आमचे गाव आमची माणसं..!
" जिवलग बालमित्रा, रमेश ..! "
===================================
खूप जिवलग बालमित्र रमेश भानुदास गायकवाड..! मूळ रा.पालखेड, ह.मु. औरंगाबाद
आज तुझ्या काळजाचा तुकडा ,रेणुका दिदीचे शुभ मंगल कार्य पार पडले..! एका वधू पित्याची होणारी भावनिक घालमेल मी, दिवसभर पाहत होतो.येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांची सरबराई करणारा वधू पिता अन् त्याच सरबराईत स्वतः चे देहभान हरपून गेलेला माझा खूप जिवलग बालमित्र रमेश ,हे दोन्ही रूपं निव्वळ समर्पण भावनेने तू आज जगलास मित्रा..! स्वतः ला आपल्या लाडक्या लेकीच्या मंगल कार्यात जो कुणी वधू पिता समर्पण भावनेने आलेल्या गेलेल्यांची आत्मीयतेने पूजन करत असतो, त्यावेळी तो वधू पिता, त्या समस्त वधू पित्यांच्या कृतीतून व्यक्त केलेल्या भावनांचे प्रतिनिधित्व करत असतो..! मित्रा रमेश, आज तू, त्या समस्त पित्यांचे खूप आत्मीयतेने अन् तितक्याच भावुकतेने प्रतिनिधित्व केलेस..!
याच माझ्या जिवलग बालमित्र रमेश वर मी यापूर्वीच माझ्या ब्लॉगवर एक लेख लिहिलेला आहे.
विश्वास अन् रमेश ,या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू..! एखाद्या व्यक्तीवर आपल्या आई वडीलांसारखा डोळेझाकून विश्वास ठेवावा ,अगदी त्याच योग्यतेचा माझा प्रिय बालमित्र तथा वर्गमित्र रमेश..! माझ्या आयुष्यात काही मित्र असे आहेत की,ज्यांच्यावर मी, जो विश्वास माझ्या आई वडिलांवर ठेवायचो,त्याच तोडीचे असे ते मित्र आहेत..! त्यात जिवलग बालमित्र रमेश गायकवाड, डॉ.संजय राऊत आणि डॉ.गणेश पा. वाणी सर्वोच्च स्थानी आहेत..! योगायोग असा की, याच लेखात ज्यावेळी मी माझा जिवलग बालमित्र डॉ.गणेश वाणी याचा उल्लेख करत होतो , नेमक्या त्याचवेळी गणेश वाणी याचा मला फोन आला..! काही योगायोग माणसाच्या आयुष्यात नात्यांची खोली दर्शवितात..! ज्या विश्वासाने आपण आपल्या आई वडिलांच्या स्वाधीन आपल्या सर्वस्वाला करतो, अगदी त्याच विश्वासाने आपण आपल्या सर्वस्वाला मित्रांच्या स्वाधीन करावे अन् निश्चिंत राहावे..! हा विश्वास अन् त्या योग्यतेची माणसं, सहज भेटत नसतात..! त्यासाठी नशीब अन् नैतिकता वागण्यातून निर्माण करावी लागते..!
प्रिय बालमित्र रमेश, हा माझ्या स्व.वडिलांचा आदर्श होता, यावरून रमेशची योग्यता सहज लक्षात येईल..! ज्या कठीण अन् गरिबीच्या विवंचनेतून दोघांनीही स्वतः ला समाजात उभे केले होते,माझ्या मते हेच एकमेव कारण दोघांच्याही निस्सीम मैत्रीचे होते. माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांनी माझ्या मोजक्या मित्रांना खांद्यावर हात टाकून शाबासकी दिली होती, त्यात प्रिय बालमित्र रमेश हा एक होता..!
ग्लॅमर अन् चकाकी असलेल्या माणसांच्या आयुष्यात सर्व सामान्य माणसांची किंमत काय असते, याविषयी व्यक्त व्हायचे झाल्यास त्यावर स्वतंत्र लेख लिहावा लागेल. ग्लॅमर अन् चकाकी असलेली माणसं, सर्व सामान्य माणसाला आपली कधीच जाणवत नाही..! अशी माणसं राहून राहून परकी जाणवतात.अशा माणसांच्या आयुष्याचा होरा अन् तोरा हा सर्व सामान्य माणसाला सतत परकेपणाची जाणीव करून देत असतो..! फक्त अशी जाणीव करून देणं कधी दृश्य स्वरूपात असते तर कधी सुप्त स्वरूपात..! मी अशा ग्लॅमर अन् चकाकी असलेल्या माणसांपासून मनाने दुरुन डोंगर साजरे या पद्धतीने राहतो..!
माझा हा खूप जिवलग बालमित्र रमेश, जगाच्या दृष्टीने असणाऱ्या तथाकथित ग्लॅमर ,चकाकी असलेल्या आयुष्याचा घटक नाही. प्रिय बालमित्र रमेश, याचे एक चहाचे दुकान, औरंगाबाद येथील मुकुंदवाडी बस स्टॉप वर आहे..!प्रिय बालमित्र रमेश खूप कष्टातून इथपर्यंत आला आहे.मी जेंव्हा पासून औरंगाबाद येथे स्थायिक झालो होतो तेंव्हा पासून माझे स्व.तीर्थरूप वडील मला याच्या चहाच्या हॉटेलवर घेऊन जायला सांगायचे अन् मग मीही माझ्या संपूर्ण कुटुंबासह जायचो..! वास्तविक माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांनी आयुष्यात कधी बाहेर हॉटेलमधील चहा, नाष्टा केला नाही,पण या नियमाला प्रिय बालमित्र रमेश अपवाद असायचा..! प्रिय बालमित्र रमेश याची भेट झाली, की माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांना खूप मोकळे वाटायचे..! जणू त्यांचा बालमित्रच भेटला..! माझ्या दृष्टीने तो एक मानसोपचार असायचा, एका ज्येष्ठ नागरिकाच्या अंतर्मनावर केलेला..! जो पर्यंत माझे स्व.तीर्थरूप वडील हयात होते तो पर्यंत जेंव्हा जेंव्हा प्रिय बालमित्र रमेश आमच्या घरी यायचा तेंव्हा तेंव्हा आम्हा कुणालाही अगोदर भेटण्याऐवजी सर्वप्रथम माझ्या तीर्थरूप वडिलांना भेटायचा..!
आज ज्यावेळी मी प्रिय बालमित्र रमेश यांच्या कन्येच्या लग्न सोहळा आटोपून माझ्या घरी निघताना निरोप घेत होतो,त्यावेळी आम्हा दोघांचेही डोळे भरून आले होते..! आमच्या त्या दोघांच्या भावूक प्रसंगात आम्हा दोघांनाही आमच्या जिवलग नात्याची अन् आम्हा दोघांच्या स्व.आई वडिलांची जाणीव जाणवत होती..! शेवटी माणसाच्या आयुष्यात यापेक्षा दुसरे काही असते का..? माझ्या मते अजिबात नाही..! मोजकी माणसं अन् मोजक्या आठवणी भावूक माणसांना जगातील सर्वात श्रीमंत बनवत असतात..! अशीच मोजकी माणसं अन् मोजक्या आठवणी माणसाला मानसिक रोग होण्यापासून दूर ठेवण्यासाठी संजीवनी औषधाच्या मात्रांच्या रूपाने उपयोगी पडतात..! आमच्या सर्वोच्च भावूक नात्याला माझी पत्नी बाजूला उभे राहून पाहत होती..!
असो, चि.सौ.का.रेणुका दीदी अन् जावई बापू आपणास आजच्या शुभ मंगल प्रसंगाच्या अन् पुढील वैवाहिक आनंदी आयुष्याच्या माझ्या कुटुंबाकडून मनःपुर्वक शुभेच्छा..!🌹🌹🙏🏻
वंदे मातरम्..!
लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
विवाह सोहळा दिनांक - २०/६/२०२१, रविवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा