मला प्रवासात भेटलेली माणसं..!
" सोज्वळ मित्र - संदीप जगधने..! "
=================================
मला आयुष्यातील प्रत्येक वळणावर अनेक मित्र भेटत गेले. मला भेटलेला प्रत्येक मित्र मला काहीतरी शिकवत गेला..! मग त्या भेटलेल्या मित्राचे ,मला शिकविणे कधी हितकारक होते तर कधी कधी अहितकारक..! मी जेंव्हा औरंगाबाद येथे स्थायिक झालो तेंव्हा इथे माझे अनेक बालमित्र स्थायिक होते.त्यामुळं अनौपचारिक नात्यातील मैत्री इथे होती की, ज्यांच्या जवळ ऐसपैस वागता येईल अशी...! याच काळात मी जन सहयोग सामाजिक संस्था औरंगाबाद बरोबर जोडल्या गेलो अन् औरंगाबाद शहराला वृक्षांनी सुशोभित करण्याचा दृढ संकल्प करणारी एक नाही तर...सर्वच समविचारी मित्र यात लाभली..! अर्थात त्या मैत्रीतील शिरोबिंदू होते प्रिय मित्र प्रशांत गिरे..! याच प्रशांत भाऊ गिरे यांची पडछाया ज्यांना म्हणता येईल असा एक खूप समजूतदार मित्र येथे लाभला..! त्या समजूतदार मित्राचे नाव संदीप भाऊ जगधने..!
लासूर स्टेशन येथे राहत असताना वृक्ष चळवळीशी निगडित होतो,त्यामुळं त्याच हौसे पोटी औरंगाबाद येथील जन सहयोग परिवार औरंगाबादशी जोडल्या गेलो.जन सहयोग परिवार मधील सर्व सदस्य मला अगदी निगर्वी अन् कोणताही अभिमान न बाळगणारी जाणवली त्यामुळं त्यांच्याशी नुकतेच सुरू झालेले औपचारिक नाते कधी अनौपचारिक नात्यात परावर्तित झाले हे समजलेच नाही..!
संदीप जगधने..!
अतिशय चपळ अन् जन सहयोग परिवारातील कोणत्याही कामाच्या बाबतीत नेहमी पुढे असणारा मित्र..! गोलवाडी फाटा सैनिकी क्षेत्र, छावणी डंपिंग ग्राऊंडवर आज जी जवळ जवळ दहा हजार देशी वृक्षांची वनराई मोठ्या डौलाने डोलत आहे, त्या बहारदार कामाच्या मेहनतीत संदीप भाऊंचे खूप मोठे योगदान आहे..! आम्ही जन सहयोग परिवार औरंगाबाद अंतर्गत सदस्यांनी शेळी मेंढी प्रक्षेत्र पडेगाव दौलताबाद रोड औरंगाबाद येथील तब्बल वीस एकर परिसरातील जवळजवळ पंधरा हजार देशी वृक्षांचे रोपण करून त्यांचे योग्यरीत्या संवर्धन करत आहोत.त्याही ठिकाणी संदीप भाऊंचे खूप मोठे योगदान आहे..!
संदीप भाऊंचा स्वभाव काहीसा मृदू मुलायम..!अर्थात समोरचा मित्र जर बहरात आला तर तोच मृदू मुलायम स्वभाव खेळकर अन् प्रेमळ खोडकर देखील होतो..! आम्ही काही महिन्यापूर्वी कन्नड तालुक्यातील निसर्गरम्य परिसरात गौताळा अभयारण्यात जिवंत असलेल्या आयुष्याचा आनंद घ्यायला गेलो होतो. तिथं संदीप भाऊंनी अशी काही उडी मारली की, त्या उडीची अप्रतिम क्लिक त्यांच्याकडे निव्वळ संग्रही आहे..! जो जिता वही सिकंदर या चित्रपटात अमिरखान या अभिनेत्याने अशीच अफलातून उडी मारलेली आहे..!😊
मी ज्यावेळी यांच्या सोबत असतो त्यावेळी प्रशांत गिरे अन् संदीप जगधने यांच्यातील निस्सीम मैत्रीला पाहून खूप सुखावून जातो..! यांच्यातील ही मैत्री पाहून मला माझ्या बालमित्रांची प्रकर्षाने आठवण येते..! ज्यावेळी प्रशांत भाऊ यांच्या तीर्थरूप वडिलांचे निधन झाले त्यावेळी शरीराने अन् अंतर्मणाने खूप धावपळ करणारा प्रशांत भाऊंचा जिवलग बालमित्र मी पहिला तो संदीप भाऊ..! आपण ज्या ज्या वेळी संदीप भाऊ यांच्याशी बोलतो त्या त्यावेळी त्यांच्या मुखातून निघालेला " अच्छा..!" हा शब्द त्यांच्या बोलण्याची ओळख देऊन जातो..!
ज्या ज्यावेळी आम्ही छावणी येथे कधी कधी रात्री निवांत भेटत असतो त्या त्यावेळी एकमेकांच्या आयुष्यातील सर्व भाव भावनांना मनमोकळे व्यक्त करत असतो..! ज्यावेळी आपण एखाद्या मित्राच्या जवळ आयुष्यातील सर्व भाव भावनांना वाट मोकळी करून देतो तेंव्हा समजून घ्या की, तुमची मैत्री ही, भली प्रौढ वयात एकमेकांना भेटली असेल,पण त्याच प्रौढ वयात भेटलेल्या मैत्रीच्या मुळाशी बालमैत्रीचा सुगंध दरवळत असतो..! जसा संदीप जगधने आणि प्रशांत गिरे यांच्यातील नात्यात अन् त्यांच्या जवळ आपण व्यक्त होतो त्या नात्यात...!
वंदे मातरम्..!
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक : ३१/७/२०२०, शुक्रवार






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा