारा दिल हैं..!"
====================================

माझा सर्वात आवडता हिंदी चित्रपट जे.पी.दत्ता दिग्दर्शित --            " गुलामी "..!

यात जे.पी दत्ता साहेब यांनी पूर्वीचे सामाजिक वास्तव खूप छान प्रकारे चित्रित केलेले आहे. तत्कालीन सरंजामशाहीवर  यात अतिशय प्रखरपणे चित्रण केलेले आहे. माझ्यामते महान हिंदी चित्रपट अभिनेते धर्मेंद्र  यांनी त्यांच्या कारकिर्दीतील  उत्कृष्ट  अभिनय यात केलेला आहे.

 जे.पी.दत्ता साहेब यांच्या बहुतांशी चित्रपटांचे वैशिष्ट्ये म्हणजे..राजस्थानच्या पवित्र भूमीचे यथार्थ दर्शन होय..! यांच्या बहुतेक चित्रपटात राजस्थानचे वाळवंट,तेथील संस्कृती,तेथील चालीरिती इ.अनेक बाबींचे अतिशय सुंदर व नेत्रदीपक चित्रण यांच्या चित्रपटात असायचे..! दत्ता साहेब यांनी चित्रपट दिग्दर्शन करणे बंद केले अन् राजस्थानचे अतिशय सुंदर दर्शन चित्रपटात दिसणे दुरापास्त झाले..!

 हिरव्या वनराईने नटलेल्या भूमीत चित्रीकरण करून वाहवा मिळविणारे अनेक जण आपल्या चित्रपट सृष्टीला लाभले..पण ज्या भूमीत असले काहीही नव्हते,अशा ठिकाणी अतिशय नेत्रदीपक चित्रीकरण करून, राजस्थानच्या वाळवंटाच्या प्रेमात पडायला भाग पाडले ते जे.पी.दत्ता साहेब यांनीच..!

हिंदी चित्रपटातील  माझे सर्वात आवडते हिंदी चित्रपट गीत हेच....!अप्रतिम,कर्णमधूर व अर्थपूर्ण गीत.....! गीतकार गूलजार साहेब....! वास्तविक या गीतातील पाहिले कडवे अरबी भाषेतील आहेत..! पण ते सादर करण्याची नजाकत फक्त आणि फक्त गुलजार साहेब हेच करू शकतात..!

माझ्या सकट बऱ्याच दर्दी रसिकांना या खूप श्रवणीय गीतातील

" जिहाले मस्की मुकंब रंजीश ,
 बहाले हिजरा  बेचारा दिल हैं..!"

 या ओळींचा अर्थही माहीत नाही,पण वंदनीय गुलजार साहेब यांच्या लेखन कौशल्याची अन् महान संगीतकार लक्ष्मीकांत ,प्यारेलाल यांच्या संगीताची कमाल,की हे गीत सर्व भारतीयांच्या ओठांना  गुणगुणायला भाग पाडते..!

मी ज्यावेळी पालखेड येथे राहत होतो त्यावेळी माझा प्रिय बालमित्र नितीन जैन याच्या टेलर कामाच्या दुकानात दररोज शाळेतून आल्यावर या गीताचा आवर्जून श्रवणीय आस्वाद  नक्कीच घ्यायचो..! बऱ्याच प्रकारचा थकवा निघून जायचा..! माझ्या या बालमित्राला सुध्दा हे गीत खूप खूप आवडायचे..! अर्थात आजही आमचे हे गीत सदा सर्वदा आवडते गीत आहे..!

प्रेमाच्या भाषेतील भाव समजण्यासाठी परिचयाचेच शब्द पाहिजे असं काहीही नाही..! त्यातील भाव,ते कसे आणि कोण सादर करते यावर खूप काही अवलंबून असते..! जसे की या गीतात आहे..!

ता.क.: कोणताही " भाव "  समजायला मुळात " भावना " असावी लागते..!☺

वंदे मातरम्..!

 विनम्र वंदन...जे.पी.दत्ता साहेब व गुलजार साहेब व लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना..!               

वंदन करणारा लेखक : नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव,पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:२५ मार्च २०१७

सोमवार, २३ मार्च, २०२०

" निर्भेळ आनंदाचे रूप गिताराम भाऊ बनसोड "





आमचे गाव आमची माणसं

" निर्भेळ आनंदाचे रूप गिताराम भाऊ बनसोड "

==================================

आपल्या पृथ्वीवर जगाच्या नियंत्याने अनेक प्राणी निर्माण केले. कुणी चतूष्पाद,कूणी अष्टपाद ,कुणी द्विपाद प्राणी इत्यादी. अनेकानेक प्राण्यांची निर्मिती करून  नियतीने पृथ्वीवरील रचनेला सुंदर बनवले..! मात्र या सगळ्या प्राण्यांमध्ये द्विपाद प्राण्यातील माणसाला जरा विशेषच बनवले..! कारण इतर सर्व प्राण्यांमध्ये माणसालाच एकमेव अशी सुंदर गोष्ट त्या नियतीने दिली..! ती एकमेव सुंदर गोष्ट म्हणजे त्याचे हास्य होय..!

आमच्या पालखेड गावात ,निदान आमच्या पिढीत, आमच्या पाहण्यात आलेली त्याच नियतीची दोन सुंदर लेकरं आम्ही याची देही याचि डोळा पहिली अन् कृतार्थ होत गेलो,आयुष्यातील हास्याचा तो निर्भेळ झरा वाहत असताना पाहत..पाहत...! निर्भेळ हास्याचे फवारे उडविणारे दोन ग्रेट  पालखेडकर म्हणजे आदरणीय स्व. शेख सादेक चाचा  बागवान अन् दुसरे हसरे व्यक्तिमत्व म्हणजे प्रिय गिताराम भाऊ रंगनाथ बनसोड..!
( आदरणीय स्वर्गीय शेख सादेक चाचा बागवान यांच्यावर मी ,आमचे गाव आमची माणसं शीर्षकाखाली स्वतंत्र लेख लिहिलेला आहे )

गिताराम भाऊ रंगनाथ बनसोड..!

कमीत कमी गरजा ठेवून आयुष्याचा निर्भेळ आनंद कसा घ्यावा याचे मूर्तिमंत उदाहरणं दोनच..! एक आदरणीय स्व.शेख सादेक चाचा बागवान अन् गिताराम भाऊ रंगनाथ बनसोड..! गिताराम भाऊ म्हणजे फार काही श्रीमंतीत वाढलेला किंवा पूर्वापार श्रीमंतीचा वारसा लाभलेला माणूस अजिबात नाही..! पण भल्या भल्या श्रीमंतांना " जगावं कसं..!" याचा आदर्श परिपाठ प्रस्तुत ठरणारे व्यक्तिमत्व..!

गिताराम भाऊ,माझ्या मोठ्या भाऊच्या ,सुनील भाऊच्या पुढील वर्गातील..! गिताराम भाऊ अन् त्यांचा वयोगट आमच्या सारख्या वयाने लहान असणाऱ्या सोबत कधीच बाधा ठरला नाही..! गिताराम भाऊंच्या वडिलांचे, रंगनाथ काका यांचे आमच्या पालखेड गावात एक छोटेसे सुवर्ण कारागिरीचे दुकान होते..! गिताराम भाऊ ,आमच्या पालखेड गावातील असा दुर्मिळ माणूस ,ज्याचे कधीही कुणाबरोबर ही भांडण झालेच नाही. होणार तरी कसे..? ज्या माणसांकडे निर्भेळ आनंदाचे क्षण अन् निर्भेळ हास्याचे फवारे असतील, अशा माणसा बरोबर जगातील सर्वात क्रूर माणूस देखील भांडण करायच्या अगोदर विचार करील अन् तोच क्रूर माणूस देखील आनंदाच्या हास्याच्या फवाऱ्यांमध्ये स्वतःला भिजवून घेईल..! असा आमचा गिताराम भाऊ..!😊

आपल्या आयुष्याचे  आदर्श आपण पुस्तकात,इतिहासात शोधात असतो. मात्र  मी , बालमित्र आण्णासाहेब म्हस्के व बालमित्र विजय गायकवाड ( ह.मु. वैजापूर ) ने निर्भेळ आनंदाचे क्षण अन् निर्भेळ हास्याचे फवारे  कसे जगावेत याचे बहुमोल मूल्य घेतले ते आमच्याच पालखेड गावातील दोन ग्रेट पालखेडकरांकडून...! आणि ते दोन ग्रेट पालखेडकर म्हणजे आदरणीय स्व.शेख सादेक चाचा व गिताराम भाऊ..!😊 या दोन्ही माणसांनी त्यांच्या वयाला हरवून आनंद घेतला..! ज्या दिवशी आमच्या निर्भेळ आनंदाचे अन्  निर्भेळ हास्याचे एक प्रेरणास्रोत आदरणीय स्व.शेख सादेक चाचा  यांचा मृत्यू झाला तो दिवस आमच्या आयुष्यातील खूप दुःखाचा दिवस होता. कारण आमच्या आयुष्यातील आनंदाचा एक प्रेरणास्रोत कायमचा निघून गेला होता..! आज त्याच दोन ग्रेट पालखेडकरांपैकी  गिताराम भाऊ बनसोड अजूनही आम्हाला निर्भेळ आनंदाच्या हास्याचा जेंव्हा जेंव्हा भेट होईल तेंव्हा तेंव्हा अमृत लाभ देत असतात..!

गिताराम भाऊ,यांच्या बरोबर गप्पा करतांना वयाचे बंधन अजिबात जाणवत नाही.आमच्या गप्पांमध्ये प्रेमाचा धागा हा सुवर्णबिंदू असतो..! ज्या ज्या माणसांच्या नात्यात प्रेमाचा धागा सुवर्णबिंदू असेल त्या नात्यातील गोडवा ईश्वराला देखील प्रिय असतो..! मी गिताराम भाऊंना जेंव्हा कधी भेट होईल तेंव्हा प्रेमाने " बन्सी " असे म्हणतो..! " बन्सी "  हेच  नाव ,आनंदाचा देव भगवान
श्रीकृष्णाचे  देखील आहे ...! गेल्या काही वर्षांपासून प्रिय गिताराम भाऊ बनसोड, आमच्याच वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावात स्थायिक झाले आहेत..!

दरवर्षी जेंव्हा आम्ही आमच्या पालखेड गावातील कार्तिकी यात्रेला जातो,तेंव्हा आम्हाला काही बाबतीत आदर्श असणाऱ्या, काही बाबतीत आवडणाऱ्या आमच्या ग्रेट पालखेडकरा़ना नक्की भेटतोच...! अशा ग्रेट पालखेडकरांच्या   आमच्या तिथून पुढच्या आयुष्याची अनेक मूल्यांची, गुणांची ऊर्जा अशा माणसानं भेटल्यावर आमच्यात साठवल्या जाते..!

वंदे मातरम्..!

लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: २३ मार्च २०२०, सोमवार.

बुधवार, १८ मार्च, २०२०

" अंधारीतील प्रेमळ मराठी भाषा उच्चार .!"




मला प्रवासात भेटलेली माणसं..!

" अंधारीतील प्रेमळ  मराठी भाषा उच्चार .!"
================================

मला वैयक्तीक मराठी भाषा बोलणाऱ्या माझ्या पिढीतील सर्वात आवडते दोनच व्यक्ती खूप खूप आवडतात.अगदी मी जेंव्हा पासून माझ्या मातृभाषेच्या प्रचंड प्रेमात पडलो आहे तेंव्हापासून..!मराठी भाषा आपण जर सहजपणे आणि अगदी साधे सोपे परिचयाचे शब्द जरी बोललो तरी ते आपल्या मनाला खूप आत्मानंद देऊन जातात..इतकं त्यात माधुर्य सामावलेले आहे.

सध्या मी अंधारी येथे एक सर्व सामान्य शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मी ज्यावेळी अंधारी येथे शिक्षक म्हणून उपस्थित झालो,त्यावेळी मला बरेच शब्द अगदी नव्या नवरी सारखे नवीन होते. नवीन नववधू ज्याप्रमाणे आपल्या सासरी पहिल्यांदा जाते,त्यावेळी तिला तेथील सर्व भाषिक आणि इतर अनेक गोष्टी नवीन असतात. ती त्या सर्व गोष्टी मनापासून ,प्रेमाने स्वीकारते,तसचं मी अंधारी येथे आल्यानंतर येथील एक वेगळा मराठी भाषेचा लहेजा असलेला प्रकार माझ्या मनाला खूप प्रसन्नता देऊन गेला..आणि जात आहे.

अंधारी येथील माझ्या ,मुलामुलींना याबाबतीत बऱ्याचदा बोललो सुध्दा आहे. अंधारी आणि परिसरातील   मराठी भाषा मला कुठे आणि कोणत्या आरोह.. अवरोह वर खूप आवडते याबाबतीत मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांशी बऱ्याचदा व्यक्त होत असतो. एक वेगळाच आनंद देऊन जाते..या परिसरातील सर्व माणसांची मराठी भाषा..!

आपण ,इतर ठिकाणी पाहतो आणि ऐकतो की, महिला,मुली ज्या प्रसंगी  " गं " चा उच्चार करतात, त्याच प्रसंगात  अंधारी येथे 
" वं " चा उच्चार केला जातो.
उदाहरणार्थ..
 विद्यार्थिनी बऱ्याचदा बोलतात की, " अभ्यास कर ना वं..!"
हेच वाक्य वैजापूर ,गंगापूर तालुक्यातील माझ्या विद्यार्थिनी बोलताना पुढीलप्रमाणे बोलतील..
" अभ्यास कर ना गं..!"

थोडक्यात मुलींच्या भाषेच्या उच्चारात " गं " ऐवजी " वं "चा उच्चार नक्कीच अंधारी येथे पाहायला मिळतो..! मी सुध्दा कधी कधी  मराठी भाषातील माझी ऐकण्याची रुची,आवड माझ्या या मुलींबरोबर संवाद साधताना म्हणत असतो की,
"अभ्यास कर ना वं..!" आणि होऊन जातो..भाषेतील...अंधारीकर..! माझ्यामते " गं " च्याऐवजी " वं " चा उच्चार करण्याचे कारण सिल्लोड लगत असणारे विदर्भाचे भाषिक नाते..! विदर्भात " गं " ऐवजी " वं " चा उच्चार करतात..! मला माझ्या मुलीचा हा " वं " चा उच्चार खूप भावून,आनंदित करून जातो..!

मी काही दिवसांपासून " वं " च्याऐवजी " गं " चा उच्चार करा असे माझ्या मुलींना समजावून सांगत आहे, कारण प्रमाणित मराठी भाषा उच्चार देखील यायला पाहिजे म्हणून..!

आपली मराठी भाषा इतकी सुंदर आहे की,जिच्या ,कोणत्याही परिसरातील, बोलीभाषेतील तिचे रूप,सौदर्य मराठी भाषेवर माझ्या सारख्या निस्सीम प्रेम करणाऱ्या मराठी माणसाला तिच्या प्रेमात पडायला भाग पाडते. संस्कृत आपल्या भारतील सर्व भाषेची जननी आहे असे कुठेतरी वाचले होते.जर संस्कृत आपल्या भारतातील सर्व भाषांची जननी असेल तर,आपली मराठी भाषा त्याच सर्व भाषांची मावशी नक्कीच आहे असे मला वैयक्तीक वाटते.

अंधारी येथील  बऱ्याच पुरुषांच्या,मुलांच्या  मराठी भाषा बोलताना त्यांच्या वाक्यात कर्ता,कर्म आणि क्रियापद यातील   यांचा क्रम कोणताही असो, मात्र त्यांच्या उच्चारल्या जाणाऱ्या वाक्याच्या शेवटच्या शब्दांचा उच्चार हा उंच स्वरात असतो.  मी सुध्दा तसे बऱ्याचदा माझ्या मुलांबरोबर त्याच लहेजा मध्ये संवाद साधून माझी       " अंधारीकर " होण्याची प्रेमळ हौस भागवून घेत असतो. त्याबाबतही मी माझ्या मुलांना समजावून सांगितले आहे.

मी जो पर्यंत अंधारी येथे शिक्षक म्हणून नोकरी करत असणार आहे,तो पर्यंत इथून खूप काही शिकून , अध्ययन करून इथला अतिशय भावपूर्ण निरोप घेणार आहे. एकंदरीत अंधारी माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा गुरु ठरत आहे,ठरणार आहे.

आता पहिल्या परिच्छेदातील मी उल्लेख केलेल्या मला मराठी भाषा बोलणाऱ्या सर्वात आवडत्या व्यक्तींविषयी बोलतो. ते आहेत ..आदरणीय नाना पाटेकर आणि आदरणीय अमोल पालेकर यांची..! या दोघांची मराठी भाषा खूप खूप सुंदर असते. अगदी समोरच्या व्यक्तीच्या मनाला ठाव घेणारी शक्ती त्यात आहे.नाना पाटेकर यांची मराठी भाषा समोरच्याला खिळवून ठेवते तर अमोल पालेकर यांची मराठी भाषा ,मराठी भाषेतील गहनतला गहन शब्द लीलया उच्चारून समोरच्याला आकर्षित करते. या दोघांच्या मराठी भाषेतील अरोह... अवरोह मध्ये एक प्रकारचा मराठी भाषेतील शृंगार सजलेला जाणवतो. अगदी सहजपणे आणि कमी उंचीचे स्वर त्यात असतात.
ग्रेट... नानाजी पाटेकर व अमोलजी पालेकर..!

वंदे मातरम्..!

ता.क.:  मला औरंगाबाद शहरात हिंडताना, मराठी भाषा बोलणारे खूप खूप कमी लोक सापडतात..! हिंदीचा भडिमार खूप असतो. बहुदा अजुन  " मोगलाईची छाप " गेलेली नाही वाटतं..!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव ©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक: १० फेब्रुवारी २०१९

मंगळवार, १७ मार्च, २०२०

" भाऊ, बसाना..!"




मला प्रवासात भेटलेली माणसं..!

" भाऊ, बसाना..!" 😊
=================================

आज दिनांक १७ मार्च २०२० रोजी आमची शाळा दुपारनंतर सुटल्यानंतर मी बस ने परतीच्या प्रवासात निघालो होतो. आळंद हुन एक तरुण माझ्या शेजारची सीट रिकामी असल्याने माझ्या शेजारी पटकन येऊन बसला. सिल्लोड ते औरंगाबाद रस्त्याचे काम सुरू असल्याने धूळ बसमध्ये आली अन् मला जोराची शिंक आली...!

मी शिंक येतानाच लगेच माझ्या तोंडाला अन् नाकाला रुमाल लावला..!माझ्या बाजूलाच एक तरुण बसलेला होता.त्यानं लगेच माझ्यात अन् त्याच्यात सुरक्षित अंतर सोडले..! मी जरासा जरी खड्याच्या धक्याने त्याच्याकडे सरकलो , की तो तरूण अजून लांब व्हायचा..! रस्त्याच्या कामामुळे पाल फाट्यावर काही ठिकाणी जास्त खड्डे होते.त्या खड्ड्यांमुळे माझा अजून त्या तरुणाला धक्का लागला.आता मात्र त्या तरुणाने माझ्याजवळ बसायचे सोडून चक्क  उभे राहणे पसंत केले..!

मीही त्याला  अधून मधून आग्रह करत होतो अन् म्हणत होतो....
" भाऊ, बसाना..!"
तो तरुण संशयित नजरेने माझ्याकडे पाहून  म्हणत होता....
" नका...नका... बसा तुम्ही..! मला हे इथच उतरायचे आहे..!

असं करता करता हर्सूल टी पॉइंट , औरंगाबाद बस थांबा आला अन् तो तरुण पटकन खाली  उतरला. इतकेच नाही,तर तो तरुण थेट दिसेनासा होईपर्यंत,मी बसलेल्या खिडकीकडे मागे वळून पाहत पाहतच पुढे निघाला होता.
मीही त्या तरुणाला ,तो दिसेनासा होईपर्यंत बसच्या खिडकीतून हाताने बाय... बाय...टाटा...टाटा  करत होतो..!😊👋

वंदे मातरम्...!

ता.क.: सध्या कोरोना व्हायरस आजाराचे थैमान सुरू आहे.शिंक आल्यास स्वतच्या नाकावर व तोंडावर रुमाल लावा..!

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: १७ मार्च २०२०, मंगळवार.

शनिवार, १४ मार्च, २०२०

प्रत्येकात दादा कोंडके लपलेला असतो..!😊



चिंतन

प्रत्येकात दादा कोंडके लपलेला असतो..!😊
===================================

समाजात वावरताना नेहमी आनंदी दिसणाऱ्या माणसाच्या अंतर्मनात एक खूप  खोलवर दुःखाची किनार असते..!कदाचित  यामुळेच अशी माणसं निदान दृश्य स्वरूपात का होईना..आपला आनंद व्यक्त करत असतात..!कारण त्या दुःखाची किंमत यांनाच चांगली माहीत असते..! म्हणून अशी माणसं जगाला हसवत असतात,स्वतचं दुःख लपवून..!

आणि प्रत्येकात एक चावटपणा देखील लपलेला असतो..! फक्त कुणी आपला चावटपणा दृश्य स्वरूपात व्यक्त करत असतो,तर कुणी सभ्यपणाचा आव आणून तो चावटपणा लपवत असतो..! मात्र एक नक्की,प्रत्येकात चावटपणा असतोच..! दादा कोंडके यांनी त्यांच्यातील चावटपणा आपल्या अभिनयाद्वारे,संवादाच्या माध्यमातून नेहमी बिनधास्तपणे व्यक्त केला..! कोणताही आडपडदा ठेवला नाही..!

थोडक्यात वरील दोन्ही परीच्छेदावरून माझ्या मते प्रत्येकात दादा कोंडके लपलेला असतोच..!😊 फक्त कधी त्याला समाजात वावरताना नेहमी आनंदी दिसणाऱ्या माणसाच्या अंतर्मनात एक खूप  खोलवर दुःखाची किनार लाभलेली असते..! तर कधी त्याच्यातील चावटपणा दृश्य स्वरूपात उघडपणे व्यक्त होत असतो..!
मात्र प्रत्येकात दादा कोंडके लपलेला असतोच..!

माझ्या पिढीतील मराठी माणसाने मनापासून दोन मराठी माणसांवर निस्सीम प्रेम केले..! त्यातील एक होते वंदनीय बाळासाहेब ठाकरे अन् दुसरे होते शाहीर दादा कोंडके..! विशेष म्हणजे या दोघांनीही एकमेकांवर सुध्दा निस्सीम प्रेम केलं..!  दादा कोंडके यांच्या मराठी चित्रपटांना बाळासाहेब ठाकरे यांनी राजाश्रय मिळवून दिला..!

साधा सरळ मराठी माणूस हा साध्या साध्या गोष्टींवर प्रेम करतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शाहीर दादा कोंडके..! दादा कोंडके यांनी मराठी माणसाची अचूक नाडी ओळखली अन् मराठी माणसाला तहहयात हसवत राहिले..!दादा कोंडके कोणत्याच अँगलने हिरो दिसत नव्हते..! मात्र सगळ्या अँगलांना दादा कोंडके हिरो दिसत होते हे विशेष..! म्हणून त्यांचे सलगपणे सुपरहिट चित्रपट तयार होऊन जागतिक रेकॉर्ड झाले..! दादा कोंडके म्हणजे द्विअर्थी शब्दांचे चालते फिरते विद्यापीठ होते.त्यांच्या चित्रपटांची नावं,त्यातील संवाद,गाणी सगळं कसं द्विअर्थी असायचे..! त्यामुळं प्रत्येक मराठी माणसात लपलेला दादा कोंडके खदखदून हसायचा..! दादा कोंडके यांचे विनोद म्हणजे वरण भात स्टाईल चे कधीही नव्हते..! त्यांच्या विनोदात नेहमी  गावरान मिरचीचा ठेचा,कांदा,लसूण अन् भाकरीची अस्सल चव असायची..! कदाचित त्यामुळेच महाराष्ट्रातील खेड्यातील सर्व मराठी रसिक माणसांनी दादा कोंडके यांच्यावर भरभरून प्रेम केलं..!

अभिनेत्री उषा चव्हाण, गायक महेंद्रकपुर,  संगीतकार राम लक्ष्मण यांची चवदार भेळ म्हणजे दादा कोंडके यांचे मराठी चित्रपट..! " च्या मायला " या गावरान बोली शब्दाला दादा कोंडके यांनीच आपल्या बोलण्याच्या विशिष्ट लकबितून जनमानसात पोहोचविले..! एवढंच नाही..!लांब लचक नाडीच्या हाफ चड्डीला देखील जनमानसात लोकप्रिय केले तेही दादा कोंडके यांनीच..!

लेखिका अनिता पाध्ये यांनी दादा कोंडके याचं आत्मचरित्र " एकटा जीव " लिहिलं आहे.त्यातील दादा कोंडके यांनी व्यक्त केलेल्या खालील भावना एक भावूक माणूस म्हणून माझ्या सारख्या अनेकांना आत्मचिंतन करायला भाग पाडतात..! दादा कोंडके यांनी व्यक्त केलेल्या भावना खालील प्रमाणे....

" माझं दुःख, एकटेपण मी सहसा कुणाला जाणवू देत नाही. त्यामुळे मी एकटा मजेत जगतो. अशी ब-याच जणांची समजूत आहे. एकटेपणाच्या बदल्यात देवानं मला पैसा, प्रसिध्दी, यश भरपूर दिलं. सर्वांनाच आयुष्यात मनासारख्या गोष्टी मिळत नाहीत अशी मी स्वत:चीच समजूत घालत असतो..!"

वरील ओळी दादा कोंडके यांच्या स्वतच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खूप काही सांगून जातात..!
कधी त्याच खोलवर रुतलेल्या दुःखाला कुठेतरी पाहिलं की, त्याचं दुःखावरची खपली निघते अन्........
अंतर्मन अश्रू ढाळत त्या दुःखाला गोंजारत आपल्या  व्यथा  दिसणाऱ्या आनंदाला ऐकवतं असतं...! 😔

असो,आज दिनांक १४ मार्च २०२० रोजी महान मराठी चित्रपट अभिनेते शाहीर दादा कोंडके यांचा स्मृतिदिन आहे..!( मृत्यू दिनांक - १४/३/१९९८) त्यानिमित्त दादा कोंडके यांना विनम्र अभिवादन..!

ता.क.: जगातील सर्वात दुःखी माणूस, नेहमी दृश्य स्वरूपात हास्य व्यक्त करत असतो..!

वंदे मातरम्..!

लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: १४ मार्च २०२०, शनिवार

शुक्रवार, १३ मार्च, २०२०

" धुळीने माखलेला एक दैनिक प्रवासी..! "





** मला प्रवासात भेटलेली माणसं..! **

" धुळीने माखलेला एक दैनिक  प्रवासी..! "

=================================

सकाळी अंघोळ... पांघोळ झाली की..मोठ्या कौतुकाने आरशात पाहून अजिबात काहीही पुरुषी मेकअप न करता फक्त देवपुजेचा गंद कपाळी लावून मी दररोज शाळेत जाण्यासाठी घराच्या बाहेर पडतो..!लहानपणी आई गालावर काजळाचा ठिपका लावायची..! कुणाची नजर लागू नये म्हणून..! पण आता त्याच काजळाची जागा माझ्या चेहऱ्यावरील काळया-पांढऱ्या दाढीने घेतल्याने कुणा...दृष्टाची...दृष्ट लागण्याची शक्यता नैसर्गिकरित्या समाप्त झाली आहे..!
( " नजर लागणे " या उदाहरणावरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी नाहक माझ्यावर हल्ला चढवू नये..! त्याचे काय आहे..हे अ.नि.स.वाले फक्त हिंदू धर्मातील अशा बाबींवरच लई मोक्कार हल्ला चढवितात..! इतर धर्मातील अशाच बाबींच्या वेळी...मौन व्रत धारण करून बसतात..!एककल्ली कुठले..! )

सगळं..आवरून सावरून मस्तपैकी इन..बिन करून मी औरंगाबाद बस स्थानकावर पोहचतो..! तिथं पोहचल्या..पोहचल्या..सगळ्याच.. दर्पाच्या...सुगंधाने...माझे स्वागत होते..! आता त्याचीही सवय झाली आहे..!😂  मी लगेच अंधारी ला जाणारी बस कधी लागेल...अन् कधी नाही..या प्रतीक्षेत इकडं..तिकडं..कावरा बावरा होऊन पाहत असतो..! इतक्यात ती  बस येते..! चालक..अन् वाहक दररोजच्या प्रवासामुळे चांगलेच परिचयाचे झाल्याने..आम्ही एकमेकांना पाहून कधी गालातल्या गालात तर..कधी.. मध्यम स्वरूपाचे विक्राळ हास्य करून..एकमेकांना साद घालतो..अन् बसतो..बस मध्ये..!
अंधारीला गडाकडे जाण्यासाठी..सिल्लोड रस्त्याने..!

माझ्या सकाळच्या पुरुषी सौंदर्याचा मला असातसा फार तर..हर्सूल सावंगी पर्यंतच निव्वळ पोकळ अभिमान वाटत असतो..!पण जर का..एकदा सावंगी पार केली...की मग..संपूर्ण बस मध्ये..अवकाशातील..विविध तारे सितारे चमकावे तश्याच स्वरूपात.. धुळींचे कण...जागा व्यापायला सुरुवात करतात..! मग मी माझ्या पुरुषी सौदर्याला झाकून...पाकून ठेवण्यासाठी माझ्या भात्यातील...एक संरक्षक शस्त्र बाहेर काढतो..! माझा रुमाल, टोपी यांनी माझ्या प्रौढ वयातील चेहऱ्याला एखाद्या गुंड प्रवृत्तीच्या माणसासारखे झाकून घेतो..! माझ्या या कृती सोहळ्यात अजूनही इतर प्रवासी सामील होतात..!त्यात..सौंदर्याला..स्वतः च्या जिवापेक्षा जास्त जपणाऱ्या काही माता ,भगिनी पण जास्त प्रमाणात सक्रिय सहभाग नोंदवून धुळींच्या कणांबरोबर या..मोहिमेत सहभागी होऊन जातात..!

जेन्हा..थोडा फार चांगला रस्ता येतो..तेंव्हा मी माझे डोक्या..चेहऱ्यावरील सर्व शस्त्रे म्यान करून ठेवतो..! पण थोड्याच वेळात जेंव्हा...धुळीचा लोट आला रे आला की पुन्हा सर्व शस्त्रे चढवून..धुळीच्या साम्राज्यात विलीन होऊन जातो..!ही हातघाईची लढाई सुरू असतानाच फुलंब्री येते..! थोडासा सुटकेचा निःश्वास सोडतो..! तोही..धुळीने माखलेला..!😂 फुलंब्री बस स्थानकावर उतरून..माझे कपडे झटकून...घेऊन..स्वतः च्या मोबाईलला आरसा करून..चेहरा वाकडा तिकडा करून माझे धुळीने माखलेले चेहऱ्याचे सौदर्य निरखून पाहून घेतो..!😂

पुन्हा काही वेळ बस तिथं थांबून पुन्हा आम्ही अंधारी गडाकडे कूच करतो..! आता धुळीच्या लोटांचे प्रमाण जरा जास्तच वाढलेले असते..! धुळीच्या रूपातील गनीम आमच्यावर प्रखर हल्ला चढवीत असतो..! पण...मीही आता लई पक्का खेळाडू झाल्याने  तिच्याबरोबर लढाईत माझे सर्व शस्त्रे पुन्हा अंगावर चढवतो..!माझ्या सोबत असलेले माझे दैनिक प्रवासी मित्र डॉ.घुगे साहेब( माझ्या बाजूला बसलेले, डॉ. गिरी साहेब, माझ्या पलीकडच्या सीटवर बसलेले) हे सुध्दा माझ्या या मोहिमेत थेट अंधारी गडापर्यंत सामील असतात..!

मित्र असावेत तर असे..! धुळीत एकमेकांना साथ देणारे..!😂 कधी मधी डॉ.योगेश राजपुत साहेब पण असतात..या मोहिमेत..सोबत..!

मजल दरमजल करत अखेर सर्व वस्रांवर धुळीचे कण घेऊन अंधारी गडावर पोहचतो.शाळेत गेल्या..गेल्या माझे मुलं अन् मुली माझ्याकडे पाहून आपले सर..धुळीच्या साम्राज्यात लढाई करून आल्याने मला सुहास्य वदनाने माझे स्वागत करतात..!😂

दिवसभर अंधारी गडावर धुळीचे कण घेऊन माझ्या लेकरांना शिकविल्या नंतर शाळा सुटली रे सुटली की,माझी पुन्हा मोहीम सुरू होते..औरंगाबाद गडाकडे..! आता मात्र सकाळी येताना जे धुळीचे कण माझ्यावर हल्ला करण्याचे बाकी राहिले आहेत..ते आता चौफेर हल्ला चढवून मला पार घायाळ करून सोडतात..! ज्यावेळी मी घरी पोहचतो त्यावेळी सकाळच्या अन् आताच्या माझ्या असलेल्या वर्णात,रंग रुपात बराच बदल झालेला असतो..!😂 यदा कदाचित...ज्या दिवशी माझ्या चेहऱ्यावर ,कपड्यांवर धूळ नसेल किंवा कमी असेल त्या रोजी माझी धर्मपत्नी मला म्हणते..
" का..हो.. आज तुम्ही अंधारीला गेले नव्हते वाटतं..!"
मी ,माझ्या धर्मपत्नीच्या या वाक्याने अजुन प्रफुल्लित होतो..! माझ्या पत्नीला सिल्लोड ते औरंगाबाद या महा मार्गावरील कामाच्या धुळीच्या कणांवर असलेल्या निष्ठावर, त्या धुळीच्या प्रामाणिकपणावर असलेल्या विश्वासावर नतमस्तक व्हावेसे वाटते..!😂

अखेर मी पुन्हा माझे पुरुषी सौदर्य पाण्याने धुवून..पुसून काढतो..पुन्हा दुसऱ्या दिवशी.. धुळी बरोबर युद्ध खेळायला..!😂

वंदे मातरम्..!

ता.क.: सध्याला औरंगाबाद ते सिल्लोड रस्त्याचे रुंदीकरण कॉंक्रीटीकरण करण्याचे काम सुरू आहे.सध्या थोडाफार त्रास होईल पण भविष्यात हा रस्ता खूप सुंदर झालेला असेल..यात तिळमात्र शंका नाही..! वरील माझे लिखाण विनोदी लेखन पद्धतीने घ्यावे..! रस्त्याच्या कामावर टीका म्हणून नाही..!

या रस्त्यावरील  धुळीने माखलेला एक दैनिक प्रवासी लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:६ मार्च २०१९

गुरुवार, १२ मार्च, २०२०

" आमची पाराई..! "



मला प्रवासात भेटलेली माणसं..!

" आमची पाराई..! "
___________________________________________
                                                         
 मी जेंव्हा..जेंव्हा सासुरवाडीला जातो, तेंव्हा..तेंव्हा माझी पाराई आपल्या जावयाला उठत..बसत नक्की भेटायला येतेच..! माझी भेट झाल्यावर माझ्या गालावरून मायेने हात फिरवून तिच्या कानावरील भागावर तिच्या दोन्ही हातांची बोटं मोडणारी माझी पाराई..! ती बोटं मोडल्यावर माझ्या आयुष्याचे कृतार्थ  झाल्याची भावना माझ्या मनात येते..! मातेला व मायेला कोणतीही " जात "  बंदिस्त करूच शकत नाही..! प्रत्येक वेळी माझी पाराई, मला म्हणते ....
" जावई, कव्हा आले..? अन् माझी शारदा कुठं हाय..? पोरं दोन्ही आणले की एकच..? म्हाताऱ्याची तब्येत बरी हाय का..?" 
 एकाच दमातील ही मायेची विचारपूस सुखावून जाते..!
                                                     
पाराईने खूप खूप कष्ट सोसले आहेत.ते कष्ट सोसतांना माझ्या सासू, सासऱ्यावर ,त्यांच्या लेकरांवर जीवापाड प्रेम करत राहिली..!गेल्या १८ वर्षापासून माझी  सासुरवाडीला एकही अशी भेट झाली नसेल की,ज्यावेळी पाराईची अन् माझी भेट झाली नसेल..! जर कदाचित थकव्यामुळे पाराई नाही आली,तर मी तिच्या भेटीला जातो..!मात्र जातो नक्कीच..! अख्खे आयुष्य झोपडीत गेलेली पाराई,तिच्या नातवाच्या शिक्षणामुळे ,नोकरीमुळे आज आरामदायी सुखी जीवन व्यतीत करत आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर नितांत श्रध्दा असलेली माझी पाराई..!

वास्तविक माझी पाराई माझी रक्ताच्या व जगाच्या दृष्टीने असलेल्या तथाकथित जातीच्या नात्याने माझी आई आजी नाही..! पण त्याही पलीकडे असलेल्या भावनिक माणसांच्या नात्यातील माझ्या मनाला भावलेली खूप मायाळू आई आहे..! असे नाते जे जातीच्या श्रृंखला तोडून टाकते..!

 मी खरंच खूप नशीबवान आहे,माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात मला मातेच्या रुपात इतिहासातील अनेक माता भेटल्या,ज्यांनी मला आजच्या काळातील वर्तमानात त्यांना शोधण्यास व त्यांचे आजचे अस्तित्व आजही आहे हे मान्य करायला लावले..!

माझ्या पत्नीवर,आमच्या पाराईचे विशेष प्रेम..! जेंव्हा जेंव्हा मी माझ्या सासुरवाडीला जातो तेंव्हा तेंव्हा एकतर माझ्या पत्नीला ,आमच्या पाराईला भेटण्याची आतुरता असायची  किंवा पाराईला,माझ्या पत्नीला भेटण्याची आतुरता असायची..! कोणत्याही नात्यात आतुरता तेंव्हाच निर्माण होते जेंव्हा त्या नात्यातील प्रेमाची खोली,खूप खोलवर रुजलेली असते..! नात्यातील प्रेमाची खोली, या दोघींच्या नात्यात नक्कीच मला नेहमी जाणवत असायची..!

आजही माझ्या पत्नीला त्यांच्या अतिशय कठीण परिस्थितीतील दिवस आठवतात तेंव्हा याच पाराईने माझ्या पत्नीला,तिच्या भावंडांना लावलेला जो जीव आहे,त्याचे स्मरण झाल्यावर खूप खूप गहिवरून येते..!कुणालाही,कठीण परिस्थितीत जी माणसं जीव लावतात तीच माणसं,अशा माणसांना आयुष्यभर देव माणसांसारखी जाणवत राहतात..! अगदी असंच निर्भेळ प्रेमाचं अन् मायेचं नातं पाराई अन् माझ्या सासुरवाडी कडील माणसांमध्ये होते..!

 कोण म्हणतं थोर राष्ट्रपुरुष पुनर्जन्म घेत नाहीत..? ते सर्व थोर राष्टपूरूष आपल्या अवतभोवतीच असतात..! फक्त त्यांना शोधण्याचे व जाणण्याचे भावनिक मन असावे लागते..! ते मन जर घाणेरडे राजकीय किंवा जातीयवादाचा पुरस्कार करणाऱ्या विचारधारेचे असेल तर...हे राष्ट्रपुरुष कधीच सापडणार नाहीत..!

 विनम्र वंदन पाराई उपाख्य पार्वताबाई बन्सी गोरे या माझ्या आईला...त्यांच्या लाडक्या जावयाकडून..!

 वंदे मातरम्                         
                                                                                 
लेखक व पाराईचा लाडका जावई: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव, पालखेडवाले

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: १३ मार्च २०१८

पोक्त विचारांचे धनी , सर्जेराव काका पाटील..!






#मला प्रवासात भेटलेली माणसं..!

 " पोक्त विचारांचे धनी , सर्जेराव काका पाटील..! "

==================================

आदरणीय सर्जेराव काका औसरमल पाटील,
वंदे मातरम्..! 🙏🏻
प्रथमतः तुम्हाला जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..! 🌹

आपण ,आम्ही जो पर्यंत एकलहेरा,ता. गंगापूर, जि. औरंगाबाद या गावात शिक्षक म्हणून सेवा करत होतो तो पर्यंत एक शिक्षण प्रेमी नागरिक म्हणून आणि परिपक्व विचारांचे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत राहिले.आम्ही जो पर्यंत तिथे नोकरी करत होतो तो पर्यंत तुम्ही म्हणजे आम्हा सर्व शिक्षकांसाठी एक वडील या नात्याने प्रेमाने वागत राहिलात. शाळेत कोणतीही समस्या आली तर तुम्ही अन् आदरणीय दादासाहेब पाटील गांगर्डे सदैव तत्पर असायचे. शाळेतील चांगल्या गोष्टींना, चांगल्या शिक्षकांना कसे प्रेरित करायचे याचे कौशल्य तुमच्या अंगी आहे.

मला चांगले आठवते.. जानकीदेवी बजाज अंतर्गत आपल्या शाळेला एक लाखाचे स्वच्छतागृह मंजूर झाले होते.पण काही रक्कम अगोदर जमा करायची होती. आम्ही ही अडचण तुमच्या अन् दादा पाटील गांगर्डे यांच्या कानावर ही समस्या सांगितली.तुम्ही क्षणाचाही विलंब न करता गावातील देवळाची जमा असलेली शिल्लक रक्कम शाळेच्या स्वच्छतागृहासाठी जमा करायला दिली होती.खूप मोठे कार्य होते ते...लेकरांसाठी..!

एक समजुतदार अन् योग्य व्यक्तीचे मूल्यमापन करणारे तुमचे गुणवैशिष्ट्ये माझ्या मनाला खूप भावले. एखादा शिक्षक जर अगदी नगण्य बाबतीत चुकत असेल तर त्याला प्रेमाने समजावून सांगून अन् त्याला अजुन प्रोत्साहित करून त्याच्याकडून खूप चांगले काम तुम्ही करून घेत राहिले.

आम्ही जो पर्यंत एकलहेरा,ता.गंगापूर शाळेत कार्यरत होतो तो पर्यंत तुम्ही सदैव चांगल्या शिक्षकाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलात याची आठवण माझ्या हृदयात कायमची कोरलेली राहील. असे पोक्त विचारांचे आणि योग्य ते समजून घेणारी माणसं एखाद्याला प्रेरित करायला खूप महत्त्वाची ठरतात. तुम्ही जेंव्हा जेंव्हा शाळेत आलात तेंव्हा तेंव्हा निदान मला तरी माझ्याच घरातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व घरी आल्यासारखे वाटत होते. त्याचे कारण तुमच्या अंगी असलेले खरे पाटीलपण..! एखाद्या पाटलाचे पाटीलपण कसे असावे ते तुमच्याकडे पाहून मला पटत गेले. पाटील हे पद होते , गाव पातळीवरील जबाबदारी सांभाळणाऱ्या व्यक्तीचे..! पाटील या जबाबदारीयुक्त पदाच्या सोबत विनम्रता, समजूतदारपणाची सुसंकृत भाषा, सर्वांना सामावून घेण्याची न्यायिक प्रवृत्ती इत्यादी नैतिक मूल्ये ओघाने आलीच. हीच पाटील पदाची खरी ओळख आहे अन् राहील. पाटील या पदाला शिवकालीन इतिहास आहे. काळाच्या ओघात पाटील या पदाचा उपयोग सर्रास कुणीही करू लागला तो भाग वेगळा..! आम्ही जो पर्यंत एकलहेरा येथे कार्यरत होतो, तो आदरणीय सर्जेराव पाटील काका अन् दादा पाटील गांगर्डे यांनी शाळेसाठी जो काही भक्कम आधार दिला होता तो कधीही न विसरण्या जोगता आहे. आदरणीय सर्जेराव काका औसरमल यांचे पाटीलपण आमच्या पाठीशी होते याचा आजही आम्ही तत्कालिक सर्व शिक्षकांना सार्थ अभिमान वाटतो.

तुमचे एक वाक्य मला नेहमी आवडायचे..अन् ते म्हणजे..
" शाळेत गावातील कुणा ही नागरिकाला यायचे असेल तर..पायातील राजकारणाचे जोडे बाजूला काढा..मगच या..!"
खूप मोठा अर्थ त्यात होता..! 

आम्ही जो पर्यंत एकलहेरा शाळेत कार्यरत होतो तो पर्यंत तुम्ही अन् दादासाहेब पाटील गांगर्डे यांनी सदैव आम्हाला खूप खूप सहकार्य केले ते शब्दात व्यक्त करणे कठीण आहे.शेवटी चांगल्या माणसांची आठवण सदैव हृदयात असते,माझ्या सारख्या सर्व सामान्य शिक्षकाच्या अंतर्मनात..!

आदरणीय सर्जेराव औसरमल पाटील काका, आज दिनांक १२ मार्च २०१९ रोजी तुमचा जन्मदिन आहे..!
त्याबद्दल आपणास जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..! 🌹

ता.क. - प्रत्येक गावात, विविध क्षेत्रात कुणीतरी राजकीय पक्षाशी संबंधित असतो किंवा एखाद्या संघटनेशी संबंधित असतो. मला वैयक्तिक आयुष्यात भावलेल्या अन् त्यांच्यातील मला वैयक्तिक अनुभवास आलेल्या सद्गुणांचा, चांगुलपणाचा मी चाहता असतो. याचा अर्थ मी, अशांच्या राजकीय पक्षाशी अथवा संघटनेशी संबंधित आहे, असा अर्थ सुज्ञ वाचकांनी काढू नये ही नम्र अपेक्षा..!🙏

" मला प्रवासात भेटलेली माणसं..!" 
हे सदर लेखन निरपेक्ष भावनेने वाचन करावे ही नम्र विनंती..!🙏

एकलहेरा शाळेतील एक माजी गुरुजी : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

वंदे मातरम्..!

दिनांक:१२ मार्च २०१९

सोमवार, ९ मार्च, २०२०

" चुना सापडला रे..! "





आमचे गाव आमची माणसं

                      " चुना सापडला रे..! "
=====================================

 आम्ही  लहानपणी  ऐंशीच्या दशकात  पालखेड येथे निव्वळ मातीच्या घरात  राहत होतो.माझी स्व.आई जरी मूळची धुळे या शहरातली होती तरी ती तिच्या सासरी पालखेड येथे आल्यापासून दारिद्र्य अवस्थेतील खेड्यातील सगळी कामे शिकून गेली होती..! परिस्थिती अन् परिसर माणसाला सगळं शिकवतो हे ब्रीद वाक्य मला नेहमी माझ्या स्वर्गीय आईकडे बघून नेहमी वाटते..अन् तेच माझ्या अंगी उतरवत गेलो..!

माझ्या बालपणी आमचे जे घर निव्वळ मातीचे होते..त्याला दरवर्षी दिवाळीच्या सणाला रंगरंगोटी करण्यासाठी निव्वळ मातीचा रंग विकत आणावा लागत असे..! गावातील स्व.विठ्ठल काका जैन यांच्या दुकानातून तर कधी स्व.संपत शेठ छाजेड यांच्या दुकानातून आणायचो.माझी आई खूप धार्मिक होती.तिची अशी इच्छा असायची की,घरात सगळीकडे रंग फिका दिला तरी चालेल पण देवघरात रंग कसा उठून दिसला पाहिजे..! मग काय..देवघरात मातीचा विकत आणलेला रंग उठून दिसावा म्हणून त्याखाली पांढरा शुभ्र चुना द्यावा लागे..!

आमच्या पालखेड गावाच्या पश्चिम दिशेला ज्या परिसराला आम्ही तेंव्हा  " तळ्यापाळी " असे  म्हणयचो. आता म्हणतात की नाही ते पक्के माहीत नाही..कारण सध्या माझे जन्मगाव आधुनिकतेकडे जात आहे..! सध्याची पिढी सुशिक्षित झाली  आहे म्हणून वाटते बाकी काही नाही..! तर त्या तळ्यापाळी असलेल्या मोकळ्या मैदानावर थोडे जरी खणले तरी पांढरा शुभ्र चुना सापडायचा..!माझी आई मला दिवाळी आली की म्हणायची..
" नंदन,तू अन् आप्पा तळ्यापाळी जा..अन् चुना खणून घेऊन ये..! देवघरात द्यायचा आहे..!"
मी लगेच घमेले घेऊन माझा आयुष्यातील सर्वात पहिला बालमित्र स्व.आप्पा सूराशे याच्या घरी  जाऊन त्याला सोबत घेऊन तळ्यापाळी जायचो.  इकडं..तिकडं शोधून झाल्यावर जिथं चुना सापडला की आम्ही लगेच मोठ्ठयाने ओरडायचाे.....
" चुना सापडला रे...!"
चुना सापडलेल्या जमिनीत खुरप्याने खणून..खणून चुना काढायचो..! तिथं त्यावेळी गावातील अजूनही काही मुलं यायची..चुना खणून काढायला..! चुना काढून झाला की, तो घमेल्यात घेऊन घरी यायचो. फक्त जिथं देवघर होते तिथंच पांढरा शुभ्र चुना लावला की मग त्यावर विकत आणलेला मातीचा रंग द्यायचो..!
माझी आई जाम खुश होऊन जायची..!

आज दिनांक १० मार्च २०१९ रोजी तसाच पांढरा शुभ्र चुना आम्ही " जन सहयोग सामाजिक संस्था,औरंगाबाद "  चे सदस्य  विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यासाठी जे खड्डे , ठिकाण गोलवाडी फाटा, वाळूज,अहमदनगर रोड, सैनिकी क्षेत्र औरंगाबाद येथे  खंदत होतो तेंव्हा  माझ्याच खड्ड्यात सापडला..! आमचे प्रमुख प्रशांत भाऊ गिरे‌ यांना लगेच बोलावून या मातीत सापडल्या जाणाऱ्या पांढऱ्या शुभ्र चुन्याची अन् माझी भूतकाळातील एक भावूक आठवण सांगितली..!

 माझ्या गत आयुष्यात बालपणी  आमच्या मातीच्या घरातील देवघराला देण्यासाठी पांढरा शुभ्र चुना खूप खणून काढला पण कधी आयुष्यात कुणालाही चुना लावलाच नाही.. आणि लावणारही नाही...! कारण त्या मातीतल्या पांढऱ्या शुभ्र चुन्याची अन् माझ्या स्वर्गीय आईची रम्य अन् भावूक स्मृती आयुष्यभर हृदयात कोरलेली आहे..!

ता.क.: एक ना एक दिवस मलाही याच मातीत मिसळून माझ्याही शरीराचा चुनाच होणारा आहे..याची सदैव जाणीव ठेवून जगणे माहीत आहे मला..!

वंदे मातरम्..!

लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: १० मार्च २०१९,रविवार
स्थळ: सैनिकी जागा, गोलवाडी फाटा,औरंगाबाद.

" आम्ही अन् होळी...! "





" आमचे गाव, आमची माणसं..! "

" आम्ही अन् होळी...! "😊
=================================

कोणे एकेकाळी मी ज्यावेळी पालखेड येथे राहत होतो तेंव्हा..एक महिना अगोदरच वाटायचे की...एक महिन्यानंतर होळी येणार..!

त्यानंतर..
कोणे एकेकाळी मी ज्यावेळी लासूर स्टेशन येथे राहत होतो तेंव्हा एक दिवस अगोदरच वाटायचे की...उद्या होळी येणार..!

आणि आज....
मी औरंगाबाद शहरात राहतोय तर.....होळी आली कधी अन् चालली कधी...कळेना पण...!

असे मला आज वाटण्याचे कारण की, मी  आज मोठ्या शहरात राहतोय..!

आपले गाव..अन् गावाकडच्या आठवणी.. शहरात पोरक्या होऊन जातात..! शहरात सर्व काही विकत मिळतं..पण.. आपलं गाव कुठंही सापडत नाही..!  मी, शाम शेळके,विजू, फैयाज, फारुख, खाजा, डॉ.संजय राऊत,डॉ.गणेश वाणी, आण्णासाहेब म्हस्के, नंदू जाधव इ.  अजूनही बरेच जण..आम्ही  वर्गमित्र खूप जगलो..आमच्या पालखेड गावात..! तेथील वास्तव्याचा तृप्तीचा ढेकर सदा सर्वदा आनंद देऊन जातो..!

आमच्या अभ्यासाच्या ज्या अभ्यासिका पालखेड येथे होत्या..त्या एक जिवंत सत्य दंतकथा आहेत..! त्यांच्या विषयी मी कधीतरी नक्कीच व्यक्त होईलच..! मात्र एक नक्की आमच्या सारख्या अभ्यासाच्या अभ्यासिका कुठेही होणार नाहीत या विषयी आम्हाला खूप खूप अभिमान आहे..! कारण त्या फक्त अभ्यासिका नव्हत्या तर..ते आमचे घर होते..!

आमच्या वर्गाच्या अभ्यासिका नंतर कोणत्याच वर्गाच्या मुलांनी पालखेड येथे अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका केल्याच नाही..! यदा कदाचित जरी कुणी केल्या असतील तरी त्यात आम्ही नव्हतो..म्हणजेच आम्ही जे जगलो ते आयुष्यावर भरभरून प्रेम करणारे क्षण नव्हते हे मी खात्रीने सांगतो..!

रात्री खूप उशिरा पर्यंत आम्ही आमच्या अभ्यासाच्या खोलीत अभ्यास करायचो.होळीच्या दिवशी मात्र रात्रीचा अभ्यास करायला खूप जीवावर यायचे..! त्यांचं मुख्य कारण असायचं होळी..!😊 तो कालखंड होता इ.स.१९९० ते १९९२ चा..! होळीच्या नावाखाली रात्री खूप उशिरा गावात भुतासारखा फिरायचा आनंद काही औरच होता..! आमच्या मित्रांच्या टोळीचा म्होरक्या असायचा आमच्या सगळ्यांच्या गळ्यातील ताईत शाम मुरलीधर शेळके..!😊 आता हा शाम म्हणजे आमचा जीव की प्राण..!😊  फक्त एका वाक्यात सांगतो, जर यदा कदाचित हा शाम आमच्या आयुष्यात नसता तर आम्ही कधीच तरुण झालो नसतो ..! 😀
आम्ही आमच्या आयुष्यात लहानपण ते डायरेक्ट म्हातारे झालो असतो...!😀 प्रिय बालमित्र शाम वर स्वतंत्र लेख लिहावा लागेल..!

होळीच्या दिवशी लाकडं चोरणं बहुदा इ. स.१९९०-९२ साली  गुन्हा नव्हता..! 😊 मात्र आज कुणीही आम्ही त्याकाळी केल तसं अजिबात करू नये.नाहीतर उगीचच एखादा आजकालचा तरुण आमचा त्याकाळचा रेफ्रन्स‌ द्यायचा अन् आज होळीत लाकडं जाळायचे उद्योग करायचा..!😊

होळीच्या दिवशी रात्री आमच्या पालखेड गावातील बहुतांशी म्हातारे आपापल्या खळ्यात झोपायला असायची..! खळ्यातील लाकडांना राखण करायला..! एवढ्यांच्या म्हाताऱ्या नजरा चुकवून होळीत जाळायला लाकडं आणायची म्हणजे लंकेतून अशोकाचे झाड आणल्या सारखे असायचे..! पण तो पराक्रम आम्ही करून दाखवत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळ  झाली की,गावातील म्हातारी माणसं,श्री.पारेश्वर मंदिराच्या समोर, रात्रीच्या अज्ञात लाकूड चोरांना  शिव्या हासाडायचे..! आम्ही सगळे मित्र सभ्यपणाचा आव आणून कोडग्या सारखं ऐकत असायचो..!😊

आम्ही सर्व मित्र खूप खूप नशीबवान आहोत, असं आठवणीत राहणार आयुष्य,आमच्या पालखेड गावात आम्हाला मिळाले..! त्यावेळी आम्ही खूप खूप आनंद घेतला आयुष्याचा..! बहुदा आमच्या जाती अन् आमचे धर्म त्याकाळी झोपलेले असावेत म्हणून आम्ही तो आयुष्याचा निर्भेळ आनंद घेऊ शकलो..!आज आमच्या मुलांच्या काळात प्रत्येकाची जात अन् धर्म भूतासारखा जागी आहे..! त्यामुळं आमच्या मुलांची झोप पार उडून गेली आहे..!
दुर्दैव आजच्या पिढीचे...!

ता.क.: आम्ही सर्वजण आज जरी बाहेरगावी स्थायिक असलो तरी..गावाकडची लाकडं अन् आठवणी त्या पेटलेल्या होळी सारख्या सदैव आमच्या अंतर्मनात पेटलेल्या असतात.. !

वंदे मातरम्..!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: २० मार्च २०१९, होळी सण..!

माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: ९ मार्च २०२०,सोमवार,होळी

शनिवार, ७ मार्च, २०२०

" कृती छोटीशी,पण खूप प्रेरणादायी..! "




मला प्रवासात भेटलेली माणसं..!

" कृती छोटीशी,पण खूप प्रेरणादायी..! "
==================================

इ. स.२०१७

हिवाळ्याचे दिवस होते.कडाक्याची थंडी पडली होती.एक दिवस भल्या सकाळी मी लासूर स्टेशन येथील लासुरगाव रोड  या रस्त्याने मॉर्निंग वॉक साठी  न जाता भानवाडी रस्त्याला असलेल्या कांदा मार्केट मध्ये थोडाफार व्यायाम व मॉर्निंग वॉक साठी गेलो होतो.माझा थोडाफार व्यायाम   आटोपून मी थोडा लवकर  घरी निघालो होतो.मी भानवाडी रेल्वे गेट जवळ आलो होतो. इतक्यात मला लासूर स्टेशन ते लासुरगाव रोड लगत  असणाऱ्या भानवाडी फाट्याजवळ कुणीतरी एक ज्येष्ठ नागरिक आम्ही  हरित क्रांती प्रतिष्ठान अंतर्गत वृक्षारोपण  केलेल्या एका लिंबाच्या झाडाला उभे करत असताना दिसले..!ते  झाड काही कारणाने जमिनीवर पडले होते.

लासूर स्टेशन येथील लासुरगाव रोड लगत दुतर्फा  इ. स.२०१६ व २०१७ मध्ये आम्ही हरित क्रांती प्रतिष्ठान अंतर्गत वृक्षारोपण केले होते.

हिवाळ्याचे दिवस होते.दुरून मला स्पष्ट दिसेना,की.. कोण ही व्यक्ती असेल ..! मी दुरूनच पाहायचे ठरवले होते. खूप कडाक्याच्या थंडीत अखेर त्या ज्येष्ठ नागरिकाने ,ते जमिनीवर पडलेले कडुलिंबाच्या झाडाला उभे केलेच..!ते ज्येष्ठ नागरिक मग पुन्हा रस्त्यावर येऊन आपल्या मार्गावर पंथस्त झाले.मी आता बराच पुढे आलो होतो.बारीक नजर करून पाहिलं तर ती व्यक्ती  आदरणीय मनोहर काका त्रिभुवन हे होते..!

मला एका गोष्टीचा खूप आनंद झाला होता. कुणीही न सांगता आदरणीय मनोहर काका त्रिभुवन  यांनी आपल्यातील संवेदनशील मनाला जाणवणारे कार्य केले होते.वास्तविक त्यावेळी कडाक्याची थंडी होती.रस्त्याने अनेक तरणाबांड तरुण,तरुणी,काही प्रौढ माणसं जात -येत होती.पण...संवेदनशीलता  फक्त आदरणीय मनोहर काका त्रिभुवन  यांनीच प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली होती.ती पण स्वतः हुन ..!  विशेष म्हणजे त्रिभुवन काकांची ही कृती होती रस्त्याने जाणारे येणारे अनेक तरणाबांड तरुण,तरुणी,काही प्रौढ माणसं पाहत पाहत मस्तपैकी पुढे चालले होते.

कुणीही न सांगता ,एक छोटेसे कार्य करण्याची त्यांची ती कृती जगाच्या तुलनेत छोटीशी असेल कदाचित..! पण मला आदरणीय मनोहर काका त्रिभुवन  काकांची ती कृती खूप प्रेरित करून गेली होती..! आपल्याला कुणीतरी सांगावे अन् मग मी एखादं विधायक काम करावे अशा  मानसिकतेच्या अनेकांच्या श्रीमुखात आदरणीय मनोहर काका त्रिभुवन यांनी सणसणीत चपराक लगावली होती..! मी, दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी त्रिभुवन काकांची भेट झाल्यावर काकांना,त्यांच्या कालच्या खूप  चांगल्या कृती बद्दल खूप खूप धन्यवाद अन् आभार मानले होते..!

लासूर स्टेशन येथे मी राहत असताना भल्या सकाळी बरीच माणसं मॉर्निंग वॉक साठी जात असायचे.आताही  जात असतील बहुदा..!😊 भल्या सकाळी याच रस्त्याने फिरण्यासाठी आदरणीय मनोहर काका त्रिभुवन हे सुध्दा नियमितपणे  असायचे.माझी अन् त्रिभुवन काकांची बऱ्याचदा भेट व्हायची..! माझा  जिवलग मित्र ,प्रकाश सूर्यभान त्रिभुवन ( शिक्षक) यांचे सख्खे काका आहेत मनोहर त्रिभुवन काका..!

आज आदरणीय मनोहर त्रिभुवन काका ( सेवा निवृत्त कर्मचारी),लासूर स्टेशन येथे तथागत गौतम बुद्धांच्या प्रज्ञा ,शील ,करुणा या विचाराचे प्रसारकार्य, समाजप्रबोधनपर म्हणून करत आहेत..! त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे..!

आज आदरणीय मनोहर त्रिभुवन काका यांचा जन्मदिन आहे...! त्याबद्दल काकांना माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून मनःपूर्वक शुभेच्छा ..!

जय भीम काका..!
वंदे मातरम्!

शूभेच्छूक लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: ७ मार्च २०२०, शनिवार.

बुधवार, ४ मार्च, २०२०

"आमच्या गावचे दाजी - सोपान दाजी..! "




आमचे गाव आमची माणसं..!

"आमच्या गावचे दाजी - सोपान दाजी..! "
================================

या संपूर्ण पृथ्वीवर कुठेही सहसा सहजपणे सापडणार नाहीत असे  खूप चांगली माणसं आमच्या पालखेड गावात आहेत. माझ्या प्राथमिक शाळेच्या वयोगटापासून ते आज पर्यंत आमची समकालीन किंवा ज्येष्ठ माणसं लई भारी ..! ज्या.. ज्या माणसांचा प्रत्यक्ष माझ्याशी संपर्क आला त्या सर्व माणसांच्या सगळ्यांनी प्रेमात पडावे अशी प्रेमळ माणसं आमच्या पालखेड गावात आजही आहेत..! आत्ताच्या पोरांचा काही अनुभव नाही..! त्यामुळं ती कशी आहेत हेही माहीत नाही..!😊

असंच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे आमचे सोपानराव धुळसुंदर..! ज्यांना आम्ही सगळे समकालीन पालखेडकर " सोपान दाजी " या नावाने हाक मारतो..! सोपानराव ,यांची सासुरवाडी आमच्याच पालखेड गावातील..ज्येष्ठ नागरिक आदरणीय भावराव पाटील शेळके यांच्या घरची..! काळाच्या ओघात अन् माणसांच्या प्रेमापायी सोपान दाजी,पालखेड गावातच रमले,जावई झाले अन् मस्तपैकी स्थिरावले सुध्दा..!

मला ,माझ्या प्राथमिक शाळेच्या वयोगट पासून ते नोकरी लागे पर्यंत क्रिकेटचा लई मोक्कार  मध्यम स्वरूपाचा नाद होता.कालांतराने आमच्या शिवशक्ती क्रिकेट संघातील बरेच खेळाडू बाहेरगावी स्थायिक झाले,त्यामुळे आमचा संघ बऱ्याच प्रमाणात खिळखिळा झाला होता. आमचे सोपान दाजी,क्रिकेट खेळायला फार काही तरबेज नव्हते,पण क्रिकेट खेळायची लई लई मोक्कार हौस..! आता सगळ्यांना माहीत आहे की, हौस काय काय खाते  ते..!😊

आमच्या पालखेड गावात,गावातील ग्रामदैवत श्री.पारेश्वर महादेव भगवान यात्रेच्या निमित्ताने म्हणजेच कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने आमच्याही अंगातील क्रिकेटचा किडा वळवळायला लागायचा..! पण....आमच्यातील बहुतांशी मित्र बाहेरगावी स्थायिक झाल्याने गावात क्रिकेटची टीम कोण तयार करील..? कोण सगळं हॅण्डल करील..? या अनेक समस्यांमुळे आमचा क्रिकेटचा किडा वळवळ करत असून सुध्दा आम्ही काहीजण आमच्या " भावना " अक्षरशः मारून टाकायचो..!😊

पण म्हणतात ना...तुमच्या जर कुणा विषयी प्रामाणिक भावना असतील तर ती भावनेची देवता किंवा देव तुमच्या मदतीला कुणाला तरी पाठवून देतो...अगदी तसंच झालं..!😊

इकडं गावात सोपान दाजी यांना क्रिकेटची लई मोक्कार हौस होतीच..! पण त्यांना त्यांच्या संघात खेळाडू भेटत नसायचे..! बहुदा त्याचे कारण गावातील बाकीच्या खेळाडूंना  असं वाटतं असेल की..
"सोपान दाजी यांनाच धड खेळता येत नाही अन् हे काय आमची कँप्टनशीप करतील..?"
पण नियतीनं आमच्या सारख्या अनेक उघड्यांना- नागड्यांना,दुसऱ्या एका उघड्या- नागड्या जवळ आणायचे ठरवले होते..!😊
(आता इथं " उघड्या-नागड्या  " याचा अर्थ कुणीही सहारा न देणारे असा अभिप्रेत समजावा..! नाहीतर उगीचच एखादा वाचक आमच्या वस्रांच्या अनुषंगाने पहायचा..!😊)

सोपान दाजी यांनी आम्हा बाहेरगावी स्थायिक असणाऱ्या  पण क्रिकेटचा मोक्कार किडा असणाऱ्यांशी संपर्क केला.त्यात प्रामुख्याने मी स्वतः , बाळु माळी ( जि.प.शिक्षक जालना ), डॉ.संजय  राऊत ( परसोडा), आण्णासाहेब म्हस्के ( बजाजनगर), भावराव कोल्हे ( औरंगाबाद) हे होतो.यात आण्णासाहेब म्हस्के जर सोडला तर बाकी आम्हा इतरांचे शरीर पूर्वी सारखे चपळ राहिले नव्हते..! चेंडू जवळून जाताना ,त्याच्याकडे एकटक पाहत रहावं असं आमचं शरीर झाले होते..!😊 मात्र आमच्या सोपान दाजींचा आमच्यातील क्षमतेवर प्रचंड विश्वास होता..! गावातीलच एक ज्येष्ठ खेळाडू आदरणीय श्रीराम मुलमुले ( तात्या ) यांचाही समावेश आमच्या संघात केला होता.थोडक्यात आमचा क्रिकेट संघ म्हणजे ,राजकुमार संतोषी दिग्दर्शित " चायना गेट " चित्रपटा सारखा होता..!😊 या चित्रपटातील सगळे कलाकार वयोवृध्द होते..! पण शत्रूवर विजय मिळविणारे होते..!

सोपान दाजी यांनी आम्हा सगळ्यांना एकत्र आणलं अन् आपल्या क्रिकेट टीमचे नाव " रामजाने क्रिकेट संघ " असे राहील असे सांगितले. मी म्हणालो...
" दाजी,आपून दुसरं नाव ठेवू ना..!"
यावर सोपान दाजी म्हणाले - " आपुन मुद्दाम रामजाने नाव ठेवले आहे,कारण हारे तो भी रामजाने और जिते तो भी रामजाने..!" 😊

सोपान दाजी या आमच्या कँप्टनचं हे लॉजिक ऐकून आम्ही बरेच टेंशन फ्री झालो होतो.😊 कारण....
"हारे भी तो रामजाने और जिते  भी तो रामजाने..!" 😊
आम्ही जीवतोडून प्रत्येक सामना खेळत होतो.गावातल्या भल्या भल्या टीमला आम्ही पाणी पाजत जिंकत चाललो होतो.त्याच मुख्य कारण आमचा कँप्टनचं आम्हाला एकदम फ्री ,तणावमुक्त खेळायला परवानगी देणं हेच होतं..! आमच्या रामजाने संघात सर्वात चपळ अन् सर्वात लहान खेळाडू होता संजय जनार्दन निकम होता..! त्याच्यावर उर्वरित खेळाडूंची लई भिस्त होती..! आमच्या
रामजाने क्रिकेट टीमला सगळ्यांनी कमी लेखलं होते,पण आम्ही थेट सेमी फायनल पर्यंत धडक मारली होती..!

सोपान दाजी यांनी आम्हा सगळ्यांना खूप धीर दिला अन् पुन्हा म्हणाले....
"हारे  भी तो रामजाने और जिते  भी तो रामजाने..!" 😊
सेमी फायनलला आमच्या समोर आमचीच पूर्वाश्रमीची टीम शिवशक्ती क्रिकेट टीम होती .त्यात भानू मामा जगदाळे हा तेजतर्रार गोलंदाज होता अन् अतिशय शैलीदार फलंदाज दिलीप सूराशे होता.आम्ही सुरुवातीला फलंदाजी केली.समोरच्या टीमला किती टार्गेट दिलं ते नीट आठवत नाही..! पण  बऱ्यापैकी टार्गेट दिलं होते..!

ज्यावेळी आमच्या प्रतिस्पर्धी संघाची फलंदाजी सुरू झाली,त्यावेळी  त्यांचे निम्मे फलंदाज बाद केले होते. पण शैलीदार फलंदाज दिलीप सुराशे एक बाजू लावून खेळत होता.अखेर माझ्या एका चेंडूवर त्याचा उंच झेल थेट सीमारेषेवर उडाला..! नेमका तिथं संजय निकम उभा होता.आम्हाला प्रत्येकाला खात्री होती की,आता दिलीप आउट होणारच...! पण..........
संजुकडून झेल सुटला..! आम्ही सगळे नाराज झालो.मात्र आमचे कँप्टन सोपान दाजी,संजूच्या जवळ गेले,त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला म्हणाले.....
" अरे संजू नाराज होऊ नको ,कारण............
"हारे  भी तो रामजाने और जिते  भी तो रामजाने..!" 😊

अखेर आम्ही सेमी फायनल हरलो.पण आमच्या आयुष्यात जी सकारात्मकतेची ऊर्जा आमच्या कँप्टनने ठासून भरली होती ती आयुष्यभर पुरेल एवढी जमा झाली होती..!

आजही मी जेंव्हा दरवर्षी आमच्या पालखेड गावातील ग्रामदैवताच्या यात्रेला जातो तेंव्हा आमच्या रामजाने क्रिकेट  टीमच्या आमच्या खूप आवडत्या कँप्टनला आवर्जून भेटतोच..! ज्यावेळी आमच्यातील चपळाई संपली होती त्यावेळी आमच्या सोपान दाजी यांनी आम्हाला त्यांच्यातील खेळकर स्वभावाने ताजे टवटवीत केले होते.दुसऱ्याला धीर कसा द्यावा हे याच आमच्या सोपान दाजी पासून शिकायला मिळाले..!आज सोपान दाजी , गावातच एक छानशी पान टपरी टाकून त्या व्यवसायात मस्तपैकी मजेत आहे..! त्यांना ज्यावेळी भेटायला जातो त्यावेळी  ते खूप खूप खूप आग्रहाने बडी सोपची पुडी देतातच..! मी ही त्यांना प्रत्येकवेळी म्हणत असतो......

"हारे  भी तो रामजाने और जिते  भी तो रामजाने..!" 😊

वंदे मातरम्..!

सोपान दाजींच्या नेतृत्वात क्रिकेट खेळलेला रामजाने क्रिकेट टीमचा एक खेळाडू लेखक :
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: ४ मार्च २०२०, बुधवार.

रविवार, १ मार्च, २०२०

"अहंकार नसलेला जिवलग प्रिय मित्र सुनील जाधव..!"



मला प्रवासात भेटलेली माणसं..!

"अहंकार नसलेला जिवलग प्रिय मित्र सुनील जाधव..!"

=====================================

प्रथमत:प्रिय मित्र सुनील पुंडलिकराव जाधव, गंगापूरकर यास आज दिनांक १ जुलै २०१७ रोजी, जन्मदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा..!
                                                             
मित्र...!
ईश्वराने मानवांच्या रक्ताच्या  दांभिक नात्यातील दांभिकपणा दूर करण्यासाठी निर्माण केलेले सर्वांगसुंदर नाते म्हणजे मित्र..!हे तेच नाते असते,ज्यात रक्ताच्या नात्यातील भाऊबंदकीचा द्वेषरूपी वास नसतो..!असतो फक्त आणि फक्त कास्तुरिमृगाच्या गर्भातील सुवासिक कस्तुरी सारखे नैसर्गिक सुगंध देणारं अदभूत रसायन..!

प्रिय मित्र सुनील, म्हणजे नैसर्गिक कस्तुरी सारखे अदभुत रसायन..!असे रसायन,ज्यात कुठलाही दांभिकपणा नाही,कोणताच अहंकार नाही, मानवी मूल्यांना घातक ठरणारे जातीपातीचे भेदभावरूपी अनैतिक मूल्ये नाहीत..! माझे हे मत कदाचित काहींना अतिशयोक्तीचे वाटेल,परंतु सुनीलच्या व माझ्या २५ वर्षातील मैत्रीतील अनुभवावरून सांगू शकतो की, सुनील पुंडलिक जाधव नावाचा हा माणूस
" निव्वळ सरळ स्वभाव " या अती दुर्मिळ मानवी प्रजाती मधील माणूस..!

आम्ही शिक्षणशास्त्र पदविका (डी.एड.) कन्नड चे वर्गमित्र..! तेही वसतिगृहातील मित्र..!वसतिगृहातील मैत्री ही मित्रत्वाचे सर्व रूप दाखवते..!त्यावेळी भगवान हिवाळे व सुनीलच्या अजोड मैत्रीचे आम्हा सर्व डी.एड.च्या विद्यार्थ्यांना अप्रूप वाटायचे..!lसूनीलकडे पूर्वीपासून  संघटन कौशल्य आहे..!ते विशेषकरून बहरले ते त्याच्याकडे शिक्षकसेनेचे नेतृत्व आल्यापासून..!जो,सुनील आम्ही समकालीन मित्रांनी त्यावेळी पाहिला होता ,तोच अनौपचारीक नात्यातील सुनील आजही हमखास दिसतो..!

वसतिगृहातील आम्ही एकमेकांना केलेली मदत,असो,किंवा सोबतचा एकत्र केलेला स्वयंपाक असो,त्यातील गोडी कधीच कमी झाली नाही..!उलट ती गोडी दिवसेंदिवस वाढतच गेली..!मित्रांनो,आपले मानवी जीवन विविध नात्यांच्या स्पर्शाने बहरते,उध्वस्त होते,कधी..कधी कोमजून जाते..!परंतु  मित्र या एकमेव नात्याच्या परिस स्पर्शाने हे मानवी जीवन सोन्याहून मौल्यवान होते..आणि या मित्ररुपी नात्यात सुनील सारखा निगर्वी,सरळ स्वभावाचा,निष्कपटी मित्र जर लाभला तर,अश्या सानिध्यावान मित्रांचे देखील सोने होते..!

प्रत्येक नेत्यात नेतृत्व कौशल्य नक्कीच असते. मात्र फार कमी नेत्यात नेतृत्व कौशल्यासोबत अनौपचारिक मित्रत्वाचे देखील सद्गुण असतात.आमचा डी. एड चा वर्गमित्र, रुम पार्टनर प्रिय सुनील  जाधव मध्ये नेतृत्व कौशल्या सोबतच अनौपचारिक मित्रत्वाचे देखील सद्गुण नक्कीच आहेत.यातच त्यांचे उजवेपण दिसून येते..!एक शिक्षक नेता म्हणून प्रिय मित्र सुनील मध्ये.....
" मी इतरांच्या पेक्षा वेगळा आहे..!" हा वाईट विचार त्याला आज पर्यंत तरी शिवलेला नाही.. प्रिय मित्र सुनील जाधव मधील मित्रत्वाचे  हे कौशल्य त्याचे शिक्षक संघटन क्षेत्रातील विरोधक देखील मान्य करतात..!

आपण सर्वजण सूनीलचे मित्र आहोत याचा खूप मनस्वी आनंद होतो..!

प्रिय मित्र सुनील,तुला जन्मदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा..!

वंदे मातरम् 

शूभेच्छूक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: १ जुलै २०१७