मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
शेंडीवाले सर..!
===================================
आपली आपल्या संकटात कोणती ओळख होईल याचा काही नेम नसतो. त्यातल्या त्यात जर आपली कुणा एखाद्याला जर नावासह ओळख नसेल तर आपली देहबोली किंवा आपण आपल्या बाह्य शरीराची कशी ठेवण ठेवतो तीच आपली ओळख समाजात प्रस्तुत केल्या जाते.मला आज दिनांक २ मार्च २०२३ रोजी असाच अनुभव माझ्या बाह्य शरीराच्या ठेवणीवरून आला अन् त्यामुळे मला जी समस्या निर्माण झाली होती ते कामही यशस्वी झाले.
आज सकाळी बसने निघालो होतो.सोबत नेहमीप्रमाणे माझी बॅग होती. फुलंब्रीच्या अलीकडे एक पेट्रोल पंप आहे, तिथं एस. टी. महामंडळाच्या बस डिझेल भरतात अन् पुढील मार्गाला लागतात. तिथं बसमध्ये डिझेल भरायला वेळ लागतो, त्यामुळं माझ्यासारखे काही प्रवासी लघुशंकेसाठी उतरत असतात.जसे की ,मी आज उतरलो होतो.आमच्या बसच्या समोर अजुन एक बस असल्याने आमच्या बसमध्ये डिझेल भरायला वेळ लागणार होता. वेळ असल्याने मी आपला लघुशंकेसाठी गेलो होतो. लघुशंकेवरून आल्यावर बघतो तर काय माझी जी बस होती ती काही तिथं दिसेना.मी गडबडून गेलो होतो.डिझेल भरणाऱ्या तरुणाला विचारले तर त्याने सांगितले की, ती बस डिझेल न भरता मागच्या मागे वळून फुलंब्रीकडे निघून गेली.आता काय करावं या चिंतेत मी पडलो होतो. मला त्या बसमधील वाहकाचे नाव माहीत होते,पण त्यांचा मोबाईल नंबर माझ्याकडे नव्हता. बरं, जे प्रवासी मित्र सोबत असतात, नेमके तेही आज बसमध्ये नव्हते.अखेर मी माझे प्रिय प्रवासी मित्र डॉ.गिरी सर यांना लगेच फोन लावला अन् सगळा प्रकार सांगितला. डॉ. गिरी सर यांनी मला सांगितले की ,'माझ्याकडे संबंधित कंडक्टरचा मोबाईल नंबर नाही, मी आप्पांना फोन करून संबंधित कंडक्टर साहेबांना झालेला प्रकार सांगतो अन् बस फुलंब्री बस स्टँडवर थांबायला सांगतो.आप्पा नावाचे एक खूप चांगल्या स्वभावाचे तरुण व्यक्तिमत्व आम्हा सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व आहे.त्यांचं नाचनवेल येथे मेडिकल दुकान आहे. तेही नेहमी प्रवासात सोबत असतात,पण नेमके आज नव्हते. प्रिय मित्र आप्पा यांनी संबंधित कंडक्टर साहेबांना झालेला प्रकार सांगितला अन् लगेच मला संपर्क करून सांगितले की," सर, चिंता करू नका, बस तुमच्यासाठी फुलंब्री बस स्टँडवर थांबलेली आहे, वंदे मातरम्..!"
इतक्यात पुन्हा दुसरा अनोळखी कॉल आला.त्यावरून समोरची व्यक्ती बोलत होती की, " सर, मी घडमोडे सर, बोलतो आहे. मला बसमध्ये असलेल्या आमच्या शाळेतील मॅडमचा फोन आला आहे की, " ते कुणीतरी शेंडीवाले सर आहेत, ते पेट्रोल पंपवर मागेच राहिले आहेत.त्यांची बॅग बसमध्ये सीटवर आहे.त्यांना कसातरी संपर्क करून सांगा की, बस फुलंब्री बस स्टँडवर थांबलेली आहे.जमेल त्या वाहनाने या..!" शेंडीवाले सर अशी ओळख झाल्यामुळे मी लगेच माझ्या डोक्यावरून माझ्या शेंडीला अजुन जाम बांधून घेतले होते अन् मुख्य रस्त्यावर कुणीतरी लिफ्ट देतो का त्याची वाट बघू लागलो होतो.काही वेळेतच एक पुरुष आपली दुचाकी दामटीत येताना दिसला.मी दोन्ही हात जोडून लिफ्ट मागितली त्या देवदूताने दुचाकी थांबवली अन् मी फुलंब्री बस स्टँडवर आलो.
बस स्टँडवर आल्या आल्या संबंधित कंडक्टर साहेब, मला बघून हसायला लागले अन् मला म्हणाले..
" सर, काय राव...चूकच झाली..! बसा आता..!"
मीही हसलो अन् बसमध्ये बसलो.माझ्या सीटमागे मॅडम बसलेल्या होत्या त्या मला म्हणाल्या..
" सर, तुमचे नाव माहीत नव्हते मला.मी आमच्या शाळेतील सरांना सांगितले होते की, शेंडीवाले सर आहेत अन् ते मागेच राहिले आहेत.त्यांची बॅग बसमध्येच राहिली आहे.त्यांना संपर्क करा म्हणून..!"
त्या भगिनी शिक्षक महिलेचे संभाषण ऐकल्यावर मी पुन्हा एकदा माझ्या शेंडीला अजुन जाम बांधून घेतले. त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
आता बस फुलंब्री बस स्थानकावरून निघाली होती.इतक्यात माझ्या मोबाईलवर आमच्याच शाळेतील आदरणीय काथार सरांचा कॉल आला होता.काथार सर मला म्हणाले की,
" नंदन जाधव सर, मला आत्ताच घडमोडे सरांचा कॉल आला होता अन् त्यांनी सांगितले की, " तुमच्या शाळेतील ते शेंडीवाले सर आहेत ना, त्यांची बॅग बसमध्येच राहिली आहे अन् तेही मागेच राहिले आहेत.त्यांना सांगा की, बस फुलंब्री बस स्टँडवर थांबलेली आहे.जा लवकर. तुमची बसमध्ये बॅग राहिली आहे का..? बस हुकली आहे का..?" पुन्हा मी माझ्या डोक्यावरील शेंडीला अजुन जाम बांधून घेतले.
मी काथार सरांना सर्व प्रकार सांगितला अन् म्हणालो की, " सर, मी आता बसमध्ये बसलो आहे.काळजी करू नये.आणि हो सर, खूप खूप धन्यवाद बरं का..!"
अखेर मी शाळेत सकाळी नऊ वाजता पोहोचलो होतो. आज दहावीचा पेपर असल्याने आजूबाजूच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थी अन् शिक्षक आलेले होते.मला बघितल्या बघितल्या आदरणीय घडमोडे सर ( माध्यमिक शिक्षक गाव - मोहरा) माझ्याकडे आले अन् मला म्हणाले..
" सर, नेमके तुमचे नाव माहीत नव्हते.मात्र तुम्हाला शेंडी आहे,हे मी बघितलेले असल्याने मीच काथार सरांना सांगितले होते की,"तुमच्या शाळेतील ते शेंडीवाले सर आहेत ना, त्यांची बॅग बसमध्येच राहिली आहे अन् तेही मागेच राहिले आहेत.त्यांना सांगा की, बस फुलंब्री बस स्टँडवर थांबलेली आहे.जा लवकर म्हणून..!"
मी आदरणीय घडमोडे सरांना म्हणालो की, " सर, खूप खूप धन्यवाद.तुम्हा सर्वांमुळे मला बस सापडली..!
असे म्हंटल्यावर मी माझ्या डोक्यावरील शेंडीला अजुन जाम बांधून घेतले अन् मनातल्या मनात म्हणालो...
" खूप खूप धन्यवाद प्रिय शेंडी..! आज तुझ्या मुळे माझी ओळख पटवायला सोपे झाले अन् माझे काम सोपे झाले..! "
असे मनातल्या मनात म्हंटल्यावर पुन्हा एकदा मी माझ्या डोक्यावरील शेंडीला अजुन जाम बांधून घेतले.
ता.क.: कृपया तथाकथित एकांगी पुरोगाम्यांनी माझ्या शेंडी वरून माझ्याविषयी अन् माझ्या प्रिय शेंडी विषयी शाब्दिक आदळआपट करू नये ही नम्र अपेक्षा.कारण ज्यांना कुणीतरी बहुजन असे म्हणतात त्यापैकी देखील काहीजण अजूनही शेंडी जानवे वापरतात.🙏🏻
वंदे मातरम्
एक प्रवासी लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक : २ मार्च २०२३, गुरुवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा