*** चिंतन ***
" बाप व त्याच्या मुली..! "
_______________________________________________
काल दिनांक २४ सप्टेंबर २०१८ रोजी माझ्या सध्याच्या शाळेतील,माझ्या मुलींना इतिहासातील अनेक बापांचे दाखले देत असताना सहज एक छोटीशी कृती माझ्या मुलींकडून झाली..! त्यांनी काही पैसे आणले होते.माझ्यातील कुतूहल जागे झाले अन् मी माझा अध्यापनाचा घटक शिकविण्याचा घटक थांबवून माझ्या या मुलींना सहज विचारले...
" दीदी, हे पैसे तू कुणाकडून आणले..?"
माझ्या मुलींनी पटकन उत्तर दिले...
" सर, आमच्या वडिलांकडून...!"
हेच उत्तर माझ्या मुलींकडून येणार मला अपेक्षित होते अन् झाले तसेच...!हे उत्तर ऐकल्या बरोबरच माझ्या चेहऱ्यावरील हावभाव माझ्या या मुलींनी पटकन ओळखले..! मी काही क्षण थांबलो अन् माझ्या मुली मला लगेच म्हणाल्या..
" का, सर...काय झाले..? आमचे काही चुकले का..?"
मी खूप स्तब्ध झालो होतो..काय बोलावं हेच समजेना..! माझ्या या मुलींना माझी समजावून सांगण्याची परिभाषा समजेल का या प्रश्नात मी गुंतून गेलो होतो..! पण अखेर माझ्या मुलींनी मला बोलते केलेच..! त्या आहेतच साक्षात ईश्वराचा अवतार..!मग मी कसा निव्वळ स्तब्ध राहू शकतो..?
मी माझ्या मुलींना नीट समजावत सांगू लागलो....,
" हे बघ दीदी, कोणत्याही मुलीच्या आयुष्यात ईश्वरा पेक्षाही सर्वात उच्च स्थान कुणाचे असेल तर......वडिलांचे...! हे तेच वडील असतात,जे जगात कुणालाही नकार देऊ शकतात पण आपल्या लेकीला कधीच नकार देऊ शकत नाही..! नकार हा शब्द त्यांच्या लेकींसाठी नसतोच मुळी..! तर....प्रत्येक बापाच्या अंतर्मनात आपल्या मुलींसाठी फक्त आणि फक्त होकार असतो..! हा तोच सर्व सामान्य परिस्थिती असलेला बाप असतो,जो..आपल्या लेकीने काहीही मागितले तर...चटकन त्यांचे लाड पुरवतो..! भले मग त्या करिता त्या बापाला कितीही त्रास सहन करावा लागला, तो बाप कितीही आर्थिक विवंचनेत असला तरी...! तरी हा तोच बाप असतो ,जो आपल्या लेकीने कोणतीही वस्तू मागितली की, देण्यासाठी तो सदैव तत्पर असतोच..! त्याचे एकमेव कारण म्हणजे...त्या बापाची ,त्याची लेक म्हणजे हळुवार भावूक कोपरा असते..! अगदी त्या बापाच्या शेवटच्या श्वासापर्यंत..! आणि भारतीय इतिहास साक्षीला आहे की,भावुकता ही सदैव ईश्वराला सदा सर्वदा प्रिय राहत आलेली आहे..!
पण माझ्या मुलींनो, एक दुसरी ही पण बाजू लक्षात घ्या की, सर्व सामान्य परिस्थती असणाऱ्या बापाने, आपल्या लाडक्या लेकीला पटकन ज्यावेळी पैसे दिले,मागितली ती वस्तू दिली...तर त्याचं वेळी तोच बाप काही वेळानंतर जर तुम्ही बघितला तर त्याचे आर्थिक नियोजन सुरू झालेले असते..!
कशाचे..?
तर..जे पैसे माझ्या मुलीला मी दिले आहेत,त्याची तजवीज मी आता कुठून व कशी करू..? एक बाप आपल्या लेकीला हे कधीच बोलणार नाही की,......
" मी तुला पैसे देणार नाही..!" त्याच्या मुलीला दिलेल्या पैश्यांचे नियोजन प्रपंचात कुठून करायचे याच नियोजनात तो गुंतून जातो..
त्या सर्व सामान्य परिस्थिती असलेल्या बापाच्या मनात त्याच्या लेकीसाठी नकार हा नसतोच..! मग तुम्ही अशावेळी काय करायचे सांगू...?
आपल्या आईला ,कोणत्याही कार्यासाठी पैसे, वस्तू मागा..! कारण कोणाचीही आई, तिला अशावेळी भावनेच्या नात्यातील सुवर्णमध्य साधायला खूप छान प्रकारे येते.! ही तीच आई असते जी आपल्या पतीचे व आपल्या लेकरांची मन जपत प्रपंचाचा गाडा सुरळीतपणे हाकत असते...! आई, वेळ प्रसंगी आपल्या लेकीला नकार देईल पण बाप देऊच शकत नाही..! हा बाप स्वतः ला चिमटा घेऊन आपल्या ईश्वरीय लेकिंचे लाड पुरवून आपल्या लाडक्या लेकीला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न सदा सर्वदा करत असतो..!
म्हणून आईला वस्तू , पैसे मागा...! आणि त्या नंतर जे उत्तर आईचे येईल तेच अंतिम मानून त्याचा नम्रपणे स्वीकार करा.. !
पटलं का तुम्हाला..माझे म्हणणे...?"
माझ्या मुली खूप खूप भावूक झाल्या होत्या..! बहुतांशी माझ्या मुलींना गहिवरून आलं होतं..!
त्यांनी एकमताने मान्य केले की,...
" या पुढं आम्ही कोणतीही वस्तूं, पैसे आमच्या आईलाच मागू..!"
मलाही आज खूप गहिवरून आले होते.कारण एक बाप आपल्या लेकींना " बाप व त्याच्या मुली " या हळुवार नात्यातील विण समजावून सांगत होता..!
वंदे मातरम्..!
ता.क.: माझ्या सध्याच्या अंधारी गावातीला शाळेतील या मुली खूप खूप ग्रेट आहेत..!
लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: २५ सप्टेंबर २०१८

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा