मंगळवार, १० सप्टेंबर, २०१९

" ग्रामीण रंगभूमीवरील उत्कृष्ट खलनायक,भानुदास भाऊ शिंदे "


                   आमचे गाव, आमची माणसं..!

 " ग्रामीण रंगभूमीवरील उत्कृष्ट खलनायक,भानुदास भाऊ शिंदे  "




_____________________________________________

दशक ८० चे..!
तशी आमच्या पालखेड, ता.वैजापूर जिल्हा औरंगाबाद या गावाला जवळजवळ १०० वर्षाची समृद्ध नाट्य परंपरा आहे..!
आमच्या पालखेड गावात आमच्या पिढीने पाहिलेल्या...... आतापर्यंतच्या नाटकातील ज्या नाटकाचा विक्रम व त्याच्या आठवणी आजही सर्वांच्या हृदयात कायमच्या घर करून राहिल्या आहेत..! त्या...ज्या नाटकातील प्रत्येक पात्र,त्यांचे संवाद,त्यांचा तो ऐंशीच्या दशकातील अजरामर झालेला अभिनय आम्हा पालखेडकरांना आजही रोमांचित करतो..!

ज्या प्रमाणे हिंदी चित्रपट सृष्टीत " शोले " चित्रपट व त्यातील प्रत्येक पात्र ,त्यातील संवाद अजरामर झाले आहेत,अगदी तसेच,त्याच सन्मानाचे स्थान आमच्या पालखेड नगरीत आमच्या पिढीने पाहिलेल्या एका अजरामर नाटकाचे व त्यातील पात्रांचे स्थान...अद्याप तरी ध्रुव ताऱ्यासारखे अढळ आहे...!
त्या अजरामर नाटकाचे नाव आहे........

" मानी मराठा...!"

हे नाव ऐकल्याबरोबर खात्रीने सांगतो की, आमच्या पिढीतील व आमच्या पेक्षा ज्येष्ठ असणारी पिढी.. ज्या..ज्या रसिकांनी हे नाटक पाहिलेले असेल त्यांच्या नजरेसमोर आमच्या गावातील एक सद्गृहस्थ व त्यांनी " मानी मराठा " या नाटकात जिवंत अभिनय करून  उभा केलेला  मुघल बादशहा औरंगजेब नक्कीच येणारच....! त्या औरंगजेबाची अजरामर भूमिका केली होती ...आदरणीय भानुदास भाऊ शिंदे..!

कडक, भेदक आवाज,करडी नजर, आक्रमक आवाज लाभलेले आमच्या गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय भानुदास भाऊ शिंदे..!सुशिक्षित माणूस..! खूप गरिबीचे चटके जवळून पाहिलेल्या या ग्रेट माणसाची महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेवर प्रचंड आस्था..!आमच्या पालखेड गावात मी व माझा बालमित्र विजय वैजीनाथ गायकवाड आमच्या दृष्टीने खूप ग्रेट असणाऱ्या व सामाजिक चळवळीतील आमचे आदर्श असणाऱ्या दोन  पुरुषांना सदैव वंदनीय स्थानी मानत आलेलो आहोत ते म्हणजे डॉ.दिलीप शेळके व भानुदास भाऊ शिंदे..! विशेष म्हणजे आमचे या दोन्ही सामाजिक वैचारिक आदर्श व्यक्तिमत्वांनी मानी मराठा या नाटकात खूप अविस्मरणीय भूमिका केलेल्या आहेत..! भानुदास भाऊ शिंदे हे एकमेव असे ग्रामीण भागातील व्यक्तिमत्व आहे की,ज्यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्या नागपूर येथील दीक्षा भूमीवर हजारो लोकांसमोर जाहीर भाषण केले आहे...तेही ऐंशीच्या दशकात..! अमोघ वकृत्वाचे धनी आहेत शिंदे भाऊ..!

आम्ही अंदाजे बारा ते तेरा वर्षाचे असू,त्यावेळी मानी मराठा या नाटकाची रंगीत तालीम पक्के आठवत नाही पण बहुदा आदरणीय विश्वनाथ भाऊ दाभाडे किंवा आदरणीय नवनाथ काका गायकवाड ( विजुचे सख्खे चुलते) यांच्या दुकानात रात्री होत असे..

अखेर...कार्तिक अमावास्येला आमच्या गावाच्या यात्रे निमित्त रात्री " मानी मराठा " या नाटकाला सुरुवात होत असे....
तो क्रूर मुघल बादशहा औरंगजेब उभारण्याची ताकद आमच्या गावातील  खलनायक सम्राट भानुदास भाऊ शिंदे लीलया वठवत असे..!आम्ही नाटकाच्या ओट्या समोर, बारदाण्यावर बसून आपल्या धाकट्या महाराजांचा म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज व क्रूर मुघल बादशहा औरंगजेब यांच्यातील जिवंत अभिनय असलेली नाट्य कलाकृती पाहून मंत्रमुग्ध होत असे..! भानुदास भाऊ शिंदे बरेचसे संवाद उर्दू मिश्रीत हिंदीत उत्तम प्रकारे म्हणत असे.

काय ती अभिनयाची ताकद होती भानुदास भाऊ शिंदे यांची.आम्हाला त्यांनी अभिनय केलेला औरंगजेब पाहत असताना ,असे वाटे की, उठून या क्रूर मुघल बादशहा औरंगजेबाला रंगमंचावर जाऊन मारावं..! एखाद्या खलनायकाची भूमिका करणाऱ्या कलाकाराविषयी ज्यावेळी प्रेक्षकांना असा भयंकर राग येतो, तेंव्हा तो विजय असतो, नाट्य कलाकाराचा..! तो विजय असतो त्याच्या अभिनयाचा. आणि हा विजय भानुदास भाऊ शिंदे यांच्या वाट्याला नक्कीच आलेला आहे. प्रा.वसंत कानेटकर लिखित " इथे ओशाळला मृत्यू " या अजरामर नाटकातील प्रभाकर पणशीकर यांनी साकारलेला क्रूर मुघल बादशहा औरंगजेब व आमच्या पालखेड गावात " मानी मराठा " या नाटकातील भानुदास भाऊ शिंदे यांनी साकारलेला औरंगजेब खूप समान आहेत..अभिनयाच्या बाबतीत.

आज भानुदास भाऊ शिंदे हे खूप श्रध्देने आमच्या पालखेड येथील ग्राम दैवत श्री पारेश्वर महादेवाची निस्सीम सेवा करत आहेत. सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजी यांच्या कार्याला वाहून घेतले आहे. तसेच भानुदास भाऊ,उत्तमप्रकारे ब्रम्हानंदी भजने ( राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भजने) गातात.आमच्या गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विविध गीतांना गाणारे भजनी मंडळ आहे,त्यात भानुदास भाऊ शिंदे आवर्जून कृतियुक्त उपस्थिती लावतात..! उंच पहाडी आवाजात त्यांनी गायिलेले भजन ऐकण्याचा आनंद काही औरच असतो.

ता.क.: आमच्या गावातील प्रभाकर पणशीकर आहेत,भानुदास भाऊ शिंदे..! ग्रामीण रंगभूमीवरील उत्कृष्ट खलनायक..!

वंदे मातरम्..!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव ©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:११ सप्टेंबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा