चिंतन ©️
आयुष्याच्या संध्याकाळचे सखा अन् सखी..!
===================================
काल दिनांक १५/४/२०२३, शनिवार रोजी दुपारी छत्रपती संभाजीनगर येथील समर्थनगर परिसरातील वरद विनायक गणेश चौकात उभा होतो. रखरखत्या उन्हात वर्दळ काहीशी कमीच होती. मला माझ्या घराकडे जाण्याची ओढ लागली होती.इतक्यात एक वृद्ध जोडपे माझ्या बाजूला येऊन थांबले.त्यांच्या हातात पिशवी होती.त्यातील कागदांवरून ती फाईल दवाखान्याची वाटत होती. ते वृद्ध जोडपे खूप थकलेले जाणवत होते. सिग्नल लागल्यावर ते वृद्ध जोडपे रस्त्याच्या पलीकडे चालत चालत गेले.
माणसाच्या वार्धक्यातील व्यथांचे , प्रश्नांचे काहूर माझ्या मनात यायला लागले. कोण असतील हे वयोवृध्द स्री अन् पुरुष..? यांच्या सोबत कुणी तरुण - तरुणी किंवा कुणी प्रौढ का नसेल..? थोर साहित्यिक वि. वा.शिरवाडकरांचे मानसपुत्र गणपतराव बेलवलकर अन् त्यांचे सरकार हेच का ते..? अजुनही नटसम्राट आपल्या वार्धक्यातील आयुष्याची संहिता आयुष्याच्या रंगमंचावर सादर करत आहेत का..? जसे त्या स्वाभिमानी नटसम्राटावर त्याच्याच पिल्लाने म्हणजेच त्याच्या मुलीने चोरीचा आळ घेतला अन् त्या स्वाभिमानी गणपतराव बेलवलकरांची जी तडफड त्यावेळी झाली होती ती आयुष्याची फडफड अजूनही सुरूच आहे का..? तडफड देणारा मुलगा किंवा मुलगी असते यात तिसरं अजुन कुणी असतं का..? असे नानाविध प्रश्नांचे काहूर माजले होते.
इतक्यात माझी पत्नी आली अन् आम्ही दोघेही घराकडे निघालो.मात्र निघण्याच्या अगोदर माझ्या पत्नीला त्या दोन वृध्दांना दुरून दाखवून कदाचित आपल्या वार्धक्यात होणारी अवस्था दाखवली अन् आपणच आपल्या आयुष्यात कसे एकमेकांचे सखा अन् सखी आहोत याची जाणीव करून दिली. जो पर्यंत माणूस जिवंत असतो तो पर्यंत त्याच्या मायारुपी आयुष्याची कुणीच खात्री देऊ शकत नाही.जो पर्यंत माणूस हयात असतो तो पर्यंत मानवी स्वभाव अन् त्याची माया याविषयी कुणीही भविष्याची शाश्वती देऊ शकत नाही हेच अंतिम सत्य..!
थोर साहित्यिक वि. वा.शिरवाडकरांनी नटसम्राटाच्या माध्यमातून त्यांचे मानसपुत्र गणपतराव बेलवलकर अन् त्यांचे सरकार म्हणजेच त्यांची पत्नी ज्यावेळी रंगमंचावर आणले त्यावेळी ते वृद्ध दांपत्य या भूतलावरील समस्त वृद्धांचे प्रतिनिधित्व करणारे ठरले. फक्त फरक इतकाच होता की, काहींच्या वृद्धापकाळातील व्यथा ह्या गणपतराव बेलवलकर अन् त्यांच्या सरकारासारख्या तीव्र होत्या,तर काहींच्या व्यथा ह्या आतल्या आत घुसमटत होत्या.आणखी एक प्रकार यात होता अन् तो म्हणजे आपलं म्हातारपण कोणत्या तरी बालकात, विधात्यात रमवून आयुष्याची संध्याकाळ करून रात्रीच्या कायमच्या विसाव्याला जाणारे..! यापेक्षा वेगळं काही वि. वा.शिरवाडकरांनी नटसम्राटाच्या माध्यमातून त्यांचे मानसपुत्र गणपतराव बेलवलकर अन् त्यांचे सरकार यांच्या वार्धक्यातून दाखवलं नाही.
एक पुरुष अन् एक स्री जो पर्यंत पती पत्नीच्या नात्यात ऐन तारुण्यात, प्रौढ वयात असतात तो पर्यंत त्यांच्यातील वि.स. खांडेकरांना अभिप्रेत असलेली प्रेमाची छटा, प्रेमाचं वलय, समाजमान्य असणारी वासना यात ते दोघेही स्री अन् पुरुष रममाण होऊन आयुष्याच्या गुलाबी रंगाच्या पावसात भिजत असतात.मात्र जेंव्हा याच आयुष्याचा ग्रीष्म ऋतू सुरू होतो अन् मग तारुण्यातील ते गुलाबी दिवस आठवल्या शिवाय माणसाच्या हाती काहीच नसतं हेच खरं..! वार्धक्यात कोणत्याही पती किंवा पत्नीला आपला जोडीदार हा खूप हवाहवासा वाटू लागतो. वार्धक्यातील एकमेकांची ही ओढ शारीरिक आकर्षणाची , वासनेची नसते. तर ती ओढ फक्त आणि फक्त एकमेकांच्या आयुष्यात एकमेकांना सखा अन् सखी या नात्यातून शोधण्याची असते.ही दोघेही वार्धक्यात एकमेकांचा आधार शोधत आसतात.
कोणत्याही पतीची पत्नी ,त्याच्या अगोदर स्वर्गवासी झाली तर त्याचं हक्काचं स्वयंपाक घर सुणं सुणं होऊन जातं.याला अत्यल्प अपवाद असतात, ज्यांना सून , लेकी सारखी मिळते तेंव्हा अख्खी हयात स्वयंपाक घर हक्काचं असतं. मात्र तरी देखील अशा विदुर पुरुषाची आयुष्याची संध्याकाळ ही एकटीच असते..! त्या संध्याकाळी तो विदुर पुरुष आपल्या प्रिय पत्नीच्या कित्येक आठवणींच्या हिंदोळ्यावर स्वतः ला झुलवत ठेवून मनाची गुलाबी बाजू टवटवीत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्या आठवणीत त्या विदुर पुरुषाच्या डोळ्यांच्या कडा नेहमी ओल्या होत असतात, आपल्या स्वर्गीय पत्नीच्या वियोगात..!
आणि जर एखाद्या स्रीचा मग तिचा वयोगट कोणताही असो, पती तिच्या अगोदर स्वर्गवासी झाला तर तिच्या आयुष्यातील शृंगार नाहीसा होतो.उरतो फक्त देव घरातील फुलांचा बहर तोही देव पूजेसाठी..! स्वतः साठी ती शृंगार करू शकत नाही,कारण तिच्या शृंगाराचा चाहता आता हयात नसतो, ज्याची तिला सदैव आस असते, तो आसवं पुसणारा हयात नसतो.तिला तिचे वियोगातील अश्रू पिऊन घ्यावे लागतात. पती अगोदर स्वर्गवासी झाल्यावर पत्नी आपल्या पतीच्या वियोगात, आठवणीत आपलं आयुष्य जसं मीराबाई ने युगंधर समोर नसताना पूजले तसे पूजन आपल्या पतीचे करत असते, मनातल्या मनात..! गोकुळातील युगंधराला, चित्तोडगडच्या संत मीराबाईने आठवणीत श्रद्धेने हृदयात पुजलं, अगदी तसेच ती विधवा पत्नी आपल्या पतीला पुजत असते.
असो, पती पत्नीच्या एकमेकांच्या वियोगाच्या वेदनेचा हुंदका खूप मोठा असतो, फक्त तो वेदनेचा हुंदका त्यातील जो या इहलोकात मागे राहतो त्यालाच देता येतो..! इतरांना त्यातील वेदना जाणवणार नाही,कारण वेदना ही ज्याने त्यानेच जाणून घ्यायची सोय त्या विधात्याने केलेली आहे.
ता.क. - मला व माझ्या धर्मपत्नीला काल एकमेकांच्या हातात हात घालून आयुष्याच्या संध्याकाळी चालणारे सखा अन् सखी असलेले जोडपे दिसले. त्या वृद्ध जोडप्यांचे म्हातारपण प्रत्येक विवाहित स्री अन् पुरुषाला आहेच..!
वंदे मातरम्..!
लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक: १६/४/२०२३, रविवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा