मंगळवार, १६ ऑगस्ट, २०२२

" सदैव अभिमानास्पद प्रिय बंधू बाबासाहेब..! "


 

आमचे गाव आमची माणसं ©️


" सदैव अभिमानास्पद प्रिय बंधू बाबासाहेब..! "


===============================


काही नाती ही निसर्गदत्त असतात.त्या नात्यात सदैव प्रेमाचा अन् आदराचा सहवास दरवळत असतो.काही नाती कधीही शिळी होत नाही.या नात्यांना फक्त माहीत असते सदैव टवटवीत ताजेतवाने असणे.नात्याच्या बाबतीत माणूस हा एकमेव प्राणी इतर सर्व प्राण्यांपेक्षा जरा जास्तच श्रीमंत आहे असे मला तरी वाटते.नाती फक्त रक्ताच्या गोतावळ्यातच तयार होतात असे अजिबात नाही. माझ्या मते नाती ही माणसाच्या वर्तनाने अन् माणसाच्या वैचारिक मंथनातून तयार होतात.जेंव्हा रक्ताच्या नात्याच्या वर्तुळाला भेदून जेंव्हा रक्तविरहित नात्याच्या विश्वात काही नाती तयार होतात अशी नाती मैत्रीच्या देवतेचा प्रसादच असतो.माणसाच्या आयुष्याच्या मंथनातून जी नाती तयार होतात ती नाती अमृतासारखी संजीवन आयुष्य प्राप्त करून देणारी असतात हा माझा आज पर्यंतच्या आयुष्यातील वाटचालीतील स्वानुभव आहे.


मी माणसाच्या आयुष्यातील नात्यांच्या बाबतीत वरील उल्लेखित जे चिंतनीय मनोभाव व्यक्त केले आहे,त्यात माझा लहान भाऊ प्रिय बाबासाहेब एकनाथराव जगदाळे पाटील हा अगदी चपखल बसतो.


प्रिय बंधू बाबासाहेब एकनाथराव जगदाळे पाटील..!

( मूळ गाव - पालखेड , हल्ली मुक्काम - छ्त्रपती संभाजीनगर)


बाबासाहेब अन् मी तसे पालखेड येथील आमच्या एकाच गल्लीतील पूर्वाश्रमीचे वास्तव्याचे माणसं..! बाबासाहेब जगदाळे याचा थोरला भाऊ माझा जिवलग बालमित्र भानुदास जगदाळे उपाख्य भानू मामा याचा धाकटा भाऊ..! अतिशय विनम्र, प्रामाणिक अन् खूपच मेहनती असलेला प्रिय बाबासाहेब हा माझ्या स्वर्गीय वडिलांना विशेष प्रिय वाटायचा. त्याचं कारण, बाबासाहेब याचे असलेले वर्तन..! विशेष म्हणजे माझ्या स्व.वडिलांना नेहमी माझा जिवलग बालमित्र भानू मामा जगदाळे अन् बाबासाहेब जगदाळे या दोन्ही भावंडांविषयी सदैव अभिमान वाटायचा. त्याचं कारण नात्यांची असलेली जुनी विण..! भानुदास अन् बाबासाहेब जगदाळे या भावंडांचे स्व.वडील एकनाथ काका , माझे स्व. वडील अन् माझे सख्खे मोठे चुलते स्व. कचरू चंपतराव जाधव यांच्यात असलेलं स्नेह संबंधाचे नाते..! या जुन्या नात्याच्या विश्वात पुढील पिढी सहभागी झाली अन् नात्याचे एक वर्तुळ पूर्ण झाल्याचे आत्मिक समाधान आम्हाला नक्कीच लाभले.


प्रिय बंधू बाबासाहेब जगदाळे हा शरीरयष्टीने काटक होता. त्यानं त्याच्या आयुष्याचा बाबतीत जे स्वप्न उराशी बाळगले होते त्यात त्याला यश प्राप्त झाले अन् आपल्या भारतमातेच्या रक्षणासाठी भारतीय सैन्यदलाचा मोठ्या अभिमानाने एक सक्षम घटक सहभागी झाला. प्रिय बंधू बाबासाहेब जगदाळे याने आपल्या आयुष्यातील भारतीय सैनिक म्हणून सेवा निभावताना ईशान्य भारतातील राज्ये अन् जम्मू काश्मीर मध्ये विशेष लक्षवेधक कामगिरी बजावली आहे. इ. स.१९९९ मध्ये ज्यावेळी कारगिल युद्ध सुरू झाले होते,त्यावेळी हाच आमचा प्रिय बंधू बाबासाहेब जगदाळे हाती शस्त्र घेऊन आपल्या शत्रूच्या म्हणजेच पाकिस्तानच्या विरोधात उभा ठाकला होता. ज्यावेळी प्रिय बंधू बाबासाहेब जगदाळे याच्याशी त्याच्या सैन्यदलातील कार्याविषयी चर्चा निघते त्यावेळी ईशान्य भारताच्या राज्यातील सेवा अन् काश्मिर मधील सेवा ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात.


मी जो पर्यंत पालखेड येथे स्थायिक होतो तेंव्हा, जेंव्हा कधी प्रिय बंधू बाबासाहेब जगदाळे हा सैन्य नोकरीच्या सुट्टीवर घरी यायचा तेंव्हा बऱ्याचदा माझ्या स्व.वडिलांबरोबर निवांत बसून आमच्या पालखेड येथील घराच्या ओट्यावर बसून गप्पा करताना बघायचो. एक कर्तव्यनिष्ठ शिक्षक अन् एक कर्तव्यनिष्ठ भारतीय सैनिक यांचं होणारं ते वैचारिक चिंतन बघण्याच्या एक विशेष अभिमान नेहमी जाणवायचा.


आमच्या पालखेड गावात पूर्वीच्या अन् माझ्या समकालीन पिढीत माझ्या परिचयातील काही फारच मोजकी माणसं होती अन् आहेत, जी की अजातशत्रू स्वभावाची होती अन् आहेत.त्यात आमचा प्रिय बंधू बाबासाहेब जगदाळे याचे नाव नक्कीच शीर्षस्थानी आहे.प्रिय बंधू बाबासाहेब जगदाळे हा कधीच कुणाच्याही निरर्थक बाबीत पडलेला नाही.कधीच कुणाला एका शब्दाने उभारलेला नाही. एखाद्या माणसाने त्यात स्री अन् पुरुष दोघेही आलेत, त्यांनी आपापल्या आयुष्यात अजातशत्रू स्वभावाची ओळख निर्माण करणे ही देखील खूप मोठी तपश्चर्या आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. आमच्या पालखेड गावात सध्याच्या पिढीत कुणी अजातशत्रू आहे का नाही हे माहीत नाही,कारण माझाच ,माझ्या जन्मगावाशी संपर्क मर्यादित झाला आहे.


मी माझ्या कौटुंबिक आयुष्यात कुटुंबाच्या बाबतीत जो विश्वास व्यक्त केला त्यात प्रिय बंधू बाबासाहेब जगदाळे हा एक अत्यंत विश्वासू पालखेडकर म्हणून माझ्या कुटुंबात नक्कीच आहे.


काल दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अन् शुभ मुहूर्तावर प्रिय बाबासाहेब जगदाळे याने बुलेट गाडी खरेदी केली. खरेदी केलेल्या गाडीचे पूजन करायला मागील पिढीपासून कौटुंबिक स्नेह असल्याने आम्हा उभयतांना बोलावून घेतले. गाडीचे पूजन केले अन् एका भारतीय सैनिकाच्या पूर्ण झालेल्या कृतीचे पूजन केल्याचे मनोमन सार्थक वाटले. यावेळी प्रिय बंधू बाबासाहेब याने मला सांगितले की,

" नंदू भाऊ, मला बुलेट विकत घ्यायची होतीच , पण ती १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अन् शुभ मुहूर्तावरच खरेदी करायची होती.ते माझे एक स्वप्न होते. वास्तविक माझ्या मुलाचा वाढदिवस येत्या काही दिवसांत आहे. मात्र मी माझ्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी गाडी खरेदी करण्याऐवजी १५ ऑगस्ट हीच तारीख निवडली. मुलाचा वाढदिवस दरवर्षी येईल,पण आपल्या भारतमातेच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पुन्हा येणार नाही. प्रत्येक वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आम्हा सैनिकांना आम्ही प्राप्त केलेले मेडल अभिमानाने छातीवर लावण्याचा अधिकार असतो. इतर दिवशी असे करता येत नाही. म्हणून मी मनाशी पक्का निर्णय केला होता की, ' मी सैनिकी गणवेशात अन् छातीवर अभिमानाने अडकवलेली विविध मेडल लावूनच बुलेट गाडी खरेदी करणार, नसता नाही..! माझ्या इच्छेखातर छत्रपती संभाजीनगर येथील दुचाकी शोरुमवाल्यांनी फक्त एकट्या साठी दुकान उघडले अन्. मोठ्या सन्मानाने मला बुलेट दिली.आम्हा सैनिकांना हेच शुभ मुहूर्त असतात..!"


प्रिय बंधू बाबासाहेब जगदाळे याचं हे बोलणं ऐकून मी अन् माझ्या सारखी कित्येक भारतीय नागरिक जे की, स्वतः च्याच विश्वात रमून आनंद साजरा करतात ते खजील झाल्यासारखे वाटले.याउलट आमचा प्रिय बंधू बाबासाहेब जगदाळे हा खूप मोठ्या उंचीचा मला जाणवला. त्याने आप्तस्वकीयांपेक्षा भारतमातेच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभ मुहूर्ताला सर्व प्रथम स्थान दिले. याचमुळे अशा लोकांना भारतमातेचे सैनिक म्हणतात याची मला त्याच क्षणी खात्री पटली अन् यांच्यामुळेच माझ्या सह इतर सर्व भारतीय नागरिकांचे अस्तित्व टिकून आहे हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे.


सध्या प्रिय बंधू बाबासाहेब जगदाळे हा आपली सैनिकी सेवा नियत वयोमानानुसार निवृत्त होऊन भारतीय स्टेट बँकेत नोकरीला आहे. 


वंदे मातरम्


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - १६/८/२०२२, श्रावण मास, मंगळवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा