शनिवार, ११ एप्रिल, २०२६

भला माणूस शेख गनी उपाख्य डॉन..!


 


मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


भला माणूस शेख गनी उपाख्य डॉन..!


=====================


परवा दिनांक १०/४/२०२६ शुक्रवार रोजी दुपारी लासूर स्टेशन येथील स्वर्गीय शेख गनी उपाख्य डॉन यांच्या ऐन तारुण्यात झालेल्या स्वर्गवासानंतर त्यांच्या घरी दुःखद सांत्वनपर भेट दिली.सोबत होता माझा अत्यंत आवडता विद्यार्थी गणेश नानासाहेब पाटील गाजरे.


मी माझ्या आयुष्याच्या प्रवासातील जवळ जवळ दीड तप लासूर स्टेशन येथे व्यतीत केले. लासूर स्टेशनचे एक हळुवार प्रेमळ स्थान हृदयात आहे. आमचे स्व.आई दादा सोबत होते, त्यामुळे आधाराचा अन् मायेचा आनंद आयुष्यात होता.लासूर स्टेशन येथे वास्तव्यात असताना इ.स.२०१४ मध्ये माझ्या स्व.आईच्या पायाला फ्रॅक्चर झालेले होते.वैजापूर स्थित डॉ.रहाणे हॉस्पिटल येथे काही दिवसाच्या अंतराने न्यावे लागायचे. माझ्या स्व.आईच्या पायाची हालचाल अजिबात होत नसे.तब्येतही स्थूल होती.अशाच एका दिवशी आईला वैजापूर येथे न्यायचे होते.ऑगस्ट महिना होता.आभाळ भरून आले होते.त्यावेळी लासूर स्टेशन येथे ॲम्ब्युलन्स नसल्यात जमा होत्या.आताची परिस्थिती माहीत नाही. माझ्या माहितीनुसार आमच्या घराच्या पाठीमागे असलेल्या Dr. खरात साहेब ( आस्था हॉस्पिटल लासूर स्टेशन) आणि माझे प्रिय मित्र राहुल भाऊ शिरसाठ यांच्याच कडे ॲम्ब्युलन्स होती. Dr. खरात साहेबांना आदल्या दिवशीच भेटून उद्या ॲम्ब्युलन्स मिळेल का? अशी प्रश्नार्थक विनंती केली. डॉ.खरात साहेब भला देव माणूस..!क्षणाचाही विलंब न करता होकार दिला. फक्त त्यांनी नम्रपणे सांगितले की, " सर, ॲम्ब्युलन्स खूप दिवसांपासून बंद आहे आणि कामावर पण आलेली आहे.तरी पण पाठवून देतो.काहीच काळजी करू नका..!"


दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्या डॉ.खरात साहेब ( आस्था हॉस्पिटल लासूर स्टेशन) यांनी त्यांची ॲम्ब्युलन्स माझ्या घराच्या समोर पाठवून दिली.त्या ॲम्ब्युलन्सवर शेख गनी ज्यांना अख्खे लासूर स्टेशन डॉन म्हणून ओळखत असायचे ते चालक म्हणून आले होते. आल्या आल्या लगेच शेख गनी उपाख्य डॉन म्हणाले..

" गुरुजी , चला निघायचे का..?"

डॉन भाऊ, तरुण कणखर तब्येतीचा होता.मी त्यांना अत्यंत आत्मियतेने घरात आणले. नाही नाही म्हणत होते तरी देखील चहा पोहे असा एकंदरीत अल्पोपहार केला.माझी स्व.आई बाजूलाच अंथरुणावर झोपून होती.आईच्या आग्रहाने अल्पोपहार आटोपला. माझ्या स्व.आईचा स्वभावचं अत्यंत मायाळू होता.आईचा हा सदगुण जेवण, अल्पोपहार अन् चहाच्या वेळी पालखेड येथील माझ्या जिवलग मित्रांना प्रत्येकवेळी यायचा.हाच अनुभव माझ्या आयुष्याच्या प्रवासातील दुसऱ्या गावी लासूर स्टेशन येथे शेख गनी उपाख्य डॉन यांनाही आला होता.शेवटी मीच आईला म्हणालो..

" आई, जास्त आग्रह करू नको.त्यांना जेवढे हवे तेवढे पोहे घेतील."

अखेर अल्पोपहार आटोपला.घरी मी , माझे वयोवृद्ध वडील, माझी पत्नी आणि धाकटा मुलगा नयन त्याचे त्यावेळी वय साधारणतः पाच वर्षे असेल एवढेच जण होतो.आता आईला झोपलेल्या अवस्थेत घराच्या बाहेर उभ्या असलेल्या ॲम्ब्युलन्स मध्ये न्यायचे होते.एका बाजूला मी अन् माझ्या पत्नीने अंथरूणाला धरले आणि दुसऱ्या बाजूला शेख गनी उपाख्य डॉन भाऊ यांनी एकट्याने धरले. शेख गनी मला म्हणाले..

" गुरुजी, पॅक धरा, आईचे वजन जास्त आहे."

हळूहळू चालत चालत आम्ही आईला अलगदपणे ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेलो. माझे वयोवृद्ध वडील घरीच थांबणार होते.आम्ही लासूर स्टेशन येथील महावीरनगर येथून लासूरगाव मार्गे वैजापूर येथे निघालो.पावसाची रिमझिम सुरु झाली होती.ॲम्ब्युलन्स गाडी काहीशी अस्वस्थच जाणवू लागली होती.अखेर जे व्हायला नको तेच झाले.लासूर स्टेशन ते लासूरगाव रस्त्याच्या मध्यावर ॲम्ब्युलन्स बंद पडली.आता काय करावे..?

हा अत्यंत वेदनादायी प्रश्न माझ्या समोर निर्माण झाला होता.शेख गनी भाऊंनी खूप प्रयत्न केले पण ॲम्ब्युलन्स काही चालू होईना.अखेर मी लगेच माझे प्रिय मित्र राहुल भाऊ शिरसाठ ( शारदा मेडिकल ) यांना मोबाईलवरून संपर्क केला.प्रिय मित्र राहुल भाऊ शिरसाठ यांना जी आहे ती सत्य परिस्थिती सांगितली.राहुल भाऊंनी क्षणाचाही विलंब न करता त्यांची ॲम्ब्युलन्स काही वेळात पाठवून दिली आणि " अजून काही मदत लागली तर आवर्जून सांगा सर..!" राहुल भाऊ शिरसाठ यांचा मानसिक आधार त्यावेळी धीर देऊन गेला.


राहुल भाऊ शिरसाठ यांची ॲम्ब्युलन्स काही वेळात आली होती.वरतून रिमझिम पाऊस सुरू होता.रिमझिम पावसात आईला बंद पडलेल्या ॲम्ब्युलन्स मधून बाहेर काढून बाजूच्या दुसऱ्या ॲम्ब्युलन्स मध्ये न्यावे लागणार होते.शेख गनी भाऊंनी मला धीर दिला अन् म्हणाले..

" गुरुजी टेन्शन मत लो, मैं हुं..! "

असे म्हणून आमच्या आईच्या अंथरूणाला एका बाजूने घट्ट पकडून अन् दुसऱ्या बाजूला मी , माझी पत्नी यांनी पकडून आईला बंद पडलेल्या ॲम्ब्युलन्स मधून बाहेर काढून बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या ॲम्ब्युलन्स मध्ये अलगदपणे ठेवले.आभाळातून रिमझिम पाऊस सुरू होता.आई भिजू नये म्हणून आईच्या चेहऱ्यावर छत्री धरण्याची जबाबदारी धाकटा मुलगा नयन याने निभावली होती.आईला बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या ॲम्ब्युलन्स मध्ये अलगदपणे ठेवल्यानंतर शेख गनी भाऊकडे बघून माझ्या स्व.आईने दोन्ही हात जोडले. आईने तिच्या मूळ अत्यंत प्रेमळ अन् मायाळू स्वभावाला अनुरूप अतिशय नम्रपणे जोडलेले हात कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या आपल्या संस्कृतीचे मूल्य दर्शवित होते.त्यावेळी माझ्या अन् माझ्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू आले होते.शेख गनी भाऊंनी ते ओळखले माझ्या खांद्यावर हात ठेवून मला म्हणाले..

" गुरुजी, टेंशन मत लो, उपरवाला साथ हैं.आप अपनी अम्मी की सेवा कर रहे हो.खुशनसीब हो..! रस्ते में अगर कुछ तकलीफ होती हैं तो मुझे तुरंत कॉल करो.मैं जल्द से जल्द पहुंच जाऊंगा..! "

दुसऱ्या ड्रायव्हर भाऊंना आवश्यक ती काळजी घेण्याचे सांगितले आणि आम्हाला पुढील मार्गाला सुव्यवस्थीपणे मार्गस्थ केले.


जो पर्यंत लासूर स्टेशन येथे वास्तव्याला होतो तो पर्यंत अधून मधून मला शेख गनी भाऊ कॉल करून आईच्या तब्येती बाबत खुलासा घेत असायचे.मी माझ्या आईच्या आयुष्यावर आधारित आई वडील हयात असताना एकतीस भागात लेख लिहिलेले आहेत.त्यातील एका भागात शेख गनी भाऊंनी आमच्या आयुष्यात कृतीतून व्यक्त केलेल्या मदतीचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आहे.सदरील पुस्तक अजून प्रकाशित केलेले नाही.भविष्यात बघू..!


जात धर्म ह्या मानव निर्मित बाबी..! ज्याने त्याने त्याचा यथा योग्य सामाजिक हितासाठी उपयोग करायला हवा.त्यांचे उपद्रवमूल्य वाढले की सामाजिक वातावरण गढूळ होते.धर्माच्या मदतीने माणसाने समुहाने , आत्मियतेने , आनंदाचे काही क्षण साजरे करुन आपापल्या परंपरा जपत जगायला अन् जपायला सुरुवात केली. काळाच्या ओघात जात, धर्म , वंश इत्यादी बाबींचा माणसाच्या आयुष्यात कधी अहंकाराने कधी न्यूनगंडाने वापर होऊ लागला.यात घुसमट झाली ती कमी संख्येच्या, संवेदशील मनाच्या अन् भावनाशील मनाच्या मानवी घटकांची..! माणसाच्या आयुष्यात रक्ताचे नाते श्रेष्ठ की रक्त विरहित नाते श्रेष्ठ..? हा प्रश्न आपल्याच पूर्वजांच्या कित्येक उदाहरणांवरून त्यांनी आपल्या समोर प्रस्तुत करून ठेवलेले आहे. मोह, माया अन् मानवी आयुष्य यावर श्रीकृष्णाने आपल्या विद्वत्तेने केलेले वैचारिक भाष्य सर्व मानवी घटकांना सदैव अनुकरणीय आहे.शेख गनी माझा रक्ताचा नातेवाईक नव्हता, मात्र विधात्याने ऐन संकटात पाठविलेला त्यावेळचा देवदूत होता. अशावेळी रक्ताची नाती बोधट ठरतात अन् चिरंजीव ठरतात रक्त विरहित नाती..! आर्ष कालीन , प्राचीन , मध्ययुगीन अन् आधुनिक काळात मानवी जीवनातील असे कित्येक उदाहरणे आहेत ज्यांनी ऐन वेळी मदत करतो तो विठ्ठल याची अनुभूती कित्येकांना दिलेली आहे.


आमच्या आयुष्यातील देवदूत स्व.शेख गनी उपाख्य डॉन भाऊ यांचा स्वर्गवास झाला आहे हे मला सोशल मीडियाद्वारे उशिरा माहित झाले. लासूर स्टेशन येथील त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे , सांत्वनपर गृहभेट घेतली.यावेळी त्यांच्या घरातील जेष्ठ बंधू उपस्थित होते.त्यांनाही डॉन भाऊंच्या माणुसकीच्या आठवणी सांगितल्या.त्यांनाही गहिवरून आले.


असो, शेख गनी उपाख्य डॉन भाऊ ( सावंगी लासूर स्टेशन )यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच भारतमातेच्या चरणी प्रार्थना..!

भावपूर्ण श्रद्धांजली..!🙏


वंदे मातरम् 


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : १२/४/२०२६, रविवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा