ईश्वराचा अधिवास असलेला प्रसंग..!
मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
" ईश्वराचा अधिवास असलेला प्रसंग..!"
===================================
आज दिनांक २२ जून २०२२ , बुधवार रोजी जि.प.प्रशाला अंधारी येथील शाळा सुटायची वेळ झाली होती. माझ्या वर्गातील सर्व विद्यार्थी आपापल्या वस्तूंची आवरासावर करत होते. शेतात राहणाऱ्या विद्यार्थांची संख्या जास्त असल्याने अन् ढगाळ वातावरणामुळे विद्यार्थी घाईत निघण्याच्या तयारीत होते.
शाळा सुटल्याची घंटी वाजली अन् सर्व मुले पटपट वर्गाच्या बाहेर पडली.नेहमी प्रमाणे सर्वात शेवटी माझ्या सोबत सदरील फोटोत दिसणारे प्रिय विद्यार्थी अजित तायडे ( माझ्या डाव्या बाजूला असलेला) अन् आदित्य जाधव ( सर्वात कडेला उभा असलेला) नेहमी प्रमाणे आम्ही सर्वात शेवटी राहिलो होतो.इतक्यात वर्गातील चिमणीच्या घरट्यातून एक चिमणीचे पिल्लू खाली आले होते.त्याला अजुन चांगले धड उडता येत नव्हते.ते अजुन नाजूक अवस्थेत होते. वर्गात इकडून तिकडे ते पिल्लू फक्त उड्या मारू लागले होते.
या फोटोत माझ्या अगदी जवळ डाव्या बाजूला उभा असलेला प्रिय विद्यार्थी अजित तायडे जो की, शेतात राहतो त्याने ते पिल्लू पाहिले.मला तो म्हणाला -
" सर, या चिमणीच्या पिल्लाला आपण त्याच्या घरट्यात पुन्हा ठेवून देऊ..! जर हे पिल्लू असेच खाली फरशीवर राहिले ना,तर याला मांजर खाऊन टाकील..!"
मी अजित मधील असणाऱ्या या निरागस अन् भूतदया वर निस्सीम प्रेम करणाऱ्या वृत्ती समोर मनोमन नतमस्तक झालो होतो.अखेर मी, अजितने अन् सर्वात कडेला उभा असलेला प्रिय विद्यार्थी आदित्य जाधवने वर्गातील डेस्क घरट्याच्या खाली फरशीवर आणला. मी देखील त्या इवल्याश्या पिल्लाला त्याच्या घरट्यात ठेवू शकत होतो,पण ज्याच्या हृदयातून ही अतिशय निर्मळ भावना निर्माण झाली होती त्याच्याच शुभहस्ते एका निरागस जीवाला त्याच्या घरात सुखरूप पोहोचविणे मला जास्त महत्वाचे वाटले. त्याचे कारण ज्याच्या हृदयातून अशी कोणतीही अतिशय निर्मळ भावना निर्माण होते त्याच्या हस्ते जर अशाच इतर कोणत्याही सत्कर्माला जर केले तर त्याने संबंधिताला सर्वात मोठे मानसिक समाधान लाभते असे माझे मत आहे. मानसिक समाधान हीच सर्वोत्तम संपत्ती असते, एखाद्या निस्वार्थ भावनेने पवित्र कार्य करणाऱ्या मनाला अजुन प्रफुल्लित करण्यासाठी..!
अजितने त्या इवल्याशा पिल्लाला अपल्या हातात अलगदपणे उचलले अन् पुन्हा त्याच्या घरट्यात सुखरूपपणे ठेवून दिले. त्या निरागस जीवाला त्याच्या घरट्यात पुन्हा सुखरूप ठेवल्यावर अजितच्या मुखातून सहजपणे देवाचा शब्दोच्चार आला..!कुणीही, कोणतेही पवित्र कार्य केले की ,त्याच्या मुखातून आपोआप आपापल्या श्रद्धेयांचा उच्चार होतो, याचा मला अनपेक्षितपणे साक्षात्कार झाला होता.
सगळी मुले जवळजवळ शाळेच्या बाहेर पडली होती.मी , अजित अन् आदित्य आम्ही तिघे जिना उतरून खाली आलो.येताना मी प्रिय अजितच्या खांद्यावर मायेनं हात ठेवला अन् त्याला म्हणालो..
" बेटा, अजित, तुला तुझ्या आजच्या या अतिशय चांगल्या कृतीबद्दल उद्या मी काहीतरी बक्षीस देईल बरं का...!"
यावर अजित त्याच्या हसऱ्या मुखाने माझ्याकडे बघत म्हणाला..
" नका हो सर..! आपलं कामच आहे , एखाद्याला जीव लावणे..!"
त्याच्या या साध्या वाक्यात खूप मोठा अर्थ होता ,पण त्याने ते वाक्य त्याच्या निरागस वृत्तीतून सहजपणे उच्चारले होते.निरागस मनाची माणसं ही अशीच असतात.अशी माणसं सहज काहीतरी खूप चांगलं वागतात,बोलतात,पण त्यांच्या त्या वागण्यात अन् बोलण्यात त्यावेळी ईश्वराचा अधिवास वास्तव्याला आलेला असतो. ईश्वराचा अधिवास असलेला प्रसंग मी प्रत्यक्ष आज अनुभला होता. तेही नेमक्या आजच्या दिवशी, ज्या दिवसामुळे आज मला या अशा अनेक निरागस जीवांच्या पवित्र सहवासात माझे आयुष्य व्यतीत करण्याचे भाग्य लाभले आहे..!
अतिशय चुणचुणीत , नम्र , समाधिटपणा असलेला अन् बोलक्या स्वभावाचा हा अजित तायडे माझ्या शिक्षकी आयुष्याच्या प्रवासात भेटलेला खूप मोजक्या प्रेमळ विद्यार्थ्यांपैकी एक आहे..! प्रिय अजित , तू सदैव माझ्या हृदयाच्या हळुवार कोपऱ्यात चिरंजीव असशील..! अजित बेटा, तुझ्यात आज मला त्या ईश्वराचा अधिवास जाणवला, ज्याला माणूस आपापल्या परीने उल्लेखित करतो..! आज मी त्याला ' अजित तायडे ' या पवित्र नावाने उल्लेखित केले अन् करत राहील..!
वंदे मातरम्..!
लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - २२ जून २०२२, बुधवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा