मला प्रवासात भेटलेली माणसं..!
" आयुष्याची शिलाई..! "
================================
आयुष्य...! प्रत्येकाचं व्यक्तित्व आणि प्रत्येकाचं अस्तित्व दर्शविणारे असते..! याच व्यक्तित्वात अन् अस्तित्वात माणूस, आपल्या आयुष्याचा गाडा हाकत दररोज जगत असतो आणि त्याच जगण्यात त्याच्या आयुष्याच्या उसवलेल्या कपड्यांना आयुष्याची शिलाई करत असतो..! माझ्या वैयक्तिक आयुष्याच्या माझ्या अस्तित्वाच्या चाळिशी उलटलेल्या कपड्यांवर विविध माणसांच्या सोबतीने आयुष्याची शिलाई अगदी पक्क्या धाग्याने गुंफत आलेलो आहे..! त्यात पालखेड, लासूर स्टेशन, जळगाव, हडस पिंपळगाव, सोनवाडी एकलहेरा, औरंगाबाद आणि आता अंधारी येथील माझ्या अस्तित्वाच्या खुणा अन् त्यांच्या धाग्यांना शिवत आलो आहे..! वैजापूर, गंगापूर आणि सिल्लोड तालुक्यातील माझ्या वैयक्तिक आयुष्याच्या शिलाईचे धागे जसे जमेल तसे अगदी निव्वळ प्रेमानं विणत आलो..! काही धागे अगदी कडक मांज्या सारखे देखील भेटले,अशांच्या द्वारे आपला गळा कापून घेण्यापेक्षा माघार घेऊन शिल्लक असलेल्या आयुष्याच्या शिलाईला अजुन उसवण्यापासून वाचवत गेलो..!
आज दिनांक ६/११/२०२० रोजी संध्याकाळी नवीन विकत घेतलेल्या बेड शिटला कडेकडेने शिवून घेण्यासाठी बजाजनगर परिसरात आम्ही उभयतांनी , कुणी या नवीन कापडाला शिवून देतो का..याचा शोध घेण्यासाठी आलो होतो. अखेर आपल्या आयुष्याचे जेष्ठ धागे ,मन लावून शिवत असणाऱ्या एका ज्येष्ठ व्यक्तित्वाला पाहिलं अन् थांबलो तिथं..! माझी पत्नी ,माझ्या बालमित्राच्या घरी गेली अन् मी , आयुष्याच्या अस्तित्वाची शिलाई शिवणाऱ्या त्या ज्येष्ठाच्या सानिध्यात गेलो, त्यांच्या आयुष्याच्या अनुभवाची शिलाई समजून उमजून घेण्यासाठी..!
स्थळ - मोहटा देवी मंदिर ते सारा वृंदावन वसाहत तिसगाव रस्ता - बजाजनगर, औरंगाबाद.
नाव - तिर्थस्वरुप नारायण जाधव काका, मुळ राहणार - आन्वा, ता. भोकरदन ह.मु.बजाजनगर. औरंगाबाद
ज्येष्ठांना बोलतं केलं अन् त्यांच्या आपल्यातील काही परिचयाच्या खाणाखुणा निघाल्या की, गप्पांच्या फडांमध्ये माझ्यासारखा माणूस स्वतच्या आयुष्याची शिलाई, त्याच ज्येष्ठांच्या अनुभवाच्या धाग्यातून शिवत जातो..! गप्पांच्या ओघात मी , अंधारी येथे नोकरी करतो हे सांगितल्या बरोबर काकांचे डोळे चमकून गेले. मी लगेच अंदाज लावला की, काकांच्या नात्यांच्या आठवणीतील धागे अंधारी गावाशी नक्कीच बांधलेले असणार आणि ते खरं निघालं..! तिर्थस्वरुप जाधव काका यांचे बरीच पाहुणे मंडळी अंधारी गावात आहे,असे त्यांच्या बोलण्यातून जाणवत गेले..!
तिर्थस्वरुप जाधव काका , शिवणकाम करण्यासाठी सकाळी ९:३० वाजता येतात अन् थेट संध्याकाळी ६ वाजता घरी जातात.दुपारी घरी जाऊन जेवण करून येतात अन् पुन्हा शिलाईचे धागे गुंफत बसतात..! जुन्या उसवलेल्या कपड्यांना शिवून देणे हे काम काका अगदी मन लावून करतात..! तिर्थस्वरुप जाधव काका यांना आपल्या मुलांचा खूप अभिमान वाटतो आहे,कारण काकांची मुलं त्यांची खूप काळजी घेतात, त्यांना खूप जीवही लावतात. तिर्थस्वरुप जाधव काका यांच्या अंगी शिवणकाम ही कला असल्यानं ,घरी निव्वळ बसून राहण्यापेक्षा आपल्या आयुष्याला ,आपल्या आवडत्या कलेच्या माध्यमातून आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात..! जुनी माणसं, कशा प्रकारे खरीखुरी आत्मनिर्भर आहेत याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे तिर्थस्वरुप जाधव काका ..!
माझ्या आयुष्यातील आता पर्यंतच्या वाटचालीत शिलाईचे धागे अन् त्यांना सुंदर अशी गुंफण करणारे सतत भेटत गेले..! पालखेड येथे पारस जैन टेलर, नितीन जैन टेलर आणि लासूर स्टेशन येथे जितू भाऊ जैस्वाल टेलर अन् पुन्हा नितीन जैन टेलर..! या सर्वांनी त्यांच्या सुरेख अशा प्रेमळ सहवासरूपी धाग्यात मला गुंफून घेतलेले आहे..! आता औरंगाबाद येथील बजाजनगर परिसरातील तिर्थस्वरुप जाधव काका यांचाही सामावेश त्याच प्रेमळ सहवासरूपी धाग्यात मला गुंफून घेणार हे नक्की..! इथून पुढं माझं भविष्यातील कधीमधी निवांत बसण्याचं अन् माझ्या उरलेल्या आयुष्याच्या धाग्यांची शिलाई शिवण्याचं हक्काचं ठिकाण राहील,तिर्थस्वरुप जाधव काका यांचं हे पवित्र ठिकाण...!
रात्रीची चाहूल लागायला लागली होती, तिर्थस्वरुप जाधव काका यांचा निरोप घेताना म्हणालो..
" काका, तुमच्या सवडीने ,माझ्या घरी नेईल तुम्हाला..! कृपया नाही म्हणू नका..!"
यावर काकांना झालेला निव्वळ आत्मीय आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे जाणवत होता..! मी निघताना काका आवर्जून म्हणाले..
" गुरुजी, पुन्हा नक्की या बरं का..!"
मी - " अहो, तुम्ही नाही म्हणले तरी मी येतच जाणार आहे..! माझा मोबाईल नंबर असू, अन् तुमचाही द्या..! अधून मधून करीत जाईल प्रेमानं खुशाली..!"
आम्ही रस्त्यानं घरी येत होतो त्यावेळी माझ्या मनात पुन्हा तोच विचार येत होता की, जुनी माणसं घरी निव्वळ बसून राहण्यापेक्षा आपल्या आयुष्याला ,आपल्या आवडत्या कलेच्या माध्यमातून आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात..! जुनी माणसं, कशा प्रकारे खरीखुरी आत्मनिर्भर आहेत याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे तिर्थस्वरुप जाधव काका..! हाच आपला खरा भारत आहे..! जो खरा भारत हिंदी साहित्यिक प्रेमचंद यांच्या साहित्यात आढळला, जो खरा भारत मराठी साहित्यिक शंकर पाटील यांच्या साहित्यात आढळला, जो खरा भारत थोर लेखक आर.के. लक्ष्मण यांच्या मालगुडी डेज मध्ये आढळला..! जो खरा भारत लोकशाहीर अण्णाभाऊंच्या साहित्यात पदोपदी जाणवला; आणि भारतातील मध्यमवर्गीय माणसाला आपल्या लेखणीतून समर्थपणे व्यक्त करणाऱ्या थोर लेखक व.पू.काळे यांच्या साहित्यात..! तो खरा भारत माझ्यामते इथच आहे, तिर्थस्वरुप जाधव काकांच्या आसपास..!
बजाजनगर परिसरातील माझ्या सर्व मित्रांना माझी नम्र विनंती असेल की, तिर्थस्वरुप जाधव काका यांच्याकडे नक्की तुमचे शिवणकाम घेऊन जा अन् खऱ्याखुऱ्या भारतातला आत्मनिर्भर करायला मदत करा..!🙏
वंदे मातरम्..!
लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव ©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक - ६/११/२०२०, शुक्रवार


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा