मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️
देवभूमी..! 🕉️
(अंतिम भाग क्रमांक १३ )
===================================
रामपूर येथून दिनांक २२ मे २०२३ रोजीच्या सकाळी ६:३० आमची बस निघाली होती. उंचच उंच पर्वतरांगा मधील रस्त्याच्या कडेला बस, जीप इत्यादी वाहनांची गर्दी होती. आमची बस काहीशी उंच घाटात गेल्यावर रामपूर , सोनप्रयाग, गौरी कुंड अन् बाबा केदारनाथ या सर्वांना अगदी हृदयातून त्रिवार वंदन केले.माझ्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. आपण पुन्हा कधी बाबा केदारनाथला भेटायला येऊ का.. हा प्रश्न मनात आला. तेही आज रोजी जे माझे संपूर्ण कुटुंब आहे त्या सर्वांच्या सोबत तेही पायी चालत जाऊन येणे पुन्हा कधी आयुष्यात होईल का.. हा भावूक प्रश्न मनात आला होता. काही प्रश्नांना उत्तरे माहीत नसतात. असे प्रश्न आयुष्यात फक्त उत्सुकता अन् आतुरता निर्माण करण्यासाठी असतात. आता सोनप्रयाग दिसेनासे झाले होते. आता नजरेच्या टप्प्यात फक्त आणि फक्त उंचच उंच पर्वतरांगा दिसत होत्या. नजरेत मावणार नाहीत एवढ्या खोल खोल दऱ्या रस्त्याच्या कडेला दिसत होत्या. केदारनाथ येथे जाण्यासाठी हरिद्वार ते सोनप्रयाग दरम्यान बसने प्रवास केला होता. त्या प्रवासातील रस्त्यांपेक्षाही आताचा रामपूर ते बद्रीनाथकडे जाणारा रस्ता अतिशय भयंकर, उंचच उंच पर्वतरांगा मधून, दऱ्याखोऱ्यातून , नागमोडी वळणं घेत आमचा प्रवास सुरू होता. बसच्या खिडकीतून खाली दरीत डोकावून पाहिलं की, मृत्यू आपल्याला बोलावत आहे असेच भासत होते. इतक्या त्या दऱ्या अतिशय खोलवर भीतीदायक होत्या. रस्ताही काही ठिकाणी अरुंद, पर्वताच्या कपारीतून कोरून काढलेल्या मार्गाने आमचा प्रवास पुढे पुढे चालला होता. गौरी कुंड ते बाबा केदारनाथ अन् पुन्हा बाबा केदारनाथ ते गौरी कुंड तसेच सोनप्रयाग जीप स्टँड ते रामपूर असा पायी प्रवास अगोदरच झालेला होता,त्यामुळं पायातील वेदना होत होत्याच. त्यात आता बसमध्ये निव्वळ बसून राहिल्यामुळे पोटरी अन् मांडीत शिथिलता येऊन वेदना अजून वाढल्या होत्या. दुपारी १ वाजता आमची बस ज्यांना जेवणं करायची आहेत त्यांच्यासाठी एका हॉटेलच्या परिसरात रस्त्याच्या कडेला थांबली होती. बसमधून उतरताना एक एक पाऊल वेदनेमुळे संपूर्ण पायाला हळूहळू पुढे नेत होते. दाक्षिणात्य पदार्थ असलेले काही खाद्य पदार्थ विकत घेऊन आमची जेवणं उरकली होती. आमची बस दुपारी १:३० वाजता, पुन्हा बद्रिनाथकडे निघाली होती.
मजल दर मजल करत अन् हिमालयाच्या उत्तुंग पर्वतरांगातील अतिशय खडतर घाटातील नागमोडी वळणे घेत असलेला रस्ता पार करत आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी साधारणतः ६ वाजता बद्रीनाथ येथे पोहोचलो होतो. संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. अतिशय कडाक्याची थंडी होती. पायात बूट होते, अंगात स्वेटर , डोक्यावर थंडीची टोपी होती तरी देखील संपूर्ण शरीर प्रचंड थंडीमुळे पार थिजून गेले होते. रात्री साधारणतः ९ वाजता बद्रीनाथ भगवंताचे मनोभावे दर्शन घेतले. एक एक पाऊल टाकताना पायात पोटरी अन् मांडीत येणारे गोळे प्रचंड वेदना देऊ लागले होते. यापूर्वी माझ्या आयुष्यात पायाच्या वेदना काय असतात याची प्रत्यक्ष जाणीव येऊन गेलेली आहे. मी माध्यमिक शाळेत असताना आम्ही काही बालमित्र पालखेड येथील ग्राम दैवत श्री. पारेश्वर महादेवाच्या यात्रेच्या वेळी गावापासून दक्षिण दिशेला साधारणतः तीस किलोमीटर अंतरावर गोदावरी आहे. आम्ही गोदावरी नदीतून ऐन मध्यरात्री पवित्र जल घेऊन अख्खी रात्र ते पहाटेपर्यंत पळत तर कधी वेगाने पायी चालत पालखेड येथे येत असायचो. गावात आल्यावर सकाळी महादेवाच्या मिरवणुकीत गोदावरी नदीतून आणलेले पवित्र जल श्रद्धेने नेऊन महादेवाच्या पिंडीवर श्रद्धेने अर्पण करत असायचो. त्यावेळी अनवाणी पायी जाणे-येणे झालेले होते. त्यावेळी पायाच्या होणाऱ्या प्रचंड वेदना काय असतात याचा अनुभव गाठीशी होता. मात्र तो प्रवासा सपाट मैदानी प्रदेशातील होता. त्यावेळी चढणीचा होणारा अनुभव नव्हता. आता वयाच्या अनुषंगाने अन् उंचच उंच पर्वतरांगा पायी प्रवास केल्यामुळे जाणवणारी वेदना प्रचंड वेदनादायी जाणू लागली होती. अतिशय उंचीचा तोही अतिशय खडतर रस्ता पार पाडल्यामुळे पायाच्या वेदना भयंकर होत होत्या. माझी धर्मपत्नी अन् दोन्ही मुलं मात्र अजूनही चालताना सहजपणे चालत होते.
रात्री साधारणतः ९ वाजता बद्रीनाथ भगवंताचे दर्शन आटोपून आम्ही पुन्हा मुक्कामाच्या ठिकाणी निघालो होतो. सर्वांना भूक लागली होती. आम्ही एका हॉटेल मध्ये आलो होतो. मुलांनी त्यांच्यासाठी पोळी भाजीचे जेवणाचे ताट मागवले होते. मला फारशी भूक नव्हती. मॅगीच्या दोन प्लेट मी अन् माझ्या पत्नीसाठी मागवल्या. मी माझ्या आज पर्यतंच्या आयुष्यात पहिल्यांदा मॅगी नावाचा खाद्य पदार्थ नाईलाजाने खाऊ लागलो होतो.घरी शेवया कित्येकदा खाल्ल्या होत्या पण मॅगी नावाचा पदार्थ आयुष्यात पहिल्यांदाच खाऊ लागलो होतो. गरमागरम मॅगी खाल्ल्यामुळे थंडगार पडलेल्या घश्याला आराम पडला होता.आमची जेवणं उरकली होती. सोबत गरम पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या विकत घेतल्या. मुक्कामाच्या ठिकाणी साधारणतः रात्रीच्या वेळी १० वाजता पोहोचलो होतो. उद्या पहाटे ४ वाजता सर्वांनी उठून आवरून सावरून हरिद्वारकडे मार्गस्थ व्हायचे आहे असे सर्वांना सांगितले.मुक्कामाच्या बाजूलाच अलकनंदा नदीच्या वेगवान पाण्याचा आवाज कानी पडत होता.अतिशय थंडगार वातावरणात अन् विष्णू भगवंताच्या सानिध्यात आम्ही सर्वजण पटकन झोपी गेलो.
दिनांक २३ मे २०२३ रोजीची पहाट झाली होती.ठरल्याप्रमाणे सर्वजण पहाटे ४ वाजता उठून आवरून सावरून मुक्कामाच्या ठिकाणाहून पहाटे ५:३० वाजता बद्रीनाथ येथील पेट्रोल पंपच्या बाजूला असलेल्या बस स्टँडकडे मार्गस्थ झालो. पायाच्या वेदना आता ओळखीच्या झाल्या सारख्या वाटू लागल्या होत्या.पुढे पडणारे प्रत्येक पाऊल आपल्या सोबत वेदनेला सोबतच घेऊन पडू लागले होते. परिसर अन् परिस्थितीमुळे होणारी शारीरिक अन् मानसिक वेदना आपली सखी, मैत्रीण होऊन जाते असे मी माझ्या मनाला , माझ्या पत्नीला व दोन्ही मुलांना सांगितले. वेदना रुपी मैत्रिणीला आपल्याला सोबत ठेवावेच लागणार होते, त्याचं कारण वेदना रुपी असलेली मैत्रीण ही या इथल्या परिसर अन् परिस्थितीमुळे आपल्या आयुष्यात आलेली होती. ज्यानं त्यानं आपापल्या वेदना रुपी मैत्रिणीला स्वीकार करून स्वतः ला तिच्या सहवासाला सहन करायचं असा वास्तववादी विचार स्वीकारून आम्ही चालू लागलो होतो. आम्ही सकाळी ६ वाजता बद्रीनाथ येथील बस स्टँड जवळ पोहोचलो होतो. तिथं चौकशी केली असता समजले की, बस उपलब्ध नव्हती, त्यामुळं आम्ही खाजगी जीप मध्ये बसून हरिद्वारच्या दिशेनं सकाळी ७ वाजता मार्गस्थ झालो. तो खाजगी जीपवाला पण पटकन निघायला तयार होईना. अखेर खूप गयावया करून, विनंती करून तो जीपवाला हरिद्वारकडे निघण्यास तयार झाला होता. बद्रीनाथ ते हरिद्वार हा प्रवास साधारणतः तेरा ते ते पंधरा तासांचा असणार होता.
काल दिनांक २२ मे २०२३ रोजीचा संपूर्ण दिवसभर बसमध्ये बसून बसून अन् आज दिनांक २३ मे २०२३ रोजी पुन्हा जीप मध्ये दिवसभर बसून बसून शरीर अजून ठणकायला लागणार होते याचा खात्रीशीर अंदाज आला होता. आमचा प्रवास पुन्हा सुरू झाला होता. ज्या मार्गावर मृत्यू आपल्याला खुणावत आहे अशा भासणाऱ्या अतिशय खोल खोल दऱ्याखोऱ्या ,उंचच उंच पर्वतरांगा दिसत होत्या. शरीर थकले होते ,पण मन अजूनही टवटवीत होते. ते सतत रस्त्याच्या कडेला असलेल्या निसर्गरम्य परिसरात आपल्या डोळ्यांना भिरभिर फिरवून त्या विधात्याच्या अस्तित्वाला नजरेत सामावून घेत होते. दुपारच्या वेळी जेवणासाठी एका ठिकाणी आम्ही थांबलो होतो. जेवणं आटोपल्यावर पुन्हा एकदा हरिद्वारकडे मार्गस्थ झालो. रात्री साधारणतः ९ वाजता हरिद्वार येथे आम्ही पोहोचलो. हरिद्वार येथे उतरल्या उतरल्या जोराच्या पावसाने आमचे स्वागत केले. हरिद्वार येथे मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. रात्रीची जेवणं झाल्यावर अतिशय थकलेल्या शरीराला झोप आवश्यक वाटू लागली होती. आम्ही कुंभ नगरी हरिद्वार येथे आलो होतो. आपल्या कित्येक पूर्वजांनी आपापल्या सानिध्याने ज्या नगरीला पूनित केले होते त्या हरिद्वार नगरीत आम्ही पोहोचलो होतो. बाबा केदारनाथ अन् बद्रिनाथ भगवान यांना श्रध्येने स्मरण करून बिछान्यावर पडल्यापडल्या आम्हाला पटकन झोप लागली.
दिनांक २४ मे २०२३ ची पहाट झाली होती. झोपेतून उठून सकाळची दिनचर्या आटोपली होती.मुलं थोडी उशिरा उठली होती. भागीरथी, अलकनंदा अन् मंदाकिनी या नद्यांच्या एकत्रित पवित्र जलाचा या भूमीवर जिथून सपाट मैदानी प्रदेशात प्रवेश होतो त्या हरिद्वार नगरीतील गंगेच्या परिसरात आम्ही आलो होतो. आम्ही हरी की पैडी येथे गंगेच्या किनाऱ्यावर पोहोचलो होतो. दुपारी आई गंगेच्या पवित्र पाण्यात आम्ही सर्वांनी स्नान केले. काही आप्तस्वकीय अन् काही जिवलग स्नेही यांना श्रध्येने देण्यासाठी कॅन मध्ये पवित्र गंगाजल घेतले होते. परिसरातील देव देवतांचे दर्शन झाले होते. गंगेच्या त्याच परिसरात काही माणसं जुने नाणी, शिक्के विक्री करायला बसलेले होते. त्यांच्याकडून काही नाणी विकत घेतली. हरी की पैडी पासून पायी चालत चालत परिसर बघत बघत पुढे चालू लागलो होतो. रस्त्याच्या कडेला अतिशय मधुर कचोरी जिलेबी रबडीचे दुकान दिसले. आम्ही तिथं मस्तपैकी गोड गोड कचोरी रबडी जिलेबी खाल्ली. त्या मिठाई दुकानाचे दुकानदार मालक वयस्कर होते.स्वभावाने खूपच तापड जाणवत होते. आम्ही दुपारी तीन वाजता मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो होतो. संध्याकाळी पुन्हा गंगेच्या किनाऱ्यावर जायचे होते.संध्याकाळी गंगेची आरती करीता उपस्थित राहायचे होते. दोन तास आराम केला होता.
संध्याकाळी आम्ही गंगेच्या किनाऱ्यावर हरी की पैडी येथे गंगेच्या आरती करीता पोहोचलो होतो.हजारो भक्त आरती मध्ये सहभागी झाले होते. हिंदू संस्कृतीत निसर्ग पूजनाला अत्यंत महत्त्व आहे.नव्हे नव्हे निसर्ग पूजा हाच हिंदू धर्माचा आत्मा आहे. फार पूर्वीपासून आपल्या पूर्वजांनी निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी परंपरा सुरू केली ती आजही सुरू आहे अन् अनंत काळापर्यंत सुरूच राहील. निसर्गाचे अनंत उपकार समस्त मानवी आयुष्यावर आहेत याची जाणीव ठेवून आपल्या पूर्वजांनी पंचमहाभूतांचे स्मरण अन् वेळोवेळी श्रद्धेने केलेले पूजन त्याचं द्योतक आहे. त्याचेच सर्वोत्तम उदाहरण आई गंगेची , तिच्या पवित्र जलाची, त्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आई गंगेची होणारी आरती..! ज्या आई गंगेच्या किनाऱ्यावर मानवी संस्कृती अन् सभ्यता बहरली, याचं आई गंगेच्या किनाऱ्यावर आर्ष कालीन कालखंड, प्राचीन भारताचा दैदिप्यमान इतिहास कित्येक भारतीयांनी आपल्या शौर्याने अन् विद्वत्तेने समृध्द केला होता. आज त्याच निसर्गाच्या देणगीला , गंगेच्या पवित्र पाण्याला आम्ही हजारो भक्तांच्या उपस्थित श्रद्धेने पूजन करून वंदन करू लागलो होतो. हरिद्वार येथील आई गंगेची आरती याचि देही याचि डोळा आम्ही बघून कृतार्थ झालो होतो.
हरिद्वार येथे गल्ली बोळात हिंडताना अनेक मिठाईची दुकानं दिसली. तिथंली मिठाई, मलईदार मसाला दूध, दुधाचे इतर मस्तपैकी पदार्थ अन् रबडी जिलेबी असे जिभेला पाझर फुटणारे पदार्थांची रेलचेल दिसली. सर्वांवर यथेच्छ ताव मारला होता.
काही वस्तूंची खरेदी केल्यावर मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो होतो.बाबा केदारनाथ अन् बद्रिनाथ भगवान यांना स्मरण केले. त्या विधात्याने मानवी संस्कृतीला विकसित करण्यासाठी आई गंगेला या भूतलावर अवतीर्ण केले होते, त्या परिसरात आम्ही आमच्या आयुष्यातील काही भाग व्यतीत करत होतो. या विश्वाच्या स्थितीचा मालक बद्री विशाल अन् याच सृष्टीच्या अंताचा स्वामी बाबा केदारनाथ महादेव यांच्या भेटीमुळे आयुष्याचे अध्यात्मिक सार्थक झाल्याचा भाव हृदयात येत होता. या देवभूमीतील वास्तव्य असलेला आपला प्रवास संपवून आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या प्रापंचिक आयुष्यात प्रवेश करून घेण्यासाठी निघण्याची वेळ आली होती. ज्याला त्याला त्या विधात्याने दिलेल्या भूमिका निभावण्यासाठी त्याच त्या दैनंदिन जीवनात प्रवेशित होण्याची वेळ आली होती. उत्पत्ती, स्थिती अन् लय म्हणजेच ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांना श्रद्धेने स्मरण करून आम्ही हरिद्वार येथील मुक्कामाच्या ठिकाणी पुण्य भूमीत निद्रेच्या स्वाधीन झालो होतो. उद्यापासून पुन्हा सुरू होणारा परतीचा प्रवास अन् आयुष्य, आम्हा सर्वांच्या आयुष्यातील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी वाट बघत होते.
बाबा केदारनाथ की जय..!
हर हर महादेव..!
वंदे मातरम्..!
हर हर महादेव..!🙏🏻🕉️🙏🏻
एक प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - १७ मार्च २०२४, रविवार
[ देवभूमी या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखमालेतील अंतिम भाग क्रमांक १३ वा समाप्त. ]






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा