सोमवार, २३ डिसेंबर, २०१९

" मानवी नात्याला फुटलेला, टहाळ प्रेमाचा..! "






मला प्रवासात भेटलेली माणसं..!

" मानवी नात्याला फुटलेला, टहाळ प्रेमाचा..! "

==================================

मी काल शनिवारी‌ दिनांक २२ डिसेंबर रोजी दुपारी शाळेतून आल्यावर जेवण झाल्यावर काहीतरी वाचत अन् पाहत बसलो होतो.माझ्या पत्नीने मला विचारले की,
" आपण ,लासूर स्टेशन येथे राहत असताना ,दरवर्षी  बबन हरभऱ्याचा टहाळ घेऊन यायचाच...!
माझ्या पत्नीच्या या वाक्याने मलाही आज बबन अन् त्याच्या दरवर्षी दिल्या जाणाऱ्या टहाळाची लगेच आठवण आली..अन् त्या माझ्या प्रिय मुलाची देखील प्रकर्षाने आठवण आली..!
मी माझ्या पत्नीला म्हणालो..
" अगं,आता आपण दूर औरंगाबादला राहतो..आता कसं शक्य आहे ते..! आणि नयन ला टहाळ आवडतो तर घेऊन टाक विकत..! विकणारे येतातच  की..! पण आज नेमकी कशी काय आठवण आली..?"
माझी पत्नी - " अहो,आज सकाळी हरभऱ्याचा टहाळ विकणारा आला होता..म्हणून बबनच्या दरवर्षीच्या भेटीची आठवण आली..!"
या नंतर मी माझ्या कामात मग्न झालो.थोड्या वेळानं माझा मोबाईल खणखणला.. त्यावर नाव  दिसत होते
" Hajare Baban " अन् वेळ होती..संध्याकाळी ५:२७ ची...!
मी आलेला कॉल घेतला अन् तिकडून मोठ्याने आवाज येऊ लागला...
" सर,तुम्ही घरीच आहात का..?"
मी- " अरे,बबन...! मी घरीच आहे भाऊ...का...काय झालं..?"
बबन - " सर,मी दहा...पंधरा मिनिटात तुमच्या घरी येऊ राहिलो...घरीच थांबा..!"
मी - " बरंं बरं...तू हळू ये पण..!"

काही वेळाने बबन घरी आला.आल्या..आल्या त्याने हरभऱ्याचा भला मोठा टहाळ आणला होता.मी अन्  माझी पत्नी एकमेकाकडे विस्मयकारक नजरेने  पाहू लागलो होतो.ज्या बबन ची अन् त्याच्या दरवर्षीच्या प्रेमळ भेटीच्या टहाळाची आठवण आम्ही काही वेळा पूर्वीच काढली होती...तीच आठवण जिवंत स्वरूपात आमच्या समोर उभी होती. असं कसं काय होऊ शकते...? यावर मी खूप अंतर्मुख होऊन अंतर्मनात विचार करू लागलो होतो.मनाच्या संवेदना ,मनाच्या तारा जोडलेल्या मानवी मनांना अशा प्रकारे भेटत असतात यावर माझा विश्वास अधिक दृढ झाला होता.फक्त बोलणे हीच एकमेव भाषा असूच शकत नाही यावर मी ठाम झालो होतो.मानवी नात्याची अन् त्यातील मानवी मनाची अबोल असणारी पण मनातून एकमेकांना साद  देणारी भाषा जगात आजही अस्तित्वात आहे यावर माझा प्रचंड विश्वास बसला होता..!

आल्या...आल्या...बबन बबन मोठ्या आवाजात बोलू लागला..
( बबन जसा शाळेत असताना मोठ्याने बोलायचा तीच त्याची सवय आजही आहे)
" सर, इकडं औरंगाबाद ला काम होते..अन् जळगाव चे एक लग्नही होते. म्हणलं सरला टहाळ द्यावा...घ्या सर...!"
अस म्हणून त्याची दरवर्षीची प्रेमळ भेट पूर्ण होत होती.वास्तविक हा जो टहाळ होता तो जगाच्या दृष्टीने असलेल्या बाजारात फार काही महाग अजिबात नाही.पण बबन ने त्या देण्यामागील सातत्य व त्या मागील निरपेक्ष प्रेम भावना मला खूप स्वर्गीय आनंद देऊन जात होती.

बबन हजारे..!
माझ्या शिक्षकी आयुष्यातील माझ्या बऱ्याच गुणांना अगदी चपखलपणे अनुकरण करणारा विद्यार्थी..! तब्बल  २३ वर्षापूर्वी मी जेंव्हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगाव, केंद्र लासूरगाव ता.वैजापूर येथे शिक्षक म्हणून कार्यरत होतो..त्यावेळी तेथे अनेक रत्ने भेटली..मुलांच्या रूपातून ! त्यापैकीच हा एक बबन..!

प्रिय बबन,हा निव्वळ रांगडा गडी..! याला कशाचेही व्यसन अजिबात नाही.शाळेत असताना मी जेंव्हा मुलांची कब्बडी घ्यायचो तेंव्हा..हा पठ्ठ्या एकटा..तीन...चार जणांना सहजपणे ओढीत घेऊन यायचा..! प्रत्येक मैदानी स्पर्धेत हा अव्वल असायचा.सकाळी जेऊन खाऊन  आपल्या कामाला मोकळा असणारा बबन..! आपल्या कुटुंबावर खूप खूप प्रेम करणारा बबन..!हा लहान असताना मी नेहमी याला खूप खूप जवळून पाहिले आहे.हा याच्या घरातील सगळी कामे करायचा.आजीची खूप सेवा करायचा.कोणत्याही कामाची कधीच लाज बाळगली नाही. पडेल ती कामे याने केली. याने याच्या घरातील म्हाताऱ्या माणसांची अशी काही सेवा केली की ,मी याच्या त्या कार्यापुढे नतमस्तक होऊन जातो. मला जळगाव येथील शाळेत असताना जर काही घरून पालखेड येथून काही आणायचे असेल तर..हा गडी सायकलवर जाऊन येऊन २० ते २५ मिनिटात पुन्हा शाळेत हजर..! दोन्ही गावातील अंतर आहे अंदाजे ८ ते १० किलोमीटर..!याला नाही म्हंटले तरी हा म्हणायचा...
" सर,तुमचं जेवण होई पर्यंत आलोच..मी..!" खूप काटक तब्येतीचा..!कुठलेही आर्थिक पाठबळ नसताना,स्थावर मालमत्ता नसताना स्वतः च्या हिमतीवर , चिकाटीने,आज माझा हा प्रिय विद्यार्थी खूप सुखात आहे.

प्रिय विद्यार्थी बबन,याने जेंव्हा बालेवाडी,पुणे येथे एक उत्कृष्ट धावपटू म्हणून राज्यस्तरावरील बक्षीस प्राप्त केले होते, तेंव्हा तिथून आल्या आल्या,माझ्या लासुर् स्टेशन येथील घरी आवर्जून भेटायला आला होता. त्या भेटीच्या वेळी त्याला प्राप्त झालेले  बक्षीस पदकासह  मला खूप कौतुकाने दाखवत होता..! माझ्या शिक्षकी आयुष्याचा तो विजय दिवस साजरा करत होता असेच जाणवत होते..!

याच्या कष्टाचे फळ याला मिळाले..! आज हा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात नोकरी करतो.याच्यातील अंगभूत गुणांना याने तिथेही प्रदर्शित केले. महसूल कर्मचाऱ्यांच्या  स्पर्धेत बबन ने राज्य स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे..! बालेवाडी , पुणे येथे हा एक धावपटू म्हणून गेलेला आहे.ज्या..ज्यावेळी हा कुठे स्पर्धेत जातो....तिथून मला नक्की आठवणीने फोन करून माहिती देत असतो..खुशाली कळवत असतो.आपल्या मुलांवर केलेल्या प्रेमाची ती परतफेड असते..!

बबन ,हा आजच्या काळातील सर्व मुलांना एक आदर्श उदाहरण आहे..!
त्याची ही योग्यता त्याच्या वर्तनातून सतत जाणवत असते..! याने स्व कष्टातून जळगाव येथे टुमदार घर बांधलं..! त्याची गृहपुजा देखील केली नव्हती..पण याने पहिल्यांदा मला ते घर पाहण्यासाठी आवर्जून घेऊन गेला होता.त्यावेळी तो जे बोलला होता..ते माझ्या हृदयात कायमचे घर करून गेले आहे..! तो म्हणाला होता....
" सर,आम्ही तुमच्या संस्काराला कधीही विसरणार नाहीत.हे माझे घर तुमच्या आशिर्वादामुळेच झाले आहे.तुम्ही माझ्या घराला पाय लावले..माझ्या घराची वास्तुशांती झाली सर..!"

 कृपया कुणीही मी माझी आत्मस्तुती करतो वगैरे असे अजिबात समजू नये ही नम्र अपेक्षा..!
पण प्रिय बबन नैतिक दृष्ट्या किती परिपक्व झाला होता अन् आहे हे जगाला माहित व्हावे हा निर्मळ हेतू..!

बबन ला , प्रिय मित्र नितीन पगार सर व मी खूप जवळून पाहिले आहे..! आमच्या आवडत्या मुलांपैकी तो एक आहे..!

माझ्या लग्नात माझ्या माजी विद्यार्थ्यां पैकी सोपान वाल्हे  अन् बबन आवर्जून उपस्थित होता. वास्तविक माझ्याकडून त्याला लग्न पत्रिका देखील दिल्या गेली नव्हती.हे नाते असते अजिबात अहंकार नसलेले..! हे नाते असते..फक्त आणि फक्त श्रद्धा अन् प्रेम असलेले..!मी ज्या बबन ला त्याच्या लहानपणी खूप जीव लावला होता त्या जीवाच्या प्रेमाचा आता वृक्ष झाला होता.असा वृक्ष ज्या वृक्षाच्या सावलीत ,त्या वृक्षाला कोवळ्या वयात जोपासणारे आनंदाने विसावू शकत होते.म्हणून माझा माझ्या सर्व माजी अन्  आजी विद्यार्थ्यांच्या प्रेमावर खूप खूप विश्वास अन् प्रचंड श्रद्धा आहे..! कारण मुळातच स्वच्छ ,सुंदर प्रेमाचं नातं असलं की, त्याला मानवी नात्याची अतिशय सुगंधी फुलं येतातच यावर माझा ठाम विश्वास आहे..! काल ज्यावेळी बबन घरी आला होता त्यावेळी नमन ला मी म्हणालो..
" तू जर माझ्या या मुलाबरोबर शर्यतीत जिंकून दाखवले तर तुला जे हवं ते बक्षीस देईल..!"
यावर नमनने स्पष्ट नकार दिला...कारण त्यालाही मी या माझ्या मुलाचे,बबन चे कर्तृत्व सांगितलेले आहे..!

खूप खूप धन्यवाद बेटा बबन...!

ता.क.: विद्यार्थांना जीव लावलेल्या जीवाच्या झाडाला प्रेमाचा टहाळ नक्की येतो..!

वंदे मातरम्..!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

 माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक: २३ डिसेंबर २०१८ व

माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: २३ डिसेंबर २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा