रविवार, २४ मार्च, २०२४

" स्वातंत्र्यवीर सावरकर "


 


चिंतन ©️


" स्वातंत्र्यवीर सावरकर "


===================================


काल सह परिवार रणदीप हुड्डा अभिनित अन् दिग्दर्शित ' स्वातंत्र्यवीर सावरकर ' हा हिंदी चित्रपट बघितला. चित्रपट बघताना अन् घरी आल्यावर कित्येक वेळा डोकं सुन्न झाले होते. भारतमातेच्या या सुपुत्राला ज्या अत्यंत त्रासदायक यातना सोसाव्या लागल्या, जो कौटुंबिक क्लेश सोसावा लागला, जो त्याग करावा लागला तो आता पर्यंत विविध पुस्तकांच्या माध्यमातून वाचण्यात आलेला होता, पण ते वाचण्यात आलेलं सर्वकाही चित्रपटाच्या माध्यमातून बघितलं अन् डोळ्याच्या कडा पाणावल्या अन् डोकं सुन्न झाले होते. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात नियती इतका कसा काय अन्याय करू शकते हा प्रश्न सतत मनात येत होता. एखाद्या पुस्तकातून एखाद्याच्या यातना, वेदना वाचण्यात येतात. मात्र त्याच एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील यातना , वेदना ज्यावेळी एखाद्या दृक श्राव्य साधनाच्या माध्यमातून आपण याचि देही याचि डोळा बघतो तेंव्हा आपलं हृदय पिळून निघते. अभिनेता रणदीप हुड्डा हे स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटातील तात्याराव सावरकर यांची भूमिका अक्षरशः जगले आहेत. या अभिनेत्याने वंदनीय तात्याराव सावरकर यांच्या भूमिकेचं अक्षरशः सोनं केलं आहे.


चित्रपटाच्या सुरुवाती पासून ते मध्यांतरापर्यंत चित्रपटाचा वेग काहीसा कमी आहे, मात्र मध्यांतरानंतर ज्यावेळी वंदनीय तात्याराव सावरकर सेल्युलर जेल मध्ये प्रवेशित होतात तेंव्हापासून चित्रपटाने जो काही वेग घेतला तो अगदी शेवट पर्यंत टिकवून ठेवला आहे. ज्यावेळी तात्याराव सावरकर अंदमान येथील सेल्युलर जेल मध्ये जातात, तिथून पुढे अभिनेता रणदीप हुड्डा यांनी असा काही अप्रतिम अभिनय केला आहे की, आपण साक्षात तात्याराव सावरकरांनाच बघत आहोत याची अनुभूती येते. क्लोज कॅमेरा वर्क अन् त्या अँगल मध्ये रणदीप हुड्डा यांनी प्रत्येक क्षणातील आपल्या चेहऱ्यावरील हावभाव अप्रतिम साकारले आहेत. विशेषतः जेल मधील इंग्रज अधिकाऱ्याच्या समोर स्वाभिमानाने व्यक्त होणे , जेलरच्या विरुद्ध होणारी उद्विग्नता , अंधार कोठडीतील होणारी जीवाची तगमग इत्यादी अनेक प्रसंग आपल्याला चित्रपट बघताना खुर्चीवर खिळवून ठेवतात. बऱ्याच प्रसंगात मन अगदी गहिवरून येते. काही प्रसंग मनाला अत्यंत वेदना देऊन जातात. चित्रपट बघताना एक प्रेक्षक म्हणून आपली ही स्थिती होते, तर प्रत्यक्षात वंदनीय तात्याराव सावरकर यांची त्यावेळची परिस्थिती किती वेदनादायक असेल याची जाणीव होते. थोडक्यात स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटातील अभिनयाचे जे सर्वोच्च शिखर रणदीप हुड्डा यांनी आपल्या जिवंत अभिनयाने गाठलेले आहे ते सेल्युलर जेल मधील प्रत्येक क्षणातील अभिनयातून गाठलेले आहे. ज्यावेळी जेल मध्ये तात्याराव सावरकर यांना भेटायला त्यांच्या धर्मपत्नी येतात त्यावेळी त्यांच्या डोळ्यावर चष्मा नसतो.नजर अंधुक झालेली असते. धूसर नजरेच्या माध्यमातून आपल्या पत्नीशी होणारी चर्चा दोघांच्या नात्यातील भावूक नात्याला उंचीवर घेऊन जाते. जेल मधील भेटीची वेळ संपल्यावर माई सावरकर निघतात अन् अगदी शेवटच्या क्षणी तात्याराव सावरकरांना चष्मा प्राप्त होतो. चष्मा लावल्यावर आपली धर्मपत्नी दिसणार मात्र तो पर्यंत माई सावरकर दरवाजाचा उंबरठा ओलांडून गेलेल्या असतात. आपल्या पत्नीला पाठमोरे बघून तात्याराव सावरकर यांच्या आयुष्यातील अपूर्णता रणदीप हुड्डा यांनी आपल्या अभिनयाने अप्रतिम व्यक्त केली आहे. या छोट्याश्या प्रसंगातून वंदनीय तात्याराव सावरकर यांच्या अख्ख्या आयुष्याची अपूर्णता रणदीप हुड्डा यांनी कळत नकळतपणे व्यक्त केली आहे. ग्रेट सॅल्युट..!


एखाद्या नाटकातील स्वगत आपण एक नाट्यरसिक म्हणून बऱ्याचदा बघत आलेलो आहोत.मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रणदीप हुड्डा यांनी तात्याराव सावरकर यांच्या भूमिकेच्या द्वारे हिंदू अन् हिंदुत्व याचे बौद्धिक विवेचन क्लोज कॅमेरा मध्ये जेल मध्ये असताना आपल्या चेहऱ्यावरील अभिनयाच्या द्वारे उत्तमरित्या सादर केले आहे.


ज्या अभिनेत्याने वंदनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका या चित्रपटात निभावली आहे ती भूमिका देखील लक्षात राहण्याजोगी आहे. भारत पाकिस्तान फाळणी, दंगलीच्या वेळी होणारी उद्विग्नता, होणारी संवादफेक संबंधित अभिनेत्याने खूपच छान प्रकारे प्रस्तुत केली आहे.


महात्मा गांधी अन् तात्याराव सावरकर यांची रत्नागिरी येथे घरी जी भेट होते त्यावेळचा अतिशय संयत अभिनय रणदीप हुड्डा यांनी सादर केला आहे. त्या प्रसंगातील शाब्दिक करारीपणा अप्रतिम आहे. दोन्ही व्यक्तिमत्वांमधील शाब्दिक बौद्धिक द्वंद्व विचार करायला प्रवृत्त करते.


चित्रपटाच्या शेवटी जे पॉप रॅप पद्धतीने गाणं सुरू होते त्याची खरंच आवश्यकता होती का..? हा प्रश्न मला पडला. पॉप रॅप पद्धतीच्या गाण्याऐवजी हृदयाला भिडणारं , सुमधुर चालीतील गाणं असायला हवे होते असे माझे वैयक्तिक मत आहे. स्वतः वंदनीय तात्याराव सावरकर थोर साहित्यिक शब्दप्रभू होते. त्या अनुषंगाने अर्थपूर्ण गाणं चित्रपटाच्या शेवटी असायला हवे होते.


असो, रणदीप हुड्डा अभिनित अन् दिग्दर्शित ' स्वातंत्र्यवीर सावरकर ' या चित्रपटाच्या माध्यमातून थोर साहित्यिक, समाजसेवक, जाज्वल्य विचारांचे महामेरू अशा भिन्न भिन्न भावनांना चित्रपटाच्या माध्यमातून वंदनीय तात्याराव सावरकर यांना बघितल्याचा अनुभव आला.


वंदे मातरम्


एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २४ मार्च २०२४, रविवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा