" बालमित्र- भानू मामा.."
=======================================
माझ्या आयुष्यात सगळयाच चवीचे मित्र मला नियतीने दिले.त्या सर्व चवीच्या मित्रांनी माझ्या आयुष्यातील जेवणाच्या ताटातील सर्व क्षणांची लज्जत खूप रसदारपणे वाढविली..! एकमात्र नक्की ज्यांना कुणाला बालपणी,त्यातल्या त्यात खेड्यातील असे विविध चवीचे प्रिय मित्र लाभले त्यांच्या आयुष्याचे सार्थक झालेच म्हणून समजा..! कारण खेड्यातील बालवयात जे बालमित्र ज्यांना कुणाला भेटतात त्यांच्या पासून तुम्ही काहीच लपवू शकत नाही..!☺ एकमेकांना सगळं कसं मोकळं चाकळं माहीत असतं..!☺अर्थात शहरात देखील असं असेलच,पण गावरान तडका जो खेड्यात मिळतो,त्याची सर कशालाच नाही..!☺
नियतीनं मला असाच एक अगदी मनमोकळा बालमित्र दिला,ज्याचं मनमोकळं वागणं माझ्या सकट सर्व मित्रांना खूप जवळचं वाटलं, वाटत आहे अन् आमच्या मरे पर्यंत वाटत राहील..! तो माझा प्रिय बालमित्र भानुदास एकनाथ जगदाळे पाटील...!
हा जरी आमचा बालमित्र असला तरी याला आम्ही सर्वजण
" भानू मामा " असंच म्हणतो,कारण याचा भाचा गावातीलच असल्याने बहुदा त्या आमच्या भाच्या सोबत आम्हा मित्रांनाही आमच्या भानुदास ला " भानू मामा " असे म्हणायची सवय लागली असावी..!☺
भानू मामा..!
मनात काहीही न ठेवता व्यक्त होणारा मित्र..! याच्या पोटात एक अन् ओठात एक असं काहीच नाही.जे काही बोलायचे ते कुणाचीही भीडभाड न करता बोलून टाकायचे..! अशा रोखठोक स्वभावाचा आमचा प्रिय बालमित्र भानुमामा..!थोडक्यात एका घावात समोरच्याचे अनेकानेक तुकडे करणारा याचा स्वभाव..! कदाचित भानू मामाच्या याच स्वभावाच्या वैशिष्ट्यामूळे याचे अन् माझ्या तीर्थरूप वडिलांची खूप चांगली मैत्री आहे..! ☺माझ्या वडिलांना भानू मामा व त्याचा धाकटा भाऊ प्रिय बाबासाहेब ( निवृत्त भारतीय सैनिक ) यांचा खूप खूप अभिमान वाटतो.तसे ते नेहमी बोलून देखील दाखवतात.
आमच्या पालखेड गावात पहाटे फिरायला जायची सुरुवात ज्याला इंग्रजीत Morning walk असेही म्हणतात त्याची सुरुवात आम्हीच दोघांनी सुरू केली.त्यापूर्वी कुणी पालखेड गावात अशी पहाटे फिरण्याची परंपरा माझ्या तरी ऐकण्यात पाहण्यात नव्हती..! आज त्याच पहाटे फिरायला जायच्या आम्ही दोघांनी सुरू केलेल्या सवयीचे वटवृक्ष झाले आहे,कारण आज पालखेड गावातील अनेक माणसं पहाटे,फिरायला जात आहेत..!
इ.स.१९९५ ते अंदाजे २००० पर्यंत आमच्या पालखेड गावात क्रिकेट खेळाला जिवंत ठेवायचे काम याच भानू मामाने केले.पालखेड गावात मी ज्या क्रिकेट संघात खेळायचो त्या संघाचे नाव होते..शिवशक्ती क्रिकेट संघ..आणि भानू मामा आमच्या याच संघाचा कर्णधार होता.याची गोलंदाजी अतिशय वेगवान..! फलंदाजी पण करायचा,पण गोलंदाजी मध्ये विशेष वेग अन् अचूक मारा करायचा..!
माझ्या गावातील काही मित्रांना माहीत आहे की, मला रात्री १० नंतर झोप आवरत नाही.बाकी पहाटे किती पण वाजता उठायला लावा..! माझी हीच रात्री लवकर झोपायची सवय मोडायची म्हणून यांनी एकदा मला अद्दल घडविली. अंदाजे १९९७ -९८ चा कालखंड असेल,आमच्या पालखेड गावातील जिल्हा परिषद शाळेच्या ओट्यावर रात्री ९ वा.आम्ही मित्र गप्पा मारण्यासाठी बसलो,त्यात हा भानू मामा पण होता.गप्पांचा फड रंगला पण मला पडल्या पडल्या लागली झोप..! हे सगळे शहाणे मित्र मला तिथंच सोडून घरी निघून गेले. मला थेट पहाटे पहाटे जाग आली.मी एकदम ताडकन उठून चीनभिन होऊन इकडं तिकडं पाहू लागलो तर कुणीच नाही,फक्त काही कुत्रे ज्यांना शुद्ध भाषेत श्वान असे म्हणतात ते माझ्याच बाजूला बहुदा माझे राखण करायला होती..!😂 दुसऱ्या दिवशी हाच भानू मामा मला भेटला अन् म्हणतो कसा..
" काय,दादा झोप बरी झाली का..?"☺
खूप हसलो होतो त्या प्रसंगावर आम्ही..!
वरील प्रसंग सांगण्याचे कारण एकच की, एवढ्या हक्काने खोड मोडणारी मैत्री लाभणे याला पण नशीबच लागते.अर्थात माझी ती झोपण्याची खोड अद्याप शाबूत आहे म्हणा..! फक्त त्यात काही वाढ झाली आहे झोपी जाण्याची इतकेच..!☺
हाच तो भानू मामा आहे,ज्याने माझ्या स्व.आईला डोंगरे हॉस्पीटल वैजापूर येथून लासूर स्टेशन येथे घेऊन येण्यासाठी त्याच्या चार चाकी गाडीतून सगळी माणसं उतरवून दिली होती अन् ड्रायव्हर सह त्याची चार चाकी गाडी मला दिली होती.या प्रसंगाचा उल्लेख मी माझ्या स्व.आईच्या आयुष्यावर लिहिलेल्या
" माझी आई एक मायाळू विद्यापीठ " या पुस्तकात सविस्तर केलेला आहे.असा मित्र नियती फार कमी लोकांच्या आयुष्यात देत असते.मी या बाबतीत खूप नशीबवान आहे.भानू मामा सारखी माणसं स्वभावाने रोखठोक असतात,पण यांच्या मनात कधीच कुणा विषयी आकस,द्वेष नसतो.मनाने खूप निर्मळ असतात अशी माणसं..!
असा आमचा रोखठोक,प्रेमळ,निष्कटी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या शिवशक्ती क्रिकेट संघाचा तेज तर्रार गोलंदाज अन् कर्णधार भानुदास एकनाथ जगदाळे पा. उपाख्य प्रिय भानू मामा..!
वंदे मातरम्
लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: २७ सप्टेंबर २०१९, शुक्रवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा