चिंतन ©️
अमूल्य देणगी
=====================
आपल्या भारतवर्षातील हिंदू संस्कृतीत स्थापित झालेल्या जैन धर्माने माझ्या मते मानव जातीला दिलेल्या अनेक सर्वोत्तम देणग्यांपैकी एक देणगी कोणती असेल तर ती आहे आहार विज्ञान..!
जैन पंथाने मानव जातीला आहार विज्ञान अंतर्गत दिलेल्या देणगीचाच भाग ' ब्याळू ' हा अत्यंत उपयुक्त अन्न ग्रहणाचा संस्कार आहे. दिवस मावळतीच्या वेळेला जेवण करणे असा याचा साधा सोपा अर्थ..! जैन पंथातील थोर ऋषी मुनींचे आहार विज्ञान बाबतीत पथ्य पाळणे खूप संयमित असते. ती त्या त्या महान ऋषी मुनींची तपश्चर्याच असते. तसे आचरण आपल्या सारखा प्रापंचिक व्यक्ती नेहमीसाठी अंगिकारने कठीणच असते.मात्र ' ब्याळू ' प्रकार तर अंगिकारने शक्य आहे.
मी स्वतः स्वतःच्या घरी , अपवादात्मक परिस्थिती वगळता नित्य नियमाने ' ब्याळू ' पाळून आहे. बाहेरच्या प्रवासात असताना, दुसऱ्यांच्या घरी मुक्कामी किंवा इतर ठिकाणी रात्रीच्या जेवणासाठी गेलो असताना यावेळी मात्र ' ब्याळू ' अंगिकारने शक्य नसते. तेवढी लवचिकता पाळून आहे.
माझे स्व.तीर्थरूप वडील नेहमी संध्याकाळी जेवण करत असायचे.माझ्या माहितीनुसार आजच्या घडीला आमच्या पालखेड गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व तीर्थस्वरूप अंबादास पाटील शेळके अन् गावातील जैन धर्मातील काही ज्येष्ठ कित्येक वर्षांपासून संध्याकाळीच जेवण करतात. माझे संपूर्ण कुटुंब तीर्थस्वरूप अंबादास पाटील शेळके अन् पालखेड गावातील जैन धर्मातील ज्येष्ठ यांच्या विषयी अत्यंत आदर बाळगून आहे.
पालखेड येथे माझे बालपण आमच्याच गल्लीतील जैन पंथातील माता, भगिनी, ज्येष्ठ, बंधू अन् अनेक बालमित्रांच्या सहवासात अनौपचारिक आयुष्य जगत असताना व्यतीत झालेलं आहे. त्यामुळं पवित्र जैन संस्कृती जवळून बघता आली. हिंदू संस्कृती अथांग स्वरूप व्यापून आहे. भारतवर्षाला तिनं अध्यात्मिक, साहित्यिक, आचरण, तत्वज्ञान, तत्ववेत्ते, अनेक पंथ इत्यादी अनेकानेक क्षेत्रात गर्भ श्रीमंत केलेलं आहे. मुळात हिंदू ही या भारतवर्षातील जीवनपद्धती आहे. त्याच हिंदू संस्कृतीतून अनेक पंथ, विचार उदयाला आलेले आहेत. त्या उदयाला आलेल्या भिन्न भिन्न पंथाची, अध्यात्मिक संस्कृतीची कुठे ना कुठे तरी नाळ जुळलेली आढळून येते.
असो, आज पासून ' पर्युषण पर्व ' प्रारंभ झाले आहे. त्यानिमित्त थोर जैन ऋषी मुनींना विनम्र अभिवादन..!
जय जिनेंद्र..!
वंदे मातरम्..!
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - २०/८/२०२५, बुधवार

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा