रविवार, १४ जून, २०२६

कट्यार काळजात घुसली

कट्यार काळजात घुसली 







 


#आमचे गाव आमची माणसं ©️


कट्यार काळजात घुसली 


=====================


मी सोशल मीडिया व्हॉट्स ॲपवर संगीत कट्यार काळजात घुसली या नाटकातील ' सुरत पिया की छिन बिसराये ' या नाट्य पदाचा व्हिडिओ ऐकला अन् बघितला. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिषेकजी काळे यांनी गायन केलेले नाट्य पद ऐकल्यावर ईश्वरीय सानिध्यात गेलो.अभिजितजी काळे यांना हृदयातून वंदन केले.तसेच कट्यार काळजात घुसली या नाटकाच्या बाबतीत ज्येष्ठांनी सांगितलेल्या आठवणीत रमून गेलो.


पालखेड येथे वास्तव्यात असताना माझे सख्खे चुलते तीर्थस्वरूप स्व.कचरू चंपतराव जाधव उपाख्य आण्णा यांच्या जवळ त्यांच्या वार्धक्यात मी अधून मधून बसत असायचो.ज्येष्ठांच्या जवळ बसलं अन् त्यांना बोलतं केलं की, बराच इतिहास आपल्याला माहित होतो हा माझा स्वानुभव आहे. हाच अनुभव मला आणि आमच्या दोन्ही मुलांना माझे स्व.तीर्थरूप वडीलांच्या वार्धक्यात त्यांच्या जवळ नेहमी संध्याकाळी बसल्यावर यायचा.


असो, पालखेड येथे वास्तव्यास असताना एकदा माझे सख्खे चुलते स्व.कचरू चंपतराव जाधव यांच्या जवळ पालखेड येथील आमच्या आळीतील  ओट्यावर बसलेलो होतो. त्यांना आपल्या गावातील नाट्य परंपरेविषयी बोलते केले होते.त्यावेळी ' कट्यार काळजात घुसली ' या संगीतप्रधान नाटकाचा विषय मी काढला होता.तीर्थस्वरूप कचरू आण्णा यांनी सांगितले होते की, " आपल्या पण गावात कार्तिकी यात्रेच्या वेळी कट्यार काळजात घुसली या नाटकाचा नाट्य प्रयोग झाला होता.आपल्याच गल्लीतील जैन नाट्य मंडळ मधील कलाकारांनी हा नाट्य प्रयोग केला होता.त्यावेळी तू लई लहान असशील.पंडित भानू शंकर शास्री ही भूमिका शांतीलाल शेठ जैन यांनी सादर केली होती आणि खाॅंसाहेब आफताब हुसेन यांची भूमिका राजा नाना जैन यांनी केली होती. याच नाटकाला हार्मोनियमवर साथ दिली होती कचरू शेठ जैन यांनी आणि तबल्यावर साथ दिली होती आपल्याच गल्लीतील सखाराम पगार यांनी.त्यानंतर या नाटकाचा प्रयोग पुन्हा आपल्या गावात झाला नाही. त्याचं कारण नाटकातील सर्व  नाट्य पदे शास्त्रीय संगीतावर होती.त्याचे गायन आणि संगीत साथ द्यायला कुणी पुढे आले नाही."


आमच्या पालखेड गावात तत्कालीन काळात प्रामुख्याने शास्त्रीय संगीत प्रधान नाट्य मंडळे दोन होती.त्यातले एक होते रोकडीया हनुमान नाट्य मंडळ आणि दुसरे होते जैन नाट्य मंडळ..!रोकडीया हनुमान नाट्य मंडळ मध्ये हार्मोनियमवर साथ माझे सख्खे चुलते तीर्थस्वरूप स्व.कचरू चंपतराव जाधव उपाख्य आण्णा द्यायचे आणि तबल्यावर स्व.तीर्थस्वरूप गीताराम काका कुमावत द्यायचे.विशेष म्हणजे दोघेही बालमित्र होते. तीर्थरूप अण्णांनी मला सांगितले होते की, आम्हा दोघांचा जन्म एकाच दिवशी झाला होता.स्व.गीताराम काका कुमावत हे आमचे आदरणीय अनौपचारिक प्रिय मित्रवर्य नारायणराव कुमावत सर ( शिक्षण विस्तार अधिकारी ) यांचे वडील होते.


पालखेड गावातील तत्कालीन काळातील दुसरे शास्त्रीय संगीत नाट्य मंडळ होते जैन नाट्य मंडळ..! जैन नाट्य मंडळ मध्ये हार्मोनियमवर साथ माझा जिवलग बालमित्र नितीन जैन याचे आजोबा स्व.तीर्थस्वरूप कचरू भाऊ जैन द्यायचे आणि तबल्यावर साथ आमच्याच आळीतील स्व.सखाराम पगार द्यायचे. विशेष म्हणजे स्व.तीर्थस्वरूप कचरू भाऊ जैन एका डोळ्याने अंध होते, मात्र उच्च कोटीचे सारस्वत होते.माझ्या मते आमच्या पालखेड गावात शास्त्रीय संगीत मध्ये हार्मोनियमवर सिद्धहस्त असलेले तीन सर्वश्रेष्ठ सारस्वत होऊन गेलेले आहेत.ते तीन सारस्वत क्रमवार पुढील प्रमाणे होत..१) माझे आजोबा स्व.चंपतराव देविदासराव जाधव २) माझे चुलते स्व.कचरु आण्णा जाधव आणि ३) स्व.कचरू भाऊ जैन..!तसेच माझ्या मते आमच्या पालखेड गावात तबला मृदुंगावर सिद्धहस्त असलेले तीन सर्वश्रेष्ठ सारस्वत होऊन गेलेले आहेत.ते क्रमवार पुढील प्रमाणे..१) स्व.तीर्थस्वरूप सखाराम काका पगार २) माझे चुलते नागोराव काका जाधव आणि ३) स्व.सखाहरी काका गायकवाड मिस्तरी..!


कला देवतेच्या कृपाशीर्वादाने श्रीमंत झालेली आमच्या गावातील उपरोक्त सारस्वतांची पिढी आता हयात नाही.मात्र त्यांनी त्यांच्या काळात आमच्या पालखेड गावात नाट्य परंपरेची जी समृद्ध परंपरा रुजवली, जपली , वाढवली त्याचा एक पालखेडकर म्हणून सदैव अभिमान वाटतो.आजही जेव्हा कधी टीव्हीवर, मोबाईलवर एखादे नाट्य पद ऐकू येते, बघायला मिळते तेव्हा तेव्हा आमच्या पालखेड गावातील समृद्व कलेचा वारसा स्मरणात येतो.ते स्मरण करते वेळी पालखेड गावातील  ज्या ज्या सारस्वतांनी नाट्य परंपरेला रुजवलं, जपलं आणि वाढवलं त्या सर्वांना हृदयातून  विनम्र वंदन करतो..!🙏


वंदे मातरम् 


एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : १४/६/२०२६, रविवार



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा