चिंतन ©️
' hi , पापा '
================================
खूप दिवसांनी अतिशय भावप्रधान असलेला '.मूळचा दक्षिण भारतीय चित्रपट ' हाय पापा ' हा चित्रपट बघितला.
आता पर्यंत बहुतांशी चित्रपटात अपत्यांच्या आयुष्यात असलेले आईचे गोडवे गायले गेलेले बघितले , मात्र माझ्या पाहण्यात पहिल्यांदा ' हाय पापा ' या चित्रपटात एका बापाची आपल्या चिमुकल्या लेकी विषयी अतिशय सुंदर भावप्रधान कथा बघण्यात आली. आपलं करियर अन् त्याच्या महत्वकांक्षेपोटी एका तरुण आईने चिमुकलीचा केलेला त्याग, लग्न झालेल्या मुलीच्या आईने आपल्या लेकीच्या वैवाहिक आयुष्यात खूप खोलवर डोकावल्यावर , हस्तक्षेप केल्यावर मुलीच्या संसाराची कशी धूळधाण होते त्याचं संयत पद्धतीने छान सादरीकरण करण्यात आले आहे. बऱ्याचदा विवाहित मुलींच्या वैवाहिक आयुष्यात तिचीच आई खल प्रवृत्तीचे काम करत असते. त्याचा परिपाक असा होतो की, नैतिक दबावामुळे किंवा कुसंगतीने मुलगी ऐकत जाते अन् स्वतः चे सुखी वैवाहिक आयुष्य दुःखी करून बसते. उपवर असणाऱ्या मुलीच्या आई वडिलांचे उडणारे खटके त्यातून उपवर मुलीच्या वडिलांची अन् मुलीची होणारी घुसमट , वडील अन् मुलगी असणाऱ्या व्यक्तिरेखेने छान सादर केली आहे. समाजात एक स्री म्हणून विवाहित मुलीच्या आईला सामाजिक सहानुभूती मिळते.मात्र बऱ्याचदा याचं मुलीच्या आई आपल्या स्वभावानं आपल्या लेकीच्या वैवाहिक जीवनात दुःख निर्माण करू लागतात. ही एक काळीकुट्ट सामाजिक बाजू हाय पापा या चित्रपटात संयत पद्धतीने सादर केलेली आहे.
एक पुरुष आपलं वैवाहिक आयुष्यातील प्रेम टिकवून ठेवण्यासाठी किती संयमी वागतो , एका चिमुकल्या लेकीला जेंव्हा समजते की, आपल्या जन्मदात्या आईने आपला त्याग केला यावेळी त्या चिमुकल्या लेकीने आपल्या बापाच्या गळ्यात पडून हाय मोकलून रडणं हे असे कित्येक प्रसंग माणसांच्या नात्यातील विविध रंग प्रदर्शित करतो. एक सासरा आपल्या नातीसाठी अन् जवयासाठी त्यांना भावनिक आधार देण्यासाठी पत्नी ऐवजी जावई बापू सोबत राहणे पसंद करतो हे बघून पुरुषाच्या भावनिक नात्याचा एक भावनिक पदर बघून मन भरून येते.
अभिनय, अतिशय संयत पटकथा आणि सर्वात उजवी बाजू म्हणजे समर्पक बॅक ग्राउंड संगीत खूपच छान सादर केल्या गेले आहे. चित्रपटाचे बॅक ग्राउंड संगीत ऐकूण बऱ्याचदा गहिवरून येते. सुंदर लोकेशन, हळुवार गाणी यामुळं हाय पापा हा चित्रपट हृदयात घर करतो. जयराम अन् मृणाल ठाकूर अन् त्यांची चिमुकली कन्या यांनी आपल्यातील भाव भावनांचा गहिवर या चित्रपटात पुरेपूर ओतला आहे.विशेषत तरुण पतीच्या भूमिकेत जयराम यांनी कित्येक भावनिक प्रसंगांना आपल्या अभिनयाने खूप उंचीवर नेऊन ठेवले आहे.त्यांना तितकीच तोलामोलाची साथ दिली आहे ती त्यांच्या चिमुकल्या लेकीच्या निरागस अभिनयाने..!
चित्रपट खूप संथ गतीने पुढे जातो.त्यामुळं उतावीळ प्रेक्षकांना अन् ढिश्युम ढिश्युमची आवड असणाऱ्यांना ' हाय पापा ' हा चित्रपट बहुदा आवडणार नाही.
ता.क. - दक्षिण भारतातील चित्रपट क्षेत्रातील सर्व कलावंत बॉलिवूडला प्रत्येक क्षेत्रात फाट्यावर मारतात.
ग्रेट आहेत.
वंदे मातरम्
एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - १/६/२०२४, शनिवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा