" मला प्रवासात भेटलेली माणसं..! "
" आग्रहाने माया लावणारं व्यक्तिमत्त्व प्रा.निघोटे पा.सर...! "
======================================
आज दिनांक २१ मे २०१९ रोजी संध्याकाळी आदरणीय प्राध्यापक शेषराव निघोटे पा.सर यांच्या औरंगाबाद येथील घरी गेलो होतो..!
निघोटे सर, मूळचे हडस पिंपळगाव ता.वैजापूर येथील..! हल्ली मुक्काम औरंगाबाद येथे..! आदरणीय सर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात दहेगाव ,ता.वैजापूर येथे प्राध्यापक आहेत.
माझ्या आयुष्यात काही माणसं अशी आलेली आहेत,ज्यांच माझ्यावर इतकं भारावून टाकणारं प्रेम का आहे..या कोड्यात मी आजतागायत आहे. त्यात आदरणीय प्राध्यापक शेषराव निघोटे सरांचे खूप आदरयुक्त स्थान आहे .
( यात मी माझी स्वतः ची आत्मसुती करतो आहे असे कृपया समजू नये..!)
लासूर स्टेशन येथे काहीकाळ आम्ही शेजारी राहत होतो.सरांचा स्वभाव काहीसा तापड..! पण माझ्या बाबतीत कमालीचा मुलायम अन् मायाळू..! आता तो माझ्या बाबतीत का आहे हे निघोटे सरांनाच माहीत..!
एकदा मी अन् माझे तीर्थरूप वडील पालखेड येथून चार चाकी वाहनात येत होतो. आदरणीय सर, करंजगाव येथे उभे होते.सरांनी मोठ्याने आवाज दिला..
" नंदन...!"
मी लगेच गाडी थांबवली अन् सरांना सोबत घेतले. वास्तविक त्यावेळी मी सरळ महामार्गाने औरंगाबाद येथे येणार होतो.पण आदरणीय निघोटे सर मला म्हणाले..
" नंदन, थोडं लासूर स्टेशन मध्ये येतो का..,मला थोडेसे काम आहे..!"
मी लगेच होकार दिला अन् सरांच्या म्हणण्यानुसार लासूर स्टेशन येथील शारदा मेडिकल शेजारी असणाऱ्या प्रसिद्ध शेव चिवडा पापडी दुकानासमोर मला थांबायला सांगितले. मी अन् माझे वडील गाडीतच बसून होतो.सरांनी जवळ जवळ एक किलो शेव चिवडा पापडी विकत आणली अन् मला म्हणाले...
" नंदन, हे तुझ्या पोरांना घे..!"
मी म्हणालो- " सर ,एवढ्यासाठी इकडं कशाला आलात..! याची काय गरज आहे..!"
निघोटे सर -" राहू दे रे...! पोरं खातील..!"
एवढ्यात माझे वडील मला म्हणाले होते की,
" आजकाल अशी माणुसकीची माणसं सापडत नाहीत, या शेव चिवडा पापडी ला नको पाहू, तू ती कुठेही विकत घेऊ शकतो पण...असा प्रेमानं भेटणारा शेव चिवडा पापडी कुठच मिळणार नाही..! घे... तो..नाही म्हणू नको..!"
सरांच्या या प्रेमाचा नेहमी माझ्यावर वर्षाव होत असायचा.माझ्या शिक्षकी आयुष्यात माझ्या वैयक्तिक आचरणानुसार मला जय बाबाजी भक्त परिवार म्हणून एकमेव गाव मिळाले होते अन् ते म्हणजे हडस पिंपळगाव..! आदरणीय निघोटे सर ,त्यांचे संपूर्ण कुटुंब ( आई,वडील बंधू इ.) माझ्याच विचाराचे..! त्यामुळं विशेष लगाव निर्माण झाला होता..!
आज दिनांक २१ मे २०१९ रोजी मी सहपरिवार आदरणीय निघोटे सरांच्या घरी प्रेमानं भेटायला गेलो.आजही तीच परिस्थिती निर्माण झाली.सरांनी व ताईनी स्वतः कापून मला अन् माझ्या पत्नीला आंबे खाऊ घातले..! घरी सुध्दा दिले..! आम्ही नाही नाही म्हणत होतो..पण सरांच्या त्याच माझ्यावरील अनाकलनीय प्रेमापोटी घ्यावेच लागले..! सरांच्या घरून निघताना आम्ही उभयतांनी आदरणीय सरांचे दर्शन घेतले अन् घरी आलो. आल्या आल्या माझ्या वडिलांना ,निघोटे सरांनी भेट दिलेल्या आंब्यांची पिशवी दाखवली..!
माझे वडील आम्हाला म्हणाले...
" अरे, तू नशीबवान आहेस,अशी देव माणसं तुझ्या आयुष्यात आहे..!"
माणसाच्या आयुष्यात यापेक्षा दुसरं काही अमूल्य आहे का..?
अजिबात नाही..! चाळीशीनंतरही असं प्रेम कुणालाही भेटत असेल तर.. मोजकं पण सहज सुंदर जगावं वाटतं.. अशा महान लोकांसाठी..!
अशा प्रेमळ माणसांसाठी..माझ्या सारख्या भावनेवर नितांत प्रेम करणाऱ्याला..!
वंदे मातरम्..!
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले .
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: २१ मे २०१९, मंगळवार

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा