मला प्रवासात भेटलेली माणसं
" आत्मनिर्भर श्रीहरी..!"
======================
माझ्या शिक्षकी आयुष्यात अनेक विद्यार्थी औपचारिक बुध्दीमान भेटले, ते आर्थिक बाबतीत बऱ्यापैकी सक्षम झालेत.मात्र काहीच काहीजण असेही भेटले जे आयुष्याच्या दुनियादारीचे चटके सोसत आपल्या आयुष्यात मार्गक्रमण करत राहिले. आयुष्याच्या झगमगतेचे ग्लॅमर अशा काहींना लाभलं नाही.
मानसिक द्वंद्वात असे वाटू लागते की, औपचारिक शिक्षणातील बुध्दीमान योग्य आहेत अन् असतील देखील, मात्र एखादा किंवा एखादी व्यक्ती औपचारिक शिक्षणात बुध्दीमान नसेल तरी देखील त्या व्यक्तींनी आपल्या जाणिवा जागृत ठेवल्या असतील तर...
अखेर औपचारिक शिक्षणातील जाणीवा जिवंत असणारे श्रेष्ठ ठरतात असे वाटू लागते. त्याचं कारण जाणीवचं जर जागृत नसेल तर अहंकारी बुध्दी अहंकाराच्या वेशीला टांगलेली असते. जाणीव नसलेल्या बुध्दीची अहंकाराच्या मिरवणुकीत केविलवाणी धिंड निघत असते. बऱ्याचदा औपचारिक शिक्षणातील बौध्दिक व्यक्ती कौतुकी ठरते आणि ते योग्यही आहे.मात्र औपचारिक शिक्षणात काहीसे मागे पडलेले मात्र जाणीव जागृत ठेवलेले विद्यार्थी समाजात तेवढे कौतुकी ठरत नाहीत, जेवढे औपचारिक शिक्षणातील बुध्दिमान विद्यार्थी ठरतात..! कारण अशांच्या आयुष्याला ग्लॅमर लाभलेलं नसते. जाणीव नसलेल्या मानवी मनांच्या अहंकाराच्या मिरवणुकीत आजूबाजूला असतात फक्त आणि फक्त बौध्दिक, भौतिक , आर्थिक, शारीरिक इत्यादी अहंकाराच्या बढाया मारणारे मानवी घटक..!
श्रीहरी..!
साधारणतः चौदा वर्षापूर्वी इ.स.२०११ च्या नंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकलहेरा, ता. गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षकी सेवेत काही निरागस मने भेटली. निरागस मन हे मुद्दामहून तयार होत नसते. निरागस मन हे नियतीने मानवाला दिलेला भावनेच्या देव्हाऱ्यातील प्रसाद असतो. याचं शाळेत सेवा करत असताना श्रीहरी भेटला अन् जाणीवा जिवंत असणाऱ्या निरागस मनाने माझ्या वैयक्तिक आयुष्यात स्थान मिळवलं.कोण होता हा श्रीहरी..?
श्रीहरी इप्पर..!
तब्येतीने धडधाकट. औपचारिक शिक्षणात कौटुंबिक जबाबदारीमूळे मागे असलेला श्रीहरी..! आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आयुष्याची भटकंती करत करत श्रीहरीचे आई, वडील, बहीण, भाऊ जालना जिल्ह्यातून एकलहेरा गावात साध्या कुडाच्या झोपडीत स्थायिक झाले होते. काबाडकष्ट करून दररोजच्या आयुष्याचा प्रवास करायचा अन् पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच आयुष्य जगत जगायचे.याचं वर्तुळात श्रीहरीच्या कुटुंबाचा आयुष्याचा प्रवास सुरू होता. ना कुठला प्रबळ आर्थिक आधार ना कुठला भर भक्कम सामाजिक आधार..! सोबतीला होते फक्त आणि फक्त काबाडकष्ट, त्यातून प्राप्त होणारी मिळकत अन् त्या कष्टाच्या मिळकतीतून प्राप्त होणारा सर्वोत्तम आत्मानंद..!
वर्गात श्रीहरी तब्येतीने जरी धडधाकट होता, तरी देखील त्यानं त्याच्या धडधाकटपणाचा बलशाली रुबाब कुणा इतर शारीरिक दुबळ्या विद्यार्थ्यांवर गाजवला नव्हता. आपली अत्यंत नाजूक कौटुंबिक परिस्थितीची जाणीव ठेवून जगणारा श्रीहरी..! त्याच्या अंतर्मनातील भावना कित्येकदा माझ्याजवळ निवांतवेळी बसून व्यक्त करत असायचा. एकलहेरा येथे शिक्षकी सेवेत असताना शाळेच्या दीर्घ मध्यांतराच्या वेळी मी काहीवेळ एकतर शाळेच्या काहीसे बाजूला असलेल्या लक्ष्मी मातेच्या मंदिरात काहीवेळ निवांत बसत असे, नाहीतर वर्गात..! वर्गात मी एकटा बसलेला दिसलो की, श्रीहरी हळूच पावलांनी यायचा अन् माझ्या बाजूला काहीसे दूर काहीवेळ फक्त बसून असायचा. असे बरेच दिवस झाले. अखेर मला श्रीहरीच्या या अशा दररोजच्या बसण्याचा भावार्थ लक्षात येऊ लागला. बौध्दिक ,भौतिक , शारिरीक , आर्थिक, अन् सामाजिक न्युनगंडतेने ग्रासलेले कोणत्याही वयोगटातील स्त्री अन् पुरुषाचे मन आपली व्यथा कुणाजवळ तरी व्यक्त करू पाहत असते. फक्त असे मन आपल्या बौध्दिक ,भौतिक , आर्थिक, शारीरिक अन् सामाजिक परिस्थितीची कुणी टिंगलटवाळी करणार तर नाही ना..? याचं मानसिक भीतीपोटी बऱ्याचदा व्यक्त होत नसते.
श्रीहरी माझ्याजवळ निवांतपणे येऊन बसू लागला होता. त्याला अनौपचारिकपणे बोलते करण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यावेळी त्याच्या शाळेतील काही दिवसांच्या गैरहजेरी बद्दल विचारले. त्यावर श्रीहरी व्यक्त झाला..
" सर, बहिणीचे लग्न करायचे आहे. पैश्याची जुळवाजुळव करायची आहे. त्यामुळं मी लग्नसराईत रात्री लग्न मंडप कामासाठी जात असतो. रात्रभर मंडप उभारण्यासाठी खड्डे खोदणे, बांबू रोवणे, मंडप बांधणे हे सगळे कामं करावे लागतात. त्यामुळं थकून जातो. पुन्हा दिवसा कुठं कधी मधी काम करायला जावं लागतं.जर मी काम नाही केले तर आमच्या दीदीच्या लग्नाकरिता पैश्याची सोय होणार नाही. माझ्या वडिलांची तब्येत आता काहीशी अशक्त झाली आहे, त्यामुळं कुटुंबाची जबाबदारी जास्त करून माझ्यावरच येते. काम केलं तर घरचा प्रपंच चालेल. "
आमच्या दररोजच्या गप्पांच्या बैठकीत मी एकटकपणे श्रीहरी कडे बघत असायचो. याचं शरीर जरी धडधाकट असले तरी याचं वय काय अन् हा किती मोठ्या वयाच्या , जबाबदारीच्या गप्पा करतो. फक्त गप्पाच करत नाहीये. तर त्या गप्पांना प्रत्यक्ष कृतीचा हातभार लावतो आहे. आपल्या कुटुंबाचा भरभक्कम आधार होतो आहे. माणसाला परिस्थिती जबाबदारीने वागायला शिकवते. श्रीहरी सोबत काही वेळी गप्पांच्या बैठकीत काही प्रसंगी मला माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांची आठवण यायची. परक्या ठिकाणी राहून मेहनत करणे, मिळेल ते काम करणे ही मूल्ये माझ्या स्व. वडिलांच्या गतकाळातील आयुष्याला वर्तमानात बघत असायचो.
बौध्दिक, भौतिक , आर्थिक, शारीरिक अन् सामाजिक परिस्थिती समोरच्या कुणाजवळ तरी व्यक्त करणारी जाणीव असणारी मनं भेटली की अशांच्या मनातील न्युनगंडता काही प्रमाणात नाहीशी होते. याची प्रचिती श्रीहरी अन् माझ्या भेटीच्या वेळी होत असायची.काळाच्या ओघात माझी एकलहेरा येथून बदली झाली. श्रीहरीशी संपर्क राहिला नव्हता. मात्र गेल्या काही वर्षांपूर्वी श्रीहरीने माझा मोबाईल नंबर कुणाकडून तरी मिळवला अन् भरभरून बोलला.श्रीहरी आता जालना जिल्ह्यातील मूळ गावी नवीन घर बांधून स्थाईक झाला आहे.त्याच्या दीदीचे आनंदाने लग्न करून पवित्र जबाबदारी देखील पूर्ण केली आहे. आयुष्यभर काबाडकष्ट करणारे वडील स्वर्गवासी झाले आहेत.त्यामुळं श्रीहरी स्वतःच्या कुटुंबातील आई, धाकटा भाऊ अन् विवाह झालेल्या बहिणींच्या सुखासाठी जगत असतो. श्रीहरी आपल्या आवडीनिवडींना बऱ्याचदा तिलांजली देऊन कुटुंबासाठी आयुष्य व्यतीत करत आहे.अधून मधून मला आवर्जून फोन करून आपल्या भाव भावनांना व्यक्त करत असतो. श्रीहरी स्वतः उत्तम चार चाकी वाहन चालक ( ड्रायव्हर ) झाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रीहरी निर्व्यसनी आहे. दूरच्या जिल्ह्यांना भाडे ने आण करतो आहे. बँकेकडून कर्ज काढून नवे कोरे करकरीत ट्रॅक्टर विकत घेतले आहे. गावाकडे ट्रॅक्टरने होणारी मशागतीची कामे करून आर्थिक बाबतीत आत्मनिर्भर होत आहे.एकंदरीत अत्यंत समाधानी आयुष्य श्रीहरी , श्रीहरी सारखं जगत आहे. कित्येकदा श्रीहरीने मला सह परिवार आग्रहाने बोलावले आहे.पण अद्याप पर्यंत जाणे झाले नाही. जेंव्हा कधी मी श्रीहरीच्या मूळ गावी सह परिवार जाईल तेंव्हा पुन्हा एकदा आयुष्याच्या प्रवासातील भाव भावनांचा देव्हारा मांडून आम्ही एकमेकांच्या जवळ नक्कीच व्यक्त होऊ.
तथाकथित ग्लॅमर नसलेल्या, मात्र शाश्वत जाणीव असलेल्या आयुष्यात प्रिय विद्यार्थी श्रीहरी अगदी मजेत आहे.
ता.क. प्रिय विद्यार्थी श्रीहरी अन् माझा सदरील फोटो इ.स.२०१२ मधील आहे.
स्थळ : जि.प.प्रा.शा. एकलहेरा, ता.गंगापूर
वंदे मातरम्
लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक : २० एप्रिल २०२५, रविवार

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा