शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९

" जिवलग बालमित्राची भेट..!"



आमचे गाव आमची माणसं..!

" जिवलग बालमित्राची भेट..! "





_____________________________________________

आमचे गाव आमची माणसं..!©️

" भेट..! "
___________________________________________

आलास,खूप खूप वेळ निवांत बसलास, तुला अन् मलाही खूप खूप बरे वाटले..! माझा जिवलग बालमित्र म्हस्के आण्णासाहेब..! तू ही औरंगाबाद येथे स्थिरावलास व मी ही हळूहळू स्थिरावतोय..!
आम्हाला माहीत नाही की, आम्ही  दोघेही पुन्हा कधी  आमच्या मूळ गावी, पालखेड येथे स्थायिक होऊ की नाही..?
पण तू किंवा मी किंवा इतर कुणीही जे आपल्या जन्मभूमी असलेल्या पालखेड गावातील  मूळ रहिवाशी आहोत ते भेटले की,अख्खे गाव भेटल्याचा आनंद नक्की होतो..!
कारण आम्ही आमच्या गावातील प्रत्येक गल्लीवर ,गल्लीतल्या बोळींवर ,बोळीतल्या माणसांवर ,तिथल्या अनेकानेक चवदार प्रसंगावर भरभरून प्रेम केले..! 

माणूस कुठेही स्थायिक होवो, शेवटी त्याची जन्मभूमी व तेथील माणसं त्याचा पिच्छा सोडत नसतात..! ती कधी जिवंत रूपाने भेटतात तर कधी आठवणीच्या रूपाने..! आमच्या सारखी अशी कित्येक माणसं असतात की जी आपल्या मूळ गावापासून दूर गेलेली असतात पण गावातला ,त्यातल्या त्यात गल्लीतला,त्यातल्या त्यात जिवलग मित्र भेटला की, गल्ली बोळीतील सर्व आठवणी जाग्या होतात..! ज्या माणसाचं बालपण खेड्यात गेलेलं असतं,त्याच्या आयुष्यात विविध अनुभवांचे त्यातील विविध रसांचे विश्व समृद्ध असते..!याचा अर्थ असा नव्हे की शहरातील माणसांचे बालपण निरस असते..! पण....
जे जिवंत अनुभव गावरान तडका देऊन खेड्यात मिळतात ते शहरातील मुलांना नाही मिळत..! 🙏

बोळ वरून आठवलं..! याच माझ्या बालमित्राच्या घरी जाताना कोणे एकेकाळी एक बोळ अस्तित्वात होती..! आता आहे का नाही माहीत नाही, कारण खेड्यात अन् शहरात बऱ्याच जुन्या भौतिक वास्तुंनी आपलं रंगरूप पूर्णपणे कधीचेचं बदलून टाकले आहे. मित्रा, आण्णासाहेब तुझ्या घराकडे येताना ज्यावेळी मी अन् विजू गायकवाड त्या बोळीत प्रवेश करायचो, अगदी तेंव्हाच मोठ्याने विचारायचो...
" आण्णासाहेब आहे का घरात..?"

तू घरातच असायचा, पण मुद्दामहून बाईंना म्हणजेच तुझ्या मातोश्रीला विचारण्याचे ते एक निमित्त असायचे..! तुझ्या घराकडे येताना जी बोळ अस्तित्वात होती, तशी बोळ आपल्या अख्ख्या पालखेड गावात नव्हती हे मात्र नक्की..! 😊 आपल्या वर्गातील आपल्या मोजक्या बालमित्रांच्या अनेक अजरामर प्रसंगांची साक्षीदार होती, ती बोळ..! काळाच्या ओघात आपण बऱ्याच मित्रांनी गाव सोडले, पण तशी बोळ पुन्हा आयुष्यात  इतरत्र कुठेही पाहण्यात आलीच नाही..!

आपल्या अभ्यासाच्या खोल्या ह्या देखील, आपल्या पौगंडावस्थेतील काळातील एक जिवंत दंतकथाच बनून गेल्या होत्या..! मी तर खात्रीने सांगतो की, आपल्या वर्गाची बॅच ही आपल्या पालखेड गावातील शेवटची बॅच असावी, ज्यांनी खूप जीव लावून अभ्यासाच्या खोल्या अन् त्यात अभ्यास केला होता..! अर्थात अभ्यासाच्या सोबतच एखाद्या निशाचर प्राण्यासारखे , गावात, गावातल्या गल्ल्यात, ओट्यावर हिंडणारे, बसणारे आपणच काही वर्गमित्र होतो..! अभ्यासाच्या खोल्यात अभ्यास करणारे आपले  काही वर्गमित्र इपितर होते हा देखील गमतीचा इतिहास आहे..! 😊 लिहीन त्यावर कधीतरी..! 🙏🏻

मी ज्या..ज्या गावात शिक्षक म्हणून नोकरी केली किंवा आता करत आहे. तिथे देखील आमच्या गावातील माणसांसारखे खूप चांगले माणसं भेटली अन् भेटत आहेत...! त्यांच्याकडे  पाहून आपल्या गावातील माणसांना भेटल्याचा आनंद मानून घ्यायचा..असतो अन् मी तो नेहमी मानून घेत असतो..!

पण एक मात्र नक्की खरे की,गावातल्या माणसांजवळ ,त्यातल्या त्यात गल्लीतला..त्यातल्या त्यात बालमित्रांजवळ माणूस जरा जास्तच खुलतो,बोलतो व वागतो..! कारण तिथे सगळं कसं एकमेकांना एकमेकांच माहीत असते..! भरभरून गप्पा केल्या आपल्या गावातील पूर्वीच्या ,आत्ताच्या गावावर..! आमच्या या गप्पांनी ,ज्या ज्या  माणसांची,त्यांच्या आठवणीची आठवण काढली,त्यांना नक्कीच गुचकी लागली असेल..!

ता.क.: कृपया ' गूचकी लागणे ' या माझ्या शब्द प्रयोगावर फक्त हिंदू धर्मातील बाबींवर टीका करणाऱ्या अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या एकांगी ढोंगी पुरोगामी कार्यकर्त्यांनी टीका करू नये ही त्यांच्या डोक्यावरून लिंबू पिळून विनंती..!😂

वंदे मातरम्..!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले 

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक २६ सप्टेंबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा