रविवार, २३ जुलै, २०२३

बाई पण भारी देवा


 

चिंतन ©️


बाई पण भारी देवा..!


====================================


बाई पण भारी देवा हा मराठी चित्रपट माझ्या मते मध्यमवर्गीय महिलांच्या मनातल्या कोंडलेल्या भावनांना मोकळी वाट करून देणारा चित्रपट आहे.माऊथ पब्लिसिटी मुळे एखादा चित्रपट किती प्रसिद्ध होऊ शकतो याचं उदाहरण द्यायचे झाल्यास बाई पण भारी देवा हा चित्रपट योग्य उदाहरण आहे.


स्री चे मन मुळात भाऊक असते.त्या मनाला जर कुणी दुखावलं तर ती स्री आतून स्वतः चा किती कोंडमारा करून घेते याचं उदाहरण म्हणजे बाई पण भारी देवा..!


एखाद्या कमावत्या स्री चा नवरा , आपल्या पत्नीचा आर्थिक फायद्यासाठी कसा बेमालूमपणे वापर करून घेतो याचं उदाहरण म्हणजे बाई पण भारी देवा..!


सारख्या वयोगटातील महिला समज गैरसमज मधून आपला तकलादू अहंकार आयुष्यभर कसा जपत राहतात अन् शेवटी अश्रूंना वाट मोकळी करून एकीच्या कुशीत हाय मोकळून रडून दुःख्खाला  वाट मोकळी करून देतात याचं उदाहरण म्हणजे बाई पण भारी देवा..!


आपल्या अंगावरील दागिन्यांचा अहंकार , आपल्या  भौतिक साधन संपत्तीचा फुगवटा समाजात मिरविणाऱ्या स्री च्या भावना व्यक्त करणारा चित्रपट म्हणजे बाई पण भारी देवा..!


एका अती शिस्तप्रिय पुरुषाच्या धाकात राहून आपल्या परिवारासाठी सोशिक आयुष्य जगणाऱ्या  स्री च्या भावनांचा चित्रपट म्हणजे बाई पण भारी देवा..!


आपला पती बाहेरख्याली आहे हे माहीत असूनही त्याच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या स्री च्या भावनांचा चित्रपट म्हणजे बाई पण भारी देवा..!


स्वतः ची शक्ती माहीत झाल्यावर आपल्या बाहेरख्याली पतीला आपल्या आयुष्यातून फेकून देऊन स्वतः ताठ मानेने उभे राहणाऱ्या स्री च्या आयुष्याची कथा म्हणजे बाई पण भारी देवा..!


आणि मला,  बाई पण भारी देवा या चित्रपटातील सर्वात आवडलेला अभिनय अन् त्याच सादरीकरण तेच , ज्यावेळी एका स्री ची घुसमट ती आपल्या संवादातून व्यक्त करते. निमित्त असते आपल्या लेकरांचा जन्मदिन अन् त्यावेळी त्या स्री ने आपल्या भावनांना मोकळी करून दिलेली वाट..! एक कमावती स्री आपल्या कुटुंबासाठी, विशेषतः आपल्या नवऱ्याचे मन सांभाळता सांभाळता स्वतः किती खचून जाते याचं सर्वोत्तम अभिनय सादरीकरण होय. आपल्या कमावत्या पत्नीच्या   जीवावर टिमक्या मारणाऱ्या अन् आपल्या पतीसाठी मनाचा होणारा कोंडमारा ज्या सर्वोत्तम अभिनयातून त्या स्री ने सादर केला आहे त्यासाठी हॅटस ऑफ..!

विशेषतः ती स्री आपल्या लेकरांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातून निघून एका कार मध्ये जाऊन बसते अन् खुप मोठ्याने रडत आपल्या कित्येक दिवसापासून दबलेल्या भावनांना वाट मोकळी करून देते.

ते दृश्य बघत असताना  डोळ्यात  अश्रू येतात. ते दृश्य बघून एक स्री आपलं मन दुसऱ्याचे मन राखता राखता स्वतः चे मन  किती मारून टाकते याची जाणीव झाली. हे फक्त चित्रपटातील दृश्य नसून ती संवेदना बहुतांशी महिलांची  व्यक्त होते. फक्त प्रतिनिधित्व करणारी ती मोठ मोठ्याने रडणारी स्री ठरते इतकेच..!


रसिक प्रेक्षकांना, महिलांच्या व्यथा अन् कथा जर आपल्यातील जाणवल्या तर माहेरची साडी या चित्रपटाने जे गारूड रसिकांच्या मनावर गाजवले होते, त्याचीच पुनरावृत्ती बाई पण भारी देवा या चित्रपटाने केली आहे असे मला वाटते.


आम्ही उभयतांनी बाई पण भारी देवा हा  चित्रपट सोबत बघितला. मात्र चित्रपटगृहात पुरुष अगदी बोटाच्या कांड्यावर मोजता येतील इतकेच आढळून आले.  वास्तविक माझ्या मते प्रत्येक नवऱ्याने आपल्या पत्नीच्या सोबत बाई पण भारी देवा हा चित्रपट नक्कीच बघायला हवा.जेणे करुन स्री च्या व्यथा अन् कथा आमने सामने समजून उमजून घेता येईल.


मला बाई पण भारी देवा या चित्रपटातील एक दृश्य खटकले अन् ते म्हणजे प्रौढ वयातील, वार्धक्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या महिला फार काही ठोस कारण नसताना दारू पिताना दाखवल्या आहेत ते..! या दृष्याची गरज होती का हा प्रश्न पडतो.असो चित्रपट निर्माण करणाऱ्याचा काय हेतू असेल तो त्यांनाच ठाऊक..! 


बाकी आदरणीय केदार भाऊ शिंदे यांनी स्री च्या कथा अन् व्यथा छान प्रकारे बाई पण भारी देवा द्वारे सादर केल्या आहेत, त्याबद्दल त्यांच्यातील उत्तम दिग्दर्शकाला दाद..!👌


वंदे मातरम्


एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २३ जुलै २०२३, रविवार.


रविवार, ९ जुलै, २०२३

संवेदनशील मनाचा कलाकार - गुरुदत्त "


 


चिंतन ©️


" संवेदनशील मनाचा कलाकार - गुरुदत्त "


===================================


हिंदी चित्रपट सृष्टीत काही कलाकार अतिशय संवेदनशील श्रेणीत त्यांनी स्थान मिळविलेले आहे.त्यात सर्वात उंच शिखरावर अढळ ध्रुव स्थान प्राप्त केलेले आहे गुरुदत्त यांनी..!


हिंदी चित्रपट सृष्टीत कित्येक कलाकारांच्या प्रेमाच्या कथा ह्या स्वप्नवत वाटणाऱ्या होऊन गेलेल्या आहेत.त्यात प्रामुख्याने दोन प्रेमकथांची गारूड आजही ,त्याकाळच्या कलाकारांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या माझ्यासह मोजक्या रसिकांच्या मनावर   हळुवारपणे स्थान टिकवून आहे. त्या दोन स्वप्नवत प्रेमकथांपैकी एक अमिताभ - रेखा अन् दुसरी अजरामर स्वप्नवत प्रेमकथा गुरुदत्त - वहिदा रेहमान..! या दोन्ही प्रेमकथांमध्ये सत्यता किती होती यापेक्षा या दोन्ही स्वप्नवत वाटणाऱ्या प्रेमकथांवर संवेदनशील रसिक प्रेक्षकांनी जीवापाड प्रेम केले, करत आहेत अन् तहहयात करत राहतील हे प्रेमळ सत्य आहे.


गुरुदत्त साहेब, यांची अजरामर कलाकृती " कागज के फूल " ही हिंदी चित्रपट सृष्टीतील माझ्या मते आज पर्यंतची सर्वात उत्कृष्ट संवेदशील प्रेमकथा..! एखादा पुरुष, एखाद्या स्त्री वर किती निस्सीम प्रेम करतो त्याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे गुरुदत्त अन् वहिदा रेहमान अभिनित कागज के फूल हा हिंदी चित्रपट होय. मोजक्या संवेदनशील भारतीय रसिकांवर ज्याप्रमाणे अमिताभ बच्चन अन् रेखा अभिनित " सिलसिला " या चित्रपटाची जादू आहे अगदी त्याच प्रमाणे गुरुदत्त अन् वहिदा रेहमान यांच्या " कागज के फूल " या चित्रपटाची जादू आजही कायम आहे. अर्थात आजच्या काळातील " ढिंगच्यांग ढिच्यांग " पिढीला या दोन्ही सर्वोत्तम कलाकृती बहुदा भावणार नाहीत..!


मृत्यू ,प्रत्येकाला येणारच,पण आपला भविष्यातील मृत्यू कसा होईल याचं धाडसी  चित्रीकरण देखील गुरुदत्त यांनी " कागज के फूल " याच सर्वोत्तम चित्रपटात स्वतः दिग्दर्शित करून प्रस्तुत केलेलं आहे. आता हा योगायोग की अजुन दुसरं काय माहित नाही. कागज के फूल चित्रपटाची सुरुवात अन् शेवट फक्त आणि फक्त गुरुदत्त साहेबच प्रस्तुत करू शकतात. एक कलाकार अन् दिग्दर्शक म्हणून हे काम अजिबात सोपे नव्हते,पण गुरुदत्त यांनी ही किमया त्यांच्यातील संवेदनशीलता जपलेल्या कलाकाराने सहज साध्य केली आहे.  कागज के फूल या चित्रपटात स्व. गुरुदत्त यांनी मानवी आयुष्याच्या ऐश्वर्याच्या शिखरावरील अन् मनाने उध्वस्त झालेला पुरुष अतिशय सुरेखपणे प्रस्तुत केलेला आहे.


काही माणसं त्यात स्री अन् पुरुष दोघेही आलेत, ते त्यांच्या आयुष्यात सतत कोणत्या ना कोणत्या तरी ग्लॅमर असलेल्या आयुष्यात जगत असतात. ग्लॅमर असलेलं हे आयुष्य मात्र बऱ्याचदा खूप नाटकी ठरतं. तिथं भावना, प्रेम या बाबी तकलादू ठरतात.तिथं असतं फक्त आणि फक्त चलनी नाणं अन् सौंदर्याचा अन् राजबिंडेपणाचा पोकळ वावर..! याच तकलादू बाबींवर कित्येकजण भाळून स्वतः ला किंवा इतर सहभागी भिन्न लिंगी व्यक्तीला त्यात ओढून घेतात अन् जगत असतात, दिखाव्याचे आयुष्य..!  फारच कमी जणांच्या आयुष्यात फक्त  दिखाव्याचे आयुष्य न येता त्याच भावस्पर्शी  आयुष्याला वास्तवाची किनार लाभते. याचं सर्वोत्तम उदाहरण द्यायचं झालं तर धर्मेंद्र अन् हेमामालिनी यांचं देता येईल. अजूनही कुणी असेल पण ग्लॅमर असलेल्या आयुष्यातील चिरतरुण प्रेमाचं कायमचं अस्तित्व माझ्या मते धर्मेंद्र अन् हेमामालिनी यांनी आजतागायत जपलेलं आहे. इतर बरेचजण चकाकी लाभलेल्या आयुष्यात प्रेमाच्या बाबतीत होरपळत राहिले अन् त्यातच काहींचा करुण अंत झाला.


गुरुदत्त साहेब यांनी खूप भावपूर्ण व्यक्त केलं आहे, कदाचित ती त्यांची व्यथा देखील असेल, जे कागज के फूल या चित्रपटात आहे...


" देखी जमानेकी यारी ,

बिछडे सभी बारी बारी ,

मतलबकी दुनिया सारी ,

बिछडे सभी बारी बारी "


" वक्त ने किया क्या हसी सितम

तुम रहे ना तुम, हम रहे ना हम


असो आज गुरुदत्त साहेब यांचा जन्मदिन आहे.

( जन्मदिन - ९/७/१९२५ )

त्यानिमित्त या संवेदनशील मनाच्या कलाकाराला माझ्याकडुन विनम्र अभिवादन..!🌹🙏🏻


वंदे मातरम्..!


एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक -९/७/२०२३, रविवार

रविवार, २ जुलै, २०२३

लक्ष्मी आईचा आषाढ निवद..!


 


आमचे गाव आमची माणसं.©️


लक्ष्मी आईचा आषाढ निवद..!


==================================


कुणी आमची टिंगलटवाळी करा, आमच्या आई वरून हेटाळणी करा,पण आम्ही आमच्या आईला , आमच्या परंपरागत श्रद्धेने आई लक्ष्मीला पुजणार..! आषाढ महिना आला की, आमच्या सारख्या कित्येक भक्तांना ओढ लागते ती आषाढ महिन्यातील आईला  द्यावयाच्या निवदाची..! यालाच थोडेफार शिक्षण घेतले की, ' नैवेद्य ' असेही म्हणतात.आषाढ महिन्यातील कोणत्याही एका दिवशी किंवा ज्यांना वेळ अन् सवड असेल  त्यांनी शुक्रवारी किंवा मंगळवारी लक्ष्मी आईला निवद दाखवण्याची आमची रीत आहे.


पालखेड येथे बालपणी आमच्या घरी माझ्या स्व.आईने आषाढ महिन्यात लक्ष्मी आईला निवद केला की, तो निवद लक्ष्मी आईला श्रद्धेने न्यायची जबाबदारी माझीच असायची. जर मी उपलब्ध नसेल तर माझी आई स्वतः घेऊन जायचीच..! आमच्या पालखेड गावाच्या पूर्व दिशेला जळगाव अन्  काटे पिंपळगाव कडे जे रस्ते जातात त्याच्या अगदी कोपऱ्यावर गावच्या लक्ष्मी आईचे देऊळ आहे. पत्र्याचे वरून आच्छादन अन् बाजूच्या भिंती असे एकंदरीत त्या देवळाचे बाह्य रूप..!आता कसे आहे माहीत नाही. आमच्या घरापासून लक्ष्मी आईचे देऊळ साधारणतः एक ते दीड किलोमीटर अंतरावर होते.माझ्या सोबत लक्ष्मी आईला श्रद्धेने  निवद न्यायला माझा खूप जिवलग बालमित्र स्व.आप्पा सूराशे , सोमनाथ गायकवाड , रमेश गायकवाड हमखास असायचे. गावातील नाटकाच्या ओट्या जवळून स्व .शाम शेळके आम्हाला येऊन मिळायचा.त्यावेळी स्व. शाम शेळके अन् माझ्यात मैत्री नव्हती.तो आमच्या सोबत यायचा तो गर्दीत इतरांना दमदाटी करायला.मुळातच शाम शेळके हा लई आचपळ होता, त्यामुळं त्याच्याकडे इतर बरीच अंगभूत कौशल्ये विकसित झालेले होते.


लक्ष्मी आईला निवद दाखवून झाला की, देवीच्या समोर जे निवद गावातील इतर भक्तांनी ठेवलेले असायचे, त्यापैकी भारी कोणकोणते याचा शोध आम्ही घायचो. भारी शोधलेले निवद हळूच बाजूला घायचो अन् त्यावर मस्तपैकी ताव मारायचो..!😋 तेंव्हा पासून मनात एक कायमची श्रद्धा निर्माण झाली अन् ती म्हणजे कोणत्याही देवाला / देवीला ज्यांनी कुणी शाकाहारी निवद , प्रसाद दाखवलेला असतो, तो आपल्यासाठीच आहे ही भावना घर करून बसली.आपणही देवाचे , देवीचे भक्त आहोत, मग देवाला दाखवलेला प्रसाद अथवा निवद यावर आपलाच पहिला हक्क ही भावना निर्माण झाली. अशीच कृती  आम्हा काही बालमित्रांकडून श्री. पारेश्वर महादेवाच्या मंदिरात व्हायची. जेंव्हा आमच्या घराच्या जवळच असलेल्या श्री.पारेश्र्वर महादेवाच्या देवळात उन्हाळ्यात गावातील काही भक्त मंडळी आंबे वहायचे.आम्ही काही बालमित्र टपूनच बसलेलो असायचो.गावातील एखाद्या भक्ताने महादेवाच्या पिंडीवर आंबा ठेवला की, आम्ही , तो किंवा ती किंवा ते भक्त कधी तिथून निघून जातात याची वाट बघत असायचो.एकदा का ते भक्त तिथून निघून गेले की, आळीपाळीने आंबे वाटून घ्यायचो. मस्तपैकी वेशीच्या बाहेर किंवा हनुमान मंदीरात बसून खायचो.


आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी समदे गाव लक्ष्मी आईच्या दर्शनाला गावच्या बाहेर निघत असे.आताही निघत असेल अशी आशा करुया. गावातील डफ वाजविणारे वादक मंडळी सर्वात पुढे असायचे. फारसे नीट आठवत नाही. आषाढ महिन्यात की इतर वेळी नक्की सांगता येणार नाही. बहुदा आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशीच आमच्या पालखेड गावातील शेळके पाटील घराण्यातील पाच जण गावातील नागरिकांच्या  सर्वात पुढे हातात शस्त्र घेऊन पंचप्यारे या पोषखात असायचे. दरवर्षी तो मान शेळके पाटील घराण्यातील पाच जणांना असायचा.


आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी समदे गाव लक्ष्मी आईच्या दर्शनाला गावच्या बाहेर लक्ष्मी आईच्या देवळाच्या परिसरात गोळा व्हायचे. तिथे आम्हा बऱ्याच मित्रांना आमचा प्रिय बालमित्र स्व.शाम शेळके अन् त्याच्या सोबत्यांचा धाक वाटायचा.धाक वाटायचे कारण असे की, शाम शेळके अन् त्याचे काही मित्र कोणती तरी एका वनस्पतींची पाने हातात लपून आणायचे. त्या वनस्पतीला आम्ही ' आग्या वनस्पती ' असे म्हणत असे.शाम शेळके अन् त्याचे काही मित्र इतर काही मुलांच्या शरीराला ती आग्या वनस्पती चोळून द्यायचे.ती  आग्या वनस्पती एकदा का शरीराला चोळली की, जिथं चोळली तिथं खूप अंगार, आग व्हायची. यामुळे आम्ही काही अहिंसा परमो धर्म मानणारे मित्र, शाम शेळके अन् त्याच्या मित्रांपासून जरा लांब लांबच असायचो.


आता काळ बदलला. आधुनिकतेचे सर्वदूर वादळ वाहू लागले आहे.मात्र मी अन् माझे काही बालमित्र अजूनही त्याच गतकाळातील आठवणी अन् आईच्या श्रद्धा  जपत आमचं आयुष्य व्यतीत करत आहोत. शेवटी श्रद्धा तरी काय असते..? माझ्या मते ज्यामुळे आपलं मन आनंदी अन् हृदयात आत्मानंद निर्माण होतो ती कृती म्हणजे श्रद्धा..! जशी की आम्ही आजही आजच्या या धकाधकीच्या जीवनात, आधुनिकतेच्या वादळी आयुष्यात आषाढात लक्ष्मी आईला निवद दाखवण्याची श्रद्धा कृतीतून बाळगून आहोत.


ता.क. - आज आम्ही सह परिवार छत्रपती संभाजीनगर येथे लक्ष्मी आईच्या देवळात निवद आईला अर्पण केला. तो निवद तिथं उपस्थित असलेल्या एका गरजवंत महिलेने अन् तिच्या लेकरांनी आम्ही काहीसे दूर झाल्यानंतर घेतला.आईच्या अन् तिच्या लेकरांच्या मुखी निवद गेल्याचे खूप आत्मिक समाधान लाभले..! बालपण अन् बालपणीचे मित्र यांची प्रकर्षाने आठवण आली.


असो, सर्व भक्तांना आषाढ महिन्यातील लक्ष्मी आईच्या पूजनाच्या श्रद्धेय शुभेच्छा..!


लक्ष्मी आई की जय..!

वंदे मातरम्


 नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २ जुलै २०२३, रविवार, ( आषाढ ) शुभ संध्या.