बुधवार, १८ डिसेंबर, २०२४

पुष्पा २


 


चिंतन ©️


पुष्पा २


==================================


फक्त आणि फक्त अलू अर्जुन..!

ग्रामीण भागातील लोक देवता , त्या देवतांचे पूजन अन् तिथले उत्सवी वातावरण पुष्पा २ मधील काही प्रसंगात अप्रतिम सादर केल्या गेले आहे. काली माताचे रूप अन् त्या उत्सवातील पुष्पाचे अप्रतिम नृत्य या चित्रपटात सर्वोत्कृष्ट श्रेणीतील आहे. एखाद्या लोककलेला, नृत्याला इतकं समरसून भारतीय चित्रटसृष्टीत पहिल्यांदाच कुणीतरी सादर केले आहे असे मला वाटते. याबाबतीत अभिनेता अलू अर्जुन, दिग्दर्शक सुकुमार अन् नृत्य दिग्दर्शक यांना मनापासून दाद द्यायलाच हवी. 


पुष्पा २ चित्रपटाच्या शेवटी अलू अर्जुनचे हात पाय बांधून देखील जी भयंकर मारधाड प्रस्तुत केली आहे ती बघून उरले सुरले तिकिटाचे पैसे फिटून जातात. असे दणक्यात अन् जब्राट सादरीकरण फक्त आणि फक्त तेलगू, तमिळ अन् मल्याळम चित्रपटसृष्टीतीलच कलाकार , दिग्दर्शक अन् इतर कलाकार सादर करू शकतात.सगळं खोटं असूनही पुष्पा ही व्यक्तिरेखा खरोखरची आहे असे वाटू लागते, त्याचं कारण, अभिनेता अलू अर्जुनने पुष्पा या व्यक्तीरेखेत ओतलेले प्राण..! माझ्या मते मणिरत्नम दिग्दर्शित  वेलू नायकन चित्रपटात कमल हसन यांनी ज्या पद्धतीने वेलू नायकन ही व्यक्तिरेखा अगदी समरसून सादर केली होती, त्याचं तोडीस तोड सुकुमार दिग्दर्शित पुष्पा भाग १ अन् पुष्पा भाग २ मध्ये अलू अर्जुनने पुष्पा ही व्यक्तिरेखा अप्रतिम सादर केली आहे.


पुष्पा १ मध्ये हाणामारी होती अन् त्याच्या सोबत भावनेची  किनार देखील होती, मात्र पुष्पा २ हा चित्रपट भावनेला व्यक्त होण्यात काहीसा कमी पडतो. तरी देखील पुष्पा २ चे सादरीकरण इतकं जब्राट झालं आहे की, बाकी सगळ्या बाबी गौण वाटू लागतात अन् पैसे वसूल होऊन भारी करमणूक होते. 


मी वैयक्तिक मुळात गजेंद्र अहिरे सर गुलजार साहेब, अन् सी.प्रेमकुमार यांच्या सामाजिक अन् भावनिक समृध्द चित्रपट कलेचा निस्सीम चाहता आहे. मानवी मनाच्या भाव भावनांचे रेशीम धागे या तिघांनी ज्या अप्रतिम पद्धतीने आपापल्या विविध कलाकृतीत सादर केलेली आहे ते सदैव कौतुकास्पद आहे. मानवी भावनेवर, मानवी संवेदनांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या रसिक मनांसाठी गजेंद्र अहिरे सर गुलजार साहेब, अन् सी.प्रेमकुमार यांच्या कलाकृती सदैव हृदयात राहतील यात तिळमात्र शंका नाही.


मात्र भावूक रसिक मनाला पुष्पा सारख्या श्रेणीतील कलाकृती जेवणाच्या ताटातील मिरचीच्या ठेच्या सारखं  झणझणीत आनंद देऊन जातात हे मात्र खरं..!


वंदे मातरम् 


एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - १८/१२/२०२४, बुधवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा