चिंतन ©️
नतमस्तक - ' संगीत देव बाभळी..! '
======================
प्रस्तुती - भद्रकाली प्रोडक्शन ( स्व. मच्छिंद्रजी कांबळी) प्रसाद कांबळी ,
लेखक दिग्दर्शक - प्राजक्त देशमुख,
संगीतकार - आनंद ओक ,
नाट्य कलाकार - आवली - संत तुकाराम महाराज यांच्या धर्मपत्नी (शुभांगी सदावर्ते ) अन् रखुमाई ( मानसी जोशी ),
आणि नाटक....' संगीत देव बाभळी..! '
द्विपात्री नाटक..!
आवली अन् रखुमाई यांचं अत्यंत प्रेमळ नातं अन् त्या भक्तिमय नात्यात न्हावून निघाले असंख्य भक्तगण..! संत तुकोबा आपल्या पत्नीला आवली म्हणत असतं. कित्येक वर्षानी हृदयाला भिडणारे अप्रतिम असे संगीतप्रधान नाटक सह परिवार बघितले.
संपूर्ण नाटक अप्रतिम आहे.देव बाभळी नाटक मध्यांतरानंतर भावूक होत जाते. प्रत्येक संवाद हृदयाला भिडतो. काही प्रसंगी डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. त्या प्रत्येक संवादाची फेक शुभांगीजी सदावर्ते अन् मानसीजी जोशी यांनी अप्रतिम केली आहे. आपापल्या पती विषयी असणारी ओढ अन् त्या ओढीतून स्री जातीची व्यक्त होणारी भावना हृदयाला भिडते. रखुमाई , एका प्रसंगात पुढील आशयाचा संवाद म्हणते की, घर सोडून जायचे वगैरे. त्यावर आवली पुढील आशयाचा संवाद व्यक्त होते..आपण घर सोडून जावं अन् पुन्हा घरी यायची इच्छा झाली तर आपल्या घराणेच जागा सोडली तर..? घर सोडून जायला मी काय रखुमाई हाय व्हयं..!
आवली हा संवाद व्यक्त झाल्या बरोबर रखुमाई एकटकपणे विठ्ठलाच्या मूर्तीकडे शून्य नजरेने बघत राहते. या प्रसंगाच्या वेळी एक प्रेक्षक अन् भक्त म्हणून डोळ्यातून अश्रू आले.आवलीच्या या संवादातून आपल्या घरासाठी, पतीसाठी एका स्री ची असणारी काळजी अन् निस्सीम प्रेम व्यक्त होते. त्याचं वेळी रखुमाई बाजूला असलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीकडे एकटक बघत राहते. त्या बघण्यात रखुमाईचा पश्चात्ताप असतो. माझ्यापेक्षा आवली श्रेष्ठ ठरली हा आत्मिक भाव रखुमाईच्या अंतर्रमनात येतो.आवली आपल्या पतीला कधीही सोडून न जाण्याची भावना व्यक्त करते, त्यावेळी ती भावना हृदयात पूजनीय ठरते. या प्रसंगात शुभांगीजी सदावर्ते ( आवली ) अन् मानसीजी जोशी ( रखुमाई ) यांनी जो काही अभिनय केला आहे त्याला तोड नाही..! नतमस्तक..!🙏
विशेष म्हणजे संगीत देव बाभळी या संगीत प्रधान नाटकातील सर्व नाट्य पदे अभिनय करणाऱ्या उपरोक्त दोन्ही नाट्य कलाकारांनी स्वतः live गायन केलेली आहेत.
मंत्रमुग्ध अन् साष्टांग दंडवत..!🙏
आम्ही उभयतांनी केलेला दंडवत हा शुभांगीजी सदावर्ते अन् मानसीजी जोशी या नाट्य कलावंतांना नव्हता, तर त्यांनी ज्या आत्मीयतेने तल्लीन होऊन संत तुकाराम महाराज यांच्या धर्मपत्नी आवली जिजाई अन् विठ्ठलाच्या धर्मपत्नी रखुमाई यांना आपल्यात जिवंत स्वरूपात उतरवलं त्यांना होता.असा अभिनय होणे नाही..!
मंत्रमुग्ध अन् दंडवत..!🙏
एखाद्या लोकभाषेला नाट्य कलेच्या माध्यमातून साता समुद्रापार नेण्याची किमया माझ्या मते संपूर्ण मानवी विश्वातील नाट्य क्षेत्रात फक्त आणि फक्त स्व.मच्छिंद्रजी कांबळी यांनाच साध्य करता आलेली आहे. मालवणी भाषेला साता समुद्रापार नेण्याची किमया थोर नाट्य कलाकार स्व. मच्छिंद्रजी कांबळी यांनीच केली.
वस्त्रहरण नाटक अजरामर केले ते स्व. मच्छिंद्रजी कांबळी यांनीच..! त्यांनी आपल्या अजरामर अभिनयाने खूप मोठ्या उंचीवर नेलेला तात्या सरपंच इतर कुणाला त्या उंचीवर नेता आला नाही.भद्रकाली प्रोडक्शन अन् स्व. मच्छिंद्रजी कांबळी मराठी नाट्य क्षेत्रातील अजरामर नाव आहे. आता त्याच भद्रकाली प्रोडक्शनचा सांस्कृतिक वारसा स्व.मच्छिंद्रजी कांबळी यांचे सुपुत्र प्रसादजी कांबळी पुढे सक्षमपणे नेत आहेत.
संगीत देव बाभळी नाटकाचे निर्माते प्रसादजी कांबळी यांची दिनांक १५/६/२०२५ रोजी छ्त्रपती संभाजीनगर येथे देव बाभळी नाटक संपल्यावर आवर्जून घेतली. संगीत देव बाभळी सारखे अत्यंत छान असे मराठी नाटक रंगभूमीवर आणल्याबद्दल एक मराठी नाट्य रसिक म्हणून त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. 🙏
स्थळ - संत एकनाथ नाट्य मंदिर छ्त्रपती संभाजीनगर
जय हरी माऊली..!
वंदे मातरम्
भक्त तथा नाट्य रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव आणि परिवार.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
नाट्य प्रयोग दिनांक -१५/६/२०२५, रविवार


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा