आमचे गाव, आमची माणसं
" आनंदाचा स्रोत, आदरणीय भावराव पाटील शेळके..!"
====================================
माणसाचं आयुष्य सतत या ना त्या कारणाने नैराश्यात सापडलेले असते.कधी हे नैराश्य स्वनिर्मित असते तर कधी हेच नैराश्य अवतीभोवतीच्या मानवी घटकांच्या विकृत वागण्याने आलेले असते. अशा भिन्न भिन्न प्रकारच्या मानवी नैराश्याच्या पेकटात लाथ मारून स्वतच्या आसपास देखील अजिबात येऊ न देणारी माणसं हल्लीच्या जगात अतिशय अल्पसंख्यांक होत चालली आहेत..! अशी माणसं अखंड आनंदाचा स्रोत असतात.अशी माणसं सदाबहार या मानवी स्वभावाच्या वर्तनात येत असतात. अशी अतिशय दुर्मिळ मानवी स्वभावाच्या वर्तनाची माणसं ज्याच्या सानिध्यात आली, त्याने बरेचसे मानवी मनोरुग्णाच्या आजारांना नक्कीच पळवून लावलेले असते..!
वरील उल्लेखित सदाबहार मानवी वर्तनाचे अन् आपल्या सदैव आनंदी स्वभावाचे अगदी चपखल उदाहरण आमच्या पालखेड गावात आहे,अन् त्या जेष्ठ व्यक्तिमत्त्वाचे नाव आहे आदरणीय भावराव पाटील शेळके..!
जसजशी माणसाने विज्ञानाच्या मदतीने प्रगती केली किंवा आधुनिकतेचे फॅड बोकाळले तसतसे कित्येक माणसांच्या मनाच्या व्यथा वाढतच गेल्या. अशा कित्येक मनोरुग्णांना, उच्च वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या एखाद्या डॉ. मनोविकारतज्ज्ञांकडे जाऊन स्वतच्या मनाची तपासणी करून घ्यावी लागते..! या अशा अनेक मानवी व्यथांवर अन् मनोरुग्णांवर प्रेमळ अन् सदाबहार औषध आमच्या पालखेड गावात आहे अन् ते म्हणजे आदरणीय भावराव पाटील शेळके..!
मी लहानचा मोठा वयाने झालो,पण अद्याप पर्यंत तरी आदरणीय भावराव पाटील शेळके यांना कधीही नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या माणसांच्या मानवी मनाचे प्रतिनिधित्व करताना पाहिलेले नाही..! हे मत फक्त वैयक्तिक माझेच नसून आमच्या पालखेड गावातील ज्यांनी ज्यांनी आदरणीय भावराव पाटील शेळके यांचं सानिध्य मिळविलेले आहे त्या सर्वांचं असणारच त्यात तिळमात्र शंका नाही..!
आदरणीय भावराव पाटील शेळके सध्या शरीराच्या वयाने थकले आहेत,पण त्यांचं मनाचं वय आजही शंभर देवनंदाच्या मनानांही लाजवेल असे चिरतरुण आहे. आदरणीय भावराव पाटील शेळके यांना मी किंवा माझ्या समकाळातील कुणी एखादा तरुण भेटला अन् त्या भेटीत सर्व चवींची बरसात झाली नाही, असे कधीही होणारच नाही..! अशी ही माणसं, निख्खळ आयुष्यावर प्रेम करणारी असल्याने यांनाच मानवी आयुष्याचा खरा अर्थ समजलेला आहे असे वाटते. आयुष्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या अतिषयी मोजक्या माणसांचे प्रतिनिधित्व करणारे आदरणीय भावराव पाटील शेळके यांच्या रूपाने ग्रेट व्यक्तिमत्व आमच्या पालखेड गावात आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो..!🙏🏻
आदरणीय भावराव पाटील शेळके यांच्याशी संवादात.. आचार्य अत्रे यांचे मार्मिक शालजोडे सापडतील..! लोकशाहीर दादा कोंडके यांच्या संवादाची झलक पाहायला मिळेल..! थोर लेखक शंकर पाटील यांची जी तळमळ ग्रामीण जीवनाविषयी होती ती पाहायला मिळेल..! राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सुश्राव्य भजनांची सुरेल मैफिल ऐकायला मिळेल..! एखाद्याच्या वर्तनावर परखड पण चपखल बसणारे भाष्य ऐकायला मिळेल..! एवढेच नव्हे तर आचार्य रजनीश उपाख्य ओशो यांचे भाष्य देखील ऐकायला मिळेल..! वास्तविक आदरणीय भावराव पाटील शेळके यांनी वरील उल्लेखित साहित्यिकांचे ,विचारवंतांचे विचार ऐकलेले ,वाचलेले नाही,पण उपजत समयसूचकता अन् गुण असल्याने सहज सोप्या शब्दात भाष्य करण्याची त्यांची शैली निव्वळ अप्रतिम आहे..!
आमच्या पालखेड गावात मी तिथे वास्तव्यास होतो तेंव्हा तीन भजनी मंडळे होती.श्री.पारेश्वर भजनी मंडळ, श्री.रोकडीया हनुमान भजनी मंडळ अन् ब्रम्हानंदी भजनी मंडळ..! या तिन्ही भजनी मंडळाच्या कळत नकळतपणे आपापसात स्पर्धा असायच्या..! कोण किती सुश्राव्यपणे भजने गातो या बाबतीत प्रत्यक्षात नाही,पण अप्रत्यक्षपणे ही स्पर्धा असायची.या तिन्ही भजनी मंडळांपैकी श्री.पारेश्वर भजनी मंडळ, श्री.रोकडीया हनुमान भजनी मंडळ वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून विविध संतांच्या अभंग रचना शास्त्रीय पद्धतीने गायन करत असायचे.पण ब्रम्हानंदी भजनी मंडळ यांचे गायन अन् अभंग रचना प्रामुख्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विविध गीतांवर आधारित असायच्या. जे मित्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विविध प्रकारच्या गीतांच्या चाली ऐकून असतील त्यांना लक्षात आले असेलच की, एका विशिष्ट ठेक्यावर अन् उंच स्वरात त्या गीतांचे गायन करावे लागते. आमच्या पालखेड गावातील ब्रम्हानंदी भजनी मंडळाची धुरा प्रामुख्याने सांभाळली होती ती ,आदरणीय भावराव पाटील शेळके यांनी..! उंच आवाजात अन् सुश्राव्य चालीत विविध ब्रम्हानंदी भजने गावी ती आदरणीय भावराव पाटील शेळके यांनीच..! मी स्वतः या भजनांचा निस्सीम चाहता होतो ,आहे अन् राहील.गावात जेंव्हा ब्रम्हानंदी भजनी मंडळाची कुणाच्या घरी भजने असायची तेंव्हा त्याचा रसास्वाद कधी मधी एक श्रवणीय प्रेक्षक म्हणून घेतला आहे. या भजनांची एक पद्धत आहे,ती अशी की, जेंव्हा एखादी अभंग रचना संपली की, मध्येच एक चारोळी पद्धतीची एक सुश्राव्य चालीत रचना उंच स्वरात गायिल्या जायची..! पूर्णपणे नीट आठवत नाही पण त्यापैकी काही शब्द पुढीलपैकी असायचे..
"बोलो भाई, माता पिता की जय,
बोलो भाई सब संतन की जय,
सियावर रामचंद्र की जय..!"
आणि वरील उंच स्वरातील रचना गावी ती आदरणीय भावराव पाटील शेळके यांनीच..! पहाडी आवाजात अन् सुश्राव्य चालीत ऐकण्याची मज्जाच वेगळी असायची..!
माझ्या तीर्थरूप आईचा स्वर्गवास झाल्यावर तेरावा विधी झाल्यानंतरच्या रात्री आम्ही आमच्या पालखेड येथील घरी ब्रम्हानंदी भजनी मंडळाचे भजन आयोजित केले होते.त्यावेळी आदरणीय भावराव पाटील शेळके यांनी गायिलेले विविध भजने ऐकण्याची शेवटची संधी मला मिळाली होती..! जवळ जवळ पहाटेच्या चार वाजेपर्यंत भजने सुरू होती अन् त्या भजनांचे मुख्य आधारस्तंभ होते, आदरणीय भावराव पाटील शेळके..!
आदरणीय भावराव पाटील शेळके यांच्या विषयीची एक आठवण माझ्या हृदयात कायमची कोरल्या गेलेली आहे ,ती पुढीप्रमाणे..
मी त्यावेळी नोकरीला लागलेलो नव्हतो. साधारणतः जानेवारी १९९५ च्या आसपासचा प्रसंग आहे. मी आमच्या पालखेड गावातील एका केश कर्तन दुकानात डोक्याची कटिंग करायला गेलो होतो. कटिंग करायला त्या दुकानात खुर्चीवर बसलो, इतक्यात गावातील एक व्यक्तीने उंच स्वरात संवाद करत मला खुर्चीवरून उठवले कारण त्या व्यक्तीला अगोदर कटिंग करायची होती. मीही कोणताही आढावेढा न करता खुर्चीवरून उठलो होतो.मात्र दुकानाच्या बाहेर उभे असलेले आदरणीय भावराव पाटील शेळके यांना ही गोष्ट आवडली नाही.ते दुकानात आले अन् मला म्हणाले..
" तू, खुर्चीवरून कम्हून उठला..? तुझा नंबर आहे तूच बस..! तुला कोण उठून देतो ते मी पाहतो..!"
आदरणीय भावराव पाटील शेळके यांनी असे म्हंटल्यावर खुर्चीवर बसलेली व्यक्ती निमूटपणे उठली अन् मी त्याच खुर्चीवर बसलो अन् माझी कटिंग करून घेतली होती. हा प्रसंग काहींच्या दृष्टीने क्षुल्लक असेल, पण माझ्या मते असेच इतर विषयाशी निगडीत प्रसंग अन् याच अशा प्रसंगात कळत नकळतपणे उभी राहणारी माणसं, , माझ्या सारख्या स्वयंघोषित अजातशत्रू माणसांच्या हृदयात कायमचे सन्मानाचे अढळ स्थान मिळवून असतात. मला खुर्चीवरून उठवून देणारी व्यक्ती सध्या हयात नाही, पण मला पुन्हा स्थान मिळवून देणारे आदरणीय भावराव पाटील शेळके अगदी ठणठणीत आहे..! मी भविष्यात पालखेड गावात कदाचित स्थायिक होणारही नाही, पण आदरणीय भावराव पाटील शेळके यांचा वडिलकीच्या प्रेमळ, मायाळू अन् वयाने ज्येष्ठ असूनही नेहमी मित्रत्वाचे नाते जपणाऱ्या आठवणींचा सहवास कायमचा माझ्या हृदयात असेल ,अगदी सन्मानाने..!🙏🏻
आदरणीय भावराव पाटील शेळके यांच्या सारख्या आनंदी वृत्तीच्या अन् चहुमुखी व्यक्तीच्या आयुष्यभर प्रेमात राहावं असं हे ,ग्रेट व्यक्तिमत्व आहे..!माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून आदरणीय भावराव पाटील शेळके यांना त्रिवार वंदन..!
🙏🏻🙏🏻🙏🏻
वंदे मातरम्..!
लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - ८ ऑगस्ट २०२१, रविवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा