मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
" निरागस आहात..! "
=======================
माझ्या आज पर्यंतच्या सत्तावीस वर्षाच्या शिक्षकी आयुष्यात खूपच मोजके असे प्रिय विद्यार्थी आयुष्यात आले जे , की अतिशय विश्वासू लाभले.त्यात अतिशय आवडता विद्यार्थी चि. उमेश पाटील शिंदे ( माझ्या उजव्या हाताच्या बाजूला उभा असलेला ) हा नक्कीच शीर्ष यादीत राहील..!
कोणत्या विद्यार्थ्याने किती शैक्षणिक अर्हता प्राप्त केली अन् तो त्या आधारे कोणत्या हुद्द्यावर आहे याला मी माझ्या शिक्षकी आयुष्यात अजिबात महत्त्व दिले नाही अन् निवृत्त होई पर्यंत देणारही नाही.
माझ्या विद्यार्थ्यांत आपलेपणा किती आहे, तो विघातक वैचारिक बैठकीत तर नाही ना..? हृदयातून आत्मीयता किती आहे, निरागसता, निर्व्यसनी वृत्ती जपतो की नाही, इत्यादी गुणांच्या आधारे असे मोजके विद्यार्थी कायमचे हृदयात स्थान मिळवून आहेत.त्यात जि.प.प्रा.शा.एकलहेरा, ता.गंगापूर,जि. औरंगाबाद येथील हा अतिशय विश्वासू अन् प्रेमळ विद्यार्थी चि. उमेश पाटील शिंदे अन् महेश दादासाहेब पाटील औसरमल..!
मी अन् माझे जिवलग मित्र प्रिय नंदलाल सलामपुरे सर ( माझ्या डाव्या हाताच्या बाजूला उभे असलेले ) काल दिनांक ८ जून २०२२, बुधवार रोजी चि.उमेश व कुटुंबीयांनी बांधलेल्या नवीन वास्तूच्या वास्तुशांती प्रीत्यर्थ एकलहेरा येथे उपस्थित होतो. उमेश याने हृदयातून दिलेलं खूप खूप आग्रहाचे निमंत्रण टाळता येणे शक्य नव्हते. भेटी समयी तोच नम्रपणा जाणवला जो प्राथमिक शाळेतील वयोगटात असताना होता.निरागसता ही कोणत्याही माणसाची प्रेमळ असण्याची निशाणी असते,जी उमेश मध्ये आजही जाणवली. कृत्रिम निरागसता अन् उपजत निरागसता ही ईश्वरीय देणगी असते .जी ईश्वरीय देणगी उमेश यास लाभलेली आहे.उमेश याचा शाळेत असताना खूप शांत, संयमी, अतिशय नम्र, सालस स्वभाव होता.काळाच्या ओघात समवयस्क मित्रात प्रत्येकाचा वैयक्तिक स्वभाव असतो अन् ज्यानं त्यानं तो खेळकर, मौजमस्ती करणारा स्वभाव नक्कीच जपायला हवा. तो खेळकर, मौजमस्ती करणारा स्वभाव मी स्वतः माझ्या जिवलग मित्रांच्या सहवासात व्यतीत करत असतो.पण जेंव्हा शिक्षक भेटतात तेंव्हा जर कुणी वरील उल्लेखित चांगल्या मूल्यांना शिक्षकाच्या समोर व्यक्त करत असेल तर मला तरी वाटते की, आपण आपल्या विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले होते त्याचं नक्कीच सार्थक झालं..!एकलहेरा येथे चि. महेश दादासाहेब पाटील औसरमल अन् चि. उमेश शिंदे त्या यादीत नक्कीच आहेत. याचा अर्थ असा नाही की,ज्या विद्यार्थ्यांचा मी उल्लेख केला नाही, म्हणजे ते चांगले नाहीत. ते सर्व आजी अन् माजी विद्यार्थी नक्कीच खूप चांगले आहेत.
कोणत्याही माणसाच्या आयुष्याला त्याच्या प्रगतीच्या आयुष्याचे ग्लॅमर चिकटले की, त्याच्यातील भूतकाळ मरत जातो. अशी माणसं सतत एकाच तोऱ्यात वावरणारे असतात अन् आपला भूतकाळ विसरून आपलं भंपक ग्लॅमर असलेलं आयुष्य व्यतीत करत असतात.मात्र याच ग्लॅमर असलेल्या आयुष्याला जो भूतकाळ कधीतरी भेटलेला असतो, तो भूतकाळ ज्याने आपल्या जाणीवा जागृत ठेवून जिवंत ठेवला तोच माणसाच्या संस्कृतीचे वहन करत असतो असे माझे वैयक्तिक मत आहे. प्रिय विद्यार्थी उमेश अन् महेश याच माणसांच्या संस्कृतीचे वहन करणारे खूप आवडते विद्यार्थी नक्कीच आहेत. उमेश बेटा तू जसा विद्यार्थी दशेत होतास, आजही तसाच आहेस हे कृतीतून बघून मन सुखावून जाते.
महेश दादासाहेब पाटील औसरमल ( सदरील छायाचित्रात माझ्या डाव्या हाताच्या बाजूला सर्वात कडेला उभा असलेला ) या ज्या प्रिय विद्यार्थ्याचा उल्लेख मी केला आहे, त्याचे वडील आदरणीय दादासाहेब पाटील औसरमल हे व्यक्तिमत्व म्हणजे हृदयातून खूप माणुसकी असलेले व्यक्तिमत्व सतत जाणवत होते,आहे अन् राहील.तो वडिलांचा वारसा चि.महेश यात आहे.
माझ्या आज पर्यंतच्या शिक्षकी आयुष्यातील प्रवासात काही विद्यार्थांच्या बाबतीत स्वतः पेक्षा खूप जास्त विश्वास जाणवतो त्यात हे विद्यार्थी नक्कीच आहेत. चि. उमेश शिंदे हा सध्या वाळूज एमआयडीसी औरंगाबाद मध्ये लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून कार्यरत आहे अन् चि.महेश हा कृषी पदविका चे शिक्षण घेत आहे.
असो, प्रिय विद्यार्थी उमेश बेटा अन् महेश बेटा जसे आहात तसेच रहा, अतिशय निर्मळ मनाचे..! राहणारच, कारण तुमच्यात मला माझा अतिशय विश्वासू विद्यार्थी गणेश नानासाहेब पाटील गाजरे दिसतो..!
वंदे मातरम्..!
लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - ९ जून २०२२, गुरुवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा