मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️
देवभूमी..! 🕉️
(भाग क्रमांक १० )
===================================
२१ मे २०२३ ची पहाट झाली होती. रात्रभर शांत झोप झाली नव्हती. तरी देखील पहाटे उठण्याची सवय असल्यामुळे नियमित वेळेला जाग आली होती. मुलं झोपलेली होती.मी अन् माझी धर्मपत्नी केदारनाथ येथील नंदी बेस कॅम्पच्या बाहेर आलो. पहाटेचे साडे चार वाजलेले होते. आजूबाजूला पांढरा शुभ्र हिमालयाचा उत्तुंग पर्वत असल्याने फारसा अंधार जाणवत नव्हता. थंडी मात्र जीवघेणी होती. पुन्हा नंदी बेस कॅम्प मध्ये आलो अन् पहाटेच्या पाच वाजता दोन्ही मुलांना झोपेतून उठवले. नंदी बेस कॅम्पच्या समोरील बाजूला शुश्रुषा / प्रात:विधी ची सोय होती.पहाटे साधारणतः एक तासात आम्ही अगदी फ्रेश होऊन आम्ही पुन्हा त्याच हॉटेल मध्ये आलो होतो जिथं आम्हाला मध्यरात्री आम्ही संकटात असताना एका देव माणसाने प्यायला कोमट पाणी दिले होते. मात्र मध्यरात्री ज्या व्यक्तीने कोमट पाणी प्यायला दिले होते ती व्यक्ती तिथं दिसत नव्हती.दुसरी एक महिला भगिनी तिथे येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना पाणी, चहाची सोय करून देऊ लागली होती. माझ्या पत्नीने चहा घेतला अन् आम्ही उर्वरीत तिघांनी फक्त कोमट पाणी पिले. आता सकाळचे सात वाजले होते.बाजूलाच एका पत्र्याच्या शेड मध्ये एक दवाखाना अन् औषध विक्री केंद्र होते. तिथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही स्वयंसेवक येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची सेवा करत होते. ते माणसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात नव्हते, मात्र त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून समजले होते की ते संघाचे स्वयंसेवक आहेत अन् फक्त सेवाभाव म्हणून भाविकांची सेवा करत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची एवढ्या प्रचंड थंडीत दिली जाणारी निस्वार्थ सेवा बघून त्यांच्या कार्याला विनम्र वंदन केले. केदारनाथ मंदिराच्या परिसरात मुक्कामी असलेल्या भक्तांची संख्या कमी प्रमाणात असल्याने रस्त्याने अजून तरी वर्दळ दिसत नव्हती. आम्ही पुन्हा नंदी बेस कँप येथे पोहोचलो. काल झालेला प्रचंड थकवा , रात्रीच्या आरामामुळे काही प्रमाणात कमी झाला होता. तसे बघितले तर रात्रभर शांत झोप अशी लागलीच नव्हती. एखाद्या फ्रिज मध्ये आपल्याला कुणीतरी रात्रभर ठेवले आहे याचं मानसिकतेत आमच्या शरीराने रात्रभर आराम केला होता. नंदी बेस कॅम्प सोडण्यापूर्वी तिथल्या कर्मचाऱ्यांचे या अशा अतिशय बिकट परिस्थितीमध्ये देत असलेल्या विनम्र सेवे बद्दल विनम्र आभार व्यक्त करून आम्ही नंदी बेस कॅम्प मधून साधारणतः सकाळी आठ वाजता पुन्हा एकदा बाबा केदारनाथ मंदिराच्या दिशेने पायी प्रवास सुरू केला होता. बाबा केदारनाथ मंदिर साधारणतः दोन किलोमीटर अंतरावर होते.
आयुष्यात सकाळी पहिल्यांदा आजूबाजूला पांढर शुभ्र हिमालयाचा विस्तीर्ण परिसर डोळ्याचे पारणे फेडत होता.महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंग मंत्रांतील' हिमालये तू केदारम ' या ओळींची आठवण आली अन् आपोआप मुखातून हर हर महादेव असा जयघोष बाहेर पडला होता. माझ्या मागे सर्वांनी मोठ्या आवाजात हर हर महादेव असा जयघोष केला. समोर दूरवर बाबा केदारनाथ मंदिराचा कळस दिसू लागला होता. आमच्या उजव्या, डाव्या अन् समोरच्या बाजूला हिमालयाचा विस्तीर्ण अन् उत्तुंग पर्वत होता. आता हा हिमालय पर्वत आमचा मित्र असल्यासारखा जाणवू लागला होता. एखाद्याच्या सहवासात काही क्षण , वेळ गेला की, त्याच्याशी मानवी मनाची एक भावनिक विण तयार होते. आम्ही काल दिनांक २० मे २०२३ च्या दुपार पासून ते आज २१ मे २०२३ च्या या आत्ताच्या सकाळच्या क्षणापर्यंत याचं हिमालयाच्या सानिध्यात होतो. हिमालय म्हणजे बाबा केदारनाथ अन् बाबा केदारनाथ म्हणजे हिमालय हे घट्ट नाते आमच्या सोबत होते. काल बाबा केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात दर्शन घेतले होते, त्यामुळं आज बाबा केदारनाथ मंदिराचे कळस दर्शन घ्यायचे ठरले होते. सकाळचे नऊ वाजले होते. मंदाकिनी नदीच्या पाण्याचा आवाज कानी पडत होता.अतिशय वेगवान प्रवाह होता.पुल ओलांडून आम्ही बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरात आलो होतो. बरेच भक्तगण हवाई मार्गाने येत होते. मंदिराच्या परिसरात भाविकांची गर्दी वाढू लागली होती. बाबा केदारनाथ मंदिराचे कळस दर्शन घेतले. मी सोबत संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांनी संग्रहित केलेली विविध मंत्रांची नित्य नियम विधी पुस्तिका आणलेली होती. त्यात ऋग्वेद, सामवेद, शिव रक्षा, इत्यादी मधील मंत्र पुष्पांजली होती. त्यातील बहुतांशी भाग मुखोदगत होता, तरी पण सदरील पुस्तिकेत बघून आम्ही सर्वजण बाबा केदारनाथ मंदिराच्या बाजूला बसून नित्य नियम विधीचे श्रद्धेने वाचन केले.
बाबा केदारनाथ मंदिराचा ज्यांनी साधारणतः एक हजार वर्षापूर्वी जिर्णोद्धार केला होता त्या थोर विभूतीच्या, विद्वत्तेच्या, साधुत्वाच्या समाधी स्थळाकडे आम्ही मार्गस्थ झालो होतो. परम पूज्य वंदनीय आदी शंकराचार्य स्वामी यांच्या समाधी स्थळाकडे आम्ही मार्गस्थ झालो होतो. जसजसे परम पूज्य वंदनीय आदी शंकराचार्य स्वामी यांचे समाधी स्थळ जवळ येऊ लागले होते, तसतसे तिथला परिसर नियोजित अन् वर्तुळाकार बांधकामाने सुशोभित दिसू लागला होता. आज तिथला परिसर जो काही सुनियोजित बांधकाम अवस्थेत दिसत होता त्याचे संपूर्ण श्रेय एका देव माणसाला होते. भारताचे पंतप्रधान वंदनीय नरेंद्र मोदीजी यांच्या अपार श्रद्धेने अन् विकसित हेतूने बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरात वंदनीय आदी शंकराचार्य स्वामी यांच्या समाधी स्थळाचा विकास झाला आहे. आदी शंकराचार्य स्वामी यांच्या समाधी स्थळाकडे वर्तुळाकार मार्गाने आम्ही काहीसे खोलवर असणाऱ्या ठिकाणी पोहोचलो होतो. आमच्या समोर आदी शंकराचार्य स्वामी यांची भव्य मूर्ती होती. ज्या थोर विभूतीने आपल्या बौद्धिक अन् वाकचातुर्याने त्याकाळी हिंदू संस्कृतीचा ध्वज उंच फडकवला होता त्या थोर साधुत्वाच्या समाधी स्थळी आम्ही शांतचित्ताने उभे राहिलो होतो. साधारणतः एक हजार वर्षापूर्वीचा कालखंड, त्यावेळी उपलब्ध असणाऱ्या सुख सुविधा, त्यावेळची इथली परिस्थिती सगळं काही अंतर्मनात येऊ लागले होते. कोणत्या अदभुत शक्तीने झपाटलेली माणसं असेल ही..? श्रद्धेच्या कोणत्या शिखरावर विराजमान झालेली माणसं असेल ही..? अखंड भारत पादाक्रांत करून आपल्या विचारांना प्रसारित करत असताना कोणती दिव्य शक्ती आदी शंकराचार्य यांच्या सोबत वावरत असेल..? या अशा कित्येक अनाकलनीय , गूढ प्रश्नांचे काहूर माझ्या मनात उठलं होतं.आपण अशा अदभुत विद्वत्तेच्या, शक्तीच्या समोर नतमस्तक होतोय यापेक्षा दुसरं अजून काय हवं एका श्रद्धेय मनाला..! आदी शंकराचार्य स्वामी यांनी साधारणतः एक हजार वर्षापूर्वी अखंड भारत पादाक्रांत करून अन् हिमालयाच्या कुशीत बाबा केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. हे अदभुत कार्य तेंव्हाच होऊ शकते जेंव्हा कोणती तरी नैसर्गिक दिव्य शक्ती सोबत असते. आमच्या सारखे कित्येकजण आजच्या काळातील विविध वाहनाच्या मदतीने गौरी कुंड पर्यंत आले होते. काहीजण गौरी कुंड पासून ते बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरात पायी चालत आले होते. एवढी सुख सुविधा असताना देखील आम्ही अन् आमच्या सारखे आलेले सर्व भक्तगण शारीरिक थकव्याने गळून गेलो होते. त्याकाळी आजच्या सारखी कोणतीही आधुनिक सुविधा नसताना हिमालयाच्या कुशीत बाबा केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करणे हा तुमच्या आमच्या सर्व सामान्य लोकांच्या मानसिकतेच्या पलिकडचा विषय आहे. आपण फक्त त्या अदभुत अन् महान व्यक्तिमत्वांच्या कार्यासमोर , त्यांच्या स्मृतीस्थळासमोर फक्त नतमस्तक व्हायचे असते.जिथं विज्ञान संपते तिथून पुढे अध्यात्म प्रारंभ होते असे कुठेतरी माझ्या वाचण्यात आले होते. त्याची अध्यात्मिक प्रचिती याची देही याचि डोळा येऊ लागली होती.मी माझी पत्नी आणि दोन्ही मुलं बऱ्याच वेळ आदी शंकराचार्य स्वामी यांच्या समाधी स्थळी असणाऱ्या आदी शंकराचार्य स्वामी यांच्या मूर्ती समोर एकाग्रतेने उभे होतो.
थोड्या वेळानं तिथं असणाऱ्या पुरोहितांच्या हस्ते आम्ही आदी शंकराचार्य स्वामी यांच्या समाधी स्थळी , आदी शंकराचार्य स्वामी यांच्या मूर्तीच्या सानिध्यात विधी पूजा केली. वीस पंचवीस मिनिटे मंत्रपुष्पांजली,विधी पूजा सुरू होती. मंत्रपुष्पांजली,विधी पूजा आटोपल्या नंतर आम्ही गुरूंचे अन् आदी शंकराचार्य स्वामी यांच्या समाधी स्थळाचे मनोभावे दर्शन घेतले. सकाळचे अकरा वाजले होते. गौरी कुंड कडे पुन्हा पायी चालत जाण्याचे नियोजन होते.बाबा केदारनाथ मंदिर ते गौरी कुंड हा पायी प्रवास होणार असल्यामुळे त्या प्रवासाला अंदाजे सात ते आठ तास लागणार होते. दुपारी बारा वाजता जरी आम्ही बाबा केदारनाथ मंदिर परिसरातून गौरी कुंड कडे पायी प्रवासाला सुरुवात केली तरी रात्री आठ वाजेपर्यंत आम्ही गौरी कुंड येथे पोहोचू शकणार होतो. त्यामुळं आम्ही आता लवकरात लवकर बाबा केदारनाथ मंदिर परिसरातून गौरी कुंड कडे मार्गस्थ होण्याचा एकमताने निर्णय घेतला.
पुन्हा एकदा आम्ही बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरात आलो. शेवटचे पुन्हा एकदा बाबा केदारनाथ मंदिराच्या कळसाला, मंदिराला, बाबा केदारनाथ महादेवाला हृदयात श्रद्धेने बंदिस्त केले. माझ्या डोळ्याचा कडा पाणावल्या होत्या. आपण आपल्या जिवलगाला सोडून जात आहोत हा भावूक श्रद्धेय भाव माझ्या अंतर्रमनात आला होता. अतिशय थंडगार असणाऱ्या तिथल्या जमिनीवर आम्ही सर्वजण साष्टांग दंडवत करून बाबा केदारनाथाच्या चरणी नतमस्तक झालो होतो. निरोपाचा क्षण , भावूक मनाला गहिवरून सोडतो. आपण आपल्या इष्टाला, आपल्या श्रध्येयाला, ज्यांच्या भेटीचे स्वप्न मी माझ्या पौगंडावस्थेतील वयोगटात बघितले होते ते स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण झाल्यानंतर बाबा केदारनाथाला निरोप देताना माझे सर्व शरीर अतिशय थंडगार वातावरणात अजून थंडगार झाले होते. भेट आणि निरोप हा मानवी शाश्वत आयुष्याचा भाग आहे. असा भाग जो कोणत्याही मानवी आयुष्याला चुकलेला नाही.आपल्या आवडत्या व्यक्तीची, स्थळाची भेट होताना मनाला आनंद मिळतो मात्र त्याच आवडत्या व्यक्तीचा, स्थळाचा निरोप घेताना मन गहिवरून जाते. हा भावनिक अनुभव त्यांनाच येतो ज्यांचं मन अन् तन कुठेतरी अगदी अंतर्मनातून गुंतलेले असते. भक्तांच्या गर्दीतून वाट काढत आम्ही बाबा केदारनाथ मंदिर परिसरातून हळूहळू पुढे पुढे चालू लागलो होतो. एखादे लहान बाळ किंवा एखादं प्रेमळ मन जसे आपल्या आवडत्या व्यक्तीला निरोप दिल्यानंतर पुन्हा पुन्हा जसे मागे वळून त्या आवडत्या व्यक्तीकडे , स्थळाकडे पाहत असते, तशी अवस्था माझी, माझ्या पत्नीची अन् दोन्ही मुलांची झाली होती. आम्ही जसेजसे बाबा केदारनाथ मंदिर परिसर सोडून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो होतो तसतसे आम्ही अधून मधून बाबा केदारनाथ मंदिराच्या कळसाला बघत होतो.
बाबा केदारनाथ मंदिर परिसराला निरोप देताना मी माझ्या मनात बाबा केदारनाथला म्हणालो की, " बाबा केदारनाथ, पुन्हा कधी तरी आयुष्यात तुझ्या भेटीला येईल, कारण तुच तर या नश्वर देहाचा स्वामी आहेस..! तूच तर शाश्वत सत्य असणाऱ्या मृत्यूचा मालक आहेस. बाबा केदारनाथ तुला भेटायला या नश्वर देहासह येईल किंवा या नश्वर देहाशिवाय, मृत्यू नंतर..! मात्र भेटायला नक्की येईल..!
आम्ही सर्वांनी एकत्रितपणे मोठ्याने जयघोष केला...
" हर हर महादेव..!" 🙏🏻🕉️🙏🏻
" बाबा केदारनाथ की जय..!"
" श्री. पारेश्र्वर महादेव की जय..!"
" सदगुरु जनार्दन स्वामी महाराज की जय..!"
" वंदे मातरम्..!"
एक प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - १० डिसेंबर २०२३, रविवार
क्रमशः







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा