शनिवार, २५ जून, २०२२

मुंगी उडाली आकाशी

 


चिंतन ©️


" मुंगी उडाली आकाशी..! "


=============================


माझ्या बालपणी अन् माध्यमिक शाळेतील वयोगटात असताना पालखेड येथे श्री.पारेश्वर महादेवाच्या मंदिरात असणाऱ्या ध्वनिक्षेपकावर नेहमी ' मुंगी उडाली आकाशी ' हे शीर्षक असलेली कथा ऐकायचो.त्या कथेचा मुख्य आधार वारकरी पंथाचे संस्थापक ज्ञानेश्वर माऊली अन् त्यांच्या संपूर्ण आयुष्याभोवती ती कथा गुंफलेली असायची. एकपात्री प्रयोग अन् त्याद्वारे एकच कलाकार ज्ञानेश्वर माऊली अन् त्यांच्या संपूर्ण कुटुंबातील सर्व व्यक्तिरेखांचा आवाज काढून अतिशय सुश्राव्य ,मधुर आवाजात कथा सादर करायचे. एवढं सुश्राव्य एकपात्री कथन माझ्या तरी आयुष्यात अद्याप पर्यंत ऐकण्यात आलेलं नाही.


निवृत्ती ,ज्ञानेश्वर माऊली, सोपान मुक्ताबाई, त्यांचे आई, वडील रुख्मिणी माता , विठ्ठलपंत, इत्यादी सर्वांचे आवाज एकाच व्यक्तीने काढले होते. मुंगी उडाली आकाशी ही कथा सुरू झाली की, आमच्या गल्लीतील बरेच माणसं आपापल्या घराच्या समोरील ओट्यावर सतरंजी अंथरूण निवांत बसून ध्वनिक्षेपकावर सुरू असलेली मुंगी उडाली आकाशी ही कथा मोठ्या श्रद्धेने एकायचे.


पद्माकर गोवईकर यांनी आपल्या सुमधुर आवाजात एकपात्री प्रयोगातून मुंगी उडाली आकाशी चे वाचन केले आहे. पद्माकर गोवईकर या एकाच व्यक्तीने कथेची पार्श्वभूमी, त्या कथेतील विविध पात्रांचे अगदी चपखल आवाजात विविध संवाद खूपच छान प्रकारे सादर केले आहे.एवढं दर्जेदार अन् सुमधुर आवाजातील सादरीकरण एकपात्री प्रयोगात अद्याप पर्यंत तरी कुणीही सादर केलेले नाही असे मला वाटते.


माझ्या बालपणी मुंगी उडाली आकाशी ही कथा सुरू झाली की, मी विशेषतः त्यावेळी गहिवरून जायचो, ज्यावेळी विठ्ठलपंत अन् रुख्मिणी माता देहांत प्रायश्चितची शिक्षा भोगण्यासाठी घराच्या बाहेर पडणार त्यावेळी. विठ्ठलपंत अन् रुख्मिणी माता आपल्या झोपलेल्या लाडक्या लेकरांच्या जवळ येतात.त्यांना आपल्या लेकरांचा निरोप घेतांना अतिशय गहिवरून येते.त्यावेळी, त्या प्रसंगात विठ्ठलपंत आणि रुख्मिणी माता यांनी केलेला संवाद ऐकून आमच्या गल्लीत ओट्यावर बसलेल्या कित्येकांचे डोळे ओले व्हायचे. मुंगी उडाली आकाशी चे कथन आमच्या पालखेड येथील गल्लीतील दररोज ऐकण्यात प्रामुख्याने माझी स्व. आजी, स्व.आई, आमचे शेजारी स्व. मुलमूले मामी ( या माझ्या आजीच्या वयाच्या होत्या,पण कौटुंबिक स्नेहामूळे आम्ही सर्वजण त्यांना ' मामी ' या मायाळू नावाने उल्लेखित करायचो.), जैन, गायकवाड कुटुंबात काही वयोवृद्ध माणसं इत्यादी मुंगी उडाली आकाशी चे कथन मोठ्या श्रद्धेने ऐकायचे.


माझ्या बालपणी पालखेड येथे मुंगी उडाली आकाशी चे कथन ऐकलं अन् आयुष्यात संवेदनशीलता कायमची रुजल्या गेली. याचं निमित्त संत ज्ञानेश्वर माऊली यांचं भावूकतेने ओतप्रोत भरलेले आयुष्य अन् त्याला ज्या निस्सीम श्रद्धेने पद्माकर गोवईकर यांनी मुंगी उडाली आकाशी च्या माध्यमातून सादर केले हे निमित्त ठरले..!


आज मुंगी उडाली आकाशी या श्रद्धेय कथन कथेची आठवण यायचं कारण म्हणजे ,आज ज्ञानेश्वर माऊली यांचे ज्येष्ठ बंधू संत निवृत्तीनाथ यांची पुण्यतिथी आहे.त्यानिमित्त संत निवृत्तीनाथ महाराज यांना श्रध्येय विनम्र अभिवादन..!🙏🏻


ता.क. - पद्माकर गोवईकर यांनी आपल्या सुमधुर आवाजात एकपात्री प्रयोगातून ज्या मुंगी उडाली आकाशी चे वाचन केले आहे, तिची व्हिडिओ लिंक -


https://youtu.be/VFiVSltZ6ww


जय हरी माऊली..!

वंदे मातरम्..!

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक -२५/६/२०२२, शनिवार.

बुधवार, २२ जून, २०२२

" ईश्वराचा अधिवास असलेला प्रसंग..!"

ईश्वराचा अधिवास असलेला प्रसंग..!




 

मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


" ईश्वराचा अधिवास असलेला प्रसंग..!"


===================================


आज दिनांक २२ जून २०२२ , बुधवार रोजी जि.प.प्रशाला अंधारी येथील शाळा सुटायची वेळ झाली होती. माझ्या वर्गातील सर्व विद्यार्थी आपापल्या वस्तूंची आवरासावर करत होते. शेतात राहणाऱ्या विद्यार्थांची संख्या जास्त असल्याने अन् ढगाळ वातावरणामुळे विद्यार्थी घाईत निघण्याच्या तयारीत होते. 


शाळा सुटल्याची घंटी वाजली अन् सर्व मुले पटपट वर्गाच्या बाहेर पडली.नेहमी प्रमाणे सर्वात शेवटी माझ्या सोबत सदरील फोटोत दिसणारे प्रिय विद्यार्थी अजित तायडे ( माझ्या डाव्या बाजूला असलेला) अन् आदित्य जाधव ( सर्वात कडेला उभा असलेला) नेहमी प्रमाणे आम्ही सर्वात शेवटी राहिलो होतो.इतक्यात वर्गातील चिमणीच्या   घरट्यातून एक चिमणीचे पिल्लू खाली आले होते.त्याला अजुन चांगले धड उडता येत नव्हते.ते अजुन नाजूक अवस्थेत होते. वर्गात इकडून तिकडे ते पिल्लू फक्त उड्या मारू लागले होते.


या फोटोत माझ्या अगदी जवळ डाव्या बाजूला उभा असलेला प्रिय विद्यार्थी अजित तायडे जो की, शेतात राहतो त्याने ते पिल्लू पाहिले.मला तो म्हणाला -

" सर, या चिमणीच्या पिल्लाला आपण त्याच्या घरट्यात पुन्हा ठेवून देऊ..! जर हे पिल्लू असेच खाली फरशीवर राहिले ना,तर याला मांजर खाऊन टाकील..!"

मी अजित मधील असणाऱ्या या निरागस अन् भूतदया वर निस्सीम प्रेम करणाऱ्या वृत्ती समोर मनोमन नतमस्तक झालो होतो.अखेर मी, अजितने अन् सर्वात कडेला उभा असलेला प्रिय विद्यार्थी आदित्य जाधवने वर्गातील डेस्क घरट्याच्या खाली फरशीवर आणला. मी देखील त्या इवल्याश्या पिल्लाला त्याच्या घरट्यात ठेवू शकत होतो,पण ज्याच्या हृदयातून ही अतिशय निर्मळ भावना निर्माण झाली होती त्याच्याच शुभहस्ते एका निरागस जीवाला त्याच्या घरात सुखरूप पोहोचविणे मला जास्त महत्वाचे वाटले. त्याचे कारण ज्याच्या हृदयातून अशी कोणतीही अतिशय निर्मळ भावना निर्माण होते त्याच्या हस्ते जर अशाच इतर कोणत्याही सत्कर्माला जर केले तर त्याने संबंधिताला सर्वात मोठे मानसिक समाधान लाभते असे माझे मत आहे.  मानसिक समाधान हीच सर्वोत्तम संपत्ती असते, एखाद्या निस्वार्थ भावनेने पवित्र कार्य करणाऱ्या मनाला अजुन प्रफुल्लित करण्यासाठी..!  


अजितने त्या इवल्याशा पिल्लाला अपल्या हातात अलगदपणे उचलले अन् पुन्हा त्याच्या घरट्यात सुखरूपपणे ठेवून दिले. त्या निरागस जीवाला त्याच्या घरट्यात पुन्हा सुखरूप ठेवल्यावर अजितच्या मुखातून सहजपणे देवाचा शब्दोच्चार आला..!कुणीही, कोणतेही पवित्र कार्य केले की ,त्याच्या मुखातून आपोआप आपापल्या श्रद्धेयांचा उच्चार होतो, याचा मला अनपेक्षितपणे  साक्षात्कार झाला होता.


सगळी मुले जवळजवळ  शाळेच्या बाहेर पडली होती.मी , अजित अन् आदित्य आम्ही तिघे जिना उतरून खाली आलो.येताना मी प्रिय अजितच्या खांद्यावर मायेनं हात ठेवला अन् त्याला म्हणालो..

" बेटा, अजित, तुला तुझ्या आजच्या या अतिशय चांगल्या कृतीबद्दल उद्या मी काहीतरी बक्षीस देईल बरं का...!"

यावर अजित त्याच्या हसऱ्या मुखाने माझ्याकडे बघत म्हणाला..

" नका हो सर..! आपलं कामच आहे , एखाद्याला जीव लावणे..!"

त्याच्या या साध्या वाक्यात खूप मोठा अर्थ होता ,पण त्याने ते वाक्य त्याच्या निरागस वृत्तीतून सहजपणे उच्चारले होते.निरागस मनाची माणसं ही अशीच असतात.अशी माणसं सहज काहीतरी खूप चांगलं वागतात,बोलतात,पण त्यांच्या त्या वागण्यात अन् बोलण्यात त्यावेळी ईश्वराचा अधिवास वास्तव्याला आलेला असतो. ईश्वराचा अधिवास असलेला प्रसंग मी प्रत्यक्ष आज अनुभला होता. तेही नेमक्या आजच्या दिवशी, ज्या दिवसामुळे आज मला या अशा अनेक निरागस जीवांच्या पवित्र सहवासात माझे आयुष्य व्यतीत करण्याचे भाग्य लाभले आहे..!


अतिशय चुणचुणीत , नम्र , समाधिटपणा असलेला अन् बोलक्या स्वभावाचा हा अजित तायडे माझ्या शिक्षकी आयुष्याच्या प्रवासात भेटलेला खूप मोजक्या प्रेमळ विद्यार्थ्यांपैकी एक आहे..! प्रिय अजित , तू सदैव माझ्या हृदयाच्या हळुवार कोपऱ्यात चिरंजीव असशील..! अजित बेटा, तुझ्यात आज मला  त्या ईश्वराचा अधिवास जाणवला, ज्याला माणूस आपापल्या परीने उल्लेखित करतो..! आज मी त्याला ' अजित तायडे ' या पवित्र नावाने उल्लेखित केले अन् करत राहील..!


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २२ जून २०२२, बुधवार.


गुरुवार, ९ जून, २०२२

निरागस, उमेश


 

मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


" निरागस आहात..! "


=======================


माझ्या आज पर्यंतच्या सत्तावीस वर्षाच्या शिक्षकी आयुष्यात खूपच मोजके असे प्रिय विद्यार्थी आयुष्यात आले जे , की अतिशय विश्वासू लाभले.त्यात अतिशय आवडता विद्यार्थी चि. उमेश पाटील शिंदे ( माझ्या उजव्या हाताच्या बाजूला उभा असलेला ) हा नक्कीच शीर्ष यादीत राहील..!


कोणत्या विद्यार्थ्याने किती शैक्षणिक अर्हता प्राप्त केली अन् तो त्या आधारे कोणत्या हुद्द्यावर आहे याला मी माझ्या शिक्षकी आयुष्यात अजिबात महत्त्व दिले नाही अन् निवृत्त होई पर्यंत देणारही नाही.


माझ्या विद्यार्थ्यांत आपलेपणा किती आहे, तो विघातक वैचारिक बैठकीत तर नाही ना..? हृदयातून आत्मीयता किती आहे, निरागसता, निर्व्यसनी वृत्ती जपतो की नाही, इत्यादी गुणांच्या आधारे असे मोजके विद्यार्थी कायमचे हृदयात स्थान मिळवून आहेत.त्यात जि.प.प्रा.शा.एकलहेरा, ता.गंगापूर,जि. औरंगाबाद येथील हा अतिशय विश्वासू अन् प्रेमळ विद्यार्थी चि. उमेश पाटील शिंदे अन् महेश दादासाहेब पाटील औसरमल..!


मी अन् माझे जिवलग मित्र प्रिय नंदलाल सलामपुरे सर ( माझ्या डाव्या हाताच्या बाजूला उभे असलेले ) काल दिनांक ८ जून २०२२, बुधवार रोजी चि.उमेश व कुटुंबीयांनी बांधलेल्या नवीन वास्तूच्या वास्तुशांती प्रीत्यर्थ एकलहेरा येथे उपस्थित होतो. उमेश याने हृदयातून दिलेलं खूप खूप आग्रहाचे निमंत्रण टाळता येणे शक्य नव्हते. भेटी समयी तोच नम्रपणा जाणवला जो प्राथमिक शाळेतील वयोगटात असताना होता.निरागसता ही कोणत्याही माणसाची प्रेमळ असण्याची निशाणी असते,जी उमेश मध्ये आजही जाणवली. कृत्रिम निरागसता अन् उपजत निरागसता ही ईश्वरीय देणगी असते .जी ईश्वरीय देणगी उमेश यास लाभलेली आहे.उमेश याचा शाळेत असताना खूप शांत, संयमी, अतिशय नम्र, सालस स्वभाव होता.काळाच्या ओघात समवयस्क मित्रात प्रत्येकाचा वैयक्तिक स्वभाव असतो अन् ज्यानं त्यानं तो खेळकर, मौजमस्ती करणारा स्वभाव नक्कीच जपायला हवा. तो खेळकर, मौजमस्ती करणारा स्वभाव मी स्वतः माझ्या जिवलग मित्रांच्या सहवासात व्यतीत करत असतो.पण जेंव्हा शिक्षक भेटतात तेंव्हा जर कुणी वरील उल्लेखित चांगल्या मूल्यांना शिक्षकाच्या समोर व्यक्त करत असेल तर मला तरी वाटते की, आपण आपल्या विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले होते त्याचं नक्कीच सार्थक झालं..!एकलहेरा येथे चि. महेश दादासाहेब पाटील औसरमल अन् चि. उमेश शिंदे त्या यादीत नक्कीच आहेत. याचा अर्थ असा नाही की,ज्या विद्यार्थ्यांचा मी उल्लेख केला नाही, म्हणजे ते चांगले नाहीत. ते सर्व आजी अन् माजी विद्यार्थी नक्कीच खूप चांगले आहेत.


कोणत्याही माणसाच्या आयुष्याला त्याच्या प्रगतीच्या आयुष्याचे ग्लॅमर चिकटले की, त्याच्यातील भूतकाळ मरत जातो. अशी माणसं सतत एकाच तोऱ्यात वावरणारे असतात अन् आपला भूतकाळ विसरून आपलं भंपक ग्लॅमर असलेलं आयुष्य व्यतीत करत असतात.मात्र याच ग्लॅमर असलेल्या आयुष्याला जो भूतकाळ कधीतरी भेटलेला असतो, तो भूतकाळ ज्याने आपल्या जाणीवा जागृत ठेवून जिवंत ठेवला तोच माणसाच्या संस्कृतीचे वहन करत असतो असे माझे वैयक्तिक मत आहे. प्रिय विद्यार्थी उमेश अन् महेश याच माणसांच्या संस्कृतीचे वहन करणारे खूप आवडते विद्यार्थी नक्कीच आहेत. उमेश बेटा तू जसा विद्यार्थी दशेत होतास, आजही तसाच आहेस हे कृतीतून बघून मन सुखावून जाते.


महेश दादासाहेब पाटील औसरमल ( सदरील छायाचित्रात माझ्या डाव्या हाताच्या बाजूला सर्वात कडेला उभा असलेला ) या ज्या प्रिय विद्यार्थ्याचा उल्लेख मी केला आहे, त्याचे वडील आदरणीय दादासाहेब पाटील औसरमल हे व्यक्तिमत्व म्हणजे हृदयातून खूप माणुसकी असलेले व्यक्तिमत्व सतत जाणवत होते,आहे अन् राहील.तो वडिलांचा वारसा चि.महेश यात आहे. 


माझ्या आज पर्यंतच्या शिक्षकी आयुष्यातील प्रवासात काही विद्यार्थांच्या बाबतीत स्वतः पेक्षा खूप जास्त विश्वास जाणवतो त्यात हे विद्यार्थी नक्कीच आहेत. चि. उमेश शिंदे हा सध्या वाळूज एमआयडीसी औरंगाबाद मध्ये लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून कार्यरत आहे अन् चि.महेश हा कृषी पदविका चे शिक्षण घेत आहे.


असो, प्रिय विद्यार्थी उमेश बेटा अन् महेश बेटा जसे आहात तसेच रहा, अतिशय निर्मळ मनाचे..! राहणारच, कारण तुमच्यात मला माझा अतिशय विश्वासू विद्यार्थी गणेश नानासाहेब पाटील गाजरे दिसतो..!


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ९ जून २०२२, गुरुवार.

बुधवार, ८ जून, २०२२

इथेही नशिबी भटकंतीच आली..! "


 

मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


" इथेही नशिबी भटकंतीच आली..! "


====================================


आमच्या पालखेड गावात भल्या पहाटे फिरायला जायची सुरुवात मी अन् माझा जिवलग बालमित्र भानू मामा जगदाळे आम्हीच केली. आम्ही दोघं अगदी नव्वदच्या दशकात पालखेड येथील परसराम पा.रोठे यांच्या शेताच्या कडेला असणाऱ्या हाळाच्या बाजूला सिमेंट जागेवर जशा जमेल तशा शारीरिक हालचाली करत असायचो. काळाच्या ओघात तो पाण्याचा हाळही तुटला अन् तिथली चिकनी चोपडी जागाही खराब झाली. त्यामुळं आमचा सकाळचा दिनक्रम भटकंती अवस्थेत गावाच्या बाहेर सपाट जागा शोधत शोधतच राहिला.


कालांतराने मी लासूर स्टेशन येथे वास्तव्यास आलो. मी भल्या सकाळच्या दिनचर्यासाठी निवांत जागा शोधत होतो.अखेर लासूर स्टेशन ते लासूरगाव रस्त्याच्या लगत आदरणीय मांगीलाल शेठ यांचा बंद अवस्थेत असलेल्या बर्फाच्या लाद्या तयार करण्याची खोली समोरचा ओटा माझ्या नजरेत आला. त्या जागेचा वापर कित्येक दिवसांपासून बंद होता. सुरुवातीला ओट्यावर खूप घाण होती,तरीही एवढी निवांत जागा दुसरी नसल्याने हीच जागा योग्य म्हणून निवडली. सुरुवातीला मी एकटाच तिथं जशा जमेल तशा काही शारीरिक हालचाली करत असायचो.याच ओट्यावर माझी तारांबळ उडायची ती ऐन नवरात्रीच्या काळात..! लासूर स्टेशन येथील भाविक , नऊ दिवस भल्या पहाटे दररोज आई दाक्षायाणी मातेच्या दर्शनासाठी जायचे.मात्र त्यातील काही तरणाबांड मुलं,मी ज्या ओट्यावर जशा जमेल तशा शारीरिक हालचाली करायचो, त्या ओट्याची जागा बळकावून तिथं गप्पा करत बसलेली असत..! बरं ती मुलं तरणाबांड असल्याने त्यांना काही म्हणायचे काम नव्हते..!😊


हळूहळू त्याच लासूरगाव रस्त्याच्या लगत आदरणीय मांगीलाल शेठ यांच्या बंद पडलेल्या बर्फाच्या छोट्या कारखान्याच्या ओट्यावर काहीजण येऊ लागले.ओट्याच्या जागेच्या मानाने कसरतपटूंची संख्या वाढल्याने तिथं कसरतपटूंची ट्रॅफिक जाम होऊ लागली. अखेर मी ही सुध्दा जागा बदलण्याचा निर्णय घेतला.


मग आमच्या घराच्या पाठीमागे रेल्वेचे फाटक होते. त्यावेळी ते रेल्वे फाटक फक्त दिवसा सुरू असायचे. त्यामुळे तिथल्या छोट्याश्या खोली समोरील जागेत निवांत जागा मिळाली. काळाच्या ओघात सदरील रेल्वे फाटकावर दिवसरात्र पाळीसाठी रेल्वे विभागाने त्यांचे कर्मचारी नेमले. त्यामुळं तिथं सकाळी निवांतपणा अन् जागा राहिली नाही अन् अखेर तिथूनही काढता पाय घेतला.


दुसऱ्या शांत परिसराच्या शोधात असताना आमच्या लासूर स्टेशन येथील घराच्या मागे रेल्वे मार्गाच्या पलीकडे आदरणीय संपत शेठ छाजेड यांच्या जागेवर कांदा मार्केट सुरू झाले होते.तिथं फारशी वर्दळ नसायची.अगदी सकाळी तिथल्या सिमेंट काँक्रिट रस्त्यावर मी एकटाच जसा जमेल तश्या शारीरिक हालचाली करायचो.काळाच्या ओघात कांदा मार्केट असल्याने तिथंही येणाऱ्या जाणाऱ्या विविध वाहनांची, माणसांची वर्दळ वाढली अन् अखेर तिथूनही हात , पाय अन् अख्खं शरीर काढतं घ्यावे लागले.


आता लासूर स्टेशन येथे दुसरी जागा शोधण्याच्या प्रयत्नात असतानाच माझी बदली झाली अन् मला माझे बिऱ्हाड लासूर स्टेशन येथून औरंगाबाद येथे हलवावे लागले.आता पुन्हा सकाळच्या उपक्रमासाठी जागेचा शोध सुरू केला अन् जागा मिळाली ती नुकत्याच तयार होत असलेल्या धुळे - सोलापूर महामार्गाच्या आजूबाजूला सुरू असणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या निवांत जागेवर..! काळाच्या ओघात धुळे - सोलापूर महामार्ग पूर्ण झाला अन् वाहनांची खूप मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली अन् अखेर तिथूनही हात , पाय अन् अख्खं शरीर काढतं घ्यावे लागले.


मग पुन्हा नवीन निवांत जागेचा शोध सुरू केला,पण निवांत जागा काही सापडत नव्हती. कोणत्याही रस्त्याच्या कडेला जशा जमेल तशा शारीरिक हालचाली सुरूच होत्या,पण निवांतपणा मिळत नव्हता.


अखेर धुळे - सोलापूर महामार्गाच्या बाजूला काही धनाढ्य माणसांनी आपले भूखंड आरक्षित केलेले दिसले.त्या आरक्षित भूखंडाच्या परिसरात डांबरी रस्ता तयार केला होता.तिथं सध्यातरी कुणाचीही वसाहत नसल्याने मला जो अपेक्षित निवांतपणा हवा होता तो इथे सापडला होता. अखेर सकाळच्या शारीरिक हालचाली करणाऱ्या एका भटक्याची भटकंती आता कुठे थांबली आहे.पण मनात पुन्हा तीच धाकधूक आहे की, पुन्हा कधीतरी सकाळच्या शारीरिक हालचाली करणाऱ्या माझ्यासारख्या भटक्याच्या नशिबी पुन्हा कधीतरी भटकंती येणारच आहे,कारण पुन्हा इथे सजीवांची अन् निर्जीवांची वर्दळ वाढणार..! आमच्या सारख्या कित्येक भटक्यांना अजूनही त्यांच्या नशिबी भटकंती असणारच आहे..!


ता.क. - सदरील छायाचित्र औरंगाबाद येथील धुळे - सोलापूर महामार्गाच्या बाजूला काही धनाढ्य माणसांनी आपले भूखंड आरक्षित केलेले आहेत, त्या सध्यातरी असणाऱ्या निवांत जागेवरील आहे..! 🙏🏻


वंदे मातरम्..!


एक भटका प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ९ जून २०२२, गुरुवार.

मंगळवार, ७ जून, २०२२

' विक्रम '


 

चिंतन ©️


' विक्रम..!'


==============================


ग्रेट विजय सेतुपती, ग्रेट कमल हसन अन् ग्रेट फहाद फासिल..! या तीन दाढ्या,विक्रमी आहेत,आपापल्या अभिनय क्षेत्रात. या तीन दाढ्यांनी असा काही अप्रतिम अभिनय केला आहे की, अभिनयाचा विक्रमच झाला आहे असे वाटू लागते.


नुकताच प्रदर्शित झालेला विक्रम हा मूळचा तमिळ चित्रपट हिंदीत डब केलेला चित्रपट औरंगाबाद येथील चित्रपटगृहात बघितला. आदरणीय कमल हसन सर अन् प्रिय फहाद फासिल यांच्या अभिनयाचा मी निस्सीम चाहता असल्याने कधी विक्रम चित्रपट प्रदर्शित होतो अन् कधी बघतो असे झाले होते.अखेर काही दिवसापूर्वी विक्रम चित्रपट पाहिला अन् कमल हसन सर का खूप ग्रेट आहेत याची पुन्हा एकदा खात्री पटली. आपल्या अभिनयाचे वेगवेगळे प्रयोग आपल्या विविध चित्रपटातून अप्रतिमरित्या सादर करणारे आदरणीय कमल हसन सर हे संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीतील अढळ ध्रुव तारा आहेत यात तिळमात्र शंका नाही.


थोडक्यात चित्रपटाची कथा पुढीलप्रमाणे - विक्रम चित्रपट सुरू होतो तो कमल हसन यांच्या हत्येने.ती हत्या कोण करतं अन् का करतं याचा उलगडा जसजसा चित्रपट पुढे सरकत जातो तसतसा होत जातो. उत्कंठा शिगेला पोहचत फहाद फासिल या तपास अधिकाऱ्याचा प्रवेश होतो.अनेक गुंतागुंत वाढत जाते अन् यात ड्रग माफिया विजय सेतूपती यांचा अतिशय क्रूरपणे प्रवेश होतो. चित्रपटाची कथा यायेक्षा जास्त स्पष्ट करून सांगत नाही,कारण ज्यांनी  अद्याप हा चित्रपट बघितला नाही, त्यांची उत्सुकता संपून जाईल.


विक्रम चित्रपटात कमल हसन सरांनी खूप छान अभिनय केला आहे. कमल हसन सर यांनी या चित्रपटात कमी संवाद व्यक्त केले आहेत,पण आपल्या देहबोलीतून अन् मुद्राभिनयातून सर्वोत्तम अदाकारी सादर केली आहे. कमल हसन सरांना याबद्दल खरचं दाद द्यायला हवी. एका आजोबाचा आपल्या नातवात असलेला जीव कमल हसन सरांनी आपल्या सर्वोत्तम अभिनयातून खूपच छान उभा केला आहे. विशेषकरून आपल्या नातवाला अंगावर झोपविणे, त्याला गरम केलेले दूध पाजणे..! सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेले आदरणीय कमल हसन सर या चित्रपटात ज्या पद्धतीने स्टंट करतात, ते पाहून हा माणूस अजूनही किती लवचिक आहे याची जाणीव होते.कमल हसन सरांच्या सारखा एवढा मोठा कलाकार या चित्रपटात असूनही हा चित्रपट फक्त त्यांच्यासाठी नाही याची जाणीव होते.


फहाद  फसिल हा नट, स्व.इरफान खान यांच्या सक्षम अभिनयाचा भक्कम वारसदार आहे याची पदोपदी जाणीव होते.शांत ,संयमी भाषेत आपला अभिनय करणे ही स्व.इरफान खान यांची खासियत होती. तीच अभिनयाची नजाकत फहाद  फसिल यांच्या अभिनयात जाणवते. विक्रम चित्रपटात फहाद  फसिल यांनी सस्पेन्स निर्माण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका खूप छान रंगवली आहे.ज्यावेळी फहाद  फसिल यांच्या पत्नीचा खून होतो त्यावेळी त्यांनी केलेला अभिनय खूपच छान आहे..! 


विजय सेतूपती या भक्कम देहाच्या अभिनेत्याच्या अतिशय क्रूरपणे सादर केलेल्या अभिनयाला दाद द्यायला हवी.असा क्रूर खलनायक दक्षिण भारतातील चित्रपटात बऱ्याचदा बघायला मिळतो.तसाच विक्रम  याही चित्रपटात बघायला मिळतो.


विक्रम चित्रपट हा मध्यंतरानंतर खूप वेग पकडतो.एकेक गूढ उलगडत जाते.कमल हसन, फहाद  फसिल  हे खरे कोण आहेत, त्यांचे ध्येय काय असते याचा उलगडा चित्रपटाच्या मध्यंतरानंतर हळूहळू होत जातो. चित्रपटाच्या शेवटी ज्या पद्धतीने  मारधाड दाखवली आहे अन् त्यात ज्या पद्धतीने आदरणीय कमल हसन सर दाखवले आहेत ते एक चित्रपट रसिक म्हणून नक्कीच कमल हसन सरांचे कौतुक करावेसे वाटते.


कमल हसन  सरांच्या सारखे सर्वोत्तम अभिनेत्याचे चित्रपट प्रत्येक रसिक मनाने नक्कीच बघायला हवे,कारण हा माणूस अभिनयाच्या बाबतीत किती मोठ्या उंचीचा आहे हे त्यांच्या प्रत्येक चित्रपटात बघायला मिळते.जसे की ,विक्रम याही चित्रपटात बघायला मिळते.


असो, भारतीय सैन्य , गुप्तहेर हे आपल्या देशासाठी , देशाच्या भल्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, यांचं सर्वोत्तम सादरीकरण विक्रम या चित्रपटात सादर केले आहे असे मला वैयक्तिक वाटते.


पुनश्च एकदा आदरणीय कमल हसन सरांच्या अभिनयाला दंडवत..!🙏🏻 

फहाद  फसिल यांच्या अभिनयात लपलेल्या  स्व.इमरान खान यांच्या अभिनयाला मनापासून दाद..!👌🏼

अन् विजय सेतूपती या अभिनेत्याच्या सहज सुंदर अभिनयाला देखील मनापासून दाद..!👌🏼


आणि सर्वोत्तम दाद, दक्षिण भारतातील चित्रपट टीमवर्कला 🙏🏻🌹


वंदे मातरम्


एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ७ जून २०२२, मंगळवार.