रविवार, ६ ऑगस्ट, २०२३

" मित्र अन् मित्रांची मैत्री "






 

चिंतन ©️


"मित्र अन् मित्रांची मैत्री "


====================================

                                                                                            भारतीय संस्कृतीत फार पूर्वी पासून निसर्गाशी संबंधित ,मानवी नात्यांच्या संबंधित विविध सण,उत्सव,दिनविशेष साजरी करण्याची महान परंपरा होती व आहे. पण आपले बरेचशे शोध, संशोधन ,उपक्रम पाश्चात राष्ट्रांनी उचलले. हेच आपले शोध,ज्ञान,दिनविशेष उपक्रम यांना पाश्चात देशांनी संकरित स्वरूपात जगासमोर सादर केले. त्याचे उदाहरण आजचा दिनविशेष मैत्री दिन..! त्याचे इंग्रजी संस्करण Friendship Day..! 


या दिना संदर्भात आपल्या भारतीय संस्कृतीत भगवान श्रीकृष्ण व सुदामा यांचे उदाहरण फार पुरातन आहे. फक्त त्यांच्या भेटीच्या दिनांकाला मैत्री दिन साजरा होत नाही इतकंच..! बहुधा ती दिनांक ज्ञात नसावी..!अशीच निखळ मैत्रीची अनेक उदा.आहेत.फक्त या अनेक मैत्रीच्या उदाहरणांना ,शोधांना,संशोधनांना आजच्या भाषेत " Marketing " आपल्याला जमले नाही..आणि या बाबतीत पाश्चात देश पटाईत होते व आहेत. मैत्री दिन खरा आपला..पण, marketing केले पाश्चिमात्यांनी..!


आता हा मैत्री दिन याचे संकरित रूप जरी पाश्चात देशातून आलेले असले,तरी त्यातील मूल्ये मुळात आपली भारतीय व नैतिकतेच्या मापदंडावर आधारलेलीआहेत. पाश्चात देशांनी आपल्या या मूल्यांना कसे सादर केले पाहू... 


फ्रेंडशिप डे चा औपचारिक प्रारंभ सन 1919 मध्‍ये झाला. पहिल्या महायुध्दानंतर जनतेला  एकमेकांविषयी भिती, अविश्वास निर्माण झाला होता.या बाबी नाहीश्या करण्यासाठी अमेरिकी सरकारने ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी हा मैत्री दिन साजरा करण्याचे ठरविले आणि तो आजतागायत सुरू आहे. मुळात एक लक्षात जर घेतले तर कोणत्याही नात्यातील पवित्र बंधनाला कोणताही एखादा दिवस बंधिस्त करू शकत नाही. समाज कोणत्याही नात्यातील भाव व्यक्त करण्यासाठी एका विशिष्ट दिवसाची निवड करतो अन् आपण  तो त्या त्या दिवशी साजरा करतो इतकेच..! त्यात गैर काही नाही. तो दिन विशेषचा  भाव सदैव अंतर्मनात राहिला तरच त्या कोणत्याही एका विशिष्ट दिवसाची महत्ता टिकून राहते.नसता तो फक्त भडक ' इव्हेंट ' होतो.


मित्र अन् जिवलग मित्र यात पुसटशी रेषा असते, जी या दोन्ही नात्यातील सूक्ष्म अंतर राखून असते. जिवलग मित्रांच्या सहवासात आपण आपलं सगळं दुःख , वेदना अन् हालाखी व्यक्त करू शकतो. मित्रांच्या सहवासात या गोष्टी सहसा होत नाहीत.त्याचं कारण जिवलग मित्रांना  एकमेकांचा इतिहास, भूगोल माहीत असतो.अन् माझ्या मते ज्या माणसांना एकमेकांचा इतिहास - भूगोल माहीत असतो अशी माणसं एकमेकांच नागरिकशास्त्र चांगलं जाणून असतात.यालाच मैत्रीच्या विश्वात जिवलग मित्र असे म्हणतात. याचा अर्थ असाही होत नाही की, आयुष्यात जिवलग मित्रांपेक्षा मित्रांचे अस्तित्व नसते. जेवढं स्थान जिवलग मित्रांचे स्थान आयुष्यात असते किंबहुना त्यापेक्षा काकणभर कमी किंवा त्यापेक्षा कमी मित्रांचे स्थान आयुष्यात असते. ते स्थान काकणभर कमी असण्याचे कारण एकमेकांच्या आयुष्यातील सामाजिक शास्त्रांच्या घटकांची माहिती नसणे. जेंव्हा मित्रांमध्ये एकमेकांच्या आयुष्यातील सामाजिक शास्त्रांच्या घटकाची माहिती, जाणीव एकमेकांना होत जाते, होते तेंव्हा त्याच मैत्रीचे रुपांतर जिवलग मित्रांमध्ये होत जाते हे मात्र खरं..! एकमेकांच सामाजिक शास्त्र जे जाणून असतात तेच मानसिकदृष्ट्या एकमेकांचे जिवलग मित्र होऊ शकतात.जर असे झाले नाही तर आपल्या भोवती असणाऱ्या ' मित्रांचा फक्त गराडा ' असतो बाकी काही नाही. तो गराडा ना आत्मिक समाधान मिळवून देतो ना भावनिक भूक भागवतो..! तिथं फक्त आणि फक्त असतो व्यवहार, स्पर्धा , असूया, तडजोड, जात पात धर्म बघून वर्तन ठरवणे इत्यादी..! या सर्व बाबी मैत्रीची बीजे अंकुरण्यासाठी पोषक नसतात यातून फक्त मैत्रीचे निरुपयोगी गाजर गवत वाढू लागते. अशा ठिकाणी जिवलग मैत्रीचा गुलाब पुष्पांचा बहर येत नाही. जिवलग मित्र असा नामोल्लेख अथवा लेखन केले म्हंटले कुणी जिवलग मित्र होत नसतो, जिवलग मित्र होण्यासाठी , असण्यासाठी मनातून जिवलग भाव महत्त्वाचा असतो हे सर्वात महत्त्वाचे असते..!


बालपणातील मैत्री अल्लडपणा शिकवते तर पौगंडावस्थेतील मैत्री ही मित्रांना भुरळ घालते. प्रत्येक  वयोगटातील आपला स्वभाव अशा मैत्रीला भुरळ घालतो.आपले अजातशत्रूपण  मैत्रीला भुरळ घालते.एकमेकांवर असलेले निरपेक्ष प्रेम अशा मैत्रीला भुरळ घालते.एकमेकांचे भौगोलकदृष्ट्या कितीही अंतर असले तरी, एकमेकांची भावनिक ओढ मैत्रीला भुरळ घालते.


माझ्या आयुष्यातील सर्वात पहिला जिवलग मित्र स्व.आप्पा धोंडीबा सुराशे याच्या करिता मी , विजू गायकवाड, सोमनाथ गायकवाड अन् रमेश गायकवाड आमच्या पालखेड येथील घरापासून अंदाजे ३ ते ४ कि.मी.अंतरावर असलेल्या आप्पाच्या शेतात फक्त मैत्री खातर पायी जायचो.तो वयोगट होता प्राथमिक शाळेतील..! कधी  आप्पा सुराशे सोबत  तर कधी त्याला भेटायला तर कधी पित्राचे जेवण करायला उन्हा तान्हात..! माझ्या आयुष्यातील मैत्रीचा प्रारंभ आप्पा सुराशे हाच होता. त्यानंतर कित्येक जिवलग मित्र माझ्या आयुष्यातील वेलीवर बहरले.त्या सर्वांचे स्थान आई वडिलांच्या नंतरचे नक्कीच श्रद्धेय अन् पवित्र आहे यात तिळमात्र शंका नाही.


आम्ही ज्यावेळी इ.९ वी ला असतांना आमचा जिवलग बालमित्र आप्पा सूराशे स्वर्गवासी झाला,त्यावेळी आप्पाचे वयोवृध्द वडील स्व.धोंडीबा दादा सुराशे पा.माझ्याजवळ लहान लेकरासारखे रडले होते..! ते त्यांचे व माझे अश्रू आजही मला माझ्यातील मित्राला मरू देत नाही आणि कधीच मरू देणार नाही..! तीच माझ्या  जिवलग बालमित्राला,स्व.आप्पा  सूराशे ला आयुष्यभर अर्पण करत असलेली श्रध्दांजली आहे..!


काळाच्या ओघात माझ्या वैयक्तिक आयुष्यातील आजच्या मैत्रीचे विश्व वाढत गेले. अनेक मित्रांचे प्रत्यक्ष भेटीचे अंतर वाढलेही असेल पण  एकच गोष्ट माझ्याकडुन ठाम  आहे आणि ती म्हणजे " मैत्रीची भावनिक ओढ अन् त्या जिवलग मित्रां विषयी असलेली समर्पित प्रेमळ भावना..! उदाहरण दाखल द्यायचे झाल्यास आजही माझे जे काही जिवलग मित्र आहेत, त्यांच्याशी कित्येक महिने, वर्ष प्रत्यक्ष भेट, फोनवर बोलणे , व्हॉट्स ॲपवर वर संपर्क देखील होत नाही.मात्र जेंव्हा कधी प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन संपर्क होतो तेंव्हा निदान आम्हा काही जिवलग मित्रांमध्ये ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष भेटीची न होणारी तक्रार अजिबात नसते. त्याचं कारण मैत्रीत असणारी खोली अन् प्रगल्भता..! माझ्या मते मैत्रीत प्रेम असायला, दररोज किंवा बऱ्याचदा प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन संपर्क असायलाच हवा असेही नसते, मात्र ती मैत्री जेंव्हा कधी भेटेल तेंव्हा त्यात श्रीकृष्णाच्या अवखळ भक्तीचा सहवास नक्कीच असायला हवा..! जो की आम्हा काही जिवलग मित्रांमध्ये आढळून येतो. 


जिवलग मित्रांच्या गप्पात सगळं कसं उघड नागडं असतं.तिथं. तुम्ही लपून राहूच शकत नाही.जिवलग मित्र अन् त्यांचा सहवास हा एकमेकांना सर्व विषयांवर मुक्तपणे व्यक्त होण्याचे सर्वात हक्काचे ठिकाण असते.तुम्ही कोण अन् कुठले हा आविर्भाव जिवलग मैत्रीच्या नात्यात अजिबात नसतो.तिथं फक्त आणि फक्त मैत्रीच्या विश्वातील अनौपचारिक वर्तनाचा संचार असतो. आपल्या अंतर्मनातील खदखद, आनंद, दुःख, व्यथा इत्यादी सर्व भाव भावनांचे बांध याचं जिवलग मित्रांच्या जवळ बसून व्यक्त केले जातात.


मैत्री हेच एकमेव नाते असे आहे की,यात कोणताच रंग नसतो.असतो फक्त स्वच्छ पाण्यासारखा नितळ पारदर्शी भाव..! अगदी स्वच्छ आई गंगेच्या पवित्र पाण्यासारखा नितळ रंग असतो. तरीपण जर यदा कदाचित मैत्रीला रंग जर द्यायचा झाल्यास तो गुलाबी अन् निळ्याशार आकाशा सारखा द्यायला मला आवडेल. गुलाबी रंग प्रेमाचं प्रतिक दर्शवतो. तसेच निळा रंग, आकाशाच्या विस्तीर्ण , प्रगल्भ   अन् डोक्यावर माझा सतत हात आहे  नियतीच्या याच  अस्तित्वाची जाणीव सतत आपल्या मनाला सुखद अनुभव करून देत असतो. विशेष म्हणजे माझा सर्वात आवडता रंग निळा , आकाशीच आहे, जो मनाला नेहमी आकाशाच्या विस्तीर्ण, प्रगल्भ अन् डोक्यावर माझा सतत हात आहे ही जाणीव मला करून देत असतो. अर्थातच त्यामागे मैत्रीचा प्रेमळ रंग देखील आलाच..!


मित्र अन् मैत्री यावर खूप काही व्यक्त करता येईल,पण तूर्तास थांबतो. कोणताही भेदभाव न ठेवता मित्रांच्या मैत्री फुलल्या तरच मैत्रीला मित्रत्वाचा प्रेमभाव स्पर्श करतो. तुमच्या आमच्यात देखील मैत्रीच्या नात्यात गुळाच्या शिऱ्या सारखा गोडवा वृध्दींगत होत राहो हीच प्रेमळ अपेक्षा..!🌹🙏🏻😊


वंदे मातरम्..!       


मित्र अन् मैत्रीवर निस्सीम प्रेम करणारा लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक:६ ऑगस्ट २०२३, रविवार


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा